मराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन

Submitted by व्यत्यय on 1 March, 2014 - 04:03

जगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.
हल्ली पुस्तके छापण्याआधी त्याची संगणकीय प्रत तयारच असते. ई-पुस्तके एकदा बनवली कि त्याच्या अधिक प्रती बनवण्यास काहीच खर्च येत नाही. चिकटलेली किंवा अनुक्रमानुसार न बांधली गेलेली पाने अशा चुका होत नाहीत. वाहतूक किंवा साठवणूक खर्च होत नाही. दीर्घकाळ पडून राहून उंदीर, कसर, वाळवी किंवा पावसाने नुकसान होत नाही. दोन छापील आवृत्यांमधल्या कालावधीमध्ये वाचक पुस्तकं विकत घेऊ शकत नाही किंवा आपल्या गावी हव्या त्या पुस्तकाची प्रत उपलब्ध नसण्यामुळे धंदा बुडण्याचे नुकसान ई-पुस्तके टाळू शकतात. असे अनेक फायदे असूनही मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत. सध्या कित्येक चांगली पुस्तके एक आवृत्ती संपल्यावर मागणी अभावी पुन्हा छापलीच जात नाहीत. त्यामुळे ज्या तुरळक लोकांना हि पुस्तके हवीशी वाटतात त्यांची कोंडी होते. ही परिस्थिती ई-पुस्तकांच्या बाबतीत कधीच येणार नाही.
(माझं पुढचं सगळं विवेचन “मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत” या गृहितकावर आधारित आहे. हे गृहीतकच चूक असल्यास कृपया मला योग्य ते मार्गदर्शन करावे.)
याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात
1. मराठी लेखक / प्रकाशकांमध्ये अजून ई-पुस्तकांबद्दल पुरेशी जागरुकता निर्माण झाली नाहीये.
1.a. अच्युत गोडबोले यांच्यासारख्या तंत्रज्ञानावर उत्तम पकड असणाऱ्या लोकप्रिय लेखकाची प्रचंड खपाची पुस्तकेही ई-माध्यमामध्ये उपलब्ध नाहीत. यामागे माध्यमाबद्दलचे अज्ञान हा मुद्दा असेल असं मला वाटत नाही.
1.b. महाराष्ट्राबाहेरचा एक मोठा ग्राहकवर्ग ई-पुस्तकांमुळे विक्रीमध्ये मोलाची भर घालू शकतो. त्यामुळे धंद्याबद्दल जागरूक असणाऱ्या प्रकाशकांना ई-पुस्तकांबद्दल माहिती नाही हे पटत नाही.

2. मराठी प्रकाशक जाणूनबुजून ई-पुस्तके प्रकाशित करणे टाळताहेत कारण...
2.a. ई-पुस्तके हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे.
2.a.i. जर इतर भाषांमधली ई-पुस्तके आतबट्ट्याचा व्यवहार ठरत नाहीत तर फक्त मराठी पुस्तकांबाबतीत असं का होईल?
2.b. ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल.
2.b.i. ही भिती अनाठायी वाटते कारण जोपर्यंत विक्री आणि पर्यायाने उत्पन्न वाढते आहे तोपर्यंत हे उत्पन्न छापील पुस्तकांमधून येतंय कि ई-पुस्तकांमधून याने काहीच फरक पडत नाही.
2.b.ii. ज्या लोकांना छापील पुस्तक वाचायला आवडते त्या लोकांनी जरी कुतूहल म्हणून ई-पुस्तक वाचायला सुरुवात केली, तरी ते त्यांना आवडलेल्या पुस्तकाची छापील प्रत विकत घेणारच.
2.b.iii. Paulo Coelho सारखा जगप्रसिद्ध लेखक आपली ई-पुस्तके फुकट दिल्यामुळे छापील पुस्तकांचा खप वाढला यावर विश्वास ठेवतो (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/). त्यामुळे विकतच्या ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल ही भिती अनाठायी वाटते.

2.c. ई-पुस्तकांची चाचेगिरी (पायरसी)
2.c.i. तार्किक दृष्ट्या हा एकमेव मुद्दा मला योग्य वाटतो आहे. ई-पुस्तके अगदी सहज आपल्या मित्र/आप्त परिवारामध्ये वाटली जाऊ शकतात (sharing). त्यामुळे मूळ पुस्तकाचा खप कमी होणे संयुक्तिक वाटते.

आता आपण स्वामित्वहक्क (Copyrights) आणि चाचेगिरी (पायरसी) चा थोडा विचार करू.
सध्याच्या नियमांनुसार कुठल्याही लिखाणावर मूळ लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्ष त्याच्या वारसांचे स्वामित्वहक्क असतात. या कालावधीमध्ये हे लिखाण इतरांना वाटणे हा गुन्हा आहे. त्यानंतर ते लिखाण सार्वजनिक होते (Public Domain). स्वामित्वहक्काची ही संकल्पना समाजामध्ये “कलात्मक सर्जनशीलतेला” उत्तेजना देण्यासाठी राबवली जाते. पण हा उद्देश बरोबर आहे का? जर स्वामित्वहक्क बंद केले गेले तर लेखक लिहायचे थांबतील का? उद्या समजा एक कायदा झाला की जो गिर्यारोहक नवीन वाट शोधून काढेल त्याला आयुष्यभर आणि त्याच्या मृत्युनंतर ६० वर्षे त्याच्या वारसांना ती वाट वापरणाऱ्या लोकांकडून रोयल्टी मिळेल. तर असा कायदा समर्थनीय असेल का?

माझ्या मते “कलात्मक सर्जनशीलता” ही कलाकाराची खाज असते. ती लेखकाच्या स्वत:च्याच समाधानासाठी खाजवली जाते. या इथे मायबोलीवर देखील आर्थिक मोबदल्याची काहीही अपेक्षा न करता बरेच सकस लेखन केले जाते. आपल्या लेखनातून मिळणारी लोकप्रियता आणि नावलौकिक हे लेखकाला अधिकाधिक लिहायला उद्दयुक्त करतात. जर त्यातून पैसे मिळाले तर सोन्याहून पिवळे. किंबहुना लोकप्रियता आणि नावलौकिक हेच लेखकाला पैसे कमवायचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देते. जसे की नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, व्याख्याने देणे, कथाकथनादी रंगमंचीय प्रयोग करणे, निरनिराळ्या कार्यक्रमांचे संचालन करणे. इत्यादि. पण लोकप्रिय होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कलाकृती पोचायला हवी. आणि वर दिलेल्या Paulo Coelho च्या Blog अनुसार (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/) तुमची कलाकृती लोकांमध्ये आपापसात वाटली जाणे ही तुमची लोकप्रियता वाढवण्याची एक उपयुक्त संधी आहे. मुळात यातील बहुतेक जणांनी ते छापील पुस्तक विकत घेऊन कधी वाचलेच नसते त्यामुळे ई-पुस्तकाच्या जितक्या अनधिकृत प्रति आपापसात वाटल्या गेल्या तेवढ्या छापील पुस्तकांच्या प्रति कमी विकल्या जाणार हे समीकरण चुकीचे ठरते.

