जगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.
हल्ली पुस्तके छापण्याआधी त्याची संगणकीय प्रत तयारच असते. ई-पुस्तके एकदा बनवली कि त्याच्या अधिक प्रती बनवण्यास काहीच खर्च येत नाही. चिकटलेली किंवा अनुक्रमानुसार न बांधली गेलेली पाने अशा चुका होत नाहीत. वाहतूक किंवा साठवणूक खर्च होत नाही. दीर्घकाळ पडून राहून उंदीर, कसर, वाळवी किंवा पावसाने नुकसान होत नाही. दोन छापील आवृत्यांमधल्या कालावधीमध्ये वाचक पुस्तकं विकत घेऊ शकत नाही किंवा आपल्या गावी हव्या त्या पुस्तकाची प्रत उपलब्ध नसण्यामुळे धंदा बुडण्याचे नुकसान ई-पुस्तके टाळू शकतात. असे अनेक फायदे असूनही मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत. सध्या कित्येक चांगली पुस्तके एक आवृत्ती संपल्यावर मागणी अभावी पुन्हा छापलीच जात नाहीत. त्यामुळे ज्या तुरळक लोकांना हि पुस्तके हवीशी वाटतात त्यांची कोंडी होते. ही परिस्थिती ई-पुस्तकांच्या बाबतीत कधीच येणार नाही.
(माझं पुढचं सगळं विवेचन “मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत” या गृहितकावर आधारित आहे. हे गृहीतकच चूक असल्यास कृपया मला योग्य ते मार्गदर्शन करावे.)
याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात
1. मराठी लेखक / प्रकाशकांमध्ये अजून ई-पुस्तकांबद्दल पुरेशी जागरुकता निर्माण झाली नाहीये.
1.a. अच्युत गोडबोले यांच्यासारख्या तंत्रज्ञानावर उत्तम पकड असणाऱ्या लोकप्रिय लेखकाची प्रचंड खपाची पुस्तकेही ई-माध्यमामध्ये उपलब्ध नाहीत. यामागे माध्यमाबद्दलचे अज्ञान हा मुद्दा असेल असं मला वाटत नाही.
1.b. महाराष्ट्राबाहेरचा एक मोठा ग्राहकवर्ग ई-पुस्तकांमुळे विक्रीमध्ये मोलाची भर घालू शकतो. त्यामुळे धंद्याबद्दल जागरूक असणाऱ्या प्रकाशकांना ई-पुस्तकांबद्दल माहिती नाही हे पटत नाही.
2. मराठी प्रकाशक जाणूनबुजून ई-पुस्तके प्रकाशित करणे टाळताहेत कारण...
2.a. ई-पुस्तके हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे.
2.a.i. जर इतर भाषांमधली ई-पुस्तके आतबट्ट्याचा व्यवहार ठरत नाहीत तर फक्त मराठी पुस्तकांबाबतीत असं का होईल?
2.b. ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल.
2.b.i. ही भिती अनाठायी वाटते कारण जोपर्यंत विक्री आणि पर्यायाने उत्पन्न वाढते आहे तोपर्यंत हे उत्पन्न छापील पुस्तकांमधून येतंय कि ई-पुस्तकांमधून याने काहीच फरक पडत नाही.
2.b.ii. ज्या लोकांना छापील पुस्तक वाचायला आवडते त्या लोकांनी जरी कुतूहल म्हणून ई-पुस्तक वाचायला सुरुवात केली, तरी ते त्यांना आवडलेल्या पुस्तकाची छापील प्रत विकत घेणारच.
2.b.iii. Paulo Coelho सारखा जगप्रसिद्ध लेखक आपली ई-पुस्तके फुकट दिल्यामुळे छापील पुस्तकांचा खप वाढला यावर विश्वास ठेवतो (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/). त्यामुळे विकतच्या ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल ही भिती अनाठायी वाटते.
2.c. ई-पुस्तकांची चाचेगिरी (पायरसी)
2.c.i. तार्किक दृष्ट्या हा एकमेव मुद्दा मला योग्य वाटतो आहे. ई-पुस्तके अगदी सहज आपल्या मित्र/आप्त परिवारामध्ये वाटली जाऊ शकतात (sharing). त्यामुळे मूळ पुस्तकाचा खप कमी होणे संयुक्तिक वाटते.
आता आपण स्वामित्वहक्क (Copyrights) आणि चाचेगिरी (पायरसी) चा थोडा विचार करू.
सध्याच्या नियमांनुसार कुठल्याही लिखाणावर मूळ लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्ष त्याच्या वारसांचे स्वामित्वहक्क असतात. या कालावधीमध्ये हे लिखाण इतरांना वाटणे हा गुन्हा आहे. त्यानंतर ते लिखाण सार्वजनिक होते (Public Domain). स्वामित्वहक्काची ही संकल्पना समाजामध्ये “कलात्मक सर्जनशीलतेला” उत्तेजना देण्यासाठी राबवली जाते. पण हा उद्देश बरोबर आहे का? जर स्वामित्वहक्क बंद केले गेले तर लेखक लिहायचे थांबतील का? उद्या समजा एक कायदा झाला की जो गिर्यारोहक नवीन वाट शोधून काढेल त्याला आयुष्यभर आणि त्याच्या मृत्युनंतर ६० वर्षे त्याच्या वारसांना ती वाट वापरणाऱ्या लोकांकडून रोयल्टी मिळेल. तर असा कायदा समर्थनीय असेल का?
माझ्या मते “कलात्मक सर्जनशीलता” ही कलाकाराची खाज असते. ती लेखकाच्या स्वत:च्याच समाधानासाठी खाजवली जाते. या इथे मायबोलीवर देखील आर्थिक मोबदल्याची काहीही अपेक्षा न करता बरेच सकस लेखन केले जाते. आपल्या लेखनातून मिळणारी लोकप्रियता आणि नावलौकिक हे लेखकाला अधिकाधिक लिहायला उद्दयुक्त करतात. जर त्यातून पैसे मिळाले तर सोन्याहून पिवळे. किंबहुना लोकप्रियता आणि नावलौकिक हेच लेखकाला पैसे कमवायचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देते. जसे की नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, व्याख्याने देणे, कथाकथनादी रंगमंचीय प्रयोग करणे, निरनिराळ्या कार्यक्रमांचे संचालन करणे. इत्यादि. पण लोकप्रिय होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कलाकृती पोचायला हवी. आणि वर दिलेल्या Paulo Coelho च्या Blog अनुसार (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/) तुमची कलाकृती लोकांमध्ये आपापसात वाटली जाणे ही तुमची लोकप्रियता वाढवण्याची एक उपयुक्त संधी आहे. मुळात यातील बहुतेक जणांनी ते छापील पुस्तक विकत घेऊन कधी वाचलेच नसते त्यामुळे ई-पुस्तकाच्या जितक्या अनधिकृत प्रति आपापसात वाटल्या गेल्या तेवढ्या छापील पुस्तकांच्या प्रति कमी विकल्या जाणार हे समीकरण चुकीचे ठरते.
सध्याच्या कालबाह्य स्वामित्वहक्क कायद्यांऐवजी Creative Commons (https://creativecommons.org/) ही चळवळ मला अधिक संयुक्तिक वाटते. Cory Doctorov (http://en.wikipedia.org/wiki/Cory_Doctorov) सारखे नामांकित लेखक या चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. तुम्ही विकिपीडिया (http://en.wikipedia.org/wiki/Creative_commons) वर देखील याबद्दल अजून वाचू शकता. http://en.wikipedia.org/wiki/Anti-copyright येथे तुम्ही स्वामित्वहक्क विरोधी भूमिका जाणून घेऊ शकाल.
निव्वळ चाचेगिरीच्या भीतीमुळे मराठी ई-पुस्तके उपलब्ध होत नाहीत हे स्वत:ला सांस्कृतिक दृष्ट्या आधुनिक समजणाऱ्या मराठी समाजाला लाजिरवाणे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
इथल्या तज्ञ लोकांची या विषयावरची मते जाणून घ्यायला आवडेल.
