दार ठोठावून परतलो : भाग - ०१

Submitted by गामा_पैलवान on 1 August, 2013 - 10:07

लोकहो,

त्याचं असं झालं की अस्मादिक नुकतेच दार ठोठावून परतले. कुठचं दार म्हणून काय विचारता, अहो चक्क यमलोकाचं दार! तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना?) गुरूवार दिनांक २५ जुलै २०१३ रोजी या नरदेहास हृदयाचा जोरदार झटका आला. एका डॉक्टराच्या शब्दात : You had a nasty and severe heart attack.

सुदैवाने हानी अत्यंत मर्यादित राहिली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काय झालं त्याची चक्ष्वैसत्यम समयरेखा देतो.

स्थळ : इंग्लंडमधील ब्रायटन येथील माझं घर
दिनांक : २५ जुलै २०१३ अर्थात आषाढ कृ ३ कलियुग ५११५
वेळ : सकाळचे ०७००

०७०० :
सकाळचा पहिला चहा घेत मायबोली वाचत होतो. (कायपण सुरुवात आहे!) हा धागा वाचणे चालू होते : http://www.maayboli.com/node/44232 . नवीन संदेश वाचून झाले तोवर ०७१० झाले होते. मी दुसरे स्थळ पाहू लागलो.

०७१० : डाव्या दंडात कळ आली. वेदना वरवरच्या नसून आतून होत होत्या. कळांचे प्रमाण वाढू लागले. त्या बगल आणि कोपर यांच्या बरोबर मध्य अंतरावरून येत होत्या. पाचच मिनिटांत तीव्रता वाढली आणि कळा बगल व खांद्यामार्गे छातीकडे सरकू लागल्या.

०७१५ :
विश्रांती घेण्याच्या उद्देशाने वरच्या मजल्यावर गेलो (घर दुमजली आहे) आणि बिछान्यावर बसलो. मध्येच शौचास गेलो, मात्र आपल्याला जोर लावता येणार नाही असं वाटल्याने मागे फिरलो. परत बिछान्यावर बसलो आणि बायकोला हाक मारली. ती बाजूच्या खोलीत सकाळच्या गडबडीत होती. तिला बोलावून काय होतंय ते सांगितलं. माझ्या डोळ्यासमोर कुटुंबियांच्या हृद्रोगाचा पूर्वेतिहास नाचू लागला. तिला म्हणलो की सरळ हृदृग्णवाहिका (कार्डियाक अँब्युलन्स) बोलाव. ९९९ हा इंग्लंडमधला तातडीचा क्रमांक (इमर्जन्सी नंबर) आहे.

०७२० :
बायकोने फोन लावला. पण ती प्रसंगाच्या गांभीर्याबद्दल जरा साशंक होती. तिचीही ९९९ ळा फोन करण्याची पहिलीच वेळ होती. पलीकडून आवाज आला पुलीस, अँब्युलन्स ऑर फायरब्रिगेड?

बायकोने सांगायचा प्रयत्न केला की हा कदाचित तातडीचा प्रसंग नसू शकतो. तर सहायक म्हणाला की, मी तुम्हाला वैद्यकीय सल्लागारास जोडून देतो. तुम्ही स्वत: त्यांच्याशी रुग्णवाहिकेबद्दल बोला.

त्याप्रमाणे वैद्यकीय सहाय्यिकेस सर्व माहीती सांगितली. बायकोने फोन वर्धकावर (लाउडस्पीकर) ठेवला. माझ्या तोंडाला कोरड पडत होती. क्षणोक्षणी माझी परिस्थिती खराब होत चालली होती. मला स्पष्ट बोलता येत होतं, मात्र कुठल्याही क्षणी धाप लागल्याने माझं बोलणं बंद पडू शकेल असं सहाय्यिकेला सांगितलं. बरीचशी उत्तरे बायकोच देत होती.

