कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.
लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती. नंतर आजीने गवंड्याकडून सळया घालून सिमेंटची चूल करून घेतली. मी थंडीत रोज उठल्या बरोबर चुलीजवळ जाऊन शेकायला बसायचे. चाळा म्हणून मधून मधून लाकडे ढकलणे, पात्या, कागद जाळणे असा खोडकरपणा चुलीबरोबर करायचे. असे करताना बरेचदा निखार्याचा चटका बसे किंवा पाती किंवा कागद जळत हातावर येत असे.
सकाळी आजीची देवपूजा झाली की आजी चुलीतील निखारे धुपांगणात घेऊन त्यावर धुप घालून ते देवाला दाखवायची मग ते पूर्णं घरात फिरवून घराभोवतीही फिरवायची. फार प्रसन्न वाटायचं तेव्हा. दसरा आला की ह्या चुलीला गेरू किंवा शेणाने सारवले जायचे. दसर्याच्या दिवशी आई-आजी चुलीची पुजा करायच्या. मी कधी आजारी वगैरे असले की आजी दृष्ट काढून चुलीत टाकायची. आजी सकाळी चहा घ्यायला चुली जवळच बसायची. पहिला कपातील ती थोडा चहा नैवेद्य म्हणून चुलीत टाकायची. मला फार गंमत वाटायची ते पाहून. काही दिवसांनी मी पण तिचे अनुकरण करू लागले. अगदी लहान होते तेव्हाचे आठवते की ह्याच चुलीची राख आई-आजी भांडी घासण्यासाठी घ्यायच्या. नंतर शायनेटची पावडर आली मग राख बंद झाली.
पूर्वी गावात ज्यांची गुरे असत ते शेणी थापून जाळण्यासाठी इंधन म्हणून विकायचे. शेणी म्हणजे शेणाच्या गोल थापून केलेल्या सुकवलेल्या जाड चकत्या. आमची वाडी असल्याने आम्हाला कधी लाकडांचा तोटा नव्हताच चुलीसाठी उलट आमच्या वाडीतूनच आमच्या आजूबाजूचे लोक चुलीसाठी लाकडे घेऊन जायचे. कुणाकडे लग्न कार्य असले की आधीच वडिलांना सांगून ठेवायचे गावकरी. माझ्या वडीलांना सगळे अण्णा म्हणतात. अण्णा अमुक महिन्यात लाकडे लागतील. मग एखादे सुकलेले झाड किंवा झाडांची डुखण (मोठ्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या) लग्नघराच्या नावे होत. वडील एकही पैसा त्यांच्याकडून घेत नसत. तेव्हा तशी लाकडांना किंमतही नव्हती. माझ्या आईने प्रार्थमिक शिक्षिकेची नोकरी केली. ती दुपारी शाळेतून आली की लाकडे गोळा करण्यासाठी वाडीत जात. मी पण तिच्याबरोबर जात असे. माझ्या हातात मावतील तितक्या काड्या छोटी लाकडे मी आई बरोबर गोळा करून आणत असे.
मला आठवते आजी चुलीवर रुचकर पदार्थ बनवायची. हे पदार्थ गॅस ऐवजी चुलीवरच रुचकर लागायचे. त्यात असायचे भानवल्या. भानवल्या बनवण्यासाठी खास बिडाचा खडबडीत तवा असायचा. ह्यात आंबोळ्या, घावन पण छान व्हायचे. उकडीचे पदार्थ जसे शेंगा, करांदे, कोनफळे अशा पदार्थांना चुलीवर शिजवल्याने विशिष्ट चव येते.
तांदूळ गिरणीतून दळून आणला की त्याचा कोंडा निघे. त्या कोंड्याचे आजी पेले बनवायची. हे कडवट गोड लागायचे. हे करताना पाहायला मला गंमत वाटायची. हे एका मोठ्या टोपात पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून त्यात छोटे छोटे घरातील पेल्यात ह्या कोंड्याचे गूळ घातलेले मिश्रण आजी भरायची आणी ते पेले वाफवायची. ह्या कृतीमुळेच कदाचित ह्याचे नाव पेलेच आहे. चुलीवरची भाकरी पण मस्त खरपूस पापुद्रा आलेली आजी करायची. ह्या भाकरी बरोबर खायला त्याच चुलीच्या निखार्यावर आई-आजी वाकट्या, बोंबील, बांगडा भाजून द्यायची. बांगडा भाजला म्हणजे अख्ख्या गावाला वास जायचा. ह्या चुलीत भाजलेल्या बांगड्याचा वास इतर कुठल्या घरातून आला तरी मला लगेच भूक लागायची. त्या काळी मटण महिन्यातून एखादं दिवशी असायचे. ते चुलीवरच. चुलीवरच्या मटणाची चवच काही न्यारी असते.
