शोभेच्या रोपांना एखाद्या कलाकृतीचे रूप देण्याचे कौशल्य हाती असलेल्या मुंबईस्थित व्यावसायिका अलका बजोरिया यांची 'पॅशन ग्रीन' कंपनी आणि त्यांच्या कंपनीद्वारे दिल्या जाणार्या समग्र सुविधा त्यांच्या झाडा-पानांवरच्या प्रेमाची साक्षच देतात. आपल्या छंदाला व्यवसायाचे रूप देणार्या, नोकरीतून ब्रेक घेतल्यावर आपल्या सेकंड इनिंगमध्ये बागकामाच्या छंदाला कॉर्पोरेट स्तरावर नेणार्या व त्यात यश मिळवणार्या अलका यांचा हा खास परिचय मायबोली व संयुक्ताच्या वाचकांसाठी!
'पॅशन ग्रीन' सुरू करण्याअगोदरच्या तुमच्या वाटचालीविषयी सांगाल का?
मी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एम. ए. केलं. पण ते करत असतानाच अर्थशास्त्रात पुढे करियर करण्यात मला रस नाही हे कळून चुकलं होतं. मग मी काही वर्षे दिल्लीची एक मर्चंट बँक व ब्रोकर यांसाठी एका ब्रोकर संस्थेत इक्विटी सेल्स ब्रोकर म्हणून काम केलं. लग्न झाल्यावर मी मुंबईला आले. इथे बाटलीवाला आणि करानी सिक्युरिटीजच्या ब्रोकर फर्म मध्ये हेड ट्रेडर म्हणून मी काम पाहत होते. त्यानंतर माझ्याकडे एच डी एफ सी बँकेची संधी चालून आली. त्यांना बँक इक्विटी फंड्स हाताळण्यासाठी इक्विटी ट्रेडर हवा होता. एच डी एफ सी बँकेत मला सहा वर्षे हेड इक्विटी ट्रेडर म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव मिळाला. २००९ मध्ये मी करियर ब्रेक घेतला. माझी मुलगी तेव्हा दहा वर्षांची होती. तिच्याबरोबर जास्त वेळ घालविता यावा हा एक हेतू होताच. शिवाय २० वर्षांच्या नोकरीनंतर आता मला वेगळे काहीतरी करावेसे वाटत होते. माझी नोकरी ही अतिशय वेळखाऊ, आव्हानात्मक प्रकारातली असल्यामुळे मला स्वतःसाठी वेळ द्यायला तोवर फारसे जमलेच नव्हते. नोकरीत असताना मी २४*७ त्या क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असायचे. पण आता त्याचा कंटाळा आला होता.
नोकरीतून ब्रेक घेतल्यावर सुरुवातीला मी स्वतःसाठी भरपूर वेळ दिला. माझे जुने छंद होते त्यांसाठी वेळ देऊ लागले. वीस वर्षांमध्ये टीव्हीही फारसा पाहिला नव्हता. मग टीव्हीवरील सीरियल्स पाहिल्या. खूप मजा यायची. बागकामाची मला आधीपासून आवड होतीच! माहेरी, माझ्या आईने जोपासलेल्या बागेचे उत्कृष्ट बागांसाठी नामांकन झाले होते. माझी आई स्वतः अतिशय हौसेने बागकाम करत असे. तिच्या ह्या हौशी बागकामाचा गुण माझ्यातही उतरला आहे. मोकळ्या वेळात मी माझ्या घरातल्या वेगवेगळ्या शोभिवंत झाडांबद्दल अधिक माहिती मिळवायचे ठरविले. दिल्लीहून मुंबईला येताना मी सोबत खूप प्रकारची झाडे घेऊन आले होते! त्या झाडांबद्दल आजूबाजूच्या रोपवाटिकांत (नर्सरीज) मी विचारायला सुरुवात केली. त्यांच्याबद्दल जवळच्या वाचनालयात काही माहिती मिळते का ते पाहिले. पण मला फार काही यश आले नाही. मग मी आंतरजालावर गूगलमार्फत शोध घ्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे मला जवळपासच्या रोपवाटिकांमध्ये जी माहिती मिळू शकली नाही ती मला गूगलच्या आधारे मिळू लागली. त्याचबरोबर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या माझ्यासारख्याच बागकामवेड्या लोकांशी माझ्या ह्या आंतरजालीय माध्यमातून ओळखी झाल्या. बागकामविषयक वेगवेगळी संकेतस्थळे, ब्लॉग्ज, फोरम्स सापडल्यावर मी त्यांचे सभासदत्व घेतले. मला पडणारे प्रश्न तिथे विचारू लागले. त्यांवर मला तेथील अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन, उत्तरे मिळू लागली.
ह्या सर्व खटाटोपांचा परिणाम म्हणून मीही हळूहळू माझ्याकडील रोपांवर वेगवेगळे प्रयोग सुरू केले. कोणते रोप कशा प्रकारच्या मातीला अधिक प्रतिसाद देते, त्याला लागणारा प्रकाश, पाणी, खत यांबद्दल मी अधिक चौकसपणे प्रयोग करू लागले. त्या प्रयोगांमधून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मी बागकामाचे औपचारिक असे कोणतेच कोर्सेस केलेले नाहीत. जे काही ज्ञान प्राप्त केले ते वाचन, निरीक्षण, स्वप्रयोग व आंतरजालाच्या माध्यमातून!
पण मग 'पॅशन ग्रीन' कंपनीची सुरुवात कशी झाली?
माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्या बागकामाविषयी, मी जोपासलेल्या झाडांविषयी फारच कौतुक आहे. अनेक मैत्रिणींनी ह्यापूर्वीही मी जोपासलेली झाडे पाहून स्वतःकडेही अशी झाडे असावीत अशी इच्छा प्रदर्शित केली होती. मी त्यांना हौसेखातर अशी रोपे भेट द्यायचे. एका मैत्रिणीचे कुलाब्याला फर्निचरचे दुकान आहे. तिने तिच्या काही ग्राहकांना माझ्याकडून शोभेची झाडे घेण्यास सुचविले. माझी खासियत ही 'टेबल-टॉप रोपां'ची आहे. माझ्याजवळ सध्या घरी किमान २०० वेगवेगळी, आकर्षक अशी टेबलटॉप रोपटी आहेत. ऑगस्ट २०१२ मध्ये डब्लू टी सी, कफ परेड येथे भरलेल्या 'सोसायटी कलेक्शन' ह्या प्रदर्शनात मी टेबल-टॉप झाडांचे प्रदर्शन मांडले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांनी मोठ्या प्रमाणात रोपांची मागणी नोंदवली. बर्याचजणांनी अशा तर्हेच्या रोपांच्या विक्रीचे कायमस्वरूपी ठिकाण असावे अशी इच्छा व्यक्त केली. मागणीचे प्रमाण पाहिल्यावर मी स्वतःची वेगळी कंपनीच उघडायचे ठरविले. त्यानुसार पॅशन ग्रीनची सुरुवात झाली.
