विषारी वनस्पती

Submitted by जिप्सी on 16 May, 2013 - 01:53

निसर्गाच्या गप्पा धाग्यावर विषारी वनस्पतींची चर्चा चालु होती. या विषारी वनस्पतींची ओळख व्हावी म्हणुन औषधी वनस्पती सारखाच हा "विषारी वनस्पती"चा हा धागा.

एक किस्सा:
एकदा गृपमध्ये ट्रेकिंगविषयी चर्चा चालू होती. तेंव्हा एकाने किस्सा सांगितला. एक गृप ट्रेकिंगला गेला असता रात्रीचे जेवण बनवायला घेतले. त्या गृपकडे चमचा नसल्याने एकाने झाडाची फांदी काढुन त्याने ढवळायला घेतले. रात्री जेवल्यानंतर सगळे झोपले. सकाळी उठल्यावर सगळ्यांचे संपूर्ण दात निखळुन पडले होते. रामेठी-कामेठी असं काहीस त्या झाडाच नाव होतं. एकाचा उपयोग दात निखळुन पडण्यासाठी तर दुसर्‍याचा उपयोग दात मजबूत करण्यासाठी होतो.

वरील माहितीच्या आधारे मायबोलीकर शांकलीने केलेली विपु:
जिप्सी, मी आत्ताच एका वैद्यांना (वैद्य कमलाकर देसले) यांना रामेठा/दातपाडी बाबत विचारलं. ते म्हणाले की
"दातपाडीमधे जो विषारी गुणधर्म सांगितला आहे तो असा की त्याने अंगावर सूज येते. गावाकडे गुरं जेव्हा बाजारात विकायला नेतात, तेव्हा रामेठ्याचा पाला गुरांच्या अंगाला चोळतात. त्यामुळे गुरं गुटगुटीत दिसतात." मग मी त्यांना त्या घटनेबद्दल विचारलं, त्यावर ते म्हणाले की "हिरड्या सुजल्या असाव्यात. क्वचित वेदना सुद्धा झाल्या असाव्यात. पण दात पडले असतील हे संभवत नाही. तसं कुठं पुस्तकांमधे उल्लेख नाही. बरेच जण वनस्पतींमधल्या विषारी गुणधर्माबद्दल अभ्यास करतात. त्यांच्याही पेपर्समधे दात पडल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही घटना म्हणजे बहुधा दंतकथा असावी."
मात्र एक गोष्ट जी मला माहिती आहे ती म्हणजे, अनेक वनस्पती ह्या बर्‍यापैकी विषारी असतात. पण तो विषारीपणा हा त्यांच्या स्व-संरक्षणाचा भाग असतो. बहुतेक सर्व वनस्पती औषधी असू शकतात. पण ह्या गोष्टींची नीट खातरजमा, माहिती आणि अभ्यास करूनच त्यांना हाताळायला पाहिजे.

रामेठा/दातपाडीचा फोटो
(फोटो साभार: शुभदा मॅडम)
रानतंबाखू
रानतंबाखू हाताला किंवा डोळ्याला लागली तर डोळ्यांची प्रचंड आग होते व तात्पुरते (कायमचे नव्हे) अंधत्व येऊ शकते.
कावळी - Cryptolepis buchanani या विषारी वनस्पतींवरचा शशांक पुरंदरे यांचा लेख.

घटित - अघटित

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूगलवर 'विषारी वनस्पती' असं शोधल्यास अनेक वनस्पतींची माहिती मिळू शकते.

अपोसायनासी या कुळातल्या वनस्पती जास्त करून विषारी आहेत. ज्यांच्यातून पांढरा चीक बाहेर येतो मग तो फूल तोडल्यावर असो नाहीतर छोटी फांदी तोडल्यावर असो. अशा बहुतेक सर्व वनस्पती विषारी आहेत.

पूर्वी काहींच्या बागेत कडेने एक काटेरी झुडुप लावलेले असे. जेमतेम दोन अडीच फूट वाढणार्‍या या झुडपाच्या नाजुकशा खोडावर खूप काटे असायचे (म्हणजे असतात) फुलं दोन पाकळ्यांची, लाल किंवा केशरी आणि पाकळ्यांच्या मधोमध एक अगदी पिटुकला त्याच रंगाचा ठिपका. किंवा टिकली! ती फुलं तोडली की चीक निघतो. पण ही वनस्पती चांगलीच धोकादायक आहे.

