है स्साला....
अभी अभी हुआ यकीं
के आग है ...
तीरांचं कसं असतय बघा, तीर तीर पे लिखा है निशान-ए-दिलका नाम!
म्हणजे काही तीर अगदी जवळून... कानाला वारा देऊन जातात... काही चक्कं वळसा घालून... पण आपलं नाव लिहिलेला तीर? तो पत्ता शोधत येतोय... तुम्ही कुठे खाचपटीत, तळघरात बसा... काही खरं नाही.. घुसायचं तेव्हा घुसतो, आणि करायची ती तबाही करतोच.
आयुष्यं समृद्धं करणारे तीर ते नव्हेत जे कानावर मोरपीसाची झुळुक देऊन पसार होतात... आयुष्यं समृद्धं करणार्या तीरांना दिलावर झेलायची ताकद हवी... तरच मनाच्या मातीत झालेल्या हळवेल्या, जखमेत... सख्यं रुजतं... काळजाचं खत-पाणी घालून वाढवायचं, जोपासायचं... ओळखीचा फुलोरा येतो.. आठवणींचे घोस घमघमतात.
टोकावर अंगार घेऊन फिरणार्या तीरांपैकी एक अत्रंग तीर म्हणजे शशांक... ज्याला त्यानं निशाण बनवलं...त्याचं काही खरं नाही.
अगदी खरं सांगायचं तर आधी, माझ्यासाठी शशांकपेक्षा माझी सखी... त्याची सहचरिण माझ्या अधिक जवळची.
शशांक भेटला तो म्हणजे सगळ्या सगळ्यात प्रचंड लुडबुड करणार्या अवखळ पोरासारखा. त्यानं पाय ठेवला नाही असा दगड नसेल सिडनीत... लिटरली. शशांक म्हणजे कशालाही ’हो करूयाच’ म्हणणारा, वाहून जाणारा... शशांक म्हणजे कटी पतंग... त्याचा मांजा हातात घट्टं धरून फिरकीसकट जमिनीवर पाय रोवून सखी.... शशांक म्हणजे घरातल्या दोन वासरांत.. कायम शिंग मोडून शिरण्याच्या प्रयत्नात... एक तिसरं मोठ्ठं वासरू.... सगळ्यात हट्टी आणि अवखळ.
आधी माझ्यासाठी शशांक फक्तं सखीचा नवरा होता.... हो, खोटं कशाला बोलू...
ह्या पठ्ठ्याला अनेक कार्यक्रमांमधून राबताना बघितलाच होता... झाडलोटीपासून, धमक्यां आणि अरेरावीपर्यंत सगळं... कार्यं सिद्धीला न्यायला जे काही आवश्यक आहे ते सगळं करण्यात... शशांक साठे होतेच... अनेकदा अनेकांना मिळून एकटाच पुरायचा. त्या एव्हढ्याशा जीवाच्या डरकाळ्या गगनभेदी असायच्या.
येता-जाता काहीतरी भन्नाट कोट्या करणार्या ह्या फकिराला, सगळं सगळं आपणहून मिठ्या मारायला यायचं... काहीही भिडायचं त्याला...
छानशा कविता, चपखल व्यक्तीचित्रण, आत्मचरित्रं, गाणं, अप्रतिम प्रवासवर्णन, सुंदर चित्रं...
अजून झालंच तर किट्टं काळ्या आभाळातली तिरपी चंद्राची कोर, लव-लव पात्याचा माळ, समुद्राची गाज... गोड मिट्टं बासुंदी, कितव्यांदाही दिलेला चहा, काहीही चमचमित...
... एखादी गिर्रं गिरकी, शिर्रं शिरशिरी, अगदी चुर्रं फोडणी सुद्धा...
रोजच्या साध्या-सुध्या आयुष्यातला प्रत्येक क्षणही त्याला भेटल्यावर "... क्या बात है" म्हणूनच पुढे जात असणार.
प्रत्येक क्षणाच्या कानात आनंदाची जादुई फुंकर घालण्याची मजबुरी घेऊन आल्यासारखा शशांक नावाचा फकीर...
फकीर अशासाठी की ह्यातलं काहीही त्याला फार वेळ धरून ठेऊ शकायचं नाही.
कधीतरी त्याला म्हटलं... इतकं वाचतोस, छान विचार करतोस, शब्दांचं भांडारही आहे... लिहीत का नाहीस?