सध्याच्या कालबाह्य स्वामित्वहक्क कायद्यांऐवजी Creative Commons (https://creativecommons.org/) ही चळवळ मला अधिक संयुक्तिक वाटते. Cory Doctorov (http://en.wikipedia.org/wiki/Cory_Doctorov) सारखे नामांकित लेखक या चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. तुम्ही विकिपीडिया (http://en.wikipedia.org/wiki/Creative_commons) वर देखील याबद्दल अजून वाचू शकता. http://en.wikipedia.org/wiki/Anti-copyright येथे तुम्ही स्वामित्वहक्क विरोधी भूमिका जाणून घेऊ शकाल.

निव्वळ चाचेगिरीच्या भीतीमुळे मराठी ई-पुस्तके उपलब्ध होत नाहीत हे स्वत:ला सांस्कृतिक दृष्ट्या आधुनिक समजणाऱ्या मराठी समाजाला लाजिरवाणे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
इथल्या तज्ञ लोकांची या विषयावरची मते जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोपर्यंत निदान पदरमोड करून पुस्तक छापावे लागत नाही तोपर्यंत अनायास पुस्तक छापले जाणे एक मानसिक गरज भागवते. नाहीतर लेखनव्यवहार मनातच राहिला असता !

>विनोदाचा भाग वगळून - याचा चालू चर्चेला कसा उपयोग होणार हे समजत नाहीये.
यात स्वतःच लेखक प्रकाशक असेल.

१) आपले कुठले लेखन ईबुक वर चालेल हे कळेल. ईबुकच्या मार्केटचा नसला तरी स्वतःच्या मार्केटचा अंदाज येईल.

२) स्वत:च्या वाचकवर्गाशी थेट संपर्क. ब्लॉगवर सहज सर्फींग करणारा वाचकवर्ग वेगळा. पिंक टाकल्यासारखी "मस्त" प्रतिसाद टाकणारा वाचकवर्ग वेगळा. पण पुस्तक डाऊनलोड करून वाचून संपर्क करून अजून वाचायला द्या म्हणणारा वाचकवर्ग वेगळा.

या प्रयोगातून एकूणच प्रकाशन उद्योगाबद्दल काही ठोस समजणार नाही, पण त्या त्या लेखकापुरता मार्केटचा अंदाज येऊ शकेल.

>प्रकाशक हवेत कशाला?
प्रकाशकांची गरज दिवसेंदिवस बदलत चाललीय. मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचायची संधी, संपादकीय संस्करण, पुस्तकांचं प्रेझेंटेशन आणि मार्केटींग या गोष्टी पूर्वी प्रकाशक करत आणि आताही त्याची गरज आहे.
पूर्वी व्यावसायिक गणित जोडण्यासाठी मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचणे जास्त आवश्यक होते. आता कदाचित योग्य त्या वाचकवर्गापर्यंत पोहोचलो तर छोट्या प्रमाणातही गणित जुळवता येतात आणि यातली काही कामं लेखक स्वतः करू शकतो.

होय अजय, माझ्या गद्य-लेखनावर हा प्रयोग करायला मी तयार आहे. अनेक कवी-कवितांवर मी लिहिलं आहे ( अ) आणि काही काव्येतर विषयांवरही (ब) असा काहीसा विचार मनात येतोय.एवढंच की ही चर्चा मी आत्ताच वाचली , आणि गेल्या दोन वर्षांपेक्षाही कमी काळातच माझं हे लेखन झालं असल्याने ते पुरेसं आहे की नाही, त्यात अजून भर मागाहून घालता येईल का असे काही प्रश्न पडत आहेत.

मस्त (आणि must) विषय आणि मस्त चर्चा!
स्वाती_आंबोळे, इब्लिस, तुमचे वाचक म्हणून दिलेले सर्व प्रतीसाद आवडले आणि १००% पटले!
अजय, तुमची भूमिका स्तुत्य आहे!
भारती ताई, लेखिका, कवयित्री म्हणून हे नवीन प्रयोग करायला तुम्ही उत्सुक आहात हे पाहून फार छान वाटले!

चिनूक्स, तुझे सगळे म्हणणे जरी १००% खरे आहे असे मानले तरी तुझ्या प्रतिसादामधला सूर काही पटला नाही. हे म्हणजे ग्राहक स्वतःहून त्याला काय हवं आहे ते सांगत असताना दुकानदाराने आपल्या तक्रारींचा पाढा त्याच्या पुढे वाचल्यासारखे वाटले! आता व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक गणितं जमून येत नसतील तर काहीतरी चुकते आहे! अशावेळी ग्राहक (वाचक) काय म्हणतोय ह्याकडे प्रकाशकांनी लक्ष द्यायचे की आपल्या अडचणींचा पाढा वाचायचा?

आता मी पण माझ्या अडचणींचा पाढा वाचणार आहे! यंदा डिसेंबर मध्ये भारतवारी नसल्याने मी ई-दिवाळी अंकांच्या शोधात होते. एके ठिकाणी मला साधारण $1.50-3.50 प्रत्येकी असे दिवाळी अंक विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसले. (ज्याची मूळ किंमत रु. 90 te 120 च्या दरम्यान होती.) ते वाचायला त्यांचा बुक रीडर download करावा लागला. शिवाय त्या साईटचे सदस्य व्हावे लागले. संपूर्ण transaction ला अजून $2-2.50 transaction fee लागली. ह्या सर्व गोष्टींना साधारणतः २ तास लागले कारण there were several glitches in the whole process!
शेवटी एकदाचा तो रीडर आणि अंक माझ्या laptop वर घेतला. तो रीडर १०० वेळा crash होई! अंक वाचणे देखील आजिबात सुखदायी नव्हते. ई-अंक बनवणाऱ्याने पाट्या टाकल्या आहेत हे कळत होते! म्हणजे समजा एक गोष्ट वाचताना ती ७९ पानावर पुढे चालू असे म्हटले असेल तर ७९ व्या पानावर भलताच मजकूर निघायचा!

त्या रीडर चे म्हणे android app देखील होते पण ते google play store मध्ये नसून third party app होते. तरीही प्रवासात वाचता येईल ह्या हेतूने ते डाउनलोड केले पण त्यामुळे माझा मोबाईल hang झाला म्हणून ते काढून टाकले!
ह्या सगळ्या अडचणींवर मात करून मी एक दिवाळी अंक वाचून काढला तो माझ्या मराठीवरच्या व्यक्तिगत प्रेमामुळे! अन्यथा इतके कष्ट मी घेतले असते असे मला मुळीच वाटत नाही! शिवाय हा माझा feedback त्या ई-बुक वाल्यांकडे पोहोचवण्यासाठी काहीही मार्ग नव्हता! एकुणात आपल्याकडे feedback and customer care ह्या गोष्टी किती सिरीयसली घेतल्या जातात हा एक वेगळाच मुद्दा आहे! अर्थात त्या ई-बुक रीडर च्या वाटेला मी पुन्हा जाणार नाहीये! गेले ते पैसे अक्कलखाती जमा! आता जेव्हा भारतात जाईन तेव्हा मिळाले तर दिवाळी अंक वाचेन! नाहीतर जाऊ दे!
चिनूक्स, आता तुला ई-अंकाच्या इतक्या कमी प्रती का विकल्या गेल्या ह्याचे उत्तर मिळाले असेल!

