चूल माझी सखी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 May, 2013 - 01:42

कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.

लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती. नंतर आजीने गवंड्याकडून सळया घालून सिमेंटची चूल करून घेतली. मी थंडीत रोज उठल्या बरोबर चुलीजवळ जाऊन शेकायला बसायचे. चाळा म्हणून मधून मधून लाकडे ढकलणे, पात्या, कागद जाळणे असा खोडकरपणा चुलीबरोबर करायचे. असे करताना बरेचदा निखार्‍याचा चटका बसे किंवा पाती किंवा कागद जळत हातावर येत असे.

सकाळी आजीची देवपूजा झाली की आजी चुलीतील निखारे धुपांगणात घेऊन त्यावर धुप घालून ते देवाला दाखवायची मग ते पूर्णं घरात फिरवून घराभोवतीही फिरवायची. फार प्रसन्न वाटायचं तेव्हा. दसरा आला की ह्या चुलीला गेरू किंवा शेणाने सारवले जायचे. दसर्‍याच्या दिवशी आई-आजी चुलीची पुजा करायच्या. मी कधी आजारी वगैरे असले की आजी दृष्ट काढून चुलीत टाकायची. आजी सकाळी चहा घ्यायला चुली जवळच बसायची. पहिला कपातील ती थोडा चहा नैवेद्य म्हणून चुलीत टाकायची. मला फार गंमत वाटायची ते पाहून. काही दिवसांनी मी पण तिचे अनुकरण करू लागले. अगदी लहान होते तेव्हाचे आठवते की ह्याच चुलीची राख आई-आजी भांडी घासण्यासाठी घ्यायच्या. नंतर शायनेटची पावडर आली मग राख बंद झाली.

पूर्वी गावात ज्यांची गुरे असत ते शेणी थापून जाळण्यासाठी इंधन म्हणून विकायचे. शेणी म्हणजे शेणाच्या गोल थापून केलेल्या सुकवलेल्या जाड चकत्या. आमची वाडी असल्याने आम्हाला कधी लाकडांचा तोटा नव्हताच चुलीसाठी उलट आमच्या वाडीतूनच आमच्या आजूबाजूचे लोक चुलीसाठी लाकडे घेऊन जायचे. कुणाकडे लग्न कार्य असले की आधीच वडिलांना सांगून ठेवायचे गावकरी. माझ्या वडीलांना सगळे अण्णा म्हणतात. अण्णा अमुक महिन्यात लाकडे लागतील. मग एखादे सुकलेले झाड किंवा झाडांची डुखण (मोठ्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या) लग्नघराच्या नावे होत. वडील एकही पैसा त्यांच्याकडून घेत नसत. तेव्हा तशी लाकडांना किंमतही नव्हती. माझ्या आईने प्रार्थमिक शिक्षिकेची नोकरी केली. ती दुपारी शाळेतून आली की लाकडे गोळा करण्यासाठी वाडीत जात. मी पण तिच्याबरोबर जात असे. माझ्या हातात मावतील तितक्या काड्या छोटी लाकडे मी आई बरोबर गोळा करून आणत असे.

मला आठवते आजी चुलीवर रुचकर पदार्थ बनवायची. हे पदार्थ गॅस ऐवजी चुलीवरच रुचकर लागायचे. त्यात असायचे भानवल्या. भानवल्या बनवण्यासाठी खास बिडाचा खडबडीत तवा असायचा. ह्यात आंबोळ्या, घावन पण छान व्हायचे. उकडीचे पदार्थ जसे शेंगा, करांदे, कोनफळे अशा पदार्थांना चुलीवर शिजवल्याने विशिष्ट चव येते.

तांदूळ गिरणीतून दळून आणला की त्याचा कोंडा निघे. त्या कोंड्याचे आजी पेले बनवायची. हे कडवट गोड लागायचे. हे करताना पाहायला मला गंमत वाटायची. हे एका मोठ्या टोपात पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून त्यात छोटे छोटे घरातील पेल्यात ह्या कोंड्याचे गूळ घातलेले मिश्रण आजी भरायची आणी ते पेले वाफवायची. ह्या कृतीमुळेच कदाचित ह्याचे नाव पेलेच आहे. चुलीवरची भाकरी पण मस्त खरपूस पापुद्रा आलेली आजी करायची. ह्या भाकरी बरोबर खायला त्याच चुलीच्या निखार्‍यावर आई-आजी वाकट्या, बोंबील, बांगडा भाजून द्यायची. बांगडा भाजला म्हणजे अख्ख्या गावाला वास जायचा. ह्या चुलीत भाजलेल्या बांगड्याचा वास इतर कुठल्या घरातून आला तरी मला लगेच भूक लागायची. त्या काळी मटण महिन्यातून एखादं दिवशी असायचे. ते चुलीवरच. चुलीवरच्या मटणाची चवच काही न्यारी असते.