०७२५ :
सहाय्यिकेने रुग्णवाहिका सोडली आहे असं कळवलं. एव्हाना मी बराच सावरलो. मी खाली आलो. मी बर्‍यापैकी ठीकपणे हिंडतफिरत होतो. वेदना छातीकडे सरकू लागल्या. डाव्या दंडाकडून छातीत शिरून आतबाहेर होऊ लागल्या. मी वेदना झटकून टाकण्यासाठी खांद्यांची हालचाल सुरू केली. त्याचवेळी आठवण आली म्हणून तोंडात विभूती टाकली. ती एका अतिशय अधिकारी व्यक्तीने निर्माण केलेली होती. आणि एव्हढ्यात दारावर थाप पडली.

०७३० :
रुग्णवाहिका आली होती. मी स्वयंपाकघरात जाऊन किल्ली आणली आणि दार उघडले. एक पुरूष (रेय् Ray) आणि एक स्त्री (टॅमझिन Tamzin) यांचा चमू उभा होता. तुम्ही रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत आहात का असा प्रश्न त्याने केला. मी होकारार्थी मान हलवत त्याचे स्वागत केले आणि आत दिवाणखान्यात घेऊन गेलो. त्याला विचारलं की जमिनीवर झोपू का. तर तो आश्चर्यचकित झाला आणि उद्गारला,

Ray : Is it you?

me : Yes.

Ray : Let's get into the ambulance

me : Yes, no worries!

असं म्हणून आत जाऊन पडलो. पडल्यावर वेदना भयानक वाढल्या. आतापर्यंत आटोक्यात होत्या त्या पराकोटीला पोहोचल्या. पुढील पंधराएक मिनिटे कशी गेली ती माझी मलाच कळली नाहीत.

आत पडल्यावर रेय्‌ने हृदालेख (ईसीजी) काढला. तो स्वच्छ आला. त्यामुळे मला भयोन्माद (panic attack) झालाय की काय असं त्याला वाटलं. त्याने बोलून दाखवलं की 'Don't panic, you are in the safest hands. You are not dying!' पण वेदना वाढतंच राहिल्या आणि छातीकडे सरकू लागल्या. छातीत कळा येऊ लागल्या.

रेय्‌ची धडपड चालूच होती. त्याने रुग्णालयात (रॉयल ससेक्स काउंटी हॉस्पिटलचे हृदयकेंद्र Royal Sussex County Hospital's Cardiac Centre) संपर्क साधून अतिदक्षतेचा इशारा दिला. रेय्‌, टॅमझिन आणि रुग्णालयातले असा एकसंघ चमू कामास लागला.

रेय्‌ने त्याचा उजवा हात ओढायला सांगितला. तो मी माझ्या डाव्या हाताने जोर लावून ओढला. मग त्याने तोच हात ढकलायला सांगितला. तोही मी डाव्या हाताने बर्‍यापैकी सहजपणे ढकलला. रेय्‌ला कळेना की खरंच मला हृदयझटका (हार्ट अ‍ॅटॅक) येतोय का ते.

तेव्हढ्यात बायकोही आत येऊन बसली. वेदनांमुळे माझी अवस्था अधिकच बिकट होऊ लागली. शेवटी मी बेशुद्ध पडायच्या अवस्थेस पोहोचलो... :

मी : मी बेशुद्ध पडतोय...! (I am passing out)
रेय्‌ : नाही, तू बेशुद्ध होणार नाहीयेस (No you are not falling unconscious)

एव्हढं बोलून होतंय तोच मी गलितगात्र झालो. माझी देहाची जाणीव मंदावली. माझ्या देहाच्या आत मी किंचित आकुंचित झालो. वेदना जरा कमी झाल्यासारख्या वाटल्या. पुस्तकात वाचल्याप्रमाणे एक जोरदार कळ येऊन सगळं शांतशांत होतं, त्या शेवटल्या कळेची वाट पाहू लागलो. पण तशी कळ आलीच नाही. कळ येवो वा न येवो पण शरीराबाहेर पडायची तयारी सुरू केली. त्यानुसार अंगावरील छिद्र शोधू लागलो. पण छिद्रही सापडेना.

