एक 'न्यूट्रल' दिवानेपण (Yeh Jawani Hai Deewani - Movie Review)

Submitted by रसप on 2 June, 2013 - 02:22

'प्यार दिवाना होता हैं..' हे शब्द दस्तुरखुद्द आनंद बक्षी साहेबांनीही जितक्या गांभीर्याने लिहिले नसतील, तितक्या गांभीर्याने हिंदी चित्रपटकर्ते वर्षानुवर्षं घेत आले आहेत. किंबहुना, हे शब्द लिहिले जाण्याआधीपासूनच ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. सुरुवातीला हे फक्त 'दिवाना' असावं आणि नंतर नकळतच त्यापुढे 'च' लागला आणि 'प्यार दिवाना'च' होता हैं..' असं समस्त वुड बी गुल-बुलबुलांचं मत झालं असावं. अनेक दशकांच्या इतिहासातील कुठलाही हिंदी चित्रपट काढावा, त्यातील प्रेमाने 'दिवाने'पणाची झलक दाखवलीच असते किंवा बऱ्याचदा त्याची मर्यादाही ओलांडलेली असते.
हे इतकं बिंबवलं गेलं आहे की पडद्याबाहेर खरंखुरं आयुष्य जगणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्यांनाही 'दिवानेपण' ही प्रेमाची मूलभूत आवश्यकता असते, असंच वाटत असतं. कुठे तरी ह्याच 'दिवाने'पणातून विजोड जोड्या जोडल्या जात असाव्यात.
पण मित्रांनो, बहुतेक चित्रपट अर्धवट शिक्षण देतात. ते फक्त लग्न ठरेपर्यंत किंवा फार तर होईपर्यंतची कहाणी सांगतात. क्वचित प्रसंगी लग्नानंतरचं एखाद-दुसरं भांडण दाखवतात. बंद दरवाज्याच्या आड घडणाऱ्या शाब्दिक, वैचारिक व मानसिक कुस्त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा 'दिवाने'पण करावं लागतं. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून !

असो. तर असंच अर्धवट शिक्षण देतो 'यह जवानी हैं दिवानी'.

नयना (दीपिका पदुकोन) एक हुश्शार मुलगी. मेडिकलच्या अभ्यासात नाकावरच्या चश्म्यापर्यंत बुडालेली आणि गुदमरणारी. आदिती (कल्की कोच्लीन) एक टिपिकल 'टॉम बॉय', कबीर उर्फ बनी (रणबीर कपूर) एक टिपिकल बॅकबेंच टॅलेण्ट आणि अवि (आदित्य रॉय कपूर) त्याची टिपिकल 'सप्लिमेण्ट'; ह्या त्रिकुटासोबत एका ट्रेकिंग कॅम्पसाठी नयना मनालीला जाते. कॅम्पदरम्यान मनमौजी बनीची तिला जबरदस्त भुरळ पडते आणि एक मेडिकलची विद्यार्थिनी एका सडाफटिंगच्या प्रेमात पडते. ती पडणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असतं पण पडेपर्यंतचा प्रवास खूप मजेशीर केला आहे. काही प्रसिद्ध वक्तव्यांची हिंदी भाषांतरं, ठसकेबाज गाणी आणि चौघांचाही सहज वावर गुंतवून ठेवतो.
पण मध्यंतराच्या जरासं आधी महत्वाकांक्षी 'बनी'तला जबाबदार 'कबीर' जागा होतो आणि कुठल्याश्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी तो अमेरिकेला जाणार असल्याचं कळतं. तो मध्यमवर्गीय घरातला असल्याने त्याच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची आवश्यकता असणार, हे चाणाक्ष कथालेखकाने ताडलं होतं म्हणून तीदेखील त्याला मिळालेली असते. त्याच्यासारख्या कॉपी करून पास होणाऱ्या डफ्फळशंखाला शिष्यवृत्ती कशी काय मिळते, ह्याचा विचार चाणाक्षमती करत नाही.
बनी, त्याला आयुष्याकडून हव्या असलेल्या 'रफ्तार'साठी निघून जातो, नयना अव्यक्त राहते आणि आदिती-अवि मागे पडतात. इथे मध्यंतर होतं आणि मध्यंतरानंतरचा बहुतेक भाग आपल्याला एक लग्नाची सीडी दाखवली जाते. आदितीचं लग्न. 'तरण'शी (कुणाल रॉय कपूर). एका मोठ्या च्यानलचा एक महत्वाचा कॅमेरामन बनलेला बनी, जगाच्या कुठल्याश्या कोपऱ्यातून जिवलग मैत्रिणीच्या लग्नाला येतो आणि पुन्हा नयनाला भेटतो. 'सोये अरमान' जागे होतात आणि व्हायचं ते होतं. ते होणार असतं हे आपल्याला माहित असतं पण होईपर्यंतचा प्रवास उगाच वेळकाढूपणा करत राहातो.
अखेरीस पाच जणांत दोन जोड्या बनतात आणि एक बेवडा उरतो. पण सगळे खुश होतात. लग्न लागल्या लागल्या उपस्थितांना जेवणाची ओढ लागते आणि सगळे पंगतीकडे पळतात तसं चित्रपट संपून श्रेयनामावली सुरु होईपर्यंत अर्धं थेटर रिकामं झालेलं असतं.

