तुझ्या मग्न प्रवासाला...

Submitted by आनंदयात्री on 8 August, 2013 - 00:15

रंग रूप स्थायीभाव
आणि लाघवी स्वभाव
सर्वांनाच मोहविती
तुझे भाव, तुझे नाव

स्तुती कौतुक अफाट
जणू उधाणाची लाट
पदोपदी तुला तुझा
भास होतसे विराट

उंचावली तुझी मान
मन हळूच बेभान
घेता दखल जगाने
तुला खुजे आसमान

मग हवेसे वाटले
सारे कौतुकाचे झेले
क्षणोक्षणी स्वीकारावे
हार तुरे अन् शेले

कुणी नाकारूच नये
कुणी झुगारूच नये
भोवतीच्या प्रत्येकाने
कधी दुर्लक्षूही नये

आदबीनेच वागणे
शालीनता दाखवणे
खरे हेतू सारे सारे
किती खुबीने झाकणे!

सुरू जाहला प्रवास
एका फसव्या वाटेने
नाकारत खाणाखुणा
स्वतःच्याच सोबतीने

कुणी आपले नाहीच
तरी पाय रेटलेस
वेळोवेळी स्वतःचीच
समजूत काढलीस

सखे मागेच राहिले
जुने जाणते चांगले
आळ घातलेस तरी
सारे त्यांचेच चुकले!

तुझ्या मते योग्य तूच
तुझे चुकले नाहीच
कधी प्राक्तन अचूक
कधी हट्ट सहेतुक

क्षणभंगुर हे सुख
चतुराईने जगणे
असे कौतुक शोधत
जागोजाग भटकणे

भीती नकार येण्याची
भीती एकटे होण्याची
मग धडपड सारी
सोबत ती शोधण्याची

वाट अखेर थांबली
हतबल नि हताश
तुझ्या मग्न प्रवासाला
आता मोकळे आकाश

जरी जपलेस फार
जगापासुनी स्वतःला
पण जपले नाहीस
स्वतःपासुनी स्वतःला

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/08/blog-post_8.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरी जपलेस फार
जगापासुनी स्वतःला
पण जपले नाहीस
स्वतःपासुनी स्वतःला

वा !!! अचूक निरिक्षण ओघवत्या शब्दात झक्कास मांडलयस !

छान.... अगदी सहजतेने मांडलंय सगळं.

"जरी जपलेस फार
जगापासुनी स्वतःला
पण जपले नाहीस
स्वतःपासुनी स्वतःला" >>> हे विशेषच.

खरे हेतू सारे सारे
किती खुबीने झाकणे! >>> Happy

भीती नकार येण्याची
भीती एकटे होण्याची
मग धडपड सारी
सोबत ती शोधण्याची>>>>>>>>>>> क्या बात.. मस्त खुप आवडली Happy

आशय आवडला. ओघवतेपणाही मस्तच!

जे सांगायचे आहे त्याची व्याप्ती पाहता कवितेची लांबी खूप झाली की काय असेही वाटले.

शुभेच्छा!

सर्वांचे आभार! Happy

चिन्नु, माझ्यामते पासून आणि पासुनी ही रुपे बरोबर आहेत. अंत्य र्‍हस्व असेल तर उपान्त्य दीर्घ होतो.
(उदा. विहीर आणि विहिरीवर). चुकत असल्यास जाणकारांनी सुधारावे...

विजयजी, यात डिटेलिंगवर जास्त भर होता.. बदलत जाणार्‍या वागण्यातले बारकावे टिपायचे होते. म्हणून लांबट वाटली असेल... अन्यथा यात जे सांगायचंय ते कवितेमधून फार क्वचित लिहिलं जातं... Wink
धन्यवाद! Happy