काय खासियत आहे पॅशन ग्रीनची?
मुंबईत भाडोत्री तत्त्वावर शोभेची रोपे, झाडे नक्कीच मिळतात. अनेक ठिकाणी झाडे विकतही मिळतात. पण तुमच्याकडील उपलब्ध जागेनुसार, तेथे येणार्या प्रकाशानुसार, एअरकंडिशन्ड वातावरणात कोणती झाडे तगू शकतील, कोणती झाडे आकर्षक दिसू शकतील हे सर्व पाहून त्यानुसार झाडे किंवा रोपे पुरविणारे विरळेच किंवा नगण्यही म्हणता येतील. माझ्याजवळ टेबल-टॉप रोपट्यांचे अनेक प्रकार आहेत. कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये, घरांमध्ये, परसबागेत, इमारतीच्या आवारात, बाल्कनीत, दुकानात किंवा अन्य ठिकाणी लावता येण्यासारख्या झाडांची बरीच व्हरायटी आहे. फुलझाडे, शोभेची झाडे, बॉन्साय, आरोग्यदायी वनस्पती, सावलीत वाढणारी - उन्हात वाढणारी झाडे, घरात ठेवायची झाडे, विदेशी प्रकारची झाडे असे अनेक प्रकार आहेत माझ्याकडे.
मी ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार झाडांचा पुरवठा करते. परंतु ते करताना त्यांच्याकडे असलेली जागा, प्रकाशयोजना, त्या झाडांची जोपासना करण्याची व्यवस्था इत्यादी गोष्टी पाहून झाडे निवडण्याबाबत सल्ला देते.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर तुमच्या बेडरूममध्ये जर अगदी कमी प्रकाश असेल तर त्या प्रकाशात ज्या प्रकारची शोभेची झाडे जगू शकतात अशीच झाडे तिथे ठेवण्याचा सल्ला मी देते. तिथे ए.सी. असेल तर वातानुकूलित हवेत राहू शकणारी झाडे तिथे हवीत. त्यांची रंगसंगती रूमच्या रंगसंगतीला अनुरूप हवी. त्यांचा आकार, गंध हा सुखद पाहिजे. ग्राहकांना कोणती झाडे घ्या, घेऊ नका, त्यांना कसे ठेवा हा सल्ला मी देत असते.
अनेकांना अशा तर्हेच्या झाडांचा काहीच पूर्वानुभव नसतो. काहींना वाटते की ह्या झाडांना अधून मधून पाणी दिले, थोडा सूर्यप्रकाश दाखविला की बास झाले. पण ते तसे नसते. प्रत्येक झाडाची वेगळी गरज असते. ती गरज जाणून त्यानुसार त्याला पाणी, माती, प्रकाश मिळाले की ते झाड उत्तमपणे जगते. माझ्याकडील प्रत्येक झाडासोबत ग्राहकांना मी त्या झाडाची कशी काळजी घ्यायची ह्याची छापील माहिती देते. त्यांनी त्या झाडांसंबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तसेच झाडांच्या निगेबद्दल त्यांना काही शंका, प्रश्न, अडचणी असल्यास त्या सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो.
ह्याशिवाय कॉर्पोरेट कंपन्यांना मी माझ्याकडच्या टेबलटॉप किंवा अन्य प्रकारच्या झाडांसोबत त्यांच्या निगेबद्दलचे खास मार्गदर्शन, झाडांचा मेन्टेनन्स ठेवण्याची सुविधा हेही पुरविते. त्यांच्या स्टाफला त्याबाबत ट्रेनिंग देते. त्यांचा स्वतःचा तसा स्टाफ नसेल तर त्यांना आठवड्यातून ठराविक दिवस येऊन झाडांची देखभाल करणारे माळी पुरविते. इनडोअर लँडस्केपिंगबरोबरच मी आऊटडोअर लँडस्केपिंग देखील करते. इमारतींचे - टेरेसचे लँडस्केपिंग, सनडेक लॅंडस्केपिंग करते.
अनेक ग्राहक सुट्ट्यांसाठी बाहेरगावी, परदेशी जाताना त्यांच्याकडील झाडे विश्वासाने माझ्याकडे सोपवून जातात. अशा तर्हेने मी झाडांचे 'डे-केअर' किंवा पाळणाघरही चालविते असे म्हणालेत तरी चालेल.
वेगवेगळ्या प्रसंगांनुसार भेट म्हणून देण्यासाठी अशी अनेक टेबलटॉप झाडे माझ्याकडे मिळतात. गिफ्ट दिल्या जाणार्या प्रत्येक झाडासोबत त्या झाडाचे नाव, त्याबद्दलची माहिती, त्याची काळजी घेण्यासंबंधी सूचना हे सर्व असते.
ह्याशिवाय एकाच प्रकारचा सूर्यप्रकाश, पाणी लागणारी वेगवेगळी रोपे किंवा ठराविक वातावरणात चांगल्या प्रकारे वाढणार्या छोट्या छोट्या शोभेच्या रोपांना एकाच कुंडीत अथवा सिरॅमिक भांड्यात लावल्यास त्यांचा मेन्टेनन्स साहजिकच कमी होतो. शिवाय रोपांचे वेगवेगळे आकार, रंगसंगती, पोत इत्यादींमुळे ते जास्त खुलून दिसतात. त्यांची असेंब्ली करून एकमेकांच्या साथीने ती झाडे चांगली जगतात. मी हे असे प्रयोगही करत असते. अशा तर्हेने असेंब्ली केलेली रोपे ग्राहकांनाही आवडतात.