तसेच आम्ही कधी कधी चुलीत एखादा बटाटा, रताळं, करांदा, कोनफळ, बाठ्याची कोय असे प्रकार भाजायचो. ह्यांची ती करपट मिश्रीत रुचकर चव अप्रतिम लागायची. दिवसभरासाठी चाळा म्हणून चिंचेच्या सीझन मध्ये चिंचोके भाजायचे. भाताची कापणी झाली, शेतातून भारे वाहून नेले की शेतात जायचे आणि शिल्लक राहिलेल्या कुठे कुठे पडलेल्या तांदळाच्या कणश्या (कणसे) गोळा करायच्या आणि त्या आणून चुलीत निखार्यावर टाकायच्या मग त्याच्या फाट फाट लाह्या होत. ह्या लाह्या खाणेही एक छंदच असायचा.
थोडी मोठी झाले म्हणजे ५ वी ६ वीत असेल तेव्हा मग घरातल्यांचे चुलीचे काम झाले की मी भातुकली आमच्या पडवीतच खर्या चुलीवर खेळायचे. मग ह्या चुलीवर कधी मुगाची भाजी, कधी अंड्याचे कालवण, भात, अंडे तळणे, असे प्रकार करू लागले. हे प्रकार मी बिचार्या घरातल्यांनाही खायला द्यायचे आणि ते माझी वाहवा करायचे.
माझी चुलत भावंडे दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरी यायची. अशा वेळी आम्ही पार्टी करायचो. पार्टी म्हणजे आम्ही स्वतः वाडीत एखाद्या झाडाखाली चूल मांडून जेवण किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवायचो. ही चूल बनवण्यासाठी आम्ही तीन विटा घ्यायचो. जास्त करून बटाट्याची भाजी, भात किंवा अंड्याचे कालवण असायचे कारण हेच करायला सोपे असायचे. पण अंड्याचे कालवण बर्याचदा पचपचीत व्हायचे. हे जेवण आम्ही चुलीजवळच केळीच्या पानात जेवायचो. वाट्या वगैरे नसायच्या त्यामुळे कालवण पानातून ओघळायचे. ते पचपचीत कालवण पण गरम-गरम भाताबरोबर खाताना मौज वाटायची, शिवाय आपण केल्याचा एक वेगळाच आनंद असायचा. एकदा तर कोजागीरी निमित्त बटाटे वडे पण केले होते.
मला असे वाटत होते की लग्न ठरल्यावर आपल्याला चुलीचा सहवास मिळणार नाही. कारण लग्न ठरलेल्या घरी चुलीला जागाच नव्हती. पण सासर्यांनी आधीच जवळ वाडी घेऊन ठेवली होती व तिथे घराचे काम चालू केले होते. लग्न झाल्यावर साधारण दीड वर्षातच आम्ही नवीन वाडीत राहायला गेलो. मला चुलीची अत्यंत आवड असल्याने व घराच्या मागील बाजूस भरपूर जागा असल्याने मी तिथे तीन विटा मांडून चूल पेटवली. बहुतेक रविवारी मी त्यावर मटण शिजवू लागले. चूल पेटविल्याने सासूबाई माझ्यावर खूश झाल्या कारण त्यांना चूल आवडते आणि नोकरी करूनही मी हा छंद जोपासते ह्याचे घरात सगळ्यांनाच कौतुक वाटते.
हळू हळू आम्ही पाठी पडवी बांधली. एक दिवस मी मिस्टरांबरोबर जाऊन एका कुंभारवाड्यातून मातीची चूल, तवी (कालवण करण्यासाठीचे मातीचे भांडे) खापरी (भाकरी करण्याचा मातीचा तवा) घेऊन आले व पडवीत ठेवले. संध्याकाळी कामावरून आले की मी चूल पेटवायचे. रोज नाही पण काही सणांच्या व्रतांच्या दिवशी आम्ही धुपांगणात धुप जाळून घरभर फिरवतो. त्यामुळे तोच जुना प्रसन्नपणा मला अनुभवायला मिळतो.
