एक 'न्यूट्रल' दिवानेपण (Yeh Jawani Hai Deewani - Movie Review)

Submitted by रसप on 2 June, 2013 - 02:22

'प्यार दिवाना होता हैं..' हे शब्द दस्तुरखुद्द आनंद बक्षी साहेबांनीही जितक्या गांभीर्याने लिहिले नसतील, तितक्या गांभीर्याने हिंदी चित्रपटकर्ते वर्षानुवर्षं घेत आले आहेत. किंबहुना, हे शब्द लिहिले जाण्याआधीपासूनच ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. सुरुवातीला हे फक्त 'दिवाना' असावं आणि नंतर नकळतच त्यापुढे 'च' लागला आणि 'प्यार दिवाना'च' होता हैं..' असं समस्त वुड बी गुल-बुलबुलांचं मत झालं असावं. अनेक दशकांच्या इतिहासातील कुठलाही हिंदी चित्रपट काढावा, त्यातील प्रेमाने 'दिवाने'पणाची झलक दाखवलीच असते किंवा बऱ्याचदा त्याची मर्यादाही ओलांडलेली असते.
हे इतकं बिंबवलं गेलं आहे की पडद्याबाहेर खरंखुरं आयुष्य जगणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्यांनाही 'दिवानेपण' ही प्रेमाची मूलभूत आवश्यकता असते, असंच वाटत असतं. कुठे तरी ह्याच 'दिवाने'पणातून विजोड जोड्या जोडल्या जात असाव्यात.
पण मित्रांनो, बहुतेक चित्रपट अर्धवट शिक्षण देतात. ते फक्त लग्न ठरेपर्यंत किंवा फार तर होईपर्यंतची कहाणी सांगतात. क्वचित प्रसंगी लग्नानंतरचं एखाद-दुसरं भांडण दाखवतात. बंद दरवाज्याच्या आड घडणाऱ्या शाब्दिक, वैचारिक व मानसिक कुस्त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा 'दिवाने'पण करावं लागतं. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून !

असो. तर असंच अर्धवट शिक्षण देतो 'यह जवानी हैं दिवानी'.

नयना (दीपिका पदुकोन) एक हुश्शार मुलगी. मेडिकलच्या अभ्यासात नाकावरच्या चश्म्यापर्यंत बुडालेली आणि गुदमरणारी. आदिती (कल्की कोच्लीन) एक टिपिकल 'टॉम बॉय', कबीर उर्फ बनी (रणबीर कपूर) एक टिपिकल बॅकबेंच टॅलेण्ट आणि अवि (आदित्य रॉय कपूर) त्याची टिपिकल 'सप्लिमेण्ट'; ह्या त्रिकुटासोबत एका ट्रेकिंग कॅम्पसाठी नयना मनालीला जाते. कॅम्पदरम्यान मनमौजी बनीची तिला जबरदस्त भुरळ पडते आणि एक मेडिकलची विद्यार्थिनी एका सडाफटिंगच्या प्रेमात पडते. ती पडणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असतं पण पडेपर्यंतचा प्रवास खूप मजेशीर केला आहे. काही प्रसिद्ध वक्तव्यांची हिंदी भाषांतरं, ठसकेबाज गाणी आणि चौघांचाही सहज वावर गुंतवून ठेवतो.
पण मध्यंतराच्या जरासं आधी महत्वाकांक्षी 'बनी'तला जबाबदार 'कबीर' जागा होतो आणि कुठल्याश्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी तो अमेरिकेला जाणार असल्याचं कळतं. तो मध्यमवर्गीय घरातला असल्याने त्याच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची आवश्यकता असणार, हे चाणाक्ष कथालेखकाने ताडलं होतं म्हणून तीदेखील त्याला मिळालेली असते. त्याच्यासारख्या कॉपी करून पास होणाऱ्या डफ्फळशंखाला शिष्यवृत्ती कशी काय मिळते, ह्याचा विचार चाणाक्षमती करत नाही.
बनी, त्याला आयुष्याकडून हव्या असलेल्या 'रफ्तार'साठी निघून जातो, नयना अव्यक्त राहते आणि आदिती-अवि मागे पडतात. इथे मध्यंतर होतं आणि मध्यंतरानंतरचा बहुतेक भाग आपल्याला एक लग्नाची सीडी दाखवली जाते. आदितीचं लग्न. 'तरण'शी (कुणाल रॉय कपूर). एका मोठ्या च्यानलचा एक महत्वाचा कॅमेरामन बनलेला बनी, जगाच्या कुठल्याश्या कोपऱ्यातून जिवलग मैत्रिणीच्या लग्नाला येतो आणि पुन्हा नयनाला भेटतो. 'सोये अरमान' जागे होतात आणि व्हायचं ते होतं. ते होणार असतं हे आपल्याला माहित असतं पण होईपर्यंतचा प्रवास उगाच वेळकाढूपणा करत राहातो.
अखेरीस पाच जणांत दोन जोड्या बनतात आणि एक बेवडा उरतो. पण सगळे खुश होतात. लग्न लागल्या लागल्या उपस्थितांना जेवणाची ओढ लागते आणि सगळे पंगतीकडे पळतात तसं चित्रपट संपून श्रेयनामावली सुरु होईपर्यंत अर्धं थेटर रिकामं झालेलं असतं.

