मराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन

Submitted by व्यत्यय on 1 March, 2014 - 04:03

जगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.
हल्ली पुस्तके छापण्याआधी त्याची संगणकीय प्रत तयारच असते. ई-पुस्तके एकदा बनवली कि त्याच्या अधिक प्रती बनवण्यास काहीच खर्च येत नाही. चिकटलेली किंवा अनुक्रमानुसार न बांधली गेलेली पाने अशा चुका होत नाहीत. वाहतूक किंवा साठवणूक खर्च होत नाही. दीर्घकाळ पडून राहून उंदीर, कसर, वाळवी किंवा पावसाने नुकसान होत नाही. दोन छापील आवृत्यांमधल्या कालावधीमध्ये वाचक पुस्तकं विकत घेऊ शकत नाही किंवा आपल्या गावी हव्या त्या पुस्तकाची प्रत उपलब्ध नसण्यामुळे धंदा बुडण्याचे नुकसान ई-पुस्तके टाळू शकतात. असे अनेक फायदे असूनही मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत. सध्या कित्येक चांगली पुस्तके एक आवृत्ती संपल्यावर मागणी अभावी पुन्हा छापलीच जात नाहीत. त्यामुळे ज्या तुरळक लोकांना हि पुस्तके हवीशी वाटतात त्यांची कोंडी होते. ही परिस्थिती ई-पुस्तकांच्या बाबतीत कधीच येणार नाही.
(माझं पुढचं सगळं विवेचन “मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत” या गृहितकावर आधारित आहे. हे गृहीतकच चूक असल्यास कृपया मला योग्य ते मार्गदर्शन करावे.)
याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात
1. मराठी लेखक / प्रकाशकांमध्ये अजून ई-पुस्तकांबद्दल पुरेशी जागरुकता निर्माण झाली नाहीये.
1.a. अच्युत गोडबोले यांच्यासारख्या तंत्रज्ञानावर उत्तम पकड असणाऱ्या लोकप्रिय लेखकाची प्रचंड खपाची पुस्तकेही ई-माध्यमामध्ये उपलब्ध नाहीत. यामागे माध्यमाबद्दलचे अज्ञान हा मुद्दा असेल असं मला वाटत नाही.
1.b. महाराष्ट्राबाहेरचा एक मोठा ग्राहकवर्ग ई-पुस्तकांमुळे विक्रीमध्ये मोलाची भर घालू शकतो. त्यामुळे धंद्याबद्दल जागरूक असणाऱ्या प्रकाशकांना ई-पुस्तकांबद्दल माहिती नाही हे पटत नाही.

2. मराठी प्रकाशक जाणूनबुजून ई-पुस्तके प्रकाशित करणे टाळताहेत कारण...
2.a. ई-पुस्तके हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे.
2.a.i. जर इतर भाषांमधली ई-पुस्तके आतबट्ट्याचा व्यवहार ठरत नाहीत तर फक्त मराठी पुस्तकांबाबतीत असं का होईल?
2.b. ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल.
2.b.i. ही भिती अनाठायी वाटते कारण जोपर्यंत विक्री आणि पर्यायाने उत्पन्न वाढते आहे तोपर्यंत हे उत्पन्न छापील पुस्तकांमधून येतंय कि ई-पुस्तकांमधून याने काहीच फरक पडत नाही.
2.b.ii. ज्या लोकांना छापील पुस्तक वाचायला आवडते त्या लोकांनी जरी कुतूहल म्हणून ई-पुस्तक वाचायला सुरुवात केली, तरी ते त्यांना आवडलेल्या पुस्तकाची छापील प्रत विकत घेणारच.
2.b.iii. Paulo Coelho सारखा जगप्रसिद्ध लेखक आपली ई-पुस्तके फुकट दिल्यामुळे छापील पुस्तकांचा खप वाढला यावर विश्वास ठेवतो (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/). त्यामुळे विकतच्या ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल ही भिती अनाठायी वाटते.

2.c. ई-पुस्तकांची चाचेगिरी (पायरसी)
2.c.i. तार्किक दृष्ट्या हा एकमेव मुद्दा मला योग्य वाटतो आहे. ई-पुस्तके अगदी सहज आपल्या मित्र/आप्त परिवारामध्ये वाटली जाऊ शकतात (sharing). त्यामुळे मूळ पुस्तकाचा खप कमी होणे संयुक्तिक वाटते.

