जावळी मुलुखातली भन्नाट भटकंती::: मंगळगड – चंद्रगड – ढवळेघाट – महाबळेश्वर
...................................................................................................................................
स्वराज्यातलं ‘जावळी प्रकरण’
"...तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वुर! त्याच्या आणि बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे.” राजांचे पूर्वीचे उपकार विसरून जावळीच्या चंद्रराव मोरेनं शिवरायांशी बेबनाव मांडला होता.
तरीही महाराजांनी संयम दाखवला, “..जावळी खाली करोन, हात रुमाल बांधोन, भेटीस येवोन हुजूराची चाकरी करणे! इतकियावरी बदफैली केलिया मारले जाल."
त्यावर चंद्ररावाने मग्रुरी दाखवली “... येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. जावळीस येणारच तरी यावे.. दारुगोली महजूद आहे!” "
अखेरीस महाराजांनी स्वतः जातीने जावळीत उतरून इ. स. १६५६ ला मोरे घराण्याकडून लाखमोलाची जावळी जिंकून घेतली. शिवचरित्रात जावळीच्या मोहीमेचं महत्त्व थोर. कारण जावळी स्वराज्यामध्ये आली, म्हणजे - अत्यंत मोलाचे दुर्ग (रायरी, चंद्रगड, मकरंदगड, मंगळगड, सोनगड, चांभारगड), दुर्गम घाटवाटा (वरंध, पारघाट), डोंगरी देवस्थानं (महाबळेश्वर, चकदेव, पर्वत अशी शिवालयं), ताकदीचे डोंगर (भोरप्या.. ज्यावर प्रतापगड बांधला), सिंधूसागरापर्यंत झेप घेता येणं अन् काही तालेवार हिरे (मुरारबाजी देशपांडे) सापडणं – अश्या खूप गोष्टी साधल्या होत्या. अफझलयुद्धात विजयश्रीसाठीदेखील जावळीच्या खो-याचा खूपंच मोठा वाटा होता...
....................................................................................................................................
जावळीच्या घाटवाटांचा रक्षक – मंगळगड
चंद्रराव मोरेचे ‘येता जावली, जाता गोवली’ हे शब्द पाठलाग करत राहिले. जावळीत असं आहे तरी काय, याची विलक्षण उत्सुकता लागून राहिलेली. एके दिवशी सगळं काही जुळून आलं, अन् २६ जानेवारीच्या आसपास आम्ही पोहोचलो जावळीमधली दुर्गम दुर्ग - घाटवाटा – जंगलं – उत्तुंग डोंगररांगा भटकायला. बेत होता मंगळगड, चंद्रगड, ढवळेघाट अन् महाबळेश्वर या जबरदस्त वाघांशी गाठ घ्यायचा.
पुण्याहून वरंधा घाटाच्या पायथ्याच्या ढालकाठी गावात पोहोचलो. कामथे खो-यात मंगळगडाच्या पायथ्याशी पोहोचायला दुपारचे १२ वाजले होते. टळटळीत उन्हांत मंगळगडाचा कातळ अन् झाडोरा झक्कास दिसत होते.
पिंपळवाडीतल्या शिवरायांच्या पुतळ्यामागे सह्याद्रीची भिंत खुणावत होती.
कांगोरी सिध्देश्वराच्या मंदिरापासून चढाई सुरू केली. गडाच्या उभ्या धारेवरून गवत अन् घसा-यामधून वाट काढत कातळमाथ्याजवळ पोहोचलो.
नवरानवरीच्या सुळक्यांच्या जवळून वाट आडवी जाऊ लागली.
प्रवेशद्वाराच्या भग्न तटबंदीमधून गडावर प्रवेशलो. समोर एक ‘वसूल’ दृश्य. लांबवर पसरलेली माची, त्यावरचं कांगोरीनाथ मंदिर अन् मागे पसरलेला सह्याद्री.
