टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परीक्षण.
एका खाजगी एफेम वाहिनीनेही या चित्रपटाची दखल घेतली आहे.(एफेमच्या हिंदी कार्यक्रमात प्रादेशिक भाषेतील चित्रपटाबद्दल बोललेले प्रथमच कानावर पडले) चार स्टार्स देऊन वर बॉलीवुडने या चित्रपटाकडून काही शिकण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले.

प्रोमो कित्येक वेळा बघितला. गाणेही झकास आहेत. बगुह, कधी बघायला मिळतो ते.

असं काही वाचलं की वाटते, यार, कधी भारतात जायला मिळेल? Wink

आवड्ला. पण मध्यंतरानंतर फार स्लो झालाय.
शिवाय प्राजक्ताच्या भावाचं उपकथानक कशासाठी ते नाही कळलं. त्याच्या प्रेमाला नाही म्हणण्याचं काही कारण दिसलं नाही.

मी पाहिला, एकदा पहायला हरकत नाही.

प्राजक्ताच्या बाबांचा, त्यांच्या मुलाच्या व स्पृहाच्या प्रेमकहाणीला असलेला विरोध हा न-कळत्या वयात केलेल्या प्रेमामुळेच असतो, तो विरोध जातीशी किंवा शिक्षणाशी निगडीत नसतो (म्हणजेच हा बाप फक्त मुलीबाबत कठोर आहे असे नाही, म्हणजे ते खलनायक नाहीत) असे दाखवायसाठी 'उर्मीला कानेटकर आणि भूषण प्रधान' (स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ) यांच्या प्रेमप्रकरणाचे कथानक घातले असावे.

एकुण एक शब्द पटला
मला आवडला
माझ्याकडुन साडे चार स्टार्स!

चै, त्याचंही टीनेजमधलं प्रेम आणि घरगुती डिफरन्सेस असतात त्यामुळे त्यांना नकार मिळतो आणि त्यांचं प्रेम अपुर्ण रहातं.
आणखी लिहिलं तर योग्य ठरणार नाही.
पण सिनेमा आवडला.
आणि शाळा पेक्षा जास्त आवडला कारण याच्या शेवटी त्या मुलाच्या मनात 'मी काही तरी करुन दाखवेन' हा आशावाद जागवलाय.

हे अगदी असच्या असं उदाहरण माझ्या मैत्रीत आहे. मुलगा फारसा शिकला नाही तरी आता सेटल्ड बिजनेस मॅन आहे. आणि आता ते लग्नासाठी झगडतायेत.
हे असच्या असं उदाहरण जवळच्या ओळखीत असल्याने जास्त भावला असेल असं वाटतय!

बाकी मी साडे चार पैकी तीन स्टार प्रियदर्शन जाधवला देईन!
मानलं त्याला! तोंडात बसतील असे डाय्लॉग्स लिहिलेत.
अर्धा स्टार प्रथमेशला (हेच रूप बीपीत पाहिल्याने काही विशेष नाही वाटलं) आणि अर्धा बाकीच्यांना देईन!
केतकी अ‍ॅक्टर म्हणून कधीच आवडली नाही. पण काय गाणी गायलीयेत तीने. आहाहा!
उरलेला एक स्टार गाण्यांना!
दगडुला स्वप्निलचा आवाज आजिबात सुट होत नाही Sad
सारेगमपमधल्या कोणत्याही लिटिल चँपकडुन गाऊन घेतली असती गाणी (स्पेशली रोहीत) तर आणखी मस्त वाटली असती.

मानलं त्याला! तोंडात बसतील असे डाय्लॉग्स लिहिलेत.>>
मस्त परीक्षण
आम्ही मनाने श्रीमंत आहोत .......................... चला हवा येतुद्या

काल रात्री पाहि ला
माझी ३ वर्षा ची मुलगी पहिल्यांदाच movie hall मधे आणलेली , घरी आल्यावर म्हणते
दगडु कुठे गेला
Happy

कालच पाहिला. गाणी आणि पार्श्वसंगीत (गिटार फार सही वापरलीय ईथे), काही काही प्रसंगातील सिनेमाटोग्राफी, आणी सगळ्या कलाकारांचा अभिनय आवडला. दगडूचे मित्र पण मजा आणतात.

पण ओवरऑल चित्रपट विशेष वाटला नाही. एकदा बघायला हरकत नाही.

मराठी चित्रपट मल्टीप्लेक्सात हाऊसफुल जातोय हेच मला लै भारी वाटतंय. धुम३ सारखा अ.अ. चित्रपट जर गल्ला जमवतोय तर मग हा त्यापेक्षा बराच बरा...

