कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.
लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती. नंतर आजीने गवंड्याकडून सळया घालून सिमेंटची चूल करून घेतली. मी थंडीत रोज उठल्या बरोबर चुलीजवळ जाऊन शेकायला बसायचे. चाळा म्हणून मधून मधून लाकडे ढकलणे, पात्या, कागद जाळणे असा खोडकरपणा चुलीबरोबर करायचे. असे करताना बरेचदा निखार्याचा चटका बसे किंवा पाती किंवा कागद जळत हातावर येत असे.
सकाळी आजीची देवपूजा झाली की आजी चुलीतील निखारे धुपांगणात घेऊन त्यावर धुप घालून ते देवाला दाखवायची मग ते पूर्णं घरात फिरवून घराभोवतीही फिरवायची. फार प्रसन्न वाटायचं तेव्हा. दसरा आला की ह्या चुलीला गेरू किंवा शेणाने सारवले जायचे. दसर्याच्या दिवशी आई-आजी चुलीची पुजा करायच्या. मी कधी आजारी वगैरे असले की आजी दृष्ट काढून चुलीत टाकायची. आजी सकाळी चहा घ्यायला चुली जवळच बसायची. पहिला कपातील ती थोडा चहा नैवेद्य म्हणून चुलीत टाकायची. मला फार गंमत वाटायची ते पाहून. काही दिवसांनी मी पण तिचे अनुकरण करू लागले. अगदी लहान होते तेव्हाचे आठवते की ह्याच चुलीची राख आई-आजी भांडी घासण्यासाठी घ्यायच्या. नंतर शायनेटची पावडर आली मग राख बंद झाली.
पूर्वी गावात ज्यांची गुरे असत ते शेणी थापून जाळण्यासाठी इंधन म्हणून विकायचे. शेणी म्हणजे शेणाच्या गोल थापून केलेल्या सुकवलेल्या जाड चकत्या. आमची वाडी असल्याने आम्हाला कधी लाकडांचा तोटा नव्हताच चुलीसाठी उलट आमच्या वाडीतूनच आमच्या आजूबाजूचे लोक चुलीसाठी लाकडे घेऊन जायचे. कुणाकडे लग्न कार्य असले की आधीच वडिलांना सांगून ठेवायचे गावकरी. माझ्या वडीलांना सगळे अण्णा म्हणतात. अण्णा अमुक महिन्यात लाकडे लागतील. मग एखादे सुकलेले झाड किंवा झाडांची डुखण (मोठ्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या) लग्नघराच्या नावे होत. वडील एकही पैसा त्यांच्याकडून घेत नसत. तेव्हा तशी लाकडांना किंमतही नव्हती. माझ्या आईने प्रार्थमिक शिक्षिकेची नोकरी केली. ती दुपारी शाळेतून आली की लाकडे गोळा करण्यासाठी वाडीत जात. मी पण तिच्याबरोबर जात असे. माझ्या हातात मावतील तितक्या काड्या छोटी लाकडे मी आई बरोबर गोळा करून आणत असे.
मला आठवते आजी चुलीवर रुचकर पदार्थ बनवायची. हे पदार्थ गॅस ऐवजी चुलीवरच रुचकर लागायचे. त्यात असायचे भानवल्या. भानवल्या बनवण्यासाठी खास बिडाचा खडबडीत तवा असायचा. ह्यात आंबोळ्या, घावन पण छान व्हायचे. उकडीचे पदार्थ जसे शेंगा, करांदे, कोनफळे अशा पदार्थांना चुलीवर शिजवल्याने विशिष्ट चव येते.
तांदूळ गिरणीतून दळून आणला की त्याचा कोंडा निघे. त्या कोंड्याचे आजी पेले बनवायची. हे कडवट गोड लागायचे. हे करताना पाहायला मला गंमत वाटायची. हे एका मोठ्या टोपात पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून त्यात छोटे छोटे घरातील पेल्यात ह्या कोंड्याचे गूळ घातलेले मिश्रण आजी भरायची आणी ते पेले वाफवायची. ह्या कृतीमुळेच कदाचित ह्याचे नाव पेलेच आहे. चुलीवरची भाकरी पण मस्त खरपूस पापुद्रा आलेली आजी करायची. ह्या भाकरी बरोबर खायला त्याच चुलीच्या निखार्यावर आई-आजी वाकट्या, बोंबील, बांगडा भाजून द्यायची. बांगडा भाजला म्हणजे अख्ख्या गावाला वास जायचा. ह्या चुलीत भाजलेल्या बांगड्याचा वास इतर कुठल्या घरातून आला तरी मला लगेच भूक लागायची. त्या काळी मटण महिन्यातून एखादं दिवशी असायचे. ते चुलीवरच. चुलीवरच्या मटणाची चवच काही न्यारी असते.