डावीकडे माचीवर पाण्याची टाकी मागे टाकत कांगोरी देवीचं मंदीर गाठलं. छत नसल्याने पावसाळा वगळता एरवी ८-१० ट्रेकर्सची राहायची सोय इथे होवू शकेल. भैरवाला अन् कांगोरी देवीला नमस्कार केला.
मंगळगडाच्या माचीला भरपूर तटबंदी अन् टोकावर बुरूज बांधून भक्कम केलंय. मंगळगडाला ‘कांगोरी’गड असंही म्हणतात. जावळीतल्या वरंध घाट, कामथ्या घाट, रायरेश्वराची अस्वल खिंड अश्या वाटांवर कंट्रोल ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा. बालेकिल्यावर काही पाण्याची टाकी, जोती सोडली, तर फार काही उरलं नाहीये. आज गड गाठायचा सह्याद्रीच्या अप्रतिम दर्शनासाठी... माचीवरचं कांगोरीनाथ मंदिर अन् मागे सह्याद्रीच्या विराट रांगा – जननी दुर्ग, कामथा घाट, रायरेश्वर, चंद्रगड, महादेव मु-हा, कोळेश्वर, महाबळेश्वर, असं बरंच काही...
मंगळगडाची निवांत भेट (लंच ब्रेक धरून) करून परत पायथ्याला यायला ५ तास लागले. सुंदर गड बघितल्याचा आनंद पाचपट व्हावा, इतका भारी फाईव्ह-स्टार मुक्काम केला पिंपळवाडीतल्या भैरोबा मंदिरात...सह्याद्रीतला स्वर्ग अनुभवायची अनवट जागा - चंद्रगड
दुस-या दिवशी सह्याद्रीच्या भिंतीमागे पहाट जागी होवू लागली. कोंबड्याच्या आरवण्यानं हलकेच जाग आली.. आपण सह्याद्रीच्या कुशीत आहोत, अन् एका नवीन भन्नाट ट्रेकच्या दिवसाची सुरुवात करतोय, ही भावनाच इतकी सुखाची होती, म्हणून सांगू...
सह्यधारेमागे सूर्योदय झाला. भातशेतीसाठी जमीन तयार करण्यासाठी राब भाजण्याची प्रचलित पद्धत असते. त्यासाठी जिकडे तिकडे झाडाच्या मुख्य फांद्या ठेवून बाकी पानं अन् बारीक फांद्या उतरवलेल्या दिसत होत्या.
हवेतला गारवा मस्त होताच. पण, पहिल्या किरणांमुळे ट्रेकर्सना ऊब आली.
मंगळगड सूर्यकिरणांत न्हाऊन निघू लागला.
नकाशा बघताना जवळ वाटले, तरी मंगळगड आहे कामथ्या नदीच्या खो-यात, तर चंद्रगड आहे ढवळी नदीच्या खो-यात. त्यामुळे मंगळगडाच्या पायथ्यापासून महादेव मु-ह्यावरून चंद्रगड पायथ्याला पोहोचण्यासाठी ६ तास चढाई-उतराई हवी. वेळ अन् श्रम वाचवण्यासाठी आम्ही २-३ बस बदलून चंद्रगडच्या पायथ्याशी ढवळे गावात पोहोचलो.
ढवळे गावात आमचं स्वागत केलं - भारताच्या नव्या पिढीनं.
चंद्रगडची वाट आहे फसवी. सोप्पी अजिबात नाही. म्हणून गाईड बरोबर घेणं उत्तम. गावाबाहेर शेताडीतून झपझप निघालो. चंद्रगडच्या ढलप्याभोवती उंचच उंच डोंगररांगांनी फेर धरलेला.
जंगलातून चढत गेल्यावर चंद्रगड अधिकाधिक जवळ येत गेला..
दाट जंगलातून आडवं जात चंद्रगडाच्या अधिकाधिक जवळ जात होतो. गावक-यांनी झाडांवर खुणेसाठी ‘ॐ नम: शिवाय’ असं लिहिले पत्र्याचे फलक पाहून हुरूप आला.
