'प्यार दिवाना होता हैं..' हे शब्द दस्तुरखुद्द आनंद बक्षी साहेबांनीही जितक्या गांभीर्याने लिहिले नसतील, तितक्या गांभीर्याने हिंदी चित्रपटकर्ते वर्षानुवर्षं घेत आले आहेत. किंबहुना, हे शब्द लिहिले जाण्याआधीपासूनच ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. सुरुवातीला हे फक्त 'दिवाना' असावं आणि नंतर नकळतच त्यापुढे 'च' लागला आणि 'प्यार दिवाना'च' होता हैं..' असं समस्त वुड बी गुल-बुलबुलांचं मत झालं असावं. अनेक दशकांच्या इतिहासातील कुठलाही हिंदी चित्रपट काढावा, त्यातील प्रेमाने 'दिवाने'पणाची झलक दाखवलीच असते किंवा बऱ्याचदा त्याची मर्यादाही ओलांडलेली असते.
हे इतकं बिंबवलं गेलं आहे की पडद्याबाहेर खरंखुरं आयुष्य जगणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्यांनाही 'दिवानेपण' ही प्रेमाची मूलभूत आवश्यकता असते, असंच वाटत असतं. कुठे तरी ह्याच 'दिवाने'पणातून विजोड जोड्या जोडल्या जात असाव्यात.
पण मित्रांनो, बहुतेक चित्रपट अर्धवट शिक्षण देतात. ते फक्त लग्न ठरेपर्यंत किंवा फार तर होईपर्यंतची कहाणी सांगतात. क्वचित प्रसंगी लग्नानंतरचं एखाद-दुसरं भांडण दाखवतात. बंद दरवाज्याच्या आड घडणाऱ्या शाब्दिक, वैचारिक व मानसिक कुस्त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा 'दिवाने'पण करावं लागतं. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून !
असो. तर असंच अर्धवट शिक्षण देतो 'यह जवानी हैं दिवानी'.
नयना (दीपिका पदुकोन) एक हुश्शार मुलगी. मेडिकलच्या अभ्यासात नाकावरच्या चश्म्यापर्यंत बुडालेली आणि गुदमरणारी. आदिती (कल्की कोच्लीन) एक टिपिकल 'टॉम बॉय', कबीर उर्फ बनी (रणबीर कपूर) एक टिपिकल बॅकबेंच टॅलेण्ट आणि अवि (आदित्य रॉय कपूर) त्याची टिपिकल 'सप्लिमेण्ट'; ह्या त्रिकुटासोबत एका ट्रेकिंग कॅम्पसाठी नयना मनालीला जाते. कॅम्पदरम्यान मनमौजी बनीची तिला जबरदस्त भुरळ पडते आणि एक मेडिकलची विद्यार्थिनी एका सडाफटिंगच्या प्रेमात पडते. ती पडणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असतं पण पडेपर्यंतचा प्रवास खूप मजेशीर केला आहे. काही प्रसिद्ध वक्तव्यांची हिंदी भाषांतरं, ठसकेबाज गाणी आणि चौघांचाही सहज वावर गुंतवून ठेवतो.
पण मध्यंतराच्या जरासं आधी महत्वाकांक्षी 'बनी'तला जबाबदार 'कबीर' जागा होतो आणि कुठल्याश्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी तो अमेरिकेला जाणार असल्याचं कळतं. तो मध्यमवर्गीय घरातला असल्याने त्याच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची आवश्यकता असणार, हे चाणाक्ष कथालेखकाने ताडलं होतं म्हणून तीदेखील त्याला मिळालेली असते. त्याच्यासारख्या कॉपी करून पास होणाऱ्या डफ्फळशंखाला शिष्यवृत्ती कशी काय मिळते, ह्याचा विचार चाणाक्षमती करत नाही.
बनी, त्याला आयुष्याकडून हव्या असलेल्या 'रफ्तार'साठी निघून जातो, नयना अव्यक्त राहते आणि आदिती-अवि मागे पडतात. इथे मध्यंतर होतं आणि मध्यंतरानंतरचा बहुतेक भाग आपल्याला एक लग्नाची सीडी दाखवली जाते. आदितीचं लग्न. 'तरण'शी (कुणाल रॉय कपूर). एका मोठ्या च्यानलचा एक महत्वाचा कॅमेरामन बनलेला बनी, जगाच्या कुठल्याश्या कोपऱ्यातून जिवलग मैत्रिणीच्या लग्नाला येतो आणि पुन्हा नयनाला भेटतो. 'सोये अरमान' जागे होतात आणि व्हायचं ते होतं. ते होणार असतं हे आपल्याला माहित असतं पण होईपर्यंतचा प्रवास उगाच वेळकाढूपणा करत राहातो.
