ज्याचे खरे नाव 'गुरू नॉट कूल' असायला हवे, अशा गुरूकूल नावाच्या कडक स्कूल बद्दल हा चित्रपट आहे. कडक म्हणजे अभ्यास किती कडक करावा लागतो ते माहीत नाही. आख्ख्या चित्रपटभर एकही वर्ग दाखवलेला नाही, कोणी अभ्यास करतानाही दाखवलेले नाही. पण येथील संचालक अधूनमधून सगळ्यांना हॉल मधे राउंड अप करून रागीट चेहर्याने ‘परंपरा और अनुशासन’ शिकवतो. भाषा अशी की तुलनेत उत्तर प्रदेश भाजप चे अध्यक्ष हाय फाय इंग्रजी बोलत असतील असे वाटावे. कडकपणा एवढाच.
येथे अॅडमिशन घेतल्यावर तुम्हाला बाहेरची दुनिया बंद होते. पण पोरे कधीही गावातील रेस्टॉरंट्स मधे जाणे, गावातील चौकात नाचणे ई. गोष्टी सहज करतात. तसेच या शाळेच्या इतर दारांवर चौकीदार असतात, पण ज्या एका बाजूला एक मुलींचे कॉलेज असते त्या साईडने कोणीही सहज ये-जा करू शकते. हा नारायण शंकर जर अमेरिकेचा अध्यक्ष असता तर त्याने कॅनडाच्या बाजूला भिंत बांधून मेक्सिकोची बॉर्डर मोकळी सोडली असती.
गुरूकुल मधून जर कोणाला काढून टाकले तर इतर कोठेही अॅडमिशन मिळत नाही. आपण एखाद्या संस्थेत काही दिवस होतो हे लपवण्याचे कोणतेही मार्ग भारतात उपलब्ध नसावेत. ड्रॉप घेतला होता वगैरे चालत नसावे. किंवा देशातील प्रत्येक शाळा कोणालाही प्रवेश देताना गुरूकुल कडे "सदर विद्यार्थ्यास आपल्या संस्थेतून कधी निलंबित केले आहे काय, याची माहिती द्यावी" चे अर्ज वेळोवेळी करत असतील. पण एवढे करून आधी काढून टाकलेला शाहरूख पुन्हा तेथेच येतो व तेही विद्यार्थी नव्हे, तर शिक्षक म्हणून (पुन्हा त्याला "तीन विद्यापीठांमधून आमंत्रण" असतेच). एवढ्या कडक संस्थेचा प्रमुख त्याला मात्र केवळ संस्थेच्या आवारात व्हायोलिन वाजवले या क्वालिफिकेशन वर नोकरी देतो. केवळ आपले आडनाव उडवून शाहरूख आपली आधीची ओळख लपवतो. राज मल्होत्रा नावाचा हाकललेला विद्यार्थी राज आर्यन नावाने परत आला तर त्याला कोणीही ओळखत नाही. अमिताभने पाहिलेले नसते (आणि पूर्ण नावही वाचलेले नसते. उत्तरेकडच्या शाळेत राज मल्होत्रा एकच असणार.) पण तेथे इतर शिक्षकही त्याला ओळखत नाहीत. एकवेळ मिशी वाढवून किंवा डावीकडच्या ऐवजी उजवीकडून भांग पाडून आला असता तर समजू शकलो असतो.
तर एकूण हिंदी चित्रपटात सहनायकांवर नेहमी होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे. ही मुख्यतः सहनायकांची प्रेमकहाणी आहे. ती ही सफल होणारी. नाहीतर यांच्या नशिबी नेहमीच अर्धाअधिक चित्रपट हीरॉइनने झाशा दिल्यावर मग तिच्याकडून "मैने तुम्हे कभी उस नजर से देखा नहीं", "तुम मेरे एक अच्छे दोस्त हो" किंवा "भैय्या, आज राखी का त्योहार है" असे ऐकायचे. आणि तिचा रूमाल किंवा तत्सम वस्तू हातात धरून ती फ्रेम मधून बाहेर पडताना तिच्याकडे केविलवाणे बघून एक सामुदायिक सहानुभूती मिळवायची एवढेच काम असते.