"... मग? तू काय करशील?" इतकं सहज मला आपटून गेलाही अजून कुणालातरी कल्हई करायला.
त्याचं बरोबरच. लिहिण्या-बिहिण्याचं किडुक-मिडुक काम हे लेखक-लेखिकांचं... त्या सगळ्या लेखक मंडळींची मोट बांधून, सिडनीकरांच्या समोर ठेवण्याचा एक कार्यक्रम केला की शशांक साठे धन्य व्हायचे. मग "काहीतरी केलं" असं वाटायचं त्याला.
काय करायचं ते असं मोठ्ठं, उदात्तं, किमान दहा दगडांवर एकाचवेळी पाय ठेऊन, काय ते. ते करून झालं की दुसर्या कशाची तरी मोट बांधायला हा निघाला.
आपल्या तसल्याच एका अत्रंग मित्राच्या नादी लागून लिहिलाच असता तर "झेंडूची फुले" नंतर "अफुची बोंडे" म्हणून वात्रट कवितासंग्रहं काढला असता..
मी वाजवलेल्या मैफिलींत त्याला आमोरी-सामोरी असा बघितलाच नव्हता कधी. नेहमी भारतातून येणार्या कलाकारांचं हवं-नको बघण्याच्या, एक झक्कास कार्यक्रम सिडनीकरांना देण्याच्या उदात्तं कार्यात गुंतलेल्या ह्या “उडात्त” माणसाला मी, समोर एका जागी बसून कार्यक्रम बघतोय, ऐकतोय असा बघितलाच नव्हता.
मध्यंतरी भारतातून आलेल्या सानिया पाटणकरांच्या कार्यक्रमाला दिसला पठ्ठ्या… समोर ऐकायला एका जागी बसलेला दिसला. कार्यक्रम घरगुती म्हणून का काय पण त्या कार्यक्रमाचा दगड कसा काय कोण जाणे, पण ह्याच्या पायाखालून निसटला होता.
श्री अन पुरिया धनाश्री गायल्या बाई. सखी तेव्हा भारतात, म्हणून हा एकटाच उंडारत होता. मैफिल सुरू झाली आणि दहाच मिनिटांत माझ्या लक्षात आलं की, मीच काय पण बाईसुद्धा निव्वळ ह्याच्याचसाठी मैफिलीत आहेत ह्याबद्दल त्याच्या चेहर्यावर अपरंपार खात्री दिसतेय. एखाद्या नवाबासारखा बसला होता.
हर एक हरकत, मुरकी, आलाप, तान... जणू त्याच्याचसाठी खुडल्यासारखी नेमकी दाद त्याच्याकडून येत होती... माझ्याही नकळत मी त्या दिवशी ह्या पठ्ठ्यासाठी वाजवलं... सानियाबाईंचं त्या जाणे.
"....ही चोरीला गेली तर मी जबाबदार नाही... आत्ताच सांगून ठेवतो", माझ्या एका सुंदरशा पर्सकडे बघून आजारपणात कीमोसाठी लॉनमॉवर फिरवलेल्या आपल्या डोक्यावरून हात फिरवीत शशांकनं माझ्या गाडीत बसता बसता सांगितलं.
"... अरे घरी गेल्यावर एखादी प्लॅस्टिकची पिशवी दे, ही रिकामी करते... तुझ्या प्रिय बायकोच्या वस्तू ह्यात ठेवूया... संध्याकाळी आली की दे..." यडचापपणे बोलतच रहाणार्याकडे बघण्याची एक विशिष्टं नजर असते त्या नजरेने माझ्याकडे बघत त्याने मला हातानेच थांबवलं. पर्सं मस्तपैकी मांडीवर घेऊन लाडिकपणे त्यावरून हात फिरवीत म्हणाला, "... ए... ही पर्स मी माझ्यासाठी म्हणतोय... बायकोसाठी नाही. तिचं-तुझं काय ते तुम्ही बघून घ्या".
मी गाडीसकट पडत होते.
