१०/८/२०१३
बरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस उघडला होता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....
(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे. सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)
कोकणात जाण्यासाठी पुण्याहून ताम्हिणी घाट, कुंभार्ली घाट, महाबळेश्वर मार्गे पोलादपूर, वरंधा घाट हे गाडी रस्ते आहेत. तसे पानशेतधरणाच्या पाठीमागून, तसेच सह्याद्रीच्या अनेक खिंडीतून पायी कोकणात उतरणारे रस्ते आहे. चिपळणूमधील करंजेश्वरी आमची कुलस्वामिनी दरवर्षी नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही नेमाने जातो. जाताना रायगड किल्ला पाहण्याचा विचार नक्की केला.
सकाळी घरातून तयारी करून ७ वाजता निघालो. काळेवाडी, हिंजवडीमार्गे घोटावडे व तेथून पौड मार्गे ताम्हिणी घाटात पोहोचलो. येथपर्यंतचा रस्ता चांगलाच खराब आहे. त्यामुळे सकाळचे ९.०० वाजले. शनिवार-रविवार असून देखील हौशी पर्यटकांची गर्दी नव्हती. त्यामुळे ट्रॅफिक जॅमचे प्रकाराचा अनुभव आला नाही. पाऊसाची हलकिशी रिमझिम सुरू होती. ताम्हिणी घाटच्या एका बाजूला दरी व दुसºया बाजुला डोंगर आहेत. वाटेत गरुडमाची म्हणून पाहणेसारखे निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे, खळखळून वाहणारे ओढे, डोंगरांवरती आच्छादून टाकणारे ढग, ताम्हिणीचा घाट, समोरच्या डोंगरातून जाणारी एसटी, रस्त्यावरील पांढरे शुभ्र दाट धुके, हिरवाईने वेढलेले डोंगर हे मनोहरी दृश्य मनात साठवून ताम्हिणीचा घाट सोडला. घाट माथ्यावर पोहोचलो व वातावरण स्वच्छ झाले होते. पाऊस सुद्धा थांबला होता.
पुण्याहून ताम्हिणी घाट लांब नाही. हा प्रवास करणे चांगला असला तरी तितकाच धोकायदायकही आहे. वळणवळणाचा रस्ता असल्याने नवशिक्या चालकांनी गाडी न चालविलेलीच बरी. घाटातील वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ जास्त लागतो. दुर्मिळ औषधी वनस्पती व जीवसृष्टी इथं खूप प्रमाणात आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटाला महाराष्ट्र शासनाने अभयारण्याचा दर्जा दिला आहे. बिबट्या, शेकरू, सांबर, गिधाड या वन्यजीवांचं अस्तित्व इथं आढळतं.
ताम्हिणी घाटातून रायगड पाहण्यासाठी निघालो.
(रायगड अधिक फोटोंसाठी क्लिक करा.)
http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_3592.html
घाटात कसे जायचं :
- पुण्याहून जायचे झाल्यास पिरंगुट, पौड, मुळशी मार्गे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब +आहे.)
- पिंपरी-चिंचवडमधून जायचे झाल्यास हिंजवडी, माण, घोटावडेमार्गे पौड, मुळशीधरणा मार्गे ताम्हिणी घाटात जाता येते. (काही रस्ता खराब आहे.)
- मुंबईतून ताम्हिणीला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत
- पहिला मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरून लोणावळा गाठावे. तेथून अॅम्बी व्हॅलीवरून मुळशी धरण व पुढे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब आहे)
- दुसरा रस्ता म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड तिथून ताम्हिणी घाट. कोलाडपासून ताम्हिणी घाट अंदाजे ६० किलोमीटर अंतरावर आहे.
- ताम्हिणी घाटात जाण्यासाठी एसटीचीही सोय आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणाºया कोणतीही एसटी या मार्गावरून जाते.
अजून काही पाहण्यासारखे
- प्लस व्हॅली.
- मुळशी धरणाच्या बाजूने कैलासगड, घनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात.
- मुळशी धरण, पिंपरी व्हॅली व पिंपरी तलाव ही पाहण्यासारखे आहे.
- हल्ली कोलाडच्या जवळून वाहणाºया कुंडलिका नदी वर रिव्हर राफ्टिंग चा अनुभवू घेता येऊ शकतो.
- ताम्हिणी घाटातून घनगड, तेलबैला किल्ल्यांना भेट देता येते.
ताम्हिणी घाटातून खाली उतरलो. कोलाड गावाकडे जाणाºया रस्त्याकडे न जाता. निजामपूरकडे जाण्यासाठी रस्ता विचारला. एक रस्ता थेट महाडपर्यंत जातो. तेथून रायगडाकडे येता येते. दुसरा रस्ता ज्याने आम्ही गेलो तो पाचाड मार्गे होता.