श्रवणीय संगीत कुणाचं आहे, ही उत्सुकता शमविण्यासाठी आपण श्रेयनामावली पाहातो आणि तिथे 'प्रीतम' वाचल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो.
आटोपशीर 'वेक अप सिड' च्या तुलनेत 'यजहैंदि' त अयान मुखर्जी जरा अघळपघळच झाला आहे.
'कल्की' हळूहळू रमायला आणि रमवायला लागली आहे. तिच्यातला अतिसाधारणपणा आपलासा वाटतो.
दोघे 'रॉय कपूर' एकदम फिट्ट !
'दीपिका' इतकी गोड दिसते की बनी तिच्या प्रेमात पडला नसता तर काही तरी गडबड वाटली असती. अजूनही तिची ती भुवया आवळून बोलण्याची सवय काही जात नाही. पण तिचं गोंडस हसू आवळलेल्या भुवयांकडे लक्ष जाऊ देत नाही.
चित्रपट रणबीरचा आहे. बाकी सगळे सपोर्ट कास्ट असावेत. कुठेही तो त्याच्यावरील जबाबदारीसाठी कमी पडत नाही. 'बदतमीज दिल' मधला त्याचा नाच असला दिलखेचक वाटला की कधी तरी त्याला आणि हृतिकला एकत्र नाचताना पाहायला मिळेल का? असं काही तरी मनात आलं.
बनी-आदिती-अवि मधल्या मैत्रीची काही दृष्यं खूप भावतात. त्यांच्यातली घट्ट वीण अदृश्य असली तरी जाणवत राहाते.
माधुरीची 'मोहिनी' अजून कायम आहे. पन्नाशीच्या कंबरेत आजही जबरी दम आहे. तिचं गाणं अगदी म्हणजे अगदी उपरं असलं तरी ती असल्यामुळे मजा येते, हे विशेष !

पाण्यात बुडवल्यावर लिटमस कागद रंग न बदलता उदासीन राहातो, तसा हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक जसा आत जातो, तसाच बाहेर येतो. हा चित्रपट काळजात घुसत नाही पण डोक्यातही जात नाही. तो जादू करत नाही पण अत्याचारही करत नाही.
अडीच तास निरागस चेहऱ्याच्या रणबीरला आणि गोंडस चेहऱ्याच्या दीपिकाला पाहून वेळ नक्कीच वाया जात नाही !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/yeh-jawani-hai-deewani-movie-revi...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ये जवानी है दिवानी आवडला. मुळात जूनच्या पहिल्या आठवड्यात रीलीज झाल्याने या सिनेमाचा टारगेट ऑडियन्स बरोबर पकडला गेलाय. अयान मुखर्जीकडून वेक अप सिदनंतर अपेक्षा जरा उंचावल्या होत्या. पण यामधे किंचितसा अपेक्षाभंग होतो. खासकरून गाणी कुठलीच सिच्युएशनला फिट बसत नाहीत. उलट एक दोन हळूवार सिच्युएशनला छानसं रोमँटिक गाणं हवं होतं असं वाटलं. तसं कहाणीमधे काहीही नावीन्य नाही. मात्र, नावीन्य असलंच तर ते ट्रीटमेंटमधे नक्कीच आहे. खरंतर ही कहाणी नैना आणि बनी या दोघांचीच नाही, ती अदिती- अविची देखील आहे. (प्रमोशनमधे हा भाग पूर्णपणे इग्नोर केला होता. व्हेरी बॅड!)

