एका दुष्काळाची गोष्ट..

Submitted by Manasi R. Mulay on 11 May, 2013 - 06:46

गावामध्ये पाण्याचा tanker आल्यावर पळापळ ही व्हायचीच.. tanker आल्यावर मागे धावणारी ही छोटी छोटी मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध.. बाळ रडतय पण आईला त्याच्याकडे लक्ष देता येत नाही.. कितीही जीव कळवळला तरी तिला माहित असतं कि तिने पाणी भरलं नाही तर सगळ्या घराला पाणी मिळणार नाही.त्यामुळे ह्या लहानग्या बाळाला कडेवर घेऊन तिला ““tankerवरची कसरत”” करावी लागते
dushkal5.jpg
पाण्याचे tanker आल्यावर पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची उडणारी तारांबळ..घाई.. पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा.. मालेवाडीतील दृश्य!
गावातलेच आजोबा..मुलं शिकून शहरात स्थिरावलेली.. पण शहरात मन रमत नाही म्हणून ते परत गावाकडे आले, तर आता गाव त्यांची सत्वपरीक्षा पाहतं.. सायकल वर दोन कॅन घेऊन tanker पर्यंत येईपर्यंत tanker च पाणी संपून गेलेल..पाण्यासाठी होणाऱ्या ‘तू तू मी मी’ मध्ये बरचसं पाणी वाया गेलेलं..पाण्याचं दुर्भिक्ष्य एवढ कि जास्तीतजास्त पाणी मिळवण्याच्या नादात सामाजिक भान विसरून हमरीतुमरीवर येणारे लोक पहिले की तिसरं महायुद्ध पाण्यावरून होणार ह्याची खात्री पटते. गावकऱ्यांशी गप्पा मारताना ह्यामागची कारणे लक्षात येतात. गावाच्या सरपंचाने स्वतःच्या घरात पाण्याची केलेली साठेबाजी..tankerमधून २ दिवसाआड एकदा येणारं पाणी.. tankerआला की त्यामागे धावताना पाण्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा.. ह्या स्पर्धेत हरणाऱ्याला तर काहीच नाही पण जिंकणाऱ्याला तरी काय मिळत? गढूळ आणि कित्येकदा पिण्यास योग्य नसलेलं पाणी..,वाढती रोगराई, सुविधांचा अभाव..जळालेली पीक..तडफडणारी गुरं.. आणि असा हताश बळीराजा.. विश्वास बसत नसला तरी ही कहाणी आहे स्वातंत्र्योत्तर ६६ वर्षे भारतातल्या गावांची..ह्यावर्षी आलेल्या दुष्काळाची..

dushkal1.jpg
निसर्गाने माणसावर सदैव अनंत उपकारच केले. नद्या,वारे,पर्जन्य,पशु,पक्षी,यांच्यामुळे मानवी जीवन नेहमीच सुखकर झाले आहे.. पण ह्या बदल्यात मानवाने निसर्गाला काय दिले असा विचार केला तर समीकरण नेहमीच असंतुलित आहे. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोचतेय ती मुक्या जनावरांना..पुरेसे पाणी नाही, न खाण्यासाठी चारा..कुपोषण,रोगराई ला बळी पडतात ते निष्पाप जीव.. मानवाला परमेश्वराने बुद्धीचे वरदान दिले ते ह्या अजाणत्या जीवांची काळजी घेईल ह्या विश्वासानेच नव्हे काय.. पण माणसाच्या कुकृत्यामुळे आज त्यांच्यावर ही दुष्काळाच्या दु;खाची परिस्थिती येऊन ठेपलीये. यंदाचा दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे असे म्हणणे वावगे ठरत नाही. त्याची कारणेही तशीच आहेत.