तुमच्याकडील झाडे वेगवेगळ्या आकर्षक आकाराच्या कुंड्यांमध्ये किंवा पात्रांमध्ये लावलेली असतात. तुम्ही कुंभारकामाचा कोर्सही केला आहे. त्याबद्दल सांगाल का?
माझ्याकडे तुम्हाला प्लास्टिकच्या कुंड्या वगैरे मिळणार नाहीत. मी जेव्हा कुंभारकामाचा कोर्स केला तेव्हा वेगवेगळ्या साहित्यापासून बनवलेल्या - भट्टीत भाजलेल्या, निरनिराळ्या पोताच्या, आकाराच्या पात्रांच्या, कुंड्यांच्या मी प्रेमातच पडले. त्यातून मला कोण कुठल्या प्रकारची पॉटरी बनविते, अमक्या प्रकारची पॉटरी कोठे विकत मिळेल ह्याबद्दलही खूप माहिती मिळाली. माझ्याकडे भारतातल्या डिझाईन व ग्लेझिंगमध्ये कुशल अशा निवडक मातीकाम करणार्यांकडून सिरॅमिक भांडी, पात्रे येतात. एखाद्या कुंडीत किंवा मातीच्या पात्रात लावलेले रोप हे अधिक उठावदार कसे दिसेल हे बघण्याकडे माझा प्रयत्न असतो. एखाद्या कलाकृतीप्रमाणे ते सुंदर दिसावे ह्याकडे मी खास लक्ष देते. ह्याशिवाय त्या रोपाचा प्रकार कोणता आहे, त्याची वाढ कशी होते, त्याची मुळे कोणत्या प्रकारची आहेत, त्यांचा आकार कसा आहे ह्यांवरून मी ते रोप कोणत्या आकाराच्या कुंडीत किंवा पात्रामध्ये लावायचे हे ठरविते. म्हणजे असं बघा, मी त्या कुंडीत लावलेले रोप हे पुढील किमान दोन वर्षे तरी व्यवस्थित राहिले पाहिजे. आणि त्याखेरीज त्या कुंडीचे किंवा पात्राचे मटेरियल, पोत, आकार, रंग आणि झाड यांची एकमेकांशी अनुरूप सांगड जुळवायचा मी प्रयत्न करते. माझी आवड लोकांच्या पसंतीस उतरते ह्याचा अर्थ मला ते जमत असावे!
१.
२.
३.
पॅशन ग्रीनचे काम तुम्ही घरूनच बघता की त्यासाठी वेगळी जागा घेतली आहे?
आम्ही (म्हणजे मी व माझा नवरा - जो ह्या बिझनेसमध्ये माझा पार्टनर आहे) सुरुवातीला आमच्या राहत्या भागाजवळ पॅशन ग्रीनसाठी आवश्यक तशी जागा विकत घेता येईल का ह्याची चाचपणी केली. परंतु मुंबईतील जागांचे अवाच्या सवा दर पाहून शेवटी आम्ही भाडोत्री तत्त्वावर जागा घेण्याचा निर्णय घेतला. सध्याची जागा माझ्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. माझ्या सध्याच्या पसार्याला पुरेशी आहे. माझ्या झाडांखेरीज बागकामाशी संबंधित इतरही बरेच साहित्य ठेवण्यासाठी आम्ही इथे वेगवेगळ्या आकारांची फडताळे ठेवली आहेत. कपाटे, जाळ्या, कामासाठी ओटा इत्यादी सुविधा तर आवश्यक आहेतच!
जागा शोधताना आम्हाला खूप गमतीदार अनुभव आले! मी सुरुवातीला एखाद्या निवासी सोसायटीच्या आवारात जागा मिळते का ह्याचा शोध घेत होते. माझा हेतू असा होता की सोसायटीची हिरवळ, तेथील झाडे इत्यादींचे बागकाम, निगा ठेवण्याची मी जबाबदारी घेऊ शकेन व त्या बदल्यात मला जागेच्या भाड्यात काही सूट किंवा जास्तीच्या सुविधा मिळू शकतील. पण अशा जागा आम्हाला तरी क्वचितच सापडल्या. तरी आमची शोध मोहीम जारी होती. एकदा असेच भर पावसाच्या मोसमात प्रभादेवीच्या परिसरात हिंडताना ऐन मध्यवर्ती भागात आम्हाला एक बर्यापैकी मोठे आवार असलेली इमारत दिसली. मनात आले, चला बघून तर येऊयात! इमारतीबाहेरचे लोखंडी गेट चांगलेच गंजलेले होते. त्याला कडी, साखळी, कुलूप किंवा रखवालदार असा कोणताच प्रकार नव्हता. आम्ही गेट उघडले तर अगदी रामसे बंधूंच्या चित्रपटांमध्ये शोभेल असा कर्र कर्र आवाज आला. इमारतीपाशी एक कार पार्क केलेली होती. गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणी तिला जागची हलवलीसुद्धा नसावी! कारण तिच्या टायरमधून एक वेल उगवली होती व कारच्या छतावर आरामात पसरली होती. ऐन प्रभादेवीच्या परिसरात असणार्या ह्या इमारतीत इतका सन्नाटा होता म्हणून सांगू! विश्वासच बसत नव्हता! त्या इमारतीत फारसे कोणी राहत नसावे. सर्व घरे कुलूपबंद! एका घराला पाहून आम्हाला वाटले की इथे कोणीतरी राहत असणार, म्हणून मग आम्ही दारावरची बेल वाजवली. एका बाईंनी दार किंचित किलकिले करून जाळीतून आम्हाला त्रासिक आवाजात विचारले, 'क्या काम है?' आम्ही काही उत्तर देणार एवढ्यात 'हमें कुछ नहीं चाहिए |' म्हणून तिने दार खाडदिशी बंदही केले! त्या आवारातून बाहेर पडताना आम्हाला हळहळही वाटत होती की इतक्या चांगल्या जागेची काय अवस्था झाली आहे, आणि त्याच बरोबर सुटका झाल्याची भावनाही होती.
तुम्ही रोपे कोठून मागविता? की त्यांची पैदासही तुम्हीच करता?
