मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी. हजार अथवा त्याहून पोस्टी झाल्यावर ही सर्व माहिती गोळा करून त्यावर संपादकीय संस्करण करून लेख तयार करावेत आणि त्या प्रत्येक लेखाचा एक ठराविक अ‍ॅंगल असावा (उदा. चोर बझार, गिरगाव, क्रॉफर्ड मार्केट, बांद्रा असा एखादा भाग किंवा मुंबईमधील फिल्म इंडस्ट्री, धारावीचे लेदर मार्केट, असा एखादा विषय). या लेखामधे फॅक्च्युअल माहितीपेक्षा आठवणी जतन करण्याच्या दृष्टीने हा लेख असावा असे कित्येक दिवसांपासून डोक्यात आहे. इथे गप्पांच्या स्वरूपात सांगितलेली माहिती उलट फारच रोचक आहे. हे मुंबईचे लेखन 'सामान्य' मुंबईकराचे असल्याने वाचताना फार जवळचं आणी कसलाही अभिनिवेश न ठेवता साहजिकरीत्या सांगितलेलं वाटतंय. म्हणून यामधे खरंच मजा वाटतेय.

असे होतील तितके लेख तयार करून त्यावर आपल्या माबोच्या फोटोग्राफरकडून फोटो डकवून एक छान डॉक्युमेंटेशन करता येईल (कुणी प्रकाशक उत्सुक असल्यास पुस्तक पण काढू अर्थात माबोच्या परवानगीने)

आज शेखचिल्ली जास्तच जोरात उडतोय Proud

नंदिनी, कल्पना खरंच अतिशय छान आहे. पण बराच लांबचा पल्ला वाटतोय हा. Happy

नी, म्हणते तसंही करता येईल. सतत अपडेट करावं लागेल पण ठीकाय. कारण गप्पांच्या ओघात धागा वाचण्याचीही एक मजा असतेच.

मीं एक सुचवूं का ?
या धाग्यावर जिथ जिथं मुख्यत्वे 'माहिती'च आहे, तिथं ठळक अक्षरांत शीर्षक द्यावं - उदा.- " माहिती - दारुखाना ".[शिवाय,sign_0.jpgअशी कांही तरी 'खूण'ही सोबत देतां येईल. यामुळें, ज्याना माहितीच हवी असेल त्याना ती सहज शोधतां येईल] व <<इथे गप्पांच्या स्वरूपात सांगितलेली माहिती उलट फारच रोचक आहे>> यालाही बाधा येणार नाही.

मुंबई फिल्म सिटी - हा तसा आरे कॉलनीला जोडलेला भाग, आत गेल्यावर पहिल्यांदा व्हिस्लींगवुड फिल्म इन्स्टीट्युट ( सध्या आहे का की बंद झाली) आणि पुढे वेगवेगळ्या मालिकांचे सेट्स लागेलेले दिसतात, येकाच सेट मधे तीनचार घर /ऑफिस दाखवणार्‍यांचे कसब मानयला पाहिजे, बर्‍याच चित्रपट /मालिकांनधे दिसणारे देऊळ परमनंट आहे , तसेच हेलिपॅड ही आहे
http://www.filmcitymumbai.org/
आरे कॉलनीमधे जे प्राणी संग्रहालय प्रस्तावीत आहे ते बहुतेक फिल्म सीटी मधे होणार आहे.

मामी,मस्त सेक्युलर फोटो मुशाफिरी.जपानी मंदिर कुतुहल- अगदी सहमत.सुरुवात जरा अलिकडून केली तर पोर्तुगीझ चर्चही येईल.एखादी अग्यारी कशी बरं बसवता येईल...
'सिटी बेकरी' या स्थानाला मनोभावे नमस्कार,तिथल्या पार्सलांच्या प्रसादांची यम्मी आठवण जोरात झाली Happy

