मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, सुंदरसुंदर प्रचि.
भरतजी, खूप उपयुक्त लिंक.
वाचतेय.खूप माहिती मिळतेय.
भाऊ, वांद्र्यातली दोन्ही प्रॉमेनेडस खास आहेत.. रिक्लेमेशन अन बँडस्टँडही.

जिप्सी, अहाहा ! माऊंटमेरीचीं काय अप्रतिम प्रचि !!
याच चर्चच्या समुद्राच्या बाजूला दैवी स्पर्श असलेली एक छोटीशी वास्तु आहे - ' आवेदना' ! मला वाटतं मिशननेच चालवलेली. 'टर्मिनल कॅन्सर'सारख्या दुखण्याने पिडीत असलेल्या रुग्णाना फक्त शेवटच्या टप्प्यातच तिथं अ‍ॅडमिट केलं जातं. तिथल्या सिस्टर्स व सर्व कर्मचारीवर्ग हा आत्यंतिक सेवाभावी वृत्तीचा व अशा रुग्णांची मानसिकता उमजणारा असेल तरच नेमला जात असावा. अत्यंत स्वच्छ, नीटनेटका ठेवलेला हा सेवाश्रमच आहे. कुणीं तरी ही अत्यंत हवेशीर, समुद्रदर्शन घडवणारी मोक्याची जागा खास याच पवित्र कामासाठी म्हणे देणगी म्हणून दिलेली. इथलं वातावरणही प्रसन्न रहावं म्हणून मनापासून प्रयत्न केले जातात. सिस्टर्स रुग्णांशीं नेहमीं हंसत खेळत बोलतात, त्यांचे खाण्या-पिण्याचे हट्ट न कुरकुरता पुरवण्याचा प्रयत्न करतात.
माऊंटमेरीला कधीही गेलो तरी या वास्तुला व तिथल्या प्रत्येक 'सेवका'ला मान तुकवून मनोभावें नमस्कार करतों.

जिप्सी, अहाहा ! माऊंटमेरीचीं काय अप्रतिम प्रचि !!+१
याच चर्चच्या समुद्राच्या बाजूला दैवी स्पर्श असलेली एक छोटीशी वास्तु आहे - ' आवेदना' !>>> मला वाटतं सुनिल दत्त यांनी ते सॅनीटोरीयम त्यांच्या पत्निच्या स्म्रुतिप्रित्यर्थ सुरु केले होते.

माऊण्ट मेरी चर्चच्या फोटोंपैकी ४था फोटो पाहिल्यावर 'अमर अकबर अ‍ॅन्थनी'च आठवला Lol

<< मला वाटतं सुनिल दत्त यांनी ते सॅनीटोरीयम त्यांच्या पत्निच्या स्म्रुतिप्रित्यर्थ सुरु केले होते.>> तें हें नसावं. तसं खूप जुनं आहे हें . तुम्ही म्हणतां तो वॉर्ड मला वाटतं कोणत्यातरी हॉस्पिटलमधे आहे. [शिवाय, असाध्य रोगांच्या शेवटच्या अवस्थेतील रुग्णांसाठीच्या या विशिष्ठ सुविधेला 'सॅनिटोरियम' म्हणतां येईल का याबद्दलही मीं साशंक आहे ]

मुंबई बेट असूनही हा जल वाहतुकीचा पर्याय आपण नीट अभ्यासलेला नाही. खरं तर मिठी नदी पण जलवाहतुकीसाठी वापरता येईल.
गरज आहे ती, हे मार्ग स्वच्छ राखण्याची आणि योग्य व्यवस्थापनाची.
दुबई, सिंगापूर, ऑकलंड, लेगॉस, सोल, माले, झुरीक या शहरातली जलवाहतूक मी अनुभवली आहे. इतकेच कशाला गोव्यातही जेटी चालवून उत्तम सोय केलेली आहे. या सर्व वाहतुकी स्वस्त तर आहेतच पण वेळ वाचवणार्‍याही आहेत.
मुंबईत खरेच व्हावी अशी सोय.

