दार ठोठावून परतलो : भाग - ०१

Submitted by गामा_पैलवान on 1 August, 2013 - 10:07

लोकहो,

त्याचं असं झालं की अस्मादिक नुकतेच दार ठोठावून परतले. कुठचं दार म्हणून काय विचारता, अहो चक्क यमलोकाचं दार! तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना?) गुरूवार दिनांक २५ जुलै २०१३ रोजी या नरदेहास हृदयाचा जोरदार झटका आला. एका डॉक्टराच्या शब्दात : You had a nasty and severe heart attack.

सुदैवाने हानी अत्यंत मर्यादित राहिली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काय झालं त्याची चक्ष्वैसत्यम समयरेखा देतो.

स्थळ : इंग्लंडमधील ब्रायटन येथील माझं घर
दिनांक : २५ जुलै २०१३ अर्थात आषाढ कृ ३ कलियुग ५११५
वेळ : सकाळचे ०७००

०७०० :
सकाळचा पहिला चहा घेत मायबोली वाचत होतो. (कायपण सुरुवात आहे!) हा धागा वाचणे चालू होते : http://www.maayboli.com/node/44232 . नवीन संदेश वाचून झाले तोवर ०७१० झाले होते. मी दुसरे स्थळ पाहू लागलो.

०७१० : डाव्या दंडात कळ आली. वेदना वरवरच्या नसून आतून होत होत्या. कळांचे प्रमाण वाढू लागले. त्या बगल आणि कोपर यांच्या बरोबर मध्य अंतरावरून येत होत्या. पाचच मिनिटांत तीव्रता वाढली आणि कळा बगल व खांद्यामार्गे छातीकडे सरकू लागल्या.

०७१५ :
विश्रांती घेण्याच्या उद्देशाने वरच्या मजल्यावर गेलो (घर दुमजली आहे) आणि बिछान्यावर बसलो. मध्येच शौचास गेलो, मात्र आपल्याला जोर लावता येणार नाही असं वाटल्याने मागे फिरलो. परत बिछान्यावर बसलो आणि बायकोला हाक मारली. ती बाजूच्या खोलीत सकाळच्या गडबडीत होती. तिला बोलावून काय होतंय ते सांगितलं. माझ्या डोळ्यासमोर कुटुंबियांच्या हृद्रोगाचा पूर्वेतिहास नाचू लागला. तिला म्हणलो की सरळ हृदृग्णवाहिका (कार्डियाक अँब्युलन्स) बोलाव. ९९९ हा इंग्लंडमधला तातडीचा क्रमांक (इमर्जन्सी नंबर) आहे.

०७२० :
बायकोने फोन लावला. पण ती प्रसंगाच्या गांभीर्याबद्दल जरा साशंक होती. तिचीही ९९९ ळा फोन करण्याची पहिलीच वेळ होती. पलीकडून आवाज आला पुलीस, अँब्युलन्स ऑर फायरब्रिगेड?

बायकोने सांगायचा प्रयत्न केला की हा कदाचित तातडीचा प्रसंग नसू शकतो. तर सहायक म्हणाला की, मी तुम्हाला वैद्यकीय सल्लागारास जोडून देतो. तुम्ही स्वत: त्यांच्याशी रुग्णवाहिकेबद्दल बोला.

त्याप्रमाणे वैद्यकीय सहाय्यिकेस सर्व माहीती सांगितली. बायकोने फोन वर्धकावर (लाउडस्पीकर) ठेवला. माझ्या तोंडाला कोरड पडत होती. क्षणोक्षणी माझी परिस्थिती खराब होत चालली होती. मला स्पष्ट बोलता येत होतं, मात्र कुठल्याही क्षणी धाप लागल्याने माझं बोलणं बंद पडू शकेल असं सहाय्यिकेला सांगितलं. बरीचशी उत्तरे बायकोच देत होती.

०७२५ :
सहाय्यिकेने रुग्णवाहिका सोडली आहे असं कळवलं. एव्हाना मी बराच सावरलो. मी खाली आलो. मी बर्‍यापैकी ठीकपणे हिंडतफिरत होतो. वेदना छातीकडे सरकू लागल्या. डाव्या दंडाकडून छातीत शिरून आतबाहेर होऊ लागल्या. मी वेदना झटकून टाकण्यासाठी खांद्यांची हालचाल सुरू केली. त्याचवेळी आठवण आली म्हणून तोंडात विभूती टाकली. ती एका अतिशय अधिकारी व्यक्तीने निर्माण केलेली होती. आणि एव्हढ्यात दारावर थाप पडली.

