४ ) नैरोबीचा निसर्ग
या सुंदर हवामानामूळे निसर्गाचे एक अनोखे रुप नैरोबीत दिसत राहते. शहरभर मोठमोठे वृक्ष जोपासलेले दिसतात. तिथल्या वृक्षांच्या आकारमानाची कल्पना आपल्याला येणे कठीण आहे, कारण अगदी सहाव्या मजल्यावरच्या घरातूनदेखील मला मोठे मोठे वृक्ष बसल्याबसल्या दिसत असत.
तसे बघायला गेलो तर केनया प्रसिद्ध आहे तो गवताळ प्रदेश आणि त्यामधल्या तृणभक्षी प्राण्यांसाठी पण नैरोबीत मात्र वेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत.
पांढरी बाभूळ, गुलाबी दिल्ली सावर, लालभडक टोकफ़ळ, पिवळा टिपूआना, वेगवेगळ्या रंगांचे कांचन आणि निळाजांभळा झकरांदा सगळीकडेच दिसतात. या झाडांचे फ़ुलण्याचे मौसम वेगवेगळे असल्याने, त्या त्या रंगांची उधळण असते. याशिवाय काही एकेकटे फ़ुलणारे वृक्ष पण बरेच आहेत.
नैरोबीच्या मधोमध उहुरू ( उहुरु म्हणजे स्वातंत्र्य. इंग्रजी स्पेलिंग वरून, यू, हू आर यू असा उच्चारपण लहान मूले करतात ) पार्क आहे. त्या पार्कपधे एक जलाशय आहे. तिथेच दुर्मिळ असा पिवळा स्पॅथोडीया आहे. नैरोबीत वडाच्या झाडासारखे दिसणारे पण फ़ायकस कूळातले नसणारे एक झाड दिसते. त्याला पारंब्या नसतात पण घेर बराच असतो. ( तिथल्या बायका वटपोर्णिमेला याच झाडाची फ़ांदी पूजतात. ) बराच मोठा म्हणजे या झाडाच्या सावलीत आठदहा गाड्या सहज सावलीत राहू शकतात.
लोकांनी आपल्या घराच्या आवारात लावलेले आंबा, पेरू, जांभूळ, फ़णस पण असेच माजलेले आहेत. नैरोबीत घराभोवती बाग जोपासणे फ़ारच सोपे आहे. एकतर कुठलेही झाड इथे तग धरतेच शिवाय पाणी नियमित घालायची गरजही नसते.
त्यामूळे कुंपणाच्या बाहेर लावलेली गुलाबाचीही झाडे तिथे अजिबात काळजी घेतली नाही तरी छान फोफावतात. आणि भरभरुन फुलत राहतात. तसाही गुलाबाची फुले आणि इतर फुलेही निर्यात करण्याचा
उद्योग, केनयात जोरदार आहे.
निर्यातीसाठीची फुले मात्र फार काळजीपूर्वक वाढवली जातात. त्यांचा आकार आणि रंग एकसमान असतो.
त्यातूनही जी उरतात ती नैरोबीतल्या बाजारात असतात. किंमतही अगदीच मामुली म्हणजे ५ शिलिंग
(साधारण २ रुपये ) अशी असते. ही फुले तिथल्या बायका बोके करण्यासाठी किंवा गाडी सजवण्यासाठी
घेतात. डोक्यात फुले माळायची पद्धत स्थानिक बायकांमधे नाही.
तिथल्या देवळातही हे गुलाबाचे उत्पादक बॉक्सेस भरभरून फुले पाठवतात. तिथल्या देवांच्या मूर्तींना अनेकदा केवळ गुलाबाचे हार घातलेले दिसतात. काढायचाच झाला तर केवळ एक दोष त्या फुलांत असतो,
तो म्हणजे त्यांना अजिबात गंध नसतो.
नैरोबीत जरा वेगळ्या प्रकारच्या चिमण्या आणि कावळे दिसतात. चिमण्या जरा आकाराने मोठ्या असतात.
कावळे तर आपल्याकडच्या कावळ्यांपेक्षा बरेच मोठे असतात. तसेच त्यांचा गळा आणि पोट पांढरेशुभ्र असते.