मला स्वतःला मराठी इ-बुक्स आणि मासिकं ह्यांची खूप मोठी बाजारपेठ दिसते आहे! भारताबाहेर राहणाऱ्या अनेकांना आपल्या मुलांना मराठीची गोडी लागावी असे वाटत असते. जर मराठीत लहान मुलांसाठी उपलब्ध असलेली पुस्तके ipad/android tablets वर मिळू लागली तर हे पालक आनंदाने घेतील. पण त्यात ढिसाळ काम नको! crash होणारे apps, payment मधले glitches हे सर्व नसले पाहिजे! पहिल्या दिवसापासून फायदा व्हावा असे होणार नाही. नीट प्रसिद्धी करावी लागेल! पण हळू हळू सगळ्याच भाषांत electronic books ची चलती असणार आहे. जे मराठी प्रकाशक बदलत्या काळाची पावले ओळखणार नाहीत ते टिकणार नाहीत!

फिल्मी संगीत क्षेत्राचं piracy मुळे बरंच नुकसान होतं. पण आता गायक गायिका स्वतःचे stage shows करतात आणि त्यात आपली गाणी गाऊन पैसे कमावतात! सिनेमा रिलीज व्हायच्या आधी त्याच्या गाण्यांच्या caller tunes इतर जाहिराती आदी मार्गाने पैसा मिळवला जातो. कोणत्याही प्रश्नांचे उत्तर असतेच ते शोधण्याची तयारी हवी. ई-बुक्सच्या बाबतीत ही मला हेच वाटते!

>> या प्रयोगातून एकूणच प्रकाशन उद्योगाबद्दल काही ठोस समजणार नाही,

मग तुम्ही हा प्रयोग का सुचवला ते कळाले नाही. :s
स्वाती म्हणतात तसे "प्रकाशकांना सल्ले द्यायच्या भानगडीत पडणार्‍यांना कायमचा धडा मिळावा" हाच हेतू दिसतो.

हा प्रयोग करायला एवढीच हरकत आहे कि यातून चुकीचे निष्कर्ष निघू नयेत.

जिज्ञासा, प्रतिसाद पटला.
माझा ही बुकगंगा रीडरबद्दल फार काही चांगला अनुभव नाही. त्यामानानी फ्लिप्कार्ट ईबुक्स चं अ‍ॅप बरच उजवं आहे. पण त्यातही मराठी पुस्तकं नाहीत. सगळे ईंग्रजी Sad
असे असूनही पुस्तकांची किंमतही परवडणारीच आहे. एक अडथळा म्हण्जे, जर पुस्तक 'विकत' घ्यायचं असेल तर डिवाईस वरून नाही घेता येत. डिवाईस वर फक्त शॉप पहाता येतं, परचेसेस मात्र पीसी/ब्राऊजर वरूनच करावं लागतं. फ्री बुक्स होतात डालो डायरेक्ट डिवाईस वर.

गुगल प्ले बुक्स आजकाल फ्री बुक्सकरताही वॅलेट सेटप करायला सांगतयं (क्रेडिट्कार्ड माहीतीसकट). अन त्यात आयपॅडवरून बुकशॉप नाही पहाता येत.

किंडल अ‍ॅप अजून नाही वापरून पाहीलं.

अ‍ॅपल च आयबुक्स आहे छान पण भारतात त्यात फक्त फ्री बुक्सच दिसतात. याबद्द्ल वर आधी लिहेलेलं आहेच.

हे सगळे ग्लिचेस जर नाहीसे झालेत तर नक्कीच आवडेल ईबुक्स वापरायला.

अजय नी जो उपाय सांगितलाय तो 'क्रमशः' कथा कादंबर्यांना जास्त चांगला लागू होतो. मी घेतयाय असा अनुभव. १०/१५ पानं (पीडीएफ) फ्री दिलेली असतात. त्यात शेवटी ईमेल अ‍ॅड्रेस असतो, पुढ्चा भाग वाचायचा असेल तर ईमेल करायचा, आधीची १०/१५ पानं + पुढचा संपूर्ण भाग/कादंबरी/दिर्घकथा ईमेलमधून अटॅच्मेंट म्हणून पाठवतात. ती पीडिएफ तुमच्या संग्रही राहाते.
बहुतेक ईसाहित्य वाल्यांचा प्रयोग होता.

अरे खरंच की वेबमा... वरतीच लिहिले होतेत, विसरुनच गेले. सॉरी हं.
असो, जिज्ञासाने आलेले प्रॉब्लेम्स लिहिलेत त्यावरुन कल्पना आली. पण पदेशात तरी ईपुस्तके उपयोगी पडतील असे वाटते. पायरसी कशी टाळता येइल ह्याचा विचार केला, अजुन तरी मार्ग नाही सुचला (मी वेबवाली नाही, नुसतेच लॉजीक लावुन प्रयत्न केला).

२०१० साली केवळ अमेरिकेतल्या प्रकाशकांना पायरसीमुळे ३ मिलियन डॉलरांचं नुकसान झालं >>>

चिनूक्स अमेरिकेत ३ च नाही १० मिलियन डॉलर पण पुस्तकांच्या विश्वात चिल्लर आहे. त्यामुळे भले भारतीय मुल्यात (आणि जरी भारतातली पूर्ण पुस्तक इंडंस्ट्री ३ मिलियनची असली तरी) ते जास्त दिसले तरी तुलना होऊ शकत नाही.

अजय,
तुमचा प्रयोग (सुचवलेला) ह्यात एक गृहितक आहे ते म्हणजे मायबोली सर्व ई वाचक वाचतात. तो चुकीचा आहे अस नम्रपणे नमुद करू इच्छितो.

आपले कुठले लेखन ईबुक वर चालेल हे कळेल. ईबुकच्या मार्केटचा नसला तरी स्वतःच्या मार्केटचा अंदाज येईल. >> परत द्विरूक्ती असेल तरी, इथे मायबोलीवर कोणी लिहिले ह्याला खूप महत्व आहे. कारण त्या त्या आयडीचे चे बॅगेज. येथील आयडींचे स्वतःचे असे फॉलोअर्स आहेत. तसेच केवळ त्या आयडीने लिहिले म्हणून आणि म्हणूनच दुर्लक्ष करणारे लोकं आहेत. ( मग भलेही लिखान दर्जेदार असो वा नसो. त्यामुळे मायबोली हे लेवल प्लेयिंग ग्राउंड नाही.

वारंवार तोच मुद्दा (मी प्रथम घेतलेला दर्जाचा) रिपिट होतोय आता कारण अगदी चिनूक्सले लिहिल्याप्रमाणे चांगले फिक्शन देखील मराठी प्रकाशित होत नाही हे सत्य आहे. प्रश्न तो आहे ई बुक वाचतील का नाही? तर आज नाही उद्या ई बुकाकडे लोकं वळणारच. हे समजायला खूप दूरदृष्टी असायची गरज नाही. प् मराठी वाचक तयार आहे का? तर इथेही अनेकजण ई बुक "हवेत" असेच म्हणत आहेत.