तसेच आम्ही कधी कधी चुलीत एखादा बटाटा, रताळं, करांदा, कोनफळ, बाठ्याची कोय असे प्रकार भाजायचो. ह्यांची ती करपट मिश्रीत रुचकर चव अप्रतिम लागायची. दिवसभरासाठी चाळा म्हणून चिंचेच्या सीझन मध्ये चिंचोके भाजायचे. भाताची कापणी झाली, शेतातून भारे वाहून नेले की शेतात जायचे आणि शिल्लक राहिलेल्या कुठे कुठे पडलेल्या तांदळाच्या कणश्या (कणसे) गोळा करायच्या आणि त्या आणून चुलीत निखार्यावर टाकायच्या मग त्याच्या फाट फाट लाह्या होत. ह्या लाह्या खाणेही एक छंदच असायचा.
थोडी मोठी झाले म्हणजे ५ वी ६ वीत असेल तेव्हा मग घरातल्यांचे चुलीचे काम झाले की मी भातुकली आमच्या पडवीतच खर्या चुलीवर खेळायचे. मग ह्या चुलीवर कधी मुगाची भाजी, कधी अंड्याचे कालवण, भात, अंडे तळणे, असे प्रकार करू लागले. हे प्रकार मी बिचार्या घरातल्यांनाही खायला द्यायचे आणि ते माझी वाहवा करायचे.
माझी चुलत भावंडे दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरी यायची. अशा वेळी आम्ही पार्टी करायचो. पार्टी म्हणजे आम्ही स्वतः वाडीत एखाद्या झाडाखाली चूल मांडून जेवण किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवायचो. ही चूल बनवण्यासाठी आम्ही तीन विटा घ्यायचो. जास्त करून बटाट्याची भाजी, भात किंवा अंड्याचे कालवण असायचे कारण हेच करायला सोपे असायचे. पण अंड्याचे कालवण बर्याचदा पचपचीत व्हायचे. हे जेवण आम्ही चुलीजवळच केळीच्या पानात जेवायचो. वाट्या वगैरे नसायच्या त्यामुळे कालवण पानातून ओघळायचे. ते पचपचीत कालवण पण गरम-गरम भाताबरोबर खाताना मौज वाटायची, शिवाय आपण केल्याचा एक वेगळाच आनंद असायचा. एकदा तर कोजागीरी निमित्त बटाटे वडे पण केले होते.
मला असे वाटत होते की लग्न ठरल्यावर आपल्याला चुलीचा सहवास मिळणार नाही. कारण लग्न ठरलेल्या घरी चुलीला जागाच नव्हती. पण सासर्यांनी आधीच जवळ वाडी घेऊन ठेवली होती व तिथे घराचे काम चालू केले होते. लग्न झाल्यावर साधारण दीड वर्षातच आम्ही नवीन वाडीत राहायला गेलो. मला चुलीची अत्यंत आवड असल्याने व घराच्या मागील बाजूस भरपूर जागा असल्याने मी तिथे तीन विटा मांडून चूल पेटवली. बहुतेक रविवारी मी त्यावर मटण शिजवू लागले. चूल पेटविल्याने सासूबाई माझ्यावर खूश झाल्या कारण त्यांना चूल आवडते आणि नोकरी करूनही मी हा छंद जोपासते ह्याचे घरात सगळ्यांनाच कौतुक वाटते.
हळू हळू आम्ही पाठी पडवी बांधली. एक दिवस मी मिस्टरांबरोबर जाऊन एका कुंभारवाड्यातून मातीची चूल, तवी (कालवण करण्यासाठीचे मातीचे भांडे) खापरी (भाकरी करण्याचा मातीचा तवा) घेऊन आले व पडवीत ठेवले. संध्याकाळी कामावरून आले की मी चूल पेटवायचे. रोज नाही पण काही सणांच्या व्रतांच्या दिवशी आम्ही धुपांगणात धुप जाळून घरभर फिरवतो. त्यामुळे तोच जुना प्रसन्नपणा मला अनुभवायला मिळतो.