आवाजही जास्त कर्कश असतो. कबुतरे पण दिसतात. चमकदार निळ्या केशरी रंगाचा साळुंकीएवढा पक्षीही
दिसतो पण नैरोबीवर राज्य आहे ते कोरी ( आपल्याकडचे चंदन आणि चंदनेश्वर ) पक्ष्यांचे. करड्या रंगाचे
हे पक्षी साधारण अडीच ते तीन फूट उंचीचे असतात. रंग करडा, लांबलचक चोच आणि गळ्याखाली मोठी
पिशवी असते. डोक्यावर पिसे नसल्याने ते थोडे बेंगरुळ दिसतात खरे पण त्यांचे उड्डाण आणि उतरणे
खुप डौलदार असते. ते माणसांना अजिबात बिचकत नाहीत आणि रस्त्यावरही सहज वावरतात.
तिथल्या बाभळीच्या झाडावर त्यांची घरटी असतात. त्यांची चोच एवढी मजबूत असते कि बाभळीची
बोटभर जाडीची फांदी देखील ते सहज तोडतात. त्यांची पिल्ले पांढरीशुभ्र आणि आकाराने आपल्याकडच्या
कोंबडीएवढी असतात. घरटे बांधणे आणि पिल्लांना वाढवणे यात त्यांचे चार सहा महिने जातात.
आमच्या ऑफिसच्या जवळ एक पुत्रंजीवीचे भले मोठे झाड होते. त्यावर रात्री हजारो चिमण्या आश्रयाला
यायच्या. संध्याकाळी गटागटाने त्या यायच्या. झाड एवढे घनदाट पानांचे होते कि त्या अजिबात
दिसत नसत पण त्यांच्या चिवचिवाट एवढा असायचा कि झाडाखाली आम्हाला एकमेकांचे बोलणे
ऐकता येत नसे.
मुनिया प्रकारातले, सुगरण पकारातले पण जरा मोठे आणि बगळ्यांसारखे पण रंगाने हिरवट झाक
असलेल्या तपकिरी रंगाचेही अनेक पक्षी दिसत.
जांभळे पिकू लागली कि माकडे दिसत पण ती एकटीदुकटीच. नैरोबी शहराला लागूनच नॅशनल पार्क आहे
( त्याबद्दल मग लिहितो ) त्याच्या गेटबाहेर मी काही रानङूक्करे पण बघितली होती.
थोडीजरी उघडीप असली तर नैरोबीतला सूर्योदय आणि सूर्यास्तही बघण्यासारखा असे. माझ्या घराला दोन्ही
दिशेंना खिडक्या होत्या आणि बिछान्यातून उठल्या उठल्या मला सूर्योदय दिसत असे. आकाशातील
ढगांमूळे चंद्र आणि चांदण्यांचे दर्शन मात्र दुर्मिळ होते.
पर्यटकांना अनोळखी भागात, खास करून पार्कलँडस, वेस्टलँड भागात एकट्यादुकट्याने फिरायचा सल्ला मी
अजिबात देणार नाही. पण मी रहात होतो त्या नैरोबी वेस्ट भागात मात्र तेवढा धोका नव्हता. रविवारी सकाळी
मी असा निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेत पायीच भरपूर भटकत असे.
५ ) खादाडी
स्वस्त भाजीपाला, दूध आणि कल्पक भारतीय ( खास करून गुजराथी आणि पंजाबी ) लोकांमूळे नैरोबीत
खाण्यापिण्याची चंगळ असते. खरं तर या सदराखाली लिहिण्यासारखे भरपूर आहे.
केनयाचे स्थानिक लोक दिवसाचे ३६४ दिवस उगाली आणि सुकुमाविकी खातात. उगाली म्हणजे मक्याच्या
जाडसर रव्याची उकड. त्यात फक्त मीठ घातलेले असते. सुकुमाविकीचा शब्दशः अर्थ आठवडा ढकला.
या नावाची मोहरी वर्गातली एक पालेभाजी असते. ती पण फक्त मीठ घालून उकडलेली असते.
उपलब्ध असेल तर या भाजीत कांदा आणि टोमॅटो पण टाकतात. या उकडीची हातानेच मळून त्याची
चमच्यासारखी पारी करून त्यासोबत ही भाजी खातात.
सुकुमाविकीबरोबरच न्येरेरे ( आपला राजगिरा ) आणि चार्ड पण खातात. राजमा आणि मका एकत्र उकडून
खातात. सणासुदीला म्हणजेच नाताळाच्या दिवशी चपाती करतात. त्यांच्या भाषेतही चपाती हाच शब्द आहे
पण ती मात्र खुप जाड असते आणि अक्षरशः तेलाने थबथबलेली असते.