माझी गचांडी धरलेल्या ह्या पठ्ठ्यानं मग नको नको म्हणताना बर्याच गोष्टी माझ्याच नकळत माझ्या गळी उतरवल्या असणार. बाकीचं जाऊदे... निव्वळ शशांकच्या राज्यात चालत नाही म्हणून त्याच्या समोर तरी मुकेशला वाईट म्हणायचं थांबवलं मी... मुकेशचीच बिचार्याची हरकत नसती एकवेळ... पण शशांक? शशांकच्या राज्यातून हद्दपारीची कल्पनाच करवली नाही, मला.
आता? आता तर त्याला मी मनात म्हटलेलंही कळेल हे समजून त्याच्या अपरोक्षही मुकेशला छानच म्हणावं लागतय.
शशांकनं आपलं बोट धरलं हे आपल्याला कळेपर्यंत आपण त्याच्या कवेत असतो... हा माझ्यासारखाच बहुतेकांचा अनुभव असणार.
माझी शौर्याची व्याख्या जरा वेगळी झालीये...अन ती सुद्धा शशांकनं घडवून दिलेली.
आमच्या गेल्या वर्षीच्या नोव्हेम्बरच्या काव्य-गोष्टींच्या मैफिलीत साहेब आले होते. आजाराशी चाललेल्या युद्धाचे घाव-डाव अभिमानाने उरी-शिरी वागवीत पठ्ठ्या खुर्चीत येऊन बसला तेव्हा... सुजलेले पाय, चेहरा बघून आधी मी धसकले. पण त्याचा तो बेदरकार, दिलखुलास चेहरा बघून वाटलं...
’यंव रे यंव... इस कॅन्सरकी ऐशी की तैशी... बाप्पू... हाणणारेस तू ह्या आजाराला... आगदी भर चौकात धुणारेस... है शाब्बास... उडवच तू धुव्वा’.
लिहून आणलेलं काहीच न वाचता त्यानं आपलं मनोगत उकललं... त्याची स्वत:ची आजाराशी झुंज... घरचे अन मित्रं-मंडळींनी धावधावून करणं.... भरभरून बोलला...
आम्ही आपले उदयभानू, बाजीप्रभू ह्यांपैकी कुणालातरी बघत असल्यासारखे थक्कित होऊन बसलो होतो. पण इतक्यावर पुरवलं तर त्याला शशांक साठे कसं म्हणता येईल?
"... तुम्हाला काही प्रश्नं आहेत?... विचारा ना.. तू? शलाका?"
निशाणाला कळतं का कधी... तीर अवधान घेत असल्याचं?...
माझी अवस्था वेगळी नाही. मीही आगाऊपणानं विचारलंच, "... ह्या आजारानं शरीरावर खूप काही वाजवलं, शशांक... ह्या प्रवासात तुझ्या मनाची, व्यक्तिमत्वाची इमारत... त्यातले बदल? आहेत असे बदल? तुला जाणवतात?"
तीर-ए-अंदाज घेण्यासाठी मन रितं करण्य़ापुरताच शशांकनं घेतलेला एक पूर्णं श्वास अन पूर्णं निश्वास... क्षणभरासाठीच... पण आमच्यातल्या प्रत्येकानं तो टिपला.
शूर तो, जो स्वत: स्वत:शी करीत असलेली प्रतारणा चार-चौघांत बोलून दाखवू शकतो.... त्यानंतर शशांक माझ्यासाठी सर्वात शूर माणूस ठरला.
"... मी दाखवतोय ना... मी किती शूर आहे आणि कसा ह्या आजाराबरोबर झुंजतोय... हम जितेंगे... खोटं आहे हे सगळं... आतून मी भयंकर घाबरलोय... मरणाची कुणाला भिती वाटत नाही?...."
पुढे तो बरच काही बोलला असणार... मी ऐकलच नाही.... डोक्यात झण्णं झालं... डोळ्यात पाणी अन मानेवर काटे आले माझ्या... कारण? कारण एकच... त्या क्षणी शशांक साठे नावाचा तीर माझ्या आरपार गेला. त्याच्याच अत्रंग भाषेत सांगायचं तर... लागी कलेजवा कट्य़ार!
जिगरवाल्या निशाणांना जिगरवाले तीर भेटले की होणारी जंगही नामी... पण अगदी काळालाही नकळेल अशी ... ह्या हृदयीचं त्या केल्यासारखं. ना तीर हुंकारत ना निशाण विव्हळत. जखम खोलही नसते, यारो... अगदी नखवलेलीसुद्धा... पण दर्दं? तो मात्रं गर्दं गहिरा.