संध्याकाळी चूल लावली की माझा पुतण्या शेकण्यासाठी माझ्या बाजूला बसून अभ्यास करायचा. चुलीच्या निखार्यावर तोही वाकट्या बोंबील भाजू लागला. साधारण वर्षानंतर मातीची चूल पाण्याने खराब झाली तेव्हा वाईट वाटले. मग मी परत विटाच मांडल्या. आम्ही वरचेवर रविवारी मटण/चिकन चुलीवरील तवीत शिजवून झाडाखाली पारावर एकत्र जेवायला बसतो. त्यामुळे मला पूर्वीचे जास्त काही हरवल्यासारखे वाटत नाही. कधी कधी मी भातही ह्या तवीत शिजवते. मातीच्या भांड्यातील पदार्थांना वेगळीच रुची असते. धुराचा व दाहकतेचा थोडा त्रास होतो पण त्यापेक्षा मला त्यातून आनंद जास्त मिळतो.
माझ्या मोठ्या मुलीला श्रावणीलाही समजायला लागल्यापासून चूल आवडते. अजूनही चुलीवरचे जेवण म्हटले की तिला आनंद होतो. माझ्या बरोबर ती पण येते चुलीजवळ. आता दुसरी मुलगी
राधा हिला शेक, धुरी ह्याच चुलीच्या निखार्यांपासून दिली जाते. माझ्या मुली माझा वारसा चालवतील की नाही हे माहीत नाही आणि माझी बिलकुल सक्तीही नाही. पण चूल म्हणून एक इंधनाचे साधन असते किंवा असायचे, मातीची भांडी असतात किंवा असायची आम्ही ती वापरली आहेत ह्याचे ज्ञान, अनुभव त्यांना आहे तसेच त्या हे अनुभव पुढे त्यांच्या पुढच्या पिढी बरोबर शेअर करु शकतील.
हा लेख शनिवार, २७/०४/२०१३ ला लोकसत्ता - वास्तुरंग पुरवणी (पुणे आवृत्तॉ) मध्ये तसेच ०१/०६/२०१३ ला इतरत्र प्रकाशीत झाला. http://epaper.loksatta.com/120968/indian-express/01-06-2013#page/26/2
जागू किती छान लिहिले
जागू किती छान लिहिले आहेस्....तुला खूप खूप शुभेच्छा. तुझे खरोखर खूपच कौतूक वाटते.
मस्त.... मला पण चुलीवरचा
मस्त....

मला पण चुलीवरचा स्वैपाक खुप आवडतो.
मी गावी गेले तेव्हा चुल घेऊन येणार होते पण मग लाकडांचा प्रश्न आला नि आयडिया बारगळली!!
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
सुरेख ग जागू. निखार्यावर
सुरेख ग जागू. निखार्यावर भाजलेल्या पापड्या, पानग्या, कोई अजुन आठवताहेत.
भाकरी करुन झाल्यावर आज्जी त्याच तव्यात तेलावर दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर शेंगदाणे टाकुन तव्यावरच रगडुन आम्हाला नाष्ट्याला द्यायची भाकरीबरोबर.
चुलीवरच्या खरपूस भाकरीची आणि भरल्या वांग्याची चव कशालाच येणार नाही.
मज्जा आहे तुमची. सिलेंडर
मज्जा आहे तुमची. सिलेंडर संपला किंवा संपावर असला तरी तुम्हाला काळजी नाही. माझी आजी दररोज चुल सारवायची. जाळ कमी करणे म्हणजे धावत जाऊन लाकडे बाहेर ओढणे ... आजीला मदत केल्याचे समाधान.
मस्तं लिहीलंयस. अगदी सेम
मस्तं लिहीलंयस.
अगदी सेम आठवणी आहेत आमच्याही.
चुलीवर तापवलेल्या स्नानाच्या पाण्यालाही मस्तं खरपूस वास येतो.
चुलीत पाडाला आलेला आंबा भाजत ठेऊन त्याचं रायतं मस्तं होतं.
मस्त जागू, मासे सोडुन इतरही
मस्त जागू, मासे सोडुन इतरही पार्टटाईम छंद जोपासते आहेस हे कळल्यावर बरं वाटलं
खरच मस्त लेख, मी जन्मलो गावीच पण एक वर्षाचा असताना आमचं संपुर्ण कुटुंब मुबईत आलं त्यामुळे गणपती, मे, शिमगा अशा वेळीच गावी जायचो त्यावेळी जे पहायचो ते सगळं डोळ्यासमोरुन तरळलं.