०७३० :
रुग्णवाहिका आली होती. मी स्वयंपाकघरात जाऊन किल्ली आणली आणि दार उघडले. एक पुरूष (रेय् Ray) आणि एक स्त्री (टॅमझिन Tamzin) यांचा चमू उभा होता. तुम्ही रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत आहात का असा प्रश्न त्याने केला. मी होकारार्थी मान हलवत त्याचे स्वागत केले आणि आत दिवाणखान्यात घेऊन गेलो. त्याला विचारलं की जमिनीवर झोपू का. तर तो आश्चर्यचकित झाला आणि उद्गारला,

Ray : Is it you?

me : Yes.

Ray : Let's get into the ambulance

me : Yes, no worries!

असं म्हणून आत जाऊन पडलो. पडल्यावर वेदना भयानक वाढल्या. आतापर्यंत आटोक्यात होत्या त्या पराकोटीला पोहोचल्या. पुढील पंधराएक मिनिटे कशी गेली ती माझी मलाच कळली नाहीत.

आत पडल्यावर रेय्‌ने हृदालेख (ईसीजी) काढला. तो स्वच्छ आला. त्यामुळे मला भयोन्माद (panic attack) झालाय की काय असं त्याला वाटलं. त्याने बोलून दाखवलं की 'Don't panic, you are in the safest hands. You are not dying!' पण वेदना वाढतंच राहिल्या आणि छातीकडे सरकू लागल्या. छातीत कळा येऊ लागल्या.

रेय्‌ची धडपड चालूच होती. त्याने रुग्णालयात (रॉयल ससेक्स काउंटी हॉस्पिटलचे हृदयकेंद्र Royal Sussex County Hospital's Cardiac Centre) संपर्क साधून अतिदक्षतेचा इशारा दिला. रेय्‌, टॅमझिन आणि रुग्णालयातले असा एकसंघ चमू कामास लागला.

रेय्‌ने त्याचा उजवा हात ओढायला सांगितला. तो मी माझ्या डाव्या हाताने जोर लावून ओढला. मग त्याने तोच हात ढकलायला सांगितला. तोही मी डाव्या हाताने बर्‍यापैकी सहजपणे ढकलला. रेय्‌ला कळेना की खरंच मला हृदयझटका (हार्ट अ‍ॅटॅक) येतोय का ते.

तेव्हढ्यात बायकोही आत येऊन बसली. वेदनांमुळे माझी अवस्था अधिकच बिकट होऊ लागली. शेवटी मी बेशुद्ध पडायच्या अवस्थेस पोहोचलो... :

मी : मी बेशुद्ध पडतोय...! (I am passing out)
रेय्‌ : नाही, तू बेशुद्ध होणार नाहीयेस (No you are not falling unconscious)

एव्हढं बोलून होतंय तोच मी गलितगात्र झालो. माझी देहाची जाणीव मंदावली. माझ्या देहाच्या आत मी किंचित आकुंचित झालो. वेदना जरा कमी झाल्यासारख्या वाटल्या. पुस्तकात वाचल्याप्रमाणे एक जोरदार कळ येऊन सगळं शांतशांत होतं, त्या शेवटल्या कळेची वाट पाहू लागलो. पण तशी कळ आलीच नाही. कळ येवो वा न येवो पण शरीराबाहेर पडायची तयारी सुरू केली. त्यानुसार अंगावरील छिद्र शोधू लागलो. पण छिद्रही सापडेना.

हे सारं होत असतांना माझ्या चेहर्‍याचा रंग पालटून फिक्का झाला. रेय्‌ला तात्काळ गांभीर्य जाणवलं. त्याने टॅमझिनला सांगितलं की आपण रुग्णालयात जायला निघणार आहोत (Darling, we are driving!). रेय्‌ने बायकोला विचारलं की याच्या चेहर्‍याचा रंग उडालाय का. तर बायको हो म्हणाली.

असं असलं तरी माझी जाणीव पूर्णपणे शाबूत होती. बायकोला माझ्या नित्यपाठाची पुस्तकं आणायला सांगितली. तसेच इंग्लंडमधल्या एका मित्राला फोन लावून परिस्थितीची कल्पना देण्यास सांगितलं. तो मित्र तेव्हा भारतात होता, तेही सांगितलं. तेव्हा त्याच्या घरी फोन करून भारतातला क्रमांक घे अशाही सूचना दिल्या. त्याप्रमाणे ती हे सारे पार पाडून आली. मित्राची बायको नेमकी घरी सापडली. तिने मित्राला फोन करायचं कबूल केलं. त्याप्रमाणे तो करून लगेच दोन मिनिटांत माझ्या बायकोला लघुसंदेशही (एसेमेस) केला.