अमिताभ, शाहरूख व ऐश्वर्या करत करत यांच्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे त्यांना उप-उप-नायकच म्हंटले पाहिजे. मात्र त्यांचा हा लाँच मूव्ही. त्यामुळे ते लेदर जॅकेट, जीन, गिटार सगळा गणवेश एण्ट्रीला हवाच. किंबहुना जिमी शेरगिल रेल्वेतून उतरतो व जुगल हंसराजला भेटतो तेव्हा तो त्याला पहिले "तुझे गिटार कोठे आहे?" असे विचारेल असेच वाटते. हे दोघे शहाण्यासारखे नॉर्मल डब्यातून उतरतात. मात्र उदय चोप्रा दिग्दर्शकाचा खास आदमी असल्याने उत्तर रेल्वे इंजिनापासून तिसर्या डब्याच्या जागे एक उघडी वॅगन लावते, व हा त्यातून बॅग फेकून मग उतरतो.
प्रत्येकाच्या आणि प्रत्येकीच्या एन्ट्रीला मात्र त्यांच्या पुढून मागे जोरदार वारा नेहमी वाहत असतो. तसेच सारखी ती मेपलची वाटणारी पाने इकडून तिकडे उडत असतात. दिग्दर्शकाला बहुधा "light, camera, fan, leaf blower, action" म्हणावे लागत असेल प्रत्येक वेळी. एकवेळ वासिम अक्रमला वार्याची दिशा ओळखता येणार नाही, पण या हीरॉइन्स बरोबर ओळखतात. त्यात समोरासमोर दोघे असले व दोघांनाही "छा गये" रूपात दाखवायचे असेल तर दोघांच्याही समोरून मागे वारे वाहतात, एकाच दृश्यात. (शाळेत जर आम्ही 'खारे वारे व मतलई वारे एकाच वेळी वाहतात' लिहीले असते तर चालले असते का?)
तसेच काही चित्रपटांत प्रत्येक जण एक 'उसूल' घेऊन येतो हे आपण पाहतो. येथे प्रत्येक जण एण्ट्रीला एक सिग्नेचर बॅकग्राउंड म्युझिक घेऊन येतो. शमिता शेट्टी ("रू रू रू रू..."), शाहरूख ("ला ला ला ला"), प्रीती ("आSSSSSS" चा कोरस) ई.
किमचा एक जुना फोटो असतो जुगल हंसराज बरोबर. त्यावर त्याचे मित्र त्याला पिळतात तेव्हा तो म्हणतो तिच्या वडलांची बदली झाल्यावर ती कोठे गेली माहीत नाही व नंतर कधी भेटलो नाही. बदली झालेल्यांना त्यांच्या ऑफिसमधून नवीन ठिकाणचे पत्ते मिळत नसल्याने व १५-१६ वर्षाच्या मुलांना आपल्या क्रश बद्दल काहीच कुतूहल वाटत नसल्याने ते बरोबर आहे. त्यात तो म्हणतो मी आता भेटलो तरी ती ओळखेल का नाही कोणास ठाऊक (त्या फोटोतला व प्रत्यक्षातला त्याचा चेहरा सारखाच दिसतो हा एक बारीक तपशील महत्त्वाचा नाही.). आता या संवादानंतर ते दोघे भेटायला किती वेळ लागेल असे आपल्याला वाटते? ती त्याच गावात असते, एवढेच नाही तर ते ज्या बाजारात ज्या दुकानात जातात तेथेच तीही आलेली असते.
त्या किम ची एन्ट्री काय वर्णावी! तिच्या स्क्रीची बोलण्यातून एवढे कळते की दुकानदार ती वस्तू दीड रूपयाला आहे म्हणत असतो व ती अडीच रूपयाला मागत असते (सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी 'श्री ४२०' मधे हा विनोद निरागस समजला जात असे. नंतर कोणी वापरल्याचे माहीत नाही). कारण म्हणे तिला 'देढ' व 'ढाई' कळत नसते. एरव्ही ती अस्खलित हिन्दी बोलते, दुसर्याच्या शेर टाईप संवादास त्याच लहेजात प्रत्युत्तर देण्याएवढ्या सफाईने.