जखमा तसं जगही करीत असतंच की. काही बुजाव्यात म्हणून धडपडायचं... अन काही? हलक्या दुखाव्यात म्हणून ताज्या ठेवायच्या.
निशाणांच्या हातात असतं तर, कुठल्या तीराला बळी पडायचं ते?...
म्हणतिल कुणीही... कोण जाणुन-बुजुन घेईल पायावर कुर्हाड मारुन? कुणी सांगितलय जीव लावायचा, मग तोडून घ्यायचा, मग जखम, वर वर धरलेली खपली, आत आपलंच आपल्याला ठसठसणारं, पिळवटणारं मन...
पण तसं नाहीये, गडेहो...
शशांकसारखे तीर ज्यांना भिडले नाहीत... ते अज्ञानातले सुखी बिचारे...
बाकी तुमच्या-आमच्यासारखे वेगळ्याच दु:खानं सुखी...
हळवेल्या जखमांच्या, हल्लक मातीत, सख्याच्या रोपाला आलेले अंगारांचे घोस... तेजानं घमघमणारे... ओळखीचे वाटतात... अन पापण्यांवर ओल्या मोत्यांच्या झालरी झुलतात... पण...
पण ओठातून मात्रं निघून जातं...
है स्साला...
समाप्त
स्पीचलेस...
स्पीचलेस...
दाद, सुरेख! कितीतरी दिवसांनी
दाद, सुरेख!
कितीतरी दिवसांनी तुझं व्यक्तीचित्रण वाचलं. तुझी नर्मदा अजून लक्षात आहे, 'वाजे नभी चौघडा' काकाही लक्षात आहे. अशीच लिहित रहा.
सुंदर, खर तर प्रतिक्रियेसाठी
सुंदर, खर तर प्रतिक्रियेसाठी शब्दच नाहीत.
खर सांगु काल वाचल तेव्हा
खर सांगु काल वाचल तेव्हा पहिला प्रतिसाद माझाच असता. पण नाहीच जमल लिहायला.
फार जवळचा अनुभव आहे.
(No subject)
अगदी मनाला भिडलं.
अगदी मनाला भिडलं.
सुरेख. व्यक्तीचित्रणं लिहावीत
सुरेख. व्यक्तीचित्रणं लिहावीत तर दादनेच.
अप्रतिम.. ___/|\____
अप्रतिम.. ___/|\____
निशाणाला कळतं का कधी... तीर
निशाणाला कळतं का कधी... तीर अवधान घेत असल्याचं? >>> सुंदर!
पटलं, भावलं, आवडलं...
खरंच सगळं लेखन एकत्र करा... वेगवेगळ्या भावनांची मस्त पोतडी होईले ती.
पुन्हा पुन्हा आभारी आहे
पुन्हा पुन्हा आभारी आहे सगळ्यांची.
(करूया... लेखन एकत्र करायचं करूया.)
लेखन भिडले, टोचले - तेच परत
लेखन भिडले, टोचले - तेच परत त्याच्याच अत्रंग भाषेत सांगायचं तर... लागी कलेजवा कट्य़ार!
पण आपलं नाव लिहिलेला तीर? तो पत्ता शोधत येतोय... तुम्ही कुठे खाचपटीत, तळघरात बसा... काही खरं नाही.. घुसायचं तेव्हा घुसतो, आणि करायची ती तबाही करतोच. शब्द निराळे एकदम जी एं च्या लेखनाची आठवण झाली...
काय गं?? मोत्यांच्या झालरी
काय गं?? मोत्यांच्या झालरी इथे लागल्या ना....
तुझ्या प्रतिभेला फक्त सलाम करु शकते. ___/\___
आणि हो, आज यानंतर काहीच वाचू शकणार नाही. मन तृप्त झालंय.
काल पासुन चार वेळा इथे
काल पासुन चार वेळा इथे आलो.
वाचलं पण प्रतिसाद काय देवु हेच कळेना.
आज हेच लिहावं म्हणलं म्हणुन हा प्रतिसाद.
दाद, सुर्रेख! तुझं लिखाणही
दाद, सुर्रेख! तुझं लिखाणही खेचून घेतं. तुझं लिखाण आल्याची कुणकुण लागली की येऊन ते बघावंच लागतं, नाहीतर आमचाच लॉस असतो काहीतरी चांगलं निसटून गेल्याचा.