हे सारं होत असतांना माझ्या चेहर्‍याचा रंग पालटून फिक्का झाला. रेय्‌ला तात्काळ गांभीर्य जाणवलं. त्याने टॅमझिनला सांगितलं की आपण रुग्णालयात जायला निघणार आहोत (Darling, we are driving!). रेय्‌ने बायकोला विचारलं की याच्या चेहर्‍याचा रंग उडालाय का. तर बायको हो म्हणाली.

असं असलं तरी माझी जाणीव पूर्णपणे शाबूत होती. बायकोला माझ्या नित्यपाठाची पुस्तकं आणायला सांगितली. तसेच इंग्लंडमधल्या एका मित्राला फोन लावून परिस्थितीची कल्पना देण्यास सांगितलं. तो मित्र तेव्हा भारतात होता, तेही सांगितलं. तेव्हा त्याच्या घरी फोन करून भारतातला क्रमांक घे अशाही सूचना दिल्या. त्याप्रमाणे ती हे सारे पार पाडून आली. मित्राची बायको नेमकी घरी सापडली. तिने मित्राला फोन करायचं कबूल केलं. त्याप्रमाणे तो करून लगेच दोन मिनिटांत माझ्या बायकोला लघुसंदेशही (एसेमेस) केला.

रेय्‌ने तोवर दुसरा हृदालेख काढून ठेवला होता. तो सतत रुग्णालयचमूच्या संपर्कात होता. तो बायकोला म्हणाला की याचं हृदय संघर्षग्रस्त आहे (His heart is struggling).

मी : मला बहुतेक उलटी होतेय...! (I might vomit)
रेय्‌ : ही पिशवी घे. (Here is the sick bag)
मी : ...धन्यवाद...! (Thanks)

पण उलटी झालीच नाही.

०७४५ (अंदाजे) :
रेय्‌ने सुमारे ८ गोळ्या भरवल्या. आणि पाण्याचा पेला तोंडास लावला. मी जेमतेम घोट घेतले आणि आम्ही भरधाव निघालो. टॅमझिनने गाडी अश्शी हाणली म्हणून सांगू! रस्त्याची वळणे जाणवत होती, पण मी काही बाहेर बघायच्या मनस्थितीत नव्हतो. सुमारे दहा एक मिनिटांत आम्ही गंतव्यस्थळी पोहोचलो.

०७५५ (अंदाजे) :
आम्ही रॉयल ससेक्स काउंटी हॉस्पिटलच्या हृदयकेंद्राबाहेर पोहोचलो. रुग्णालयसंकुल टेकडीवर असल्याने प्रत्येक वास्तूस पातळी दिली आहे. त्यानुसार आम्ही पाचव्या पातळीवर होतो. सहाव्या पातळीवर नलिकाशाळेत (कॅथेटर लॅब) वैद्यकीय चमू जय्यत तयारीत होता. रुग्णवाहिकाचमूने (रेय्‌ व टॅमझिन) डॉक्टरांना सार्‍या घटनांची कल्पना दिली.

पाचव्या पातळीवर बराच वेळ (सुमारे अर्धा तास) थांबून होतो. या वेळात काहीबाही कागदपत्रे वगैरे सिद्ध केली गेली. तत्ज्ञांची बरीच चर्चा चालू होती आणि मी वेदनेने तळमळत पडलो होतो.

एका मुलीने संहिता (स्क्रिप्ट) वाचून दाखवली. त्यानुसार माझ्या हृद्रोहिणीमध्ये विस्फारजाळी (stent) बसवण्यात येणार आहे. याच्या अयशस्वितेची शक्यता शंभरात एक असून प्रस्तुत डॉक्टर एकदाही अयशस्वी झाले नाहीयेत.

