दार ठोठावून परतलो : भाग - ०१

Submitted by गामा_पैलवान on 1 August, 2013 - 10:07

लोकहो,

त्याचं असं झालं की अस्मादिक नुकतेच दार ठोठावून परतले. कुठचं दार म्हणून काय विचारता, अहो चक्क यमलोकाचं दार! तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना?) गुरूवार दिनांक २५ जुलै २०१३ रोजी या नरदेहास हृदयाचा जोरदार झटका आला. एका डॉक्टराच्या शब्दात : You had a nasty and severe heart attack.

सुदैवाने हानी अत्यंत मर्यादित राहिली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काय झालं त्याची चक्ष्वैसत्यम समयरेखा देतो.

स्थळ : इंग्लंडमधील ब्रायटन येथील माझं घर
दिनांक : २५ जुलै २०१३ अर्थात आषाढ कृ ३ कलियुग ५११५
वेळ : सकाळचे ०७००

०७०० :
सकाळचा पहिला चहा घेत मायबोली वाचत होतो. (कायपण सुरुवात आहे!) हा धागा वाचणे चालू होते : http://www.maayboli.com/node/44232 . नवीन संदेश वाचून झाले तोवर ०७१० झाले होते. मी दुसरे स्थळ पाहू लागलो.

०७१० : डाव्या दंडात कळ आली. वेदना वरवरच्या नसून आतून होत होत्या. कळांचे प्रमाण वाढू लागले. त्या बगल आणि कोपर यांच्या बरोबर मध्य अंतरावरून येत होत्या. पाचच मिनिटांत तीव्रता वाढली आणि कळा बगल व खांद्यामार्गे छातीकडे सरकू लागल्या.

०७१५ :
विश्रांती घेण्याच्या उद्देशाने वरच्या मजल्यावर गेलो (घर दुमजली आहे) आणि बिछान्यावर बसलो. मध्येच शौचास गेलो, मात्र आपल्याला जोर लावता येणार नाही असं वाटल्याने मागे फिरलो. परत बिछान्यावर बसलो आणि बायकोला हाक मारली. ती बाजूच्या खोलीत सकाळच्या गडबडीत होती. तिला बोलावून काय होतंय ते सांगितलं. माझ्या डोळ्यासमोर कुटुंबियांच्या हृद्रोगाचा पूर्वेतिहास नाचू लागला. तिला म्हणलो की सरळ हृदृग्णवाहिका (कार्डियाक अँब्युलन्स) बोलाव. ९९९ हा इंग्लंडमधला तातडीचा क्रमांक (इमर्जन्सी नंबर) आहे.

०७२० :
बायकोने फोन लावला. पण ती प्रसंगाच्या गांभीर्याबद्दल जरा साशंक होती. तिचीही ९९९ ळा फोन करण्याची पहिलीच वेळ होती. पलीकडून आवाज आला पुलीस, अँब्युलन्स ऑर फायरब्रिगेड?

बायकोने सांगायचा प्रयत्न केला की हा कदाचित तातडीचा प्रसंग नसू शकतो. तर सहायक म्हणाला की, मी तुम्हाला वैद्यकीय सल्लागारास जोडून देतो. तुम्ही स्वत: त्यांच्याशी रुग्णवाहिकेबद्दल बोला.

त्याप्रमाणे वैद्यकीय सहाय्यिकेस सर्व माहीती सांगितली. बायकोने फोन वर्धकावर (लाउडस्पीकर) ठेवला. माझ्या तोंडाला कोरड पडत होती. क्षणोक्षणी माझी परिस्थिती खराब होत चालली होती. मला स्पष्ट बोलता येत होतं, मात्र कुठल्याही क्षणी धाप लागल्याने माझं बोलणं बंद पडू शकेल असं सहाय्यिकेला सांगितलं. बरीचशी उत्तरे बायकोच देत होती.

०७२५ :
सहाय्यिकेने रुग्णवाहिका सोडली आहे असं कळवलं. एव्हाना मी बराच सावरलो. मी खाली आलो. मी बर्‍यापैकी ठीकपणे हिंडतफिरत होतो. वेदना छातीकडे सरकू लागल्या. डाव्या दंडाकडून छातीत शिरून आतबाहेर होऊ लागल्या. मी वेदना झटकून टाकण्यासाठी खांद्यांची हालचाल सुरू केली. त्याचवेळी आठवण आली म्हणून तोंडात विभूती टाकली. ती एका अतिशय अधिकारी व्यक्तीने निर्माण केलेली होती. आणि एव्हढ्यात दारावर थाप पडली.

०७३० :
रुग्णवाहिका आली होती. मी स्वयंपाकघरात जाऊन किल्ली आणली आणि दार उघडले. एक पुरूष (रेय् Ray) आणि एक स्त्री (टॅमझिन Tamzin) यांचा चमू उभा होता. तुम्ही रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत आहात का असा प्रश्न त्याने केला. मी होकारार्थी मान हलवत त्याचे स्वागत केले आणि आत दिवाणखान्यात घेऊन गेलो. त्याला विचारलं की जमिनीवर झोपू का. तर तो आश्चर्यचकित झाला आणि उद्गारला,

Ray : Is it you?

me : Yes.

Ray : Let's get into the ambulance

me : Yes, no worries!

असं म्हणून आत जाऊन पडलो. पडल्यावर वेदना भयानक वाढल्या. आतापर्यंत आटोक्यात होत्या त्या पराकोटीला पोहोचल्या. पुढील पंधराएक मिनिटे कशी गेली ती माझी मलाच कळली नाहीत.

आत पडल्यावर रेय्‌ने हृदालेख (ईसीजी) काढला. तो स्वच्छ आला. त्यामुळे मला भयोन्माद (panic attack) झालाय की काय असं त्याला वाटलं. त्याने बोलून दाखवलं की 'Don't panic, you are in the safest hands. You are not dying!' पण वेदना वाढतंच राहिल्या आणि छातीकडे सरकू लागल्या. छातीत कळा येऊ लागल्या.