संध्याकाळी चूल लावली की माझा पुतण्या शेकण्यासाठी माझ्या बाजूला बसून अभ्यास करायचा. चुलीच्या निखार्यावर तोही वाकट्या बोंबील भाजू लागला. साधारण वर्षानंतर मातीची चूल पाण्याने खराब झाली तेव्हा वाईट वाटले. मग मी परत विटाच मांडल्या. आम्ही वरचेवर रविवारी मटण/चिकन चुलीवरील तवीत शिजवून झाडाखाली पारावर एकत्र जेवायला बसतो. त्यामुळे मला पूर्वीचे जास्त काही हरवल्यासारखे वाटत नाही. कधी कधी मी भातही ह्या तवीत शिजवते. मातीच्या भांड्यातील पदार्थांना वेगळीच रुची असते. धुराचा व दाहकतेचा थोडा त्रास होतो पण त्यापेक्षा मला त्यातून आनंद जास्त मिळतो.
माझ्या मोठ्या मुलीला श्रावणीलाही समजायला लागल्यापासून चूल आवडते. अजूनही चुलीवरचे जेवण म्हटले की तिला आनंद होतो. माझ्या बरोबर ती पण येते चुलीजवळ. आता दुसरी मुलगी
राधा हिला शेक, धुरी ह्याच चुलीच्या निखार्यांपासून दिली जाते. माझ्या मुली माझा वारसा चालवतील की नाही हे माहीत नाही आणि माझी बिलकुल सक्तीही नाही. पण चूल म्हणून एक इंधनाचे साधन असते किंवा असायचे, मातीची भांडी असतात किंवा असायची आम्ही ती वापरली आहेत ह्याचे ज्ञान, अनुभव त्यांना आहे तसेच त्या हे अनुभव पुढे त्यांच्या पुढच्या पिढी बरोबर शेअर करु शकतील.
हा लेख शनिवार, २७/०४/२०१३ ला लोकसत्ता - वास्तुरंग पुरवणी (पुणे आवृत्तॉ) मध्ये तसेच ०१/०६/२०१३ ला इतरत्र प्रकाशीत झाला. http://epaper.loksatta.com/120968/indian-express/01-06-2013#page/26/2
जागू तुझ्या लेखाची
जागू तुझ्या लेखाची लिन्क
http://epaper.loksatta.com/120968/indian-express/01-06-2013#page/26/2
माझ्या मुली माझा वारसा
माझ्या मुली माझा वारसा चालवतील की नाही हे माहीत नाही आणि माझी बिलकुल सक्तीही नाही. पण चूल म्हणून एक इंधनाचे साधन असते किंवा असायचे, मातीची भांडी असतात किंवा असायची आम्ही ती वापरली आहेत ह्याचे ज्ञान, अनुभव त्यांना आहे तसेच त्या हे अनुभव पुढे त्यांच्या पुढच्या पिढी बरोबर शेअर करु शकतील.
खरंच चांगला विचार आहे. त्यांना उपयोग असेल नसेल पण आपल्या घरीही हे होते हे माहीत असणेही खुप गंमतीचे आहे.
लहानपणी आपल्यावर काय काय कामे आई सोपवायची याचा विचार आज करते तेव्हा वाटते की तेव्हा खुप लहानपणापासुनच मुली घरात कामाला हातभार लावायच्या. आम्ही सावंतवाडीला राहायचो तेव्हा घरी आईचा संसार चुलीवरचाच होता आणि रोज सकाळी उठल्यावर चुल सारवायचे काम माझ्याकडे होते.
जागूताई, लेख अतिशय आवडला. ही
जागूताई, लेख अतिशय आवडला. ही नष्ट होत जाणारी संस्कृती आपल्या पिढीपर्यंततरी जिवंत ठेवण्याची धडपड खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या बालपणाच्या आठवणीत नुसतेच न रमता आपल्या मुलांनाही ती मजा अनुभवायला मिळावी, जुन्या संस्कृतीशी त्यांचाही परिचय व्हावा यासाठी तू प्रत्यक्ष कृती करते आहेस. आपली संस्कृती शेकोटीभोवतीच बहरली. पाश्चात्यांनी बार्बेक्यूच्या रूपात ती मजा जिवंत ठेवली आहे. आम्हांला मात्र जागा, वेळ अशा क्षुल्लक अडचणी भेडसावतात. पण तुझ्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे आणि उरकामुळे या अडचणींवर तू मात करू शकलीस. तुझ्याहातून असेच लिखाण होत राहू दे आणि आम्हांला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत राहू दे.