मी (केविलवाण्या स्वरात) : हे सारे मला का सांगताहात. कृपया योग्य ते करा. (Why are you telling me all this! Please do whatever you think good for me.)
ती मुलगी : पण आम्हाला सांगावेच लागते. (But we have to tell you.)
मी : अरे हां, त्या कायदेशीर बाबी! (Oh yes, that legal stuff!)

असं म्हणून लेखी प्रतीवर कशीबशी सही केली. आणि मला वर सहाव्या पातळीवर ते लोक घेऊन गेले.

जातांना बिछान्याचे एक चाक उद्वाहनाच्या जमिनीला धडकले. त्याबरोबर झटका बसला आणि मी जरा सावध झालो. हे पाहून मुख्य परिचारक (हेडनर्स) पॅट्रिकने अंगठा उंचावून सुचिह्न दर्शवले. मीही किंचित हसून दाद दिली.

०८३० (अंदाजे) :
मला नलिकाशाळेत (कॅथेटर लॅब) दाखल केले गेले. वेदना भयानक वाढल्या होत्या. पण मी सुरक्षित होतो. निदान तसं वाटत तरी होतं मला.

वेदनांना ना अंत ना पार ! मी अगतिकपणे विचारलं कोणी मला मालीश करेल का! (Can someone give me a massage ...?) कोणीच काही न बोलल्याने पुढे प्रश्न विचारला की माझं मीच मालीश करू का! (Can I do it myself ?) पण काही उत्तर नाही. माझ्या अंगात मालीश करायची शक्ती नव्हती.

वेदना कमी करायला मी मधूनच 'पेऽन' असं किंचाळत होतो. 'आईगं'ने वेदना कमी होत नव्हत्या! कोणीतरी जवळ येऊन म्हणालं की 'हे सारे लोक त्यांच्यापरीने शिकस्त करीत आहेत. त्यांना मदत व्हावी असं तुला वाटतं ना?' (They are doing their best. Would you like to join them?) मग मी आवाज बंद करून किंचाळणे चालूच ठेवले. तेव्हढाच आपला आराम. हा सारा तमाशा मुख्य उपचार चालू असतांनाच होत होता.

मुख्योपचारांचा क्रम असा होता :

०१. मला चमूची ओळख करून देण्यात आली. पण मी जाणून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. वेदना चालूच होत्या.

०२. प्रत्येकाने पुढे येऊन काय काम करणार ते सांगितले. अगदी श्मश्रूकन्येनेसुद्धा पुढे येऊन 'माझं नाव अमुक असून मी तुझे केस काढणार आहे' असे म्हणाली.

०३. डॉक्टर कपूर म्हणून एक पंचविशीची भूलतत्ज्ञा पुढे आली आणि जांघेत (की जांघेजवळ) इंजेक्शन दिले. अर्थात अगोदर काय करणार ते सांगितले. ही स्थानिक भूल होती.

०४. मुख्य डॉक्टर डीबेल्डा (Dr de Belder) होते. ते बहुतांश वेळ पर्यवेक्षक म्हणून होते होते. डॉक्टर विन (Dr Wynne वय अंदाजे पन्नाशी), डॉक्टर निलेश परीख (वय अंदाजे २५), डॉक्टर ब्लोज (वय अंदाजे ३०), असे इतर अनेक डॉक्टर लोक सोबत होते. परिचारक, सहाय्यक असे बरेच इतर लोकही होते. मला अर्थात काही दिसत नव्हतं. केवळ डॉक्टर कपूर आणि डॉक्टर विन एव्हढेच लोक लक्षात राहिले. मुख्य परिचारक पॅट्रिकही लक्षात राहिला.

०५. भूलीने काम करायला सुरुवात केली. सगळे आपल्याभोवती उभे आहेत अशी अचानक जाणीव झाली. मीही देहाबाहेर असल्याची कल्पना केली, आणि मलाही त्या चमूत कल्पनेनेच सामील केलं. मग उजव्या जांघेजवळ फेमोरल रोहिणीला छेद देण्यात आला. अर्थात अगोदर सांगण्यात आले. मी पूर्णपणे जागा होतो, पण वेदना तेव्हढ्याच होत होत्या.

