"मी माझं चरित्र लिहीणार आहे!"
-बकुळाबाईंनी दवंडी पिटल्याच्या आवेशात घोषित केलं आणि ’आश्चर्याचा धक्का, अविश्वास, अभिमान, गहिवर, कौतुक, आनंद... वगैरे वगैरे’ या सगळ्या भावनांचं अनोखं स्नेहसंमेलन आता आपल्याला ईंदूच्या - त्यांच्या सुनेच्या - चेहर्यावर पहायला मिळणार आहे अशा खात्रीने त्यांनी समोर बसून मेथी निवडणार्या ईंदूकडे पाहिलं. ईंदू समोरच्या टिव्हीत पार आकंठ बुडालेली होती. एका हाताने मेथीची पानं त्यांच्या मूळस्थानापासून कचाकच तोडत स्थानभ्रष्ट करता करता ती सवयीनं उद्गारली... "हं..."
’हं? फक्त हं? एवढया महत्त्वाच्या बातमीला प्रतिक्रिया काय... तर फक्त हं? कि हिनं ऐकलंच नाही मी काय बोलले ते?’ - बकुळाबाई मनातल्या मनात चरफडल्या. आयुष्यात पहिल्यांदा त्यांना ’टिव्ही’ हा खिडकितून फेकून देण्याइतपत आपला शत्रू आहे असं वाटलं. तसं बर्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात रोजच्या रोज ’पहिल्यांदा’ घडायच्या... असो. तो आपला विषय नाही!
"अगं तु ऐकलंस का मी काय म्हटलं ते? अगं ए... ईंदू.. तुझ्याशी बोलतेय मी..."
"अहो ऐकतेय मी... बहिरी नाही झाले अजून. चरित्र लिहायचंय ना तुम्हाला? लिहा कि मग... फक्त ते प्रिंटिंगचे नवे कोरे कागद वापरू नका हं. २-४ जुन्या डायर्या दिलेल्या ना तुम्हाला मध्ये... त्या वापरा. नाही पुरल्या तर बघता येईल पुढे."
बकुळाबाई हिरमुसल्या. त्यांनी मनातल्या मनात आपल्या या निर्णयाबाबत घरच्यांच्या ज्या ज्या प्रतिक्रीया रंगवल्या होत्या त्यात विरोधापासून प्रोत्साहनापर्यंत आणि उपहासापासून अविश्वासापर्यंत सगळं होतं. त्या सगळ्या प्रतिक्रीयांसाठीची मानसिक तयारिही त्यांनी करून ठेवली होती. म्हणजे.... ’काही झालं तरी मी माझं चरित्र लिहून पूर्ण करणारच. फक्त लिहिणारच नाही तर प्रकाशितही करणार. बघाच तुम्ही!’... वगैरे वाक्ये सराईतपणे घरच्यांच्या तोंडावर मारण्याची रंगित तालिमही झाली होती त्यांची. पण प्रत्यक्षात जी प्रतिक्रीया आली.... तीही घरातल्या सर्वात ’सेफ’ सदस्याकडून... ती फार म्हणजे फारच अनपेक्षित होती हो बकुळाबाईंना! त्यांच्या आवेगातली पार हवाच काढून घेतली त्यांच्या सुनेने. आणि त्यासाठी रागवावं तरी कसं? तिनं विरोधही केला नाही अन्.... छे!!!