रेय्‌ने तोवर दुसरा हृदालेख काढून ठेवला होता. तो सतत रुग्णालयचमूच्या संपर्कात होता. तो बायकोला म्हणाला की याचं हृदय संघर्षग्रस्त आहे (His heart is struggling).

मी : मला बहुतेक उलटी होतेय...! (I might vomit)
रेय्‌ : ही पिशवी घे. (Here is the sick bag)
मी : ...धन्यवाद...! (Thanks)

पण उलटी झालीच नाही.

०७४५ (अंदाजे) :
रेय्‌ने सुमारे ८ गोळ्या भरवल्या. आणि पाण्याचा पेला तोंडास लावला. मी जेमतेम घोट घेतले आणि आम्ही भरधाव निघालो. टॅमझिनने गाडी अश्शी हाणली म्हणून सांगू! रस्त्याची वळणे जाणवत होती, पण मी काही बाहेर बघायच्या मनस्थितीत नव्हतो. सुमारे दहा एक मिनिटांत आम्ही गंतव्यस्थळी पोहोचलो.

०७५५ (अंदाजे) :
आम्ही रॉयल ससेक्स काउंटी हॉस्पिटलच्या हृदयकेंद्राबाहेर पोहोचलो. रुग्णालयसंकुल टेकडीवर असल्याने प्रत्येक वास्तूस पातळी दिली आहे. त्यानुसार आम्ही पाचव्या पातळीवर होतो. सहाव्या पातळीवर नलिकाशाळेत (कॅथेटर लॅब) वैद्यकीय चमू जय्यत तयारीत होता. रुग्णवाहिकाचमूने (रेय्‌ व टॅमझिन) डॉक्टरांना सार्‍या घटनांची कल्पना दिली.

पाचव्या पातळीवर बराच वेळ (सुमारे अर्धा तास) थांबून होतो. या वेळात काहीबाही कागदपत्रे वगैरे सिद्ध केली गेली. तत्ज्ञांची बरीच चर्चा चालू होती आणि मी वेदनेने तळमळत पडलो होतो.

एका मुलीने संहिता (स्क्रिप्ट) वाचून दाखवली. त्यानुसार माझ्या हृद्रोहिणीमध्ये विस्फारजाळी (stent) बसवण्यात येणार आहे. याच्या अयशस्वितेची शक्यता शंभरात एक असून प्रस्तुत डॉक्टर एकदाही अयशस्वी झाले नाहीयेत.

मी (केविलवाण्या स्वरात) : हे सारे मला का सांगताहात. कृपया योग्य ते करा. (Why are you telling me all this! Please do whatever you think good for me.)
ती मुलगी : पण आम्हाला सांगावेच लागते. (But we have to tell you.)
मी : अरे हां, त्या कायदेशीर बाबी! (Oh yes, that legal stuff!)

असं म्हणून लेखी प्रतीवर कशीबशी सही केली. आणि मला वर सहाव्या पातळीवर ते लोक घेऊन गेले.

जातांना बिछान्याचे एक चाक उद्वाहनाच्या जमिनीला धडकले. त्याबरोबर झटका बसला आणि मी जरा सावध झालो. हे पाहून मुख्य परिचारक (हेडनर्स) पॅट्रिकने अंगठा उंचावून सुचिह्न दर्शवले. मीही किंचित हसून दाद दिली.

०८३० (अंदाजे) :
मला नलिकाशाळेत (कॅथेटर लॅब) दाखल केले गेले. वेदना भयानक वाढल्या होत्या. पण मी सुरक्षित होतो. निदान तसं वाटत तरी होतं मला.

वेदनांना ना अंत ना पार ! मी अगतिकपणे विचारलं कोणी मला मालीश करेल का! (Can someone give me a massage ...?) कोणीच काही न बोलल्याने पुढे प्रश्न विचारला की माझं मीच मालीश करू का! (Can I do it myself ?) पण काही उत्तर नाही. माझ्या अंगात मालीश करायची शक्ती नव्हती.