०६. गुप्तांगात थोडी गरमशी हुळहूळ जाणवली. लगेच विचारलं असं ठीक आहे ना? (Is is ok to feel warm in the groin?) होकारार्थी उत्तर आलं.

०७. मग डॉक्टर विन जवळ आले आणि म्हणाले की तुला अंगभर गरमी पसरल्याची जाणीव होईल. पण काळजी नको. (You will feel warm sensation all over your body, but don't be alert. It's just a warning.) मी शांत पडून राहावं अशी सगळ्यांची इच्छा दिसत होती. मग आत रंगमिश्रीत पाणी सोडण्यात आलं. हा रंग नेहमीचा नसून क्ष-किरणांना अपारदर्शक असा बहुतेक असावा.

०८. मग फोटो (बहुधा क्ष चित्रण) काढण्यात आला. त्यात अग्रवामाधोगामी रोहिणीत (Left Anterior Descending Artery) रक्ताची गुठळी सापडली.

०९. तोवर पहिली लवचिका टोकावरील फुग्यासह (बलून कॅथेटर) तयार होती. ती फेमोरल रोहिणीतून आत सारून गुठळीपर्यंत नेली आणि गुठळी शोषून बाहेर काढली. त्याच वेळी फुगा प्रसरण पाववून रोहिणी मोठी केली गेली. मग फुगा कोमावून (कोमेजवून) नळी बाहेर काढली.

१०. तोवर दुसरी लवचिका (कॅथेटर) तयार होती. तिच्या टोकावरही फुगा होता आणि फुग्याच्या भोवताली विस्फारजाळी (stent) लावलेली होती. ही दुसरी नळी आत सारून योग्य जागी गेल्याची खातरजमा केली. मग फुगा यथायोग्य मात्रेने फुगवला. विस्फारजाळी उघडून आपल्या जागी घट्टपणे सुस्थिर झाली. मग फुगा कोमावून लवचिका काढून घेण्यात आली.

११. याच सुमारास माझ्या वेदना एकदम थंडावल्या. गुठळी काढल्याचा मी तर्क बांधला. छाती आणि धड शरीरापासून अलग होऊन जराशी थरथरून परत जागच्याजागी घट्ट बसल्याची जाणीव झाली. अशीच जाणीव रात्री झोपेतही झाली. त्या वेळी बेंबीखालचे धड थरथरून स्थिर झाले. दोन्ही वेळेस स्थूलदेह हलला नव्हता, तर केवळ लिंगदेहाचे भाग थरथरले होते.

१२. लगेचच डॉक्टर विन जवळ आले आणि सुवार्ता पुरवली (I took off the block and put a stent). छातीतील वेदना पार थांबल्या होत्या. दंडाजवळील वेदना खूप कमी झाल्या होत्या. हळूहळू त्याही नाहीश्या होऊ लागल्या. केवळ बगलेत व दंडात त्वचेजवळच्या स्नायूंच्या किरकोळ वेदना चालू राहिल्या. त्यांची काही चिंता नव्हती.

०९०० :
मला नलिकाशाळेतून पाचव्या पातळीवरील हृद्विभागी (कार्डियाक वॉर्ड) आणण्यात आलं. माझे हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वसन, इत्यादि आरोग्यमापे (हेल्थ पॅरामीटर्स) व्यवस्थित होती. अवघ्या दोन तासांत गाम्याचा जणू नवा जन्मच झाला होता.

या सर्व घडामोडी होत असतांना अगदी ०७३० वाजता रुग्णवाहिकेत शिरण्यापासून खाली हृद्विभागात येईपर्यंत 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप चालू होता. कधी प्रयत्नपूर्वक तर आधी आपसूक होत होता. मध्येमध्ये थांबलाही होता. पण तसं लक्षात येताच सुरू करीत होतो.

प्रमुख कथा सांगून झाली आहे. उर्वरित गोष्ट नंतरच्या भागात. आता प्रश्न येउद्या!