आपण ज्या मुलावर प्रेम करतोय तो मुलगा लूझर आहे, त्याच्याकडून आयुष्यात काहीही होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर समजूतीने दुसर्‍या एका मुलाशी अरेंज मॅरेज करणारी त्यामधे कुठेही त्याग अथवा दु:ख वगैरे न मानणारी अदिती मला खूप आवडली. उलट तिच्या लग्नामधे अवि आल्याचा तिला खूप आनंददेखील झालाय. आपण आता कॉलेजमधले टीनेजर्स नाही आहोत आणि अता यापुढे तिघान्च्या तीन वाटा तीनकडे हे वास्तव सर्वात आधी ती स्वीकारते. ज्या मुलाशी ती लग्न करतेय त्याला या सर्वाची कल्पना आहे पण तो दाखवून देत नाही. दोघांकडेही तितका समजूतदारपणा आहे.

बनी आणि नैना दोघांनाही आयुष्याकडून काय हवंय ते नक्की माहित आहे. त्यादृष्टीने त्यांनी त्यांच्या आयुष्याची आखणी केली आहे. आयुष्यामधे "प्रेम" या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे दोघांनीही पूर्णपणे स्वीकारलेले आहे- खास करून नैनाने. बनी अमेरिकीला जाणार हे समजल्यावर ती आपलं प्रेम व्यक्त करत नाही पण आठ वर्षांनी आपल्या मनातल्या भावना बिनदिक्कत त्याला ती सांगू शकते. नंतर "आपण एकत्र राहणं शक्य नाही" हेदेखील तीच त्याला पटवून देते. बनी आयुष्यामधे कधीही कन्फ्युज नाही. त्याला प्रेम करायचं नाही, यामागे कसलंही पुचाट तत्वज्ञान नाही, त्याला प्रेमापेक्षा इतर गोष्टींमधे जास्त इंटरेस्ट आहे. जेव्हा तो प्रेमात पडतो तेव्हादेखील तो प्रेम, करीअर आणि एकंदर आयुष्य याबद्दल खूप क्लीअर आहे.

असे भावनाप्रधान जेन वाय चित्रपट असले की क्लायमॅक्सला हमखास काहीतरी ड्रामा करून वाट लावलेली असते. (आठवा: जानेतूया जाने ना चा तो एअरपोर्ट सीन) तसलंच काहीतरी आता घडणर याची मला खात्री होती. पण क्लायमॅक्सच्या सीनसाठी अयान मुखर्जीला शंभरपैकी एकशेदहा मार्क. अगदी साधा सरळ आणि सुटसुटीत रीत्या चित्रपट संपवलाय.

रणबीर कपूर नैसर्गिकरीत्या काम करतो म्हणून खूप आवडतो. या चित्रपटामधे पण त्याचं काम सहज आहे. नृत्य आणि कॉमिक टायमिंगमधे तर तो अव्वल आहेच. पण इमोशनल सीन मधे पण तो मॅच्युअर्ड काम करतो.

दीपिका सरप्राईज म्हणून चक्क छान काम करते. एक स्कॉलर मुलगी म्हणून तिला दिलेला लूक देखील खूप साजेसा आहे. (उगाच ते दोन वेण्या, पंजाबी ड्रेस वगैरे क्लिशे नाहीत) मिनि स्कर्ट स्लीव्हलेस हे सगळं ती वापरते. अदिती टॉमबॉय म्हणून आणि नंतर नवरी म्हणून पण खूप चांगली दिसते आणि काम करते. तिचे हिंदी उच्चार पण बरेच सुधारले आहेत. आदित्य रॉय कपूरचे काम पण व्यवस्थित. लूझर बेवडा जुगारी म्हणून तो शोभतो खरा. कुणाल रॉय कपूरला जास्त काम नाही, पण जेवढं आहे तेवढं चांगलं. ती लारा नावाची कोण आहे तिचं बोलणं डोक्यात जातं पण अशा मुली खरोखरच अशा बोलत असतात.