हे मूळचे जन्मानंतर बिछडलेले तिळे असावेत अशी शंका येण्याइतपत त्यांच्या आयुष्यातील गोष्टी एकसारख्या व एकाचे-झाले-की-दुसर्याचे-तसेच पद्धतीने घडतात. मुली सापडणे, त्या आवडणे, त्यांचे प्रेम जमणे, मोडणे, परत जमणे हे सगळे एकाच वेळेला क्रमा क्रमाने होते. एकाला एक मुलगी दिसली की लगेच दुसर्याला आणि लगेच तिसर्याला त्यांच्या प्रेमिका नाट्यमय पद्धतीने सापडणार. एका ला प्रेमात अडचण आली की लगेच गावभर प्रेमभंगाचा सीझन. अशाच एका सामुदायिक प्रेमभंग सोहळ्यानंतर शाहरूख त्यांना भेटतो. त्याचे काउन्सेलिंग सेशन साधारण असे झाले असावे:
उदयः "तिला माझ्यात इंटरेस्ट नाही",
शाहरूखः "मग काय झाले. डर बघितला का?"
अलंकारः "तिला एक बॉयफ्रेण्ड आहे",
शाहरूखः "कभी हाँ कभी ना पाहा"
जिमी: "तिचे लग्न झालेले आहे",
शाहरूखः (गूढ हसतो)...
तिघे: "ओह! डर, अंजाम, यू नेम इट..",
येथे शाहरूख च्या चेहर्यावर मुले परीक्षा पास झाल्याचे भाव.
मग तो त्यांना त्याची प्रेमिका काय म्हणायची ते सांगतो:
"मोहब्बत भी जिंदगी की तरह होती है. कुछ मोड मुश्किल होते है, कुछ आसान...
मगर जिस तरह हम कभी जिंदगी का साथ नही छोडते, उसी तरह मोहब्बत का साथ भी नही छोडना चाहिये"!
मग ते तिघे विचारतात ती कोठे आहे, तर तो म्हणतो "ओह, तिने आत्महत्या केली".
ऐश्वर्या राय असले लंबेचौडे डॉयलॉग मारेल असे मुळात वाटत नाही. ती अमिताभची मुलगी. ते दोघे एकमेकांशी मुळात क्वचित बोलतात. त्यात त्या हवाई बेटांवरच्या लिपीत जसे १२ की १५ च अक्षरे आहेत, तसे यांच्या संवादांत दोन तीनच वाक्ये आलटून पालटून येतात. अमिताभने काही चांगले केले की ऐश्वर्या म्हणते
"आप दुनिया के सबसे अच्छे पिता है".
मग अमिताभ म्हणतो, "मै दुनिया का सबसे अच्छा पिता नही हूँ".
उलट त्याला आपले काही चुकले हे लक्षात आले की तो म्हणतो
"मै दुनिया का सबसे बुरा पिता हूँ".
मग त्यावर ती म्हणते, "नही, आप दुनिया के सबसे अच्छे पिता है".
मग लग्नाच्या वयाच्या आपल्या मुलीचे कोणावर तरी प्रेम जमले आहे. त्यात आपल्याच संस्थेत अॅडमिशन मिळण्याइतपत तो चांगला आहे, एवढेच नव्हे तर तेथील लोकांच्या मतानुसार 'बहुत काबिल है और ये जरूर कुछ बनेगा' हे कळाल्यावर कोणत्याही बापाची रिएक्शन होईल तशीच त्याची होते. तो त्याला संस्थेतून हाकलून देतो. त्याचा चेहराही न पाहता. सलीम-जावेद चे स्क्रिप्ट असते तर शाहरूख येथे अमिताभला म्हंटला असता "तुम मुझे एक बाप की हैसियत से निकाल रहे हो या एक प्रिन्सिपल की?"