हेम, चित्रकाचा हा वेगळा प्रकार दिसतोय. निळ्या / करड्या रंगाचा असतो नेहमी आणि पाकळ्या पण टोकेरी नसतात.

शांकली,
मागे एका लेखात असेही वाचले होते कि काही जातीच्या फुलपाखराच्या अळ्या अशा वनस्पतीवर पोसतात पण ते विष त्यांच्या पचनसंस्थेत न जाता पंखात ( पाखराच्या ) उतरते आणि कुणा पक्ष्याने ती खाल्ली तर त्यांना विषबाधा होते. ( याची पण खात्री करायची आहे. )

परवाच्या बोस्टनमधल्या स्फोटानंतर, अमेरीकेत जी पत्रे सापडली त्यात जे प्राणघातक विष होते ते तर एरंडाच्या टरफलात असते. ( असे लोकसत्तामधेच वाचले होते. )

छान धागाय. फक्त लक्षात रहाणे अवघड आहे.

जंगलात फिरायला जातो तेव्हा अशा वनस्पतींच्या स्पर्शामुळे काही वाईट परिणाम होऊ नये म्हणुन अंगाला काही लावता येईल का?

पण चित्रक पण तसा धोकादायकच आहे.
<<
दिनेशदा, ते दिसतंच बेक्कार. माळ्याने वेगळं फूल म्हणून आणून लावलंय. उडवायचा विचार आहे माझा. त्याचं निळं पिग्मेंट भल्तं सुंदर आहे पण. फुलं चुरली तर छानसा निळा रंग मिळतो.

साधना | 16 May, 2013 - 15:46
रुईचा चिकही घातक असतो, डोळ्यात गेल्यास जळजळ होऊ शकते असे ऐकलेय. हे खरे नसेल तर सांगा, उडवते इथुन.
<<
अनेकांना हा चीक त्वचेवरही उभरतो.
डोळ्यात गेल्यास नुसती आग नाही, कॉर्निअल इडिमा येतो. (काळ्या बाहुलिवरील काचेस सूज. ती पांढरी पडते व नजर कमी होते) त्वरित डोळ्याच्या डॉ. ना दाखवणे गरजेचे. शनिवारी, विषेशतः शनी अमावस्येस रुईची फुलं शनीमंदिरात वा मारूतीला दर शनिवारी वहाणारी लोक्स आहेत.
पिंपळ, रुई, इ. झाडे कापून फेकू नयेत अशीही अंधश्रद्धा आपल्याकडे असते.

पावसात एक खाजेरी वनस्पती येते. मला वाटत मी नि.ग. च्य धाग्यावर मागे फोटो टाकला होता. आता शोधते परत नाहीतर येत्या पावसात पुन्हा टाकते. त्याला स्पर्श करताच प्रचंड खाज सुटते. त्याला बारीक बारीक कुसे असतात.

रुईच्या चिकाचा एक उपयोगही आहे. काटा रुतल्यावर हे चिक त्या जागी लावल्यावर त्या जागी जरा दाबल्यावर काटा लगेच वर येतो.

पुर्वी रुईच्या पानांचे उकळलेले पाणी पापडाच्या पिठात कालवायचे. पण त्याचे चिक जावे म्हणून आदल्या रात्री ही पाने पाण्यात बुडवून ठेवत असत.

लहान बाळाला पोटात दुखत असले की रुईच्या पानावर खराट्याचा पाठून फटका मारून (होल पडण्यासाठी असावा) ते पान पोटावर ठेवून वरून फडक्याने शेक द्यायचा म्हणजे पोटदूखी थांबते असे एकदा आमच्या सुईणीने सांगितले होते.

इब्लिस,
या रुईच्या चिकापासूनच खरजेवर औषध करतात असे ऐकले होते. पण सामान्य लोकांनी यापासून दूरच राहिले पाहिजे.

आता मी ज्या वेलीबद्दल लिहितोय, ती खरीच अस्तित्वात असते का कोकणातल्या गावगप्पा, याची खात्री नाही. ( एकजात सगळे कोकणी म्हणतील, असां काय करतां गाववाल्यानू. म्हापुर्षाची आन, ह्या सगळां खरां असा.. )
तर त्या वेलीचे नाव रानभूल. याच नावाचे विनय आपटेचे नाटक पण होते. ही वेल जमिनीवर पसरलेली असते आणि ती ओलांडली कि माणसाचे दिशाज्ञान नाहीसे होते. माणूस भरकटल्यासारखा त्याच जागी फिरत राहतो. उजाडले कि आपोआप रस्ता सापडतो.
माझ्या मामाने पण चंदगडला याचा अनुभव घेतलाय. त्याच्यासकट अनेक जण शपथेवर या वेलीबद्दल
सांगतात. पण दाखवा, मला फोटो काढायचाय असे म्हंटले तर तयार होत नाहीत.
मूळात हा शब्द तयार व्हायला काहीतरी कारण असेलच, असे मात्र मला वाटतय.