आता आपण स्वामित्वहक्क (Copyrights) आणि चाचेगिरी (पायरसी) चा थोडा विचार करू.
सध्याच्या नियमांनुसार कुठल्याही लिखाणावर मूळ लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्ष त्याच्या वारसांचे स्वामित्वहक्क असतात. या कालावधीमध्ये हे लिखाण इतरांना वाटणे हा गुन्हा आहे. त्यानंतर ते लिखाण सार्वजनिक होते (Public Domain). स्वामित्वहक्काची ही संकल्पना समाजामध्ये “कलात्मक सर्जनशीलतेला” उत्तेजना देण्यासाठी राबवली जाते. पण हा उद्देश बरोबर आहे का? जर स्वामित्वहक्क बंद केले गेले तर लेखक लिहायचे थांबतील का? उद्या समजा एक कायदा झाला की जो गिर्यारोहक नवीन वाट शोधून काढेल त्याला आयुष्यभर आणि त्याच्या मृत्युनंतर ६० वर्षे त्याच्या वारसांना ती वाट वापरणाऱ्या लोकांकडून रोयल्टी मिळेल. तर असा कायदा समर्थनीय असेल का?

माझ्या मते “कलात्मक सर्जनशीलता” ही कलाकाराची खाज असते. ती लेखकाच्या स्वत:च्याच समाधानासाठी खाजवली जाते. या इथे मायबोलीवर देखील आर्थिक मोबदल्याची काहीही अपेक्षा न करता बरेच सकस लेखन केले जाते. आपल्या लेखनातून मिळणारी लोकप्रियता आणि नावलौकिक हे लेखकाला अधिकाधिक लिहायला उद्दयुक्त करतात. जर त्यातून पैसे मिळाले तर सोन्याहून पिवळे. किंबहुना लोकप्रियता आणि नावलौकिक हेच लेखकाला पैसे कमवायचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देते. जसे की नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, व्याख्याने देणे, कथाकथनादी रंगमंचीय प्रयोग करणे, निरनिराळ्या कार्यक्रमांचे संचालन करणे. इत्यादि. पण लोकप्रिय होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कलाकृती पोचायला हवी. आणि वर दिलेल्या Paulo Coelho च्या Blog अनुसार (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/) तुमची कलाकृती लोकांमध्ये आपापसात वाटली जाणे ही तुमची लोकप्रियता वाढवण्याची एक उपयुक्त संधी आहे. मुळात यातील बहुतेक जणांनी ते छापील पुस्तक विकत घेऊन कधी वाचलेच नसते त्यामुळे ई-पुस्तकाच्या जितक्या अनधिकृत प्रति आपापसात वाटल्या गेल्या तेवढ्या छापील पुस्तकांच्या प्रति कमी विकल्या जाणार हे समीकरण चुकीचे ठरते.

सध्याच्या कालबाह्य स्वामित्वहक्क कायद्यांऐवजी Creative Commons (https://creativecommons.org/) ही चळवळ मला अधिक संयुक्तिक वाटते. Cory Doctorov (http://en.wikipedia.org/wiki/Cory_Doctorov) सारखे नामांकित लेखक या चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. तुम्ही विकिपीडिया (http://en.wikipedia.org/wiki/Creative_commons) वर देखील याबद्दल अजून वाचू शकता. http://en.wikipedia.org/wiki/Anti-copyright येथे तुम्ही स्वामित्वहक्क विरोधी भूमिका जाणून घेऊ शकाल.

निव्वळ चाचेगिरीच्या भीतीमुळे मराठी ई-पुस्तके उपलब्ध होत नाहीत हे स्वत:ला सांस्कृतिक दृष्ट्या आधुनिक समजणाऱ्या मराठी समाजाला लाजिरवाणे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
इथल्या तज्ञ लोकांची या विषयावरची मते जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी छोटासा लेखक आहे (फार चांगले लिहित नसणार ). पण मायबोलीवरून पुस्तकापर्यंत पोहोचलेला पहिला न-लेखक ...

१. गोष्टी गावाचे ई-बुक लिहिले व बुकगंगावर टाकले.. (Total buys - 2)
२. 'परदेसाई' नामक पुस्तकही टाकले. ( (Total Buys२१ ते २)
३. मायबोली तर्फे विकले: सगळी मिळून ४ ते ५ पुस्तकं ३ वर्षांमधे विकली गेली).
४. मित्रानी माझ्या कडून direct घेतलेली पुस्तके (जवळपास २०० ते ३००)

' उ उ वि' च्या निमित्ताने बर्‍याच अमेरिकन शहरात जातो.. मा बो कर व इतर भेटतात. त्यावेळी 'तुमचे पुस्तक वाचायला हवे कधीतरी' असे म्हणून विकत किंवा भेट म्हणून घेतात.. (जवळपास २००).