रेय्‌ची धडपड चालूच होती. त्याने रुग्णालयात (रॉयल ससेक्स काउंटी हॉस्पिटलचे हृदयकेंद्र Royal Sussex County Hospital's Cardiac Centre) संपर्क साधून अतिदक्षतेचा इशारा दिला. रेय्‌, टॅमझिन आणि रुग्णालयातले असा एकसंघ चमू कामास लागला.

रेय्‌ने त्याचा उजवा हात ओढायला सांगितला. तो मी माझ्या डाव्या हाताने जोर लावून ओढला. मग त्याने तोच हात ढकलायला सांगितला. तोही मी डाव्या हाताने बर्‍यापैकी सहजपणे ढकलला. रेय्‌ला कळेना की खरंच मला हृदयझटका (हार्ट अ‍ॅटॅक) येतोय का ते.

तेव्हढ्यात बायकोही आत येऊन बसली. वेदनांमुळे माझी अवस्था अधिकच बिकट होऊ लागली. शेवटी मी बेशुद्ध पडायच्या अवस्थेस पोहोचलो... :

मी : मी बेशुद्ध पडतोय...! (I am passing out)
रेय्‌ : नाही, तू बेशुद्ध होणार नाहीयेस (No you are not falling unconscious)

एव्हढं बोलून होतंय तोच मी गलितगात्र झालो. माझी देहाची जाणीव मंदावली. माझ्या देहाच्या आत मी किंचित आकुंचित झालो. वेदना जरा कमी झाल्यासारख्या वाटल्या. पुस्तकात वाचल्याप्रमाणे एक जोरदार कळ येऊन सगळं शांतशांत होतं, त्या शेवटल्या कळेची वाट पाहू लागलो. पण तशी कळ आलीच नाही. कळ येवो वा न येवो पण शरीराबाहेर पडायची तयारी सुरू केली. त्यानुसार अंगावरील छिद्र शोधू लागलो. पण छिद्रही सापडेना.

हे सारं होत असतांना माझ्या चेहर्‍याचा रंग पालटून फिक्का झाला. रेय्‌ला तात्काळ गांभीर्य जाणवलं. त्याने टॅमझिनला सांगितलं की आपण रुग्णालयात जायला निघणार आहोत (Darling, we are driving!). रेय्‌ने बायकोला विचारलं की याच्या चेहर्‍याचा रंग उडालाय का. तर बायको हो म्हणाली.

असं असलं तरी माझी जाणीव पूर्णपणे शाबूत होती. बायकोला माझ्या नित्यपाठाची पुस्तकं आणायला सांगितली. तसेच इंग्लंडमधल्या एका मित्राला फोन लावून परिस्थितीची कल्पना देण्यास सांगितलं. तो मित्र तेव्हा भारतात होता, तेही सांगितलं. तेव्हा त्याच्या घरी फोन करून भारतातला क्रमांक घे अशाही सूचना दिल्या. त्याप्रमाणे ती हे सारे पार पाडून आली. मित्राची बायको नेमकी घरी सापडली. तिने मित्राला फोन करायचं कबूल केलं. त्याप्रमाणे तो करून लगेच दोन मिनिटांत माझ्या बायकोला लघुसंदेशही (एसेमेस) केला.

रेय्‌ने तोवर दुसरा हृदालेख काढून ठेवला होता. तो सतत रुग्णालयचमूच्या संपर्कात होता. तो बायकोला म्हणाला की याचं हृदय संघर्षग्रस्त आहे (His heart is struggling).

मी : मला बहुतेक उलटी होतेय...! (I might vomit)
रेय्‌ : ही पिशवी घे. (Here is the sick bag)
मी : ...धन्यवाद...! (Thanks)

पण उलटी झालीच नाही.

०७४५ (अंदाजे) :
रेय्‌ने सुमारे ८ गोळ्या भरवल्या. आणि पाण्याचा पेला तोंडास लावला. मी जेमतेम घोट घेतले आणि आम्ही भरधाव निघालो. टॅमझिनने गाडी अश्शी हाणली म्हणून सांगू! रस्त्याची वळणे जाणवत होती, पण मी काही बाहेर बघायच्या मनस्थितीत नव्हतो. सुमारे दहा एक मिनिटांत आम्ही गंतव्यस्थळी पोहोचलो.

०७५५ (अंदाजे) :
आम्ही रॉयल ससेक्स काउंटी हॉस्पिटलच्या हृदयकेंद्राबाहेर पोहोचलो. रुग्णालयसंकुल टेकडीवर असल्याने प्रत्येक वास्तूस पातळी दिली आहे. त्यानुसार आम्ही पाचव्या पातळीवर होतो. सहाव्या पातळीवर नलिकाशाळेत (कॅथेटर लॅब) वैद्यकीय चमू जय्यत तयारीत होता. रुग्णवाहिकाचमूने (रेय्‌ व टॅमझिन) डॉक्टरांना सार्‍या घटनांची कल्पना दिली.

पाचव्या पातळीवर बराच वेळ (सुमारे अर्धा तास) थांबून होतो. या वेळात काहीबाही कागदपत्रे वगैरे सिद्ध केली गेली. तत्ज्ञांची बरीच चर्चा चालू होती आणि मी वेदनेने तळमळत पडलो होतो.

एका मुलीने संहिता (स्क्रिप्ट) वाचून दाखवली. त्यानुसार माझ्या हृद्रोहिणीमध्ये विस्फारजाळी (stent) बसवण्यात येणार आहे. याच्या अयशस्वितेची शक्यता शंभरात एक असून प्रस्तुत डॉक्टर एकदाही अयशस्वी झाले नाहीयेत.