राजाबाई टॉवर म्हटले की प्रेमचंद रॉयचंद यांचे नाव आठवतेच. ते तत्कालीन मुंबईतले एक धनाढ्य व्यापारी होते मुख्यतः त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ दिलेल्या दोन लाख रुपयांच्या देणगीमुळे टॉवर आणि लायब्ररी उभी राहिलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असते. माहीत नसतो तो प्रेमचंद रायचंद यांच्या आणि त्यांच्या बरोबरीने मुंबईच्या जीवनातला एक अद्भुत स्वप्नवत काळ. अख्खी मुंबई रोषणाईने नटली होती तो काळ. अख्खी मुम्बई पागल होऊन कापसाच्या मागे धावत सुटली होती तो रोमहर्षक काळ. विकीवर खूप माहिती आहे, पण गंगाधर गाडगिळांच्या पुस्तकातले वर्णन बहारीचे आहे. सन १८६१ साली अमेरिकेत युद्ध सुरू झाले आणि मँचेस्टरच्या गिरण्यांना तिथून होणारा कापूस पुरवठा थांबला. एकाएकी भारतीय कापसाची मागणी वाढली आणि त्याला सोन्याचा भाव आला. मुंबईतली पैशाची उलाढाल प्रचंड वाढली. नुकत्याच स्थापन झालेल्या (हेही प्रेमचंदजींच्याच नेतृत्वाखालीच) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये शेअर्सचे भाव गगनाला भिडले. यात प्रेमचंदजींनी अमाप पैसा कमावला. ते ज्याला हात लावीत त्या शेअरचे सोने होई.ते त्या काळातले हर्षद मेहताच होते.. या पैशापायी त्यांच्या डोक्यातून एक अफलातून योजना निघाली -'बॅक बे रेक्लमेशन स्कीम'. भराभर सगळ्यांनी शेअर विकत घेतले. पाच हजार रुपयांच्या दर्शनी किंमतीचा समभाग एक कोटी सहा लाखांना विकला गेला. एरवीच्या.शहाण्यासुरत्या मुंबईने आपली सारी अक्कल गहाण टाकली होती. या काळात मुंबईने जी दिवाळी साजरी केली तशी पुढे कित्येक दशके झाली नाही. अर्थात शेवटी व्हायचे तेच झाले. युद्ध थांबले .मँचेस्टरला अमेरिकेतून कापूस पुरवठा पूर्ववत सुरू झाला. १ मे १८६५ रोजी ही बातमी मुंबईत येऊन थडकली आणि होत्याचे नव्हते झाले. स्टॉक मार्केट जबरदस्त आपटले. कित्येकांचे संसार धुळीला मिळाले. यात अर्थात नेहमीप्रमाणे पुरेश्या माहितीशिवाय गुंतवणूक केलेले मध्यमवर्गीयच जास्त होते. जगन्नाथ शंकरशेट यांनाही फटका बसला. त्या काळातल्या एका प्रसिद्ध मराठी लेखकांनीही(अ.ब. कोल्हटकर का?) बरेच पैसे गमावले. असो. हे सर्व मुळातूनच वाचण्याजोगे आहे.

जिप्सी, राजाबाई टॉवर ची प्रचि अतिशयच सुरेख आली आहेत. सगळे कोन इतके वेगळेच आणि वैशिष्ट्यपूर्ण दिसताहेत. धन्स.

भाऊ .... Biggrin

हीरा, नेहमीप्रमाणेच मस्त माहिती दिलीत. Happy

जिप्सी कडक (कोडॅक ? :)) फोटो
पाटील , भाऊ ,वंदन.
हीरा,मस्त पोस्ट.
जाई, मग करतेस का सुरुवात ?

हीरा.. विकीवर माहिती मिळतेच.. पण तुमच्या कडून अनौपचारिकरित्या मिळणारी माहिती वाचायला जास्त आवडते.

हीरावाणीच्या सोबतीला जिप्सीचे प्रचि, पाटलांचे जलरंग, भाऊंचे व्यंचि, दिनेशदा आणि भारतीताईंच्या आठवणी.. सगळ्याच प्रतिसांदकांची भावनिक गुंतवणूक या धाग्याची रंगत वाढवत आहे.

धन्यवाद इंद्रधनुष्य.
जिप्सी यांची प्रकाशचित्रे, श्री. पाटील यांची जलरंगचित्रे, भाऊ नमसकरांची व्यंगचित्रे आणि दिनेशदा, भारती बिर्जे,मामी, नंदिनी आणि इतर अनेकांची शब्दचित्रे यांमुळे हा धागा अगदी चित्रदर्शी,चित्रमय, चित्राकर्षक (चित्रांमुळे आकर्षक) झाला आहे.
खरे तर मुंबईच्या इतिहासातील काही रोमहर्षक पाने जुन्या पुस्तकांतून विखरून पडली आहेत. त्यांविषयी लिहावेसे वाटते. पण या सतत नव्याची ओढ असणार्‍या शहरात जुन्यापान्या गोष्टींविषयी वाचणे लोकांना कितपत आवडेल असा विचार येऊन उत्साह कमी होतो.