चुलीच्या बाबतीत एक आठवण येते ती म्हणजे एक मे महिन्यात गावी गेलेलो असताना मी पहायचो चुल फुकायला फुकणी असायची. एकदा लाकडांचा धूर झाला होता मी फुकणी उचलली आणि पिपाणी सारखी एका बाजुने तोंडात धरली आणि जोरात फूंकली आणि श्वास परत घेताना तोंडावाटेच (फुंकणी मधुनच) जोरात वर ओढला त्या बरोबर सगळा धूर नाका तोंडात गेला, ते सगळं आठवल
मस्त लेख जागू.
मस्त लेख जागू.
जागू, मस्त लेख. बालपण
जागू, मस्त लेख. बालपण डोळ्यासमोर आलं.


आम्ही पण लहानपणी सगळा स्वयंपाक चुलीवरच करायचो. पोहे तयार करताना आई चुलीवरच मातीच्या भांड्यात भात (ते भात. तो भात नव्हे. :फिदी:) भा़जून उखळात कांडून पोहे करायची. काय मस्त स्वाद असायचा त्यांचा. मी पण पोहे कांडले आहेत.
कांदे, करांदे, काजू, चुलीत भाजून खायचो. आणि कैरी भाजून त्याचा गर अंगाला लावून अंघोळ. आहाहा! काय दिवस होते ते. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
एकदा लाकडांचा धूर झाला होता मी फुकणी उचलली आणि पिपाणी सारखी एका बाजुने तोंडात धरली आणि जोरात फूंकली आणि श्वास परत घेताना तोंडावाटेच (फुंकणी मधुनच) जोरात वर ओढला त्या बरोबर सगळा धूर नाका तोंडात गेला, ते सगळं आठवल फिदीफिदी>>>>>>>>>>>>>वैभव, माझं पण लहानपणी एकदा असच झालं होतं. पण अनुभवातून शहाणपण आलं .
ग्रेटच आहेस ग तू जागू. छान
ग्रेटच आहेस ग तू जागू.
छान लिहीलास लेख. माझ्या लहानपणी आमच्याकडेही पडवीत चुल होती. एक भुश्श्याची पण होती. फुंकणी ठेवून त्यात लाकडाच्या वखारीत मिळणारा भुस्सा ठासून भरायचा. ह्यावर अंघोळीचे पाणी तापे. दुसर्या मातीच्या चुलीवर पोळ्या-भाकरी केल्या जात.
जागू, मस्त लिहिलाय. माझ्या
जागू, मस्त लिहिलाय.
माझ्या आजोळी पण गॅस आला तरी भाकर्या वगैरे करण्यासाठी चूलच वापरतात. त्या फुंकणीचा आवाज मस्त असतो. आजोळची फुंकणी चांगलीच दणकट आहे. भाजलेला कांदाच काय भाजलेली काजूची बीदेखील तिने फोडता येते.
घरामागे चिंचेचे झाड आहे. त्याच्या कच्च्या चिंचा पण आम्ही चूलीत भाजून खातो.
काय सुंदर लेख लिहिलास जागू -
काय सुंदर लेख लिहिलास जागू - प्रचंड आवडला.
नॉस्टाल्जिक करुन टाकलंस अगदी- लहानपणी मी ही चुलीवर बनवलेलं जेवण चाखलेलं आहे - खरंच त्या जेवणाची चवच न्यारी - अगदी साधं दूध जरी तापवलं चुलीवर तरी मस्तंच लागतं मग भाकरी-पिठलं, भरीत इ. गोष्टी तर किती चवीष्ट लागतात हे सांगायलाच नको .....
जागू, अगं कित्ती छान लेख
जागू, अगं कित्ती छान लेख लिहिलाय्स
तुझं खुप खुप कौतुक वाटतं नेहमीच मला. निसर्गाशी गप्पा, स्वयंपाक, संस्कृती जपणे, हस्तकला सगळं सगळं तु इतक्या आत्मियतेने आणि आवडीने करत असतेस
परत ते सगळं दुसर्यांबरोबर शेअर करतेस... _/\_ तुला 
अशीच सदैव सुखात, आनंदात रहा
भाजलेला कांदाच काय भाजलेली
भाजलेला कांदाच काय भाजलेली काजूची बीदेखील तिने फोडता येते.>>>>>>>>>>हो दिनेशदा. आमच्याकडे पण लोखंडाची नळी (फुंकणी) होती. त्यावेळी ती खूपच जड वाटायची. त्यानीच आम्ही भाजलेल्या काजू फोडून अखंड गर काढायचो.