श्रवणीय संगीत कुणाचं आहे, ही उत्सुकता शमविण्यासाठी आपण श्रेयनामावली पाहातो आणि तिथे 'प्रीतम' वाचल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो.
आटोपशीर 'वेक अप सिड' च्या तुलनेत 'यजहैंदि' त अयान मुखर्जी जरा अघळपघळच झाला आहे.
'कल्की' हळूहळू रमायला आणि रमवायला लागली आहे. तिच्यातला अतिसाधारणपणा आपलासा वाटतो.
दोघे 'रॉय कपूर' एकदम फिट्ट !
'दीपिका' इतकी गोड दिसते की बनी तिच्या प्रेमात पडला नसता तर काही तरी गडबड वाटली असती. अजूनही तिची ती भुवया आवळून बोलण्याची सवय काही जात नाही. पण तिचं गोंडस हसू आवळलेल्या भुवयांकडे लक्ष जाऊ देत नाही.
चित्रपट रणबीरचा आहे. बाकी सगळे सपोर्ट कास्ट असावेत. कुठेही तो त्याच्यावरील जबाबदारीसाठी कमी पडत नाही. 'बदतमीज दिल' मधला त्याचा नाच असला दिलखेचक वाटला की कधी तरी त्याला आणि हृतिकला एकत्र नाचताना पाहायला मिळेल का? असं काही तरी मनात आलं.
बनी-आदिती-अवि मधल्या मैत्रीची काही दृष्यं खूप भावतात. त्यांच्यातली घट्ट वीण अदृश्य असली तरी जाणवत राहाते.
माधुरीची 'मोहिनी' अजून कायम आहे. पन्नाशीच्या कंबरेत आजही जबरी दम आहे. तिचं गाणं अगदी म्हणजे अगदी उपरं असलं तरी ती असल्यामुळे मजा येते, हे विशेष !

पाण्यात बुडवल्यावर लिटमस कागद रंग न बदलता उदासीन राहातो, तसा हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक जसा आत जातो, तसाच बाहेर येतो. हा चित्रपट काळजात घुसत नाही पण डोक्यातही जात नाही. तो जादू करत नाही पण अत्याचारही करत नाही.
अडीच तास निरागस चेहऱ्याच्या रणबीरला आणि गोंडस चेहऱ्याच्या दीपिकाला पाहून वेळ नक्कीच वाया जात नाही !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/yeh-jawani-hai-deewani-movie-revi...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय राव, तुम्ही तर स्टोरीच उघड केलीत.
काय घडणार आहे याचा अंदाज प्रेक्षकांना असतो, असं असं व्हायला हवं आहे आहे अशी अपेक्षाही ते ठेवून असतात, त्याप्रमाणे पुढ्यात उलगडत जाणार्‍या सिनेमाचा आस्वाद घेत राहतात. पण म्हणून काय सिनेमा पाहिलेल्यांनी इतक्या सरळसोट शब्दात सिनेमातील मुख्य गिमिकच उलगडून सांगणे योग्य नव्हे.