ईतर साईटवरून विक्रीचा प्रयत्न ((Total Buys 0 )

पुस्तक आवडल्याचे प्रत्यक्षात कळवणारे लोक (२०० ते २५०)
पुस्तक दुकानातून विक्री (जवळपास १०० असावी. एकाही दुकानदाराने ६ वर्ष झाली तरी पैसे दिलेले नाहीत).
दुकानातून पुस्तक घेऊन वाचलेले आणि माहित असलेले लोक जवळपास २५)
(यात मॅजेस्टि..., दादरचे आयडि.., अक्षरया... असेच सगळे दुकानदार आहेत... )

चर्चेला थोडी आकडेवारी असावी म्हणून देतोय... बाकी चालू द्या....

देसाई, आकडेवारी बघुन मार्केटींगचा लोचा आहे की काय असं वाटलं, तसं असेल तर उत्तम नाहीतर दुर्दैवच म्हणावं लागेल. असो.
डॉ. शिंदे तुमचं म्हणणं पटलं आणि अनुभवही.
आपण मार्केटींगमध्ये कमी पडतो का?

>> अजून kindle तरी 'देवनागरी फॉन्ट support and convert करत नाही या technical issue पाशी मी अडले आहे.

पण विकिपीडिया वर तर लिहिलंय की तिसऱ्या पिढी पासून किंडल युनिकोड दाखवू शकतं म्हणून.
http://en.wikipedia.org/wiki/Amazon_Kindle या लिंक वर "Unicode" शोधा.

माझ्याकडे किंडल नाही म्हणून मी स्वत: हे पडताळून पाहू शकत नाही. जर कोणाकडे किंडल असेल तर मी देवनागरी फाईल देऊ शकतो.

गोगा यांची आकडेवारी म्हणजे अजय यांच्या प्रयोगाचं संभाव्य फलित आहे.
म्हणूनच मी मर्ढेकरांचं नाव सुचवलं होतं. बर्‍याच कविता आधीच ऑनलाइन असल्यामुळे संग्रह कोणी विकत घेत नाहीच नाहीतरी, तेव्हा कोणाचं उत्पन्न बुडायचा प्रश्न नाही, शिवाय आणखी दोन वर्षांत ते तसेही प्रताधिकारमुक्त होणारच आहेत.

दादासाहेब फाळक्यांनी पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्रावर बनवला, शेजारच्या हरीभाऊंवर बनवला नाही. का बरं?

@टग्या : <<<पण विकिपीडिया वर तर लिहिलंय की तिसऱ्या पिढी पासून किंडल युनिकोड दाखवू शकतं म्हणून.>>> खरे आहे ते. मी शोधल्यावर दोन पुस्तके सापडली. चालीसा या पुस्तकाचे स्याम्पल पेजस डाऊनलोड केल्यावर व्यवस्थित दिसतात. आत्ता प्रश्न असा कि हे फोरम्याटिंग कसे व कोण करणार. संशोधन करावे लागेल.

>>>किन्दल या हार्डवेअर ची गरज नाही. 'किन्दल फॉर पीसी' वर पाहू शकता.

बर्‍याच कविता आधीच ऑनलाइन असल्यामुळे संग्रह कोणी विकत घेत नाहीच नाहीतरी>> मग त्यासाठी पर कवितासंग्रह पैसे घेण्याऐवजी पर कविता पैसे घ्यायचे. तसच कथा प्रकारा करता करता येइल.

शूम्पी, त्यासाठीच आयट्यून्सचं उदाहरण आलं होतं वरती.
पण हे तुला-मला कळतं ते प्रकाशकांना पुण्यात बसून कळत नसेल असं वाटतं की काय तुला? वेडी कुठली!
अगं, त्यांना कविता ऑनलाइन आणणं परवडत नाही आणि इतर कोणी आणल्या तर प्रताधिकार धोक्यात येतो!
त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत, आपण (अमेरिकेत बसून) त्याबद्दल बोलू नये.

@सुरेश शिंदे:
मी किंडल-फॉर-पीसी वापरून मी स्वत: बनवलेली मराठी .mobi फाईल वापरली तर ती एकदम सुसाट चालली. काहीच अडथळा आला नाही.

मराठी .mobi फाईल बनवण्यासाठी मी क्यालिबर (http://calibre-ebook.com/) हे ओपन सोर्स app वापरलं.
क्यालिबर हे खूप लोकप्रिय आहे. You can use Calibre to convert between various file formats like epub, mobi, pdf, lit and so on.