इंटरेस्टींग लेख. थोडा मोकळा
इंटरेस्टींग लेख.
थोडा मोकळा वेळ पाहून लिहीतो. जरा डीट्टेलवार लिहायचे आहे.
इब्लिस, तुमच्या उत्तराच्या
इब्लिस, तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
ट्ग्या.. या विषयाला हात
ट्ग्या.. या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.
काही लिहिले नाही तरी वाचायला नक्की आवडेल.
सर्वात आधी ई-पुस्तकांचे
सर्वात आधी ई-पुस्तकांचे फायदे.
मला स्वतःला ई-पुस्तके वाचणे प्रचण्ड आवडते. आजकालच्या टेक्नॉलॉजीमुळे अगदी कागदावर छापलेल्या पुस्तकासारखी पाने 'दिसणारे,' पाने उलटविण्याचा फील येईल अशा प्रकारच्या पुस्तक वाचनाचा अनुभव देणारी सॉफ्टवेअर्स, व सहज हातात धरून वाचता येईल अशी उपकरणे उपलब्ध आहेत. फक्त नव्या कागदाचा वास येईल अशी सोय अजून निघालेली नाहीये, ती पण निघेल पुढेमागे बहुतेक.
क्लाऊड वा मोबाईलमधे कायम शे दोनशे पुस्तके सोबत घेऊन फिरता येऊ शकते, त्यांत पान दुमडून ठेवणे, पानाच्या कडेवर टीपा लिहिणे या कागदी पुस्तकांबद्दल उपलब्ध असलेल्या बाबींसोबतच हवा तो शब्द/वाक्य/संदर्भ सहज शोधण्याची सोयही उपलब्ध झालेली आहे.
यात, मी बहुतांश इंग्रजी पुस्तके वाचतो, अन खरे सांगायचे, तर पायरेटेड पुस्तके भरपूर प्रमाणात अतीशय सहज उपलब्ध आहेत. पूर्वी क्रेडीटकार्ड आदि सुविधा सहजतेने उपलब्ध नसल्याने पायरेटेड पुस्तके मिळवून वाचण्याकडे कल होता, आजकाल वाजवी किंमत असेल, तर नक्कीच विकत घेऊन डाऊनलोड केले जाते.
मराठी पुस्तके फारशी उपलब्ध नाहीत. काही थोडी प्रताधिकारमुक्त पुस्तके उदा. सानेगुरुजींची श्यामची आई इ. गूगलवर फुकट आहेत, पण ते विरळा.
*
आता या पायरसी उर्फ चाचेगिरिबद्दल बोलायचे, तर इंग्रजी पुस्तकांत पायरसी आहे, व ती भरपूर प्रमाणात आहे. उदा. हॅरी पॉटरचा ७वा भाग प्रसिद्ध झाला त्या दिवशी, रांगेतल्या २०व्या माणसाच्या हाती पुस्तक पडेपर्यंत त्या पुस्तकाची पायरेटेड ई-प्रत उपलब्ध झालेली होती.
पण पायरसी फक्त ईबुक्सची होते का? तर नाही. अनेक गाजलेली पुस्तके डुप्लिकेट स्वरूपात छापून रस्त्यावर ५०-१०० रुपयांत मिळतात. व या पुस्तकांचा खर्या अर्थाने फडशा पाडू शकणारा तरूण वर्ग, विकत घेऊन वाचताना हीच पुस्तके घेतो, असे निरिक्षण माझे तरी आहे.
होस्टेलला असताना हा एक प्रकार परवडत असे, दुसरा पर्याय लायब्ररीचा, पण आमच्या कॉलेजडेज मधला त्यापेक्षा भारी एक आयटम म्हणजे स्टेशनवर पुस्तकं मिळत. एकदा एक पेपरबॅक पुस्तक विकत घेतले, की वाचून झाल्यावर ते सुस्थितीत परत देऊन २ ते ५ रुपयांत दुसरे मिळत असे. हा प्रकार एका गावात पुस्तक घेऊन दुसर्या गावातल्या स्टेशनवर विकले तरी चालत असे. आता यातही एकप्रकारची पायरसीच होत असे. कारण हे पुस्तक 'लेण्ड' करायलाही परवानगी नाही असे मूळ लायसन मधे लिहिलेले आहे.
ईबुक्स सहज मित्राला कॉपी करून देताना ते वाचायला दिले, व मूळ प्रत माझ्याकडे ठेवली म्हणजे त्या गाढवाने पुस्तक हरवले तर वाईट वाटायला नको, अशी छान आयडिया आहे, ही छापील पुस्तके उसनी देण्यापेक्षा वेगळी आहे असे वाटत नाही, उलट मूळ प्रत सुरक्षित रहाते हा फायदा.
*
पायरसीच्या थोडे बाजूनेच लिहिलेले वरचे हे सगळे मुद्दे अनेक ठिकाणी बहुतेक सर्वांच्या डोळ्याखालून गेले असतीलच.
माझा मुद्दा असाय, की लोकांना स्वस्तात वाचायला आवडते.
जर मी बाजारातून ५०० रुपयांचे पुस्तक विकत आणले, तर त्यात त्या लेखकाला किती पैसे मिळतात नक्की? मला नाही वाटत प्रतिमागे ८०-१०० रुपयांच्यापेक्षा जास्त मिळत असतील. ई प्रत निर्माण करून डाऊनलोडिंग अन सेक्युअर मेडिया लायसन्सेस तयार करण्याचा अॅक्चुअल खर्च फारसा नसावा.
लेखकांनी डायरेक्ट पब्लिकेशन केले, किंवा मायबोलीसारख्या संस्थेने फक्त ई पब्लिकेशनचे अधिकार घेणे, व मिनिमम नफ्यावर अशी पुस्तके उपलब्ध करून देणे हे काम केले, तर लोक नक्कीच विकत घेऊन वाचतील.
बर्यांचदा ऑनलाईन विकत न घेण्यामागे 'क्रेडीटकार्ड' नाही, हा एक मोठा अडसर असतो. तो जर काही मार्गांनी दूर करता आला, उदा. कोअर बँकींग मार्फत अकाउंटात पैसे भरा, पावती नंबर योग्य त्या फिल्डमधे भरा, इकडे पुस्तक डालो + वाचण्याची की मिळवा. असे काही करता आले तर बहार होईल.
*
लायब्ररीज.
काळाच्या ओघात ज्या लायब्ररीज बदलल्या, उदा. इमेलवर्/एसेमेसवर पुस्तकाची मागणी नोंदविणे व हापिसात्/घरपोच पुस्तके मिळवणे. किंवा जिथे स्कॅनर/फोटोकॉपी सुविधा उपलब्ध आहेत इ. प्रकारच्या लायब्रर्या उत्तम व्यवसाय करीत आहेत.
हा सगळा बेसिकली एकाच प्रतिचा मोबदला लेखकाला देणारा धंदा नव्हे का?
मग जर हे चालतं, तर ज्या थोड्याफार कॉपीज पायरेट होतील, त्या असूनही (इन स्पाईट ऑफ देम) अॅक्चुअल लेखकास प्लस डिस्ट्रीब्यूटरला चांगला फायदा होईल, असे वाटते.
गेल्या वर्षी अॅमेझॉनवर ईपुस्तके, कागदी पुस्तकांपेक्षा जास्त विकली गेली, अशी माहिती मध्यंतरी वाचनात आली.
मराठी साहित्याच्या प्रकाशनात जर बदल झाला नाही, तर काही वर्षांपूर्वी ऑफसेटमुळे जसे खिळाप्रेसवाले भिकेला लागले, तशी वेळ आज ना उद्या लवकरच येईल, असे वाटते. कारण आवडलेली/दुर्मिळ/जुनी पुस्तके स्कॅन करून एकमेकांत शेअर करणे हे आजकाल तुरळक का होईना, सुरू झालेले आहेच.