मी आजूबाजूच्या, तसेच अगदी कर्जत, पुण्यापर्यंतच्या रोपवाटिकांमधून रोपे विकत घेते. सुरुवातीला मी अगदी दुरून, उत्तर-पूर्वेकडूनही रोपे मागविली होती. पण त्यातली काही प्रकारची रोपे ही येथील हवेत जगू शकली नाहीत. हे लक्षात आल्यावर मग मी मुंबईच्या हवामानात टिकणारी, तग धरू शकणारी रोपेच मागवायचे ठरविले. मुंबईच्या जवळपासच्या भागातून माझ्याकडे मोठ्या प्रमाणात रोपे येतात. अगदी खास काही रोपांसाठी मात्र मी कर्जत, पुण्यापर्यंतच्या रोपवाटिकांकडे ऑर्डर नोंदविते. पण मजा अशी होते की तुम्ही जरी अगदी रोपांचे नाव सांगून, त्यांचे वर्णन करून एखाद्या नर्सरीतून रोपे मागवलीत तरी तुमच्याकडे तीच रोपे पोहोचतील ह्याची खात्री नसते. याचे कारण म्हणजे अनेकदा तेथील स्टाफला त्या रोपांबद्दल जास्त काही माहितीच नसते. एकदा मी Petunia नावाच्या फुलझाडांची मोठी ऑर्डर दिली होती. प्रत्यक्षात माझ्याकडे त्यांनी Fittonia ह्या इनडोअर प्रकारात मोडणार्या रोपांची डिलिव्हरी पाठवून दिली! तर असे प्रकार होतच असतात. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक लक्ष घातल्याशिवाय गत्यंतर नसते. मी २०१२ मध्ये पॅशन ग्रीनची सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत मला आलेला अनुभव चांगला आहे.
तुम्ही लँडस्केपिंग पण करता ना? त्याबद्दल सांगाल का?
आतापर्यंत मी जास्त करून इनडोअर लँडस्केपिंग केलं आहे. एखाद्या घराची किंवा ऑफिसची रचना पाहून, तिथे येणारा प्रकाश, क्लाएंटची आवड इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना त्या वातावरणाला साजेशी, खुलून दिसणारी रोपे, फुलझाडे सुचविणे व ती आकर्षक पद्धतीने मांडणे इत्यादी. पण आऊटडोअर लँडस्केपिंगचाही माझा अनुभव चांगला आहे. सध्या माझे सनी देओलच्या जुहू येथील स्टुडिओच्या ड्राइव्ह-वे लँडस्केपिंगचे काम चालू आहे. त्यांना तिथे खूप फुलझाडे हवी होती. पण त्या जागी सूर्यप्रकाश कमी प्रमाणात येतो. मग त्यानुसार त्यांना आवडतील आणि त्या ठिकाणी जगतील, फुलतील व उठून दिसतील अशी फुलझाडे निवडून त्यानुसार काम सुरू आहे.
काय आहे ना, प्रत्येक क्लाएंटची स्वतःची काही आवड असते, काही कल्पना असतात. पण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी त्याला लँडस्केपिंग करायचे आहे ती जागा, तेथील प्रकाश, त्या जागेची रचना इत्यादी हे त्याने आखलेल्या कल्पनेशी जुळतेच असे नाही. अशा वेळी क्लाएंटला आपले म्हणणे, आपला दृष्टिकोन रुचेल, पटेल अशा भाषेत समजावून द्यावा लागतो. क्लाएंटशी योग्य प्रकारे संवाद साधावा लागतो.
मी अनेकदा लँडस्केपिंग केल्यावर त्याच्या मेन्टेनन्सचे कामही घेते. किंवा त्या ठिकाणच्या स्टाफला मेन्टेनन्सचे ट्रेनिंग देते. अर्थात असे ट्रेनिंग देऊनही काही वेळा त्या लोकांना मेन्टेनन्स ठेवायला जमत नाही. असेच एका ठिकाणी एका कॉर्पोरेट कंपनीचे आऊटडोअर लँडस्केपिंग केल्यावर मी त्यांच्या माळ्याला त्या झाडांना कसे, किती पाणी घालायचे हे व्यवस्थित सांगितले होते. ही झाडे विदेशी प्रकारातली होती. त्यांना आपल्या स्थानिक झाडांसारखे पाणी देऊन चालत नाही. मी त्या माळ्याला हे समजविल्यावर त्याने ते समजल्यासारखे दाखविले खरे, पण काही दिवसांनंतर मी जेव्हा रूटीन व्हिजिटला गेले तेव्हा तो माळी त्या झाडांची निगा नीट ठेवत नसल्याचे निदर्शनाला आले. मग त्या वेळी मला कंपनीच्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून तो माळी त्याचे काम नीट करत नसल्याचे सांगावे लागले. कंपनीकडे त्या झाडांच्या मेन्टेनन्सबद्दल लेखी सूचना होत्या, त्या माळ्यालाही मी नीट समजावले होते, तरी अशी परिस्थिती येते. काही कंपन्यांना त्यांच्या लँडस्केप मेन्टेनन्स करता मी माझ्या संपर्कातील अनुभवी माळ्यांची सेवा पुरविते. खरं तर माळी लोकांना नेहमीच्या झाडा-रोपांचा चांगला अनुभव असतो. पण काही खास प्रकारची रोपे, विदेशी रोपे असतील तर त्यांबद्दल त्यांना विशेष माहिती नसते. त्या वेळी त्यांना अशा रोपांची निगा कशी राखावी याबाबत वेगळे प्रशिक्षण द्यावे लागते. इनडोअर फुलझाडे, मौसमी फुलझाडे आणि सदाबहार फुलझाडे, स्थानिक झाडे आणि विदेशी झाडे ह्यांची प्रत्येकाची निरनिराळ्या तर्हेने काळजी घ्यावी लागते.
तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने भेट म्हणून देण्यासाठी रोपे विक्रीस ठेवता. त्यांबद्दल सांगाल का?