सिनेमा रिव्ह्यू, परीक्षणं यासाठी अनेक उत्तमोत्तम ब्लॉग आहेत, ते जरा नजरेखालून घाला असा माझा फुकट सल्ला तुम्हाला. उदा. http://wogma.com
आजच्याच म.टा.ला याबद्दल मकरंद करकर्‍यांचा फार छान लेख आला आहे.

मी आत्ता जाणार आहे सिनेमा बघायला, उगाच वाचला हा बाफ असं झालं मला.

असले पिक्चर बोअर होतात आजकाल!

रसप तुम्हि चांगले परिक्षण लिहिता. उगाचच वरच्या कोमेंटने नाराज होउ नका. हा काहि रहस्यमय पिक्चर नाहि. फालतुची नेहमीची कथा आहे आणी जो शेवट सांगितला आहे तो आजकाल पहिली दुसरीतील मुलेहि सांगु शकतील. त्यामुळे रसपच्या लिखाणात मला तरी काहि फार मोठे नुकसान दिसत नाहि.

हाहा रसप असल्या प्रकारच्या परीक्षणात 'एक्सपर्ट' आहेत. काहीं( वेड्या लोकां)नी त्यांना पूर्वी वेगवेगळ्या प्रकारे सांगून पाहिलं पूर्ण कथा लिहू नका असं. पण ते म्हणतात असेच लिहायचे असतात रिव्ह्यू! काही (सिनेमाच्या तिकिटाचे पैसे वाचवू पहाणरे) रसिक पण म्हणातात लिहा हो लिहा तुम्ही. त्यामुळे ते लिहितच राहणार असे(च) रिव्ह्यु.
मी तर बुवा वाचते हल्ली त्यांची परीक्षणं - म्हणजे सिनेमावरचे पैसे वाचतात. सगळंच उघड करून लिहिल्यामुळे सिनेमा बघण्याचीच गरज उरत नाही Proud

काहीं( वेड्या लोकां)नी त्यांना पूर्वी वेगवेगळ्या प्रकारे सांगून पाहिलं पूर्ण कथा लिहू नका असं>>>>>> अहो असे स्वतःच्या मैत्रीणीला वेडे म्हणु नये. Wink

आणी हो admin लाहि तुम्हि वेडे म्हणत आहात. Wink

अजून पन्नाशीची नाही हो ती. ४६! मी तरुणाईला पिक्चरला पाठिवलं अन घरी आराम केला. दीपिका नाही बघू शकत. रणबीरच्या डीएन ए मध्ये करमणूक करण्याची कला आहे ती अगदी कळते. खरेच मस्त नाचला आहे बदतमीज दिल मध्ये.

दिल्लीत एका तिकीटा चे ३०० रु. जाणे येणे खाणे धरून सिनेमा फार महाग पडतो हे मा वै म.

तसेच कथेतील काही गोष्टी लिहिण्याआधी स्पॉइलर वॉर्नींग द्यावी.>>> खरय.
पण हल्लीच्या युगात इतक 'शेल्टरर्ड' नाही राहता येत. एका 'फ्रेंड ऑफ फ्रेंड' ने फेबुवर स्टेट्स 'करीना भूत असते' असा लावला (कुठला सिनेमा विचारू नका). १००० लोकांनी 'लाईक' केला. काय बोलणार?! त्यामुळे लेखनातील औचित्य म्हणून तुमची सूचना चांगली आहे पण त्याने रसिकांच्या नशिबात काही फरक पडेल असे नाही.

