मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा, त्या पुतळ्याच्या डागडुजीकरता तो पुतळा खाली उतरवून पुन्हा वर चढवलेली आठवण माझे वडीलही सांगतात.
इंद्रा, ताजचा फोटो (ताजचाच आहे ना?) कुठून घेतला आहेस? भारी आहे.

नातेवाइकांना भेटी सोडल्यास मुंबईशी कधी फारसा संबंध आलेला नसला तरी या धाग्यातल्या माहिती देणार्‍या पोस्टी वाचायला आणि फोटो बघायला मजा येते.

(ताजचाच आहे ना?) कुठून घेतला आहेस? > गेट वे च्या समोरुन घेतला आहे.

भाऊंचा कॉलेज विश्वातील फेरफटका आवडला... भवन्स बद्दल वाचायला नेहमीच आवडत Happy

यो... सहीच रे

<<भाऊंचा कॉलेज विश्वातील फेरफटका आवडला>> कुणाकडून तरी तरुणाईचे खमंग किस्से मला मिटक्या मारत ऐकायला मिळतील म्हणून मीं तो ओबडधोबड खडा टाकलाय ! Wink

भाऊ, कॉलेजेस बद्दल मस्त माहिती..
मला आठवतेय तेव्हापासून राजाबाई टॉवर पाहुण्यांसाठी बंदच आहे. दोन विद्यार्थिनींनी तिथून आत्महत्या केली होते असे वाचल्याचे आठवतेय. आपल्याकडे सुरक्षितता जपण्याऐवजी अशा जागा बंद करण्याचीच पद्धत आहे.
मला वाटतं चारमिनार आणि कुतुबमिनारही असेच बंद आहेत.

बाकीच्या जागा बंद होत असताना CST स्टेशन ची हेरीटेज टुर चालु केल्याचे काही महिन्यापुर्वी वाचले होते. कुणी ही टुर केली आहे का?
http://www.mumbai77.com/city/2626/attractions/cst-building-museum-tour/

कुतुबमिनार बद्दल जिप्सी सांगेल.>>>>हो कुतुबमिनार बंद केलंय. Sad

बाकीच्या जागा बंद होत असताना CST स्टेशन ची हेरीटेज टुर चालु केल्याचे काही महिन्यापुर्वी वाचले होते. कुणी ही टुर केली आहे का?>>>>हो मी पण वाचलंय/ऐकलंय.

या जून्या इमारतींची खासियत म्हणजे आत बर्‍याच सुधारणा केल्या तरी बाहेरुन त्यांचे सौंदर्य अबाधित राहिलेय. रस्त्यावरचे फेरीवाले नसले ( रविवारी खुप कमी असतात ) तर फोर्ट एरीया, बॅंक स्ट्रीट, दलाल स्ट्रीट, हॉर्निमल सर्कल, टॅमरिंड लेन, सेंट्रल बिल्डींग, हाय कोर्ट... वगैरे भाग अजून जूनाच वाटतो.

फोर्टमधले हँडलूम हाऊस आणि इंडोसुएझ बँक ची बिल्डींग जळाल्यावर बरीच वर्षे ते दोन भाग भकास वाटत होते, पण तिथेही आता चांगल्या इमारती झाल्यात.

काळा घोडा परीसरातील, क्रायसोफॉयलम ( सुवर्णपत्र ) म्हणजेच स्टार अ‍ॅपलची झाडे तर त्या विभागाचे वैभव आहे. अनेक पुस्तकात त्यांचा उल्लेख आहे. अमेरिकन एक्स्प्रेस बँकेच्या बाजूला ( ८ लिमिटेड सुटते तिथे ) खुप मोठी झाडे आहेत. त्या झाडाची पाने. अगदी सोन्याप्रमाणे झळाळत असतात. त्या झाडांना फळे मात्र क्वचितच लागलेली दिसतात.