dushkal3.jpg
बाढ गव्हाण मधील आटलेली विहीर..त्यात पडलेलं कचरा..
योजना आहेत पण कागदावर..नदी आहे पण नकाशावर..पैसा आहे पण तो वाहून जातोय पाण्यामध्ये आणि आता पाणी उरलंय ते फक्त डोळ्यांमध्ये.. “नेमेची येतो मग पावसाळा” असं म्हणण्याऐवजी आता “नेमेची येतो मग दुष्काळ” असं म्हणायची वेळ येऊन ठेपलिये. ह्याधीही दुष्काळ पडला होता १९७२ मध्ये अन्नाचा, चाऱ्याचा दुष्काळ.. आणि आता मात्र ‘पाण्याचा दुष्काळ’! यंदाच्या वर्षी आलेला पाऊस हा, १९७२ मध्ये आलेल्या पावसापेक्षा जास्त असूनही यंदाच्या दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवते. वाढलेली लोकसंख्या, बदललेले राहणीमान, दिवसेंदिवस उंचावत जाणाऱ्या गरजा यामुळे स्वाभाविकपणे साधन-स्रोत तोकडे ठरताहेत. अशा परिस्थितीत योग्य नियोजनाच्या अभावाचा परिणाम म्हणजे ह्यावेळेस चा दुष्काळ. बर मग पाण्याचा दुष्काळ म्हणजे केवळ पाणी कमी पडतंय इतकाच न.. असा म्हणून चालत नाही. त्याचे माणूस व जनावरांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्याबरोबरच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दुष्परिणाम ह्याकडे कानाडोळा करता येत नाही. बऱ्याचदा tanker ने आणलेलं पाणी आटलेल्या, खोल, दुषित विहिरीमध्ये ओतलं जातं.
आणि मग हे पाणी आणखीच दुषित होतं.. पण पर्याय नसल्याने हेच पाणी स्वच्छतेसाठी कपडे भांडी धुण्यासाठीच नव्हे तर पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी सुद्धा वापरला जाते. ह्यातूनच येणारी रोगराई अटळ असते. पण आजारी पडलं तरी दवाखान्यात जाऊन औषध आणण्यासाठी ची मानसिक व आर्थिक तयारी शेतकर्याची नसतेच. रोजचे पिण्याचे पाणी मिळवण्याची कटकट.. मग जनावरांसाठी पाणी कुठून आणणार.. एका बैलाला दिवसाला ८० ली पाणी लागते. आणि शासनाच्या योजनेनुसार २००१ च्या लोकसंख्येनुसार प्रती माणशी प्रतिदिवशी २० ली इतके पाणी पुरवले जाते. त्यात १० वर्षात वाढलेली लोकसंख्या.. मग शेतकरी स्वाभाविकपणे गुरांना छावणीमध्ये पाठवून देतो. तिथे गुरांची नीट,आवश्यक ती काळजी घेतलीच जाते असे नव्हे. १० वर्षापासून कष्टाने उभ्या केलेल्या फळबागा एका क्षणात अवर्षणाचा बळी ठरतात.. बाकी पिकांची त्यांच्या परीने हीच कहाणी..कोरड्या जमिनीकडे पाहून विहिरी खोदण्यासाठी शेतकरी आपल्या पत्नीच्या अंगावरचे सोने गहाण टाकतो, कर्ज काढतो, शिकायला शहरात गेलेल्या मुलाला माघारी बोलावून घेतो. परत, घेतल्या विहिरीला पाणी लागेलच ह्याचीही खात्री नाही. ह्यातून नक्की काय साध्य होत? दुष्काळ पडल्यावर विहीर खणून उपयोग काय? मग येणारं नैराश्य.. भविष्य अंधारात दिसत असेल तर अशा माणसाकडून कल्पकतेची अपेक्षा तरी कशी करणार?