हिंदी चित्रपटात कोणताही मिलिटरीतील माणूस सर्व काही यथासांग करून मग लष्करात गेलाय आणि व्यवस्थित परत आलाय असे बघितले आहे का? येथे त्या प्रीतीचा नवरा लग्नाच्या दिवशीच सीमेवर जातो. दुसर्या दिवशी जाणे एक वेळ मिलिटरीला चालेल पण हिंदी चित्रपटात चालणार नाही. तो तेथे गायब झाल्याने तो मेला असेच सगळे समजत असतात पण अमरिश पूरी (त्याचे वडील) अजूनही मानायला तयार नसतो. त्याने एवढे हिंदी पिक्चर पाहिलेले व स्वत: अनुभवलेले असल्याने साहजिकच त्याला माहीत असते की 'गायब' झालेला हीरो नंतर कधीतरी उपटतोच. मग नंतर अचानक एक नाच चालू होतो. तेथे प्रीतीला जायचे असते. पण अमरिश पुरी तेथे असल्याने ती जात नाही. मग त्या कुटुंबाचा मानसिक प्रवास वगैरे दाखवला असेल असे तुम्हाला वाटेल - तिचा नवरा परत येत नाही याची खात्री झाल्यावर तिला जो आवडतो आहे त्याबरोबर जाऊ देण्यासाठी. प्रत्यक्षात अमरीश पुरी येऊन तिचे कुंकू पुसतो आणि लगेच ही एकदम खुषीत नाचायला आणि गायला निघून जाते!
एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्षात काहीही चूक दिसत नसताना केवळ तो हीरो नाही म्हणून त्याची फजिती करणे ही प्रथा दिग्दर्शक येथेही पाळतो. ती किम इतकी निरागस ई.ई असते की पूलसाईड पार्टीमधे कदाचित आपल्याला पाण्यात उतरावे लागेल याची तिला कल्पनाच नसते. त्यामुळे तिचा बॉयफ्रेण्ड ("लव्ह ऑफ हर लाईफ") तो दीपक तिला पाण्यात टाकतो आणि इतका वेळ हाय फाय असलेल्या किम ला फक्त पाण्यात पडल्यावर एकदम आपली मर्यादा वगैरेचा साक्षात्कार होतो. आणि ती 'माकारेना' पोज मधे उभी राहते. मग हीरो ने (भुतासारखा चेहरा करून पाण्यात) येऊन आपले जॅकेट काढून तिला घालणे वगैरे सोपस्कार होतात. मग ते दोघे गावातील मुख्य चौकात जाऊन पूलसाईड पार्टीला बोलावून पाण्यात टाकणार्याच्या प्रेमात पडण्याची चूक मी कशी केली याबाबत चर्चा करतात. वास्तविक तिला पाण्यात टाकलेले आवडले नाही हे समजल्यावर त्या बिचार्या दीपकने तिची माफीसुद्धा मागितलेली असते. पण त्याची चूक ही असते की तो हीरो नसतो.
आमच्या कॉलेज मधे दोन नग होते त्यांचे एका परिक्षेत एक सोडून सर्व विषय 'राहिले' होते. त्या एका विषयात त्यांच्यापैकी एकाला १०० पैकी ५७ व दुसर्याला ५६ मार्क होते. तर ५७ वाल्याने दुसर्याकडे बघून तुच्छतेने 'हूं' असे केले त्याची आठवण मला हा पुढचा, आता उदय चोप्रा चा नफ़रत टू मोहब्बत शॉट बघून झाली. ती शमिता शेट्टी उदय चोप्रावर रागावते कारण म्हणे तो एक तोकडे कपडे घालून नाचणार्या मुलीकडे बघत बसतो. वास्तविक ती नाचणारी मुलगी आणि शमिता यांच्या कपड्यात काय तो २-४ धाग्यांएवढाच फरक असतो. मग तो तिला म्हणणार की तुम उसके जैसी नही हो सकती, ती चॅलेंज स्वीकारणार (१ सेमी कपडा कापायला किती वेळ लागतो), मग उदय नुसता बसलेला असताना एकदम तो दोन्ही दिशांना वाहणारा वारा, उडणारी पाने वगैरे आणि मग ती एक शाल गुंडाळून येते. मग ती शाल काढल्यावर कळते की ती 'उसके जैसी' झालेली असते. मला तर आधीची शमिता आणि ही यात काहीच फरक दिसला नाही.