मी (केविलवाण्या स्वरात) : हे सारे मला का सांगताहात. कृपया योग्य ते करा. (Why are you telling me all this! Please do whatever you think good for me.)
ती मुलगी : पण आम्हाला सांगावेच लागते. (But we have to tell you.)
मी : अरे हां, त्या कायदेशीर बाबी! (Oh yes, that legal stuff!)

असं म्हणून लेखी प्रतीवर कशीबशी सही केली. आणि मला वर सहाव्या पातळीवर ते लोक घेऊन गेले.

जातांना बिछान्याचे एक चाक उद्वाहनाच्या जमिनीला धडकले. त्याबरोबर झटका बसला आणि मी जरा सावध झालो. हे पाहून मुख्य परिचारक (हेडनर्स) पॅट्रिकने अंगठा उंचावून सुचिह्न दर्शवले. मीही किंचित हसून दाद दिली.

०८३० (अंदाजे) :
मला नलिकाशाळेत (कॅथेटर लॅब) दाखल केले गेले. वेदना भयानक वाढल्या होत्या. पण मी सुरक्षित होतो. निदान तसं वाटत तरी होतं मला.

वेदनांना ना अंत ना पार ! मी अगतिकपणे विचारलं कोणी मला मालीश करेल का! (Can someone give me a massage ...?) कोणीच काही न बोलल्याने पुढे प्रश्न विचारला की माझं मीच मालीश करू का! (Can I do it myself ?) पण काही उत्तर नाही. माझ्या अंगात मालीश करायची शक्ती नव्हती.

वेदना कमी करायला मी मधूनच 'पेऽन' असं किंचाळत होतो. 'आईगं'ने वेदना कमी होत नव्हत्या! कोणीतरी जवळ येऊन म्हणालं की 'हे सारे लोक त्यांच्यापरीने शिकस्त करीत आहेत. त्यांना मदत व्हावी असं तुला वाटतं ना?' (They are doing their best. Would you like to join them?) मग मी आवाज बंद करून किंचाळणे चालूच ठेवले. तेव्हढाच आपला आराम. हा सारा तमाशा मुख्य उपचार चालू असतांनाच होत होता.

मुख्योपचारांचा क्रम असा होता :

०१. मला चमूची ओळख करून देण्यात आली. पण मी जाणून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. वेदना चालूच होत्या.

०२. प्रत्येकाने पुढे येऊन काय काम करणार ते सांगितले. अगदी श्मश्रूकन्येनेसुद्धा पुढे येऊन 'माझं नाव अमुक असून मी तुझे केस काढणार आहे' असे म्हणाली.

०३. डॉक्टर कपूर म्हणून एक पंचविशीची भूलतत्ज्ञा पुढे आली आणि जांघेत (की जांघेजवळ) इंजेक्शन दिले. अर्थात अगोदर काय करणार ते सांगितले. ही स्थानिक भूल होती.

०४. मुख्य डॉक्टर डीबेल्डा (Dr de Belder) होते. ते बहुतांश वेळ पर्यवेक्षक म्हणून होते होते. डॉक्टर विन (Dr Wynne वय अंदाजे पन्नाशी), डॉक्टर निलेश परीख (वय अंदाजे २५), डॉक्टर ब्लोज (वय अंदाजे ३०), असे इतर अनेक डॉक्टर लोक सोबत होते. परिचारक, सहाय्यक असे बरेच इतर लोकही होते. मला अर्थात काही दिसत नव्हतं. केवळ डॉक्टर कपूर आणि डॉक्टर विन एव्हढेच लोक लक्षात राहिले. मुख्य परिचारक पॅट्रिकही लक्षात राहिला.

०५. भूलीने काम करायला सुरुवात केली. सगळे आपल्याभोवती उभे आहेत अशी अचानक जाणीव झाली. मीही देहाबाहेर असल्याची कल्पना केली, आणि मलाही त्या चमूत कल्पनेनेच सामील केलं. मग उजव्या जांघेजवळ फेमोरल रोहिणीला छेद देण्यात आला. अर्थात अगोदर सांगण्यात आले. मी पूर्णपणे जागा होतो, पण वेदना तेव्हढ्याच होत होत्या.

०६. गुप्तांगात थोडी गरमशी हुळहूळ जाणवली. लगेच विचारलं असं ठीक आहे ना? (Is is ok to feel warm in the groin?) होकारार्थी उत्तर आलं.

०७. मग डॉक्टर विन जवळ आले आणि म्हणाले की तुला अंगभर गरमी पसरल्याची जाणीव होईल. पण काळजी नको. (You will feel warm sensation all over your body, but don't be alert. It's just a warning.) मी शांत पडून राहावं अशी सगळ्यांची इच्छा दिसत होती. मग आत रंगमिश्रीत पाणी सोडण्यात आलं. हा रंग नेहमीचा नसून क्ष-किरणांना अपारदर्शक असा बहुतेक असावा.

०८. मग फोटो (बहुधा क्ष चित्रण) काढण्यात आला. त्यात अग्रवामाधोगामी रोहिणीत (Left Anterior Descending Artery) रक्ताची गुठळी सापडली.

०९. तोवर पहिली लवचिका टोकावरील फुग्यासह (बलून कॅथेटर) तयार होती. ती फेमोरल रोहिणीतून आत सारून गुठळीपर्यंत नेली आणि गुठळी शोषून बाहेर काढली. त्याच वेळी फुगा प्रसरण पाववून रोहिणी मोठी केली गेली. मग फुगा कोमावून (कोमेजवून) नळी बाहेर काढली.