जगाच्या कुठल्याश्या कोपऱ्यातून जिवलग मैत्रिणीच्या लग्नाला येतो आणि पुन्हा नयनाला भेटतो. 'सोये अरमान' जागे होतात आणि व्हायचं ते होतं.>>> या एवढ्या ओळी परीक्षणातून वगळल्या तर शेवट नक्की काय आहे ते कळणार नाही. लोकांना असेच काहीतरी होणार असे वाटेल यात शंका नाही, पण यापेक्षा वेगळा शेवट करणारे काही चित्रपट आता हिन्दीत येउ लागले आहेत. त्यात नवीन दिग्दर्शक असले की नेहमीच्या सरधोपट कथेपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवतील अशीही शक्यता असते.

बाकी परीक्षण आवडले. दीपिका गोड दिसते याबाबत मात्र सहमत नाही. तिला का सिनेमात घेतात हे मला आजतागायत कळालेले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यापेक्षा बॅडमिंटन जमते का बघ म्हणावे Happy

तसेच .अभ्यासू मुलगी म्हणजे नाकावर चष्मा दाखवलाच पाहिजे हा ही एक नियम दिसतो Happy

अभ्यासू मुलगी म्हणजे नाकावर चष्मा दाखवलाच पाहिजे>>>>>> तसा चष्मा २४ तास टिव्हीबघुन सुध्दा येतो पण लोकांना वाटते की रात्र रात्र अभ्यास करुन चष्मा लागला आहे Wink

चित्रपटाची कथा मी पूर्णपणे उघड केली, हे काही वेळापुरतं मान्य केलं; तरी 'स्पॉईलर अलर्ट' असे दोन शब्द टाकून तरी ते कसं काय जस्टीफाय होईल?
असो.
पुढील वेळी व्हेग लिहिण्याचा प्रयत्न करीन.

क्षमस्व.

कालच बघितला . आमच्या घरातील तरुणाईचे मत पण असेच होते की कुठेच भिडला नाही.
सिनेमा रणबीरचाच आहे.
दिपिका पहिल्या हाफ मध्ये खूप सुंदर दिसते. ट्रेन, ट्रेक मध्ये फ्रॉक का घातलेत हे काही काळात नाही बाबा.
ट्रेक चे १५ दिवस & लग्नातले ८-१० यात आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारी हि जवानी खरच दिवानी वाटली .
दोघेही स्वताच्या वाटाना निघून गेले असते तर जास्त पटला असता हा सिनेमा.

दीपिका गोड दिसते याबाबत मात्र सहमत नाही. तिला का सिनेमात घेतात हे मला आजतागायत कळालेले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यापेक्षा बॅडमिंटन जमते का बघ म्हणावे

तसेच .अभ्यासू मुलगी म्हणजे नाकावर चष्मा दाखवलाच पाहिजे हा ही एक नियम दिसतो
>> फारेन्ड तुला १००००००००००००००००००००००० मोदक. Happy

फारेंडा Lol
पण हल्लीच्या सिनेम्यातल्या अभ्यासू मुली चष्मा लावलेला असला तरी फ्रॉक, शॉर्टस् वगैरे घालून सिनेमाभर वावरू लागल्या आहेत हे काही कमी नाही. Wink

पण दीपिका या सिनेम्यात खरंच खूप छान दिसली आहे. काल दुपारी मी हा सिनेमा पाहिला आणि रात्री टिव्हीवर रेस २ थोडासा पाहिला, त्यामुळे हा फरक मला चांगलाच कळून आला Proud

अरे ते रॉय-कपूर आहेत तरी किती? Uhoh सिद्धार्थ रॉय कपूर= मिस्टर विद्या बालन. आणि एक आदित्य रॉ क- याचा आणि आयुष्यमान खुरानाचा एक सिनेमा आला होता. आणि इथे एक कुणाल रॉ क. सगळे एकाच खानदानचे चिराग आहेत काय? अजून किती आहेत असे?