अगदी साधं दूध जरी तापवलं चुलीवर तरी मस्तंच लागतं मग भाकरी-पिठलं, भरीत इ. गोष्टी तर किती चवीष्ट लागतात हे सांगायलाच नको .....>>>>>>>>शशांकजी, माझी आई लोखंडी कढईत पिठल किंवा पिठी करायची आणि सगळ्यांच जेवण झाल की कढई मला द्यायची. काय मजा यायची ती खरवड खाताना.
लाजो +
लाजो + १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००
जागु _____/\____ सलाम
जागु _____/\____ सलाम तुला!!
चुल पेटवणं,एकीकडे धुर सहन करत तीच्यातला जाळ एकसारखा ठेवणं, हे अगदी महाकष्टाचं काम वाटतं मला.
खरच ही सगळी कामं नोकरी सांभाळुन तु लिलया करु शकतेस... खुप कौतुक तुझं!
खूप छान लेख. आवडला. लाजो +
खूप छान लेख. आवडला.
लाजो + १०००००
जागु , अतिशय सुंदर लिहले
जागु , अतिशय सुंदर लिहले आहे........
सुरेख झालाय लेख्...लाजो +
सुरेख झालाय लेख्...लाजो + १००००
छान लिहिले आहेस . मला सुद्धा
छान लिहिले आहेस . मला सुद्धा चुलि वर जेवन करयला आवडते .
छान लिहिले आहेस . मला सुद्धा
छान लिहिले आहेस . मला सुद्धा चुलि वर जेवन करयला आवडते .
तुझं खुप खुप कौतुक वाटतं
तुझं खुप खुप कौतुक वाटतं नेहमीच मला. निसर्गाशी गप्पा, स्वयंपाक, संस्कृती जपणे, हस्तकला सगळं सगळं तु इतक्या आत्मियतेने आणि आवडीने करत असतेस परत ते सगळं दुसर्यांबरोबर शेअर करतेस... _/\_ तुला
अशीच सदैव सुखात, आनंदात रहा >>>++११११११११११११
मला पण गावी गेल्यावर चुली वरच जेवण आवडते.. अगदि कोंबडी -वडे तरि होतातच चुलिवर..
मस्तच लेख.. तेव्हा सकाळ
मस्तच लेख.. तेव्हा सकाळ मध्येही वाचला होता.. खूप कौतुक तुझे
छान! आजोळची आठवण आली..... खूप
छान! आजोळची आठवण आली..... खूप खूप कौतुक !
मस्त!
मस्त!
सामी, स्वाती, चैत्राली,
सामी, स्वाती, चैत्राली, शुभांगी, किशोर, वैभव, रैना, शोभा, अनघा, दिनेशदा, शशांकजी, आर्या, नताशा, स्मितू, केया, प्रणाली, सृष्टी, मृनिष, मंजू, जाईजुई खुप खुप धन्यवाद.
लाजो किती कौतुक ग अगदी तुझ्या केकसारखेच.
धन्स.
जागू, अगदी जीव ओतून लिहितेस
जागू, अगदी जीव ओतून लिहितेस त्यामुळे तुझं लिखाण आपलंसं वाटतं
ग्रेट! माझ्या लहानपणी गावी
ग्रेट!
माझ्या लहानपणी गावी गेल्यावर आंघोळीच पाणी अंगणातच तापवलं जायचं. ज्वारीच्या बारीक पापुद्र्यासारख्या रोट्या होत. चुलीवरची दिब्बारोट्टी, आप्पे स्स्स्स्स्स्स.. क्या याद दिला दी!
मलाही चूल आवडते पण अनुभव नाही.
जागू अतिशय सुरेख लेख आहे.
जागू अतिशय सुरेख लेख आहे. दापोलीला आजीच्या हातचा चुलीवरचा स्वैपाक जेवलीये, चूल सारवली आहे, चुलीवरचं गरम पाणी आंघोळीला वापरलंय. पण त्याला अनेकानेक वर्षं लोटली आहेत. तुला अजूनही हे सगळं अनुभवायला, वापरायला मिळतंय हे खरंच भाग्यच.
अशीच सदैव सुखात, आनंदात रहा >>> लाजो + १.
लेख खूप आवडला. तुझं लिखाण
लेख खूप आवडला.
तुझं लिखाण मनापासून लिहिलेलं आणि फार प्रामाणिक वाटतं.
Pages