इतर काही महान सीन्स-
- देवाला नमस्कार करणारे भूत या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. कोणत्याही धार्मिक वा हॉरर चित्रपटाला जे जमले नाही ते येथे यांना जमलेले आहे.
- इतर चित्रपटांत कलाकार फुटेज खातात तसे यातील काही जोड्या वारा खातात. कारण एकाच वेळी चालू असलेल्या गाण्यांत तिकडे प्रीतीच्या गच्चीवर तुफान वारा, इकडे लेडिज हॉस्टेल मधे तर इनडोअर हॉल मधे वारा व बाहेर जोरदार पाऊस तर गावातील मुख्य चौकात जुगल-किम उभे असताना वार्याचा मागमूस नाही. "या पिक्चर मधे सर्वात जास्त वारा माझ्याच सीनमधे आहे" अशा मुलाखती नक्कीच दिल्या असतील काहींनी.
- एका गाण्यात मधेच उदय चोप्रा इलेक्ट्रिशियनच्या वेषात लेडिज हॉस्टेल मधे असतो. २-३ पुरूष इलेक्ट्रिशियन्स ना मुलींच्या हॉस्टेल मधे कोणाच्याही देखरेखीशिवाय सहज जाऊ दिले जात असल्याने उदय चोप्रा त्या वेशात तेथे असतो. बाकी मुली ते तेथे नसल्याप्रमाणे वावरत असतात. बहुधा हा नॉर्मल सीन असावा. या गाण्यात नीट कळत नाही, कदाचित ड्रीम सिक्वेन्स असेल. पण जर ड्रीम सिक्वेन्स असेल तर उदय चोप्राला स्वप्नात इलेक्ट्रिशियन का बनावे लागते कळत नाही.
- अमिताभच्या भाषणात एकदा "मैने यहाँ के हर एक स्टुडण्ट को एक समर्थ, संपूर्ण और काबिल इन्सान बनाया है" अशा वाक्याला खाली सबटायटल्स मधे "stronger, fuller and better man" अशी वाक्ये आल्याने मला आजकाल सबटायटल्स मधेही स्पॅम मेल्स येतात की काय अशी शंका आली.
- शेवटी अमिताभने हार मानल्यावर सगळे भांगडा वगैरे करत असताना. आदित्य चोप्रा 'मोहब्बते-२' ची नांदी दाखवतोय का असे मला वाटले- म्हणजे सगळे गुरूकूल नाचगाण्यात मग्न असताना अमिताभ पुन्हा तेथे येतो व तीन विद्यार्थ्यांना अभ्यास करायला शिकवतो व आता तो पुन्हा शाहरूखला हरवतो असा दुसरा भाग.
नंदिनी, सॉलिड आहे हे
नंदिनी, सॉलिड आहे हे
नंदिनी सॉलिड थिअरी..
नंदिनी सॉलिड थिअरी..
नंदिनी........ थिअरी मे दम
नंदिनी........
थिअरी मे दम है !!!
मुहोब्बतें पाहताना आलेला वैताग तुझ्या परिक्षणाने धुवून निघाला.. चक्क सूड बीड उगवल्याचं समाधान ही मिळालं 
फारेण्ड.... मस्त मस्त मस्त............
नंदीनी धम्माल थिअरी
नंदीनी धम्माल थिअरी
देवाला नमस्कार करणारे भूत या
देवाला नमस्कार करणारे भूत या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल>>> हहपुवा
या पिक्चरमधे अॅश भूत आहे हे सर्वांना माहित आहे, पण शाहरूख खान जिवंत आहे याचा काय पुरावा? >>> @नंदिनी... Perfect catch
म्हणून माझी थेअरी अशी आहे की,
म्हणून माझी थेअरी अशी आहे की, शाहरूखदेखील भूतच आहे.>>> शॉल्लेट :-G, सिक्थ सेन्स नंतर असला भारी ट्विस्ट पाहिला नव्हता! तलाश कॉपीकॅट!!!