खरा प्रश्न आहे तो मराठी प्रकाशक तेंव्हा तयार असतील का? आज तरी नाहीत.

तसेच स्वातीने आधीच लिहिल्याप्रमाणे दिवाळी अंक आणि लिखाण ह्यांची तुलना होऊ शकत नाही. चांगल्या मार्केटिंग बद्दल मी हिंदूचे उदाहरण पहिल्या प्रतिसादात दिले आहे. त्यांनी पिडिएफ डाऊनलोड केल्यावर वाचतिल का हा मुद्दा पण उपस्थित केला आहे. वाचोत नाही तर नकोत. प्रश्न अ‍ॅव्हलेबिलिटी (पर्याय) आहे. माझ्यासहित अनेक जण कधीकधी छापिल पुस्तक विकत घेतात, पण ते नंतर आपल्या टाईपचे नाही म्हणून वाचत नाहीत. तोच न्याय ई बुकला पण हवा !

चांगले मार्केटिंग झालेले आणखी एक उदाहरण म्हणजे शिवा ट्रियॉलॉजी. सर्व रेकॉर्डस ह्या पुस्तकाने मोडली. अर्थात मराठी नाही, पण भारतीय आहे.

पिंक टाकल्यासारखी "मस्त" प्रतिसाद टाकणारा वाचकवर्ग वेगळा. >>> लोल अहो मायबोलीवरचे ९०% प्रतिसाद मग पिंकेतच गृहित धरा. बहुतेक जण मस्त, छान, अफलातून, सुंदर, वाह, किंवा Happy अशी टिकली लावून मोकळे होतात. बरेचदा केवळ "मस्त" हा प्रतिसाद देखील खूप बोलका असतो.

तुम्ही हा वाचकवर्ग आणि ई बुक वाचक वर्ग एकच आहे असे गृहित धरत आहात का?

अजय,

तुमच्या प्रतीसादातून नक्की काय सुचवायचे आहे वा काय साध्य आहे ते अजीबातच स्पष्ट होत नाहीये मला तरी.

>>>> या प्रयोगातून एकूणच प्रकाशन उद्योगाबद्दल काही ठोस समजणार नाही,

मग तुम्ही हा प्रयोग का सुचवला ते कळाले नाही. :s

+१००

बाकी ईथे टेक्नॉलॉजिबद्द्दल चे अनुभव वाचल्यावर खरे तर हे कळते की technology is not an issue. :)The real issue again to me based on my experience is the lack of approriate copyright framework in India. व्यावसायिक गणित हा मुद्दा दिसत नाही. जे छापील वाचत आहेत ते (सुविधा ऊपलब्ध असल्यास) ई पुस्तक आनंदाने वाचतील. अर्थातच छापील + ई बूक्स असे प्रकाशन करायला काहीच हरकत नाही. तूर्तास, भारतीय वाचकासाठी छापील व परदेशी वाचकासाठी ई- पुस्तक. हे अगदी शक्य आहे, फक्त ई-प्रकाशन बद्दलचे नियम, संरचना, व चौकट यात ते सध्ध्या बसत नाही. किंबहुना आधीच प्रकाशीत केलेल्या साहित्याचे पुनः ई-प्रकाशन तेही कुठल्याही फॉर्मॅट मध्ये करण्याच्या बाबतीत ठोस नियमावलीच नाही. आता बोला.

>>खरा प्रश्न आहे तो मराठी प्रकाशक तेंव्हा तयार असतील का? आज तरी नाहीत.
+१००.
आणि याचं ऊत्तर, व्यावसायिक गणित हे नसून, वर म्हटले तसे एकंदरीत नियमावलीचा अभाव हे आहे.

शिवाय मुळात कथा कादंबर्‍या कविता पेक्षा 'व्यावसायिक' क्षेत्रातील ई बूक्स ना जास्त बाजारपेठ आहे. दुर्दैवाने मराठी भाषा त्या बाजारपेठेत चालत नसल्याने एकूणात मराठी ई-बूक्स चा आवाका व धंदा हा मर्यादीत असेल हे नक्की. पण सुरुवात करायला काहीच हरकत नाही.

>तुमचा प्रयोग (सुचवलेला) ह्यात एक गृहितक आहे ते म्हणजे मायबोली सर्व ई वाचक वाचतात. तो चुकीचा आहे >अस नम्रपणे नमुद करू इच्छितो.
मायबोली सगळे वाचत नाही हे मान्य. आणि तसे मी कुठेच गृहीत धरले नाही.

>मग तुम्ही हा प्रयोग का सुचवला ते कळाले नाही
कारण इथे आपण नुसत्या कितीही गप्पा मारल्या, गृहतक धरली तरी प्रत्यक्ष कुणितरी त्या योजना अंमलात आणेपर्यंत खरी परिस्थिती काय आहे ते कसे ठरणार. का दुसर्‍या कुणितरी(प्रकाशकांनी) हे करावे असे नुसते बोलायचे आहे फक्त ? (आणि ते दुसरे कुणितरी कदाचित मायबोली वाचतही नसतील)

मी प्रयोग सुचवला कारण जगाचं कल्याण करायच्या अगोदर इथे आपल्या हातात ज्या काही गोष्टी आहे त्यापासून सुरुवात करता यावी म्हणून. ज्या ज्या गोष्टी नक्की माहिती नाही त्या पडताळून पाहणे थोड्या प्रमाणात का होईना शक्य आहे म्हणून. आपल्याला व्यावसायिक गणितं नक्की माहिती नाहीत, प्रताधिकार मिळवण्यासाठी, मूळ लेखकांना/ वारसांना असलेल्या अपेक्षा माहिती नाही आणि दुसर्‍या कुणितरी या प्रोजेक्ट्वर त्यांचे पैसे कसे खर्च करायचे हे आपण कसे सांगणार?

>खरा प्रश्न आहे तो मराठी प्रकाशक तेंव्हा तयार असतील का?
त्याबद्दल नुसतीच इथे चर्चा अपेक्षीत असेल तर मी या धाग्याबद्दल चुकीची अपेक्षा केली आहे. (ही माझी चूक असू शकेल) मला वाटले कुणाला तरी काही ठोस करायचे आहे.
नुसते ईबुक्स नाहि तर पैसे मिळवण्याच्या अशा अनेक कल्पनांबद्दल चर्चा होत असतात. बहुतेक वेळा फक्त मार्केटींग जमलं की झालं , लोकांना माहिती झालं की जिंकलीच अशा योजना असतात. पण कुठलीही योजना प्र्॑त्यक्ष आचरणात आणणारा मात्र दुर्मिळ असतो. It is all in execution and not ideas.