पाटीलजी, 'सौ सोनारकी, एक लोहारकी' असंच कांहीसं झालंय तुमच्या चित्रांमुळें ! अप्रतिम !!
अहाहा ! सुंदर प्रचि, जिप्सीजी व इंद्रजी.
<< हीरा,मस्त पोस्ट.>> अगदीं खरंय, नेहमीप्रमाणेच !
<< जुन्यापान्या गोष्टींविषयी वाचणे लोकांना कितपत आवडेल असा विचार येऊन उत्साह कमी होतो.>>ह्या धाग्याच्या प्रस्तावनेतच इथं काय अपेक्षित आहे हें स्पष्ट केलंय. ज्याना असलं नाहीं आवडत ते येतीलच कशाला इथं मुद्दाम नाक मुरडायला ? तुम्ही असलं कांहीं नका मनात आणूं.
<< आता मुंबैच्या काँलेजाबद्दल लिहूयात का >> खोताच्या वाडीबद्दल लिहायचं मनात होतं. पण कॉलेजबद्दल तर कॉलेजबद्दल ! हा धागा अखंड चालायला हवा व त्यासाठीं आठवणींचं गाठोडं झटकून उघडायला हवं, हें महत्वाचं ! Wink
पूर्वींच्या गिरगांवातल्या मुला-मुलींचं 'होम पीच' म्हणजे चौपाटीवरचीं विल्सन कॉलेज व भवन्स कॉलेज. दोन्ही कॉलेजीसची अस्मिता व संस्कृति भिन्न. विल्सनचा [स्थापना १८३८ सध्याची इमारत १८८९]मुख्य रुबाब समुद्राचा वारा झेलत उभ्या असलेल्या ब्रिटीशकालीन दगडी इमारतीत तर मुन्शीजींच्या भारतीय डौलात मिरवणार्‍या भारतीय विद्या भवनच्या कृपाछत्राखालीं बहरलेलं भवन्स. खूप नंतर स्थापन झालेल्या भवन्सने स्वतःचा प्रचंड नांवलौकीक मिळवून भवन्सकडे ऐतिहासिकतेचा टेंभा मिरवत नाक मुरडून पहाण्याची संधी मात्र विल्सनला फार काळ नाही लाभूं दिली. तरी पण विल्सनचं लगतचंच विद्यार्थ्यांसाठीचं हॉस्टेल व 'सीफेस'वरचा स्वतःच्या मैदानासहितचा जिमखाना यामुळें भवन्सवाल्याना विल्सनचा कायम हेवा वाटणं अपरिहार्यच. या दोन्ही कॉलेजीसशीं माझ्या बर्‍याच आठवणी निगडीत असल्या तरीही इथं सांगण्यासारख्या व प्रकर्षाने आठवणार्‍या दोन तीन -
टाटा उद्योगसमूहात उच्चपदस्थ असलेले चोक्सी नांवाचे एक सुविद्य पारशी गृहस्थ शिकवणं व इंग्लीश साहित्य यावरल्या आत्यंतिक प्रेमामुळें विल्सनला आठवड्यातून दोन-तीन वेळां सकाळचे 'इंग्लीश लिटेरेचर'चे क्लास घेत. खादीची पांढरी शर्ट-पँट ,वरतीं बेफिकीरीत चढवलेला खादीचाच फिक्क्या करड्या रंगाचा कोट पण चेहर्‍यावर मनस्वी समाधान धारण केलेले वयाने साठीच्या आसपासचे हे चोक्सी मला अजूनही तीव्रतेने आठवतात. हे कधीही 'मस्टर' घेत नसत पण यांचा वर्ग मात्र खच्चून भरलेला, त्यांच्या वर्गातल्याच नाही तर इतरही विद्यार्थ्यानी. त्यांची शेक्सपियरच्या नाटकावरचीं तीन लेक्चर्स मीं मुद्दाम जावून ऐकली; खरं तर त्यांचं तें 'लेक्चर' नसून साहित्याचा रसास्वाद घेणारं त्यांचं तें खानदानी स्वगतच असायचं. आपल्याला गवसलेले बारकावे तुम्हाला समजावून सांगतो ,अशाचा गंधही नसे त्यांच्या बोलण्यात; जाणवे ती फक्त तादात्म्यतेने साहित्यात रममाण होण्याची व इतराना त्यांत सहभागी करून घेण्याची प्रगल्भ रसिक वृत्ती. आजही कधीं शेक्सपियरचा विषय निघाला कीं मंत्रमुग्ध करणारं चोक्सींचं तें रसाळ, ओघवतं शेक्सपियरचं रसग्रहणच आठवतं.