अखेरीस पाच जणांत दोन जोड्या बनतात आणि एक बेवडा उरतो. पण सगळे खुश होतात. लग्न लागल्या लागल्या उपस्थितांना जेवणाची ओढ लागते आणि सगळे पंगतीकडे पळतात तसं चित्रपट संपून श्रेयनामावली सुरु होईपर्यंत अर्धं थेटर रिकामं झालेलं असतं.
श्रवणीय संगीत कुणाचं आहे, ही उत्सुकता शमविण्यासाठी आपण श्रेयनामावली पाहातो आणि तिथे 'प्रीतम' वाचल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो.
आटोपशीर 'वेक अप सिड' च्या तुलनेत 'यजहैंदि' त अयान मुखर्जी जरा अघळपघळच झाला आहे.
'कल्की' हळूहळू रमायला आणि रमवायला लागली आहे. तिच्यातला अतिसाधारणपणा आपलासा वाटतो.
दोघे 'रॉय कपूर' एकदम फिट्ट !
'दीपिका' इतकी गोड दिसते की बनी तिच्या प्रेमात पडला नसता तर काही तरी गडबड वाटली असती. अजूनही तिची ती भुवया आवळून बोलण्याची सवय काही जात नाही. पण तिचं गोंडस हसू आवळलेल्या भुवयांकडे लक्ष जाऊ देत नाही.
चित्रपट रणबीरचा आहे. बाकी सगळे सपोर्ट कास्ट असावेत. कुठेही तो त्याच्यावरील जबाबदारीसाठी कमी पडत नाही. 'बदतमीज दिल' मधला त्याचा नाच असला दिलखेचक वाटला की कधी तरी त्याला आणि हृतिकला एकत्र नाचताना पाहायला मिळेल का? असं काही तरी मनात आलं.
बनी-आदिती-अवि मधल्या मैत्रीची काही दृष्यं खूप भावतात. त्यांच्यातली घट्ट वीण अदृश्य असली तरी जाणवत राहाते.
माधुरीची 'मोहिनी' अजून कायम आहे. पन्नाशीच्या कंबरेत आजही जबरी दम आहे. तिचं गाणं अगदी म्हणजे अगदी उपरं असलं तरी ती असल्यामुळे मजा येते, हे विशेष !
पाण्यात बुडवल्यावर लिटमस कागद रंग न बदलता उदासीन राहातो, तसा हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक जसा आत जातो, तसाच बाहेर येतो. हा चित्रपट काळजात घुसत नाही पण डोक्यातही जात नाही. तो जादू करत नाही पण अत्याचारही करत नाही.
अडीच तास निरागस चेहऱ्याच्या रणबीरला आणि गोंडस चेहऱ्याच्या दीपिकाला पाहून वेळ नक्कीच वाया जात नाही !
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/yeh-jawani-hai-deewani-movie-revi...
सुरुवातीचा चित्रपट
सुरुवातीचा चित्रपट ट्रेकिंगच्या हास्यस्पद दृश्यांनी व्यापलेला आहे. त्यातली मनाली गावातली लांबलचक मारामारी कंटाळवाणी. मिनी स्कर्ट्स आणि हॉटपॅन्ट्स घालून ट्रेकिंग करणार्या,सॅक अजिबात न घेता (उदा. दीपिका) किंवा लहानशी किडिश सॅक पाठीवर घेऊन मुली बर्फाचे डोंगर चढताहेत, तेही फुल मेकपमधे, असं दाखवण्याइतका अजूनही कमर्शिअल सिनेमातले दिग्दर्शन इम्मॅच्युअर आहे हे पाहून हसावे की रडावे कळत नाही. शिखरावर पोचल्यावर रणबीरच्या डोक्यावर कान-नाक झाकणारी टोपी आणि दीपिकाचे केस हवेत दखवायची हे कशाला? तिलाही टोपी घालायला दिली असती तर सिनेमाचा ग्लॅमर कोशन्ट ढासळला असता का?