बकुळाबाई अगदिच वैतागून गेल्या. एवढ्या चांगल्या आणि उदात्त कार्याला अशी उदासिन प्रतिक्रीयेनी सुरूवात व्हावी? तमाम साहित्यविश्वाची... (हो... तमाम... म्हणजे फक्त मराठीच नव्हे... हो तर! बकुळाबाईच्या चरित्राचे इतर भाषांत अनुवादही होणार होते ना! फक्त मराठीपुरता संकुचित विचार त्या करतच नव्हत्या कधी!) होत चाललेली नैतिक (की अनैतिक?) घसरण या विषयावरही काहितरी विधायक लिहिता येईल चरित्रामधे. - हा विचार येताच बकुळाताई पुन्हा बहरल्या. बहरल्या त्या इतक्या बहरल्या की आपल्या पायांना गार गार पानं फुटून ती पोटर्यांशी हुळहुळतायत कि काय असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी कौतुकाने खाली पाहिलं तर टिपू पाय चाटत होता. त्यांना गहिवरून आलं. बकुळाबाईंच्या साहित्यिक प्रतिभेची जाणिव असणारा या घरातला एकमेव जीव म्हणजे टिपू. चरित्र लिहिण्याचा विचारही सगळ्यात पहिल्यांदा बकुळाबाईंनी टिपूलाच सांगितला होता आणि त्याची प्रतिक्रीयाही उत्साहवर्धक होती. तोंडाची नळकांडी करून मान वर करून त्यानं बकुळाबाईंकडे पाहून त्याने ’कूंऊंऊंऊंऊं...’ असा आवाज काढला आणि शेपूट आभाळाच्या दिशेनं ताठ उभी केली. बकुळाबाईंना ती त्या मुक्या जीवाची आपल्या संकल्पनेला मिळालेली भाबडी सलामी वाटली आणि त्याची आभाळाकडे निर्देश करणारी शेपूट म्हणजे जणू आपली भविष्यात उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती... हाच संकेत असणार. मुक्या प्राण्यांना माणसापेक्षा जास्त भावना असतात - याही विषयावर चरित्रात एक प्रकरण लिहायचे निश्चित झाले. बास! आता कुणीही काहिही म्हणो! चरित्र लिहायचे म्हणजे लिहायचेच! - टिपूच्या केसाळ मानेला खाजवता खाजवता बकुळाबाईंनी एकूण एकशे सत्ताविसाव्यांदा मनाशी निर्धार केला!
’बकुळा सदानंद करकोचे’ - अत्यंत सामान्य नाव धारण केलेलं, आणि त्याहून सामान्य परिस्थितीत स्वतःतल्या अत्यंत असामान्य प्रतिभेचा साक्षात्कार होऊन ती असामान्य प्रतिभा प्राणपणाने जपण्याचा कठोर अट्टाहास करणारं एक... खरंतर अतिसामान्य व्यक्तीमत्त्व! हुश्श! लिहितानाच धाप लागली. पण बकुळाबाई असल्या शब्दांच्या माळाच्या माळा बनवून लवंगी फटाक्यांची माळ पेटवल्याच्या उत्साहात आणि त्याच सहजतेने सगळीकडे फोडत... म्हणजे फेकत असतात. काळाच्या ओघात आपल्यातल्या या सुप्त प्रतिभेचे आपल्या आतच नकळत दहन झाले याची वेदनादायी जाणीव त्यांना झाली तेंव्हाच्या त्यांच्या भावनाही त्यांनी या ईंदूलाच बोलून दाखवल्या होत्या. तेंव्हा मात्र ईंदूने फार मनापासून बकुळाबाईंचे सगळे ऐकले होते. नुसते ऐकलेच नाही तर ’स्त्रीयांनी सांसारिक कामात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व न हरवून बसता आपले छंद आणि प्रतिभा कश्या जपल्या पाहिजेत’ या विषयावर दोघी सासवा-सुनांत चांगला दिड तास परिसंवाद रंगला होता. टिव्हीवर ’तुझ्यात-माझ्यात’ मालिका सुरू व्हायची वेळ झाली नसती तर ती चर्चा अजून किती वेळ चालली असती कोण जाणे. नंतर नंतर सूनच बोलते आहे आणि आपण फक्त माना डोलावतोय हे लक्षात आल्याने बकुळाबाईचंच मनोधैर्य खचू लागलं होतं आणि त्यांनीच मग मोठ्या चतुराईनं ईंदूला मालिकेच्या वेळेची आणि मागच्या भागात मालिका संपली तेंव्हा दारात पाठमोरं कोण बरं उभं होतं ते बघायला हवं याची आठवण करून दिली. ’साहित्याच्या क्षेत्रात कितीही नाऊमेद करणार्या गोष्टी घडल्या तरी आपले मनोबल आपणच राखले पाहिजे’ हा अत्यंत महत्वाचा धडा त्या त्या प्रसंगामुळे शिकल्या. (आणि ईंदू आपल्यापेक्षा जास्त साहित्यिक बोलू शकते याचीही बकुळाबाईंना जाणीव झाली. नाही म्हटलं तरी धास्तीच बसली त्यांच्या मनात... पण त्या डगमगल्या अजिबात नाहित. काही झालं तरी त्या सासूबाई आहेत ना!)