प्रतिसाद फारच लांबला, त्याबद्दल क्षमस्व.
लेख अन प्रतिसाद आवडलेत.
लेख अन प्रतिसाद आवडलेत.
ई-पुस्तकांचे
ई-पुस्तकांचे फायदे
आणि आता ई-पुस्तकांचे तोटे
ई-पुस्तके लोकप्रिय होणे याला काही वेळ लागेल पण ते होणे कोणीही थांबवू शकणार नाही. It is just a matter of time
तसे DRM वापरून पुस्तकांची
तसे DRM वापरून पुस्तकांची पायरसी थांबवायचे प्रयत्न केले जातात खरे, पण त्यामुळे पुस्तके विकत घेणाऱ्या चांगल्या वाचकांनाच त्रास होतो. ई-पुस्तका मधून DRM काढून टाकणे हे चुटकी वाजवण्या एव्हढे सोपे आहे. त्यामुळे त्या फंदामध्ये लेखक प्रकाशकांनी न पडलेलेच बरे.
>ई-पुस्तका मधून DRM काढून
>ई-पुस्तका मधून DRM काढून टाकणे हे चुटकी वाजवण्या एव्हढे सोपे आहे. त्यामुळे त्या फंदामध्ये लेखक प्रकाशकांनी न पडलेलेच बरे.
तुमच्या या वाक्यातच या सगळ्या चिंतनाचं उत्तर उघड आहे. तुम्ही फक्त वाचकाच्या दृष्टीकोनातून लिहता आहात. जे प्रकाशक किंवा लेखक यात गुंतवणून करायला तयार असतील त्यांना त्याचा मोबदला मिळणार नसेल तर त्यांनी त्यात कशाला पैसे गुंतवावे?
मराठी मनाची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही, मराठी माणूस जो पर्यंत पैसे खर्च करत नाही, तो पर्यंत यावर उत्तर नाही. किंमत कमी झाली तर तस्करी कमी होईल हे विधान चुकीचे आहे असे गेल्या काही वर्षात सिद्ध झाले आहे.
१) आधी मराठी सीडी डिव्हीडी मिळत नाही अशी ओरड होती, त्या मिळायला लागल्या पण जेंव्हा तस्करी करून वेबसाईटवर फु़कट सिनेमे पहायला मिळाले तसा सीडी डिव्हीडी चा धंदा पूर्ण बसला आहे. मोझर बायर कंपनीने अगदी स्वस्तात व्हिसीडी आणल्या पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. इतकेच नाही तर आपण किती समाजकार्य करतो आहोत अशा थाटात अनेक व्यक्ती अशा तस्करीने फुकट मिळणार्या गोष्टींचा हिरीरीने प्रसार करत असतात.
२) अगदी फु़कट एखादी गोष्ट मिळाली तरी त्याचीही किंमत आपल्याला नसते. त्या फुकट गोष्टीतून दुसर्या व्यक्तीला/संस्थेला फायदा झाला तरीही तो आपल्याला चालत नाही. अगदी जवळचे उदाहरण म्हणजे मायबोलीवर सगळे फु़कट आहे आणि मायबोलीचा अनेकांना फायदा झाला आहे. पण मायबोलीवरच्या जाहिराती दिसूच नयेत किंवा इतर पद्धतीने मायबोलीला मिळणारे इतर उत्पन्न कमी होईल असे उपाय काही मायबोलीकर अगदी हिरीरीने, मायबोलीवरच मुद्दाम दुसर्यांना सांगत असतात.
शेवटी हा प्रश्न नवीन तंत्रज्ञानाचा नाहीच आहे. त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक भरून निघेल का आणि सध्या जे काही पैसे मिळत आहेत तेही बंद होईल का, या अतिशय वास्तविक भितीचा आहे.
ई पुस्तकांचा आणखी एक
ई पुस्तकांचा आणखी एक प्रकार म्हणजे ऑडीओ बुक्स ! वाचवाचुनी डोळे अति दुखले तर फायदेशीर ! मला तर हा प्रकार आवडतो. शक्य झाल्यास डाऊनलोड करा आणि नसेल व तशी खाजच असेल तर घ्या विकत ! बाकी स्वामित्वहक्काचे म्हणाल तर हा विचार सर्व जगाने केला असता तर इन्टरनेट वर आज मोफत उपलब्ध असलेले ज्ञानभांडार आपल्याला दिसले असते का ? अनेक व्यक्ती टग्या यांनी म्हटल्याप्रमाणे मानधनातील मानाकरता लिहितात, धनाकरता नाही आणि हे केवळ नैसर्गिकच आहे. तेंव्हा ज्ञान मिळेल तेथून घ्यावे आणि पुढे वाटावे, पे इट फॉरवर्ड !
अगदी जवळचे उदाहरण म्हणजे
अगदी जवळचे उदाहरण म्हणजे मायबोलीवर सगळे फु़कट आहे आणि मायबोलीचा अनेकांना फायदा झाला आहे. पण मायबोलीवरच्या जाहिराती दिसूच नयेत किंवा इतर पद्धतीने मायबोलीला मिळणारे इतर उत्पन्न कमी होईल असे उपाय काही मायबोलीकर अगदी हिरीरीने, मायबोलीवरच मुद्दाम दुसर्यांना सांगत असतात.
ह्म्म्म्म.. मायबोलीवरच्या जाहिरातींचा वाचकाना त्रास होतो अशी ओरड ब-याच बाफवर वाचलीय आणि त्यावरचे उपायही वाचलेत. पण त्याची ही दुसरी बाजु लक्षातच आली नाही कधी...
अजयजी, दोन प्रश्न
अजयजी,
दोन प्रश्न आहेत.
१.
माबोवरच्या जाहिराती नुसत्या पाहून, (म्हणजे क्लिक न करता, नुसत्याच माझ्या स्क्रीनवर दिसल्या, तर) माबोचा फायदा होतो का?
२.
>>शेवटी हा प्रश्न नवीन तंत्रज्ञानाचा नाहीच आहे. त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक भरून निघेल का आणि सध्या जे काही पैसे मिळत आहेत तेही बंद होईल का, या अतिशय वास्तविक भितीचा आहे.<<
हे समजू शकतो. पण अशी काय/किती अॅडिशनल गुंतवणूक करावी लागेल? पुस्तक छापण्याआधी सॉफ्टकॉपी तर बनवलीच जाते ना?
मला तरी वाटते प्रश्न नवीन तंत्रज्ञानाचाच आहे. या लोकांची (प्रकाशक) छापखान्यात झालेली इन्व्हेस्टमेंट उसाचा रसवाले जशी उस पिळून पिळून शेवटच्या थेंबापर्यंत वसूल करायच्या मागे असतात, तशी वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वाटते. माझ्या अल्प माहितीनुसार बर्याच प्रकाशनांचा बेसिक आधार क्रमिक पुस्तके हा असतो. या क्रमिक पुस्तकांचीही ई आवृत्ती (लीगल. चोरीची नव्हे) आजकाल उपलब्ध असते. (मेडिसिनबद्दल बोलतोय) व पायरेटेड कॉपीज असल्या, तरीही मुले ही पुस्तके, कागदावर छापलेलीही विकत घेतात असा अनुभव आहे.
बाकी फुकट मिळालं की किम्मत नसते याबद्दल शंभरदा सहमत.
१.माबोवरच्या जाहिराती नुसत्या
१.माबोवरच्या जाहिराती नुसत्या पाहून, (म्हणजे क्लिक न करता, नुसत्याच माझ्या स्क्रीनवर दिसल्या, तर) माबोचा फायदा होतो का?