त्या वेलीचे नाव रानभूल>>> दिनेशदा विचित्र आणि मजेशीर आहे ही माहीती. चकवा लागणे यालाच म्हाणतात का?

तर त्या वेलीचे नाव रानभूल. याच नावाचे विनय आपटेचे नाटक पण होते. ही वेल जमिनीवर पसरलेली असते आणि ती ओलांडली कि माणसाचे दिशाज्ञान नाहीसे होते. माणूस भरकटल्यासारखा त्याच जागी फिरत राहतो. उजाडले कि आपोआप रस्ता सापडतो. >>>>> याविषयी एका ब्लॉगवर एका सुशिक्षित आदिवासीनेच लिहिले होते - की हे अगदी खरे आहे - त्यांच्या जमातीत म्हातारी, अनुभवी माणसे पुढील पिढीला हे सांगून सावध करीत असत - पण नक्की कशामुळे हे होते हे मात्र त्यांनाही कळत नव्हते ...

मी ही आता शोधून बघतो तो ब्लॉग सापडतोय का ते .....

....

माहितीबद्दल सर्वांचे धन्यवाद!!! Happy
विजयजी, सिंडरेला दोन्ही लिंक मस्त.

या धाग्यात खालीलप्रमाणे माहिती संग्रहित करण्याचा मानस आहे (काहि वनस्पती या संपूर्ण विषारी नसतात त्यातील काही भागच विषारी असतो.)

१. वनस्पतीचे स्थानिक नाव
२. वनस्पतीचे बोटॅनिकल नाव
३. वनस्पतीचा कुठला भाग विषारी (पान, फुल, खोड, मुळ, संपूर्ण झाड)
४. शरीरावर/त्वचेवर होणारा (नेमका) अपाय
४. पान, फुल, खोड, मुळ किंवा संपूर्ण झाडाचे प्रकाशचित्र (ओळखायला सोपे जावे म्हणुन)
५. वनस्पतीचा प्रकार (देशी किंवा विदेशी)

अजुन काहि सुचना/अ‍ॅडीशन असतील तर अवश्य सांगा. Happy

याविषयी एका ब्लॉगवर एका सुशिक्षित आदिवासीनेच लिहिले होते >>>
माबोवर पण लिहिल होतं बहुतेक.
मला त्या काकांच नाव आठवत नाहिये.
जुमले की असच काहिसं..

वाघ्याच्या पाड्यावर कि असच काहीस नाव असलेल्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे रानभूल वनस्पतीचे रोपटे असते. ते रात्रीच्या वेळेला गंध सोडते त्या गंधामुळे नशा चढुन माणसाची विचार करण्याची शक्ती ( जवळ जवळ ६ तासांसाठी ) थांबते.
रोजची वहिवाट असलेले सुद्धा गोंधळतात.

बघा, एका कोकणी माणसाने दुजोरा दिला कि नाही..
कुणाकडे डॉ. राणी बंग यांचे गोईण पुस्तक आहे का ? त्यातही काही विषारी वनस्पतिंचा उल्लेख आहे असे वाटतेय.

रुईवर आपल्याकडे सुरवंट दिसतात का ? इथे सर्रास दिसतात. काळसर हिरव्या रंगाचे मोठे असतात. ते कुठल्या पाखराचे ते मात्र कळले नाही.

दा Proud

वरती इब्लिस रूईच्या बाबतीत "उभरतो" असे म्हणाले तसा प्रकार बिब्ब्याच्या बाबतीत पण होतो,
काही जणांना तो घरात ठेवलेलाही चालत नाही, तर काहीजण गोडांब्या खाउ शकतात.

बिब्ब्याच्या बाबतीत पण काळजी घेतलेलीच चांगली.

विषारी भाग - वनस्पती
(१) मूळ विष - कण्हेर, गुंज, कळलावी.
(२) पान विष -विषपत्रिका, करंभ, महाकरंज.
(३) फलविष -कुचला, धोतरा,जेपाळ.
(४) पुष्पविष - वेत
(५) त्वचा, गाभा, डिंक विष - आंत्रपाचक सौरीयक, कर्तरी
(६) क्षीरविष -बिधारी निवडुंग, रुई.
(७) कंदविष -कालकूट, बचनाग, हालाहल.
साभार - http://marathivishwakosh.in/khandas/khand16/index.php?option=com_content...