१०. तोवर दुसरी लवचिका (कॅथेटर) तयार होती. तिच्या टोकावरही फुगा होता आणि फुग्याच्या भोवताली विस्फारजाळी (stent) लावलेली होती. ही दुसरी नळी आत सारून योग्य जागी गेल्याची खातरजमा केली. मग फुगा यथायोग्य मात्रेने फुगवला. विस्फारजाळी उघडून आपल्या जागी घट्टपणे सुस्थिर झाली. मग फुगा कोमावून लवचिका काढून घेण्यात आली.

११. याच सुमारास माझ्या वेदना एकदम थंडावल्या. गुठळी काढल्याचा मी तर्क बांधला. छाती आणि धड शरीरापासून अलग होऊन जराशी थरथरून परत जागच्याजागी घट्ट बसल्याची जाणीव झाली. अशीच जाणीव रात्री झोपेतही झाली. त्या वेळी बेंबीखालचे धड थरथरून स्थिर झाले. दोन्ही वेळेस स्थूलदेह हलला नव्हता, तर केवळ लिंगदेहाचे भाग थरथरले होते.

१२. लगेचच डॉक्टर विन जवळ आले आणि सुवार्ता पुरवली (I took off the block and put a stent). छातीतील वेदना पार थांबल्या होत्या. दंडाजवळील वेदना खूप कमी झाल्या होत्या. हळूहळू त्याही नाहीश्या होऊ लागल्या. केवळ बगलेत व दंडात त्वचेजवळच्या स्नायूंच्या किरकोळ वेदना चालू राहिल्या. त्यांची काही चिंता नव्हती.

०९०० :
मला नलिकाशाळेतून पाचव्या पातळीवरील हृद्विभागी (कार्डियाक वॉर्ड) आणण्यात आलं. माझे हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वसन, इत्यादि आरोग्यमापे (हेल्थ पॅरामीटर्स) व्यवस्थित होती. अवघ्या दोन तासांत गाम्याचा जणू नवा जन्मच झाला होता.

या सर्व घडामोडी होत असतांना अगदी ०७३० वाजता रुग्णवाहिकेत शिरण्यापासून खाली हृद्विभागात येईपर्यंत 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप चालू होता. कधी प्रयत्नपूर्वक तर आधी आपसूक होत होता. मध्येमध्ये थांबलाही होता. पण तसं लक्षात येताच सुरू करीत होतो.

प्रमुख कथा सांगून झाली आहे. उर्वरित गोष्ट नंतरच्या भागात. आता प्रश्न येउद्या!

आपला नम्र,
-गामा पैलवान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानी,

>> प पू गुगलबाबा भाषांतरकार एकदम बोगस निघाले की!!!!

आहे, ते त्यांचे बालवयातले बोबडे बोल आहेत. Biggrin एकदा वयात आले की व्यवस्थित वागतील अशी आशा आहे.

आ.न.,
-गा.पै.

संकटावर मात केल्याबद्दल शुभेच्छा. काळजी घ्या. तुम्ही ज्या सहजपणे हे सर्व लिहिले आहे ते तर फारच विशेष वाटले. या सकारत्मकतेचेचाही तुम्हाला लवकर एकदम बरे होण्यास फायदा होईल असे वाटते. >>> +१००.

पुनर्जन्मच झालाय की तुमचा .....

तुम्हाला निरामय दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना.

माननीय गामा पैलवान सप्रेम नमस्कार
प्रथम - ‘चतुर्विध-पुरुषार्थ-प्राप्तिस्तव आपणास उत्तम आरोग्य लाभो !!!’ अशी मी त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करतो.
.
.
.
तुम्ही ‘विल स्मिथ’चा ‘आय्‌ एम्‌ लिजन्ड’ हा चित्रपट पाहिला आहे का हो? त्या चित्रपटात - पृथ्वीवर एका संसर्गजन्य जिनेटिक आजाराने थैमान घातलेले असते. याची बाधा झालेली व्यक्‍ती दिवसा सूर्यप्रकाशात बाहेर पडत नसते. पण ती रात्री बाहेर पडून इतरांवर हल्ला करत असते व चावा घेतल्यानंतर निरोगी व्यक्‍ती देखील या आजाराने बाधित होऊन त्यांच्या कंपूत मिसळत असते. असे होत होत शेवटी एक व्यक्‍ती (नायक) व एक कुत्रा शिल्लक राहतो. नंतर तो कुत्रादेखील बळी पडतो. पण शेवटी लढा देऊन हा नायक त्यातून सहीसलामत बाहेर पडतो.
तुमची http://www.maayboli.com/node/44993 वरील उपस्थिती पाहून या चित्रपटाची आठवण आली. उपरोक्‍त चित्रपटातील नायकाप्रमाणेच प्रतिकूल परिस्थितीत (नुकतेच दार ठोठवून परत आला असतानाही) तुम्ही योग्य लढा दिलात व सर्व मुद्द्यांचे अतिशय योग्य प्रकारे खंडन केले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.....

हरिहर, लेजेंडच पात्र, सहीसलामत बाहेर नाही पडत, तुम्ही सिनेमा शेवट पर्यंत पाहिला असेल तर. Happy

ठीक ! नाण्याची एक बाजूने तुम्ही म्हणता तसे नायक अजून सहीसलामत बाहेर पडला नसेल कदाचीत, पण नाण्याची दुसरी बाजू पाहता ‘हिंदूधर्मद्वेषरूपी व्हायरल इन्फेक्शनची आम्हा हिंदूंना लागण झालेली आहे हे आपणास मान्य आहे’ असे त्यासाठी गृहित धरावे लागेल.
(रचक्याने - जर बापू दोषी असतील तर धर्मशास्त्रनियमानुसार त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट शिक्षा होणे गरजेचे आहे असे मी म्हणेन.)