असे मोठे नैसर्गिक व आर्थिक संकट पुढ्यात ठाकले असताना सुद्धा "बाबा रं, तू शिकून मोठा व्हयं.. म्हंजी मंग आपल्या गावाचं भलं करशील" असं म्हणत पोराच्या शिक्षणासाठी त्याच्या पाठीशी भक्कम भिंत बांधणारे काही गावकरी अपवादानेच आढळतात..कारण त्यांच्यावर येणार संकट हे शिक्षणाच्या अभावाचा परिणाम आहे हे ते जाणून असतात कदाचित.. आणि मग अशाच गावामधली मुलं शिक्षणासाठी शहरामध्ये येतात.. क्लास च्या, कॉलेजच्या फी, राहण्याचा जेवणाचा खर्च सांभाळत दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारे महत्त्वाकांशी विद्यार्थी आणि त्यांचे "निरक्षर पण जाणते पालक" ही आजच्या शिक्षणसंस्थांसाठी एक मोठी प्रेरणा ठरू शकते.

ज्यांच्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी अवलंबून आहे असे लोक जर संकटात असतील तर ही धोक्याची सूचना ओळखून त्या दिशेने प्रत्येकाने पावला उचलायला हवीत. एकीकडे भयंकर असा दुष्काळ आग ओकत असताना ह्याच देशामध्ये अनेक श्रीमंत लोक आपला पैसा देशातील व परदेशातील खेळाडूंवर लावत, आयुष्याचा आनंद लुटताना दिसतात, हा विरोधाभास नव्हे काय? ‘भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे’ ही उक्ती इथे सार्थ ठरायला लागते. अशावेळी IPL सारख्या गोष्टींचा फेरविचार होऊन तो पैसा तात्पुरता का होईना खेड्यांकडे वळवायला हवा.

अशा परीस्थितीत अनेक उपाययोजना सुचवता येतात. समाजातील अनेक लोक ह्यासाठी झोकून देऊन कामाला लागले सुद्धा आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून लाखोंनी पैसा ही गोळा होतोय. स्वयंसेवी संस्था माध्यमे आपापल्या परीने झटताहेत.. फक्त एवढेच वाटते की दुष्काळावर मात करण्याच्या तात्कालिक उपायांबरोबरच दीर्घकालीन उपायांचा सुद्धा विचार व्हायला हवा. प्रयोगशाळेतील निष्कर्ष, कागदावरच्या योजना शेतकर्यापर्यंत पोचायला हव्यात. खऱ्या अर्थाने गांधीजींचा खेड्याकडे चला हा संदेश पुन्हा आठवण्याची व आचरण्याची ही वेळ आहे, केवळ ज्यामुळे भारतीय कृषी व्यवस्था व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था अजून भक्कम होउ शकेल.

ब्लॉग वर पूर्वप्रकाशित http://mananvay.blogspot.in/2013/05/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे तुमचे << .... दुष्काळावर मात करण्याच्या तात्कालिक उपायांबरोबरच दीर्घकालीन उपायांचा सुद्धा विचार व्हायला हवा. >> नाहीतर पुढची कित्येक वर्ष हे चित्र बदलणार नाही. आपण फक्त स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन साजरे करत राहणार.

पण ह्या बदल्यात मानवाने निसर्गाला काय दिले असा विचार केला तर समीकरण नेहमीच असंतुलित आहे. >>>>>>>> अगदी खर आहे.. पटल Sad

खूप काळजाला भिडणारा लेख आहे. शहरात आमच्याकडे पाणी चांगले मिळते, पण जरा एखाद्या दिवशी आले नाहीकी काहीजण निराश होतात, मी मात्र पाणी जास्तीतजास्त वाचवण्याचा प्रयत्न करते, खूप वाईट वाटते आपल्याच काही बांधवाना अशा परीस्थितीतून जायला लागते.

खरतर आपल्या कडे दर ५/१० वर्षाने हे घडतेच आहे .तरीही आपण देव भरोसे का ?पाण्याचा प्रत्येक थेंब अडवावा त्या साठी प्रयत्न व्हावा ,राजकारण्या कडून अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे .स्थानिक सामाजिक कार्यकर्ते हे करू शकतील पण त्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय मिळायला हवे .

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! परिस्थिती पाह्ता यंदा खरोखर चांगला पाऊस व्हायला हवाय. आणि काही
सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या कामाविषयी वर्णन करणारा पुढील लेख लवकरच सादर करेन.