ता. क. एक फर्माईश. एकदा 'पोपटी पार्टी'वर लेख येऊ दे. शंकर सखारामांनी लिहिले होते पण आता 'डायरेक्ट फ्रॉम हॉर्सेस माऊथ' येऊ दे.
सामी, तीच लिंक सांगायला आलो
सामी, तीच लिंक सांगायला आलो होतो.
खुपच मस्त ! आवडला लेख !
खुपच मस्त ! आवडला लेख !
लहानपणी आपल्यावर काय काय कामे
लहानपणी आपल्यावर काय काय कामे आई सोपवायची याचा विचार आज करते तेव्हा वाटते की तेव्हा खुप लहानपणापासुनच मुली घरात कामाला हातभार लावायच्या. आम्ही सावंतवाडीला राहायचो तेव्हा घरी आईचा संसार चुलीवरचाच होता आणि रोज सकाळी उठल्यावर चुल सारवायचे काम माझ्याकडे होते. >>>>>>>>>>>आम्हाला तर, घरातला अंगणातला केर काढणे, सडा घालणे, रांगोळी काढणे, दुल सारवणे, फ़ुले गोळा करणे, पाणी आणणे, भांडी घासणे, अशी बरीच कामे करावी लागत.पण त्याचा कधी कंटाळा किंवा राग आला नाही.
चुलीवरचे स्वयंपाक मी सुध्दा
चुलीवरचे स्वयंपाक मी सुध्दा बर्याच वेळा केला आहे. तेव्हा कुकर सुध्दा बिना शिट्टीवाला होता. मातीची चुल बारीक लाकडे फोडणे , भुश्याची शेगडी प्रत्येक गोष्टीत मजा होती.
लेख आवडला !
हा लेख आजच्या (१ जून)
हा लेख आजच्या (१ जून) लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशित झाला आहे. अभिनंदन.
लोकसत्ताने नोडमध्ये देण्यासाठी निवडलेले इंग्रजी नाव आजकालच्या हिंदी सिनेमांच्या शीर्षकासारखे आहे.
जागुताई लोकसत्तामधील ह्या
जागुताई लोकसत्तामधील ह्या लेखासाठी अभिनन्दन.
१००
१००
मी १०१
मी १०१
साती, भरतजी लिंकबद्दल खुप
साती, भरतजी लिंकबद्दल खुप धन्यवाद.
हीरा धन्यवाद. ही पोपटीची लिंक. http://www.maayboli.com/node/21397
साधना, शोभा खरच तेंव्हा ती कामे करताना कधीच कंटाळा नाही यायचा.
इब्लिस, बंडोपंत, मुक्तेश्वर, अन्जु, उदयन, शोभा धन्यवाद.
आज मला हा लेख वाचुन काही जणांचे फोन आले त्यांनीही माझ्याशी त्यांच्या आठवणी शेअर केल्या. खुप खुप धन्य वाटल मला खरच.
खुप छान लेख जागू. माझ्या
खुप छान लेख जागू. माझ्या लहानपणीही आम्ही आजोळी जायचो तेव्हा चुलीवर पाणी तापवत असु.
तसचं डाळ्-बट्टीचा प्रोग्रॅम असेल तर बट्ट्या चुलितल्या निखार्यात भाजत असु. छान वाटले वाचून.
खूप हेवा वाटतो आहे तुमचा.
खूप हेवा वाटतो आहे तुमचा. मीही यातल्या बर्याच गोष्टी अनुभवल्या आहेत. पण आता मात्र हे सगळे फार दूर गेले असे वाटते. ते सगळ स्वप्नं झालं आहे आता.बाहेर पाउस येतो आहे. हे वाचत असताना सगळ्या जुन्या गोष्टींना उजाळा मिळला.त्यामुळे खूप छान वाटत आहे.
लोकसत्ताची शहरागणिक वेगवेगळी
लोकसत्ताची शहरागणिक वेगवेगळी वास्तुरंग पुरवणी असते हे माहीत नव्हते.
भरतजी मलाही माहीत नव्हते.