लोकहो,

आज तृतीया आहे, तर काल तृतीयेचं श्राद्ध होतं. ग्रंथ आटोपला असता तर काल श्राद्ध घातलं गेलं असतं. तशी पाळी न आल्याने अस्मादिक स्वत:वर खूष आहेत! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

मी सांगितले तर चालेल का ?.....
ज्या ठिकाणी श्राद्ध करावयाचे त्या ठिकाणी अपराह्ण काळी जी तिथी येते ती तिथी श्राद्धासाठी घ्यावी.
दिनमानाचे पाच समान भाग केले असता - १) प्रातः, २) संगव, ३) मध्याह्न, ४) अपराह्ण व ५) सायाह्न असे पाच कालावधी मिळतात. सध्या (दाते पंचांगानुसार सोलापूर येथील) रवि उदय सकाळी ६ वाजून २८ मिनीटे व रवि अस्त सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटे असा आहे. त्यामुळे सध्या दिनमान १२ तास ८ मिनिटाचे म्हणजेच ७२८ मिनिटाचे आहे. ७२८/५(भाग) = १४५.६ (मिनीटांचा एक भाग), १४५.८*३ भाग (प्रातः+संगव+मध्याह्न) = ४३६.८. म्हणजेच अपराह्ण काळ; { सकाळी ६ वाजून २८ मिनीटे + ४३६.८ मिनिटे (७ तास १६ मिनिटे)} दुपारी १ वाजून ४४ मिनीटांपासून ४ वाजून १० मिनीटांपर्यंत (१ वा ४४ मि + १४५.८ मि.) आहे.
२३ तारखेला अपराह्ण काळाच्या प्रारंभी म्ह. दुपारी १ वाजून ४४ मिनीटाला सोलापूर येथे चतुर्थी तिथी आहे. (या दिवशी २ वाजून ५० मिनीटांपर्यंत चतुर्थी असून त्यानंतर पंचमी चालू होते.) त्यामुळे दातेपंचांगामध्ये पंचमी श्राद्ध (येथे पंचमी महालय) दुसर्या दिवशी म्हणजेच २४ तारखेला दिलेला आहे.
.
.
वरील गणित करून आपल्या येथे अपराह्ण काळी कोणती तिथी येते पाहावे व त्यानुसार श्राद्ध करावे. तथापि वार्षिक पितृश्राद्धाची तिथी पंचमी असल्यामुळे महालय पंचमीलाच केला पाहिजे असे काही नाही. खरं तर या दोन तिथींचा काहीही संबंध नाही. महालयातील ठराविक तिथी ठराविक कारणांसाठी नियत आहेत. जसे की, द्वादशी घराण्यातील संन्याशासाठी, चतुर्दशी शस्त्राने मृत झालेल्या पितरांसाठी नियत आहे म्हणून हे दिवस सोडून कोणत्याही साोइस्कर दिवशी महालय करावा.

संपादन २४ सप्टेंबर १३, २२.५३
अखेर कोंदण मिळाले Happy
उपरोक्‍त मजकूर http://www.maayboli.com/node/45354 या धाग्यावर काॉपीपेस्ट केलेला आहे.

वत्सलाताई, आता एवढे टाइपलं आहे तर राहू दे. पुढे चुकून-माकून महालयासंदर्भात धागा उत्पन्न झाला तर तेथे पाेस्ट करीन. ताोपर्यंत आपण पूर्वीची शंका तेथे लिहाल का?

शंकानिरसन केल्याबद्दल धन्यवाद हरिहर!

गामा पैलवानांच्या बाफवर अवांतर विषय नको म्हणून मी माझा वरील प्रतिसाद संपादित केला होता. तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्हीही तुमचे वरील दोन्ही प्रतिसाद संपादित कराल का?
पुन्हा एकदा धन्यवाद!

गामा पैलवानांच्या बाफवर अवांतर विषय नको म्हणून मी माझा वरील प्रतिसाद संपादित केला होता.
<<
इतकी सारासार विचारबुद्धी व आकलनक्षमता असती, तर हरिहरानी इथे आसाराम आणला नसता.
(संपादनात वरील वाक्य बोल्ड करण्यात आलेले आहे. कारण खाली उत्तर देणार्‍या महान धर्मरक्षकांनी बगल किंवा सोप्या भाषेत काख उघडी केली आहे. श्राध्दकर्मात काखा वर करून दाखवणे म्हणजे काय हो हरिहर?)

पण काय करणार? हिंदुत्वाची इंगळी अशी डसली आहे, की सगळी सार असार विचार बुद्धी व आकलनक्षमता झापडबंद करून गहाण टाकलेली असली, की झॉम्बी अ‍ॅटॅकवाल्या पिक्चरमधले हीरो आपणच असल्यागत स्वप्ने पडू लागतात..

अवांतरः
मी-भास्करांना अ‍ॅडमिन यांनी 'मावळवल्यावर' हरिहर दिसू लागले. लवकरच यांचेही हरि-हरण होणार की काय?
(शंकेखोर) इब्लिस

इतकी सारासार विचारबुद्धी व आकलनक्षमता असती, तर याच धाग्यावर इब्लिसांनी खालील इब्लिस प्रतिक्रीया दिली नसती.

| 2 August, 2013 - 07:52
लगेच स्टेंटिंग झाल्याने हृदयाला नुकसान झालेले नाही. अभिनंदन!
पुढे काळजीपूर्वक रहा. सिगारेट बंद करा. आल द बेस्ट

डॉक्टरसाहेब !!! कमीत कमी ह्या धाग्यावर तरी तुम्ही मनापासून शुभेच्छा द्यावयास हव्या होत्या.

एक तर हा धागा हिंदूधर्मावर श्रद्धा असणार्याचा आहे. दुसरे म्हणजे गामांना येथे मनःपूर्वक शुभेच्छा देणार्यांची हिंदूधर्मावर श्रद्धा आहे गृहित धरलेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे योगायोगाने वत्सलाताईंनी पंचमी महालयाची शंका विचारली होती त्यामुळे या सर्वांना जाता जाता माहिती मिळावी म्हणून मी उत्तर दिलेले होते.)