माधुरीचं आयटम साँग असून नसून सारखंच आहे. माधुरी जाड दिसतेच पण तिचे ड्रेसेस फार विचित्र घेतलेत. एकही आवडला नाही. मला कोरीओग्राफी विशेष आवडली नाही, मात्र रणबीर माधुरीच्या स्टाईलमधे नाचू शकतो हे मात्र खरं. मला मधेच एकदातरी माधुरीची "चोली के पिछे" मधली ती घागरा फिरवायची स्टेप घ्यायला हवी होतं असं वाटलं होतं. ती स्टेप कमाल होती, आणि या गाण्याला परफेक्ट होती. कोरीओग्राफर फराह खान असूनपण गाण्यात मसाला फार कमी आहे. बदतमीझ दिल रेमोने कोरीओग्राफ केलंय आणि ते पूर्ण गाणं धमाल आहे. रणबीरला नाचताना बघून शम्मीची आठवण आली मलातरी.

अभिनेत्यांमधे तीन उल्लेख मानाचे आहेत. फारूख शेख- तीनच सीन आहेत पण जेवढे आहेत त्यामधे कमाल आहे. दुसरा महत्त्वाचा उल्लेख तन्वी आझमी. अत्यंत गोड चेहर्‍याची अभिनेत्री कायम समजूतदारच दिसते त्यामुळे तिला तसेच रोल येतात आणी इथे तर तिला चक्क सावत्र आईचा रोल आलाय. पण बनी नंतर घरी परत येतो त्या सीनमधे तिचं काम खूप छान आहे. आणि त्या मॉलच्या एकमेव सीनमधे डॉली अहलूवालिया (बरोबरे का नाव? विकी डोनरमधली) छा जाती है. अदिती आणि नैनामधला फरक लगेच टिपत दाखवून देत ती भन्नाट एक्स्प्रेशन्स देते. खासकरून "ये दोस्त है तुम्हारी" ते "ओह. स्कूलमे साथ थे" या डायलॉगच्या दरम्यान. टू गूड.

एकंदरीत सिनेमा पैसावसूल वाटला तरी.

त्याच्यासारख्या कॉपी करून पास होणाऱ्या डफ्फळशंखाला शिष्यवृत्ती कशी काय मिळते, ह्याचा विचार चाणाक्षमती करत नाही.
<< रसप, अगदीच चुकीचं निरीक्षण. सिनेमामधे सुरूवातीपासून बनीमधला "फिरस्त्या" दाखवला आहे. तो अचानक जागा होत नाही. अगदी फारूख शेखसोबतच्या सीनमधे पण तो महत्त्वाकांक्षी दिसून जातोच. हां.. आता ओम जय जागदीशमधल्या फरदीनसारखा तो "मुझे दुनियाकी फास्ट गाडी बनानी है" हे बोलून सांगत नाही. पण त्याच्या कृतीमधून दिसत राहतंच की. शिवाय नैनाला तो स्वतःची नोटबूक काढून कुठे फिरणार आहे ते सांगत असतो की. अगदी ट्रेकम्धे पण त्याला हरायचं नसतं. तो पुस्तकी किडा नाही, पण मूर्ख बावळटदेखील नाही उलट, चांगला स्ट्रीट-स्मार्ट दाखवलाय.

मनालीमधे देखील फिरताना तो फोटो काढत त्याचं कोलाज बनवताना दाखवलाय. कॉपी करत होता हे दिपीका त्याला चिडवण्यासाठी म्हणते, याचा अर्थ तो कायम कॉपीच करत होता अथवा त्याचा आयक्यु लो आहे असा होत नाही. शिवाय त्याला अ‍ॅडमिशन आणि स्कॉलरशिप जर्नालिझमसाठी मिळते कारण इथे मार्कांपेक्षा जास्त महत्त्व क्रीएटीव्हीटीला दिलेलं असतं.

ते होणार असतं हे आपल्याला माहित असतं पण होईपर्यंतचा प्रवास उगाच वेळकाढूपणा करत राहातो.
>>> इथे ते झाल्यानंतर "पुढे काय?" हा प्रश्न प्रेक्षकासोबत लेखकालादेखील पडतो आणि इथेच चित्रपट थोडा वेगळा ठरतो. आधी लिहिलं तसं क्लायमॅक्सला शंभरपैकी एकशे दहा मार्क.

नंदिनी........

'स्पॉईलर वॉर्निंग' द्या....!! तुम्ही तर माझ्याही पुढे जाऊन अख्खा सिनेमा सांगितलात की!

तुम्ही तर माझ्याही पुढे जाऊन अख्खा सिनेमा सांगितलात की!<<< सिनेमा कसा वाटला अथवा कसा जाणवला हे सांगणं वेगळं आणि सिनेमाची सरधोपट कथा सांगणं वेगळं. आय नो द डिफरन्स बीटवीन टू. डोन्ट वरी.