तुम्हाला क्यालिबर संदर्भात काही मदत हवी असल्यास मला सांगा. मी एका पायावर तयार आहे.

ज्या कोणाला त्यांची पुस्तके मराठी मध्ये kindle, iBooks किंवा Android साठी फोर्म्याट करून हवी असतील त्यांनी मला सांगा. मी नक्कीच मदत करेन.

मी स्क्राईब्ड या वेबसाईटवर काही मराठी ई-बुक्स पाहिली होती. त्यानंतर मी माझ्या एका दीर्घकथेचं ई-बुक बनवून ते तिथे विक्रीसाठी ठेवायचा प्रयोग करून बघायचं ठरवलं. ई-बुक तयार करण्यासाठी आधी मी माझी दीर्घकथा वर्ड फाईलमध्ये बरहा फाँट (लेटेस्ट एडीशन) वापरून टाईप केली. त्यानंतर त्याची पीडीएफ फाईल बनवून ती स्क्राईब्डवर ई-बुक म्हणून अपलोड केली आणि त्या ई-बुकबद्दल माझ्या ब्लॉगवर, फेसबुक वॉलवर लिहून मित्रमंडळींना त्याबद्दल कळवलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं, की इंटरनेट एक्स्प्लोरर सोडला तर इतर कोणत्याही ब्राऊजरमधून त्या पीडिएफ फाईलमधला फाँट व्यवस्थित दिसत नव्हता. (इथे काही पानं वाचकांना फुकट वाचण्यासाठी खुली ठेवता येतात.)

मग त्यात नेमका काय तांत्रिक घोटाळा झाला आहे ह्याची मेल पाठवून चौकशी केल्यावर असं लक्षात आलं, की ह्या पीडीएफमध्ये फाँट व्यवस्थित एम्बेड न झाल्याने हा प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर मी पुन्हा नव्याने पीडीएफ बनवली आणि अपलोड केली, पण तोपर्यंत बराच वेळ गेल्याने माझ्या मित्रमंडळींचा त्यातला रस संपुष्टात आला होता. आता काही ब्राऊजर्समधून माझ्या ई-बुकमधला फाँट व्यवस्थित दिसतो, तर काही ब्राऊजर्समधून सगळी अक्षरं विखुरलेली दिसतात.

अजून माझ्या ई-बुकला अपलोड करून एक महिनाही पूर्ण झालेला नाही, पण असं धड न वाचता येणारं ई-बुक कोण विकत घेईल? त्याशिवाय वेबसाईटने दिलेल्या ऑप्शननुसार (पायरसी रोखण्यासाठी) मी माझं ई-बुक कोणाला डाऊनलोड करता येणार नाही, नुसतंच कॉम्प्युटर, मोबाईल, आयपॅडवर वाचता येईल असा ऑप्शन दिलेला आहे, पण त्यासाठीही वेबसाईटवर लोकांना प्रत्यक्ष साईन ईन करावं लागतं. अशा परिस्थितीत किती लोक ते विकत घेऊन वाचतील याची शंकाच आहे, पण सध्या काही महिने तरी मी हा प्रयोग करून बघणार आहे. (या वेबसाईटवर पीडीएफ अपलोड करतांना ती प्रोटेक्ट करता येत नाही.)

जर युनिकोड फाँट व्यवस्थित वाचता येईल, लोकांपर्यंत सहज पोहोचू शकेल, सहज वाचता येईल पण पायरसी रोखू शकेल असं अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध झालं, तर तिथे माझं ई-बुक विक्रिकरता ठेवायला मला आवडेल.

दीपगृह,
फायरफॉक्सच्या रिसेंट मोबाईल्/टॅब अपडेटमधे मराठी दिसण्याची वाट लागलेली आहे.
पीसी/लॅपीवर व्यवस्थीत दिसतं.
फाफॉला अनेकदा फीडब्याक देऊन उपयोग नाहिये. काने मात्रे उकार ऋकार वेगळेच दिसतात.
नाईलाज.
*
इबा,
त्रस्त स्वाती, शांत हो << +१ Proud

माझ्याकडे iphone वर 3D classic Literature Collection version 1.1.5 हे फुकट app आहे. Ideal Binary Ltd नावाच्या कंपनीने बनवले आहे. अत्यंत सोपे आणि प्रत्यक्ष पुस्तक-वाचनाच्या अगदी जवळ जाईल असे app आहे.
जवळ्-जवळ १०० classics फुकट उपलब्ध आहेत.

कुणी मराठी ग्रंथालय app वापरलेय का?