---
<<<<ह्या हृदयीचं त्या केल्यासारखं. ना तीर हुंकारत ना निशाण विव्हळत. जखम खोलही नसते, यारो... अगदी नखवलेलीसुद्धा... पण दर्दं? तो मात्रं गर्दं गहिरा.
जखमा तसं जगही करीत असतंच की. काही बुजाव्यात म्हणून धडपडायचं... अन काही? हलक्या दुखाव्यात म्हणून ताज्या ठेवायच्या.
निशाणांच्या हातात असतं तर, कुठल्या तीराला बळी पडायचं ते?... >>>> है स्साला!
निशाणांच्या हातात असतं
निशाणांच्या हातात असतं तर,
कुठल्या तीराला बळी पडायचं ते?...
म्हणतिल कुणीही... कोण जाणुन-बुजुन घेईल पायावर
कुर्हाड मारुन? कुणी सांगितलय जीव लावायचा, मग
तोडून घ्यायचा, मग जखम, वर वर धरलेली खपली,
आत आपलंच आपल्याला ठसठसणारं, पिळवटणारं
मन...
पण तसं नाहीये, गडेहो...
शशांकसारखे तीर ज्यांना भिडले नाहीत... ते
अज्ञानातले सुखी बिचारे...
बाकी तुमच्या-आमच्यासारखे वेगळ्याच दु:खानं
सुखी...>>>>>_______/\_______
खूप छान!! __/\__
खूप छान!! __/\__
(No subject)
जबरदस्त लिखान !
जबरदस्त लिखान !
खूप छान लिहिलंत दाद. जवळच्या
खूप छान लिहिलंत दाद.
जवळच्या मैत्रांबद्दल/सुह्रदांबद्दल लिहिणं किती अवघड असेल , ते ही त्यांच्या अशा अवस्थेत.
>> शूर तो, जो स्वत: स्वत:शी करीत असलेली प्रतारणा चार-चौघांत बोलून दाखवू शकतो.... त्यानंतर शशांक माझ्यासाठी सर्वात शूर माणूस ठरला.
>> पुढे तो बरच काही बोलला असणार... मी ऐकलच नाही.... डोक्यात झण्णं झालं... डोळ्यात पाणी अन मानेवर काटे आले माझ्या... कारण? कारण एकच... त्या क्षणी शशांक साठे नावाचा तीर माझ्या आरपार गेला. त्याच्याच अत्रंग भाषेत सांगायचं तर... लागी कलेजवा कट्य़ार! >>
नि:शब्द ......
शूर तो, जो स्वत: स्वत:शी करीत
शूर तो, जो स्वत: स्वत:शी करीत असलेली प्रतारणा चार-चौघांत बोलून दाखवू शकतो.... त्यानंतर शशांक माझ्यासाठी सर्वात शूर माणूस ठरला.
"... मी दाखवतोय ना... मी किती शूर आहे आणि कसा ह्या आजाराबरोबर झुंजतोय... हम जितेंगे... खोटं आहे हे सगळं... आतून मी भयंकर घाबरलोय... मरणाची कुणाला भिती वाटत नाही?...."
पुढे तो बरच काही बोलला असणार... मी ऐकलच नाही.... डोक्यात झण्णं झालं... डोळ्यात पाणी अन मानेवर काटे आले माझ्या... कारण? कारण एकच... त्या क्षणी शशांक साठे नावाचा तीर माझ्या आरपार गेला.
>>>>>>>>>>>>>>>
कोट करण्यासारखे बरेच आहे.. किंबहुना संबंध लेखच आहे.. पण तयातही याने परीसीमा गाठलीय लेखाची.. !!!
हि कथा असुच शकत नाहि. हे सत्य
हि कथा असुच शकत नाहि. हे सत्य आहे, एका शशांक च .... हो ना दाद, .... मनाला
इतक भिडलय की ही कथा वाटतच नाहिये.....!!!!!!!
दाद.... "....लागी कलेजवा
दाद....