अयान मुखर्जीसारख्या नव्या पिढीच्या दिग्दर्शकानेही अशा दोन दशकांपूर्वीच्या तडजोडी सिनेमात दाखवणे खेदजनक आहे.
सिनेमाच्या सुरुवातीच्या दहा मिनिटांमधे, ट्रेक सुरु होईपर्यंतच्या काळात अपेक्षा खूप उंचावतात आणि मग त्या पुर्या होत नाहीत. खोलवर काही स्पर्शूनच जात नाही. सगळं उथळ. >>>
शर्मिलाच्या या पोस्टला अनुमोदन.. जल्ला ट्रेकच्या नावाखाली कायपण दाखवलय... !
तरीपण मला फक्त टाईमपास म्हणून चित्रपट आवडला !! अगदी वाईट नाही.. अगदी उत्तम नाही.. ! कलाकारांचे काम मस्त... पण छोटयाश्या भुमिकेत फारुख शेख भाव खाउन जातो.. ! 'बलम पिचकारी' व लग्नसोहळ्यातले ते 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' वाले गाणे उगीच घुसडल्यासारखे वाटले..
काल पाहीला. लेकीची शाळा सुरू
काल पाहीला. लेकीची शाळा सुरू होण्याआधी एक टी पी म्हणून बरा आहे.
शर्मिला फडके>>> मस्त पोस्ट. एकदम पटेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिखरावर पोचल्यावर रणबीरच्या
शिखरावर पोचल्यावर रणबीरच्या डोक्यावर कान-नाक झाकणारी टोपी आणि दीपिकाचे केस हवेत दखवायची हे कशाला? तिलाही टोपी घालायला दिली असती तर सिनेमाचा ग्लॅमर कोशन्ट ढासळला असता का?
माझ्या लहानपणापासुन हे पाहतेय. बर्फात हिरो शक्य तितके कपडे घालुन नी हिरविन शक्य तितके कपडे काढुन.... कधी बदलणार हे सगळे??
एनी वेज, जर शेवट वर लिहिलाय तसाच असेल तर चांगलेच आहे. सिनेमात हिरो-हिर्विन कितीही स्वतंत्र विचारांचे दाखवले तरी शेवटी लग्नच करतात त्यापेक्षा हे पार्ट टाईम पार्टनर प्रकरण चांगले आहे. दोघेही आपल्याला हवे तसे आयुष्य जगायला मोकळे आणि त्याचबरोबर एकमेकांसाठीही वेळ काढायला मोकळे.
रसप +१००००
रसप +१००००
दीपिका.....आणि गोड????
दीपिका.....आणि गोड????
"बोल्ड" अस म्हणायचं होत का? ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शर्मिलाचा रिव्ह्यु परफेक्ट
शर्मिलाचा रिव्ह्यु परफेक्ट आहे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्या सिनेमाला ' मुव्ही फॉर युथ' टॅग देतायेत पण प्रत्यक्षात टिपिकल कोण्या नॉटी अॅट फॉर्टी किंवा मिड लाइफ क्रायसिस माणसाने त्याच्या जुनाट जमान्यात बनवलेला मुव्ही वाटला मला
आजकालची जनरेशन किंवा एकुणच कोणीही ट्रेकर मुली ट्रेकिंग ला , ते ही मनालीच्या वेदर मधे मायक्रोमिनी शॉर्ट टॉप घालण्याइतक्या मूर्ख नसतात , पण जुनाट डिरेक्शन- जुनाट स्टोरी असल्याने इतका विचार न करता जुन्या ओल्ड स्टाईल मधेच बनवलाय सिनेमा !
नुसती यंग क्राउड घेउन मुव्ही फॉर युथ नै बनत , त्या करता 'जाने तू या जानेना' सारखी फ्रेश ट्रिटमेन्ट देता आली पाहिजे सिनेमाला !
कल्कीनी चांगलं काम केलय , आवडली !
काल पाहिला. शर्मिला आणि रसप
काल पाहिला. शर्मिला आणि रसप +१. चित्रपट केजोच्या मानाने चांगला आणि अयानच्या मानाने फारसा चांगला नाही असा अध्यात मध्यात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्रेकिंगची रम्य दृश्ये आणि ते झिपरे केसबीस पाहुन भरुन का काय ते आलय. अहाहा.. असे ट्रेकिंग १६००० फुटांवर रमत गमत पळत बिळत करणे. वा! वा! जय हिंदी सिनेमा.
दिपिका, कल्की, फारुख शेख आवडले.
Pages