तसेच आम्ही कधी कधी चुलीत एखादा बटाटा, रताळं, करांदा, कोनफळ, बाठ्याची कोय असे प्रकार भाजायचो. ह्यांची ती करपट मिश्रीत रुचकर चव अप्रतिम लागायची. दिवसभरासाठी चाळा म्हणून चिंचेच्या सीझन मध्ये चिंचोके भाजायचे. भाताची कापणी झाली, शेतातून भारे वाहून नेले की शेतात जायचे आणि शिल्लक राहिलेल्या कुठे कुठे पडलेल्या तांदळाच्या कणश्या (कणसे) गोळा करायच्या आणि त्या आणून चुलीत निखार्‍यावर टाकायच्या मग त्याच्या फाट फाट लाह्या होत. ह्या लाह्या खाणेही एक छंदच असायचा.

थोडी मोठी झाले म्हणजे ५ वी ६ वीत असेल तेव्हा मग घरातल्यांचे चुलीचे काम झाले की मी भातुकली आमच्या पडवीतच खर्‍या चुलीवर खेळायचे. मग ह्या चुलीवर कधी मुगाची भाजी, कधी अंड्याचे कालवण, भात, अंडे तळणे, असे प्रकार करू लागले. हे प्रकार मी बिचार्‍या घरातल्यांनाही खायला द्यायचे आणि ते माझी वाहवा करायचे.

माझी चुलत भावंडे दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरी यायची. अशा वेळी आम्ही पार्टी करायचो. पार्टी म्हणजे आम्ही स्वतः वाडीत एखाद्या झाडाखाली चूल मांडून जेवण किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवायचो. ही चूल बनवण्यासाठी आम्ही तीन विटा घ्यायचो. जास्त करून बटाट्याची भाजी, भात किंवा अंड्याचे कालवण असायचे कारण हेच करायला सोपे असायचे. पण अंड्याचे कालवण बर्‍याचदा पचपचीत व्हायचे. हे जेवण आम्ही चुलीजवळच केळीच्या पानात जेवायचो. वाट्या वगैरे नसायच्या त्यामुळे कालवण पानातून ओघळायचे. ते पचपचीत कालवण पण गरम-गरम भाताबरोबर खाताना मौज वाटायची, शिवाय आपण केल्याचा एक वेगळाच आनंद असायचा. एकदा तर कोजागीरी निमित्त बटाटे वडे पण केले होते.

मला असे वाटत होते की लग्न ठरल्यावर आपल्याला चुलीचा सहवास मिळणार नाही. कारण लग्न ठरलेल्या घरी चुलीला जागाच नव्हती. पण सासर्‍यांनी आधीच जवळ वाडी घेऊन ठेवली होती व तिथे घराचे काम चालू केले होते. लग्न झाल्यावर साधारण दीड वर्षातच आम्ही नवीन वाडीत राहायला गेलो. मला चुलीची अत्यंत आवड असल्याने व घराच्या मागील बाजूस भरपूर जागा असल्याने मी तिथे तीन विटा मांडून चूल पेटवली. बहुतेक रविवारी मी त्यावर मटण शिजवू लागले. चूल पेटविल्याने सासूबाई माझ्यावर खूश झाल्या कारण त्यांना चूल आवडते आणि नोकरी करूनही मी हा छंद जोपासते ह्याचे घरात सगळ्यांनाच कौतुक वाटते.

हळू हळू आम्ही पाठी पडवी बांधली. एक दिवस मी मिस्टरांबरोबर जाऊन एका कुंभारवाड्यातून मातीची चूल, तवी (कालवण करण्यासाठीचे मातीचे भांडे) खापरी (भाकरी करण्याचा मातीचा तवा) घेऊन आले व पडवीत ठेवले. संध्याकाळी कामावरून आले की मी चूल पेटवायचे. रोज नाही पण काही सणांच्या व्रतांच्या दिवशी आम्ही धुपांगणात धुप जाळून घरभर फिरवतो. त्यामुळे तोच जुना प्रसन्नपणा मला अनुभवायला मिळतो.