होय आणि नाही. ते जाहिरातदारांवर आहे. काही जाहिराती नुसत्या पाहिल्या गेल्या तरी पैसे मिळतात. काही जाहिरातींवर क्लि़क केले गेले तरच पैसे मिळतात. काही जाहिरातींवर क्लीक होऊन प्रत्यक्ष विक्री झाली (किंवा काही कृती झाली) तरच पैसे मिळतात. पण त्याहीपेक्षा खूप मोठा भाग म्हणजे मराठी समाजाकडे पैसे आहेत, विकत घेण्याची ऐपत आणि इच्छा आहे, आणि तो आकाराने मोठा आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची जाणीव जाहिरातदारांना होते आणि त्यातून मराठी माणसांसाठी अधिक नोकरीच्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. याचे उत्तम ऐतिहासिक उदाहरण म्हणजे मराठी टीव्ही सिरीयल्स जशा लोकप्रिय झाल्या तशा अनेक मराठी माणसांना/लेखकांना/कलाकारांना नवीन संधी उपलब्ध झाल्या. तिथेही जाहिरातींचा कंटाळा येतो म्हणून, त्या टाळून पुढे जायची सोय असती तर प्रायोजकांना पैसे देण्याचे प्रयोजनच राहिले नसते. आजची मराठी संकेतस्थळे ही खूपशी सुरवातीच्या काळातल्या नवीन टीव्ही चॅनेलसारखी धडपडतायत.
२. पण अशी काय/किती अॅडिशनल गुंतवणूक करावी लागेल?
अ. तस्करी होऊ नये या साठी लागणार्या सॉफ्टवेअर मधे गुंतवणूक. जी वरचे वर करावी लागेल कारण तस्करीचे नवीन मार्ग निघतच असतात.
ब. ईपुस्तके ऑनलाईन विकण्यासाठी लागणारा खर्च, Transaction cost, credit card fees, marketing costs. Marketing cost हि बर्यापैकी वाढती असेल कारण तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडे चुटकीसरशी जाता येते. आणि त्यांनी १० पैसे किंमत केली तरी तुम्हाला कळायच्या अगोदरच तुमचा ग्राहक तिकडे गेलेला असेल.
मायबोलीवरच्या जाहिराती हा या
मायबोलीवरच्या जाहिराती हा या लेखाचा उद्देश नाही. त्यामुळे त्याबद्दलची चर्चा इथे थांबवू या. मूळ विषय ईबुक्स हा आहे आणि त्याबद्दलची चर्चा पुढे चालू राहील.
अजयजी विषयाकडे वळा
मा. वेमा, आपला मुद्दा मान्य,
मा. वेमा, आपला मुद्दा मान्य, एक शंका म्हणून विचारले होते, तिचे निरसन झालेले आहे.
पुस्तकांच्याच संदर्भात,
अजयजी म्हणताहेत त्याप्रमाणे, ई पुस्तके विकण्याच्या खर्चाइतकाच खर्च कागदी पुस्तके विकतानाही करावा लागतो ना?
प्लस फिजिकल ट्रान्स्पोर्ट कॉस्ट अॅड होते. तसेच मधल्या पुस्तक विक्रेत्यांचे कमिशन. या दोन बाबी सेफ्टी सॉफ्टवेअर्सच्या किमतीला offset करणार नाहीत काय?
(माफ करा, बरीच इंग्रजी/मराठी खिचडी झालिये)
>सॉफ्टवेअर्सच्या किमतीला
>सॉफ्टवेअर्सच्या किमतीला offset करणार नाहीत काय?
सुरुवातीला नाही कारण या तंत्रज्ञानामुळे सुरुवातीला तरी स्वभक्षण (cannibalism) होण्याची शक्यता आहे. ते किती होईल याचे ज्याचे त्याचे आडाखे वेगळे आहेत.
एका वाचकाच्या दृष्टीकोनातून
एका वाचकाच्या दृष्टीकोनातून वाचल्यामुळे असेल, पण टग्या, तुमचा लेख आवडला आणि पटला.
अजय यांनी मांडलेली नाण्याची दुसरी बाजू समजून घेते आहे. आणि तीही काही अंशी योग्य वाटते आहे.
>>अगदी फु़कट एखादी गोष्ट मिळाली तरी त्याचीही किंमत आपल्याला नसते. त्या फुकट गोष्टीतून दुसर्या व्यक्तीला/संस्थेला फायदा झाला तरीही तो आपल्याला चालत नाही. अगदी जवळचे उदाहरण म्हणजे मायबोलीवर सगळे फु़कट आहे आणि मायबोलीचा अनेकांना फायदा झाला आहे. पण मायबोलीवरच्या जाहिराती दिसूच नयेत किंवा इतर पद्धतीने मायबोलीला मिळणारे इतर उत्पन्न कमी होईल असे उपाय काही मायबोलीकर अगदी हिरीरीने, मायबोलीवरच मुद्दाम दुसर्यांना सांगत असतात.
अजय, वेबमास्तरांनी, 'जाहिरातीवरची चर्चा इथेच थांबवू' म्हंटलंय. पण मला यावर लिहिलं नाही तर रुखरुख लागेल. तेव्हा कृपया लिहू द्या. या मुद्द्यातलं पहिलं वाक्य अगदी पटतं. पण पुढचा भाग काही पटला नाही. मायबोलीला जाहिरातींतून मिळणार्या उत्पन्नाचा काहींना जळफळाट होतो असा काहीसा अर्थ ध्वनित होतो. अनेक धाग्यांवर जाहिरातींबाबत तक्रारी वाचल्यात आणि केल्यात म्हणून माझी बाजू मांडाविशी वाटते.
या जाहिराती बघून मायबोलीला होणार्या किंवा न होणार्या उत्पन्नाचं डोक्यातही येत नाही. उत्पन्न झालं, त्यामुळे मायबोली टिकली, वाढली तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण स्वार्थ! ती आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तक्रार करणारे वेगळ्या कारणांमुळे ती करत असतात. उदा: एखाद्या सुंदर फोटोवर बचकन जाहिरात दिसते. फोटो वर खाली स्क्रोल करून बघू म्हंटलं तरी फायदा नसतो. अशावेळी जाहिरातीचा वैताग आला तर काय करायचं?
दुसरं उदाहरण म्हणजे बडबड्या जाहिराती. सध्या त्यांचा ताप नाही. पण चुकून व्हॉल्यूम मोठा असला तर आपोआप ढणाणा आवाजात ऐकू आलेली जाहिरात अप्रिय असणार नाही तर काय? तरीही तक्रार करायची नाही?!
काही जाहिराती अत्यंत व्हल्गर असतात. त्या येऊ नयेत म्हणून वेळोवेळी अॅडमिनांच्या विचारपुशीत लिहिलेलं वाचलं आहे.
तेव्हा तुमचं हे लिहिणं मलातरी खटकलं, अपमानकारक वाटलं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पण कमी किमतीतली वस्तू लोक विकत घेत नाहीत याबद्दल आपण दिलेले मोसरबिअरचे उदा. पटले नाही.
माझ्या परिप्रेक्ष्यातून पहाता, रस्त्यावर पायरेटेड डिव्हिडीज मिळतात, त्या अल्प किमतीला विकतच घेतल्या जातात ना?
त्यात पायरसी करणार्यापासून सगळ्याच डिस्ट्रीब्युशन चेनला काहीच फायदा नसता, तर पोलिस कारवाई, लाच देणे इ. खर्च धरूनही हे लोक या धंद्यात समाजप्रबोधनाकरता नक्कीच येत नसावेत
हा सगळा लेख वाचून काही मुद्दे
हा सगळा लेख वाचून काही मुद्दे मांडावेसे वाटतात -
मराठी आणि इंग्रजी प्रकाशनव्यवसाय यांची अनेक बाबतींत तुलना करता येत नाही.
इंग्रजी पुस्तकांचा वाचकवर्ग अनेक देशांमध्ये आहे. तसा मराठीचा नाही. तो महाराष्ट्रातच आहे. (याचा अर्थ इतकाच की मराठी महाराष्ट्रातच बोलली जाते. इंग्रजी अनेक देशांमध्ये बोलली जाते. मराठी माणूस परदेशातही मराठी पुस्तकं वाचतो, हा मुद्दा नाही. त्यामुळे बड्या इंग्रजी प्रकाशकांच्या अनेक देशांमध्ये शाखा असतात. मराठी प्रकाशक महाराष्ट्राबाहेरही पडलेले नाहीत.)
