टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुम३ सारखा अ.अ. चित्रपट जर गल्ला जमवतोय तर मग हा त्यापेक्षा बराच बरा...>>> +१००००००
शिवाय बराच तर्क, विचार आहेत. Happy

मी कालच पाहिला. शेवटचा शो हि अगदी हाऊसफुल्ल.
मराठि सिनेमा साठि अशी गर्दि पाहुन बर वाटल.
सिनेमा एकदा पाहण्या सारखा नक्किच आहे.

परवाच हा सिनेमा बघितला, हाउसफुल्ल! नशीब की ऑनलाईन बुकींग करून गेलो होतो, पुर्ण सिनेमा हॉलमधे ९९% पब्लिक कॉलेज स्टुडंटसचीच होती Happy
प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम सर्वच कलाकारांची एक्टींग मस्तच.
.
.

प्राजक्ताचा बॉडीबिल्डर ब्रदर दगडूला फटकवेल अस वाटत होत, पण अस काहीच नाही झालं Happy

अर्धा स्टार प्रथमेशला (हेच रूप बीपीत पाहिल्याने काही विशेष नाही वाटलं)
>>>>>>>>>>>>>>>
तिथे ट्रेलर होता.. इथे त्याने फुल्ल सिनेमा दाखवला.. दुसरा एखादा कमकुवत गडी असता त्या भुमिकेसाठी तर चित्रपट साधारण झाला असता..

फर्स्ट हाल्फ बघताना मला एक बरेपैकी चांगला सिनेमा बघतोय, पैसे फुकट गेले नाहीत इतपत वाटत होते.. पण सेकंड हाल्फने चित्रपटाला ऊंचीवर नेऊन ठेवले.. त्याचमुळे थिएटरबाहेर पडताना प्रेक्षकांवर ईंम्पॅक्ट सोडून जाण्यात यशस्वी ठरतोय..

बाकी गाणी एक सो एक आहेत.. हल्ली कानात तीच चालू असतात.. त्यातही मला वेड लागले प्रेमाचे माझे फेवरेट.. सतत गुणगुणले जातेच.. अन वैतागून आज शेवटी त्याची रिंगटोनच सेट केली.. Happy

अरे हो एक विशेष उल्लेखनीय राहिले.. वैभव मांगले हा गडी काय माझ्या खास आवडीचा नाही.. मात्र इथे या भुमिकेत चपलख बसला.. अभिनय सुद्धा भारीच केला.. त्याचे कॅरेक्टर या चित्रपटाच्या दृष्टीने महत्वाचे होते.. अन अध्येमध्ये तो रडतो, हताश होतो तेव्हा दगडूच्या साईडने असलेल्या आपल्यालाही वाईटच वाटते यातच त्याचे यश आहे ..

मी पाहिला. केतकी ला मुळात अभिनय येत नाही. लाजण सोडून दुसर काही नीटस जमत नाही तिला. दगडू नुसत्या शिव्या घालतो. ते पात्रच मुळी मला आवडत नाही. वैभव मांगलेचा अभिनय मस्त. ब्राम्हणांची थट्टा उडवल्या सारखी वाटली मला त्यात, आणि ते खूप खटकले.

आजकाल नुसत्या प्रमोशन वर सिनेमे चालतात आणि नुसते चालत नाहीत, तर हिट पण होतात, हे नव्याने कळले.
थोडक्यात काय,
नाही आवडला. थर्ड क्लास. पाहू नका. पैसे वाचवा स्वतःचे.

खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. >>>>+१

मी पाहिला.
सगळा सिनेमाभर केतकी आली की मी टेन्स होत होते.
आता हा सीन ही बाई नीट करेल की नाही हे टेन्शन नकळत तयार होत होते.
पण सांगण्याची बात अशी की बरेचसे शॉट्स दिग्दर्शक असेल एडिटर असेल किंवा संवाद्लेखक असेल ..........नीट पार पडले........हुश्श .....

केतकी ला मुळात अभिनय येत नाही. लाजण सोडून दुसर काही नीटस जमत नाही तिला. दगडू नुसत्या शिव्या घालतो. ते पात्रच मुळी मला आवडत नाही. वैभव मांगलेचा अभिनय मस्त. ब्राम्हणांची थट्टा उडवल्या सारखी वाटली मला त्यात, आणि ते खूप खटकले.

आजकाल नुसत्या प्रमोशन वर सिनेमे चालतात आणि नुसते चालत नाहीत, तर हिट पण होतात, हे नव्याने कळले.
थोडक्यात काय,
नाही आवडला. थर्ड क्लास. पाहू नका. पैसे वाचवा स्वतःचे.

खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. >>>>>

वाक्यावाक्याला सहमत....
मुळात मी हा चित्रपट पूर्वग्रहदूषीत दृष्टीने पाहिला हे मान्य करतो. त्यामुळे प्रेम वगैरे खूप उदात्त वगैरे दाखवले असले तरी यांचे जमू नये किंवा त्या नात्याला काहीही भविष्य नाही असेच वाटत होते. त्यामुळे दगडूचे पात्र कुठेही अपील झाले नाही. आणि असाही तो हळव्या प्रेमाच्या भावना दाखवायला कुठेतरी कमी पडला. शाळा मधला जो हळवा कातरपणा, हुरहुर, ओढ जाणवली ती इथे कुठेच जाणवली नाही.
वैभव मांगलेच्या प्रतिक्रीया पण काहीतरी चमत्कारीकच वाटतात. कित्येक ठिकाणी तर त्या ओढून ताणून आणल्यासारख्या वाटतात.
दुर्दैवाने मी एका प्रत्यक्षातल्या दगडू आणि प्राजक्ताला पाहिले आहे. आमच्या एका परिचितांची मुलगी आणि नाव प्राजक्ताच..त्यांच्या पेपरवाल्याच्या मुलाबरोबर ज्याचे कर्मधर्मसंयोगाने नाव दगडूच, पळून गेली. दहावीचे शिक्षण पूर्ण न करताच. दोन वर्षे अत्यंत बकाल अशा झोपडपट्टीत काढली आणि जेव्हा परत आली तेव्हा पदरात एक मूल. आता ज्या आईबापांचे तोंड काळे करून पळून गेली त्यांच्याच आधाराने आख्खे आयुष्य काढायचे...किती भीषण वास्तव आहे हे...
त्यामुळे तिच्या ताईच्या वाक्यावाक्याला टाळ्या वाजवाश्या वाटल्या मला...
वास्तवाच्या प्रखर धगीत हे असले हळवे प्रेम कधीच करपून जाते आणि मग उरते ते काळेठिक्कर पडलेले आयुष्य....

मी लहान असताना पण आमच्या शेजारच्या सोसायटीत पण असाच प्रकार घडला होता. ती घरी इस्त्रीचे कपडे न्यायला येणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्या बरोबर पळून गेली. चांगल्या घरातली मुलगी झोपडपट्टीत राहायला लागले. शिक्षण अर्धवट सोडून .आणि जशी व्हायची तिचा परिणीती त्याही लग्नाची झाली. नवर्याच्या व्यसनापायी आणि मारझोडी पायी आई वडिलांच्या घरी याव लागल .

आशुचँप....

"...वास्तवाच्या प्रखर धगीत हे असले हळवे प्रेम कधीच करपून जाते आणि मग उरते ते काळेठिक्कर पडलेले आयुष्य..."

~ ह्या वाक्याला शंभर टक्के सहमती. चित्रपटाच्या माध्यमातून होत असलेली प्रेमाची भलावण, पाहाणार्‍याला वा नेमके तेच वय असणार्‍या मुलामुलींना कितीही भावत असली तरी "घी देखा लेकिन बडगा नही देखा..." अशी परिस्थिती जेव्हा समोर येऊन ठाकते तेव्हा कळते खर्‍या दगडूपेक्षा खर्‍या प्राजक्ताचे हाल कुत्राही कसा खात नाही.

चित्रपट परीक्षण छान आहे....कल्पनाही चांगली असू शकेल....पण व्यवहारी जग फार फार चटका देणारे असते.

मी आजच पाहिला हा सिनेमा! खुप आवडला.

दगडूचे काम एकदम भारी झाले. केतकी माटेगावकरला अजुन छान अभिनय करता आला असता असे वाटते.

सिनेमाचा शेवट चांगला केलाय.

मी कालच पाहिला. शनिवार सकाळी ९ चा शो असुन हाऊसफुल्ल होते थिएटर. पुर्ण सिनेमा हॉलमधे ९९% पब्लिक कॉलेज स्टुडंटसचीच होती.

विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते.

>> हे अगदी पटले. विशेषतः "केवढस्सं आहे बघ माझं लेकरु" असं तो दगडुच्या बाबांना (भाऊ कदम) म्हणतो तेव्हा वडील म्हणुन त्यांची बाजु अगदी पटून जाते.

बाकी मी साडे चार पैकी तीन स्टार प्रियदर्शन जाधवला देईन!
मानलं त्याला! तोंडात बसतील असे डाय्लॉग्स लिहिलेत.

>> +१ हम गरीब हुए तो क्या हुआ.. काजु कतली आणी प्राजु पतली.. गलपटला काय?.. आईबाबा आणी साईबाबा.. सगळेच एक नंबर.

केतकी अ‍ॅक्टर म्हणून कधीच आवडली नाही. पण काय गाणी गायलीयेत तीने. आहाहा!
उरलेला एक स्टार गाण्यांना!