जिप्सी, सुंदर फोटो.
भाऊ,शांति-अवेदनावरील पोस्टमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. साधारण ९०-९५सालाच्या सुमारास आम्ही काही जण समाजासाठी काही वेळ द्यावा या हेतूने चेशायर होम, त्यासमोरील हॉस्पिटलमधील मनोरुग्ण आणि अल्कॉहॉलिक अ‍ॅनॉनिमसने चालवलेला तीव्रव्यसनग्रस्तांसाठीचा पुनर्वसन विभाग, अनेक वृद्धाश्रम, कुष्ठरोगी धाम अशा ठिकाणी फिरत असू. आश्रमवासीयांस भेटायचे,त्यांच्याशी गप्पा मारायच्या,-ह्या गप्पा एकतर्फीच असत, कारण त्यांना खूप बोलायचे असे, आपल्या व्यथा कुणालातरी सांगायच्या असत, त्यांना कुणीतरी श्रोता हवा असे- कधी एखादे पुस्तक आणून द्यायचे, कधी कुणाचा वाढदिवस लक्षात ठेऊन छोटी भेटवस्तू आणायची असे आमचे चालले होते. आम्ही समाजसेवा करतो आहोत या कल्पनेत आम्ही रमलो होतो. या फुग्याला टाचणी लावली एका सज्जन गुरुवर्यांनी. 'अरे ही कसली समाजसेवा, खरी सेवा बघायची असेल तर शांतिअवेदनामध्ये जा, पहा त्या तरुण मुलींनी सर्व आयुष्य, नातेवाईक, तरुण वयातली सारी स्वप्नं सोडून फक्त रुग्णसेवेला वाहून घेतलं आहे' असं म्हणून त्यांनी आम्हांला तिकडे पिटाळलंच. आम्ही एकदा गेलो आणि इतके भारले गेलो की पुन्हा पुन्हा जात राहिलो. हे सर्व शेवटच्या टप्प्यावर पोचलेले कॅन्सरपीडित रुग्ण होते. वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती. उरलेले थोडे दिवस वेदनारहित अवस्थेत, शांत वातावरणात जावे म्हणून त्यांना इथे ठेवलेले असे. काचेच्या मोठ्या खिडक्यांतून होणारे समुद्रदर्शन, विलोभनीय सूर्यास्त,भणाणणारा पण सुखद वारा असे सर्व आल्हाददायक वातावरण असे. रुग्णांचा 'शेवटचा दीस गोड व्हावा' म्हणून कर्मचारीवर्ग धडपडत असे. त्या रुग्णांना काहीही नको होते. मनोरंजनार्थ मुद्दामहून मारलेल्या गप्पा नको होत्या, ताज्या बातम्या नको होत्या,जगात काय घडतेय याच्याशी त्यांना काहीच कर्तव्य नव्हते, त्यांनी आपले पंख सूर्यास्ताची चाहूल लागताच मिटून घेतले होते. त्यांना केवळ वेदनाशामक औषधे, कधीकधी मॉर्फिन, दिली जात. आम्ही काय करू शकणार होतो? आम्ही आश्रमप्रमुखांना विचारले. ते म्हणाले, तुम्ही एक करू शकता. इथे आम्हाला कपड्यांची टंचाई जाणवते. कपडे म्हणजे नवे, न वापरलेले कपडे. इथला प्रत्येक रुग्ण अंतिम प्रवासाला निघताना त्याच्या अंगावर नवे कपडे घालूनच आम्ही त्याची पाठवणी करतो. आणि असे नवे जोड दरदिवशी आम्हांला लागतच असतात कारण इथे भरती केले गेलेले रुग्ण हे आसन्नमरणावस्थेतच असतात, ते बरे होणार नसतात.'
नंतर आम्ही थोड्याफार मदतीची जुळवाजुळव केली, पण तो मुद्दा नाही. आमचा 'आम्ही समाजसेवा करतो' हा भ्रम तिथे गळून पडला,अवेदनेची खिडकी उघडल्यावर आत शिरणार्‍या वार्‍याच्या झोताबरोबर दूर पश्चिम क्षितिजावर उडून गेला, ते मनावर पक्के बिंबून राहिले आहे.