माधुरीच्या गाण्याआधी तो ट्रॅव्हल शो वाल्याना मदत करताना दाखवलाय ,अगदी सुरवातीपासुन महत्वाकांक्षा अधोरेखित होते, त्यामुळे ते स्कॉलरशीप मिळणे जस्टीफाय होते

आवडला.... रणबीर एकदम झकास Happy बदतमीज गाण्यातल्या डान्सवर टोटल फिदा आपुन तो Happy
शेवट फारच ताणलाय. कल्कीच्या लग्नात सगळे उठसुठ बीअरच्या बाटल्या घेऊन बसतात ते बघूनच कंटाळा आला.

सिनेमा कसा वाटला अथवा कसा जाणवला हे सांगणं वेगळं आणि सिनेमाची सरधोपट कथा सांगणं वेगळं. आय नो द डिफरन्स बीटवीन टू. डोन्ट वरी.>>>>>>>>>> डिफरन्स बीटवीन टू माहित असुनहि तुम्हि सिनेमाची सरधोपट कथा सांगलीतली की!

मला रसप आणि नंदिनी दोघांचे रिव्ह्यू आवडले. मी सिनेमा बघणार आहे आणि मला तो आवडणार आहे हे मला समजलं आहे Happy

मला वाटत नाही दोघांनी सिनेमाची पूर्ण कथा लिहीली आहे...रसप ने चित्रपट का बघू नका ते सांगितले आहे आणि नंदिनीने का बघावा ते...
आता लोकांचा कल कशाकडे आहे ते त्यांनी ठरवायचे आहे...

असेही हा काय सस्पेन्स सिनेमा नाही...त्यामुळे कथा कळली तरी ती नक्की कशी मांडलीये ते पहायची उत्सुकता असेलच ना...

नंदिनीचा रिव्ह्यू जास्त आवडला

नंदिनी, रिव्यू मस्त! कल्की ची पर्सनॅलिटी बॉलीवूडी कमर्शियल हीरॉइन शोभेल अशी नाही. मला वाटते ती काही लोकांना जबरी आवडेल आणि काहींना अजिबात नाही. मी दुसर्‍या प्रकारांमधे Happy

नंदिनी, घागरा स्टेप बद्दल १०० मोदक. >> मी ते गाणे ओन-लाईन पाहिले आहे. सरोज खान नेहमी काही 'सिग्नेचर' स्टेप्स देते. इतक की 'डंब शेराद्स' मध्ये एक स्टेप वरून सिनेमा ओळखावा. ह्या गाण्यात तस काही वाटल नाही. (फरहने पण तसच कराव अशी माझी भाबडी अपेक्षा) दोन चांगले कलाकार वाया घालवले अस वाटल. इतपतच नाचायचं होत तर विद्या बालन पण खूप शोभली असती. राहून राहून 'मखना'ची आठवण आली. कमी नाच होता तरी काय धमाल केलीये माधुरीने अमिताभ आणि गोविंदाबरोबर!!

मला या सिनेमाबद्दल एकदम दोन टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या... टीनएजर्स किंवा त्याच्या आसपासाच्या वयाच्या मंडळींच्या प्रतिक्रिया तरी बहुतेक करुन चित्रपट आवडल्याच्या होत्या.... काहीकाही जण तर मस्ट वॉच आहे असे म्हणताना मी ऐकले... पण इतर एज ग्रुपमधल्या बहुतांश प्रेक्षकांनाकडून तर एकदम रटाळ आणि ताणलेला आहे असे कळले!

नंदिनी ++++++१... मी तुझ्या पोस्ट शी एकदम सहमत आहे.
मला काही सीन्स फार आवड्ले... मनालीला होणारी मारामारी... कल्की ची प्रतिक्रिया अविला बघुन...
मस्त टाइमपास...

राहून राहून 'मखना'ची आठवण आली. कमी नाच होता तरी काय धमाल केलीये माधुरीने अमिताभ आणि गोविंदाबरोबर!!>> सिमंतीनी, गोविंदा आहे त्या गाण्यामधे. गोविंदा म्हणजे अशा गाण्यांमधे एकदम फुलटू मस्ती. अमिताभपेक्षा गोविंदा आवडतो त्या सिनेमामधे.