वाचकवर्ग सीमित असल्याने व्यवसायाचा आवाका लहान आहे. मागणी असली की पुरवठा वाढतो. पण मागणीच नाही. आजही महाराष्ट्रातल्या निम्म्याअधिक जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची दुकानंच नाहीत. म्हणजे ललित वाङ्मयाची. शाळाकॉलेजाच्या पुस्तकांची नव्हेत. पुस्तकांची दुकानंच नसल्याने पुस्तकविक्रीसाठी फार कमी पर्याय उपलब्ध होतात.
मागणी कमी असल्याने फार कमी पुस्तकांच्या वाट्याला तिसर्या-चौथ्या आवृत्तीचं भाग्य येतं. हल्ली आवृत्तीही बहुतकरून जास्तीत जास्त पाचशेची असते. दरवर्षी अपवादात्मक दोनतीन पुस्तकांची हजार-दोन हजाराची आवृत्ती निघते.
एवढं असूनही प्रकाशकांनी ईबूक निघावेत म्हणून प्रयत्नच केले नाहीत का? माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक सर्व बड्या प्रकाशकांनी केले. पण गुंतवणूक, उत्पन्न यांचं गणित न जमणारं आहे.
लेखक, प्रकाशक वाचकाला केवळ आनंद मिळावा, म्हणून पुस्तकं छापतात हा अनेक वाचकांचा गैरसमज आहे. लेखकाला आणि प्रकाशकाला पुरेसा मोबदला मिळाला नाही, तर पुस्तकं निघणार नाहीत. नाव व्हावं, अशी इच्छा असू शकते, पण जगायला पैसा लागतो. लेखकानं कायम गरिबीत जगलं पाहिजे, असं अजिबात नाही. त्यालाही योग्य तो मोबदला मिळायला हवा. सध्याच्या पुस्तकांची किंमत, खप लक्षात घेता, लेखकानं केवळ लेखनावर उपजीविका करणं शक्यच नाही.
गेल्या काही वर्षांत मराठीत कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह प्रकाशित होण्याचं प्रमाण काळजी वाटावी इतकं कमी झालं आहे. अनुवादित साहित्य, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, स्वयंपाकाची पुस्तकं किंवा सेल्फ-हेल्प बुकांना मागणी आहे. यातलं सगळंच साहित्य वाचक ईबुकाच्या स्वरूपात आणि विकत घेतील, याची प्रकाशकांना खात्री नाही. महाराष्ट्रात ग्रंथालयांचं अप्रतिम जाळं असल्यानं पुस्तक तीन दिवसांसाठी आणणं सोयीचं आणि स्वस्त आहे.
@मृण्मयी तुम्हाला यात काही
@मृण्मयी
तुम्हाला यात काही अपमानास्पद वाटले असेल तर क्षमस्व. कारण तसा कुठेच उद्देश नव्हता. उलट जे मायबोलीकर अशा त्रासदायक जाहिराती आमच्या नजरेस आणून देतात त्या सगळ्यांचा आदर आहे. त्यामुळे फक्त मायबोलीचाच नाही तर या पर्यावरण संस्थेतून त्रासदायक जाहिरातदार काढून टाकायला मदत होते आणि त्यातून प्रामाणिक जाहिरातदारांनाही मदत होते आहे. येत्या काही दिवसात या विषयावर स्वतंत्र धागा सुरु करावा म्हणतो तिथे जास्त खोलात जाउन बोलता येईल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47946
हा नवीन धागा सुरू केला आहे.
लेख आवडला. बाकी तांत्रिक
लेख आवडला. बाकी तांत्रिक बाबींविषयी कल्पना नाही पण मला स्वतःला ईबुक्स, ऑडिओ बुक्स इ. आवडत नाहीत. हातात जोवर अॅक्चुअल पुस्तक येत नाही तोवर वाचनाची मजा वाटत नाही. माझ्या आयपॅड, फोनवर वगैरे एकही मराठी, इंग्लिश पुस्तक नाही. ऑनलाईन पुस्तकं मागवायची तर बर्याचदा अव्वाच्यासव्वा शिपींग भरावं लागल्याच्या अनुभवातून तो पर्यायही वापरावासा वाटत नाही. भारतात गेल्यावर जेवढं शक्य आहे तेवढं घेऊन येणे हाच पर्याय सध्य दिसतोय.
सध्याच्या पुस्तकांची किंमत,
सध्याच्या पुस्तकांची किंमत, खप लक्षात घेता, लेखकानं केवळ लेखनावर उपजीविका करणं शक्यच नाही. >>
पुस्तकाची भंगार क्वालिटी असेल तर असे होऊ शकेल. जर पुस्तकाची क्वालिटी (दर्जा) उच्च असेल तर लोकं आजही जुनी पुस्तके शोधताना ( कारण ते पुस्तक बाजारात उपलब्ध नाही) दिसतात. (माझ्यासहित) केवळ कोणी पुस्तकं लिहिले म्हणून ते बाजरात खपले पाहिले असे थोडी आहे?
मला तुझे आणि अजयचे काही मुद्दे मान्य आहेत. पण तुझा परदेशी मुद्दा - ह्यात थोडा होलिस्टिक व्हियू घेऊ.
मराठी प्रकाशकांनी महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांचा ( देशी आणि विदेशी - तो वर्ग आता खूप मोठा आहे.) विचार केला नाही तर त्यासारखे दुदैवी दुसरे काही नाही. इ बुक हे भविष्य आहे. आणि लोकं चांगले पुस्तक असेल आणि इ मध्ये उपलब्ध असेल तर ते लवकर घेऊ शकतील आणि त्या साठी पैसे मोजायला प्रॉब्लेम येत नाही.
उदाहरण १ .आय ट्युन्स मध्ये $१ ला एक गाणे मिळते. तेवढ्या पैशात ७५ गाण्यांची लिगल सिडी मिळते. पण तरी खूप देशी लोकं केवळ परदेशात तश्या लिगल MP3 मिळत नाहीत म्हणून असे $१ देऊन एक गाणे विकत घेतात.
दुसरे उदा हिंदी पिच्कर. तो १५ वर्षांपूर्वी चालत नव्हता. थिएटर ओस पडली होती आणि अचानक गेल्या दशकात NRI - परदेशी वितरणामुळे तो व्यवसाय भरभराटीस आला. थोडक्यात काय तर टारगेट ऑडियन्स ओळखला.
आताशा कित्येक मराठी चित्रपट अमेरिकेतील प्रत्येक मोठ्या शहरात प्रदर्शित होतात / खेळ आखले जातात. ते का? तर त्यांनी ऑडियन्स आणि मार्केट ओळखले आहे. पण त्याच्या उलट मी कधी कलकत्यात खास मराठी चित्रपट चालताना बघितला नाही. त्याच वेळी पुण्यात तेलुगु चित्रपट चालायचे.
--
मराठी प्रकाशकांनी असा टारगेट ऑडियन्स ओळखणे ही काळाजी गरज आहे. तुम्ही (प्रकाशक आणि लेखक) उच्च दर्जाचे पुस्तक देऊ शकत नसाल तर तुम्ही रस्तावर आलात तरी इतरांचे काही बिघडणार नाही. (भाषा संवर्धण वगैरे मुद्दे राहूद्याच) लोकं इंग्रजी मधील दर्जेदार पुस्तकं नक्कीच वाचतील.
त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिने एक तर आधिच चांगली पुस्तकं कमी / खप कमी आणि त्यात व्यवसाय महाराष्ट्राच्या बाहेर पसरवायचा नाही असे असले तर व्यवहार नक्कीच आतबट्ट्याचा होईल.