दुसर्या दिवशी ईंदूने आपण पुन्हा गाण्याच्या क्लासला जायला सुरूवात करणार आहोत हे घरात सांगून टाकले. म्हणजे ही बया आता ऑफ़िस मधून आणखी तासभर उशीरा येणार. म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाकही आपल्याच कपाळी! - पण हे सगळं मनात ठेवावं लागलं बकुळाबाईना. काय करणार...? ’स्त्रीयांनी त्यांचे छंद कुठल्याही परिस्थितीत जोपासलेच पाहिजेत’ हे त्याच बोलल्या होत्या ना आदल्या दिवशी...! त्या दिवशी ईंदू बकुळाबाईंकडे बघून असं काही ठेवणीतलं हसली होती की... बकुळाबाई अजुनही कधीकधी निवांतपणात त्या हसण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतात. ’तुमच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झालं सासूबाई....’ असं ईंदू तोंडदेखलं तरी म्हणेल आणि आपण मोठेपणाने मान वगैरे हलवत ’अगं मी फक्त माझे विचार तुला सांगितले... खरं श्रेय तुझ्याच प्रतिभेला आहे...’ - वगैरे असं काहितरी बोलून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी... नाहितर किमान टाळ्या तरी घेतल्याच असत्या. पण ही फक्त हसली. आता काय बोलणार? असो. चालायचंच. व्हायचंच. वगैरे.
तर पुन्हा आपल्या विषयाकडे. त्या दिवसानंतर बकुळाबाईंनी ठरवून टाकलं आपणही लिहायला लागायचं. नुसतं लिहायचंच नाही तर आपली साहित्यिक प्रतिभा जगासमोर आणायची. तेंव्हापासून बकुळाबाईंना आपली पुस्तकं, कवितासंग्रह प्रकाशित झाली आहेत; पुस्तकांच्या दुकानात आवर्जुन आपल्या नावाची विचारणा लोकांकडून होते आहे; आपल्याला साहित्यक्षेत्रातील मोठे मोठे पुरस्कार मिळाले आहेत वगैरे स्वप्नं पडू लागली. एकदा तर ’साहित्य संमेलना’चं अध्यक्षपद त्यांना जाहिर झालं असल्याचं स्वप्नं बकुळाबाईंनी पाहिलं आणि त्या दचकून उठल्या!
पण आता खरोखरच त्यांनी मनावर घेतलं होतं. रोजच्या रोज बुंदी पाडावी तशा कविता पडायला लागल्या होत्या बकुळाबाई. ही बुंदिची उपमा अर्थातच श्री. जीवन करकोचे - अर्थात बकुळाबाईंचे चिरंजीव - यांची. कुठल्याही अविष्काराची सुरवातीला अशीच अवहेलना होते हे बकुळाबाईंना चांगलीच कल्पना असल्याने त्यांनी असल्या टिप्पण्यांकडे सुरुवातीपासूनच सपशेल दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. (आणि हे करायला लागल्यापासून त्यांना आपल्या यजमानांच्या स्वभावाचं आश्चर्य वाटेनासं झालं होतं. किंबहुना कुतुहल जागृत झालं होतं - हे अशाच काहिशा भावनेने कायम आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करित असतील का...? वगैरे. थोडक्यात साहित्यिक उन्नती ही माणसाला अंतर्मुख बनवते व आत्मपरिक्षण करायला शिकवते.)
बकुळाबाईंनी त्यांची पहिली (या नव्या साहित्यिक उन्मेशाच्या लाटेत वाहताना सुचलेली) कविता - ’क्षितिजापाशी पोचता पोचता चंद्रच वर आला...’ ही तरलतेच्या प्रवाहात उचंबळून जात जरा जास्तच लांब वहावत गेलेली. सदानंदरावांनी त्यावर केलेलं प्रथम आणि शेवटचं कथन - ’कविता ही संपता संपता दिवसच संपून गेला...’ आणि त्यावर उडालेला छुपा हास्यकल्लोळ बकुळाबाईंच्या लक्षात आला होता. त्यानंतर बरेच दिवस ती कविता घरात अक्षरशः ’वापरली’ गेली हो... म्हणजे जीवन आंघोळीला जाताना म्हणायचा - ’टॉवेल कपाटात शोधता शोधता बनियनच हातात आला..." कौस्तुभ (नातू) शाळेतून आल्यावर म्हणायचा ’आई... आज मिस शिकवता शिकवता तासच संपून गेला’.... वगैरे वगैरे. ईंदू डोळे वटारायची वगैरे पण एकूण तिलाही मजाच येत असणार. सदानंदरावांची ती बकुळाबाईंच्या साहित्यावरिल शेवटचीच प्रतिक्रीया ठरली हे वेगळे सांगणे न लगे.