आज उद्या बघायचा प्लॅन करतेच.

केतकीचे काय करायचे हा एक प्रश्न आहे. ती दिसते छान पण आपण फारच ग्रेट हा एक आविर्भाव तिच्या चेह-यावर कायम असतो त्याचा वैताग येतो. जौद्या, चित्रपट तरीही पाहिन.

काल पाहिला. मला आवडला. गाणी, संवाद छान आहेत. (आयटम-साँग नसतं तरी चाललं असतं.) सिनेमाचा शेवट टिपिकल फिल्मी केलेला नाही हे पण मला आवडलं. १५-१६ या वयात एखादा मुलगा/मुलगी आवडणं यात गैर काहीच नाही, पण त्यात वाहवत न जाता आधी योग्य शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्त्वाचं हा संदेश देऊ केला आहे. नायिकेच्या बापाचं व्यक्तिचित्रणही या मुद्द्यावर जोर देणारंच आहे. गरीब-श्रीमंत्/उच्च-नीच हा भेदभाव बाप करत नाही, हे पण आवडलं.

उर्मिला कानेटकर मला आवडते. पण या सिनेमातला तिचा मेक-अप अजिबात नाही आवडला. तिच्या प्रेमकहाणीचे फक्त संदर्भ आहेत, डिटेल्स दाखवलेले नाहीत हे मात्र आवडलं.

दगडुला स्वप्निलचा आवाज आजिबात सुट होत नाही. सारेगमपमधल्या कोणत्याही लिटिल चँपकडुन गाऊन घेतली असती गाणी (स्पेशली रोहीत) तर आणखी मस्त वाटली असती

>>> +१००

प्रीतिची सगळीच पोस्ट +१
मी ते लिहणार होते पण विसरुन गेले Happy
आयटम साँग नसतं तरी चाल्ललं असतं पण आहे तर त्याच्या वापर जसा केलाय ना रवी जाधवने! बास अपने को तो लै आवड्या ये माणुस!

हो रंगाशेठ पण एक प्रश्न,
ज्याला नीट प्राजक्ता म्हणता येत नाही, शुद्ध मराठी जमत नाही. त्याला त्या नावांचा अर्थ कसा कळाला?
कारण माझ्या मित्राला आणि त्याच्या मित्रांना त्यातल्या अनेक पुस्तकांच्या नावांचा अर्थ कळाला नव्हता!
त्यामुळे तो प्रसंग मला निराश करुन गेला.
दुसर्‍या, साध्या सोप्प्या नावांची पुस्तकं घ्यायला हवी होती

बघावा का ? खर तर केतकी आवडत नाही. तिला जर जास्तच महत्व मिळालंय तिच्या वकुबापेक्षा अस माझ वैयक्तिक मत .. प्रथमेश परब बिपी मध्ये आवडला होता. त्यामुळे त्याच्या करता पाहीन म्हणते Happy

शाळा बघितला नव्हता ग. पण बिपी आवडला होता. आत्ता ताबडतोब डिसीझन घेतला आहे. आणि पंधरा मिनिटात निघेन म्हणते . हम भी चले " टाईमपास" देखणे Happy

मस्त परिक्षण..

मी फर्स्ट डे तिसर्‍या शो ची तिकीटे काढण्याचा प्रयत्न केला.. पण फसला.. मग रविवारसाठी पाहिले तर जवळपास फुल.. मग शनिवारी एका शोची तिकीटे ऑनलाईन बुक केली.. जवळपास सगळीकडे हाउसफुल जातोय.. नि सर्वात महत्त्वाचे सिनेमा चालू असताना संवादावर वा दृश्यावर 'हशा, टाळ्या, शिटया' ऐकून तरी खूप बरे वाटले.. टिपी म्हणून बघायला काहीच हरकत नाही.. काही अगदी बारिक गोष्टी पण हसवून जातात.. जसे 'दुश्मन' असे ओरडणारा आवाज !

मी_केदार,
तो संवाद इथे फोडला नसतात तर बरं झालं असतं असं वाटलं. त्या दृश्याचा हायलाईट आहे तो संवाद !!

तो संवाद इथे फोडला नसतात तर बरं झालं असतं असं वाटलं.

प्लस वन.
मीसुद्धा तो संवाद लिहिण्याचा मोह मोठ्या कष्टाने आवरला होता. Happy आणखी एक-दोन भारी पंचेस आहेत, जे प्रत्यक्ष पडद्यावर बघायला प्रचंड मजा येते..संपूर्ण थिएटर खो-खो हसत असते.

Pages