'सेलिब्रिटी' हा शब्द आजच्यासारखा सवंग झाला नव्हता तेंव्हा खर्‍या अर्थाने 'सेलिब्रिटी' असलेलं एक व्यक्तिमत्व होतं -सुहासिनी मुळगांवकर. संगीत, अभिनय व खानदानी सौंदर्य याच्या जोडीला संस्कृतचा व्यासंग ! भवन्सला त्या कांही काळ संस्कृत शिकवायच्या. वर्गात त्या येतांच प्रथमतः सर्व जण त्यांच्या व्यक्तीमत्वानेच भारावून जायचे. पण कण्वाच्या आश्रमात नेवून त्यानीं एखाद्या रसिक गाईडसारखं 'शाकुंतल' दाखवायला सुरवात केली कीं बाकी सारं दुय्यम ठरायचं. चोक्सी व त्यांच्यांतला हा दुवा मला नेहमी जाणवायचा. त्यांचं खूपच अकालीं निधन झालं तेंव्हां त्यांच्या अगणित चाहत्यांप्रमाणे मींही त्यामुळेच हळहळलो.
मीं निवृत्तिच्या झोनकडे झपाट्याने सरकत असताना आमच्या कंपनीचे प्रसिद्धी अधिकारी माझ्याकडे एक छोटसं वर्तमानपत्रातलं कात्रण घेवून आले [ प्रसिद्धी व संपर्क अधिकार्‍यांचा हा स्थायीभावच !]. पण त्या कात्रणाने मला एका समृद्ध अनुभवाकडे नेलं; तें कात्रण होतं ' व्यंगचित्रकारिते'च्या कार्यशाळेबद्दलचं [वर्क शॉप] व तें आयोजित केलं होतं व्यंगचित्रकार सुरेश सावंत यानी, भवन्सच्या चौपाटीच्या 'कॉलेज ऑफ जर्नॅलिझम'च्या जागेत. कित्येक तपांनंतर पुन्हां भवन्सला जाण्याचा योग आला होता पण माझ्या वयामुळें आपण जावं कीं नाहीं अशा संभ्रमावस्थेत मीं होतों. पण फार थोडे अचूक निर्णय आयुष्यात घेतले त्यांतलाच हा एक घेवून कार्यशाळेत नांव नोंदवलं. आठवड्यातून तीन दिवस, संध्याकाळीं तीन तास असं दोन महिन्याचं होतं हें वर्कशॉप. पहिला आठवडा सावंतानी छानपैकी कार्टूनींगचे 'बेसिक्स' समजावण्यासाठी घेतला. नंतर केवळ त्यांच्याच प्रयत्नांमुळे कांहीं प्रतिथयश, प्रतिभावान व माझे खूप आवडते व्यंगचित्रकार आमच्या सर्व वयोगटांची मोटली बांधलेल्या केवळ वीस-पंचवीस जणाना मार्गदर्शन करायला यायचे. त्यातले मुख्य तीन म्हणजे - मारिओ मिरांडा, राम मोहन व वाईरकर. मिरांडा नुसतं लेक्चर देवून थांबले नाहीत तर प्रत्येकाच्या शेजारीं बसून त्याच्या जर्नलमधीला कामाचं नीट निरिक्षण करून त्यावर टिपणी व 'टिप्स'ही देण्याचा उपजत मोठेपणाही त्यांनी दाखवला. 'अ‍ॅनिमेशन'मधलं एक मोठ्ठं नांव म्हणजे राम मोहन.[ 'रामायण' या इंडो-जॅपनीज निर्मितीच्या अ‍ॅनिमेशन चित्रपटाचे सह-दिग्दर्शक]. त्यावेळीं अ‍ॅनिमेशन नुकतंच लोकप्रिय होत होतं. राम मोहन त्यातले त्यावेळचे दादा .पण इतक्या साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी अ‍ॅनिमेशनचं वाढतं महत्व, त्याना जगभरात आलेले त्या क्षेत्रातले अनुभव इ.इ.खूप आत्मीयतेने संगितले, 'ह्या हौशी चित्रकाराना हें काय सांगायचं' असा जराही विचार न करतां. शिवाय, प्रोजेक्टर आणून तयार होत असलेल्या 'रामायणाच्या' 'क्लिप्स' दाखवून त्यातल्या खुबी, अडचणी याची रंजक माहितीही दिली. वाईरकर हें जाहिरात क्षेत्रातलं बडं नांव . कार्टून स्ट्रीप्ससाठीही हे प्रसिद्ध. त्यांनी तर फार न बोलतां केवळ जादुई प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने अत्यंत उदबोधक विवेचन केलं . या वर्कशॉपमुळें माझ्या व्यंगचित्रांत मीं किती सुधारणा करुं शकलों यापेक्षां दोन महिने ज्या 'क्रिएटीव्हीटीने' भारलेल्या वातावरणाचा अपूर्व अनुभव मला जिथं घेतां आला त्या भवन्सच्या वास्तुबद्दलची कृतज्ञता कायमची मनात राहिली, हें महत्वाचं. [माझ्या माहितीनुसार, 'कार्टूनींग' इतकं लोकप्रिय होत असूनही मुंबईत असं वर्कशॉप एकमेवच झालं व त्याचं श्रेय बव्हंशीं श्री. सावंत व भवन्सच्या त्या वास्तुलाच जातं ].
धोबी तलावच्या झेवियर्स कॉलेजमधे मीं कधींच नव्हतो व गेलोच तर तिथल्या टेबल टेनीस स्पर्धांसाठीं [ झेवियर्स हें एकवेळ मुंबईच्या टेबल टेनिसची मक्काच होती ]. पण तिथल्या कांहीशा गूढमय वातावरणावरही ताण करून सदैव टवटवीत रहाणारी माझी तिथलीही एक सुखद आठवण आहे. दरवर्षीं तिथं ' फादर हेरास मेमोरिअल' व्याख्यानमाला होते [ अजूनही होत असावी]. एका वर्षीं [ साधारण १९६० सालीं]' भारताची स्वातंत्र्य चळवळ' या विषयावर दोन दिवस व्याख्यान आयोजित केलं गेलं होतं जयप्रकाश नारायण यांचं ! जयप्रकाशजींच्या पांडित्याचा व वक्तृत्वाचा एक जबरी अनुभव तिथं आला. अस्खलीत इंग्लीशमधे, ओघवत्या शैलीत १८५७ ते १९४७ ह्या कालखंडातले स्वातंत्र्यविषयक विविध विचारप्रवाह, चळवळी, गट/पक्ष, ब्रिटीशांची बदलती विचासरणी, जागतिक परिस्थितीचा वेळोवेळीं पडलेला प्रभाव इ.इ.चा त्यानी प्रखर बुद्धीनिष्ठेने घेतलेला आढावा ऐकून अवाकच झालो होतों. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन-दोन तासांच्या दोन्ही व्याख्यानांच्या वेळीं संदर्भासाठीं त्यांच्या हातांत असायचा फक्त कागदाचा अगदीं छोटासा चिटोरा ! खादीचे कपडे घालून अत्यंत साधेपणाने आलेल्या या महापुरुषावर सरस्वतीचा वरदहस्तच होता याचं प्रत्यंतर त्या दोन दिवसांत आलं.