चंद्रगडाची चढाई उभ्या दांडावरून आहे. पायथ्याशी ‘वांझव्हिरा’ ओढ्याजवळ मुद्दाम विश्रांती घेतली, कारण आता सुरू होणार होती खरी अवघड चढाई. ‘चंद्रगड दर्शन’ अश्या लावलेल्या पाटीपासून सुरू होते घसा-याची अन् उभ्या कठीण चढणीची सुरुवात.
घसा-यावर चांगलीच झटपट केल्यावर अन् प्रत्येक पाऊल अधिकाधीक उंच रोवल्यावर थोडी उंची गाठली. जंगलातून वर उंची गाठल्यामुळे, आता पाठीमागे ढवळे नदीचं खोरं उलगडू लागलं.
चढ संपेना.. मग एखादं रानफूल पाहिलं, की दम खायला थांबायचं..
म्हसोबा खिंडीपाशी आलो. इथून एक घसरडी वाट ढवळे घाटात उतरते म्हणे. उजवीकडे होत्या सह्याद्रीच्या उभ्या धारा अन् कातळमाथे.
घसा-यानं अन् उभ्या चढानं हैराण झालो होतो. क्वचित एखादं झाड गवसायचं, विश्रांतीचा आग्रह करणारं, मग त्याचं मन कसं मोडायचं..
२ मिनिटं विश्रांती घेऊन परत निघालो, की आहेतच गवताळ घसा-याच्या पावठ्या अन् उभे कातळटप्पे..
वाटेत काही सोप्पे कातळारोहण टप्पे पार केले.
अन्, अखेरीस आम्ही पोहोचलो चंद्रगडाच्या चिंचोळ्या माथ्यावर. कातळात कोरलेली श्री ढवळेश्वर महादेवाची पिंड.
ऊन-वारा-पावसात ढवळेश्वर महादेवाला साथ देणारा निष्ठावंत नंदी
गडाचा माथा अगदीच अरुंद. वरच्या टप्प्यावर चढून गेलो.
स्वर्ग!!!!!!!!!!!!!
रायरेश्वर - कोळेश्वर – ढवळे घाट – महाबळेश्वर असा अफलातून नजरा..
सह्याद्रीच्या एकसे बढकर एक रांगा. उद्या जिथे ट्रेक संपवायचा ते ऑर्थरसीट टोक दूरवर मागे डोकावताना..
गडाच्या पूर्व टोकापाशी दडलंय एक थंड अन् गोड पाण्याचं टाकं, पहा-याची गुहा अन् जननी देवीचं स्थान!
पाण्यावर हिरवट तवंग होता. पण आमचा गाईड ‘रवी मोरे’नं निवडुंगाच्या चिकाचे २-३ थेंब पाण्यात टाकले, अन् काय आश्चर्य – पाण्यावरचा तवंग दूर झाला.
शांतपणे सह्याद्रीतल्या स्वर्गाचा - गूढरम्य विराट रौद्रतेचा मनसोक्त ‘अनुभव’ घेतला..
अर्थात, असे क्षण एन्जॉय करायला समविचारी ट्रेकर मित्रांची सोबत असणं किती किती मोलाचं!!!
पण, हाच मित्र दरीच्या काठावर जाऊन टाकी शोधायला गेला, की हे कुतूहल डोक्यात जातं. हाहा..
परतीचा प्रवास सुरू केला. मगाशी चढताना जाणवलं नव्हतं, पण चंद्रगडाचा चिंचोळा कातळमाथा आता भीतीदायक वाटत होता. दुर्गम जागचं पाण्याचं टाकं दिसलं.
कातळ अन् घसा-यावरून उतरणं सोप्पं नक्कीच नव्हतं. सूर्य मावळतीकडे झुकू लागला.