सिनेमा पाहिला नाही. पण दिपिकाला काही म्हणू नका हो. चांगली आहे ती Proud

दीपिका गोड दिसते याबाबत मात्र सहमत नाही. तिला का सिनेमात घेतात हे मला आजतागायत कळालेले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यापेक्षा बॅडमिंटन जमते का बघ म्हणावे >>>> +१०००००

बघितला. मुळीच आवडला नाही.
फक्त रणबीर आणि कल्की आवडले.
३२० रुपये आणि ३ तास फुकट गेले Sad

सिद्धार्थ रॉय कपूर= मिस्टर विद्या बालन. आणि एक आदित्य रॉ क- याचा आणि आयुष्यमान खुरानाचा एक सिनेमा आला होता. आणि इथे एक कुणाल रॉ क. सगळे एकाच खानदानचे चिराग आहेत काय? अजून किती आहेत असे? >>> तिघेही भाऊ आहेत सख्खे.
सिद्धार्थ
कुणाल
आदित्य

एक आदित्य रॉ क- याचा आणि आयुष्यमान खुरानाचा एक सिनेमा आला होता. >>> तू नौटंकी साला बद्दल बोलते आहेस का? त्यात कुणाल रॉय कपूर होता. तो 'देलीबेली'मध्येही होता.
आदित्य रॉय कपूर 'अ‍ॅक्शन रिप्ले' आणि 'आशिकी २' मध्ये होता.

तू नौटंकी साला बद्दल बोलते आहेस का? त्यात कुणाल रॉय कपूर होता. >>अरे देवा! Biggrin बर आता त्यांचे फोटो गूगल करून शेजारी शेजारी ठेवून नीट पाहिले पाहिजेत.

आ.रॉ.क. आशिकी २ आणि या सिनेम्यात इतकी दारू प्यायलाय की आपल्याला नुसतं बघूनच झिंगायला होतं.

फारएण्ड आणि श्रद्धाला भरपूर वाव देणारा असला तरी मला आवडला सिनेमा.

बनीचा व्यवहारीपणा, जो आजकालच्या मुलांत आढळतो, आवडला नाही तरी पटला. जिगरी दोस्त अचानक शेकडो योजने दूर गेल्यावर आलेले रितेपण कधीच पचवू न शकलेला अविपण पटला. पण सगळ्यात आवडले ते अदितीचे पात्र. प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यावरही अजीबात कटूता न बाळगता, गाढ मैत्री तितकीच गाढ ठेवत जीवनात पुढे सरकणारी अदिती.

नैना आणि बनी एका संध्याकाळी शिखरावरून सूर्यास्त पहात असताना नैनाचा तोंडी एक संवाद आहे 'कितनी भी भागदौड करलो, हम सबकुछ नही देख सकते. कुछ तो छुटही जाता है. इसलीये जो अभी है उसी को एंजॉय करलो' अशा अर्थाचा. नेमके तेच सांगतो हा सिनेमा आणि त्याचा शेवटही. नायक किंवा नायिका यांच्या दोन विचारसरणी आहेत. नक्की कोणती विचारसरणी जिंकते ते सांगत नाही शेवट - कारण तसे कधीच होत नसते.

'माधुरीबरोबर नृत्य करणे हे माझे स्वप्न होते' या रणबीरच्या विधानाला साजेसे माधुरीचे नृत्य आहे, बाकीची गाणी पण कंटाळवाणी नाहीत. मला सगळ्यात आवडलेल्या पात्राला कल्कीने पूर्णपणे न्याय दिला आहे. पुढे असलेले दात हे सौंदर्याचे लक्षण मानले जात नाहीत पण त्यांचाच वापर जर निखळ हास्याकरता केला तर व्यक्तिमत्वात एक वेगळेच सौदर्य येऊ शकते.

क॑रण जोहरचे ते टिपीकल श्रीमंती सेट्स नसायला पाहिजे होते असे प्रकर्शाने वाटले.

ईतकं सगळं वाचुन पण काल मी रणबीर साठी हा मुवी बघुन आले....बद्तमीझ दिल... बद्त्मीझ दिल... बद्त्मीझ दिल... मानेना मानेना

Pages