पण काही काळाने बकुळाबाईंना कवितांचा कंटाळाच आला. जवळजवळ शंभरेक कवितासंग्रह छापून (फक्त छापून) होतील एवढ्या कविता दहा-बारा दिवसांत लिहिल्यावर कंटाळा येणारच ना? आता हे फारच सोपं प्रकरण झालं. आता काहितरी भरगोस करायला हवं. यातूनच त्यांना ’चरित्र’ लिहिण्याची कल्पना सुचली. आणि आता प्राण गेला तरी (अर्रर्र... पण तो जायच्या आधी...) त्या त्यांचे चरित्र लिहून पुर्ण करणारच होत्या.
’चरित्र’ - तसं बकुळाबाईंकडे सांगण्यासारखं खूप होतं. आयुष्याने आजवर जे रंग दाखवले त्यात सावलीचे फारच कमी आणि ढळढळीत उन्हाचे बेहिशेब होते. म्हणजे दुःख, आर्थिक विवंचना, दगेफटके, संकटे, दैवी सामर्थ्याचे दर्शन, कर्तृत्वाने समस्यांना दिलेले तोंड वगैरे सगळाच मसाला होता त्यांच्याकडे चरित्र लिहिण्यासाठी. आयुष्याने एकूण भरपूरच भांडवल पुरवले होते त्यांच्या चरित्रलिखाणासाठी. भरिस भर म्हणून पुढच्या पिढिला ’मार्गदर्शक’, ’प्रोत्साहक’, ’आश्वासक’ वगैरे असं काही त्यांचं आयुष्य असू शकतं याची त्यांना खात्री होती. पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांचा संघर्ष एक आदर्श उदाहरण ठरणार होता! अशा अनिक विचारांनी भारावून जाऊन बकुळाबाई अत्यंत आत्मविश्वासाने शेवटी चरित्र लिहायला बसल्याच!
"श्री गजानन प्रसन्न" एवढे लिहून त्या थांबल्या. कुठून सुरुवात करावी?
’मी बकुळा सदानंद करकोचे. माझा जन्म...’ बकुळाबाई पहिल्याच वाक्याला थांबल्या... ही अशी सुरुवात फारच ’टिपिकल’ होत नाहिये ना?
’हं....’ एक गंभीर उसासा सोडून त्यांनी पहिले वाक्य खोडून टाकले. पण पहिल्याच पानावर खाडाखोड? हा अपशकून वाटून त्यांनी सरळ पानच पालटून नविन पानावर नव्याने सुरुवात केली.
"श्री गजानन प्रसन्न" - बकुळाबाई परत थांबल्या. खरंतर लहानपणापासूनच सुरुवात करायला हवी... काय लिहावं?
बकुळाबाई भूतकाळात गेल्या....
लहानपण.... आई लवकर वारली. काही कळायच्या आत. वगैरे...
बाप एका गावी... आपण मामाकडे दुसर्या गावी. बापाशीही फारशी ओळख नाही. आपण कॉलेजला नुकतेच जाऊ लागल्यावर कधीतरी आजीनं बाप गेल्याची बातमी दिली. ओळख नव्हती तरी वाईट वाटलं होतं हे नक्की. बाकी मामानं तेंव्हाही गावी नेलं नाही. आई गेली त्याला बापच जवाबदार होता असं म्हणायचा मामा... त्याचे शिव्याशाप, मामीची चिडचिड, आजीचे तळतळाट... बापाची एवढीच ओळख... वगैरे.
मात्र त्यानंतर आपलं कॉलेजला जाणं अचानक थांबलं त्याअर्थी पैसे बापच पाठवत असावा... हे नंतर वाटलं. पण कुणाला विचारलं नाही. उगाच कल्पना करणं वगैरे...
बाकी... मामाचं जुनाट, पत्र्यांचं, ओलसर अंधारं घर. घरात येणारा कुबट वास आणि सतत देवासमोरच्या समईचा मिणमिणता अशक्त उजेड... वगैरे.