नसेल करायचा प्रयोग आणि नुसतेच त्याबद्दल बोलत रहायचे असेल आणि त्यातून बरे वाटणार असेल तर तसे करूया Happy

जिज्ञासा,

< हे म्हणजे ग्राहक स्वतःहून त्याला काय हवं आहे ते सांगत असताना दुकानदाराने आपल्या तक्रारींचा पाढा त्याच्या पुढे वाचल्यासारखे वाटले! आता व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक गणितं जमून येत नसतील तर काहीतरी चुकते आहे! अशावेळी ग्राहक (वाचक) काय म्हणतोय ह्याकडे प्रकाशकांनी लक्ष द्यायचे की आपल्या अडचणींचा पाढा वाचायचा?>

कोथरुडात उत्तम बुफे / थाई / इटालियन जेवण मिळणारं हॉटेल असावं, पुण्याहून अकोल्याला विमानानं जाता यावं, जगातल्या सर्व भाषांमधले चित्रपट सिटिप्राईडात प्रदर्शित व्हावेत, असं मला खूप वाटतं. मी ग्राहक आहे. पण या गोष्टी मला अजूनही मिळालेल्या नाहीत. मला जरा बरं जेवायचं असेल तर कोरेगाव पार्कात किंवा निदान डेक्कनला जावंच लागतं. अकोल्याला पुण्याहून विमानं जात नाहीत. ग्राहक असले तरी ग्राहकांची संख्या किती, ते या सेवांचा किती लाभ घेणार आहेत, याचाही विचार केला जातो. रेल्वेच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या गाड्यासुद्धा पुरेसं उत्पन्न नसेल तर बंद केल्या जातात.

तू ज्या अडचणींचा उल्लेख केलास, त्या आल्याही असतील. पण अडचणी असल्या तरी संख्या कमी आहे, हे निश्चित. उत्तम आणि दर्जेदार म्हणून गौरवल्या जाणार्‍या दिवाळी अंकांच्या किती प्रती निघतात, हे जरा शोधलं, आणि महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली, तर हे आकडे किती कमी आहेत, हे कळेल.

ईबूक म्हणजेच भविष्य वगैरे हे सर्व आजच्या सगळ्या मराठी प्रकाशकांना व्यवस्थित ठाऊक आहे. जगात काय चाललं आहे, हे त्यांना ते पुण्यात असले तरी कळतंच. पण आज जो वाचक 'आम्हांला ईबूक नाही म्हणून आम्ही वाचत नाही' असं म्हणतो आहे, तो वाचक काल ईबूक नसताना तरी पुस्तकं विकत घेत होता का, हा प्रश्नही त्यांना पडतो. महाराष्ट्रातल्या साक्षरांची संख्या आणि पुस्तकांच्या आवृत्ती यांचं प्रमाण ते बघतात. जे आहे त्यालाच जर बाजारात किंमत नाही, तर खर्च करून नवीन उत्पादन आणायचं, बरं, हे उत्पादन तरी कसं? तर जे फुकट उपलब्ध करून द्यायला अनेक ग्राहक तयारच आहेत, असं. हा धोका प्रकाशकांनी का पत्करावा?

आपण फक्त एखक-प्रकाशक-वितरक-वाचक या साखळीबद्दल बोलतो. दिल्लीत कागदाची मोठी बाजारपेठ आहे, हे व्यापारीही कागदाचा खप, ई-स्वरूपातल्या लेखनामुळे कागदाच्या खपावर होणारा परिणाम, यांवर लक्ष ठेवून असतात. मराठीतले एक प्रकाशक ग्राहकांची मागणी इत्यादीबरोबरच अशा व्यापार्‍यांशीही चर्चा करतात आणि हे महत्त्वाचं आहे.

<फिल्मी संगीत क्षेत्राचं piracy मुळे बरंच नुकसान होतं. पण आता गायक गायिका स्वतःचे stage shows करतात आणि त्यात आपली गाणी गाऊन पैसे कमावतात! सिनेमा रिलीज व्हायच्या आधी त्याच्या गाण्यांच्या caller tunes इतर जाहिराती आदी मार्गाने पैसा मिळवला जातो. कोणत्याही प्रश्नांचे उत्तर असतेच ते शोधण्याची तयारी हवी. ई-बुक्सच्या बाबतीत ही मला हेच वाटते!>

मी गैरफिल्मी संगीताबद्दल लिहिलं होतं. गेल्या पाच वर्षांत शास्त्रीय संगीताच्या किती सीड्या बाजारात आल्या? दुकानं बंद झाली. नवीन सीड्या निघत नाहीत. मुळात नवी ध्वनिमुद्रणंच होत नाहीत कारण ते संगीत लगेच फुकट उपलब्ध होतं. संगीताची विक्री हा एक उत्तम पर्याय गायकवादकांसमोर होता, तो आता बंद झालाय. चित्रपटसंगीताच्या विक्रीत येणारे अडथळे गेल्या वर्षी अनुभवले आहेत. संगीताच्या निर्मितीसाठी खर्च येतो, आणि तो भरून निघतच नाही. फुकट उपलब्ध करून द्यावं लागतं. नाही दिलं, तरी ते संगीत ऑनलाइन येतंच.

हा लेख फक्त ईबुकांपुरताच मर्यादित राहिला असता, तर प्रकाशकांची पायरसीबद्दलची भीती अनाठायी आहे, असं म्हणतातरी आलं असतं. इथे कॉपीराइट आणि फुकट वाटपाबद्दल जे लिहिलं गेलं आहे, त्यावरून प्रकाशकांना 'अगोदरच खप नाही, त्यात ईबूक फुकट आल्यानं खप कमी होईल, त्याचं काय?' असं वाटलं, तर चूक काय?

***

'कोणत्याही प्रश्नांची उत्तर शोधण्याची तयारी हवी, तुम्ही प्रयत्नच करत नाहीत' हे वर्षानुवर्षं मराठी प्रकाशकांना आणि चित्रपटनिर्मात्यांना ऐकवलं जातं. गेल्या अनेक वर्षांत या दोन जमातीच हुशार का झाल्या नाहीत, त्यांच्या चुकांमधून काहीच कसं शिकल्या नाहीत याचं मला फार्फार आश्चर्य वाटतं. Proud

'कोणत्याही प्रश्नांची उत्तर शोधण्याची तयारी हवी, तुम्ही प्रयत्नच करत नाहीत' हे वर्षानुवर्षं मराठी प्रकाशकांना आणि चित्रपटनिर्मात्यांना ऐकवलं जातं. गेल्या अनेक वर्षांत या दोन जमातीच हुशार का झाल्या नाहीत, त्यांच्या चुकांमधून काहीच कसं शिकल्या नाहीत याचं मला फार्फार आश्चर्य वाटतं. <<<
Lol

माझ्या मते, मुळात इपुस्तकं विकत घेणारे कमीच राहणार. कारण पायरसी किंवा इमेलने ही पुस्तके सहज इथुन तिथे पोहचतात. पण आता धोका हा हि आहे की जर इपुस्तके प्रकाशकांनी बनवली नाही, तर ती वाचक बनवतील (स्कॅन करुन) अन पोहचवतील आणि प्रकाशक काहीच करु शकणार नाही.

अनेक मासिकं (इंग्रजी समजा वाटल्यास) इ-स्वरुपात येवुनही टिकली आहे, इतकच नव्हे तर त्यांचा व्यवसाय वाढतोय. तसाच प्रयोग मराठी पुस्तकांबाबत का करु नये. म्हणजे जाहिरातीसहित पुस्तक किंवा ३० सेकंदाची जाहिरात आणि पुढे काही पानांची लिंक, असं करुन कमी किंमतीत किंवा अगदी मोफतही पुस्तकं उपलब्ध केले तरी नुकसान होईल का?