हो, माझ्याकडे हर तर्हेच्या कार्यक्रमासाठी किंवा प्रसंगासाठी भेट म्हणून द्यायला निरनिराळे रंग, आकार, प्रकार असलेली वेगवेगळी रोपे आहेत. ही रोपे मी खूप आकर्षक सिरॅमिक पात्रांमध्ये लावली आहेत. ती तुम्ही कोठेही ठेवू शकता. कॉर्नर-पीसवर, टेबलावर, खोलीच्या कोपर्यात, खिडकीच्या कठड्यावर किंवा तुमच्या आवडत्या ठिकाणी! लोक सामान्यतः शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ किंवा आकर्षक पुष्परचना भेट म्हणून देणे पसंत करतात. पण कालांतराने हे गुच्छ सुकून जातात, नष्ट होतात. झाडाचे तसे नसते. ते तुमची साथ आयुष्यभर निभावते. तुमच्या घरातला ते एक घटक बनते. तुम्ही घरातल्या लहान मुलांना, पाळीव प्राण्यांना जसे प्रेमाने खाऊ-पिऊ घालता, त्यांची काळजी घेता तशीच तुम्ही त्या झाडाची काळजी घेतलीत तर तेही तुम्हाला आनंद देते, सोबत देते. मी प्रत्येक झाडासोबत त्याची काळजी कशी घ्यायची हे छापील स्वरूपात देत असतेच! पण खरं सांगायचं तर तुम्ही त्या झाडाचे निरीक्षण केलेत तर तुम्हालाही ते कळू शकते. त्याच्या मुळांजवळची माती फार ओली नाही ना, झाडाला आवश्यक प्रकाश मिळतो आहे ना, त्याची पाने तजेलदार दिसत आहेत की कोमेजली आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेच विशेष प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. परंतु दुर्दैवाने लोक तेवढे कष्ट घेत नाहीत.
ह्या व्यवसायात तुम्हाला कोणती आव्हाने सामोरी येतात? कोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते?
बागकाम हे कष्टाचे काम आहे. हाताखाली काम करणारी माणसे दरवेळी कष्टाळू, विश्वासू मिळतीलच असे नाही. माळीकाम, मजूरकाम करणारे लोक कित्येकदा बेभरवशाचे निघतात. मदतनीस कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सुट्टी घेतात किंवा काम सोडून निघून जातात. अशा वेळी त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यातून मार्ग काढणे, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेणे हे सर्व करावेच लागते. माझ्या नोकरीत मला कोठेच कष्टकरी वर्गासोबत काम करण्याची वेळ आली नव्हती. माझ्या हाताखालची माणसे ही प्रोफेशनल असायची, कमिटमेन्ट घेऊन ते काम वेळेत पूर्ण करणारी असायची. त्याबाबत त्यांना फारसे कधी सांगावेही लागले नाही. इथे मात्र तसे होत नाही. समोरचा माणूस आपले काम जबाबदारीने पूर्ण करेलच ह्याची शाश्वती नसते. तुम्हाला पर्यायी व्यवस्था तयार ठेवावीच लागते.
माझ्या नोकरीचा मला एक फायदा असा झाला की मी सुरुवातीपासून ह्या व्यवसायात प्रोफेशनल अप्रोच ठेवून काम केले आहे. त्याचा खूप फायदा होतो. वेळेची कमिटमेन्ट, कामाची गुणवत्ता राखणे, जनसंपर्क, विक्रीपश्चात सेवा, तांत्रिक पातळीवर अद्ययावतपण राखणे यासारख्या गोष्टींसाठी मला माझ्या नोकरीतल्या अनुभवाचा चांगला उपयोग झाला.
दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग. मी स्वतः माझ्या व्यवसायाचे छान मार्केटिंग करू शकते असे मला वाटत नाही. पण जर तुम्हाला ते तंत्र अवगत असेल तर ते फार फायद्याचे ठरते. नशीबाने माझ्या व्यवसायात माझा नवरा ती बाजू सांभाळतो आणि झाडा-रोपांच्या बाबतीतले सर्व काही मी बघते.
ह्या व्यवसायाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे?
व्यवसाय म्हटल्यावर आर्थिक नफा, फायदा, व्यवसायाचा विस्तार हे समीकरण ओघाने येतेच! पण माझ्या बाबतीत म्हणाल तर झाडापानांवर, बागकाम करण्यावर माझे नि:सीम प्रेम आहे. खूप मनापासून आवड आहे मला त्याची! आणि आपल्या छंदाला व्यवसायाचे स्वरूप देण्यातली मजाही काही औरच आहे! हा एक असा व्यवसाय आहे ज्याचा मला कधी कंटाळा येईल असे वाटत नाही. हे काम मी अगदी म्हातारी होईपर्यंत करू शकते.
आणखी एक कारण आहे. माझ्या आयुष्याचा सुरुवातीचा बराचसा काळ दिल्लीत गेला, त्यामुळे मनाने मी आजही दिल्लीकर आहे असेच म्हटलेत तरी चालेल. दिल्लीत आजूबाजूला खूप हिरवाई, बागा, झाडे-पाने-फुले बघायची सवय होती. मुंबईला आल्यावर इथे तशी हिरवाई आजूबाजूला दिसायची नाही. मग मी माझ्या घरातच ती हिरवाई आणली. आणि आता इतरांना हिरवीगार झाडे विकताना मला खूप छान वाटते. बरं, मी फक्त झाडे, रोपे विकते असे नव्हे तर त्याबरोबर ग्राहकांना त्या झाडाशी संबंधित मार्गदर्शन करते. अनेकजण त्यांच्याकडच्या रोपांबद्दलचे लहान-मोठे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात, त्यांचे प्रश्न सोडवायचा मी प्रयत्न करत असते. ह्या निमित्ताने माझ्याकडे नियमित येणारा असा एक ग्राहकवर्ग तयार झाला आहे. मी रोपांबद्दल योग्य तो सल्ला देईन आणि त्यांच्या गरजेनुसार योग्य रोपेच त्यांना विकेन असा त्यांचा विश्वास असतो. माझ्या ग्राहक असलेल्या काही कंपन्यांच्या बाबतीतही तसेच झाले आहे. ते मला त्यांचे बजेट सांगतात आणि मला गरजेनुरूप त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या क्लाएंटसाठी कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून झाडे, रोपे निवडायला सांगतात. आपल्याला चोख सेवा मिळणार ह्याची त्यांना खात्री असते. असे ग्राहक माझ्याकडे पुन्हा पुन्हा येत राहतात. मला ह्या प्रकारे माणसे जोडायला आवडतात. आणि एक प्रकारे हे माझ्या व्यवसायाचे यशच म्हणावे लागेल.
रोपांच्या विक्रीसाठी किंवा मार्केटिंगसाठी तुम्ही काही खास प्रयत्न करता का?