मटण त्यांना परवडतेच असे नाही पण शक्य असल्यास ते त्याचा न्यामा चोमा ( म्हणजेच बार्बेक्यू मीट )
करतात. त्यातही तेल व मसाले नसतात. भात आणि सोबत अवाकाडो खाण्याची पद्धत आहे.
याशिवाय ते शक्यतो दिवसातून २/३ फळे खातात ( त्यांची तिथे रेलचेल असते ) व किमान अर्धा लिटर दूध
पितात. अनेक कंपन्यातून कामगारांना दूधाची पिशवी दिली जाते. मक्याची उकडलेली कणसे आणि ऊस
पण आवडीने खातात. ( ते जशी जून कणसे व जाड ऊस खाऊ शकतात, तसे आपल्याला खाणे शक्यच नसते. )
भाजलेली रताळी व केळी (प्लांटेन) पण खातात. तिथली रताळी खुप मोठी असतात. आपल्याला एक संपवणे
शक्य होत नाही. लहान मूले टोळ, स्वॉलो सारखे छोटे पक्षीही पकडून खातात.
पण त्यांच्या दृष्टीने खाण्याची परमावधी म्हणजे चिप्स आणि सोडा. चिप्स म्हणजे आपल्या पोटॅटो फ्राईज.
पण त्या तितक्या कुरकुरीत नसतात. आणि सोडा म्हणजे सर्व कोल्ड ड्रिंक्सना असलेले एक सामान्य नाम.
कोला असो कि फंटा असो त्यांना फरक पडत नाही.
हे झाले स्थानिक लोकांचे. भारतीय लोक मात्र खाण्यापिण्याची ऐश करतात.
त्यांची उगाली आणि सुकुमाविकी आम्ही पण खात असू. फक्त उगालीला जिरे मिरचीची फोडणी देत असू.
माझ्या एका पंजाबी मित्रांने सुचवल्याप्रमाणे मी उगाली दूधात शिजवत असे. ती तर चवीला मस्तच लागत
असे. पालेभाज्या आपल्या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित फोडणी देऊन, डाळ दाणे घालून शिजवत असू.
नैरोबीच्या आसपास आणि खास करून केरिचो या गावाजवळ चहाचे मळे आहेत. तिथला चहा अप्रतिम चवीचा
असे. ( भारतात चहाच्या लागवडीखालचे क्षेत्र मागणीच्या प्रमाणात वाढलेले नाही, त्यामूळे आपल्याकडे
चहात इतर अनेक वनस्पतिंच्या पानांचे मिश्रण असते. ) केनयात मात्र प्यूअर चहा मिळतो. त्याशिवाय तिथे
मसाला मिश्रित चहाही मिळतो. इंस्टंट कॉफीसारखा इंस्टंट चहादेखील मिळतो. त्याशिवाय प्रत्येक घरी
त्यात आले, पुदीना, गवती चहा वगैरे वापरून खास चवीचा चहा बनवला जातो. हा चहा पाणी न वापरता
केवळ दूधाचाच बनवलेला असतो.
दूधाप्रमाणेच तिथे ताकही लोकप्रिय आहे. दूध म्हणजे मझिवा आणि ताक म्हणजे मझिवा लाला ( झोपलेले दूध ) किंवा माला. हे तिथे पिशवीतून मिळते. आपल्या दह्यापेक्षा जरा वेगळ्या चवीचे असते ते.
माझे गुजराथी मित्र मला घरी चहाला नेहमी बोलवत असत. एकाच्या घरी गेलो तर दुसरा नाराज होत असे,
असे करत महिन्यातून २/३ रविवारी मी कुणा ना कुणा मित्राच्या घरी जात असे. त्यांच्या घरात रविवारी
चारी ठाव जेवणाला फाटा देऊन काहीतरी वेगळे बनवले जात असे. माझ्यासाठी खास काही करायचे नाही,
ही माझी अट असे. पण त्या त्या घरी अनोखे पदार्थ बनत असत आणि माझी चंगळ होत असे.
चहा आणि थेपले. चहा आणि कसाव्याचे पापड, चहा आणि कणकेचे लाडू, कढी खिचडी आणि पापड,
हांडवो आणि ताक, डाळ्ढोकळी असे बेत असत.