राजाबाई टॉवरचे बांधकाम सुरु असताना.. ( इमारतीच्या मागे चक्क समुद्र नजरेस पडतोय !! )

बांधकामानंतर

नि हे पुर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस !

सारे फोटो नेटवरुन साभार Happy

आणि 'एका हातात मशाल नि एका हातात चक्र' असे विकासाकडे वाटचाल दर्शवणारे हे शिल्प नक्की कुठले ते ओळखता येतय का ?... Happy

मस्त पोश्टी आणि फोटो!
मामी, मागचे फोटो मस्त. ओळखीचे दिसतायत. Wink

इंद्रधनुष्यच्या फोटोला माझा हा झब्बू. खिडकीतून काढलाय-

link.jpg

बापरे, भाऊ तुम्हाला दंडवत. समृध्द माहितीचा किती उदंड खजिना आहे तुमच्याकडे.

व्यंगचित्रांच्या वर्कशॉपची माहिती मस्त आहे. इतक्या प्रतिभावंतांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे तुमची व्यंचिप्रतिभा तेजानं तळपते हे आलं आता लक्षात. Happy

Yo Rocks,this famous statue stands at the top of the dome of Victoria Terminus building. I had read somewhere that the torch was damaged by lightening some years back. Make-shift repairing was carried out. But people say that it was not restored to its original beuty.

आणि पुन्हा,
यो रॉक्स, आपण टाकलेले फोटोज सुंदर आहेत, जसे इंद्रधनुष्य आणि जिप्सीचेही होते.
भाऊ,अतिशय स्मरणरम्य प्रतिसाद.

हीरा, भाऊ, पाटील, इंद्रा, जिप्सी, योगेश आणि अर्थातच मामी, तुम्हा सगळ्यांमुळे किती छान माहिती संकलीत होतेय आणि वाचायला मिळतेय. धन्यवाद... इथं लिहिताय त्या सगळ्यांचे.

Pages