"....लागी कलेजवा कट्य़ार! ...." तुमच्या लेखातील या रचनेने माझ्यासारख्या वाचकाला अशा काही जिवलग वेदना दिल्या की या विषयावर खूप काही वैयक्तिक असे लिहिण्यासारखे माझ्याकडे असूनही लेखणीला आणि मनाला आवर घालत आहे. लेखातील प्रत्येक शब्द तुमच्या भावनेचे स्पष्ट प्रतिक तर आहेतच शिवाय शशांक साठे या व्यक्तीचे चित्र असे काही जबरदस्त उभे राहिले आहे की अनोख्यांनाही सातत्याने वाटत राहावे की एकदा तरी ह्या व्यक्तीशी आपला शेकहॅन्ड व्हावा.
सहजगत्या उतरेलेले लिखाण वाटते....एकही वाक्य असे नाही की ज्याच्या शब्दबद्धतेसाठी तुम्हाला काही विशेष विचार करावा लागला असेल....सारे काही अंतर्मनातूनच कागदावर झरले आहे.
अशोक पाटील
शशांक साठे या 'वृत्ती'ला आणि
शशांक साठे या 'वृत्ती'ला आणि ती अचूक पोहचवणार्या तुझ्या लेखनाला सलाम!
सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे
सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार..
त्याही आधी कडकडून भेटून गेलेलेल्या ह्या शशांक नामक अत्रंग तीराचेआभार (आभार? चलै.. काहीही काय... असंच म्हणत असेल पठ्ठ्या)
शशांक खराच... अजूनही तो उठून गेलाय अन परत येणार नाहीये... हे मानायला मन तयार नाही.
तुमच्या आयुष्यात असाच कुणी येवो... फक्तं त्यानं जाता कामा नये
तुझ्या लेखांवर काय
तुझ्या लेखांवर काय प्रतिक्रीया द्यावी हेच कळत नाही बघ.
दाद.... "...तुमच्या आयुष्यात
दाद....
"...तुमच्या आयुष्यात असाच कुणी येवो... फक्तं त्यानं जाता कामा नये...."
~नेमकं असेच होत नाही....काही प्रकरणात....राहतात त्या स्मृतीकळ्याच केवळ.
दाद, सध्या प्रवासास
दाद,
सध्या प्रवासास अकल्पितपणे निघावं लागल्यास तारांबळ उडते. इथे तर अनंताचा प्रवास आहे. हा लेख म्हणजे तिचं मृदूमर्म आणि मर्मग्राही चित्रण आहे.
खूप वेळ बसून होतो. काय लिहावं ते कळत नव्हतं. शेवटी वरची दोनतीन वाक्यं लिहिली आणि बघत बसलो त्यांच्याकडे. तुम्ही लिहिलंय ते सगळं खोलवर पोहोचतंय. पण का कुणास ठाऊक, माझ्या मनाची पेडी शशांक साठ्यांबरोबर विणली जातंच नाहीये. माझा अनुभव अतिशय तोकडा आहे.
हे द्वंद्व असूनही पिळवटून न टाकणारं आहे. ना तीर हुंकारला ना निशाण विव्हळलं म्हणजे हेच का हो?
तुमच्या प्रतिभेस मानाचा मुजरा!
आ.न.,
-गा.पै.
गापै, तुम्हाला नक्की काय
गापै, तुम्हाला नक्की काय म्हणायचय मला कळलं नाहीये.
हे द्वंद्व नाही. ह्या तीरानं अवधान घेतलेलं निशाणांना कळतच नाही. अरेच्चा... हा तीर आरपार गेला आपल्या, हे ही बर्याचदा नाही कळत तेव्हा.
कळतं तेव्हा उशीर झालेला असतो कदाचित.
शशांकचं म्हणाल तर काळानं हिंदोळ्यावर बसवल्यावर अन आपल्यासवे घेऊन जाण्या मधे काही कालवधी गेलाय... ज्यात जगणं म्हणजे काय, मृत्यू काय ह्याचा विचार करायला खूप वेळ मिळाला. हे सोप्पं नाही.
तुमची रोलरकोस्टर राईड होती... अंती तुम्ही निघून आला आहात...
हिंदोळा अन रोलरकोस्टर.. अनुभवच वेगळा म्हणून पेडीच वेगळी.
अ-फा-ट दुसरा शब्दच नाहिये.
अ-फा-ट
दुसरा शब्दच नाहिये.
लेखन वाचून झाल्यावरही बराच
लेखन वाचून झाल्यावरही बराच काळ मनात तरंग उमटत राहिले.
अफाट लेखनसामर्थ्य.
Pages