प्रश्न attitude चा आहे. करायचे असेल, तर कसे करायचे याचे अनेक मार्ग सापडतील किंवा रडणार्‍यांना खांदे मिळायला फारसा त्रास होत नसतोच. Happy

ज्यांना खरंच एवढी स्पष्टता आहे आणि ज्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत ते का बरे एखाद्या प्रकाशकाला वा निर्मात्याला गाठून त्याचा सल्लागार म्हणून काही काळ काम करत नाहीत?
सिरीयसली विचारतेय.

मायबोलीवरचे तुलनेने अप्रसिद्ध लेखक/कवी यांच्या लेखनावर प्रयोग करण्याबरोबरच आपण जे प्रसिद्ध लेखन आधीच public domain मध्ये आहे ते वापरून प्रयोग करू शकतो. उदाहरणार्थ माझ्या माहितीनुसार साने गुरुजींचे सर्व साहित्य आता public domain मध्ये आहे. इथले तज्ञ अशा प्रसिद्ध लेखकांची आणि त्यांच्या लेखनाची सूची तयार करू शकतात.
जी पुस्तके आता "Out Of Print" आहेत आणि ज्यांची नवीन आवृत्ती येण्याची फारशी शक्यता नाही अशी पुस्तके आपण कोणाचंही आर्थिक नुकसान न होता ई मध्यमा मध्ये आणू शकतो. मी शोधत असलेले "मासे आणि मी" हे गोपाळ कृष्ण भोबे यांचे पुस्तक या कक्षेत येऊ शकते. इथे मायबोलीवर एक वेगळा धागा काढून त्यावर लोकं अशी पुस्तके सुचवू शकतात. प्रकाशन व्यवसायामधली तज्ञ मंडळी अशा पुस्तकांचे copyights ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची परवनागी घेऊ शकतात.

माझ्यासारखे तंत्रज्ञानाबद्दल थोडीफार जाणकारी असणारे लोकं या लेखनाची PDF, EPUB, MOBI बनवू शकतो.

विजय देशमुख यांनी वर म्हटल्याप्रमाणे आपण PDF ची काही पाने जाहिरातींसाठी वापरू शकतो.
५०० रुपये भरा आणि ५० ई-पुस्तके मिळावा अशी एखादी सवलत जाहीर करू शकतो.

आता प्रश्न असा उरतो की या उपक्रमासाठी कोणीही विनामोबदला या लष्कराच्या भाकऱ्या का भाजाव्यात?
विकिपीडिया हा ज्ञानकोश अधिकाधिक माहितीपूर्ण करण्यासाठी काही मंडळी विनामोबदला झटत आहेतच. तसेच आपल्या उपक्रमासाठी देखील आपल्याला स्वयंसेवक मिळवावे लागतील. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांतर्गत प्रकल्प करावे लागतात. अश्या विद्यार्थ्यांचा आपल्या उपक्रमाला काही फायदा होईल का याचे प्रयत्न सुद्धा आपण करू शकतो.

मला खात्री आहे की या विषयावर अजून विचारमंथन झाले तर अजून कल्पना सुचू शकतील. बघा पटते का.

< ज्यांना खरंच एवढी स्पष्टता आहे आणि ज्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत ते का बरे एखाद्या प्रकाशकाला वा निर्मात्याला गाठून त्याचा सल्लागार म्हणून काही काळ काम करत नाहीत? सिरीयसली विचारतेय. >

नीधप :- नक्कीच प्रयत्न करतो. फार फार तर (धक्के देउन) बाहेर काढतील, अजुन काय होईल. Happy

>>
मला वाटले कुणाला तरी काही ठोस करायचे आहे.
...
नसेल करायचा प्रयोग आणि नुसतेच त्याबद्दल बोलत रहायचे असेल आणि त्यातून बरे वाटणार असेल तर तसे करूया
<<

अजय, तुमच्या आधीच्या पोस्टमधे 'या प्रयोगातून एकूणच प्रकाशन उद्योगाबद्दल काही ठोस समजणार नाही' असा तुम्हीच स्पष्ट उल्लेख केलेला असताना आणि तीन आयडीजनी तातडीने प्रयोगात रस दाखवलेला असताना हा कांगावा (सॉरी, तुमच्याबद्दलच्या आदरामुळे हा शब्द वापरताना मला वाईट वाटतं आहे, पण दुसरा चपखल शब्द सुचत नाही) चुकीचा आहे. असो.

एकूण या चर्चेतून माझ्यासारखे वाचक मराठी प्रकाशकांच्या (खिज)गणतीत नाहीत असा बोध मला झाला. त्यांना वाचनालयांसाठीच पुस्तकं छापायची असतील तर त्यांची मर्जी.
तसंच प्रकाशक किंवा चित्रपटनिर्माता बुडताना दिसला तरी तिकडे दुर्लक्ष करावं हाही बोध झाला. तुम्ही काही सांगायला गेलात तर 'तुम्ही आमच्यासारखं पोहता येत नसताना पाण्यात उडी मारून दाखवा' असं उत्तर मिळण्याची किंवा 'आले "मदत" करायला' अशी दुहेरी अवतरणालंकृत संभावना व्हायची शक्यता जास्त.

सर्व चर्चा वाचून काढली.
फुकट ते पौष्टीक असे असंख्य लोकांचे तत्व आहे ई जमान्यात. Sad
अर्थात पायरसी पुर्वी नव्हती असे नाही.
अनेक प्रकारची पुस्तके स्वस्तात छापून ती परस्परच स्वस्तात विकली जात असत.
लेखक, प्रकाशक लोकांना पत्ता देखील लागायचा नाही.
अशी पुस्तके रस्ते का माल सस्ते मे वाल्या विक्रेत्यांकडे असायची.
तेव्हा हे असले फुकटे उद्योग रोखण्यासाठी किमान आळा घालून लेखक, प्रकाशकांसाठी आश्वासक वातावरण कसे निर्माण व्हावे याचा विचार अवश्य झालाच पाहिजे.
पण त्यासाठी पुर्णपणे फुकटात ईबुक्स उपलब्ध करून देणे हा उपाय रोगापेक्षाही भयंकर वाटतो आहे. Sad

केदारचा मायबोली हे level playing field नाही हा मुद्दा एकदम चपखल आहे. अजय ने सुचवलेले प्रयोग करताना तेव्हढी sample space असायला हवी म्हणजे ५-६ जणांचे लिखाण तरी त्याच process मधून जायला हवे जर काहि निष्कर्ष काढायचेच असतील तर.

अजेय,

मी सर्व चर्चा वाचली. मला जे वाटते ते असे …
१. फार पूर्वी लेखक लिहित असे पण पुस्तक छापू शकत नसे. म्हणून प्रकाशक निर्माण झाले. पुस्तक विक्रेते ह्यांच्याकडेच गिर्हाईके असत. थोडेफार आजही विक्रीमध्ये त्यांचा सहभाग आहे पण बर्याच प्रकाशकांनी आता त्यांचे स्वतःचे नेटवर्क / क्लबस तयार केले आहेत.