@दीपगृह: लहान तोंडी खूप मोठा घास घेतोय त्या बद्दल क्षमस्व. पण लोकांना तुमचं पाहिलं पुस्तक तरी आपापसात फुकट वाटू दे. त्याने तुमची लोकप्रियता वाढेल (गृहीत धरू की तुमच्या लिखाणाचा दर्जा चांगलाच आहे) . जास्तीत जास्त लोकांना कळू दे की एक ताज्या दमाचा लेखक मस्त लिहितोय. मगच तुमची नंतरची पुस्तकं लोकं विकत घ्यायला तयार होतील.

जे के रोलिंग यांनी Harry Potter नंतर टोपण नावाने The Cuckoo's Calling हे पुस्तक बाजारात आणले तेव्हा ते जेमतेम खपले. पण जेव्हा लोकांना कळले की हे जे के रोलिंग यांचे पुस्तक आहे तेव्हा ४७०९ व्या क्रमांकावरून ते पहिल्या क्रमांकावर आले. (http://en.wikipedia.org/wiki/The_Cuckoo%27s_Calling#Sales_and_reception)

नवोदित लेखकांची दर्जेदार पुस्तकेही बऱ्याचदा विकली जात नाही कारण लोकप्रियता आणि नाममहात्म्य त्यांच्याकडे नसते.

जर तुम्ही मार्केटींगसाठी मोठी पदरमोड करणार नसाल तर तुमचे विक्रीचे आकडे "गोष्टीगावाचे" यांनी वर सांगितल्या पेक्षा फारसे वेगळे येणार नाहीत. पण निदान फुकट वाटल्याने का होईना तुमचे लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्याने जी तुमची लोकप्रियता वाढेल ती तुमच्या पुढच्या लिखाणसाठी उपयोगी ठरेल असे मला प्रामाणिक पणे वाटते.

मी मूळ लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्ही http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/ ही लिंक वाचाच. रशिया मध्ये फारसे माहित नसलेले Paulo Coelho यांच्या पुस्तकांचा खप तिथला त्यांनी फुकट ई-बुक्स द्यायला लागल्यावर कित्येक पटींनी वाढला.

तसेही तुम्हाला तुमच्या श्रमाबद्दल आता फारसा मोबदला मिळत नाहीच आहे. बाकी सर्व उपाय थकल्यावर हा पण एक उपाय करून बघा.

माझ्या आगाऊपणाबद्दल पुन्हा एकदा मन:पूर्वक माफी मागतो.

@ टग्या,
मी याआधी विविध नियतकालिकांतून केलेलं लेखन माझ्या ब्लॉगवर लोकांना वाचण्यासाठी टाकलेलं आहेच. त्याशिवाय निव्वळ लोकांना उपयोग व्हावा म्हणून काही लेख मी ब्लॉगवर लिहिलेले आहेत, ते सर्वांसाठी उपलब्ध आहेत आणि त्यातल्या माहितीचा लोक उपयोगही करून घेतात. त्यांच्या कॉमेंट्सवरून मला फीडबॅक मिळतो. ब्लॉगमधला लोकांना उपयोगी असलेला जो मजकूर कॉपी केला जातो, त्याची नोंद मला मिळते. त्यामुळे मी आता माझं ई-बुक विक्रीसाठी ठेवायचा निर्णय घेतला. शिवाय ई-बुकचा हा प्रयोग करून बघण्यामागे अजून काही कारणं आहेत. सध्या ई-बुकच्या विश्वात नेमकं काय आणि कशा पद्धतीने चालतं हे मी आजमावून पाहत आहे. त्यावरून माझं पुढचं पुस्तक ई-बुकच्या स्वरूपात विक्रीसाठी ठेवायचं की प्रत्यक्ष प्रकाशित करायचं, हे मी ठरवेन. सध्या मी फक्त ई-बुकचा ऑप्शन आजमावून बघत आहे.

इ बुक फ्युचर आहे आणि पेपर बुक्स पुढं वाचलीच जाणार नाहीत ही भिती व्रुथा आहे असं सध्या लक्षात आलय. सुरुवातीला जेव्हा इबुक्स बाजारात आली तेव्हा एका ठरावीक वर्गाने त्याचा अत्यंत उदोउदो केला. त्यामुळ इबुक्स पॉपुलर झाली. मार्केट जस जसं सेटल होत जात आहे तस तस रेग्य्लर पुस्तकांना इबुक्स पेक्षा जास्त मागणी आहे हे कंसिस्टंटली दिसून आले आहे. इबुक्स , रेग्युलर पुस्तक वाचन्याच समाधान मिळवून देवू शकत नाही, पुस्तक शेल्फ वर असन हे लोकांना मानसिकदृष्ट्या अधिक पॉझिटिव्ह आणि वाचण्यासाठी अधिक इनकरेजिंग वाटत हे त्यामागच्या अनेक कारणांपैकी मह्त्वाची कारणं. इबुक्स हे थोड ऑडिओ बुक्सच्या बुम सारख वाटतय. म्हणजे सुरुवातीला टेकी लोक उड्या मारत होती त्यावर पण हार्ड कोअर वाचक परत पेपर बुक्स कडेच वळला.