शाळेचं मोकळं प्रांगण. शेणाने सारवलेली गार गार जमिन आणि त्यावर अंथरलेली लाल मळकी सतरंजी. काळ्या फळ्याच्या खालच्या कडेवर पडलेला पांढरा खडूचा भुगा. खडूची तुरटशी चव... फाटकी पुस्तकं... वगैरे.
मॅट्रिकला किती मार्क होते बरं आपल्याला?
कॉलेज तर तोंडओळख होण्याआधीच सुटलेलं. तरी ते मोठाले वर्ग... बेंचेस... मोठ्ठा फळा... वगैरे.
’छे!’ बकूळाबाई जाम वैतागल्या. एकही प्रसंग धड आणि सलग आठवेना त्यांना त्यांच्या लहानपणाच्या पहिल्या वीस वर्षांमधला. एवढा दुर्लक्षणीय काळ होता तो? आपल्या एवढ्या सहज विस्मरणात जावा? लहानपणचे दिवस कसे सोनेरी असतात... कौस्तुभचं बाळपण कसं दृष्ट काढून ठेवावी असं आहे... तो विसरेल का कधी हे दिवस? छे... आपण का विसरलो? बाळपण आठवलं नाही तर चरित्र पूर्ण कसं होणार? मुळात सुरू कसं करणार? ते काही नाही. काहितरी आठवेलच आपल्याला. एवढी काही स्मृती गेलेली नाही. काहितरी आठवायलाच हवं.
बकुळाबाईंनी शांतपणे डोळे मिटले.
केस फार छान आणि दाट लांब होते आपले. आजी रोज विंचरून घट्ट दोन वेण्या घालून द्यायची. काळ्या रिबिनीने वर बांधायची.
मामाने आणलेली एक पोपटी रंगाची सलवार कमिझ... तेवढ्याच एका वेषात लहानपण आठवतं. खूप प्रिय होता तो ड्रेस. आणि त्यावरची मऊसूत रेशमी पिवळसर ओढणी.... ओढणीनं काय झाकायचं असतं ते समजायच्याही आधीचा तो काळ...
घराचे ओलसर अंधारे कोनाडे... मामाचे आंजारणे-गोंजारणे... जवळ घेणे... कधी.... छातीशी... पोटाशी.... कंबरेशी...
"शी....!!!" बकुळाबाई अक्षरशः ओरडून भानावर आल्या... कपाळावरचे घर्मबिंदू त्यांनी हातानेच पुसले.
’हे.... हे लिहिणार आहोत आपण आपल्या चरित्रात? हे सगळे वाचतील... आपल्या घरचे... ओळखीचे, नातेवाईक, शेजारीपाजारी... आपल्याबद्दल काय वाटेल सगळ्यांना? नाही नाही... हे सगळं वगळलं पाहिजे. हे कुणालाच समजता कामा नये.... कधीच. संपूर्ण बालपणच गाळले पाहीजे. चरित्रातून... स्मृतीतून...’
बकुळाबाई उठल्या... घसा कोरडा पडला होता. पाणी आणायला स्वयंपाकघराकडे निघाल्या. पायाशी लुडबुडत येणार्या टिपूकडे पहाताना त्यांना उगाचच हायसं वाटलं. चला.... ते स्टेशन सोडून खरंच फार फार लांब आलोय आपण. आता भ्यायचं काही कारण नाही. त्या स्वतःशीच हसल्या.
पाण्याचा ग्लास घेऊन पुन्हा एकदा टेबलापाशी परतताना त्यांचा निग्रह पुन्हा एकदा झाला होता. त्यांनी समोरच्या पानाकडे पाहिलं. शब्द तर अजून एकही उतरला नव्हता कागदावर. बकुळाबाई पाणी पिता पिता विचार करू लागल्या... हे काही वाटतं तितकं सोपं नाही. मन कठोर करायला हवं. स्वतःकडे त्रयस्थपणे पहायला हवं.
बकुळाबाई पुन्हा लिहायला बसल्या. नसेना का बाळपण... नसतं काहिंना. माझा जन्म माझ्या लग्नाच्या मुहुर्तावरच झाला असं गृहीत धरुया.
हं... बकुळाबाई पुन्हा निग्रहानं भूतकाळात गेल्या.