आपला नम्र,
-गामा पैलवान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गापै, शुभेच्छा तुम्हाला. काळजी घ्या व ती कशी घेताय ते ही लिहा येथे. आणि माबोवरच्या बाकी चर्चेचा जास्त विचार करू नका. Happy

बाप रे! अवघड प्रसंग फारच!
तुम्हाला शुभेच्छा. काळजी घ्या! Happy
इथे लिहिल्याबद्दल तुमचे आभारच मानायला हवे खरे तर. अवघड प्रसंग असला तरी माहिती उपयुक्त ठरु शकते इतर लोकांसाठी.

गा.पै. >>> आपणास खरोखरच... स...न... __/\__ ,ज्या परिस्थितित कोणताही माणूस भयभीत होतो,तिथे तुम्म्ही अंतरमनानी हा चमत्कार करून (लक्षात ठेऊन) आमच्याशी शेअरंही केलात. खरच पुन्हा एकदा... __/\__

गा.पै.

अहो काय सांगताय काय?? या अवघड प्रसंगातून बाहेर आलात त्याबद्दल खूप शुभेच्छा. शतायुषी व्हा ही देवापाशी प्रार्थना!

इमर्जन्सी वा अ‍ॅम्ब्युलन्स् ला कॉल करून ती मदत येईस्तोवर आपान वायू मुद्रा केल्यावर जरा आराम मिळतो. सुदैवाने स्वत:ला अनुभव नाही किंवा placebo controlled, blinded/randomized clinical trails वगैरे कुणी केलेल्या ऐकिवात नाही. पण ही एक सेव्ह करून ठेवलेली लिंक मिळाली तीच देते आहे.

http://www.naturalhealthcure.org/yoga-and-exercise/benefits-of-apan-vayu...

वापरायची वेळ तुम्हा कुणावर ही न येवो. गा.पै. टेक केअर!

अजून एक लिहायचे राहिले ते म्हणजे इतक्या लगेच तुम्ही इथे येऊन हे सगळं सविस्तर लिहिले त्यावरुन ह्या प्रसंगानंतर तुम्ही कुठेही गर्भगळीत वगैरे होता व्यवस्थित अ‍ॅक्सेप्ट करुन नवीन वाटचाल करायला उभे ठाकला आहात असं दिसतय जे खुपच स्तुत्य आहे. Happy Its really hard to find people who can take this kind of stuff in their stride and move on so quickly. Great!
एरवी असा प्रसंग ओढावणे तर सोडा पण साधं आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो ह्या कल्पनेनी लोकं खुपच घाबरुन जातात आणि पुढे मग नैराश्य वगैरे सुद्धा येतं.
सध्या मेडिकल सायन्स इतके पुढे पोहोचलय की जरा वेळेत मदत मिळाली तर ह्रदया संबंधीत शस्त्रक्रिया करुन लोकं अगदी ठणठणीत बरे होऊन अगदी नॉर्मल आयुष्य जगतात हे बर्‍याच वेळा पाहायला मिळतं.

गापै
मी देखील काळ आणि आज असे दोन दिवस साबांसाठी याच कारणाने गडबडीत होतो. तुमची मात्र कमाल आहे. तुम्ही त्याच बाफवर पुन्हा चार दिवसांनी हजेरी लावलीत. या सर्व गोष्टी, जालीय सवयी पत्नीबरोबर शेअर करा. व्यायामासाठी वेळ काढा. जालावर विकतचा मनःस्ताप मिळतो. हार्ट तुमचं आहे.. पुन्हा एकदा विचार करा.

अरे बापरे, पैलवान...
तुम्ही धोबीपछाड घालून कुस्ती जिंकलीत हे वाचून अत्यानंद झाला.... काळजी घ्या. तुमच्या मनाचा तोल वाखाणण्यासारखा आहे, साहेब. तुमच्या मनाची ही पैलवानकी अशीच राहो...
काळ देहासी आला खाऊ.. आम्हा आनंदे नाचू-गाऊ
गामाभाऊ खरच काळजी घ्या.