जिप्सी, छत्रपती शिवाजी टर्मिनस व मुंबई महापालिका प्रचि मस्त.. छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये गॉथिक शैलीतली शिल्पे पहाण्यासारखी आहेत. विशेषतः प्राण्यांची शिल्पे. >> अगदी..

खालील फोटोत कुत्रा व सिंह आहे.. पण आणखीन एक प्राण्याचे शिल्प आहे.. कुठले ते नीटसे कळत नाही.. तसेही हे शिल्प तिथे आहे हे फोटो झूम केल्यावरच दिसते...

शिवाय व्हिटीचे जिपीओकडील भागावर ही त्रिमुर्ती दिसते.. ह्याबद्दल काहीच ठाउक नाही.. कुणाला माहित आहे का ?

- -

<< शांति-अवेदनावरील पोस्टमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. >> प्रथम, हिरा यांच्याबद्दलचा आदर दुणावला, हें मनापासून नमूद करतों.
माझी आठवण मात्र व्यक्तीगत आहे व म्हणूनच सांगायचं टाळलं होतं. पण तिथल्या << तरुण मुलींनी सर्व आयुष्य, नातेवाईक, तरुण वयातली सारी स्वप्नं सोडून फक्त रुग्णसेवेला वाहून घेतलं आहे'>> याची अनुभूति मला कशी आली तें पहा-
आमचा एक मित्रच त्या दु:खद अवस्थेत 'आवेदना'त अ‍ॅडमिट होता व आम्ही गर्दी न करतां पाळीपाळीने त्याला भेटायला जात असूं. एकदां तो म्हणाला "अरे, इथं लहान मुलांसारखे हट्टही करतात पेशंट; काल दुपारीं सर्वांची जवणं झाल्यावर एकाने मला डाळ-भातच पाहिजे म्हणून आकांडतांडव केलं.आपल्या वडिलाना समजवावं तसं ह्या सिस्टर्सनी समजावलं त्याला थोडा वेळ व मग हंसत जावून मुद्दाम त्याच्यासाठी करून आणला डाळ-भात व मगच स्वतः गेल्या जेवायला !". असंच एकदां मीं त्याच्याशीं बोलत बसलो असताना मधेच त्याला औषध द्यायला आलेली एक सिस्टर मिष्कीलपणे त्याला म्हणाली ," काय, रात्रीं आम्हाला न सांगताच कुठे जायला निघाला होतास ? असं नाही हां करायचं" . ती गेल्यावर माझा मित्र म्हणाला, " रात्रीं मीं अचानक अत्यवस्थ झालो होतो, मरणालाच स्पर्श करून आलो; या सिस्टर्सनी मला खेंचूनच परत आणलं, असंच म्हण ना ! ". मला अश्रु आवरेनात म्हणून त्याचा हात हातात घेऊन मीं उद्या येतों म्हणून तिथून निघालों. वाटेत त्याच सिस्टरने मला गांठलं." आजच आम्ही तुमच्या मित्राला त्या खिडकीकडच्या कॉटवर हलवणार आहोत; तिथून समुद्र छान दिसतो. आतां सिनेमात त्याला नाही इंटरेस्ट राहिलाय ! उद्या मात्र न चुकतां याच हां त्याला भेटायला". मीं समजायचं तें समजलो होतो. आत्यंतिक, निखळ सेवावृत्तीचं प्रतिकच असावं तिथलं प्रत्येकजण !

यो,
तो कुत्रा म्हणजे गागॉईल आहे. पावसाचं पाणी गच्चीतून खाली ओतणारी पन्हळ.

