रव्याचा केक- पारंपारिक पद्धतीने

Submitted by प्रज्ञा९ on 4 July, 2013 - 08:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा

क्रमवार पाककृती: 

-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!

IMG_4472.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तसा! :)
अधिक टिपा: 

-मी हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! Proud त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!

माहितीचा स्रोत: 
आई, रुचिरा हे पुस्तक, दिनेशदांची अधिक माहिती आणि मी केलेले थोडेफार बदल.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरमयी, तव्यावर ठेवणार असशील तर कूकरचा हिंडालियमचा डबा चालावा.>>> मी विचार करतोय ह्या केक मध्ये अचानकच सुरमई मासा कुठुन आला. Biggrin

अश्विनी वाळुचा प्रश्न मला नाही पडलाय.

मंजूडी थँक्स. अ‍ॅनोडाईझ्ड पॅन आहे.
वाळू तव्यावर टाकून त्यावर पॅन ठेवायचा का वाळूशिवाय डायरेक्ट गॅस वर हेच विचारायचे होते. .....

प्रज्ञा९ मी आजच हा केक केला. एक वाटी रव्याचा करून बघितला. मावेच्या कन्वेक्शन मोडवर १८०वर पहिल्यांदा २०मिनिटे बेक केला कमी वाटला मग अजून १०मिनिटे केले, अजून खरपूस होण्यासाठी ५ मिनिटे २००वर ठेवला, छान झाला, अजिबात जळला नाही. मी मावे pre-heat केला नव्हता. केकमध्ये थोडी dairy-milk कॅडबरी मिक्स केली होती. काचेच्या भांड्यात केला म्हणून कदाचित वेळ लागला असेल.धन्यवाद प्रज्ञा९.

Majhahi hs aavadata cake aahe. Magchya mahinyat kela hota pan oven madhe.

प्राजक्ता,किती वेळ बेक केला?
बाकी रेसिपी मस्तच..आज करून बघीन. बाय द वे, हा शिर्‍यासारखा लागतो का थोडा?

आता एकच शंका किंवा प्रश्न...
यात रव्याच्या जागी मैदा वापरला तर कसा होइल?
म्हणजे चालेल का?

मामी, तुम्ही केलेला केक मस्त मॉइस्ट दिसतोय. तो तसा कितीवेळ राहिला? (मॉइस्टनेस गायब व्हायच्या आत केक गायब झाला नसेल तर)

आज लेकीच्या डब्यासाठी हा केक केलाच.. फार्फारच सुंदर झाला आहे.
काल लोणी कढवलं होतं. तूप काढून घेतल्यावर भांड्याची बेरी खरवडून सारखी केली आणि त्यातच भाजलेला रवा, कोमट दूध, दही, साखर घालून मस्तपैकी फेटलं. दोन चहाचे चमचे तूप, वेलची, केशर सिरप आणि कुस्करलेलं केळं घालून मिश्रण तयार केलं आणि केक भाजला. केक भाजला जात असतानाच्या खमंग दरवळाने लेक जागी झाली आणि थेट स्वयंपाकघरात आली Happy

बेरीचा केक मस्तच होतो.. मी मैदा नि कणिक घालून केला होता बेरीचा केक.. सुरेख झाला होता चवीला नि दिसायलाही.. Happy आताच लोणी कढवलय आता रव्याचा केक करुन बघते.. मस्त.. आत्ताच तोंपासु.. Happy

आज करून पाहिला.
लेकीला बसवले दही-साखर फेटायला. मग सगळे मिश्रण तिनेच फेटून दिले.
अननसाचे तुकडे घातले होते मी. लेकीला खूप आवडला. Happy

माझ्याकडे अवन किंवा पॅन नसल्याने तव्यावर जाड बुडाचे भांडे ठेवून भाजला केक. चांगला झाला.

मी काल केला.. लेकीने फोटो पाहिले होते.. त्यामुळे तिचा हट्ट होता.. Happy

माझ्या मानाने उत्तमच झाला Happy

फोटो आहे, डकवते थोड्या वेळात.

जाजु, मस्त दिसतोय केक. तो अयंगार बेकरीमधे व्हीट केक मिळतो ना, तसाच अगदी मस्त खमंग दिसतोय.

मी पण केला हा केक... चवीला एकदम मस्त पण काय चुकल ते कळल नाही, माझा केक पॅनला चिकटला Sad
इथे सांगितल्या प्रमाणे हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधेच केला होता.. नेक्स्ट टाइम नॉर्मल नॉन-स्टीक पॅन वापरुन करावा का असा विचार करतेय...

विनार्च .. पूर्ण थंड होऊ दिलास का? आणि तळाला पूर्ण तुपाचा हात होता का?

माझा थोडा जास्तच (२ मिनिटे) गॅसवर राहीला.. त्यामुळे सलग निघाला नव्हता.

तळाला काय पूर्ण पॅनला तूप लावल होत .... कदाचित जास्तवेळ राहिला असं वाटय आता ... थॅन्क यु जाईजुई Happy
रेसीपीसाठी थॅन्क यु प्रज्ञा Happy

Pages