मारू भजिया म्हणजे तर तिथली खासियतच. बटाट्याची भजी पण बेसनात भरपूर कोथिंबीर, मिरची
वगैरे घालून भजी केलेली असतात. सोबत टोमॅटो किसून केलेली चटणी असे. खिच्चा हा पण असाच एक
मस्त पदार्थ. खिच्चा म्हणजे तांदळाची उकड पण हे तांदूळ तीन दिवस भिजत घालून, सावलीत वाळवून
केलेल्या पिठाची असे. फोडणीला जिरे व हिंग वापरत आणि वरून कच्चे तेल व तिखट घेत.
आपल्या उकडीपेक्षा ती बरीच वेगळी आणि छान लागते. उपवासाचा दिवस असेल तर वर्याचा भात आणि
दाण्याची आमटी असे.
शाळांना सुट्ट्या पडल्या कि शाळेच्या आवारात जत्रा भरे. त्यात गुजराथी बायका स्टॉल लावत. तिथला पिझा
खुप मस्त असे. त्यासाठी तिथे एक कल्पक शेगडी केलेली असे. लोखंडी उभ्या नळकांड्यात अनेक आडव्या
ताटल्या असत. व सर्वात खाली कोळसा जाळत असत. यात एकाचवेळी ५/६ पिझा भाजता येत.
केनयातले स्थानिक चीज पण चवीला छान असायचे.
तिथल्या देवळांतून नवरात्रीमधे आणि एरवी सणांना मोफत जेवण असते. हरे रामा हरे कृष्णा देवळात
मिठाई आणि खास करून ताजे पनीर छान मिळते. गुरुद्वारातल्या लंगरमधे पण मी जात असे. तिथल्या
अप्रतिम चवीच्या जेवणावर तूप सढळ हाताने घातलेले असे.
डिपी म्हणजे डायमंड प्लाझा हे तिथल्या भारतीयांचे आवडते ठिकाण. तिथे मारू भजिया, दाबेली, चाट,
समोसे खाण्यासाठी झुंबड उडालेली असते. ताज एक्स्प्रेस हि तिथल्या शाकाहारी रेस्टॉरंटसची चेन आहे.
त्यांच्या कडे इडली डोश्यापासून सरसोंका साग पर्यंत अनेक अस्सल चवीचे पदार्थ मिळतात.
आपला चिवडा देखील चिवडो नावांनी त्यांनी आपलासा केला आहे. त्यात बटाट्याचे व हळदीचे प्रमाण जरा
जास्त असते. बटाटावडा, ढोकळा वगैरे विकणारी दुकाने पण आहेत.
स्ट्रीट फूडमधे भाजलेला कसावा व त्यावर तिखट हा माझा आवडता प्रकार. भाजलेली व उकडलेली कणसे
( तिथे सालासकट कणसे उकडतात ) आपल्यासाठी खास कोवळी बघून देतात.
याशिवाय ट्राफिक जॅममधे अडकल्यावर वेगवेगळी फळे, शेंगदाणे, तिथली खास केळी यासोबत मी ज्याची
वाट बघत असायचो ते मकाडामिया नटस खात माझा वेळ मजेत जात असे. नैरोबीत रस्त्यावर
मिळतात तसे नटस तर मी आणखी कुठेच खाल्ले नाहीत. ( काही मायबोलीकरांनी त्याची चव घेतली
आहे. )
मी शाकाहारी म्हणून अशी जंत्री केलीय असे म्हणालात तर खरे आहे. पण तरी मांसाहारींसाठी असलेल्या
एका खास जागेचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही. कार्निव्होर नावाचे एक मोठे रेस्टॉरंट तिथे आहे.
शहामृग, झेब्रा, जिराफ, मगर असे अनेक प्राणी तिथे मेन्यूवर आहेत. तूम्हाला हव्या त्या प्राण्याची स्टेक
तिथे मिळते. मी चव नाही पण वास मात्र घेतला आहे. ( माझे काय झाले ते सोडा, तूमच्या तोंडाला पाणी
सुचलेय ते पुसा आधी ! )
असाच एक न अनुभवलेला प्रकार म्हणजे तिथली ट्स्कर बियर. ती त्याथी व्हाईट कॅप वाली म्हणे चवीला
फारच छान असते. सोबत अख्खा तळलेला तिलापीया मासा असला तर स्वर्ग म्हणे.. ( लंकेत सोन्याच्या विटा... )
क्रमशः
छान!
छान!
दिनेश, नैरोबीबद्दल चांगली
दिनेश,
नैरोबीबद्दल चांगली माहिती देताय.