तो तिसरा प्राणी म्हणजे एक भलीमोठी पाल, मगर, घोरपड वगैरे जमातीपैकी वाटतोय.

शांतीआवेदना वाचून काटाच आला अंगावर. इतकी निरलस सेवाभावी वृत्ती जोपासणार्‍या त्या महापुरुष आणि स्त्रियांना सलाम!

शांतीआवेदना वाचून काटाच आला अंगावर<<<< +१

हिरा, भाऊ, अजूनही आपण व्यक्तीगतरित्या तिथे जाऊन जमेल तसा वेळ त्यांच्यासाठी देऊ शकतो का? फक्त माझा प्रॉब्लेम असा आहे की मी आजारी माणसांत पटकन गुंतते. तिथे जाऊ लागल्यावर कधी ना कधी त्या आजारी व्यक्ती तिथून कायमच्या गेलेल्या असणार हे मनाला बजावूनच जायला हवं. अर्थात हळूहळू मनाची तयारी होतच असेल तिथे नियमित जाणार्‍या लोकांची. ते नव्या कपड्यांचं अजूनही असेलच ना? ह्या दोन्ही बाबतीत तुम्हाला काही माहित असेल तर कृपया माझ्या विपुत लिहून ठेवाल का?

जवळ जवळ १७ वर्षांपुर्वी एका मैत्रिणीचे वडिल तिथे अ‍ॅडमिट होते पण तिने कुणीच भेटायला येऊ नका म्हटल्यामुळे आम्ही कुणीच गेलो नव्हतो.
--------

बाकी मुंबई बाफ एव्हरग्रीन भासतोय Happy

मामी,

>> तो तिसरा प्राणी म्हणजे एक भलीमोठी पाल, मगर, घोरपड वगैरे जमातीपैकी वाटतोय.

हो, शक्य आहे. इंग्लंड हा सापाचा प्रांत मानला जातो. सर्प जमातीचे अक्करमाशे इथले पारंपारिक प्रमुख आहेत. या सर्प जातींचा अनेकांशी संकर होतो असं मानलं जातं. तो तिसरा प्राणी असाच संकरित आहे. घोरपड या अक्करमाशांची सामायिक माता आहे.

इंग्लंडच्या फुटबॉल संघाचे चिन्ह पहा तरी :

http://sportswithhenry.files.wordpress.com/2010/08/england-football-emblem1.jpg

हे तीन सिंह आहेत असं सांगावं लागतं. कारण की ते मूळ सिंह नसून सर्पयोनीशी संकरित झालेले आहेत.

भारताचं सरकार अक्करमाशं आहे हे सांगायला नकोच! असो.

आ.न.,
-गा.पै.

मला वाटते, त्या आश्रमाचे नाव शांति-अवेदना आहे. जिथे वेदना नाहीत आणि निव्वळ शांतीच आहे असा हा शांति-अवेदना आश्रम.

गा.पै.जी, खुपच रंजक व कुतूहल जागृत करणारी माहिती. [ आपल्या राष्ट्रीय प्रतिक असलेल्या स्तंभावरचे सिंह मात्र अस्सल आहेत - त्या प्रतिकाला न शोभणारे शासनात व बाहेर उदंड होत असले तरीही ! Sad ]
<< शांती आवेदना वाचून डोळे पाणावले...>> सहाजिकच आहे; पण त्याहीपेक्षां, आजच्या स्वार्थाच्या बजबजपुरीतही अत्यंत सहृदयतेने, आपुलकीने, हंसतमुखाने व मनाचा तोल ढळूं न देतां अशा रुग्णांची अविरत सेवा करण्यात समाधान मानणार्‍या व्यक्ती व संस्था एक आशेचा किरण दाखवतात, हें खूपच महत्वाचं ! मुंबईच्या एकंदरच झगमगत्या व्यक्तीमत्वाचा हाही तळपता पैलू आहेच.

Pages