माझा प्रतिसाद थोडा वेगळ्या अँगलने पण आहे पण इ बुक (विकत) मिळत असेल तर त्यात दोन्ही साईडचा फायदच आहे. (वाचक आणि प्रकाशक) असे मला वाटते. फक्त त्याचे मार्किटिंग व्यवस्थित व्हायला हवे. उदा जसे हिंदूचे झाले. जर त्याचे इ बुक असले असते तर ते तत्काळ लोकांनी विकत घेतले असते, ह्याची खात्री आहे.
<त्यामुळे व्यवसायाच्या
<त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिने एक तर आधिच चांगली पुस्तकं कमी / खप कमी आणि त्यात व्यवसाय महाराष्ट्राच्या बाहेर पसरवायचा नाही असे असले तर व्यवहार नक्कीच आतबट्ट्याचा होईल. >
व्यवसायाच्या बाबतीत उदासीन असे काही प्रकाशक पूर्वी होते, पण हल्लीच्या प्रकाशकांची नवीन पिढी नक्कीच व्यवसायाच्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत साक्षर आहे. व्यवसाय बुडला तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकणार नाही, अशी मनोवृत्ती त्यांची नक्की नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.
तू पुण्यातल्या तेलुगु चित्रपटांबद्दल बोललास. हल्ली पुण्यात हे चित्रपट प्रदर्शित होतात, हे मान्य. पण किती मराठी प्रेक्षक हे चित्रपट बघतात? नोकरी-शिक्षणासाठी त्या त्या प्रांतांतून आलेले हे चित्रपट बघतात. परदेशात जेव्हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात, तेव्हा ते बघण्यासाठी 'भारतीय' प्रेक्षक जातात. केवळ मराठी किंवा पंजाबी प्रेक्षक नसतात. म्हणजे संख्या वाढली. आता 'फॅण्ड्री' भारतभरात प्रदर्शित होईल. अपेक्षा अशी की सर्व भाषांचे प्रेक्षक हा चित्रपट बघतील. पण हे पुस्तकांच्या बाबतीत शक्य आहे का? तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाला, तरी आपण तेलुगु पुस्तक वाचतो का?
मराठी प्रकाशकांना भारताबाहेरच्या, महाराष्ट्राबाहेरच्या मराठी वाचकाबद्दल आस्था नाही, असं नाही. पण गेल्या काही वर्षांतल्या ईबुकांचा खप लक्षात घेता, खरंच ईबूक महाराष्ट्राबाहेरतरी वाचली जातील का, हा मुख्य प्रश्न आहे. उदाहरण देतो. गेल्या वर्षी एका मोठ्या दिवाळीअंकाच्या चाळीस हजार छापील प्रती संपल्या. याच अंकाची ई-आवृत्ती १०७ वाचकांनी विकत घेतली. ही तफावत मला फार मोठी वाटते. हे झालं ईबुकांबद्दल. दोन दिवाळी अंक मला खूप आवडतात. मला ते अतिशय दर्जेदार वाटतात. पण त्यांचा खप किती? पाचेक वर्षांपूर्वी तीन हजारांची आवृती खपत असे. यंदा हजाराची आवृत्ती जेमतेम खपली. यातून असा कितीसा नफा मिळणार? 'आम्ही आमची हौस म्हणून अंक काढतो', असं प्रकाशक सांगतात. पण अशी हौस प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत ठेवून चालणार नाही आणि असाच खप असेल, तर प्रकाशक तंत्रज्ञानावर खर्च करायला बिचकेल.
एक महत्त्वाचा मुद्दा आवाक्याबद्दल मला मांडावासा वाटतो. आपण मराठी प्रकाशनव्यवसायाची तुलना इंग्रजी प्रकाशनव्यवसायाशी किंवा चित्रपटांशी करतो. ती मला का योग्य वाटत नाही, हे वर लिहिलं आहे. त्यात अर्थकारणाबद्दल लिहायचं राहिलं. वाचक जेव्हा शंभर रुपयाचं पुस्तक विकत घेतो, तेव्हा त्यातले ३०-३५% दुकानदाराच्या खिशात जातात. १०-१५% लेखकाला. २०% निर्मितीखर्च आणि उरलेले प्रकाशकाचे. हा निव्वळ नफा नसतो. यातून प्रकाशकाला कर्मचार्यांचे, संपादकांचे पगार, वीजबिलं, जागेचं भाडं हे सगळं भागवायचं असतं. हल्ली पुस्तकांची किंमत साधारण २००-३०० रुपये असते. हजाराची आवृत्ती खपली असं समजलं, तरी यातून लेखक, प्रकाशक यांना कितीसा पैसा मिळतो, याचं गणित करता येतं. त्यामुळे प्रकाशकानं वर्षाला दहा पुस्तकं छापली, तरी बरं उत्पन्न देणारं एकच पुस्तक असतं. आणि म्हणून संपादकांना, लेखकांना मानधनही अतिशय बेताचं मिळतं.
असं चित्र असताना प्रकाशकाला फार उड्या मारता येत नाहीत. दोन पुस्तकांच्या जरी पाचसात आवृत्ती खपल्या, तरी तो पुढची उडी मोठी घेण्याचा विचार करेल. पण असं घडत नाही.
शिवाय पायरसीचा मुद्दा आहेच. गेल्या आठवड्यातच दोन वितरकांशी बोलत होतो. 'कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर यांच्या सगळ्या कविता ऑनलाइन आहेत..त्यांचे काव्यसंग्रह हल्ली अगदीच कमी जातात', असं दोघांनीही सांगितलं.
तुम्ही (प्रकाशक आणि लेखक)
तुम्ही (प्रकाशक आणि लेखक) उच्च दर्जाचे पुस्तक देऊ शकत नसाल तर तुम्ही रस्तावर आलात तरी इतरांचे काही बिघडणार नाही. (भाषा संवर्धण वगैरे मुद्दे राहूद्याच) लोकं इंग्रजी मधील दर्जेदार पुस्तकं नक्कीच वाचतील. >>> हे म्हणणे काही पटले नाही. फारच अतिशयोक्त वाटले. खरेतर तुम्ही त्याआधी टारगेट ऑडियन्सचा मुद्दा मांडला होता, परंतु तुम्ही पुढच्याच वाक्यात एकदम 'दर्जा कमी असला तर ...' अशा स्वरूपाचा मुद्दा मांडला. तुमचा मूळ मुद्दा म्हणजे टारगेट ऑडियन्स नसल्याने दर्जेदार पुस्तकांनादेखील उठाव नाही हा होता, असे मी समजत होतो. ' उच्च दर्जाची = चांगल्या खपाची ' असे नसल्यानेच तर हा सर्व चर्चाविषय उत्पन्न होतो असे मला वाटते.
चांगले लेखक कुठल्याही भाषेत येणे बंद होईल असे मला वाटत नाही. संख्याशास्त्रानुसार कोणाचा दर्जा खाली असेल, तर कोणाचा वर. चांगल्या लेखकांची ज्यांचा खप कमी होण्याची शक्यता असेल परंतु दर्जेदार अशी पुस्तके प्रकाशित करण्यास प्रकाशक जास्त उदासीन होत जातील, हा धोका जाणवत असेल, तर ते भाषासंवर्धन बाजूला ठेवूनसुद्धा मला धोकादायक वाटते. ह्याचे कारण सरळसरळ स्वार्थ आहे. मला इंग्रजी भाषेत पुस्तके वाचायला आवडतात, तशीच मराठीदेखील. प्रत्येक भाषेची स्वतःची खुबी असते. माझा मराठी भाषेचा खुराक बंद झाला, तर माझे स्वतःचे सांस्कृतिक अवकाश अपुरे राहील, असे मला वाटते. त्यामुळे वरील प्रकारच्या भांडवलवादाशी मी असहमत आहे. ह्यासाठी मी जास्तीत जास्त पुस्तके स्वतः विकत घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
<पण अशी हौस प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत ठेवून चालणार नाही> हे चिनूक्स ह्यांचे म्हणणे हेच अधोरेखित करते असे मला वाटते. प्रकाशकांचा व्यवसाय पूर्णतः बंद होईल असे वाटत नाही. परंतु खपाची ताकद नसलेली पुस्तके काढायची त्यांची इच्छा कमी होत जाईल.