इब्लिस तुम्हाला खरोखरच सारासार विचारबुद्धी व चांगली आकलन क्षमता असेल आणि त्याचबरोबर हिंदूधर्मावर आस्था असेल तर लोकांना महालयाची माहिती व्हावी म्हणून महालयावर एखादा धागा काढा. मी येथे सपशेल माफी मागून तुमच्या धाग्यावर ती माहिती पोस्ट करतो.

अवांतरः
मी-भास्करांना अ‍ॅडमिन यांनी 'मावळवल्यावर' हरिहर दिसू लागले. लवकरच यांचेही हरि-हरण होणार की काय?
(शंकेखोर) इब्लिस>>>>>>>

(शंकेखोर)इब्लिस किती विघ्नसंतोषी आहात हो ?
काय करणार तुम्ही नावच तसे धारण केले आहे. त्यामुळे तुम्हाला नावाप्रमाणेच वागावे लागते.
इब्लिस ! शब्दकोश अर्थ - १) दानव, सैतान.

हरिहर,
एक,
या प्रकारचे संभाषण पुढे विपुत करू या.

दुसरे,
डॉक्टरी सल्ला दिला आहे वर. बेगडी शुभेच्छा नव्हेत.

तिसरे,
एक तर हा धागा हिंदूधर्मावर श्रद्धा असणार्याचा आहे....इ.
<<
हास्यास्पद असण्याची लिमिट असते काहीतरी.

अरे हो,
चौथे,
'इब्लिस'चा अर्थ इथे मिळेल.

ता.क.
अरे ते मुख्य मुद्दाच विसरलो!

बगला देणे बंद करा. तुमचे अवांतर आसाराम अन आय अ‍ॅम लीजंड बद्दलचे होते. त्याबद्दलची ती माझी पोस्ट आहे, तुमच्या कर्मकांडाबद्दल नव्हे. मराठी लिहिता वाचता येणार्‍या किमान इंटेलिजन्स असलेल्या कुणालाही इतपत उमजतेच उमजते.

हरिहर, ह्या धाग्यावरची निदान माझी तरी प्रतिक्रिया आणि शुभेच्छा एक हिंदू म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून आणि एक मायबोलीकर म्हणून असलेल्या नात्याने होती Happy

बाकी मला असं वाटतं की ते श्राद्ध वगैरेची माहिती http://www.maayboli.com/node/8676?page=6 इकडे किंवा अजून कुठे योग्य वाटल्यास हलवा. इथे आनगापै सुखरुप आहेत तर त्यांच्या निमित्ताने तरी ही चर्चा कश्याला? आणि कुणाला खरोखर ही माहिती हवी असेल तर योग्य टायटल खाली नसल्याने मिळणारही नाही. वत्सलानेही म्हणूनच तिची पोस्ट बदलली असावी. अर्थात तिची आधीची पोस्ट मी वाचली नाहिये.

इब्लिस
एक, या प्रकारचे संभाषण पुढे विपुत करू या.
यावर बाोलण्यासारखे काही नाही.


दुसरे, डॉक्टरी सल्ला दिला आहे वर. बेगडी शुभेच्छा नव्हेत..>>>

आपल्या पेशंटचे हित पाहणारा सच्चा डॉक्टर आपल्या पेशंटची अशी सार्वजनिक चिरफाड करत नसतो.

तिसरे,
एक तर हा धागा हिंदूधर्मावर श्रद्धा असणार्याचा आहे....इ.>>>

मी असे कुठेच म्हटलेलेच नाही. तुम्ही माझ्या शब्दांचा विपयार्यास करत आहात.
मी म्हटले की शुभेच्छा देणार्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे हे गृहित धरून त्यांच्यासाठी योगायोगाने मुददा उपस्थित झाला म्हणून सदर माहिती देत आहे. ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे त्यांनीच शुभेच्छा दिलेल्या आहेत असे कुठेच म्हटलेले नाही.

पण जर बहुसंख्य शुभेच्छा देणार्यांनी जर ‘आमची हिंदूधमार्मावर श्रद्धा नाही’ अशा प्रतिकि्रिया दिल्या तर मात्र त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवल्याबद्दल त्या सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ करावे असे मी अगोदर लिहून ठेवतो.

अरे हो, चौथे,
'इब्लिस'चा अर्थ इथे मिळेल.
तुमचे कुराण देखील म्हणत आहे की, IBLIS: He is also known as Shaitan (Satan). See Shaitan. See Holy Qur’an,

ता.क.
अरे ते मुख्य मुद्दाच विसरलो!
बगला देणे बंद करा. तुमचे अवांतर आसाराम अन आय अ‍ॅम लीजंड बद्दलचे होते.>>>>>

खर तर हे तुम्हाला लागू हाोते. आपणच माझ्या शब्दांना बगल दिलेले असून लाोकांचा गैरसमज करून देत आहात. मी ‘आसाराम अन आय अ‍ॅम लीजंड’ असे म्हटलेले नाही. उलट जर ते दोषी असतील तर त्यांना दुप्पट शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. त्यामुळे तुम्हीच ‘बगला देणे बंद करा’ असे मला नाइलाजाने म्हणावे लागत आहे.

ता.क.
अरे ते मुख्य मुद्दाच विसरलो! >>>>

आणि बरच काही विसरला आहात.
इब्लिस किती विघ्नसंतोषी आहात हो ? या प्रश्नाला सोइस्कर बगल दिलेली आहे.