ढवळे गावातून चंद्रगड बघून यायला ४ तास लागले होते. चंद्रगडच्या थरारक चढाई-उतराईमुळे अन् सह्याद्रीच्या विराट दृश्यामुळे दिवस दुसरा भन्नाट ठरला..‘ढवळे घाट’ - सह्याद्रीतली सर्वोत्तम घाटवाट (अर्थातंच, मी बघितलेल्या अत्यल्प घाटवाटांपैकी)
चंद्रराव मोरेच्या जावळी खो-याची खरी ओळख करून घेण्यासाठी सुरू केलेल्या भटकंतीचा तिसरा अन् सर्वात उत्कंठेचा दिवस उजाडला. ढवळे गावच्या शाळेतला मुक्काम आवरून निघालो. आज आम्ही ढवळे घाटानं पूर्ण १००० मी.ची चढाई करून महाबळेश्वरला चढणार होतो.
ऑर्थरसीट टोकाकडून कोकणात उतरलेली डोंगराची सोंड आहे. सापळखिंडीपासून ही सोंड उत्तरेला ढवळे खो-यात उतरते अन् याच सोंडेच्या टोकाशी चंद्रगड आहे. चंद्रगडला उजवीकडे ठेवून वळसा घालून ढवळे खो-याच्या खोलवर आत शिरू लागलो.
घनटाट अंधा-या जंगलातून, ओढ्यानाल्यांतून वाट चढत होती. अजून तरी चढ छातीवरचा नव्हता. सलग दीड तास चढल्यावर ‘गाढव दगडा’वर पहिली विश्रांती घेतली. (सगळ्या गाढवांनी ओझी उतरवून बुडं टेकवली.)
आम्ही अधिकाधीक उंच चढत गेलो, अन् खूप वेळ जंगलातनं चढल्यावर प्रथमंच चंद्रगडचं खोलवर दर्शन झालं...
दाट जंगल संपून आता कारवीची दाटी सुरू झाली.
ढवळे घाटातून दिसणारं चंद्रगडाचं क्लोजअप अन् अजून थरारक असं दृश्य
जंगलात काही टप्प्यांत वाटेवर दगड रचून पाय-या केलेल्या दिसल्या. सह्याद्री माथ्याकडची कातळभिंत झाडीतून डोकावली.
साधारणतः अडीच तासात ४०% घाटाची वाट पार झाली होती, अन् पुढची वाट शोधू शकू असा विश्वास वाटत होता. आमचे वाटाडे रवी मोरे अन् निवृत्ती यांनी आमचा निरोप घेतला.
उभ्या चिरेबंद वाटेवरून चढून जाताना घामटं निघालं.
सापळखिंडीपासून प्रतापगडाचं दर्शन झालं. इथून एक वाट प्रतापगडाच्या पायथ्याशी करंजे किंवा दाभीळ गावांकडे उतरते.
सापळखिंडीपासून आता वाट डावीकडे (पूर्वेकडे) वळत होती. पाठीमागे सापळखिंडीकडे बघितल्यावर दिसणारं दृश्य..
आता आम्ही जात होतो, एका भीतीदायक घसरड्या उतारावरून.. वाट फुटली होती, अन् होतां खूप सारा घसारा. प्र.चि. वरून ‘भीतीदायक’ आडवी वाट कां म्हणतोय, हे कळणार नाही. पुढची दोन प्र.चि. बघा..
ही होती खाली दिसणारी खोलवर दरी..
आम्ही कुठून आडवं जात होतो, ते बघा.. अश्या दृष्टीभयामुळे अन् घसा-यामुळे ही आडवी खूप काळजीपूर्वक पार कारवी लागली.
आता समोर बहिरीचं स्थळ अन् कोळेश्वर पठाराचं पश्चिम टोक खुणावू लागलं होतं.
ढवळे गावातून निघाल्यापासून साडेतीन तासात आम्ही ढवळेघाटातल्या ‘बहिरी’पाशी पोहोचलो होतो. ७०% घाट चढल्यानंतर लागणारं हे ठिकाण. अनगड रानदेवतेला वंदन करून, मस्त जेवणाचा कार्यक्रम पार पाडला.