ह्म्म्म्म.. चांगलीच माहितीपूर्ण धागा आहे हा..
कितीतरी इनोसंट श्या दिसणार्‍या वनस्पती तितक्या इनोसंट नसतात हे कळळं..
मॉरल ऑफ द स्टोरी.. माहीत नसलेल्या वनस्पती/झाडंझुडुपं/पानं/फळं/फुलांपासून दूर्र राहाणे!!!

माझ्या कडे आहे राणी बंग यांच गोईण पुस्तक आता वेळ मिळताच पुन्हा सगळ वाचून त्यातील विषारी वनस्पतींची यादी जमा करते इथे. पण त्यात चित्र नाहीत. फक्त माहीती आहे.

भुशी डैमची मासेमारी . पस्तीस वर्षांपूर्वी मी आणि माझा एक मित्र लोणावळयात सप्टेंबर महिन्यात भुशीला नऊला पोहोचलो .थोडेच जण होते आणि पाणीपण फार वाहात नव्हते .साडेबाराला सर्व निघून गेले आणि आम्ही दोघेच उरलो .मग एकदम सातआठ कातकरी आले .त्यांनी आजुबाजूचे गवत उपटून वरती अशा रीतीने आडवे बसवले की पाण्याचा एकच ओहोळ पायऱ्यांवरून वाहिल .त्यांच्यापैकी फक्त दोघे खाली गेले व त्यांनी काही विशिष्ट झुडुपे उपटून सर्वात खालच्या पायरीवर ती पाण्यातच दगडावर रगडायला सुरू केली .पाचेक मिनीटांत बोटभर लांबीच्या माशांची फौज खालच्या धारेकडून पायऱ्यांवरून उड्या मारत भुशी डैमकडे चढू लागली पण त्यांना इतर पाचसहाजणांनी भराभर पकडले .दोन तीन मिनीटांनी मासे कमी झाले .त्यांना विचारल्यावर कळले की त्या झुडुपाचा रस माशांच्या डोळ्यांना चुरचुरतो ,आग होते मग वरचे पाणी चांगले असेल समजून मासे वरच्या प्रवाहात जातात . या गोष्टीनंतर आतापर्यंत कोणा कडूनच अशा झुडुपाबद्दल कळले नाही .विषारी वनस्पतीचा असाही एक उपयोग !

समुद्रफळाच्या पानाचा पण असा मासेमारीसाठी उपयोग करतात. पण माणसासाठी ते विषारी नाही.

नितीन किंवा इतर कोणी माहीतगार सांगू शकेल. एक झुडूप असते त्याचा ( बहुतेक पानांचा ) रस काढून गायीगुरांच्या अंगाला चोळल्यास त्यांना गोचिड वगैरे किटकांचा त्रास कमी होतो. पण तो रस माणसासाठी पण घातक ठरतो.

एस आर डी. हेच लिहायला आलो होतो.
अशी हि झुडपे आहेत त्याचा आपल्याला त्रास होत नाही पण माशांना होतो.
कोकणात अशाही वनस्पती आहेत त्यांचा ऊपयोग मासेमारी साठी होतो.
माझ्याकडे आता प्रचि नाही पण एका झुडपाची मऊलव असलेली पाने ठेचुन पाण्यात टाकतात आणि थोड्यावेळाने गुंगी चढ्लेले मासे पाण्यावर तरंगु लागतात.

दा - भुरंबीचा पाला आणी धुप गायीगुरांच्या अंगाला चोळल्यास त्यांना गोचिड वगैरे किटकांचा त्रास कमी होतो.

म्हणजे जागूने पोपटी करण्यासाठी जो पाला वापरला होता तोच असणार.
मूळ्यासारखी पाने पण कातरलेली नाहीत, आणि लालपिवळी बोंडासारखी फुले, असे स्वरुप असते ना ?

आपण जो बटाटा खातो (खरं म्हणजे त्याच्यावर जगतो ) त्याच्या झाडाची पाने मात्र विषारी असतात .आणि गहू ,लोंबितून दाणे काढल्यावर अगदी विषारी नाही पण त्याची कुसे भयानक असतात गुरांसाठी निरुपयोगी .

Pages