हा रस्ता काही प्रमाणात चांगला रस्ता आहे. परंतु दिवसाढवळ्या गेलेले बरे कारण काही रस्ता घनदाट जंगलातून व निर्मुष्यवस्तीतून जातो. वाटेत पंक्चरची दुकाने, पेट्रोलपंप मिळणार नाही. वाटेत धामणी, हरवंडी, खराबाचीवाडी आदी छोटे गावे लागतात. सुमारे २५ किलोमीटर अंतरासाठी आम्हाला पाचाडला पोहचण्यासाठी पाऊणतास लागला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी उभारलेली मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून रायगडाचे महत्त्व आहे. निजामपूर मार्गे पाचाडला पोहाचलो. जिजाबार्इंची समाधी या पाचाडला आहे. वृद्ध झाल्यामुळे जिजाबार्इंना गडावर येणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी त्यांच्यासाठी खाली पाचाडला वाडा बांधून दिला. पाचाडला सध्या जिजाबाइंची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन रायगडवर जाण्यासाठी निघालो.
रायगड
रायगडवर एक रस्ता १४०० पायºयांनी गडावर जातो. तर दुसरा रस्ता रोपवे कडे हिरकणीगावातून जातो. १५ - २० वर्षांपूर्वी सुमारे १४०० पायºया चढून या किल्यावर जावे लागे. आता मात्र रोपवे सेवा सुरु झाली आहे. अवघ्या ५ मिनिटांत रायगडवर पोहचता येते. १५ वर्षांपूर्वी मी एका ट्रेकिंग क्लबबरोबर येथे पानशेत ते रायगड असा ट्रेक केला होता. मजा आली होती. दिवसभर चालून चालून पाय चांगले दमले होते. तीन दिवसाचा या ट्रेकमध्ये एक संपूर्ण दिवस व एक रात्र रायगड पाहून झाला होता. रोलचा कॅमेरा असल्यामुळे जास्त फोटो काढता आला नाहीत. त्यानंतर आज बºयाच वर्षांनी रायगड किल्ल्यावर जाण्याचा आनंद काही औरच होता. आणि तेही रोपवे मधून.
रोप वे मार्गे रायगड :
अधिक फोटोंसाठी क्लिक करा
http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_3592.html
४ फुट उंचीखालील लहान मुलांसाठी ११५ रुपये जाऊन येऊन. तर प्रौढ व्यक्तींसाठी १८० रुपये जाऊन येऊन तिकीट आहे. एका ट्रॉलीमध्ये ४ प्रौढ व २ लहान मुले बसतात. एका वेळी दोन ट्रॉली गडावर घेऊन जातात. त्याचवेळी वरून खाली दोन ट्रॉली गडावरून शिवभक्तांना घेऊन खाली येतात. गडावर जाण्यासाठी ट्रॉलीतून पाच मिनटं लागतात. चौकशी केली असता मे महिन्यात, शनिवारी व रविवारी, सुटटी दिवशी येथे गर्दी असते. दोन दोन तास थांबून वर गडावर जाण्याची वाट पहावी लागते. मी मात्र सुदैवी निघालो. शनिवार असूनही देखील पर्यटकांची गर्दी पाहिजे तेवढी नव्हती. तिकीट काढून रोपवे मध्ये बसलो. रोपवे सुरू झाला. ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत रायगडाकडे रोपवेची ट्रॉली निघाली. मराठीतून रोप वे ला ‘लोहरज्जू’ असे मजेशीर नाव आहे. वर जाण्याचा अनुभव लिहिणे शक्य नाही. यासाठी एकदा तरी प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला हवा. वर जाण्यासाठी पाच मिनिटेच लागतात. परंतु जो अनुभव आहे तो मोजता येणार नाही. जसे जसे किल्यावर पोहचत होतो तस तसे खालील लावलेली वाहने, माणसे, शेती छोटे छोटे होत गेले. छातीत चांगलीच धडधड वाढत होती. लांबवर उंच डोंगर दिसू लागले होते. ज्युरॅसिक पार्कमधील धबधबा व हॅलिकॉप्टरचे दृश्य आठवले. रायगडावरून कोसळणारा धबधब्या शेजारून आपण वर पोहचतो. एकदम मस्त वातावरण अनुभवयाला मिळाले. वरती पोहोचोस्तोवर ढग दाटून आले. वर पोहाचलो ते दाट ढगामध्येच. अचानक खालील दृश्य गायब झाले. गडावर काही पायºया चढून जाऊन मेणा दरवाज्यातून गडावर जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली राजगडावरून रायगडावर राजधानी हलवली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६७४ साली याच किल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये याच किल्यावर झाला. गडावर जगदीश्वराचे मंदिर आहे. त्यासमोर समाधी व त्यांच्या वाघ्या या कुत्र्याचे स्मारकही आहे. हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, होलरचा माळ, हिरकणी बुरुज, मदरशाचे थडगे, नाना दरवाजा, महादरवाजा या गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. गडावर भोजनाची सोय आहे.