>> +१ स्पेशली.. मला वेड लागले.. Happy

बाकी ललिता-प्रितीच्या सगळ्याच पोस्टला +१.

आणखी एक.. स्पृहा आणी वल्लभविषयी लिहिण्याआधी स्पॉयलर द्या प्लीज. मी इथे वाचुन गेल्यावर त्या उपकथानकाची मजा निघुन गेली माझ्यापुरती.. Sad

फेबुवर एका जाणकार मित्राने बरंच क्रिटीसाईज केलं होतं. हा लेखही तसा स्तुतीसुमनं उधळत नाहीच!
एकंदरीत, मी मिसला ह्यात फारसे नुकसान झाले नाही म्हणायचे !

लॉजिक नसलेले, ठोकळ्यांचे आणि चड्डी बनियन टाईप चित्रपटांपेक्षा हा नक्कीच बघेन.
मराठी(च) चित्रपटांबद्दल थोड्या जास्तच अपेक्षा असतात का?
अर्थातच या चित्रपटाने १०+ कोटीचा गल्ला केला याचा आनंद आहे.

कालच पाहीला चित्रपट खुप आवड्ला , मला वाट्त काहि दिवसांनी टीपी -२ ही चित्रपट येईल तेव्हा वाट पहावि.

मला मुळीच आवडला नाही हा चित्रपट.

दगडूच्या केवळ डायलॉगबाजीवर प्राजक्ता त्याच्यावर भुलते हे पटण्यासारखे नाही. प्राजक्ताची घडवणूक ज्या वातावरणात झाली आहे त्या वातावरणातील मुलगी दगडूसारख्यालावर भाळेल असं अजिबात वाटत नाही. त्याने काही नेत्रदीपक पराक्रम वगैरे करून दाखवला असता तर पटण्यासारखं होतं. उदा. रस्त्याने तिने चालत असताना तिचं कानातलं पडणं आणि त्याने शोधून देणं हा जो प्रसंग आहे त्यामधे तिचं कानातलं शेजारच्या तळ्यात/दगडांच्यात पडणं आणि दगडूने पाण्यात सूर मारून/ दगडांत उतरून शोधून देणं असं दाखवलं असतं तर प्राजक्ताने त्याच्या पराक्रमावर आकृष्ट होणं जरा नैसर्गिक वाटलं असतं. पण इथे त्या प्रसंगात तिचं कानातलं तिथेच फूटपाथवर पडलेलं प्रेक्षकांनाही दिसत असतं.

वडिलांनी घराबाहेर काढल्यावर दगडूच्या चरीतार्थाचा प्रश्न मिटलेला दाखवलाय पण त्याच्या राहण्याचं काय ते कळत नाही.
एकामागोमाग एवढे यशस्वी चित्रपट दिल्यावर रवी जाधवला संकलनाच्या चुका टाळता आल्या असत्या.

चित्रपट घडतो तो काळ आणि पात्रांचे कपडे यात भयंकर विसंगती जाणवली. खास करून भूषण प्रधानचे सगळे कपडे आजच्या काळातले आहेत. प्राजक्ताच्या आईच्या साड्यांवरचे ब्लाऊज आणि त्यांच्या बाह्या आजच्या काळातल्या आहेत. प्राजक्ताचेही काही कपडे/ तिची बॅग 'दयावानच्या' दशकात घातले जात नव्हते.

संवाद चांगले आहेत आणि त्याच जोरावर चित्रपट चालला आहे.

बाकी काही असो, हा सिनेमा आपल्याला बसल्याजागी थेट कॉलेजच्या "एफवायजेसी" मध्ये घेऊन जातो यात शंका नाही.
सिनेमाच्या शेवटचा डायलॉग, "तो टाईमपास नव्हता, आपल्या आयुष्यातील बेस्ट टाईम होता".... सिनेमाला एका अफाट उंचीवर घेऊन जातो आणि आपल्याला आठवणीच्या खोल गर्तेत........

@मंजूडी-

प्राजक्ताची घडवणूक ज्या वातावरणात झाली आहे त्या वातावरणातील मुलगी दगडूसारख्यालावर भाळेल असं अजिबात वाटत नाही.

सामान्यतः असे होत नाही, पण अशी उदाहरणे आहेत. वर काहींनी लिहिले आहेच. अर्थात, त्यात कुटुंबाचा, संस्कारांचा, वातावरणाचा काही दोष नसून, त्या वयाचा दोष असतो असेही वाटते. कालांतराने हा सर्व मूर्खपणा असल्याचे, आपले आपल्यालाही कळतेच. Happy

----------------------------------------------------

एक दुसरा मुद्दा- टीपीने १० कोटी, १५ कोटी गल्ला जमवल्याच्या बातम्या येत आहेत. दुनियादारीने ३०-३५ कोटी कमावले म्हणतात. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला या आकड्यांमधे रस असू नये असे मला वाटते. हिंदी सिनेमांनी शंभर-दोनशे-तीनशे कोटींचे टप्पे गाठून त्याच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हापासून हे फॅड आलेले दिसते. हिंदीतले हे शतकोटी सिनेमे, एक कलाकृती म्हणून आपल्याला (प्रेक्षकांना) काय देतात? काहीही नाही. ज्यांना पैसे कमवायचे त्यांनी त्या बाजूकडे लक्ष द्यावे.. प्रेक्षकांनी नाही, असेही वाटते.