खरंतर ‘बहिरी’पाशीच आपण पोहोचलो असतो सह्याद्रीच्या माथ्यावर. बहिरीपासून पूर्वेला वाट कृष्णा खो-यात जोर गावात जाते. आम्हांला मात्र दक्षिणेला अजून महाबळेश्वरच्या माथ्याची उंची चढायची होती. ‘बहिरी’पासून खोल दरीत चंद्रगड बघून विश्वास बसेना, की आपण काही तासांपूर्वी खोल कोकणात होतो.
इतक्या कष्टांचं बक्षीस म्हणून बहिरीपासून समोर गेल्यावर १०० पावलांवर थंड गोड पाणी मिळालं.
अर्थात, आमचं गंतव्य – महाबळेश्वरचा ऑर्थरसीट (मढीमहाल टोक) अजून बरंच लांब होतं. बहिरीपासून १०० मी. रांग चढून धारेवर आलो. मागे वळून पाहिलं, तर सदाहरित जंगलाच्या पार्श्वभूमीवर बहिरीचं ठाणं, कोळेश्वर पठाराचं पश्चिम टोक अन् रायरेश्वर कम्माल दिसत होते.
पहिल्यांदाच महाबळेश्वरचा ऑर्थरसीटकडे जाणारी चित्ताकर्षक सोंड दिसली. आम्ही जावळीतल्या ट्रेकची मज्जा पुरेपूर अनुभवत होतो.
वाळक्या गवतानं झाकलेल्या बारीक पाऊलवाटांवरून सावकाश चालत होतो. उजवीकडे दरीचं खोलवर दर्शन होवू लागलं.
धारेवर नेच्याच्या ठेंगण्या झुडुपांची दाटी होती. सदाहरित रानाच्या टप्प्यांखाली खोलवर चंद्रगड परत एकदा दिसला. सह्याद्रीच्या रांगांच्या गर्दीत एकसे बढकर एक सवंगडी डोंगर दिसत होते.
ऑर्थरसीट जवळ जवळ येत चालला. वाट आखूड, दाट झुडुपांमधून अन् दरीच्या एकदम काठावरून जात होती.
दरीची सोबत सोडून डावीकडून आडवं जाणारी वाट बरी वाटली. अन्, अचानक सामोरं आलं एक विराट दृश्य. श्वास रोखून धरून आम्ही तो खत्तरनाक व्ह्यू डोळ्यांत साठवू लागलो!!! वाऊ.. महाबळेश्वरचा ऑर्थरसीट कडा!
डावीकडून वळसा घालत वाट पुढे निघाली. ऑर्थरसीट टोक दरीतून चढताना, पर्यटकांच्या आश्चर्याच्या नजरा अन् हातवारे जाणवत होत्या.
ऑर्थरसीट टोकाच्या थोडं खाली ‘विंडो’ नावाची कातळात कोरलेली जागा आहे. सोप्प्या श्रेणीचं कातळारोहण करून ‘विंडो’मध्ये पोहोचलो.
दरीत चंद्रगड, कोळेश्वर अन् बहिरी खुणावत होते.
तर दुसरीकडे ऑर्थरसीटच्या दरीत कोसळलेले कडे दिसत होते.
पर्यटकांच्या गर्दीत मिसळून ऑर्थरसीट टोकावरून दिसणारी सह्याद्रीची दरी पाहिली.
दरीतून डोकावणारा चंद्रगडाचा कातळमाथा आता केवळ एक किरकोळ टेपाड भासत होते. तब्बल सहा तास सह्याद्रीची थेट कोकणतळापासून माथ्यापर्यंत अशी थरारक चढाई करून इथे पोहोचलो होतो.
येस्स!!!
मान्य की, सह्याद्रीचं प्रत्येक अंग वेगळं, अन् देखणं!