(ह्या अख्ख्या लेखात नेहमीचे इंग्रजी शब्दांना चपखल मरठी शब्दं वाचून करमणूक होत होती...
आपली करमणूक होतेय ह्याचंही वाईट वाटत होतं... पण खरं ते सांगितलं.)

लगेच स्टेंटिंग झाल्याने हृदयाला नुकसान झालेले नाही. अभिनंदन!
पुढे काळजीपूर्वक रहा. सिगारेट बंद करा. आल द बेस्ट

दाद +१.
चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा.>> +१

वेळिच मदत मिळाली ते खरंच बरं झाले. इकडे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

बाप रे! हार्ट-अ‍ॅटॅक आणि त्यावरचा तातडीचा उपाय यांचं धावतं समालोचन आहे हे...
तुम्ही त्याला सकारात्मक रीतीनं सामोरं गेलात हे खरंच कौतुकास्पद आहे. पूर्ववत आयुष्य पुन्हा सुरू झाल्याचं हे प्रतिक मानता येईल. पण तरीही, पूर्वीच्या काही सवयी, आचार-विचारपध्दती बदलाव्या तर लागतीलच.
वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आता तब्ब्येतीची काळजी कशी घेता ते ही सविस्तर लिहा. हे कदाचित लगोलग लिहिता येणार नाही. पण हार्टअ‍ॅटॅकनंतरचा १ महिना, २ महिने, ६ महिने - असं लिहिलंत तर इतरांनाही ते मार्गदर्शक ठरेल आणि मुख्य म्हणजे त्यामागच्या तुमच्या सकारात्मकतेचा उपयोग होईल.

तुमच्या पत्नीच्या धीराचंही कौतुक.

जालावर विकतचा मनःस्ताप मिळतो. हार्ट तुमचं आहे.. पुन्हा एकदा विचार करा.>>> +१
शिवाय पथ्य वै संभाळुनच...

शुभेच्छा निरोगी आयुष्यासाठी... Happy

त्या धाग्याच्या वाचनामुळे पैलवानांना हे असे सग़ळे झाले असे चित्र का निर्माण होत आहे? ते निव्वळ सहज, एक चर्चेने ओथंबत असलेला धागा व स्वतःच्या आवडीचा विषय म्हणून त्या धाग्यावर गेले असावेत. Uhoh

श्री गुरुदेव दत्त

गापै, काळजी घ्या! उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो! जमेल तसं पुढे कशी काळजी घेताय/घेतली पाहिजे ह्याबद्दलही स्वानुभवातून लिहा. डॉ. अभय बंगांच पुस्तक सुद्धा त्यांच्या स्वानुभवाच्या वर्णनामुळेच फार जवळचं वाटतं.

बाकी सद्ध्या कुठल्याही गंभीर चर्चांचे धागे उघडूही नका. पीजे, अनंताक्षरी, चुकीची ऐकलेली गाणी, लहानपणचे उद्योग ह्या टाईप बाफ आधी बघितले नसतील तर ते बघा. बरं असतं कधी कधी Happy

गापै
शामत हो तुझी.... काळजी घे बाबा.... तुमच्याकडे हिस्टरी आहे ना .... लिहिलस पण इतक्यात....

तुझी पत्रिका पाठवुन दे इमेल वर.....

काळजी घ्या हो पैलवान!!
पण खरंच अभिनंदन तुमचं अशा कठिण परिस्थितिला धैर्याने सामोरे गेल्याबद्दल!!

वा गा पै कमाल झाली !
गा पै हे नावही सार्थकी लागले म्हणायचे
पुढील जिवणास शुभेच्छा ! देवाची कॄपा आहेच तुमच्यावर !

गामा, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. योग्य ती काळजी घ्या.

इतक्या लवकर आपल्या जिवघेण्या दुखण्याचा आढावा देण्याच्या तुमच्या मनोधैर्याला खरेच सलाम.

Pages