अजून चित्रपट पाहिलेला नाही, पण वरच्या काही प्रतिक्रियांशी सहमत. अर्धवट वयातल्या आकर्षणांमधून आयूष्याची वाताहत होण्याची उदाहरणं पाहिली आहेत आणि त्या कुटुंबाची फरफट सुद्धा. त्यामुळे हा विषय वैयक्तिक पातळीवर अपिल होत नाही. मी तर 'शाळा' सुद्धा पुर्ण पाहू शकलो नव्हतो. पूर्वग्रह नाकारत नाही.

सिनेमा बराचसा फिल्मी झालेला आहे. कलाकारांची कामं छान झालीत पण. संगीतही सुरेल. प्रियदर्शनला इमोशनल दृश्यांतले संवाद लिहायला जमले नाहीत.

एक प्रेक्षक म्हणून आपल्याला या आकड्यांमधे रस असू नये असे मला वाटते. >> पण एक मराठी माणुस म्हणुन नक्की असावा (हेमावैम).

एक दुसरा मुद्दा- टीपीने १० कोटी, १५ कोटी गल्ला जमवल्याच्या बातम्या येत आहेत. दुनियादारीने ३०-३५ कोटी कमावले म्हणतात. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला या आकड्यांमधे रस असू नये असे मला वाटते. >> ज्ञानेश , सहमत .
पण असे आकडे असले तरच मल्टीप्लेक्स वाले , सिनेमावाले तुम्हाला स्क्रीन्स देतात.
मराठी प्रेक्षक जात असेल तर चांगलेच आहे माझे मत .
नाहीतर आमच्या इचलकरंजीत "ए बलमा बिहारवाला" हाऊसफुल्ल जातो अन अनुमती , संहिता रिलीजच होत नाहीत Sad

केदार नक्कीच.

काल बघितला. ज्या पद्दतीने बालक-पालक चित्रपटात समजुतदारपणे 'समजुत' घातली गेली, तसं काहीसं अपेक्षित होतं. पण असो, मग तो बालक-पालकच झाला असता, नाही का?
बर्‍याचश्या गोष्टी लिहिता येतील, पण ते आपला तो बाब्या, या न्यायाने, हे लेकरू गोड आहे, असं म्हणतो. Happy

अशी अनेक उदाहरणे माझ्या मित्रांचीच घडली. ते मार खाण्यापासुन वाचले, ते फक्त माझ्यासोबतचे (मी धरुन) चांगली मुलांची सोबत आहे म्हणुन, नाहीतर २-३ मुलांची आयुष्य वाया गेलेली पाहिलीय मी.
मनाला भिडत नाही, आणि थोडासा अधुरा वाटतो, हे खरय, पण धुमपेक्षा चांगला वाटला. Wink

<<<<आशुचँप....

"...वास्तवाच्या प्रखर धगीत हे असले हळवे प्रेम कधीच करपून जाते आणि मग उरते ते काळेठिक्कर पडलेले आयुष्य..."

~ ह्या वाक्याला शंभर टक्के सहमती. चित्रपटाच्या माध्यमातून होत असलेली प्रेमाची भलावण, पाहाणार्‍याला वा नेमके तेच वय असणार्‍या मुलामुलींना कितीही भावत असली तरी "घी देखा लेकिन बडगा नही देखा..." अशी परिस्थिती जेव्हा समोर येऊन ठाकते तेव्हा कळते खर्‍या दगडूपेक्षा खर्‍या प्राजक्ताचे हाल कुत्राही कसा खात नाही.

चित्रपट परीक्षण छान आहे....कल्पनाही चांगली असू शकेल....पण व्यवहारी जग फार फार चटका देणारे असते.>>>

सहमत !

अजिबात आवडला नाही चित्रपट. दगडुमध्ये आवडण्यासारखे काहीही दिसले नाही. प्रेमकहाणीला काही आधारच नाही. ब्राह्मणांची उगाच टवाळी करण्याची फॅशनच आहे.
चित्रपट नक्की कुठल्या काळातला आहे हे समजत नाही. ना आताच्या काळातला वाटत ना जुन्या.

रवी जाधव कडुन खूप जास्त अपेक्शा होत्या.

Pages