पण, माझ्या अल्प भटकंतींमध्ये ‘ढवळे घाटा’इतकी अ-प्र-ति-म घाटवाट मी पाहिली नाहीये.
जावळीच्या किल्ले-घाटवाट-जंगल-डोंगररांगा यांचं गारुड माझ्या मनावर असं काही बसलंय, म्हणून सांगू...
जबरदस्त, अद्वितीय.. शंकाच नाही!!!
...............................................................................................................................
ता. क.
शिवरायांनी चंद्रराव मोरेंचे शब्द कधीही खरे होऊ दिले नव्हते...
पण, त्या शब्दांची प्रचीती घेणं आजंही आपल्याला ते सहज शक्य आहे.. पूर्वतयारीशिवाय, अनुभवाशिवाय अन् नियोजनाशिवाय जावळीत चंद्रगडावर-ढवळेघाटात घुसून तर बघा.. कसे फसताय ते अनुभवालंच, अन् अचानक ऐकू येईल चंद्रराव मोरेंची आकाशवाणी, ‘येता जावली, जाता गोवली..’
- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)
केवळ अप्रतिम !!! तुझ्या
केवळ अप्रतिम !!! तुझ्या Discover सह्याद्री या आयडीला जागणारी भटकंती (तशी तुझी नेहमीच असते म्हणा !!). वर्णन आणि फोटोज झकास. पहिल्यांदाच ह्या रूट बद्दल इतकी तपशीलवार माहिती वाचली. चालते व्हा (म्हणजे चालायचं थांबवू नका !!!).
एक सजेशन कम विनंती…. मंगळगडच्या बालेकिल्ल्यावरून माचीचा आणि मागच्या डोंगररांगांचा जो फोटो आहे त्यात त्या फोटोच्या वर नमूद केलेली (जननी दुर्ग, कामथा घाट, रायरेश्वर, चंद्रगड, महादेव मु-हा, कोळेश्वर, महाबळेश्वर ) (आणि फोटोत जेवढी दिसतायेत तेवढी ) ठिकाणं बाणांनी दाखवलीस तर माहितीत अजून भर पडेल.
अवर्णनीय लेखन आणि
अवर्णनीय लेखन आणि प्रचि....
हेवा वाटतोय यार तुझा...
ओंकार: खूप धन्यवाद.. छान
ओंकार:

खूप धन्यवाद.. छान वाटलं
हाहा, ‘चालते व्हा’ या मस्त शुभेच्छा आहेत.. (अर्थात या शुभेच्छा घरून मिळाल्या, तर प्रॉब्लेम होईल :D)
२-३ फोटोज अपडेट करून त्यात मंगळगडवरून दिसणारे घाट आणि शिखरं दाखवण्याचा प्रयत्न केलाय..
आबासाहेब:
प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे..
अप्रतिम
अप्रतिम
नेहमीप्रमाणे ह्या ट्रेकची
नेहमीप्रमाणे ह्या ट्रेकची सुद्धा इतकी सखोल आणि तपशीलवार माहितीबद्दल नक्की काय प्रतिक्रिया देऊ ... काहीच कळत नाहीये… कडक… अफाट … एवढेच शब्द आठवत आहेत … ह्याची सुद्धा Printout घेऊन जाणार …
मंडळ सदैव आभारी आहे ….
ट्रेकळावे,
दत्तू
हे सर्व वर्णन व प्र चि अतिशय
हे सर्व वर्णन व प्र चि अतिशय अप्रतिम आहेत.
तुम्हा सर्व बहाद्दर मावळ्यांना सलामच ...
पण मला एक कायम प्रश्न पडतो की महाराजांच्या काळात (किंवा त्यानंतरच्या काळातही) कोणी एखादा दिल्लीकडचा /आदिलशाहीकडचा सरदार (मुगल वा रजपूत) इथे आला तर त्याला कसे काय कळत असेल हा गड कुठला नि तो कुठला ? (आता देखील जर स्थानिक वाटाड्याची गरज पडत असेल तर त्याकाळात तर काय स्थिती असेल ??)