तिथली खास केळी यासोबत मी ज्याची वाट बघत असायचो ते मकाडामिया ( हॅझल नट्स ) >>> माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही वेगवेगळे आहेत. Macadamia Nuts आणि hazelnut. कन्फर्म करणार का?
दिनेशदा मस्त वर्णन. फोटो
दिनेशदा मस्त वर्णन. फोटो बघायला आवडले असते.
आभार अंजली, हॅझल नट्स अंगोलात
आभार अंजली, हॅझल नट्स अंगोलात मिळतात. सरमिसळ झाली होती.
हाही भाग आवडला .
हाही भाग आवडला .
ओ हो हो, केवढी विविध तरिही
ओ हो हो, केवढी विविध तरिही डिटेल माहिती आणि तीही मनोरंजक पद्धतीने ........ ग्रेट ....
.... एक पुस्तकच लिहा ना दिनेशदा - ज्यामधे ही सगळी माहिती सचित्र असेल .....
बिना फोटो काय चांगलं वाटेना
बिना फोटो काय चांगलं वाटेना ओ.
चित्रदर्श वर्णन असतच तुम्ही केलेलं पण जरा चित्र बी दावा की.
आमी टॅली करुन बघतो.
छान माहिती... लहान मूले टोळ,
छान माहिती... लहान मूले टोळ, स्वॉलो सारखे छोटे पक्षीही पकडून खातात.>>> बाप्रे
फोटो नसल्याने मजा नाही.
फोटो नसल्याने मजा नाही.
नैरोबीतले बरेच फोटो
नैरोबीतले बरेच फोटो वेगवेगळ्या लेखात मी इथेच टाकले होते. लेखमालिकेच्या शेवटी लिंक्स देतो.
शोभा, ते लोक वाळवी पण आवडीने खातात. वर्तमानपत्राच्या रविवारच्या बाल आवृत्तीत त्या कश्या पकडायच्या याच्या युक्त्या वगैरे असत.
उदा. वारुळावर एक प्लॅस्टीकचे कापड धरून हलवा म्हणजे पावसासारखा आवाज येईल. तो ऐकून पंखवाल्या वाळव्या बाहेर येतील, त्यातल्या मोठ्या मोठ्या वेचून खा.... वगैरे.
तो ऐकून पंखवाल्या वाळव्या
तो ऐकून पंखवाल्या वाळव्या बाहेर येतील, त्यातल्या मोठ्या मोठ्या वेचून खा.... वगैरे. >>> मग पोटाला वाळवी लागली तर ?
वा! सुंदर वर्णन! फोटो कुठायत?
वा! सुंदर वर्णन! फोटो कुठायत?
हा भाग पण छान माहितीपूर्ण
हा भाग पण छान माहितीपूर्ण झाला आहे.
दिनेश फोटो टाकच प्लीज.. वर्णन
दिनेश फोटो टाकच प्लीज..
वर्णन इतकं सुरेख आहे त्याला फोटोंमुळे अजूनच बहार येईल..
छान चालू आहे मालिका..
छान चालू आहे मालिका..
मस्तच बिना फोटो काय चांगलं
मस्तच
बिना फोटो काय चांगलं वाटेना ओ.>>> हो ना
पिवळा स्पॅथोडिया बॅगलोरला पण
पिवळा स्पॅथोडिया बॅगलोरला पण आहे. लालबाग जवळच्या २-३ नर्सरीमध्ये ह्याची मोठी झाडं आहेत.
मी पण मिळवून झाड लावले आहे.मोठे झाल्यवरच समजेल कि तो पिवळा आहे की नेहमीचा केशरी.
छान.
छान.
सुरेख वर्णन ! पण फोटो
सुरेख वर्णन ! पण फोटो पाहिजेतच.........
मी चौथा भाग पण टाकलाय आज.
मी चौथा भाग पण टाकलाय आज. मालिका सम्पली कि सगळ्या आधीच्या लेखांच्या लिन्क्स देतो. ( निदान असा विचार करतोय. )
एकूण सुजलाम् सुफलाम् भुमी
एकूण सुजलाम् सुफलाम् भुमी दिसतेय ही.
मला नेहमीच वाटायचं की त्या प्रदेशात शाकाहारी लोकांची पंचाईत होत असेल पण इतके शाकाहारी खाद्यप्रकार बघून आश्चर्य वाटले.