डीजे, ती कॉमिक स्ट्रीप एवढी खास वाटली नाही मला. याआधीच्या एक दोन एकदम धमाल होत्या, पण अता तोचतोच पणा आलाय.

फा, कल्कीसारख्या मुलीला शोभतील असे रोल आहेत हेही नसेल थोडके. Happy

चित्रपट ठीकठाक.पण तरूणाईला जास्त आपला वाटू शकेल. रणवीर्,दिपिका कल्कीसह सगळ्यांचीच कामे चांगली आहेत. मात्र फारूक शेख ने एकाच सीन मध्ये आख्खा सिनेमा जिंकलाय..दिपिका ज्या पध्दतीने बोलते. ते एकून रीमा लागूची आठवण होते. अगदी सेम स्टाईल ! Wink

>>>आपण ज्या मुलावर प्रेम करतोय तो मुलगा लूझर आहे, त्याच्याकडून आयुष्यात काहीही होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर समजूतीने दुसर्‍या एका मुलाशी अरेंज मॅरेज करणारी त्यामधे कुठेही त्याग अथवा दु:ख वगैरे न मानणारी अदिती मला खूप आवडली. उलट तिच्या लग्नामधे अवि आल्याचा तिला खूप आनंददेखील झालाय. आपण आता कॉलेजमधले टीनेजर्स नाही आहोत आणि अता यापुढे तिघान्च्या तीन वाटा तीनकडे हे वास्तव सर्वात आधी ती स्वीकारते. ज्या मुलाशी ती लग्न करतेय त्याला या सर्वाची कल्पना आहे पण तो दाखवून देत नाही. दोघांकडेही तितका समजूतदारपणा आहे. <<<

हा पॅरा वाचून नवल वाटले. प्रेमात इतकी ताकद असते की पराजितातून विजेता निर्माण केला जाऊ शकतो. टीन एज संपून गेल्यानंतर येणार्‍या परिपक्वतेला तर हे नक्कीच जाणवायला हवे. किंबहुना, आपण ज्याच्यावर प्रेम करतोय तो लूझर आहे हे समजल्यावर वाटा बदलणे हा स्वार्थ वाटतो. (म्हणजे चित्रपटातील ते पात्र तसेच आहे असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल तर गोष्टच वेगळी, पण त्या कथानकातून त्या पात्राचा नेमका तो स्वभावविशेष प्रेक्षकाला आवडणे हे पटत नाही, पटत नाही म्हणण्यापेक्षा आवडले नाही).

भाषण समाप्त!

-'बेफिकीर'!

त्या पात्राचा नेमका तो स्वभावविशेष प्रेक्षकाला आवडणे >> आवडणे न आवडणे हे सापेक्ष तर आहेच, पण यापुढे जाऊन त्या आवडण्याला 'रिलेट करू शकणे', 'ते पात्र आपल्याच आजूबाजूला (किंवा स्वतःतच) बघितलेलं असणं', 'ते पात्र साकारलेला अभिनेताच मुळातून आवडत असणं', 'दिग्दर्शकाला ते पात्र तसंच दाखवायचं असल्याचं पटणं' असे अनंत पोत असू शकतात की.

आदर्शवाद आला की आवेश आणि अभिनिवेश आपोआप येतात. एकुणच प्रकरण वास्तवापासून मग दूर दूर जात राहतं, आणि त्याचे आपल्याशी लागेबांधे राहत नाहीत. हेच आजकाल लोकांना (विशेषतः नव्या पिढीला) आवडत नाही, हे चांगलं लक्षण आहे.

"ये जवानी है दिवानी" चित्रपट बघितल्या नंतर मुलगा घरी येउन वडिलांना डायलॉग मारतो...
.
.पापा... मै उडना चाहता हु.... गिरना चाहता हु....... डुबना भी चाहता हु...बस.........रुकना नही चाहता...!!!"

वडीलः हा घे मोबाईल....."TEMPLE RUN" खेळ.... Biggrin

आपण ज्या मुलावर प्रेम करतोय तो मुलगा लूझर आहे, त्याच्याकडून आयुष्यात काहीही होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर समजूतीने दुसर्‍या एका मुलाशी अरेंज मॅरेज करणारी >>>> अरर्र तसं नाहिये ते, मुळात त्या मुलाचं कल्कीवर प्रेमच नसतं, एका सिन मधे ती म्हणते देखिल, की त्या रीलेशन मध्ये मी एकटिच होते, त्याला ह्या गोष्टीचा पत्ताच नसतो. तो तिच्या डोळ्यादेखत दुसर्या मुलिंशी लगट वगैरे करत असतो. मग एकतर्फी रिलेशन मधे कल्कीनी उगाच झुरत राहण्यात काय अर्थ आहे, म्हणुन मग ती जिवनात मुव्ह ऑन करते आणि साजेश्या मुलाला लग्नासाठी होकार देते.