इथे ज्याचा जन्म झाला असेल तोच माणूस हे सगळं (वाटा, किल्ले) समजू शकत असेल.....
आणि अशा दुर्गम सह्याद्रीच्या बळावर (व अर्थातच कडव्या, काटक, देशभक्त मावळ्यांच्या साथीने) महाराजांनी स्वराज्य मिळवले ते नंतर काही काळातच अक्षरशः हातातून निसटून गेले ... अरेरे ..... (इथे - कालाय तस्मै नमः असे म्हणावेसे वाटते...)
मस्त!! कुठून कुठे भटकतात
मस्त!! कुठून कुठे भटकतात लोक्स!
छान वाटलं
छान वाटलं
तुम्हा सर्वांना मनापासुन
तुम्हा सर्वांना मनापासुन सलाम.
खरच भन्नाट!
खरच भन्नाट!
अति भारी!
अति भारी!
ज ब रा ट !! हा ट्रेक किती
ज ब रा ट !! हा ट्रेक किती कष्टदायी आहे याची पुरेपुर कल्पना येतेय.. मस्तच !
जबरदस्त.
जबरदस्त.
जबरदस्त.. काय उत्साह आहे.
जबरदस्त.. काय उत्साह आहे. दाद द्यावीच लागेल.
अप्रतिमच ट्रेक केलात
अप्रतिमच ट्रेक केलात मित्रांनो…सलाम !
अफझलखान युद्धाच्या वेळी ढवळेघाट आणि चंद्रगड इथे मोठी नाकाबंदी करण्यात आली होती, ढवळे गाव आणि शेजारच्या उमरठ लाही मोठा इतिहास आहे, तुम्ही अगदी महत्वाची आणि फार मोठा इतिहास असलेली वाट पार केलीत त्याबद्दल अभिनंदन.
चंद्रराव मोरेची स्वतःची पारंपारिक जहागीर असूनसुद्धा आणि अफझलखानची इथे अनेक वर्षांची सुभेदारी असूनसुद्धा अफाट नेतृत्वगुणांच्या जोरावर शिवरायांनी दोघांनाही त्यांच्याच भूमीत पराभूत केल त्या छत्रपतींनासुद्धा मुजरा .
झकासराव बंकापुरे पुरंदरे
झकासराव
बंकापुरे
पुरंदरे शशांक
अश्विनी के
शिन्दे निल्या
सुनिल परचुरे
devenbhole
शैलजा
Yo.Rocks
अमेय२८०८०७
दिनेश.
मालोजीराव
दोस्तहो, प्रत्येक प्रतिक्रिया मोलाची आहे. स्वतंत्र उत्तर देत नाही, याबद्दल क्षमस्व!
प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला... खूप खूप धन्यवाद!!!
अरे काय जबरी भटकंती ...
अरे काय जबरी भटकंती ... मुजरा...
जबरदस्त.....आणि इतक्या आडव्या
जबरदस्त.....आणि इतक्या आडव्या घसरड्या वाटेवरुन जात क्लिक्स घेतलेत त्यासाठी कोपरापासुन दंडवत....
असेच अजुन मस्त मस्त ट्रेक्स करा पण जिवाला / प्रक्रुतीला जपुन...
मस्त. खुप छान वर्णन आणि फोटो.
मस्त. खुप छान वर्णन आणि फोटो.
झकास. अजुन येऊद्यात.
झकास.
अजुन येऊद्यात.
खतरणाक ट्रेक केलायत यार
खतरणाक ट्रेक केलायत यार तुम्ही , प्र ची अन माहिती खुपच उपयुक्त. चंद्रगड अन ढवळ्या घाट करायचाय , या माहितीचा उपयोग होइल , धन्यवाद !