विसाव्या वर्षीच लग्न झालं. मामीनंच घाईघाईनं लावून दिलं. लग्नाच्या दिवशीच मला समजलं की आपलं नवं नाव आता ’बकूळा सदानंद करकोचे’ असणार आहे. पण घाईघाई केली तरी स्थळ तसं बरं निघालं. कसंतरी... रडत-खडत, लोळत-लोंबत का होईना... यांनी साथ दिली माझी. अगदी आजवर. यांचा स्वभाव फारच शांत. एकत्र कुटुंब. मोठ्ठ्या एकत्र कुटुंबात असतोच तसा छुपा कावेबाजपणा आणि अधिकार गाजवण्याची, स्वतंत्र अस्तित्व ’दाखवून देण्याची’ प्रत्येक सदस्याची खुमखुमी तिथेही होतीच. हे शांत म्हणून यांच्या स्वभावाचा फायदा घेतला जातोय हे समजल्यावर मी आपणहूनच ताठ झाले. बघता बघता अख्ख्या घरात, नातेवाईकांत खत्रुड, खविस, खडूस म्हणून मी प्रसिद्द झाले. माझ्यादेखत लोक यांना बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणायचे. माझं रक्त खवळायचं पण हे मात्र शांतच. इतरांच्या बोलण्याचा राग यायचाच पण त्याहून यांच्या काहीही न बोलण्याचा भयंकर राग यायचा. कधी मी चिडून यांच्यावर आवाज चढवला तर हे भांडायचं सोडून देवासमोर शांतपणे पोथी वाचत बसायचे. मी चरफडायचे. लग्नाच्या इतक्या वर्षांत हे मला काय मनाजोगतं देऊ शकले नाहीत असं जर मला कुणी विचारलं तर मी म्हणेन... ’एक मनसोक्त.... मनमोकळं भांडण!’
बकुळाबाईंनी पुन्हा एक लांब उसासा सोडला.
ते मोठं एकत्र कुटुंब मोडून बाहेर पडण्याचं पहिलं पाप मी माझ्या माथ्यावर घेतलं. यांना मनवून विनवून, कधी डोळ्यांत पाणी कधी निखार आणून स्वतंत्र उद्योगाला लावलं. मी स्वतः पोलकी शिवण्यापासून शिकवण्या घेण्यापर्यंत सगळे उद्योग केले. असलं नसलेलं सगळं स्त्रीधन मोडलं. देव-धर्म केला, उपास केले, व्रत-वैकल्य केली... नवस-सायास आणि कष्ट करून संसार अखेरी मार्गी लावला.
’मी’ माझ्या बळावर संसार केला. ’मी’ यांना उभारी दिली. ’मी’ मुलांना शिकवलं... त्यांच्या पायावर उभं केलं. ’मी’च त्यांची यथावकाश लग्ने लावून दिली.... त्यांचे संसारही ’मी’च रांगेला लावून दिले... त्यांची मुलेबाळे सांभाळली... अजूनही... ’मी’च त्यांचे संसार करते आहे.
’मी’.... ’मी’.... हे कुठून आलं?
मी नसते तर... काय झालं असतं? की काहिच झालं नसतं? की... काहीच होण्यावाचून राहिलं नसतं?
’मी’.... म्हणजे कोण? - ’बकुळा सदानंद करकोचे’. - कोण ही बाई?
कर्तृत्वाच्या बेगडी प्रावरणाखाली स्वतःचं मूळ, खरं अस्तित्व झाकण्यासाठी धडपडणारी एक अतिसामान्य भित्री व्यक्ती.
’काय बकुळाबाई... आहे हिंमत जसं आहे तसं तुमचं असणं या कागदावर उतरवण्याची? आहे हिंमत स्वतःला नग्न पहाण्याची? आहे हिंमत चरित्र लिहिण्याची? खरं खुरं चरित्र?’
दारावरची बेल वाजली आणि बकुळाबाई भानावर आल्या. उठताना किंचित अशक्तपणा त्यांचा त्यांनाच जाणवला. थरथरत्या पायांनी चालत त्या दारापाशी गेल्या. दारात ईंदू उभी होती.
"अगं ईंदू... तू गाण्याच्या क्लासला जाऊन येणार होतीस ना? लवकर कशी आलीस?"