संपूर्ण गडावर मध्येच जोरात पाऊस व दाट धुक्यामुळे खालील परिसरत पाहणे शक्य नव्हते. मात्र, पाऊस संपता संपता गड पाहणे एक वेगळाच अनुभव होता. गड पाहून अडीचला रोप वे परत खाली आलो. खाली आल्यावर झुणका भाकरीवर ताव मारून पोटपूजा उरकली.
तेथून आम्हाला चिपळूणला करंजेश्वरी देवीचे दर्शन व मुक्कामाला जायचे होते.
कसे जाल :
(श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर.)
मस्त.. ‘लोहरज्जू’ असे मजेशीर
मस्त..
‘लोहरज्जू’ असे मजेशीर नाव आहे. वर जाण्याचा अनुभव लिहिणे शक्य नाही. यासाठी एकदा तरी प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला हवा. >> +१.. ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच या मार्गाने गेलो होतो.. पावसाळ्यात हा अनुभव घ्यायचाय..
पहिले दोन फोटो तर जलरंगातली
पहिले दोन फोटो तर जलरंगातली चित्रे वाटताहेत.
तुमचा ब्लॉग पण छान आहे आणी
तुमचा ब्लॉग पण छान आहे आणी माहिती सुटसुटीत पण उत्तम असते. धन्यवाद्.:स्मित:
फोटो नी लेखन सुटसुटीत छान आहे
फोटो नी लेखन सुटसुटीत छान आहे .रायगडला आम्ही लोहरज्जू नवीन असतांना '९५ मध्ये तीन वर्षाच्या मुलीला घेऊन गेलो होतो त्याची आठवण झाली .दुपारी भयाण वारा सुटल्यावर छोटी घाबरली .आणि त्या एमटिडिसीच्या दगडी खोल्या नी कडप्पाचे बेडस !! दुसरे दिवशी गुहागर गाठले .कोकणरेल्वेही त्यावेळी चिपळूण पर्यंत होती त्याने 'वीर'ला उतरून पुढे रायगडफाट्याला(१०किमी) गेलो .येथून पाचाड ३६ किमी आहे .तासातासाने बस होत्या .विसू .रायगडला लोहरज्जूनेच जाणार असाल पायऱ्याचढून नाही तर फाटयावरून फोन करून रज्जू चालू आहे का विचारून जावे नाहीतर ३६किमीचा फेरफटका पडेल.
... नाहीतर ३६किमीचा फेरफटका
... नाहीतर ३६किमीचा फेरफटका पडेल. >> फेरफटक्याला काही फरक पडणार नाही. सुंदर माहिती, चित्ररुपी प्र.चि. छानच. पुढची सफर लवकर घडवा. ‘लोहरज्जू’ची आबालवॄध्दांसाठी चांगली सोय आहे.
वर्णन आनि फोटो मस्तच
वर्णन आनि फोटो मस्तच
दिनेश दा : पहिले दोन फोटो तर
दिनेश दा :
पहिले दोन फोटो तर जलरंगातली चित्रे वाटताहेत.
निमाजपुर ते रायगड व एकंदरीत सगळेच वातावरण एवढे मस्त होते की, खरोखरच निसर्गाने जलरंगातील चित्र आपल्यासमोर काढून ठेवले आहे असे वाटत होते. हा सर्व भाग उन्हाळ्यात मात्र भकास व रुद्र वाटतो एवढेच.
रश्मीजी
तुमचा ब्लॉग पण छान आहे आणी माहिती सुटसुटीत पण उत्तम असते. धन्यवाद्
खूप वर्षांपासून ट्रेकिंगचा नाद, व्यसन लागले आहे. हिंडून आलेला परिसर कसा वाटला, तेथे कसे जायचे, स्थळाविषयी माहिती घेणे व ती इतरांना सांगणे हे केवळ गुगल वरती ब्लॉग व मायबोलीवर लेखन करायला संधी मिळाल्याने ते साध्य झाले. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
किशोर मुंढेजी
लोहरज्जूची आबालवृध्दांसाठी चांगली सोय आहे.
खरेच लोहरूज्जूची सोय झाल्याने रायगडासारख्या दुर्गम व बिकट अशा गडावर जाणे आता आबालवृद्धांना शक्य झाले आहे. आणि तेही काही मिनिटातच. फक्त मे महिना, व सुट्टी दिवशी येथे प्रचंड गर्दी असते. तेवढे जरा सांभाळूनच. आपल्या प्रतिक्रि येबद्दल धन्यवाद
जिप्सीजी
वर्णन आणि फोटो मस्तच स्मित
धन्यवाद.
(श्री. करंजेश्वरी देवी,
(श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर.)
http://www.maayboli.com/node/44715
पावसाळा सुरू झाला आहे.
पावसाळा सुरू झाला आहे. सह्याद्रीतील भटक्यांची भटकंती सुरूवात झाली आहे. नवीन वाचकांसाठी धागा वर काढत आहे..