वेदना कमी करायला मी मधूनच 'पेऽन' असं किंचाळत होतो. 'आईगं'ने वेदना कमी होत नव्हत्या! कोणीतरी जवळ येऊन म्हणालं की 'हे सारे लोक त्यांच्यापरीने शिकस्त करीत आहेत. त्यांना मदत व्हावी असं तुला वाटतं ना?' (They are doing their best. Would you like to join them?) मग मी आवाज बंद करून किंचाळणे चालूच ठेवले. तेव्हढाच आपला आराम. हा सारा तमाशा मुख्य उपचार चालू असतांनाच होत होता.

मुख्योपचारांचा क्रम असा होता :

०१. मला चमूची ओळख करून देण्यात आली. पण मी जाणून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. वेदना चालूच होत्या.

०२. प्रत्येकाने पुढे येऊन काय काम करणार ते सांगितले. अगदी श्मश्रूकन्येनेसुद्धा पुढे येऊन 'माझं नाव अमुक असून मी तुझे केस काढणार आहे' असे म्हणाली.

०३. डॉक्टर कपूर म्हणून एक पंचविशीची भूलतत्ज्ञा पुढे आली आणि जांघेत (की जांघेजवळ) इंजेक्शन दिले. अर्थात अगोदर काय करणार ते सांगितले. ही स्थानिक भूल होती.

०४. मुख्य डॉक्टर डीबेल्डा (Dr de Belder) होते. ते बहुतांश वेळ पर्यवेक्षक म्हणून होते होते. डॉक्टर विन (Dr Wynne वय अंदाजे पन्नाशी), डॉक्टर निलेश परीख (वय अंदाजे २५), डॉक्टर ब्लोज (वय अंदाजे ३०), असे इतर अनेक डॉक्टर लोक सोबत होते. परिचारक, सहाय्यक असे बरेच इतर लोकही होते. मला अर्थात काही दिसत नव्हतं. केवळ डॉक्टर कपूर आणि डॉक्टर विन एव्हढेच लोक लक्षात राहिले. मुख्य परिचारक पॅट्रिकही लक्षात राहिला.

०५. भूलीने काम करायला सुरुवात केली. सगळे आपल्याभोवती उभे आहेत अशी अचानक जाणीव झाली. मीही देहाबाहेर असल्याची कल्पना केली, आणि मलाही त्या चमूत कल्पनेनेच सामील केलं. मग उजव्या जांघेजवळ फेमोरल रोहिणीला छेद देण्यात आला. अर्थात अगोदर सांगण्यात आले. मी पूर्णपणे जागा होतो, पण वेदना तेव्हढ्याच होत होत्या.

०६. गुप्तांगात थोडी गरमशी हुळहूळ जाणवली. लगेच विचारलं असं ठीक आहे ना? (Is is ok to feel warm in the groin?) होकारार्थी उत्तर आलं.

०७. मग डॉक्टर विन जवळ आले आणि म्हणाले की तुला अंगभर गरमी पसरल्याची जाणीव होईल. पण काळजी नको. (You will feel warm sensation all over your body, but don't be alert. It's just a warning.) मी शांत पडून राहावं अशी सगळ्यांची इच्छा दिसत होती. मग आत रंगमिश्रीत पाणी सोडण्यात आलं. हा रंग नेहमीचा नसून क्ष-किरणांना अपारदर्शक असा बहुतेक असावा.

०८. मग फोटो (बहुधा क्ष चित्रण) काढण्यात आला. त्यात अग्रवामाधोगामी रोहिणीत (Left Anterior Descending Artery) रक्ताची गुठळी सापडली.

०९. तोवर पहिली लवचिका टोकावरील फुग्यासह (बलून कॅथेटर) तयार होती. ती फेमोरल रोहिणीतून आत सारून गुठळीपर्यंत नेली आणि गुठळी शोषून बाहेर काढली. त्याच वेळी फुगा प्रसरण पाववून रोहिणी मोठी केली गेली. मग फुगा कोमावून (कोमेजवून) नळी बाहेर काढली.

१०. तोवर दुसरी लवचिका (कॅथेटर) तयार होती. तिच्या टोकावरही फुगा होता आणि फुग्याच्या भोवताली विस्फारजाळी (stent) लावलेली होती. ही दुसरी नळी आत सारून योग्य जागी गेल्याची खातरजमा केली. मग फुगा यथायोग्य मात्रेने फुगवला. विस्फारजाळी उघडून आपल्या जागी घट्टपणे सुस्थिर झाली. मग फुगा कोमावून लवचिका काढून घेण्यात आली.