"आज नाही गेले आई... कौस्तुभची परिक्षा आहे उद्या. आणि यांचे मित्र येणारेत रात्री जेवायला... त्यांचा स्वयंपाक. शिवाय उद्या शेवटचा श्रावण शुक्रवार... नैवेद्याचा स्वयंपाक करावा लागेल ना... माझ्याशिवाय कसं होणार?"
बकुळाबाई हसल्या. ’मी’... पुन्हा तो ’मी’ त्यांच्या अवतीभोवती पिंगा घालत होता.
ईंदू फ्रेश होऊन बाहेर आली तेंव्हा बकुळाबाई टेबलाच्या बाजूला खुर्चिवर निवांत बसल्या होत्या. त्यांच्यासमोर होती एक उघडी डायरी आणि "श्री गजानन प्रसन्न" एवढंच बोलणारा एक मुका कागद!
"आई... लिहायला घेतलंत का चरित्र? मला आत्ता वाचायला मिळेल की सगळं लिहून संपल्यावरच?" ईंदू हसून म्हणाली.
बकुळाबाई पण हसल्या.
"ईंदू... एक विचार आलाय मनात. खूप वर्ष संसार केला. माझा... तुमचा.... आता तुमच्या संसारात तुम्हाला स्वातंत्र्य द्यावं असा विचार करते आहे..."
"आई.... म्हणजे काय म्हणताय तुम्ही? काय झालं?"
"काही नाही गं. तू आहेस आता. इथे असेन तोवर ’माझ्यामुळे चाललंय सगळं’ या भ्रमातून बाहेर पडणं नाही जमणार मला. मूर्तिपूजा फार झाली गं... आता त्या निर्गुणाच्या भजनात शेवटापर्यंतचे दिवस कंठावेत असं मनात आहे. आता गावी जाऊन राहू म्हणतो दोघे. तिथं घर आहे म्हणून गं. नसतं तर मग पर्यायच नव्हता ना... आता आहे एवढं छान घर... तर उपभोग घ्यावा ना...."
"आई... मनापासून बोलताय?"
बकुळाबाईंनी ईंदूकडे पाहिलं.
’आश्चर्याचा धक्का, अविश्वास, अभिमान, गहिवर, कौतुक, आनंद... वगैरे वगैरे’ या सगळ्या भावनांचं अनोखं स्नेहसंमेलन ईंदूच्या चेहर्यावर पाहताना बकुळाबाईंना फार गंमत वाटली. ईदूच्या मनात बरिच वर्ष हेच होतं हे ठाऊक होतं बकुळाबाईंना. ’पण हे माझं घर आहे.... मी का जाऊ? मी इथंच राहणार...’ या अहंकाराने त्या तिथंच राहिल्या. हट्टाने! स्वतःही कधीकाळी एक कुटूंब मोडून बाहेर पडल्या होत्या हे विसरून.
"आई, आमचं... माझं काही चुकलं नाही ना?" ईंदूने चाचपडत विचारलं.
बकुळाबाई हसल्या.
"नाही गं बयो. मीच कंटाळले आता तुम्हा सगळ्यांना. आणि आता साहित्यनिर्मिती करायचीये ना जोरात? मग गावचा निवांतपणा माझ्या लिखाणासाठी उत्तम वातावरण निर्मिती करेल बघ. बाकी काही नाही गं... या साहित्यविश्वाच्या उन्नतीसाठी आणि उत्तम साहित्यनिर्मितीच्या दिशेने एक प्रयत्नशील पाऊल उचलावं म्हणून हा निर्णय घेतला."
यावर दोघीही खळाळून काही क्षण हसल्या. हसणं ओसरल्यावर ईंदू म्हणाली,
"आई, पण बाबांचं...?"
"अगं ते तर कित्येकदा सांगत आलेत मला गावी जाऊया आता म्हणून. त्यांना आनंदच होईल बघ. आणि जीवनलाही मीच सांगेन. कौस्तुभचं मात्र तू बघ. अणि सुट्टीत पाठव बरं त्याला गावी..."
ईंदू प्रसन्न हसली. आणि तिला पाहताना बकुळाबाईंना खरोखरच ’मी’ काहितरी केल्याचं समाधान झालं. पायाशी घुटमळणार्या टिपूला त्यांनी प्रेमाने उचलून गोंजारलं.