झक्कास ट्रेक
झक्कास ट्रेक
खरच भन्नाट भटकंती..... पण
खरच भन्नाट भटकंती.....
पण मला एक कायम प्रश्न पडतो की महाराजांच्या काळात (किंवा त्यानंतरच्या काळातही) कोणी एखादा दिल्लीकडचा /आदिलशाहीकडचा सरदार (मुगल वा रजपूत) इथे आला तर त्याला कसे काय कळत असेल हा गड कुठला नि तो कुठला ? (आता देखील जर स्थानिक वाटाड्याची गरज पडत असेल तर त्याकाळात तर काय स्थिती असेल ??)
इथे ज्याचा जन्म झाला असेल तोच माणूस हे सगळं (वाटा, किल्ले) समजू शकत असेल.....
आणि अशा दुर्गम सह्याद्रीच्या बळावर (व अर्थातच कडव्या, काटक, देशभक्त मावळ्यांच्या साथीने) महाराजांनी स्वराज्य मिळवले ते नंतर काही काळातच अक्षरशः हातातून निसटून गेले ... अरेरे ..... (इथे - कालाय तस्मै नमः असे म्हणावेसे वाटते...)>>>>> +१
अफाटच. केव्हा योग यायचा
अफाटच.
केव्हा योग यायचा अश्या तंगडतोड वसूल भटकंतीचा?
अवर्णनीय लेखन आणि
अवर्णनीय लेखन आणि प्रचि....>>++१११
येता जावली, जाता गोवली. >>>>
येता जावली, जाता गोवली. >>>> याचा अर्थ आज समजला.
भन्नाट भटकंती.
भरपुरसारे फोटो/मार्ग दिसतील
भरपुरसारे फोटो/मार्ग दिसतील असे माबोची सुविधा वापरुन टाकल्याबद्दल धन्यवाद.
असा कठीणातील कठीण ट्रेक पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन.
>>>>> ऑर्थरसीट टोक दरीतून चढताना, पर्यटकांच्या आश्चर्याच्या नजरा अन् हातवारे जाणवत होत्या <<<<<< हा अनुभव अंगावर मुठभर मांस चढविणारा असतो.
पण नंतर मागे वळून बघताना, अरे खरेच का आपण त्या तिथुन इथवर आलो असे स्वतःसच आश्चर्यचकित करणाराही असतो.
माझ्या एका मित्राच्या बरोबर (हा मित्र आता साठीच्या पुढे आहे) हा ट्रेक करण्याचे घाटत असताना माझ्याकडून हुकले, त्यान्नी पुर्वीही केला होता, पण त्या ट्रेकचे पस्तीसेक वर्शांपूर्वीचे त्यांचे अनुभव वरील फोटो/वर्णन वाचल्यावर ताजेतवाने झाले.
इथे हा थरारक दीर्घ चिकाटीचा उद्योग मांडल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद आणि तुमच्या सह्यनिष्ठेला सलाम.
अतिषय सुरेख !!
अतिषय सुरेख !!
मस्त लेख... आवडला..
मस्त लेख...
आवडला..
रोहित ..एक
रोहित ..एक मावळा
अनिश्का.
शापित गंधर्व
मिलिंदा
दादाश्री
मार्को पोलो
जो_एस
आऊटडोअर्स
सृष्टी
मोल
limbutimbu
गिरीजा
jayant.phatak
तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं.
धन्यवाद!!!!!!! 
आत्तासुद्धा भर दुपारी द-या खो-यांमधून भटकताना भीती वाटावी, अशी गहनगूढ जावळी!!!
या रांगड्या-राकट-रौद्र सौंदर्याला खरी दाद देणा-या शिवरायांच्या vision ला मनोमन दाद द्यावीशी वाटते..
आधुनिकतेच्या अशक्य रेट्यामध्येही इथला रानवा अन् दुर्गमता टिकून राहावी, अशी शिवचरणी मनापासून प्रार्थना!!!
Pages