तुम्ही आमचे संकेतस्थळ पाहिलेच असेल! लोकांना रोपांची ऑनलाईन खरेदी करता यावी, त्यांना आपण निवडलेल्या रोपांबद्दल अधिक माहिती मिळावी, इतरांना ही रोपे गिफ्ट म्हणून देता यावीत ह्या दृष्टीने आम्ही आमचे संकेतस्थळ डिझाईन केले आहे व अद्ययावत ठेवले आहे. तुमच्या ऑनलाईन ऑर्डरचे ट्रॅकिंग करण्याचीही सुविधा ह्यात आहे. आम्ही रोपांची होम डिलिव्हरी देतो. एक्सप्रेस डिलिव्हरी सारखा पर्यायही आहे. आजकालच्या बिझी लाईफ मध्ये प्रत्यक्ष नर्सरीत जाऊन रोपे निवडणे, त्यांची ने-आण वगैरेसाठी अनेकांना वेळ नसतो. त्यांना ही सुविधा खूपच सोयीची वाटते. ह्याशिवाय वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये मी माझे स्टॉल्स लावत असते. तिथून मला रोपांसाठी खूप मागणी येते. लोक सतत नवनवीन कल्पना, आकर्षक रचना यांच्या शोधात असतात. मी प्रदर्शनात ठेवलेल्या टेबल टॉप रोपांमध्ये त्यांना काहीतरी वेगळे गवसते. शिवाय एक समाधानी ग्राहक इतर अनेकांना माझ्या नावाची शिफारस करतो. सध्यातरी एवढे मार्केटिंग मला पुरेसे आहे. आणि नियमित स्वरूपात माझ्याकडे येऊन रोपे विकत घेणारा ग्राहकवर्ग हा तर आहेच!
इनडोअर झाडा-रोपांचा घरातल्या वातावरणावर नक्की काय परिणाम होतो?
घरात ठेवलेली झाडं ही घरातली हवा शुद्ध करण्यासाठी मदत करतात. घरातले गालिचे, जाजमे, फर्निचर यांमध्ये खूप धूळ साचलेली असते. त्यांमुळे घरातली हवा प्रदूषित होत असते. झाडांमुळे ही हवा शुद्ध होण्यास हातभार लागतो. मी तर म्हणेन की प्रत्येक व्यक्तीमागे घरात ७-८ झाडे तर हवीतच! सर्वसामान्य घरात वीसेक झाडे तरी पाहिजेत. मुंबईत लोकांपाशी वेळेची खूप चणचण असते. झाडांना उन्हात किंवा सावलीत हालवायचे तर त्यासाठी तरी थोडा वेळ काढायला हवा ना! अशा वेळी कोकोपिट सारखे खत वापरले तर झाडाची कुंडी किंवा पात्र वजनाला व हलवायला हलके होते आणि त्या जोडीने झाडाचे चांगले पोषण होते. घरात झाडे जगवण्यासाठी तुमच्यापाशी 'ग्रीन थंब' वगैरे असण्याची काहीएक गरज नाही. तुम्ही घरातल्या माणसांबद्दल जसे जागरूक असता तसेच झाडांबाबतही असलात की झाले! मी नोकरी करत असताना माझं घर, नवरा, संसार, मुलगी, सासरे आणि एक पाळीव कुत्रा या सर्वांची काळजी घेत होते व शिवाय घरातल्या माझ्या झाडांचीही काळजी घेत होते. मुद्दा असा आहे की त्यांच्यासाठी खूप वेळ द्यावा लागत नाही, पण तरी कितीतरी लोकांना तेवढाही वेळ द्यायला जमत नाही. मग कामवाल्यांवर किंवा नोकरांवर झाडांची निगा राखण्याची जबाबदारी येते. ते लोक बरेचदा झाडांना नको तेवढे पाणी घालतात. परिणामी त्या पाण्याचे पुरेसे बाष्पीभवन होत नाही आणि झाडांची मुळे कुजतात, सडतात आणि झाडे मरून जातात.
या शिवाय झाडांमुळे घरातील वातावरण आनंदी ठेवायला मदत होते. झाडांची काळजी घेताना मनावरचा ताण हलका होतो. घराचे सुशोभन होते.
ह्या व्यवसायात तुम्हाला स्पर्धा आहे का?
माझ्यासारखी नाना तर्हेच्या झाडांची ऑनलाईन विक्री करून त्यांची खास सूचना व मार्गदर्शनासह, आकर्षक पात्रांमध्ये तुमच्या घरी डिलिव्हरी देण्याची सुविधा मुंबईत देणारे लोक कमीच आहेत किंवा नाहीत असे म्हटलेत तरी चालेल. त्यामुळे त्या पातळीवर मला स्पर्धा अशी नाही. शिवाय मी माझा व्यवसाय हा मुंबईपुरताच सीमित ठेवला आहे. पण ग्राहकांच्या अपेक्षा कधी कधी पेचात टाकणार्या असतात. होतं काय, रस्त्याच्या कडेला स्वस्त दरांमध्ये रोपांची विक्री करणारे शेकडो विक्रेते तुम्हाला मुंबईत सापडतील. त्यांच्याकडेही तुम्हाला कदाचित माझ्याकडे उपलब्ध असलेली रोपे मिळतील. त्यांच्याकडील किमती व माझ्याकडील रोपांच्या किमती ह्यांत खूप तफावत असते आणि अनेकांना त्याबद्दल प्रश्नही पडतो. पण ते लोक हे लक्षात घेत नाहीत की मी वापरत असलेले साहित्य, रोपांचा दर्जा, सिरॅमिक पात्रे, खत, माती हे चांगलेच असले पाहिजेत ह्याकडे माझा कटाक्ष असतो. रस्त्यावरून घेतलेले रोप आठ दिवसांपलीकडे जगेलच ह्याची काही खात्री नसते. पण माझ्याकडील रोपाची योग्य काळजी घेतल्यास ते व्यवस्थित जगते. किमतीतला हा फरक काहीजणांना खटकतो. पण माझ्या व्यवसायातल्या ओव्हरहेड्सचा विचार करू जाता त्या किमती रास्त आहेत हे ज्या ग्राहकांना पटते आणि परवडते ते नक्कीच टिकून राहतात.
ह्या व्यवसायासाठी रोज तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो? तुमच्या मदतीला कोण असते?