संध्याकाळी चूल लावली की माझा पुतण्या शेकण्यासाठी माझ्या बाजूला बसून अभ्यास करायचा. चुलीच्या निखार्‍यावर तोही वाकट्या बोंबील भाजू लागला. साधारण वर्षानंतर मातीची चूल पाण्याने खराब झाली तेव्हा वाईट वाटले. मग मी परत विटाच मांडल्या. आम्ही वरचेवर रविवारी मटण/चिकन चुलीवरील तवीत शिजवून झाडाखाली पारावर एकत्र जेवायला बसतो. त्यामुळे मला पूर्वीचे जास्त काही हरवल्यासारखे वाटत नाही. कधी कधी मी भातही ह्या तवीत शिजवते. मातीच्या भांड्यातील पदार्थांना वेगळीच रुची असते. धुराचा व दाहकतेचा थोडा त्रास होतो पण त्यापेक्षा मला त्यातून आनंद जास्त मिळतो.

माझ्या मोठ्या मुलीला श्रावणीलाही समजायला लागल्यापासून चूल आवडते. अजूनही चुलीवरचे जेवण म्हटले की तिला आनंद होतो. माझ्या बरोबर ती पण येते चुलीजवळ. आता दुसरी मुलगी
राधा हिला शेक, धुरी ह्याच चुलीच्या निखार्‍यांपासून दिली जाते. माझ्या मुली माझा वारसा चालवतील की नाही हे माहीत नाही आणि माझी बिलकुल सक्तीही नाही. पण चूल म्हणून एक इंधनाचे साधन असते किंवा असायचे, मातीची भांडी असतात किंवा असायची आम्ही ती वापरली आहेत ह्याचे ज्ञान, अनुभव त्यांना आहे तसेच त्या हे अनुभव पुढे त्यांच्या पुढच्या पिढी बरोबर शेअर करु शकतील.

हा लेख शनिवार, २७/०४/२०१३ ला लोकसत्ता - वास्तुरंग पुरवणी (पुणे आवृत्तॉ) मध्ये तसेच ०१/०६/२०१३ ला इतरत्र प्रकाशीत झाला. http://epaper.loksatta.com/120968/indian-express/01-06-2013#page/26/2

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहीलं आहेस जागू. आवडलं.
चुलीवरच्या स्वैपाकाला वेगळाच स्वाद असतो हे खरंच. आमच्या गावी असलेल्या परसातल्या चुलीची आठवण आली.

मस्त गं जागु.
आंब्याचे बाठ (कोय) चुलीत भाजून आणि काजु शिवाय सुके मासे (हे मला आवडत नाहीत) असं सगळं ज्याकाळी भाजायचो ते सर्रकन डोळ्यासमोर आलं

तू ही परंपरा पुढे सुरु ठेवतेयस यासाठी तुझं खास अभिनंदन Happy

मस्त लिहिलं आहेस. आमचा आणि चुलीचा संबंध फक्त कोकणात उन्हाळ्याच्या सुट्टीला जायचो तेव्हाच. चुलीवर शिजवलेल्या पदार्थांची चव गॅसवरच्या पदार्थांना अजिबात येत नाही हे खरंय.
आमच्याकडे ज्याला तुम्ही शेणी म्हणता त्याला गोवर्‍या म्हणतात.

खुपच छान लिहिलेय.
लहानपणी गावी गेलो कीच चुलीवरचे खायला मिळे. दुपारच्या वेळी, फणसाच्या बिया(आठला), बटाटे असे काहीबाही भाजून खायला मजा यायची.

जागूताई, काय सुंदर लिहिलं आहेस गं ! मला हेवा वाटतो तुला एवढं सगळं सांभाळायला जमतं म्हणून...
आईकडे मोठं अंगण झाडं..दर हिवाळ्यात पानगळती नि झाडांची कटिंग झाली की आई चूल मांडायची. त्यावर रोज नाश्त्याच्या मुग-ज्वारीची भाकरी नि वांगं, कारलं, ढोबळी मिर्ची भाजून तेल मिठ घालून खायचो आम्ही. अगदी कॉलेजात असतानाही हा नेम चुकला नाही. गावी नि आजोळी, आता सासरी चूल आहे. पण तो निवांतपणा नाही. चुलीवर होणार्‍या सैपाकाचा वास किती आश्वस्त करणारा, सुरक्षित, समाधानी असल्याचा फील देणारा असतो नाही!

खुप छान लिहीलेस जागू. तुझ्या या लेखाने माझ्यासारख्या अनेकजणींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलास. बालपणीच्या या आठवणी न विसरता येणार्‍या, कधीही, कितीही वेळा आठवल्या तरी तसाच आनंद देणार्‍या ! मस्त लिहीलेस.

छान लिहिले आहेस जागू!

मी चुलीवरचं जेवण चाखलंय ते आजीच्या हातचं! त्या सार्‍या पदार्थांना, दुधाला चुलीतल्या निखार्‍याचा जो एक धुरकट वास यायचा तो खासच होता! एवढे, की अशा दुधापासून विरजलेल्या दह्याला व त्यापासून बनवलेल्या ताकालाही असाच वास यायचा.