२. काळ बदलला आहे. लेखकही आत्ता पुस्तके ईबुक्सच्या रूपाने लिहू शकतात. स्वतः किंवा दुसर्याच्या मदतीने नेटवर विकू शकतात. म्हणजेच पुस्तक दुकानदार आणि काही अंशाने छोटे प्रकाशक देखील कालबाह्य होवू घातले आहेत.

३. अमेझोन सारख्या चेनकडे उत्कृष्ठ विक्री व्यवस्था नेटवर्क, आणि गिर्हाईकेदेखील आहेत. शिवाय त्यांचा 'किन्डल' हा कन्सेप्ट अतिशय यशस्वी आहे. त्यात फायदे अनेक आहेत. लेखकाला भरपूर फायदा कारण किमतीमध्ये फक्त दोनच भागीदार ,लेखक आणि अमेझोन. शिवाय किंडल मुळे पायरसी जवळजवळ नाही. झटपट सर्विस, झटपट डिलिव्हरी.

४. शिवाय अमेझोन व्हीस्परनेट मुळे ऑडिओबुक्स देखील उपलब्ध.

५. मराठीमध्ये प्रत्येक प्रकाशकाला हे शक्य आहे का ? प्रत्येकाने चक्र पुन्हा शोधण्यासारखे होईल ते.! प्रकाशक आणि पुस्तक-विक्रेते ह्या संस्था केवळ पेपरबुक्स विक्रीसाठी आपल्याकडे अजूनही अनेक वर्षे जिवंत राहतील असे दिसते.

६. सध्यातरी ईबुक्स साठी प्रकाशक संघ अथवा मायबोलीसारख्या त्रयस्थ पण टेक्नोस्याव्ही संस्थेने अमेझोन किंडल सारखी 'स्टेट-ऑफ-द आर्ट' सर्विस दिल्यास वाचक,लेखक आणि प्रकाशक यांचाही फायदा होईल. उत्तम पर्याय उपलब्ध केल्यास प्रयोग करण्याची गरज पडणार नाही असे मला वाटते.

स्वाती
तुम्ही वर पाहिले असेलच की "प्रयोग कशाला हवा" हा प्रश्न होता आणि त्याला माझे उत्तर होते. ते उत्तर देतांना ज्या तिघांनी तयारी दाखवली आहे त्यांना मी नाऊमेद करतो आहे हे माझ्या लक्षात आले नाही.

त्यामुळे ज्यांना प्रयोगात भाग घ्यायची तयारी दाखवली आहे त्यांच्याबरोबर काम सुरु करतो. ज्यांना चर्चा करायची आहे त्यांना इथे पुढे करता येईल.

इतर प्रकाशकांनी काय करावे ,काय योग्य हे मी त्यांना सांगू शकत नाही. त्यामुळे जे आपल्या जे शक्य आहे ते करायचा प्रयत्न करतो आहे. हा प्रयत्न यशस्वी व्हावा ही मनापासून इच्छा आहे. म्हणुनच शक्य तितके variables कमी करावे असे सुचवतो आहे. हे जमणारंच नाही दाखवा पाण्यात उतरून असा अर्विभाव मुळीच नाही.

सुरेश शिंदे,
कायद्यामधल्या बर्‍याच भानगडी, मालकीहक्कांबदलच्या अपेक्षा आणि वास्तव्यातलं व्यवहाराचं गणित याची सांगड घालायची म्हटलं तर माहीतीतल्या,जुन्या लेखकांच्या बाबतीत हे सध्यातरी अवघड दिसतंय. त्यामुळे कोर्ट्कचेर्‍यांच्या भानगडीत न पडता मायबोलीवर ज्यांच्या कडे स्वतःचे हक्क आहेत त्यांच्यापासून काही सुरु करता येते का ते पाहतो आहे.

अजय, तुमच्या सगळ्या पोस्ट्स आवडल्या. तुमच्या प्रयोगासाठी शुभेच्छा. Happy

मला जर यात वेळ द्यावा लागणार नसेल तर माझे लेखन तुमच्या प्रयोगात वापरायला माझी अजिबातच हरकत नसेल. फक्त मला तशी पूर्वसूचना द्यावी

आमचं एक 'लहानसं' प्रकाशन आहे आणि तरीही मला स्वत:ला इ-बुक पब्लिश करण्यात स्वारस्य आहे, निदान प्रयोग करून पाहण्यात तरी.
मी Amazon चे kindle writer वापरून प्रयत्नही केला पण अजून kindle तरी 'देवनागरी फॉन्ट support and convert करत नाही या technical issue पाशी मी अडले आहे. याबद्दल कोणी माहितगार असेल तर संपर्क करायला आवडेल.
मला स्वतःला नुसत्या scan करून pdf केलेल्या पुस्तकांना इ-बुक म्हणणं योग्य वाटत नाही. पण सध्या तरी जी काही मराठी पुस्तकं आहेत ती अश्याच फॉर्म मधे आहेत बहुतांशी.

महेश, पायरसी रोखणे खरच शक्य आहे का? चित्रपटाचं उदाहरण घेतलं तर डीव्हिडी प्रिंट निघताच त्याच्या कॉपीज बाहेर पडतात. पुस्तकांचहि तेच, आणि टोरंटच्या माध्यमातुन तर अगदी १० जिबीसुद्धा फार डेटा नाही आजकाल. कुठे आणि कसं थांबवणार? त्यापेक्षा, याचा फायदा कसा करुन घेता येईल याचा विचार व्हायला हवा.

डॉ. सुरेश शिंदे यांनी चांगले पर्याय सुचवले आहेत! ६वा पर्याय हा बराच व्यवहार्य आहे असे वाटते.

Amazon ना प्रकाशक आहे न लेखक. ते फक्त दुकान आहे. जे लोकांना विविध मार्गाने पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देतं. भारतात Flipkart त्या मार्गावर आहे असं दिसतं. मला वाटतं ह्या बाबतीत फक्त मराठीपुरता संकुचित विचार करून चालणार नाही. आता मराठीत दिवाळी अंकांच्या खपाचे गणित नसेल जुळत पण २६ प्रमुख भारतीय भाषांमध्ये मिळून तर पुस्तकांची मोठी बाजारपेठ आहेच ना? हिंदीत किंवा बंगालीत तरी आहे का कोणता चांगला ई-बुक रीडर?