//Quote:

हरिहर | 22 September, 2013 - 15:48

तुम्ही ‘विल स्मिथ’चा ‘आय्‌ एम्‌ लिजन्ड’ हा चित्रपट पाहिला आहे का हो? त्या चित्रपटात - पृथ्वीवर एका संसर्गजन्य जिनेटिक आजाराने थैमान घातलेले असते. याची बाधा झालेली व्यक्‍ती दिवसा सूर्यप्रकाशात बाहेर पडत नसते. पण ती रात्री बाहेर पडून इतरांवर हल्ला करत असते व चावा घेतल्यानंतर निरोगी व्यक्‍ती देखील या आजाराने बाधित होऊन त्यांच्या कंपूत मिसळत असते. असे होत होत शेवटी एक व्यक्‍ती (नायक) व एक कुत्रा शिल्लक राहतो. नंतर तो कुत्रादेखील बळी पडतो. पण शेवटी लढा देऊन हा नायक त्यातून सहीसलामत बाहेर पडतो.
तुमची http://www.maayboli.com/node/44993 वरील उपस्थिती पाहून या चित्रपटाची आठवण आली. उपरोक्‍त चित्रपटातील नायकाप्रमाणेच प्रतिकूल परिस्थितीत (नुकतेच दार ठोठवून परत आला असतानाही) तुम्ही योग्य लढा दिलात व सर्व मुद्द्यांचे अतिशय योग्य प्रकारे खंडन केले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.....

//Unquote.

मला वाटते इब्लिस व गा पै या दोघांसाठी एक स्वतंत्र धागा उघडला जाणे आवश्यक झालेले आहे. त्यांचे जे काही जिव्हाळ्याचे विषय असतील, हिंदूत्ववाद, धर्म, इतिहास, संस्कृती, रुढी, वेद, समाज, राजकारण त्या सर्वांवर त्यांना एकत्रीत स्वरुपात एकाच ठिकाणी तुफान रणकंदन करता येईल.

तुमचे अवांतर आसाराम अन आय अ‍ॅम लीजंड बद्दलचे होते.>>
च्याऐवजी तुम्ही
‘‘तुमचे अवांतर आसारामच्या धाग्यावरील ‘गामा_पैलवान अन आय अ‍ॅम लीजंड’ बद्दलचे होते.’’ असे म्हणावयास हवे होते.
आय अ‍ॅम लीजंड मी गापैच्या अनुषंगाने म्हटलेले आहे. आसारामबापूंच्या अनुषंगाने नाही.

आणि म्हणूनच मी म्हटले की विपर्यास करत आहात.

लाोकस्‌ !! पाहा इब्लिस काय म्हणतात ते.

इब्लिस | 22 September, 2013 - 20:55
दुसरे,
डॉक्टरी सल्ला दिला आहे वर. बेगडी शुभेच्छा नव्हेत.>>>

म्हणजेच इब्लिसखेरीज आम्ही सर्वांनी बेगडी शुभेच्छा दिल्या आहेत.

बेफी,
लवकरच मा. अ‍ॅडमिन 'इब्लिस' नावाचा स्वतंत्र मायबोली ग्रूप उघडणार आहेत, अशी 'आतली' बातमी 'उडत उडत' माझ्या कानावर आलिये. त्या ग्रूपमधे हवे ते धागे काढता येणारेत. तुम्हीही काढा. Wink

असो.

आज विकेंडामुळे रोजच्या माबो 'फिक्स' ला मुकलो म्हणून इथे माझे नर्तन सुरू आहे. (नाचण्याचा संदर्भ इतरत्र)

***

हरिहरा,

बोलण्यासारखे काहीच नव्हते उरलेले म्हणे?

अन हा प्रतिसाद म्हणजे शब्दच्छल, इकडच्या बोटावरील थुंकी तिकडच्या बोटावर करणे इ. चे टेक्स्टबुक एक्झाम्पल. अगदी शासकीय सेवेतील लिपिकाच्या तोडीस तोड म्हणता येईल असा.
असो.

ते काखा वर करण्याचं श्राद्धकर्म पितृपक्षानिमित्ताने योग्य जागी लिहिणार का? प्लीज?

तुमच्या सोबत आयडी हाराकिरी करण्याची माझी इच्छा नाही. तुम्हास हरिहरण होण्याबद्दल शूभेच्छा.

अहो हरिहर, तुम्ही जशा हिंदुत्ववादी भूमिकेतून :प्रथम - ‘चतुर्विध-पुरुषार्थ-प्राप्तिस्तव आपणास उत्तम आरोग्य लाभो !!!’ अशी मी त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करतो:" अशा शुभेच्छा दिल्यात तशाच इब्लिसांनी त्यांच्या डॉक्टरी धर्माला जागून शुभेच्छा दिल्या. त्यात अभिनंदन आणि आल द बेस्ट या दोन प्रचलित शुभेच्छादर्शक शब्दांचा समावेश आहे.

<दुसरे म्हणजे गामांना येथे मनःपूर्वक शुभेच्छा देणार्यांची हिंदूधर्मावर श्रद्धा आहे गृहित धरलेले आहे> या वाक्याच्या उत्तरार्थ आलेल्या एकाच प्रतिसादानंतर तुम्हाला :"ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे त्यांनीच शुभेच्छा दिलेल्या आहेत असे कुठेच म्हटलेले नाही. " असा अर्थ घुसवावा लागला यातच काय ते आलं.

<<"पण जर बहुसंख्य शुभेच्छा देणार्यांनी जर ‘आमची हिंदूधमार्मावर श्रद्धा नाही’ अशा प्रतिकि्रिया दिल्या तर मात्र त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवल्याबद्दल त्या सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ करावे असे मी अगोदर लिहून ठेवतो.">>>

आमची मने मोठीच आहेत, काळजी नसावी. तुमचे मन मोठे करता आले तर पहा. शुभेच्छांमागचाही धर्म पाहणारी विचारसरणीच पाहायची राहिली होती.