भरतजी मलाही माहीत नव्हते. माझा लेख जेंव्हा पुण्याच्या पुरवणीत आला तेंव्हा मुंबईत नव्हता मला सकाळी शांकलीचा मेसेज आला लेख वाचल्याचा मी लगेच घरातला लोकसत्ता पाहीला तर लेख नव्हता. तेंव्हा मला शांकलीकडूनच कळले की काही लेख असे मागे-पुढे होतात.
माधवी, सुरेखा धन्यवाद.
जागू दी ग्रेट!!! सकाळच्या
जागू दी ग्रेट!!!
सकाळच्या वेळी चुली शेजारी बसुन त्याच चुलीवरचा बिन दुधाचा चहा आणि सोबत घावणे... स्वर्गच तो.
लोकसत्ताची शहरागणिक वेगवेगळी
लोकसत्ताची शहरागणिक वेगवेगळी वास्तुरंग पुरवणी असते हे माहीत नव्हते.
<<< बहुतेक पुरवण्या (रविवारची वगैरे सोडल्यास) आवृत्तीप्रमाणे बदलतात. स्थानिक जाहिरातदार, स्थानिक माहिती आणि स्थानिक वाचक या दृष्टीने ते सोपे पडते.
शहरागणिक वेगवेगळी वास्तुरंग
शहरागणिक वेगवेगळी वास्तुरंग पुरवणी >>>>>>>>> असं असावं बहुतेक कारण मी शनी, रवी लोकसत्ता अगदी अ पासून ज्ञ पर्यंत वाचते. पण जागूचा हा लेख नाही दिसला. किंवा मग राहिला असेल.
पण जागू मस्त लिहिलंस!
मी इंटरनेटवर लोकसत्ता वाचते,
मी इंटरनेटवर लोकसत्ता वाचते, त्यात वास्तुरंगमधे आहे हा लेख.
जागु, खुपच छान चुलीचं
जागु,
खुपच छान चुलीचं शब्दचित्र लिहिलं आहेस. सर्वांच्याच स्मृती जाग्या केल्यास. अशीच लिहीत जा आणि आम्हा सर्वांना वाचण्याचा आनंद देत जा.
जागु ताई.....ईमोशनल बनवलस
जागु ताई.....ईमोशनल बनवलस गं........हे सग्गळ्ळं मी अनुभवलयं........पण आता नाही अनुभवु शकत.......तु सांगितलेल्या सर्व घटना मी माझ्या लहानपणाशी रिलेट केल्या...... कधी ईमोशनल झाले ते कळ्ळंच नाही....
अप्रतीम झालाय लेख
अप्रतीम झालाय लेख जागू.
चुलीचा दररोज इतका सहवास नशीबी नव्हता, पण उन्ह्याळ्याची सुट्टी गावी कधी चुलीशिवाय पुरी झाली नाही. त्यात भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव अजुनही जीभेवर कायम आहे
जागू, अगं कित्ती छान लेख
जागू, अगं कित्ती छान लेख लिहिलाय्स
मलाही तुझं खुप खुप कौतुक वाटतं नेहमीच . कित्ती आत्मियतेने करतेस सारं. तुझ्या माशांवर तर माझा लईच जीव असंच लिहित रहा, करत रहा, हसत रहा
खुप खुप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !
खूप छान लेख. खूप आवड्ला.
खूप छान लेख. खूप आवड्ला.
नंदीनी आत्ता कारण समजल
नंदीनी आत्ता कारण समजल जाहीरातीच. धन्स.
मानुषी कधी आला तर मला नक्की सांग.
अनिश्का अलिबागकरीण तू , होणारच ग. धन्स.
इंद्रा, दिपा, अन्जू, सुमेधा धन्यवाद.
अवल मासा उड्या मारायला लागला धन्स.
अग्रसेन या दिवाळी अंकात
अग्रसेन या दिवाळी अंकात जागूच्या या लेखाला दुसरे पारितोषिक मिळाले जागू, खूप खूप अभिनंदन ग
अरे वा. अभिनंदन जागू. हे त्या
अरे वा. अभिनंदन जागू. हे त्या दिवाळी अंक २०१३ बाफ वर टाका.
Abhinandan Jagudi!
Abhinandan Jagudi!
मला खूप आवडते तुमचे लेखन
मला खूप आवडते तुमचे लेखन (रेसिपी आवडतात हे सांगायलाच नको ) .
साध्या प्रसंगातून/विषयातूनही कळत-नकळत काहीतरी गहिरे सांगून जाण्याचे सामर्थ्य या निर्व्याज लेखनात निश्चितच आहे.
Pages