जर पर्सेटेजच प्रमाण बघितल तर २०१२ पासून इबुक्स वाचकांची संख्या कमी होताना दिसतीये. इबुक्स वाचणारे लोक आणि पेपर बुक्स वाचणारे लोक संपुर्णपणे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. एकाच्या संख्या वाढीमुळ दुसर्‍यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. वाचन ही क्रिया फक्त त्या मजकुरापुरती मर्यादीत नसून , तर पान उलटण, पानाचा स्पर्श इत्यादी गोष्टींशी निगडित आहे. थोडक्यात ऑनलाईन शॉपिंग सारखं. तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून टिव्ही वगैरे गोष्टी विकत घेता. परंतू कपडे, फुड घेण्यासाठी अजुनही brick and mortar स्टोअर च प्रेफर करता. स्पर्श आनि गंध मार्केटींगचे फार मोठे फॅक्टर आहेत. इबुक्स तो आनंद रिप्लेस करु शकत नाहीत.

जेव्हा टिव्ही आला तेव्हा रेडीओ थोडक्या काळापुरता अनपॉप्युलर झालेला. रेडिओ आता कोण ऐकनार? अशा कमेंट्स ऐकायला मिळत होत्या. मधल्या काळामध्ये रेडिओ इंडस्ट्रीला बराच सेट बॅक पण बसलेला. पण Look at us now!!!. टिव्ही आणि रेडिओ दोन्ही इंडस्ट्रीजची ग्रोथ तितक्याच वेगाने चालू आहे.
so वर जी सतत भिती व्यक्त केली जातीये , जर सोशल अ‍ॅनालायसिस च्या दृष्टीने पाहिलत तर फारस पोटँशिअल नसलेली आहे. इबुक्स फ्युचर आहे. पण हार्ड बुक्स कुठेही जाणार नाहीत.

(आकडेवारी आणि इतर फॅक्ट्स हवे असतील तर अमेरिकन पब्लिशिंग असोसिएशन ने आकडेवारी जाहीर केली आहे ती वाचून पहा. वरील सर्व मत माझी आहेत. सगळ्यांना ती पटतीलच असे नाही.)

सुलू, अरे वा! छान बातमी आहे!

सीमा, होय छापील पुस्तकं एकदम नाहीशी होतील असं नाही पण ई-बुक्स वापरणं देखील अधिकाधिक सुलभ होत जाणार आहे. उदा. मी barrons's चं जाडजूड पुस्तक घेऊन GRE ची तयारी केली पण आता त्यासाठी एक app निघालंय! मग कोण घेऊन बसेल Barron's? आणि पुढची पिढी जी जास्ती screen savvy आहे ती कदाचित ई-बुक्स ना अधिक पसंती देईल.

आजच एका नवीन app बद्दल कळलं! Magzster म्हणून त्यावर बरीच मासिकं आणि पुस्तकं उपलब्ध आहेत. वापरायला छान आणि सोप्पे आहे! ज्यांना आपली पुस्तके ई बुक म्हणून प्रकाशित करण्याची इच्छा असेल त्यांनी ह्या अशा तयार व्यासपीठांचा उपयोग करावा! म्हणजे नवख्या माणसाला येणारे glitches कमी होतील. शिवाय प्रताधिकार इत्यादी कायदेशीर बाबींची अधिक चांगली काळजी घेता येईल.अजूनही अशी काही apps असतील तर इथे सांगा. सगळ्यांनाच फायदा होईल!

how to publish an ebook असे गूगल केले असता बरेच पर्याय दिसतात. मी स्वतः काही वापरलेले नाही, फक्त एक पर्याय सांगितला.