तसा हा व्यवसाय कष्टाचा व वेळखाऊ आहे हे नक्की. कारण माझ्याजवळच्या झाडा-रोपट्यांची निगा, नवीन आलेल्या झाडांना योग्य पात्रांमध्ये लावणे, ऑर्डरींचा ट्रॅक ठेवणे, नव्या ऑर्डरी देणे - घेणे, ग्राहकांच्या गरजांनुसार त्यांना मार्गदर्शन आणि अशी इतर बरीच कामे मी करत असते. तरी रोज मला ह्यासाठी किमान ४-५ तास तरी द्यावे लागतात. माझा नवराही तेवढाच वेळ ह्या कामासाठी देतो. आम्हा दोघांमध्ये मिळून म्हणाल तर तसा हा अख्खा दिवस द्यावा लागणारा व्यवसाय आहे. परंतु आम्ही जबाबदार्या वाटून घेतल्या आहेत, त्यामुळे बरे पडते.
ह्याखेरीज नियमित स्वरूपातील कर्मचारी असे मी कमीच ठेवले आहेत. गरजेनुसार आम्ही कर्मचारी कंत्राट तत्त्वावर ठेवतो. रोपांची डिलिव्हरी करणे, विक्रीपश्चात मेन्टेनन्ससाठी माळी इत्यादी कामांसाठी आम्ही गरजेबरहुकूम मदतनीस ठेवतो. मार्केटिंगचं काम हे बहुतांशी माझा नवराच बघतो.
तुमच्या 'पॅशन ग्रीन' संदर्भात पुढील काय योजना आहेत?
मला आजूबाजूला, लोकांमध्ये झाडांविषयी अधिकाधिक जागरूकता व आवड निर्माण करण्यात रस आहे. एकमेकांना भेटवस्तू देण्यापेक्षा झाडा-रोपांची जिवंत व कायम साथ देणारी गिफ्ट देण्याचा कल कसा वाढेल हे बघण्याकडे रस आहे. त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू असतात. सध्या माझा व्यवसाय हा मुंबईपुरता आहे आणि भविष्यातही तो मुंबईपुरताच राहील, कारण मुंबईत या व्यवसायाला प्रचंड प्रमाणात वाव आहे. आणि मी तशी काही खूप महत्त्वाकांक्षी व्यक्ती नाही. आता आहे तोच व्यवसाय अधिक चांगल्या प्रमाणात, कालसुसंगत पद्धतीने आणि जास्तीत जास्त बाजूंचा समावेश करून वाढवण्याकडे माझा रोख राहील. शेवटी मला व माझ्या ग्राहकांना ह्यातून जे समाधान मिळते ते माझ्यासाठी सर्वात मोलाचे आहे. आणि खरं सांगू का? ह्या व्यवसायाच्या निमित्ताने मला माझे हात रोज मातीत घालता येतात, मातीत काम करता येते, रोपट्यांबरोबर खेळता येते. ती जी अनुभूती असते ना, त्याची मी इतर कशाशी तुलना करूच शकत नाही! ते समाधान माझ्यासाठी खूप मोठे आहे.
या व्यवसायात येऊ इच्छिणार्यांना काय सल्ला द्याल?
पहिली गोष्ट म्हणजे तुमचे ह्या कामावर प्रेम हवे. हे कष्टाचे काम आहे. त्यामुळे तुम्ही ह्या व्यवसायात फक्त फायद्यासाठी किंवा पैशासाठी येणार असाल तर तुम्हाला त्यातून अपेक्षित यश मिळेलच असे नाही. तसेच तुमच्यापाशी तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्याचे कौशल्य हवे. तसे नसेल तर तशी व्यक्ती तुमच्यासोबत किंवा हाताखाली ह्या व्यवसायात हवीच! म्हणजे जर तुम्ही मार्केटिंग पर्सन असाल तर बागकामावर मनापासून प्रेम करणारी, त्यात पारंगत असणारी व्यक्ती तुमच्या व्यवसायात तुमच्या जोडीने हवी. किंवा तुम्ही बागकामात पारंगत असाल तर मार्केटिंगवाली व्यक्ती सोबत हवी. तरच हे व्यावसायिक समीकरण जमू शकते. ह्या व्यवसायात जागा सोडल्यास प्रचंड मोठी अशी गुंतवणूक करावी लागत नाही. रोपांचे म्हणाल तर दीर्घकाळ टिकाऊ आणि तुलनेने कमी किमतीची गुंतवणूक असते. व्यवसायात नफा मिळायला, आर्थिक दृष्ट्या हा व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. या क्षेत्रात तुम्हाला आपले ज्ञान अपडेटेड ठेवावेच लागते. ग्राहकांचा कल बघून, त्यांच्या आवडी-निवडी-क्षमता बघून त्यानुसार त्यांना सल्ला द्यावा लागतो. जनसंपर्काचे कौशल्य त्यासाठी आवश्यक ठरते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याद्वारे आपला व्यवसाय वाढविणे किंवा व्यावसायिक प्रक्रिया अधिक सुकर करणे, आपल्या व्यवसायाची जाहिरात सुयोग्य प्रकारे कशी होईल या सर्व गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आंतरजाल, संकेतस्थळ, सोशल मीडिया इत्यादींचा योग्य वापर करता आला पाहिजे.
*****************************
मुलाखत अनुवादित.
मुलाखतकार : अरुंधती
खास आभार : मामी आणि तिचा टेरारियम बाफ.
मुलाखत इतकी आवडली की प्रत्येक
मुलाखत इतकी आवडली की प्रत्येक शब्दात "पॅशन ग्रीन" हा रंग आल्याचा भास होतो आहे. मुलाखती म्हटल्या की ठरलेल्या त्याच त्याच कलाकारांच्या वा तत्सम सिलेब्रिटीजचा हा सिलसिला या मुलाखतीने खोडून काढला त्याबद्दल अरुंधती कुलकर्णी आणि त्याना मुलाखतीसंदर्भात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याच्या व्यक्तींचे खास अभिनंदन केले पाहिजे.