वर त्यांनी ४०००० आणि १०७ च्या तफावतीतून हाच मुद्दा प्रकाशकांच्या इ-बुक काढण्याच्या इच्छेबद्दल सांगितला आहे असे मला वाटते. अव्यवहार्य परंतु चांगल्या कल्पना फार वेळ राबवता येत नाहीत.
आता 'फॅण्ड्री' भारतभरात प्रदर्शित होईल. अपेक्षा अशी की सर्व भाषांचे प्रेक्षक हा चित्रपट बघतील. पण हे पुस्तकांच्या बाबतीत शक्य आहे का? तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाला, तरी आपण तेलुगु पुस्तक वाचतो का? >>> अनुमोदन. किंबहुना फॅण्ड्रीनामे मराठी पुस्तक प्रदर्शित झाले, तरी ते चित्रपट पाहणार्यांच्या किती टक्के लोक वाचतील?
'कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर
'कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर यांच्या सगळ्या कविता ऑनलाइन आहेत..त्यांचे काव्यसंग्रह हल्ली अगदीच कमी जातात',
<<
हे जर असे असेल, तर चर्चा विषयाच्या अनुषंगाने - प्रताधिकाराबद्दल थोडे मत :
असे म्हणावेसे वाटते, की कॉपीराईट आमच्याच कडे आहे, मग आम्हीच फक्त पुस्तके छापू शकतो, व वरतून (पुरेशी) मागणीच नाही तर छापणार नाहीच, असा एकंदर कॅच२२ आहे. असे केले, तर मनापासून कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर आवडलेला एकादा साहित्यप्रेमी पुस्तक शोधत फिरेल अन त्याला ते मिळणार नाही अशी पररिस्थिती उत्पन्न होते आहे.
मग यापेक्षा सरळ ऑफिशियल पीडीएफ अधिकृत संस्थळावर फुकट उपलब्ध करून द्यावी, अन साहित्यप्रेमींना विनंती करावी, की बाबाहो, जर खरेच तुम्हाला या कवीची अन प्रकाशकाची कदर असेल तर एक ५० रुपयांची मनीऑर्डर अमुक पत्त्यावर पाठवा! असेही लोक कॉपीराईट वगैरे फाट्यावर मारीत आहेतच, तेव्हा हे असे ^ करणे अगदीच अशक्य वा impractical आहे का?
लोकांनी व्हॉट्सॅपवर समजा पायरेटेड 'पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा' फॉरवर्ड केली, तर मला तरी यात त्या कवीशी ओळख होण्याचाच, अर्थात जाहिरात होण्याचाच भाग जास्त दिसतो. अशा पायरेटेड कथा कविता वाचणारे बहुतांश कॉलेजतरुण असतात. पॉकेटमनी सोडाच, मोबाईलचा रिचार्ज मारायला १० रुपये नसतात खिशात. पण वाचनाने भारून अन कवितांनी झिंगून जाण्याचं वय असतं ते. हजार लोकांनी पायरेटेड वाचली, तरी १०० तरी नक्कीच खरे कदरदार निघतील अन पहिल्या पगारावर ५० ची मनिऑर्डर पाठवतील. - प्लेस्टोरवरच्या फ्री अॅप्सचा फंडा तोच आहे ना?
मराठी टेक सॅव्ही वाचकाला
मराठी टेक सॅव्ही वाचकाला कुठली पुस्तके वाचायला आवडतील याचा अभ्यास झाला आहे का ? साने गुरुजी, सावरकर यांची पुस्तके वाचण्यात ( सध्या तरी तत्सम पुस्तकेच आहेत ) नव्या पिढीला रस आहे का ? आणि नवे बुक रिडर वापरायला मराठी वाचकांना आवडते का ?
मला तरी या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत असे वाटतेय.
>> शेवटी हा प्रश्न नवीन
>> शेवटी हा प्रश्न नवीन तंत्रज्ञानाचा नाहीच आहे.
हा प्रश्न नवीन तंत्रज्ञानाचाच आहे. क्यासेट ने एल-पी रेकॉर्ड चा धंदा बसवला, तर MP3 ने ऑडीओ क्यासेटला नेस्तनाबूत केले. मध्यंतरी MP3 प्लेयर (iPod etc) जोशात होते. पण आता मोबाईल फोनने त्यांना नामशेष करून टाकले. पाट्या-वरवंट्यावर वाटलेली चटणी लोकांना कितीही आवडली तरी मिक्सरचा सोयीस्करपणा नेहमीच व्यवहारी ठरतो. Kodak सारखी मातब्बर कंपनी बदलत्या डिजिटल युगाशी जुळवून न घेतल्याने मोडीत निघाली. मी दर आठवड्याला मुंबई-पुणे प्रवास करतो आणि या प्रवासात वाचन करतो. मराठी –ई-पुस्तके उपलब्ध नसल्याने माझे इंग्रजी वाचन सध्या खूपच जास्त वाढले आहे. माझे एक चुकार उदाहरण प्रातिनिधिक मानता येणार नाही असा जर विचार केला तर ती व्यावसायिक आत्महत्या ठरेल. अधिकाधिक तरुण पिढी इंग्रजी माध्यमातून शिकत आहे. ही तरुण पिढी सध्या कायम त्यांच्या मोबाईल स्क्रीनला चिकटलेली असते. त्यांना वाचते करायचे असेल तर पुस्तकांना त्यांच्या स्क्रीनवर यावेच लागेल. इंग्रजी साहित्याची सहज उपलब्धता त्यांना मराठी पुस्तकांपासून दूर घेऊन गेली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
>> त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक भरून निघेल का
ई- पुस्तकांसाठी लागणारी गुंतवणूक नगण्य आहे. संगणकीय प्रत तयारच असते. DRM चा खर्च देखील नगण्यच आहे. त्यांचा वाहतूक किंवा साठवणूक खर्च नसतो. नासाडी चा खर्च नसतो. ई-पुस्तकांची marketing cost जास्त असेल असे तुम्ही का म्हणता हे कळले नाही. उदाहरणार्थ “हिंदू” पुस्तकाची marketing cost छापील आणि ई-पुस्तकासाठी सारखीच असणार. ई-पुस्तकांसाठी लागणारी गुंतवणूक हा पूर्णपणे गैरलागू मुद्दा आहे.
>> आणि सध्या जे काही पैसे मिळत आहेत तेही बंद होईल का, या अतिशय वास्तविक भितीचा आहे.
तुमची भिती अतिशय रास्त आहे. सध्या जी काही विक्री होत आहे आणि जे काही पैसे मिळत आहेत ते दिवसेंदिवस अजून तुटपुंजे होत जाणार आहेत. यावर मात करण्यासाठी पुस्तकांच्या किमती वाढवणे म्हणजे लोकांना पर्यायी करमणुकीकडे ढकलणे आहे. पण काहीही कृती न करता परिस्थिती बदलणार नाही. आणि माझ्या वैयक्तिक मते नवीन तंत्रज्ञानाला गवसणी घालणे हीच योग्य दिशा आहे. Progress or perish.
>> सध्याच्या पुस्तकांची किंमत, खप लक्षात घेता, लेखकानं केवळ लेखनावर उपजीविका करणं शक्यच नाही.
१००% सहमत. सध्याच काय तर मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये कधीही, कोणीही, कितीही लोकप्रिय लेखक फक्त पुस्तक विक्रीतून मिळणाऱ्या रोयल्टी वर उपजीविका करणं शक्य नव्हतं. याचा ई-पुस्तकांशी काहीही संबंध नाही.