आदर्शवाद आला की आवेश आणि अभिनिवेश आपोआप येतात. एकुणच प्रकरण वास्तवापासून मग दूर दूर जात राहतं, आणि त्याचे आपल्याशी लागेबांधे राहत नाहीत. हेच आजकाल लोकांना (विशेषतः नव्या पिढीला) आवडत नाही, हे चांगलं लक्षण आहे.
<<< साजिरा, Happy नेमक्या शब्दांत परफेक्ट लिहीले आहेस.

अगदी अगदी @aashu29..

तो 'लूझर' आहे म्हणून ती त्याला सोडून देते/ त्याचा नाद सोडते अश्यातला भाग नाहिये. ती त्याच्यावर प्रेम करत असते, पण ते त्याला माहित/ कळत नसतं आणि तो मिळेल त्या मुलीच्या मागे डोळ्यातून लाळ वाहवत फिरत असतो . 'प्रेम' ह्या संकल्पनेवर त्याचा विश्वास नसतो. त्याच्यासाठी प्रेम म्हणजे 'वन नाईट स्टॅण्ड' वगैरे असावं, असं दाखवलं आहे. अश्या परिस्थितीत कुणीही चाणाक्ष मुलगी जो निर्णय घेईल, तोच निर्णय आदिती (कल्की) घेते. त्या निर्णयाचा अवि 'लूझर' वगैरे असण्याशी संबंधच नाहीये!

अयान मुखर्जीने साफ निराशा केलीय या सिनेमात. वेक अप सिड मधे दिसलेला फ्रेशनेस ये जवानी मधे अजिबात नाही. टिपिकल धर्मा प्रॉडक्शन्सचा चकचकाट आणि दिखावूपणा भरपूर आहे.

सुरुवातीचा चित्रपट ट्रेकिंगच्या हास्यस्पद दृश्यांनी व्यापलेला आहे. त्यातली मनाली गावातली लांबलचक मारामारी कंटाळवाणी. मिनी स्कर्ट्स आणि हॉटपॅन्ट्स घालून ट्रेकिंग करणार्‍या,सॅक अजिबात न घेता (उदा. दीपिका) किंवा लहानशी किडिश सॅक पाठीवर घेऊन मुली बर्फाचे डोंगर चढताहेत, तेही फुल मेकपमधे, असं दाखवण्याइतका अजूनही कमर्शिअल सिनेमातले दिग्दर्शन इम्मॅच्युअर आहे हे पाहून हसावे की रडावे कळत नाही. शिखरावर पोचल्यावर रणबीरच्या डोक्यावर कान-नाक झाकणारी टोपी आणि दीपिकाचे केस हवेत दखवायची हे कशाला? तिलाही टोपी घालायला दिली असती तर सिनेमाचा ग्लॅमर कोशन्ट ढासळला असता का?
अयान मुखर्जीसारख्या नव्या पिढीच्या दिग्दर्शकानेही अशा दोन दशकांपूर्वीच्या तडजोडी सिनेमात दाखवणे खेदजनक आहे.

सिनेमाच्या सुरुवातीच्या दहा मिनिटांमधे, ट्रेक सुरु होईपर्यंतच्या काळात अपेक्षा खूप उंचावतात आणि मग त्या पुर्‍या होत नाहीत. खोलवर काही स्पर्शूनच जात नाही. सगळं उथळ.

आठ वर्षांच्या लिपनंतर अदितीचे (कल्की) कॅरेक्टर सोडले तर एकाही कॅरेक्टरमधे ग्रोथ नाही. ही लिप दोन वर्षांचीही चालली असती. ट्रेकिंगला गेल्यावर मोकळं वाटलं,आयुष्याकडे खुलेपणाने कसं बघावं हे कळलं असं सांगणारी नैना नंतर रणबीरच्या देशविदेश भटकण्याच्या आवडीवर का स्केप्टीकल दाखवली कळत नाही. उलट तिला त्याच्यासोबत जाऊन आयुष्याचा खुलेपणा अनुभवावा असं का वाटत नाही?
तेज रफ्तार हवीशी वाटणारा रणबीर कुठेही त्या आयुष्याला कंटाळलेला वाटत नाही पण तरी तो प्रेमात पडल्यावर त्याचा ड्रीम जॉब सोडून देतो हे कृत्रिम वाटते. त्यापेक्षा ओपन एन्ड हवा होता असे प्रकर्षाने वाटले.