अलका बजोरिया यांचा 'पॅशन ग्रीन' सदर्भातील योगदान किती मोठे आणि महत्वाचे आहे हे ज्यांनी आपल्या घरी हा प्रयोग केला आहे त्यांच्या लक्षात लागलीच येईल. चार कुंड्या आणि त्यात लावलेली ठराविक गुलाबाची जाईची फुले सोडल्यास इतका खोलवर विचार....तोही अत्यंत अभ्यासू....माझ्या मनी कधीच आला नव्हता. आज मुलाखात वाचल्यावर लक्षात येते की किती पेपरवर्क या अलकामॅडम यानी केले असेल. विशेष म्हणजे त्यांचे पतीही त्याना 'ग्रीन' संदर्भात आवश्यक ती सर्व मदत करतात त्याचे स्वागत होणे आवश्यक आहे.
"रोपांचे म्हणाल तर दीर्घकाळ टिकाऊ आणि तुलनेने कमी किमतीची गुंतवणूक असते."... हे माहीत झाले; प्रश्न आहे तो देखरेखीचा आणि वेळेचा. तरीही इतकी छान मुलाखात पाहून 'पॅशन ग्रीन' विषयी फार औत्सुक्य निर्माण झाले.
धन्यवाद अरुंधती.
अकु, मुलाखत अतिशय सुरेख
अकु, मुलाखत अतिशय सुरेख झालीये. फोटो देखिल एकदम मस्त!
खूप आवडला लेख !!! खूप
खूप आवडला लेख !!! खूप दिवसापासून घरातील छोटे plants शोधत होते आणि तुझी पोस्ट मिळाली. ते पण आमची मुंबई मध्ये ...खूप खूप आनंदी वाटत आहे !!
'पॅशन ग्रीन' ची website खूप माहितीपूर्ण आणि आकर्षक आहे.
छान मुलाखत आणि फोटोही मस्त.
छान मुलाखत आणि फोटोही मस्त.
तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक रोपांना तुम्ही कोठून मागविता? >>> ही वाक्यरचना बदलणार का?
अतिशय सुंदर माहितीपुर्ण
अतिशय सुंदर माहितीपुर्ण मुलाखत. लगेच साईटही पाहिली. काय भेट द्यावी हा प्रश्न अगदी चटकन निकाली काढणारी साईट आहे
अकु तुझे आणि मायबोलीचे मनापासुन धन्यवाद.
मुलाखत छानच अकु.
मुलाखत छानच अकु.
अशोक., गुलमोहोर, मामी, साधना,
अशोक., गुलमोहोर, मामी, साधना, कविन... सर्वांना धन्यवाद.
मंजूडी, थँक्स, बदल केला आहे.
अकु, मुलाखत अतिशय सुरेख
अकु, मुलाखत अतिशय सुरेख झालीये. थँक्यु.
अकु, खूप छान मुलाखत ! आमच्या
अकु, खूप छान मुलाखत !
आमच्या घरात सगळे बागकामवेडे लोक आहेत. त्यांनाही वाचून दाखवते.
असं 'आपलं' काम सापडणं आणि करायला मिळणं किती छान !!!
खूप छान मुलाखत !
खूप छान मुलाखत !
मस्तच!
मस्तच!
खुप छान मुलाखत ! मी हा
खुप छान मुलाखत !
मी हा व्यवसाय का निवडला नाही, असे वाटून गेले.
सुंदर मुलाखत! फोटो फार आवडले.
सुंदर मुलाखत! फोटो फार आवडले.
अकु, फारच मस्त मुलाखत.
अकु, फारच मस्त मुलाखत. धन्यवाद
घरात झाडे जगवण्यासाठी तुमच्यापाशी 'ग्रीन थंब' वगैरे असण्याची काहीएक गरज नाही. तुम्ही घरातल्या माणसांबद्दल जसे जागरूक असता तसेच झाडांबाबतही असलात की झाले! >>> कसलं हुरुप वाढवणारं वाक्य आहे हे.
त्यांची वेबसाईटही सुंदर आहे. प्रत्येक झाड कुठल्या प्रकारचे, पाणी किती घालायचे, गुणधर्म ह्यांची छान माहिती आहे.
मस्त मुलाखत.
मस्त मुलाखत.
खूप मस्त मुलाखत. धन्यवाद.
खूप मस्त मुलाखत. धन्यवाद. नक्की रोपे घेइन ह्यांच्याकडून.
छान झाली आहे मुलाखत.
छान झाली आहे मुलाखत. सातत्याने अशा व्यक्तीमत्वांची ओळख करून दिल्याबद्दल तुला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. या सगळ्या लोकांशी तुझ्या वैयक्तीक ओळखी असतील तर कौतुकच आहे
अकु, धन्यवाद! फार मस्त घेतली
अकु, धन्यवाद! फार मस्त घेतली आहेस मुलाखत!!
खुप छान मुलाखत ..
खुप छान मुलाखत ..
मस्त मुलाखत
मस्त मुलाखत
छान घेतलीये मुलाखत. पॅशन
छान घेतलीये मुलाखत. पॅशन ग्रीन पण खुप आवडले.
मुलाखत आवडली .
मुलाखत आवडली .
छान झाली आहे मुलाखत.
छान झाली आहे मुलाखत. सातत्याने अशा व्यक्तीमत्वांची ओळख करून दिल्याबद्दल तुला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. या सगळ्या लोकांशी तुझ्या वैयक्तीक ओळखी असतील तर कौतुकच आहे
+१
सर्वांचे मनःपूर्वक
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
मुलाखतीचे दरम्यान अशा व्यक्तींशी फोन, इमेल, समस, कधी प्रत्यक्ष गप्पा इत्यादींमधून भरपूर बोलणे होते आणि कधी काळी आपला काहीच परिचय नव्हता हेच खरे वाटत नाही.
अकु खूप आवडली मुलाखत. >>छान
अकु खूप आवडली मुलाखत.
>>छान झाली आहे मुलाखत. सातत्याने अशा व्यक्तीमत्वांची ओळख करून दिल्याबद्दल तुला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. या सगळ्या लोकांशी तुझ्या वैयक्तीक ओळखी असतील तर कौतुकच आहे +१
छान घेतलीये मुलाखत. धन्यवाद
छान घेतलीये मुलाखत. धन्यवाद अरुंधती!
अकु, खूप छान झालीये
अकु, खूप छान झालीये मुलाखत!
सातत्याने अशा व्यक्तीमत्वांची ओळख करून दिल्याबद्दल तुला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. >> +१