पण माझ्या आजीला गावाकडच्या घरातील ह्या चुलीच्या धुराचा खूप त्रास व्हायचा. शहरात सारे आयुष्य काढल्यावर तिला चुलीची जास्त सवयही नव्हती, आणि एखादे लाकूड जरी ओले असले तरी घरभर तो धूर पसरायचा. तेव्हा आतासारख्या निर्धूर चुलीही नव्हत्या. फुंकणीने निखारे फुंकून आजीची कांती लालेलाल व्हायची आणि धूर झाला की बिचारी खोकून बेजार व्हायची. त्यावेळी मला फार वाईट वाटायचे!

मामी, मृण्मयी, अंजली, मेधा, स्वाती, मैत्रेयी, श्यामली, वेका, सायो, वरदा, गमभन, विद्याक धन्यवाद व सर्वांच्या आठवणीही सुंदर.

अरुंधती असा अनुभवही येतो कधी कधी. पण एखाद दिवशी.

मितान तुमचे पदार्थ वाचुन तोपासु.

छानच, नेहमीप्रमाणे !
अशी सखी मिळायला चूल खरंच भाग्यवानच म्हटली पाहिजे !
लहानपणीं कोकणात दर सुट्टीचे तीन महिने जाणं होईच. कुणाच्याही घरीं गेलं कीं आज्या, मावश्या, आत्या यांच्याशीं गप्पा होत त्या चूलीजवळ बसूनच ! त्यामुळेही निर्व्याज प्रेमाच्या बर्‍याच आठवणी चूलीशीच निगडीत.

लेख आवडला. गावाकडची आठवण झाली. अनेक स्मृती ( ते बोंबील मटन अंडी वगळता) जाग्या झाल्या. ती मांजर अगदी चुलीपाशी बसून घुर्र घुर्र करत असायची.

लाजो,

>> तुझं खुप खुप कौतुक वाटतं नेहमीच मला. निसर्गाशी गप्पा, स्वयंपाक, संस्कृती जपणे, हस्तकला सगळं
>> सगळं तु इतक्या आत्मियतेने आणि आवडीने करत असतेस स्मित परत ते सगळं दुसर्‍यांबरोबर शेअर
>> करतेस... _/\_ तुला

अगदी, अगदी! कौतुक करायला शब्दच सापडत नाहीत. जागूताईचं करणं जितकं सहज तितकंच आपल्यापर्यंत पोहोचवणंही सहज!! Happy

जागूताई,

तुम्हाला शतवार प्रणाम. तुमच्या कुटुंबियांचंही कौतुक करावंसं वाटतं. विशेषत: तुमच्या आईंचं आणि सासूबाईंचं!!

आ.न.,
-गा.पै.

चुलीवर शिजवलेल्या अन्नाची चव खरंच खूप मस्त असते. आम्ही पण लहानपणी नेहमी चूल-पार्टी करायचो सुट्टीच्या दिवसांत. शेतावर हुर्डा खायला गेलं की भाकरी-पिठलं आणखी काय असेल ते तब्येतीत जेवूनच परत यायचो.

जागू, अतिशय सुरेख लिहिलंय. Happy
पुन्हा कधी येऊ घरी चुलीवरचं जेवायला Happy

वरच्या सगळ्यांच्या प्रतिसादाला +१ Happy

राजसी, शुम्पी, भाऊ, प्रकाश, डॅफोडिल्स, गामा पैलवान, स्वाती,यो, सिंडरेला, राधिका, चर्चा धन्यवाद.

जिप्स्या तुझ केळवण आहेच की Happy

मी चुलीवरचा स्वयपाक पाहीला नाहीये, खाल्ले पण नाहीये! Sad पण लेख वाचून मस्त वाटले! तुझ्या घरी मायबोली गटग कर गं जागू! Happy

मस्त लेख जागु! माझ्या आजोळी पण चुलच होती,लहानपणी गावी गेलो कि चुलिवरच जेवण चाखायला मजा यायची ,चुलिवर केलेल्या साध्या वरणालाही अप्रतिम चव असते...माझ्या सासरच्या गावी घरच म.न्दिर आणी राम-जन्म उत्सव असतो त्यावेळेला मागिल अ.न्गणात भरल्या थोरल्या चुलिवरच स्वयपा.न्क बनतो.

लाजो शी सहमत! किती किती उरक आहे तुला! शिवाय ते सगळ सहज मा.न्डण्याची हातोटी आहेच शिवाय केलेल कौतुक कधी डोक्यात जाउ देत नाहिस.. तुझा विनम्रपणा तुझ्या पोस्टित दिसतो.

Pages