(No subject)
नंदिनी गुरुकुलात पगार वगैरे
नंदिनी


गुरुकुलात पगार वगैरे कागदोपत्री देत नसतात का? की क्याश?
तोही भूत असता तर तो आणि ऐश्वर्या एकत्र आले नसते का उपहीरोंचे प्रॉब्लेम्स सोडवायला? त्याला अधूनमधूनच दिसते ना ती? की ते इन्सेप्शनसारखं भुतांना दिसणारी भुतं लेव्हल २ प्रकरण आहे.
त्याला अधूनमधूनच दिसते ना
त्याला अधूनमधूनच दिसते ना ती?>>> स्वाती, भूते झाली म्हणून काय झाले? दोघांना स्वतःची पर्सनल स्पेस हवी असते हे आदित्य चोप्राला दाखवायचे असेल. आपल्यालाच हाय लेव्हलचे स्टोरीटेलिंग कळत नाही.
त्या उपहीरोंना मुळात फारसे प्रॉब्लेम नसतात खरे म्हणजे. शमिता शेट्टी चांगली एकटी असते. तिला उदय चोप्राशी जमवायला लावले म्हणजे प्रॉब्लेम सुटला असे समजणे अवघड आहे. किमचा एक चांगला 'लव्ह ऑफ हर लाईफ' असतोच. आता पाण्यात टाकू नको एवढे पटवणे काही अवघड नाही. प्रीती चाच काय तो प्रॉब्लेम असतो. पण तो शाहरूख-ऐश्वर्या सोडवत नाहीत. तिचीच भाभी सोडवते. आणि किमान ती भूत नसावी (अधिक माहिती उपलब्ध होईपर्यंत तसेच समजू)
>> थिअरी
>> थिअरी
टिनपाट पिक्चरवर किती सिरियसली
टिनपाट पिक्चरवर किती सिरियसली चर्चा करताय
मूळ चिरफाड आणि चर्चा तर
फा
फा
जबर लिहिलय
जबर लिहिलय
भूत काय, थिअरी काय... काय
भूत काय, थिअरी काय... काय चाललंय
टिनपाट पिक्चरवर किती सिरियसली चर्चा करताय >>>
हे परिक्षण वाचलं तर
हे परिक्षण वाचलं तर मोहोब्बतेंची आख्खी टिम नफरतें करायला लागेल आणि आत्महत्या करून प्रायश्चित्त करेल.
दक्षे, किंवा सिनेमा वगैरे
दक्षे,
किंवा सिनेमा वगैरे सोडून (पु.लं.च्या भाषेत) "पदयात्रा करत मक्केला जाईल." 
थोडक्यात हा विनोदी सिनेमा आहे
थोडक्यात हा विनोदी सिनेमा आहे तर.....
(शाळेत जर आम्ही 'खारे वारे व मतलई वारे एकाच वेळी वाहतात' लिहीले असते तर चालले असते का?)
>> हे भारीच.
जहबहरीही! फारेंडा महानेस!
जहबहरीही!

फारेंडा महानेस!
शेवटी आता वाचायला वेळ झाला!
शेवटी आता वाचायला वेळ झाला! घरात वाचून दाखवला. हहमुव!
हा नारायण शंकर जर अमेरिकेचा अध्यक्ष असता तर त्याने कॅनडाच्या बाजूला भिंत बांधून मेक्सिकोची बॉर्डर मोकळी सोडली असती.>>>>>>>
एकवेळ मिशी वाढवून किंवा डावीकडच्या ऐवजी उजवीकडून भांग पाडून आला असता तर समजू शकलो असतो.>>>>>>
येथे प्रत्येक जण एण्ट्रीला एक सिग्नेचर बॅकग्राउंड म्युझिक घेऊन येतो.>>>>>>>>>>>>>
"ऐश्वर्या राय असले लंबेचौडे डॉयलॉग मारेल असे........... मग त्यावर ती म्हणते, "नही, आप दुनिया के सबसे अच्छे पिता है".>>>>>>>
अगदी!