डाॉक्टरसाो प्लीज? कशाला म्हणता? तुम्ही नुसते यंदा महालय करण्याचा विचार आहे असे नुसते म्हणा केवळ तुमच्यासाठी ‘ते काखा वर करण्याचं श्राद्धकर्म पितृपक्षानिमित्ताने योग्य जागी तर लिहितोच पण तुम्ही म्हणाल त्यादिवशी महालयासाठी विद्वान ब्राह्मणांची टीम पाठवून देतो. त्यांना फक्‍त सव्वारूपाया दक्षिणा द्या. एकदा करून तर पाहा.
शुभरात्री

भरत मयेकर | 22 September, 2013 - 23:40>>>
इब्लिसांनी त्यांच्या डॉक्टरी धर्माला जागून शुभेच्छा दिल्या. त्यात अभिनंदन आणि आल द बेस्ट या दोन प्रचलित शुभेच्छादर्शक शब्दांचा समावेश आहे.>>>>>>>
अहो मयेकरजी ! कोणा सामान्याच्या नाहीत तर इब्लिसांच्या शुभेच्छा आहेत त्या. आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यावरून जाणार आणि कळणार्याला बरोबर कळणार. (कुणी सांगावे त्यांनी त्या स्टेंटवाल्या डाॉक्टरचे ‘अभिनंदन’ केले असेल आणि आगामी इब्लिस v/s गा.पै स ‘आल द बेस्ट’ म्हटले असेल ? हत्ती-हत्तींची लढाई आहे ती. आमच्यासारख्या कोल्ह्याच्या बस की बात नाही.)

<<एक तर हा धागा हिंदूधर्मावर श्रद्धा असणार्याचा आहे. दुसरे म्हणजे गामांना येथे मनःपूर्वक शुभेच्छा देणार्यांची हिंदूधर्मावर श्रद्धा आहे गृहित धरलेले आहे >>
माफ करा मला हे माहीत नव्हतं.

मी पैलवानांना दिलेल्या शुभेच्छा एका माणसानं दुसर्‍या माणसाला द्याव्यात इतक्या साध्या आहेत. हा धागा हिंदू किंवा कोणत्याही धर्माशी निगडित अस्ल्याचं कळलं असतं तर त्याच शुभेच्छा त्यांच्या विपूत जाऊन दिल्या असत्या.
पैलवानांचा हा लेख हा त्यांच्या स्वतःच्या अनुभवाचं कथन आहे. त्यात त्यांच्या श्रद्धेनं त्यांना मनाचा समतोल राखू दिला आहे असं दिसतं. ह्याच्याशी मला हिंदू धर्माचा संबंध लावता न आल्याने मी अनवधानाने इथे शुभेच्छा दिल्या आहेत.

पैलवानांनी खरच सांगावं की हा धागा हिंदूधर्मावर श्रद्धा असणार्याचा आहे आणि त्यांना येथे मनःपूर्वक शुभेच्छा देणार्यांची हिंदूधर्मावर श्रद्धा आहे गृहित धरलेले आहे.
मी माझ्या शुभेच्छा पुन्हा एकदा त्यांच्या विपूत देऊन येईन.
जो हिंदू धर्म इथे किंवा सध्या कुठेही अपेक्षित आहे, तो कदाचित माझा नसेल.. किंबहुना तो माझा नाही.

माझा किंवा कुणाचाही धर्म अन त्याचं माझ्या वकुबाप्रमणे करीत असलेलं पालन ही एक अत्यंत खाजगी बाब आहे.. माझी अन त्या कुणाचीही.
इथे (मायबोलीवर) चाललेल्या धर्माच्या धांदोट्यांशी सुताचाही संबंध येऊ नये ह्या प्रामाणिक हेतुनं टाकलेली ही पोस्ट आहे.

दाद | 23 September, 2013 - 12:12 नवीन
एक तर हा धागा हिंदूधर्मावर श्रद्धा असणार्याचा आहे. दुसरे म्हणजे गामांना येथे मनःपूर्वक शुभेच्छा देणार्यांची हिंदूधर्मावर श्रद्धा आहे गृहित धरलेले आहे >> माफ करा मला हे माहीत नव्हतं.>>>>>>
माफ करा दादजी आपण केवळ पूर्वार्ध लिहिलात त्यामुळे गैरसमज होत आहे.

घटना अशी -
वत्सलाताईंनी पंचमी महालय कधी करावा असा प्रश्न गापैंना येथे विचारला होता. त्यावर मी पंचमी महालयासंदर्भातील उपराोक्‍त पोस्ट लिहिली. मी उत्तर द्यायला व वत्सलाताईंनी तो संपादीत करून काढून टाकायला एकच गाठ पडली. पण माझ्या उत्तरावर; इब्लिसांनी ‘मला सारासार विचारबुद्धी व आकलनक्षमता नसल्यामुळे मला कुठे काय लिहावे हे कळत नाही’ अशा प्रकाराचे माझे शल्यकर्म केले. त्यावर मी प्रतिक्रिया की -
शुभेच्छा देणार्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे हे गृहित धरून त्यांच्यासाठी योगायोगाने मुददा (महालयाचा प्रश्न) उपस्थित झाला म्हणून सदर माहिती देत आहे. ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे त्यांनीच शुभेच्छा दिलेल्या आहेत असे कुठेच म्हटलेले नाही.

मी पुढे असेही म्हटलेले आहे की -
पण जर बहुसंख्य शुभेच्छा देणार्यांनी जर ‘आमची हिंदूधमार्मावर श्रद्धा नाही’ अशा प्रतिकि्रिया दिल्या तर मात्र (या माहितीचा त्यांना उपयोग नसल्यामुळे) त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवल्याबद्दल त्या सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ करावे असे मी अगोदर लिहून ठेवतो.

हरिहर, वरील खुलाशाबद्दल धन्यवाद. तसेच मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे.

वत्सला, अहो, मी श्राद्धाचं गमतीने बोललो होतो! Lol कृपया गैरसमज नसावा!

आ.न.,
-गा.पै.

Pages