रात्री सदानंदरावांच्या शेजारी बसून बकुळाबाई सगळं मनातलं भरभरून बोलल्या. सदानंदराव कौतुकानं आपल्या रणचंडिका बायकोच्या हळव्या रुपाकडे पहात होते. सगळं बोलून झाल्यावर त्यांनी थरथरत त्यांचा हात बकुळाबाईंच्या हातावर ठेवला. बकूळाबाईंच्या डोळ्यांतून थेंब निसटला. खालच्याच मानेने त्या सदानंदरावांना म्हणाल्या...
"एक विचारू? हसणार नाही ना?"
"विचार ना. आज एवढ्या वर्षांनी एवढं बोलली आहेस... सगळ्या मनातल्या शंका फेडून टाक."
"मगासपासून एक प्रश्न पडला आहे हो... फार अस्वस्थ करतो आहे. चैन पडू देत नाही. मेंदूवर खूप ताण दिला तरी आठवत नाही..."
"विचार ना अगं. मी उत्तर देऊ शकत असेन तर नक्की देईन."
"...... अहो..... लग्नाआधीचं..... माझं नाव काय होतं हो? माहित्ये तुम्हाला? आठवतंय?"
____________________________________
- मुग्धमानसी.
आवडली.
आवडली.
सरधोपट सुरूवातीनंतर शेवटी
सरधोपट सुरूवातीनंतर शेवटी सिक्सरच मारलात तुम्ही. आवडली कथा
बापरे,वाचता वाचता
बापरे,वाचता वाचता रडवलंत.
मस्तं ,भारी कथा आहे.
खूप आवडली.
अशीच लिहित रहा.
जबर्दस्त.
जबर्दस्त.
झकास . आवडेश….
झकास . आवडेश….
सुंदर! आवडली!
सुंदर! आवडली!
काय बोलू? !!!!!!!!!!!!
काय बोलू?
!!!!!!!!!!!!
कथा आवडली.
कथा आवडली.
धन्यवाद! रिया>> काहीही बोल.
धन्यवाद! रिया>> काहीही बोल. नावे ठेव वाटल्यास.
छान!
छान!
मुग्धमानसी, कथा थोड्या बाळबोध
मुग्धमानसी, कथा थोड्या बाळबोध वळणाची वाटली. पण शेवट मात्र अनपेक्षित आहे म्हणून आवडला! अखेरच्या प्रश्नाचं उत्तर 'नकोशी' असण्याची दाट शक्यता आहे.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद!
धन्यवाद!
कथा आवडली.
कथा आवडली.
छान ....आवडली.
छान ....आवडली.
आवडली कथा.. मस्त लिहिलीय
आवडली कथा.. मस्त लिहिलीय
धन्यवाद!
धन्यवाद!
आईशप्पथ! छान झालीये! शेवट
आईशप्पथ! छान झालीये!
शेवट अगदी अनपेक्षित .... आवडला!
<< आबासाहेब. - सरधोपट
<< आबासाहेब. - सरधोपट सुरूवातीनंतर शेवटी सिक्सरच मारलात तुम्ही. आवडली कथा >>
अगदी अगदी मनातल बोललात.
आवडली
आवडली
मस्त लिहीलीये...
मस्त लिहीलीये...
मस्त लिहिलय... खुप आवडलं ...
मस्त लिहिलय... खुप आवडलं ... खरच 'मी'पणा काढता येईल का ?
खूप धन्यवाद. खरच 'मी'पणा
खूप धन्यवाद.
खरच 'मी'पणा काढता येईल का ?>>> हो. पण आधी त्या 'मी'पणाची जाणीव व्हायला हवी.
मस्त लिहिलय. >>सरधोपट
मस्त लिहिलय.
>>सरधोपट सुरूवातीनंतर शेवटी सिक्सरच मारलात तुम्ही. आवडली कथा<< +१
परत एकदा अप्रतिम..... सहिच...
परत एकदा अप्रतिम..... सहिच...
खुपच छान ! मस्त झाली आहे
खुपच छान !
मस्त झाली आहे कथा .............
आजुन येउ ध्यात ........
खोला आपली पोतडी.........
धन्यवाद!
धन्यवाद!
आवडली कथा. सुरुवात जरा सपक
आवडली कथा. सुरुवात जरा सपक झाली पण नंतर मस्त रंगली.
परत एकदा अप्रतिम.....
परत एकदा अप्रतिम..... सहिच...+१
खूप धन्यवाद!
खूप धन्यवाद!
आवडली कथा.
आवडली कथा.
Pages