११. याच सुमारास माझ्या वेदना एकदम थंडावल्या. गुठळी काढल्याचा मी तर्क बांधला. छाती आणि धड शरीरापासून अलग होऊन जराशी थरथरून परत जागच्याजागी घट्ट बसल्याची जाणीव झाली. अशीच जाणीव रात्री झोपेतही झाली. त्या वेळी बेंबीखालचे धड थरथरून स्थिर झाले. दोन्ही वेळेस स्थूलदेह हलला नव्हता, तर केवळ लिंगदेहाचे भाग थरथरले होते.

१२. लगेचच डॉक्टर विन जवळ आले आणि सुवार्ता पुरवली (I took off the block and put a stent). छातीतील वेदना पार थांबल्या होत्या. दंडाजवळील वेदना खूप कमी झाल्या होत्या. हळूहळू त्याही नाहीश्या होऊ लागल्या. केवळ बगलेत व दंडात त्वचेजवळच्या स्नायूंच्या किरकोळ वेदना चालू राहिल्या. त्यांची काही चिंता नव्हती.

०९०० :
मला नलिकाशाळेतून पाचव्या पातळीवरील हृद्विभागी (कार्डियाक वॉर्ड) आणण्यात आलं. माझे हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वसन, इत्यादि आरोग्यमापे (हेल्थ पॅरामीटर्स) व्यवस्थित होती. अवघ्या दोन तासांत गाम्याचा जणू नवा जन्मच झाला होता.

या सर्व घडामोडी होत असतांना अगदी ०७३० वाजता रुग्णवाहिकेत शिरण्यापासून खाली हृद्विभागात येईपर्यंत 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप चालू होता. कधी प्रयत्नपूर्वक तर आधी आपसूक होत होता. मध्येमध्ये थांबलाही होता. पण तसं लक्षात येताच सुरू करीत होतो.

प्रमुख कथा सांगून झाली आहे. उर्वरित गोष्ट नंतरच्या भागात. आता प्रश्न येउद्या!

आपला नम्र,
-गामा पैलवान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ. न. गा. पै. Happy

संकटावर मात केल्याबद्दल शुभेच्छा. काळजी घ्या. तुम्ही ज्या सहजपणे हे सर्व लिहिले आहे ते तर फारच विशेष वाटले. या सकारत्मकतेचेचाही तुम्हाला लवकर एकदम बरे होण्यास फायदा होईल असे वाटते.

श्री गुरुदेव दत्त!

अभिनंदन गापै! यापुढे तब्येतीची योग्य ती काळजी घ्यालच!

तुमच्याकडे हिस्ट्री असली तरी तुमच्या खाण्या-पिण्याच्या काही सवयींमुळे तुम्हाला हा त्रास झाला असेल का? तुमचे वय किती? (अगदी आकडा नाही सांगितलात तरी चालेल! Biggrin )

काळजी घ्या! उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो!
मायबोलीवरचा वावर कमी करा , कारण तुमचे मायबोलीवरचे प्रतिसाद प्रदीर्घ असतात म्हणजेच तुम्ही खुप वेळ इंटरनेटवर बसता आणि तुमच्या शरिराला व्यायाम होत नाही.
हे तुम्हालाच नाही तर सगळ्याच मायबोलीकरांना / ईंटरनेट वापरणार्‍यांना लागु होतं, आपल्याला जाणवत नाही पण बसुन राहण्याचा वचपा शरीर हळुहळु काढत असतं.

काळजी घ्या!! आभिनंदन, मोठया झटक्यातुन बाहेर पडल्याबद्दल...!! डोक्टरांनी काय काळजी घ्यायला सांगितली? व्यायाम आणि खाणेपिणे, पथ्यपाणी...

सुरस कथा.

एल ए डी ब्लॉक ... तशी काळजीचीच गोष्ट असते.

काळजी घ्या.

हल्ली कॅथ लॅब मधील सर्व प्रोसिजरची सी डी देखील मिळते. तीही घ्या. अपलोड करा जमले तर.

सध्या कुठे आहात? घरी की दवाखान्यात ? लंडनमध्ये बलून प्लास्टी नंतर किती दिवसात डिस्चार्ज देतात.

या सगळ्या विवेचनात एक गोष्ट सांगायची राहिली. तुमचं वय काय?