>>पण हे तुला-मला कळतं ते प्रकाशकांना पुण्यात बसून कळत नसेल असं वाटतं की काय तुला? वेडी कुठली! अगं, त्यांना कविता ऑनलाइन आणणं परवडत नाही आणि इतर कोणी आणल्या तर प्रताधिकार धोक्यात येतो! त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत, आपण (अमेरिकेत बसून) त्याबद्दल बोलू नये.
Happy

>>नवोदित लेखकांची दर्जेदार पुस्तकेही बऱ्याचदा विकली जात नाही कारण लोकप्रियता आणि नाममहात्म्य त्यांच्याकडे नसते.जर तुम्ही मार्केटींगसाठी मोठी पदरमोड करणार नसाल तर तुमचे विक्रीचे आकडे "गोष्टीगावाचे" यांनी वर सांगितल्या पेक्षा फारसे वेगळे येणार नाहीत. पण निदान फुकट वाटल्याने का होईना तुमचे लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्याने जी तुमची लोकप्रियता वाढेल ती तुमच्या पुढच्या लिखाणसाठी उपयोगी ठरेल असे मला प्रामाणिक पणे वाटते.

+१०० अचूक!

कुण्याही सोम्या गोम्याचे साहित्य निवळ ई-बूक म्हणून विकले जाणार नाहीच. मुळात लेखक किंवा व्यासपीठ हे थोडेतरी प्रस्थापित नाव वा ब्रँड असेल तरच 'खप' होईल. त्यातही फक्त ई-बूक्स हाच फक्त पर्याय ऊपलब्ध करून दिला तर खपाची संख्या अधिक वाढेल. अन्यथा जे ब्लॉग वर वा नेट वर ऊपलब्ध आहे तेच पुन्हा ई-बूक्स च्या माध्यमात देऊन हाशील काय? आणि प्रस्थापित नावे व त्यांचे साहित्य प्रताधिकाराच्या मुद्यामूळे बाद ठरतात. खेरीज स्वतःची प्रकाशनाची मोनोपॉली/मार्केट ई-बूक्स च्या माध्यमातून प्रकाशित करणे ही 'पायावर कुर्‍हाड' कोण प्रकाशक मारून घेईल? तेव्हा नविन लेखक, नविन साहित्य (म्हणजे ज्यात खरोखरीच काहितरी नाविन्य आहे...), हे आधी प्रस्थापित होणे गरजेचे आणि मग ई-बूक्स माध्यम हे त्याचे पुढील प्रस्तारण होऊ शकेल.
मला वाटते निव्वळ छापिल चे ई- माध्यमात रुपांतर करणे एव्हडाच ऊद्द्देश असेल तर प्रयोग करायची गरज नाही-- निक्काल लागलेलाच आहे! पण जे छापिल आहे त्याचे वेग वेगळ्या ई माध्यमातून प्रकाशन करायचे असे ठरवले तर भरपूर वाव आहे. ऊ.दा. नावाजलेल्या कविच्या कविता त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रीत करून त्याच्या ऑडीयो फाईल्स ऊपलब्ध करून देणे.. अगदी जमल्यास व्हिडीयो फाईल्स देखिल. किंवा नावाजलेले अभिनेते ई. यांचेकडून नावाजलेल्या कथा कादंबर्‍या साहिय्त यांचे वाचन करून ते ऑडीयो/व्हिडीयो स्वरूपात ऊपलब्ध करून देणे.. थोडक्यात जे आधीच प्रकाशीत झाले आहे ते अधिक सकस व विशेष स्वरूपात वाचकांना ऊपलब्ध करून दिले तर 'धंदा' या अर्थी तो व्यवसाय होऊ शकेल. अगदी एव्हडेच करायचे ठरवून २०१२ साली सुरुवात केली. पण प्रताधिकार परवानगी, मग पुनः प्रकाशनातील कायदेशीर बाबी, अगदी लाख रूपये मोजून संपूर्ण मूळ प्रताधिकार विकत घेण्याचा प्रयत्न, हे सर्व करून पाहिले पण निव्व्वळ प्रताधिकार, जुनाट नियमावली, नविन माध्यमातून प्रकाशन करण्यासाठी आवश्यक सर्वसमावेशक नियमावली चा अभाव ईथेच गाडी अडकून पडली.

बाकी परवडत नाही हा मुद्दा अगदीच 'पळवाट' आहे. $१००० चा फोन कुणाला परवडेल? हे असले विचार स्टीव्ह जॉब ने केले नाहीत म्हणून बरे नाहीतर आजही आपण ट्रिंग ट्रिंग किंवा वॉकी टॉकी वर बोलत असतो.. तेव्हा, मार्केट नाही, धंदा होत नाही, या ऊदासीन दृष्टीकोन असणार्‍यांसाठी सोयीस्कर पळवाटा आहेत. आजच्या जमान्यात 'मार्केटींग' शिवाय कुठल्याही ई-साहित्याला पर्याय नाही.