सिनेमातले प्रसंग तुकड्या तुकड्यांनी येतात आणि नको इतकी गाणी रसभंग करतात. बदतमीज दिल गाणं बेस्ट. रणबीर सही नाचतो. दिल्लीवाली गाणं ठिकठाक.प्रोक्मोमधे जस्त बरं वाटतं. घागरा गाण्याची कोरिओग्राफी फारच कल्पनाशून्य. अयान मुखर्जी तयार नव्हता हे गाणं घ्यायला, करण जोहरने जबरदस्ती केली असं मुलाखतीत वाचलं होतं. एकंदरीतच या सिनेमात अयान मुखर्जीवर करण जोहरचा नको इतका छाप आहे हे जाणवत रहाते.

दीपिका पडुकोण आणि कल्की दोघी आवडल्या. रणबीर कपूरची अ‍ॅक्टींग स्टाईल प्रेडिक्टेबल वाटते. त्याचा प्रेझेन्स आनंददायी असतो आणि दायलॉग डिलिव्हरीचे त्याचे टाइमिंग सुपर्ब आहे हे मात्र खरं.

एकंदरीत सिनेमा मिडिऑकर आणि अगदीच टिपिकल कमर्शियल सिनेमांसारखा आहे. अपेक्षा न ठेवता पाहीला तर आवडेल.

रसप आवडला रिव्यु. तसही स्टोरी सांगितली नसती तरी कळलीच असती.
नंदिनी, तु सिनेमाचे रिव्यु प्रोफेशनली लिहायला सुरुवात कर(लिहित नसशील तर). इतका मस्त लिहिलायस रिव्यु. Happy

साजीरा, शर्मिला नेहमी प्रमाणे मस्तच लिहिलयं.

रणबीर आवडतो अतिशय. त्यामुळ बघणारच मुव्ही. इथे दोन टोकाचे रिव्यु वाचल्यामुळ आणखीणच उत्सुकता वाटती आहे.

नैना नंतर रणबीरच्या देशविदेश भटकण्याच्या आवडीवर का स्केप्टीकल दाखवली कळत नाही. >> असं नाही वाटलं. तिला कुटुंब, आपले घर, आपली माणसे हे हवय. बनीच्या वेगवान आणि फिरस्त्या जीवनात ते जमणं कठीण आहे असं तिला वाटतय. आपल्याला आणि बनीला आयुष्यात काय हवय हे तिला व्यवस्थीत माहीती आहे. त्या दोन लाईफ स्टाइल्स एकत्र येणे कठीण आहे हे पण तिला माहीती आहे. म्हणून ती 'देशविदेश भटकण्याच्या आवडीवर' नाही तर आपले प्रेम व्यक्त करण्याबाबत स्केप्टीकल आहे.

शेवट मोकळाच आहे की. नैनाला बनीला वर्षातून दोन महिने 'घरी' असला तरी चालणार आहे तर बनीला आता नैनाला घेऊन जग फिरायचय. दोघांपैकी कोणीही आपली लाइफ स्टाइल सोडतच नाहीयेत. रॅशनलच आहे की हे. आता असं नातं कितपत टिकेल हा वेगळा मुद्दा पण तो सिनेमाच्या कक्षेत नाही.

एकंदरीतच या सिनेमात अयान मुखर्जीवर करण जोहरचा नको इतका छाप आहे हे जाणवत रहाते >> अगदी अगदी. तो श्रीमंती, चकाचक बॅकड्रॉप नसता तर सिनेमा अधीक छाप पाडू शकला असता.

एक गोष्ट लक्षात घेतली का ??????????? चित्रपटाच्या सुरुवातीला ... नाव नव्हतीत........फक्त थँक्स ज्यांना द्यायची होतीत त्यांची नाव दिलेली........
बाकी सगळ्यंची (हिरो हिरोईन सकट ) चित्रपटाच्या शेवटी दिलेली....... Happy

- - - - - - - - - - - - - - - - - -- -

Pages