>> महाराष्ट्रात ग्रंथालयांचं अप्रतिम जाळं असल्यानं पुस्तक तीन दिवसांसाठी आणणं सोयीचं आणि स्वस्त आहे.
खरंतर ग्रंथालयांमुळे लेखक/प्रकाशाकांच अतोनात नुकसान होत आहे असं नाही का वाटत? पुस्तकं वाचण्याची आवड, ती विकत घेण्याची आर्थिक क्षमता असणारी हजारो मंडळी ग्रंथालयातून फक्त तीन दिवसांसाठी पुस्तक घरी आणतात आणि अनुषंगाने पुस्तकांची विक्री खालावते. पण म्हणून खप वाढवण्यासाठी जर ग्रंथालये बंद केली तर तो स्वत:च्याच पायावर धोंडा पाडणे होईल. नीट मोकळेपणी विचार केला तर ग्रंथालय आणि ई-पुस्तके यातील साम्य जाणवून येईल.
>> 'कुसुमाग्रज, मर्ढेकर,
>> 'कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर यांच्या सगळ्या कविता ऑनलाइन आहेत..त्यांचे काव्यसंग्रह हल्ली अगदीच कमी जातात',
मर्ढेकर वारले त्याला आता ५८ वर्षे झाली. बोरकर जाऊन ३० वर्षे झाली. कुसुमाग्रज त्या मानाने अलीकडे १५ वर्षांपूर्वी निर्वतले. अजून किती वर्ष हा सांस्कृतिक ठेवा चरकातून पिळून फायदा काढायचा विचार आहे? कवी किंवा लेखक जिवंत असेपर्यंत कॉपीराईट असणे एकवेळ समजू शकतो. पण त्याच्या मृत्युनंतरही वर्षानुवर्षे... दशकानुदशके तिसऱ्याच कोणाला तरी आर्थिक फायदा मिळालाच पाहिजे हा "च" चा अट्टाहास मात्र मी अजिबात समजू शकत नाही.
टग्या, या सर्वाच्या मूळाशी
टग्या,
या सर्वाच्या मूळाशी एकच मुद्दा आहे. outdated or in some instances non availability of proper copyrights laws pertaining to re publication of marathi books in e- format. बरेच कायदेशीर सल्ले व विचारानंतर आणि याची पाळे मूळे खणून काढल्यावर हा 'ऊद्योग' करायचे ठरवून देखिल तो विचार सध्याच्या कायदेशीर चौकटीत बसत नाही म्हणून अक्षरशः केराच्या टोपलीत टाकावा लागला.. हे दुर्दैव! यात मोठे नुकसान वाचकांपेक्षाही साहित्याचे अधिक आहे असे मला वाटते. एकीकडे आपण मराठी भाषा दिनाचे गोडवे गातो मात्र भाषा प्रसारण, विस्तार व व्यावहारीक सवलतींच्या बाबतीत खरी वस्तुस्थिती मात्र निराशाजनक आहे.
म्हणूनच जे काही ई- साहित्य ऊपलब्ध आहे ते निव्वळ ६० वर्षापूर्वीच्या प्रकाशनाचे आहे... आणि हे चित्र बदलायचे असेल तर एक मोठी कायदेशीर चळवळच ऊभारावी लागेल. आणि अर्थातच एखाद दुसरा अपवाद वगळता, प्रसिध्द व यशस्वी प्रकाशक याबाबत ऊदासीन असतील हे समजण्यासारखे आहे.
मराठी ई- साहित्याची 'पायरसी' होईल हा मराठी बद्दल अभिमान असलेल्यांचा भ्रम आहे... दुर्दैवाने तेव्हडी मागणी मराठी साहित्याला नाही. पण तेच साहित्य जर ई-प्रकाशाना सारखे सुलभ केले तर मागणी व वाचक वर्ग वाढेल असा हा तिढा आहे. ई- साहित्याच्या प्रकाशनाचे मार्ग छापिल साहित्या पेक्षा निश्चीतच अधिक सुरस, सकस, व बहुढंगी करता येऊ शकतील हे निश्चीत!
तू पुण्यातल्या तेलुगु
तू पुण्यातल्या तेलुगु चित्रपटांबद्दल बोललास. हल्ली पुण्यात हे चित्रपट प्रदर्शित होतात, हे मान्य. पण किती मराठी प्रेक्षक हे चित्रपट बघतात? >> अरे टारगेट मराठी लोकं नाहीतच ना. पुण्यात राहणारे तेलुगु लोकं आणि मी तेच म्हणतोय. परदेशी / महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी लोकं हे प्रकाशकांचे टारगेट नाही का?
खरंच ईबूक महाराष्ट्राबाहेरतरी वाचली जातील का, >> मार्केटिंग माणसाला सवय लावते. अॅपलचे प्रॉडक्टस का विकल्या जातात, किन्डल वर किती पुस्तकं विअकली जातात हे पण बघ. लोक वाचतात. मी प्रचंड प्रवास करतो. दरवेळी विमानात मी जाडजुड पुस्तक घेऊन जायचो, पण आय पॅड आले, किण्डल आले आणि विमानात ७०% लोकं ( बिझनेस ट्रॅव्हलर्स - मन्डे ए एम, थर्स्डे पि एम) पाहिले आणि पटले की ई बुक हवे आहेत आपणही घेऊ. थोडक्यात सवय ही लावली जाऊ शकते.
हे म्हणणे काही पटले नाही. फारच अतिशयोक्त वाटले <<< ह्यात अतिशयोक्ती ती काय? अहो हा व्यवहार आहे. पुस्तक आवडले नाही तरे फक्त प्रकाशित झाले म्हणून घेणार का?
एक उदाहरण परत - फॅन्ड्री, टिपी, दुनियादारी असे पिक्चर लोक थिएटर मध्ये जाऊन का पाहतात? तर ते दर्जेदार आहेत म्हणून , मग दर्जेदार पुस्तक द्या लोक विकत घेतीलच.
चिनूक्सच्या प्रतिसादात त्याने दिवाळी अंकाबद्दल लिहिले ( ई नाही, तर प्रकाशित) किती लोक दिवाळी अंक घेत आहेत? तसेच प्रकाशित पुस्तकांची ५०० / १००० ची आवृत्ती निघते असे तो लिहितो आणि त्याची माहिती फर्स्ट हॅण्ड आहे. म्हणून परत झालयं काय की अंकात दर्जेदार कथाच नसतात, त्याच त्या बोअर कथा / कविता असल्यामुळे लोकांनी घेणे बंद केलेय. आणि पुस्तकं वाचण्यासारखीच नसतात म्हणून परत तोच दर्जाचा मुद्दा आणि व्यवहाराचा मुद्दा.
मी टारगेट ऑडियंस असे जेंव्हा लिहिले तेंव्हा मला पुस्तक लगेच न घेऊ शकणारे सर्व आणि इलेक्ट्रॉनिक मिडियावर भर देणारी सर्व असे लोक अभिप्रेत आहेत. आणि आज तरी मराठी प्रकाशक त्यांच्या गरजा भागवू शकत नाही हे दिसतेय.
मे बी ते दोन्ही टारगेट आणि दर्जा एकापाठोपाठ यायला नको होते हे मान्य.
झा मराठी भाषेचा खुराक बंद झाला, तर माझे स्वतःचे सांस्कृतिक अवकाश अपुरे राहमराट्।एसे मला वाटते. >> अगदी आणि म्हणूनच मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर देखील राहतो आणि तिथे सर्वात मोठा प्रश्न मराठी पुस्तकं उपलब्ध असण्याचा आहे. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस देखील टेक सॅव्ही आहे, त्याला बदल आवडतात हे विचारात घेऊन त्यांना टारगेट करा असे माझे म्हणणे आहे.
बाकी फुकट वाटले तर थोडेफार पैसे लोकं देतील ह्यावर माझाही विश्वास नाही. PDF विकत द्या नक्की घेऊ.
Pages