सलीम-जावेद चे स्क्रिप्ट असते तर शाहरूख येथे अमिताभला म्हंटला असता "तुम मुझे एक बाप की हैसियत से निकाल रहे हो या एक प्रिन्सिपल की?">>>>> जबरी! हे असलं काही तूच फक्त ट्रॅक करु जाणे!
पण त्याची चूक ही असते की तो हीरो नसतो.>>>>>
देवाला नमस्कार करणारे भूत या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. कोणत्याही धार्मिक वा हॉरर चित्रपटाला जे जमले नाही ते येथे यांना जमलेले आहे.>>>>>>>>

भन्नाट लिहिले आहे
भन्नाट लिहिले आहे
बघायला पाहिजे! )
बघायला पाहिजे! :))
धम्म्माल
धम्म्माल

लॉल !! जबरी !! अनेक पंचेस
लॉल !!
जबरी !!
अनेक पंचेस भारी आहेत..... टू गुड !!
स्वतः ला पट्ट्याने बडवून
स्वतः ला पट्ट्याने बडवून घ्यावे असे वाटले....!

मी ही थेटरात बघितला होता...!!!
मी नववी-दहावीत असताना थेटरात
मी नववी-दहावीत असताना थेटरात पाहिला होता.....असलं वारे वाहणारं, लाल पानं उडणारं कॉले़ज आणि प्रत्येकजण अभ्यास करायच्या ऐवजी प्रेमातच पडतो....मलापण याच कॉले़जला अॅडमिशन हवी होती! पण कॉलेजचा बंडल युनिफॉर्म बघून आपण प्लान कँसल केला
फारएन्ड.....झकास जमलंय!!
अ पासून ज्ञ पर्यंत भन्नाट
अ पासून ज्ञ पर्यंत भन्नाट लिहिलेय.. हहपुवा..
काल रेकॉर्ड करून ठेवलेला
काल रेकॉर्ड करून ठेवलेला 'मोहोबतें' पाहत होते. ते पाहताना जाणवलं की खरा संस्कारी चोप्रा कँप, बडजात्या नोहे.
ऐश्वर्या राय जीव द्यायला गळ्यात मंगळसूत्र घालून कठड्यावर चढते. पण तिच्या बाबांना ते लग्न मंजूर नसल्याने खाली कोसळण्याआधी ते गळ्यातून काढते. मग नंतर शाहरुख खानाभोवती सिनेमाभर बागडताना गळा मोकळा असतो. अखेरच्या दृश्यात सासरा जावई दिलजमाई झाल्यावर पुन्हा भुताच्या गळ्यात मंगळसूत्र येते.
तात्पर्य काय, तर हिरविणीला मेल्यानंतरही लग्नाचे पवित्र संस्कार आणि मंगळसूत्राचे माहात्म्य विसरू न देणारे चोप्रा जास्त संस्कारी!
अरे कसलं भन्नाट लिहिलंय...
अरे कसलं भन्नाट लिहिलंय...
ऐश्वर्या राय जीव द्यायला गळ्यात मंगळसूत्र घालून कठड्यावर चढते. पण तिच्या बाबांना ते लग्न मंजूर नसल्याने खाली कोसळण्याआधी ते गळ्यातून काढते. मग नंतर शाहरुख खानाभोवती सिनेमाभर बागडताना गळा मोकळा असतो. अखेरच्या दृश्यात सासरा जावई दिलजमाई झाल्यावर पुन्हा भुताच्या गळ्यात मंगळसूत्र येते. >>
हे पण लईच भारी.
तात्पर्य काय, तर हिरविणीला
तात्पर्य काय, तर हिरविणीला मेल्यानंतरही लग्नाचे पवित्र संस्कार आणि मंगळसूत्राचे माहात्म्य विसरू न देणारे चोप्रा जास्त संस्कारी! >>>
टोटली. हे लक्षात नव्हते आले.
बाय द वे वरती नंदिनीला शंका आली आहे तसे शाखाही भूत असेल तर 'भूतां परस्परे घडो मैत्र जीवांचे' हे चोप्राने लिटरली घेतले आहे.
Pages