समजा जर एखाद्या start up ने युनिकोड मध्ये चालणारं, compatible to all major platforms (Apple, Android, Windows), ज्यात सर्व भारतीय भाषा दिसू शकतील असं application develop केलं तर विविध भारतीय भाषांमधल्या प्रकाशन संस्थांशी करार करून त्यांची निवडक पुस्तकं त्या app च्या माध्यमातून विकता येतील. म्हणजे जसं आत्ता Kindle वरून तुम्ही अनेक प्रकाशकांची पुस्तकं घेऊ शकता तसं. आणि पुढच्या ५-१० वर्षांत हे होताना मला दिसतंय. आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणारच आहे! It's an untapped niche which won't be untapped for long! काय माहिती उद्या तुमचं app ही कदाचित १९ मिलियन डॉलरला विकत घेईल कुणीतरी!
आणि market survey करून काही innovation होत असतं तर आयफोन तयारच झाला नसता! कारण लोकांना हे असं काही असू शकतं हे माहितीच नव्हतं! पण आज smart phone ही एक आवश्यक गोष्ट होऊन बसली आहे. गरज ही कधी कधी जाणवून दिली की निर्माण होते! टीव्ही ची काय गरज होती! पण त्यातून जगभर एक मोठी industry उभी राहिली आहे आज! ई-बुक्सची आज छोटीशी वाटणारी फट एका मोठ्ठा दरवाजा होऊ शकते. थोडासा काळाच्या पुढे जाऊन विचार करून बघा!

चिनूक्स, तुझ्या प्रत्येक मुद्द्याला मी प्रतिवाद करू शकते पण मग चर्चा भरकटत जाईल. पण तरीही
१. गैरफिल्मी गाण्यांचा एक दौर होता जो आता तितकासा राहिला नाहीये आणि ते कलाकार देखिल स्टेज शो करून पैसे मिळवतात (उदा. दलेर मेहंदी वै.). किंवा आता त्यासाठी कोक स्टुडिओ आहे. ढीगाने वाहिन्या आहेत. थोडक्यात व्यक्त होण्याचे मार्ग बदलले आहेत. आयुष्यावर बोलू काही चे शो तर नेहमी हाऊसफुल जातात म्हणे! आणि शास्त्रीय संगीत तर रेकॉर्ड्स उपलब्ध होण्याआधीही अस्तित्वात होतं आणि पुढची १००० वर्षे राहील कारण रेकॉर्ड वर कितीही ऐकलं तरी शास्त्रीय संगीत प्रत्यक्ष मैफिलीत ऐकण्याची जी मजा आहे ती औरच असते.

'कोणत्याही प्रश्नांची उत्तर शोधण्याची तयारी हवी, तुम्ही प्रयत्नच करत नाहीत' हे वर्षानुवर्षं मराठी प्रकाशकांना आणि चित्रपटनिर्मात्यांना ऐकवलं जातं. गेल्या अनेक वर्षांत या दोन जमातीच हुशार का झाल्या नाहीत, त्यांच्या चुकांमधून काहीच कसं शिकल्या नाहीत याचं मला फार्फार आश्चर्य वाटतं.
>> मला तर वाटतं की सध्या तरी चित्रपट क्षेत्राला हे विधान आजिबातच लागू पडत नाही. ज्या प्रकारे मराठी सिनेमा पुढे येतो आहे त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच वाटतो आहे! शिवाय पायरसी संदर्भात ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते म्हणून नमूद करावीशी वाटते की भारतातील सिनेमाची पायरसी थांबवण्यात ज्या कंपनीने सिंहाचा वाटा उचलला आहे त्याची स्थापना एका मराठी व्यक्तीने (श्री संजय गायकवाड) केली आहे. ज्यांना काही वर्षांपूर्वी फिल्म फेअर पुरस्कार सोहोळ्यात विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आलं! (अधिक माहिती साठी विकी:http://en.wikipedia.org/wiki/UFO_Moviez)
मग अशीच एखादी technology भारतीय भाषांमधल्या पुस्तकांची पायरसी थांबवण्यासाठी develop का नाही करता येणार? मराठी चित्रपट सृष्टी जशी कात टाकताना दिसते आहे तशी मराठी प्रकाशन विश्वाने देखिल टाकावी अशीच इच्छा आहे! केवळ मराठी पुरता संकुचित विचार न करता संपूर्ण भारतीय प्रकाशन विश्वाला समोर ठेवून काहीतरी नावीन्यपूर्ण तयार केलं पाहीजे!

< ज्यांना खरंच एवढी स्पष्टता आहे आणि ज्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत ते का बरे एखाद्या प्रकाशकाला वा निर्मात्याला गाठून त्याचा सल्लागार म्हणून काही काळ काम करत नाहीत? सिरीयसली विचारतेय. >
माझी इच्छा आणि तयारी आहे वेळ द्यायची! माझ्याकडे सर्व उत्तरं नाहीत पण उत्तरं शोधण्याची तयारी आणि इच्छा आहे!

@जिज्ञासा <<< मराठी प्रकाशन विश्वाने देखिल टाकावी अशीच इच्छा आहे! केवळ मराठी पुरता संकुचित विचार न करता संपूर्ण भारतीय प्रकाशन विश्वाला समोर ठेवून काहीतरी नावीन्यपूर्ण तयार केलं पाहीजे!>>>सहमत. पण या जॉबसाठी एखादा स्टीव्ह जॉब्सच हवा !

@rar:<<<मला स्वतःला नुसत्या scan करून pdf केलेल्या पुस्तकांना इ-बुक म्हणणं योग्य वाटत नाही. पण सध्या तरी जी काही मराठी पुस्तकं आहेत ती अश्याच फॉर्म मधे आहेत बहुतांशी.>>>सहमत.

डॉक्टर, हे म्हणजे शिवाजी जन्मायला हवा पण शेजारी, असं होतय का? आपण इतके सगळे मराठी लोकं इथे नित्यनेमाने लिहितोय, त्यांच्यापैकी काही लोकांना सहभागी व्हायची इच्छाही व्यक्त केलीय. जसं open source softwares तयार झाले, तसच काहीसं करता येणार नाही का?
यातल्या बर्‍याच लोकांना तांत्रिक गोष्टी कळत नसतील (त्यात मीही आहे), पण इच्छा तिथे मार्ग म्हणतात, तसं करता येईल असं वाटतय.

टग्या :- बर्‍याच उशिरा म्हणतोय, पण खरच हा विषय इथे आणल्याबद्दल आभार.

@विजय देशमुख :<<<हे म्हणजे शिवाजी जन्मायला हवा पण शेजारी, असं होतय का? >>>नाही. कारण नुसते लेखन लिहून भागत नाही. ते लोकांना आवडावे लागते. आणि आवडेल असे असेल तरी ते योग्य खरेदीदारापर्यंत पोहोचावे लागते. यासाठीच अशा जाहिरात आणि विक्री यंत्रणेची आवश्यकता आहे. वीस वर्षांपूर्वी मी स्वतः स्वस्त मेडिकल सोफ्टवेअर तयार केले होते पण १०० पेक्षा जास्त प्रती विकू शकलो नाही. भारतातील पहिले मल्टीमेडिया सीडी रोम मेडिकल जर्नल दोन वर्षे चालवत होतो. परिणाम काय तर चार लाख रुपये व सात वर्षे गुंतवणुकीचा तोटा ! म्हणून जिज्ञासा आणि रार म्हणतात तशी यंत्रणा उभी व्हावयास हवी. किन्दल बुकचे फायदे अनेक आहेत. तुमचे मटेरियल वापरून किन्दल बुक्स तयार करून देणारे पण आहेत. पण सध्या तरी देवनागरी सपोर्ट नाही. आता amazon.in सुरु झालेच आहे. कदाचित लवकरच देवनागरी सपोर्ट सुरु होईलही !

Pages