तेव्हा, खरोखरच प्रयोग करायचा असेल तर नेमके कुठले व कुणाचे साहित्य, काय स्वरूपात ते द्यायचे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाचक वर्ग नेमका कोण हे ठरवावे लागेल. ते एकदा ठरले की बाकी तांत्रिक बाबी व धंदेवाईक मूल्यमापन हे निव्वळ व्यावसायिक सोपस्कार ठरतील.

मी वैयक्तीक ईथे चिमण या आय्डीला त्याच्या मायबोलीवरील खुस्खुशीत विनोदी लेखमालांची व.पु. स्टाईल ऑडीयो कथाकथन मालिका करूयात अशी तेव्हा ऑफर देखिल दिली होती. पण त्याने काही कारणाने त्यात रस दाखविला नाही. साहित्य संमेलनात केली जाणारी भाषणे, मुलाखती, चर्चासत्रे, ही सहसा संमेलनं झाली की केराच्या टोपली जातात. तीच जर ई माध्यम audio/video स्वरूपात ऊपलब्ध करून दिली तरी साहित्य प्रेमी, रसिक लोक आनंदाने विकत घेतील. यासाठी देखिल थोडी खटपट केली होती. पण पुन्हा त्याच सर्व प्रश्णांना तोंड द्यावे लागले. आणि भारताबाहेर राहून या सर्वाचा पाठ पुरावा करणे निव्वळ अशक्य आहे. कै. कविवर्य ग्रेस यांच्या निवडक कवितांचे वाचन त्यांच्या आवाजात त्याबरोबर विश्लेषण वा मुलाखत असेही वैभव जोशी च्या माध्यमातून ठरले होते.. ग्रेस यांच्या आजारपणामूळे व नंतर त्यांच्या दु;खद निधनामूळे तेही होऊ शकले नाही. तेव्हा जमेल तसे प्रयत्न करून पाहिले. पण मुळात लेखक, वाचक व ऊद्योजक या तीघांनी ऊदासीन दृष्टीकोन बाजूला ठेवला व कसे, काय, आणि कशा नव्या स्वरूपात देता येईल, याचा एकत्रीत विचार केला तर हे नक्की शक्य आहे. व.पु., पु.ल., मर्ढेकर, ग्रेस, ई. ई..... ही दैवते आहेत पण आता बरेच वेळ लोकांना नविन दैवतांची देखिल गरज आहेच... सचिन देखिल आता 'कालचा' झाला!
innovative ways, new content, unique ways of offerring the content, will be the key..

अजय,
असे काही नाविन्यपूर्ण प्रयोग करायचे असल्यास माझा सहभाग नक्की असेल. ईथे यात स्वारस्य दाखवलेल्यांची व पुर्वानूभव असलेलेल्यांची एक निवडक टीम बनवून- साहित्य निवड, कायदेशीर बाबी, साहित्य प्रकाशनाचे स्वरूप (माझा सहभाग यात असेल), तंत्रज्ञान, मार्केटींग अशा प्रकारे यात प्रत्येकासाठी जबाब्दारी नेमूम दिली तर यातून निशीतच ठोस निर्मिती होऊ शकेल.
अर्थातच हे सर्व भाषेप्रेमापोटी फुकट करावे अशी अपेक्षा असेल तर मात्र बोलणे संपले. Happy

असामी, ललिता, यशस्विनी,
धन्स !

ज्यांना 'खरोखरीच' स्वताचे साहित्य ई-माध्यमातून (किंडल वगैरे) प्रकाशीत करायचे आहे त्यांनी हे पॉड्कास्ट पण नक्की ऐकावे:

http://www.dubaieye1038.com/business-breakfast-podcasts/
listen to: Seumas Gallacher 06.03.2014

Seumas Gallacher, Author, talks about the business and publishing your book and the importance of social media.

Coming straight from a common/not so famous banker-writer, who knew nothing about computers/technology/kindle etc.. this should be very real and very 'encouraging'. The author makes a very good point that even for e-books and with social media, there is NO susbstitue to marketing of your product.
So, treat your creation (whatever it is) as a Product and then plan a strategy to market the same!

ज्यांना यात अधिक रस आहे वा काही करायची ईच्छा असेल तर मला वैयक्तीक (वि. पु वा माब संपर्कातून) संपर्क करा. मिळुन करू काहितरी. Happy एक अनुभव येईल, बरेचसे शिकायला मिळेल, खाचा खोचा कळतील आणि सर्वात मह्त्वाचे, काहितरी 'सक्रीय' केल्याचे समाधान असेल.

Pages