गेल्या आठवड्यात मुंबईत एक घटना घडली. डोक्टरांसाठी सी एम ई ( लेक्चर ) सुरु होते. लेक्चर देणारे डॉक्टर ४० वर्शांचे , नेफ्रॉलॉजिस्ट होते. पाचच मिनिटे बोलले आणि खाली कोसळले, ते कोसळलेच. समोर १५० डॉक्टर होते.

गामाजी..... भारीच लिहलयं... पेक्षा ज्या अँगलने तुम्ही स्विकारलयं ते आवडलं... हाकुना मटाटा....

तो वयाचा प्रश्न अगदी डोक्यात आला. काय आहे तुमचे प्रतिसाद वाचुन तुम्ही ४० च्या पुढचे असाल असं वाटत नाही Wink .

गापै हा बहूतेक शेवटचाच अ‍ॅटेक असणार तुम्हाला, इतक्या सहजतेनं बघताय असं दिसल्यावर पुढचा अ‍ॅटेक तुमच्या वाटेला जाईल असं वाटत नाही, तसही आता तुम्ही खच्चून काळजी घ्याल हे नक्कीच Happy धन्य हो !
__/|\__

गा.पै..

पुढील माहिती लिहाल का?(जर खुप पर्सनल वाटत नसेल तर)

वयः
स्मोकर्/नॉन स्मोकर
वेज्/नॉन वेज
काम - बैठे/फिरण्याचे(ज्यात शारिरीक श्रम आहेत असे)
फॅमिलीमधे कोणाला हा विकार आहे का?(अनुवांशिक)
नियमित व्यायाम करता का?
कारणे - कशामुळे हा विकार झाला असावा?
प्रतिबंध - काय केले असते तर हे उद्भवले नसते असे वाटते?
अवांतरः जर हृद्रोग अनुवांशिक असेल तर समजा कोणाला चांगल्या सवयी असतील (आहार, व्यायाम इ) तरीही केवळ अनुवांशिकतेने तो होउ शकतो का?

धन्यवाद आणि शुभेच्छा..

मस्त लिहिलेत गामा सविस्तरही
आजच "माझा साक्षात्कारी हृदयरोग" वाचायला घेतलेले

इकड तिकडच्या कुस्त्या लढून झाल्या असतील तर पुढचा भाग टाका आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची (जमल्यास) उत्तरे द्या.

जमल्यास मुद्दामच, कारण प्रश्नांना बगल देणे, मोठमोठया पोस्ट टाकून बोर करणे तुम्हाला चांगलेच जमते. Happy Light 1

गामा, Rofl प पू गुगलबाबा भाषांतरकार एकदम बोगस निघाले की!!!!

मी दुसरे स्थळ पाहू लागलो. चं भाषांतर चक्क I did not see another place. असं केलंय. Rofl

०७१५ :
विश्रांती घेण्याच्या उद्देशाने वरच्या मजल्यावर गेलो (घर दुमजली आहे) आणि बिछान्यावर बसलो. मध्येच शौचास गेलो, मात्र आपल्याला जोर लावता येणार नाही असं वाटल्याने मागे फिरलो. परत बिछान्यावर बसलो आणि बायकोला हाक मारली. ती बाजूच्या खोलीत सकाळच्या गडबडीत होती. तिला बोलावून काय होतंय ते सांगितलं. माझ्या डोळ्यासमोर कुटुंबियांच्या हृद्रोगाचा पूर्वेतिहास नाचू लागला. तिला म्हणलो की सरळ हृदृग्णवाहिका (कार्डियाक अँब्युलन्स) बोलाव. ९९९ हा इंग्लंडमधला तातडीचा क्रमांक (इमर्जन्सी नंबर) आहे.
भाषांतरः
0715:
Rest on the floor was the top-personnel (dumajali is home) and sitting there on the bed. Toilet was just in, You put the emphasis will be on the back vatalyane phiralo. Sitting there on the bed and there was a Hawk. My room was on the side of the gadabadita. What was the hotanya the bolavuna. My eyes what kind of family is nacu hrdrogaca History. It's simple mhanalo hrdrgnavahika (cardiac ambyulansa) to come. This inglandamadhala emergency number 999 (emergency number) is.

बापरे!! एवढंच पूरे!! हे पूर्ण वाचणार्‍याला हसून हसूनच हार्ट अ‍ॅटॅक यायचा.. Rofl

गापै रॉक्स..
Light Ghatpande Lol

@ राहुल १२३ : इथं गापैंनी चांगली लिंक दिलीय ती बघा. तुमचं काय चाललंय कपडे बदल बदल के ? तुमची मज्जा करु का ? Lol

Pages