गेला आठवडाभर मुंबईचा महालक्ष्मी रेसकोर्स वर्तमानपत्रात गाजतोय. सव्वाशें वर्षांहून अधिक काळ मुंबईचं एक आकर्षण असणार्‍या ह्या रेसकोर्सला छोटसं कां होईना पण हक्काचं स्थान या धाग्यावर आहे असं वाटलं म्हणून -

वृक्षराजीनं नटलेलीं, स्वच्छ समुद्रावरच्या हवेची जीं अगदीं मोजकींच ,विस्तीर्ण मोकळीं ठीकाणं अजूनही मुंबईत तग धरून आहेत, त्यांत मला वाटतं महालक्ष्मी स्टेशननजीकचा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचा 'महालक्ष्मी रेसकोर्स' अग्रक्रमावर असावा. मीं जवळ जवळ ४० वर्षांपूर्वीं कुतूहल म्हणून मित्रांबरोबर प्रथम तिथं गेलों तेंव्हां भारावूनच गेलो होतो. तिथली गर्द झाडी तुम्हाला दूरवरच्या कुठल्यातरी शांत गंभीर तपोवनातच नेतात तर तिथल्या ब्रिटीशकालीन भव्य इमारती तुम्हाला एका वेगळ्या कालखंडातही आपसूकच डोकावूं देतात. त्यानंतर कधीही बस वा ट्रेनमधून तिथून जाताना त्या आठवणीने वृक्षराजीतल्या सुखद वार्‍याची झुळूक अंगावरून गेल्यासारखं वाटायचं. त्यानंतर रेसकोर्सवर प्रत्यक्ष जाणं झालं तें मात्र निवृत्तिनंतरच , मुख्यतः तिथल्या 'रेग्यूलर' असणार्‍या माझ्या कांही मित्राना भेटण्यासाठी.

प्रत्येकी फूटबॉल, क्रिकेट व हॉकी यांचीं एकेक मैदानं सहज मावतील इतकी झाडीने वेढलेली विस्तीर्ण मोकळी जागा[ २२५ एकर] , छान राखलेली हिरवळ, लगतच्या समुद्रावरून फणफणत येणारा गार खारा वारा, स्वच्छ व प्रशस्त प्रसाधनगृहं, वाजवी किंमतीत चहा, पेयं व खाद्यपदार्थ देणारे स्टॉल्स आणि तिथल्या आकाश झांकणार्‍या डेरेदार झाडांवर खारींचा सतत चालणारा लपंडाव, हें सर्वच 'रेसचा नादी' म्हणवून घ्यायची भितीही रेसकोर्सवर जाण्यापासून रोखणं आतां अधिकाधिक कठीण करतंय. अर्थात रेसच्या शौकीनांच्या गर्दीचा कलकलाट यांत मिठाचा खडा टाकू शकतो. म्हणूनच,शक्यतों मोठ्या रेसचे गर्दीचे दिवस वगळून आजही मी अधून मधून तिथं जातों, ठराविक वृक्षाच्या पारावर बसून जुन्या नव्या -समवयस्क असंच नव्हे - मित्रांबरोबर गप्पाही छाटत बसतो; त्यांच्या त्या दिवशीच्या तिथल्या यशापयशांत सामीलही होतों; अगदींच तिथला उपर्‍या वाटूं नये म्हणून एखाद दुसर्‍या रेसवर चाळीस-पन्नास रुपये खेळतोही. मधेच तिथल्या भव्य स्टँडमधल्या बांकावरही जावून बसतो, अंगावर समुद्राचा फ़णफ़णता गार वारा झेलत पण तिथं हमखास येणारी डुलकी आपला ताबा घेणार नाही याची दक्षता घेत .

अर्थात हें झालं 'पब्लिक'ला खुल्या असलेल्या रेसकोर्सच्या भागातलं; खास 'मेंबर्स एनक्लोझर' मात्र तिथल्या 'ड्रेस कोड'मुळे, उच्चभ्रू दिखाऊपणामुळे व अजूनही निलाजर्‍यासारखं इथंच रेंगाळणार्‍या नकली स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश वातावरणानेच भारावलेलं असतं. तिथला स्टँड हा इंग्लंडची राणी, अमेरिकेचा प्रेसिडेंट, प्रिन्स आगाखान इ.इ. च्या पायधुळीने पावन झालेला व आतां ' हेरिटेज कॉन्झर्वेशन'च्या सुरक्षेखाली असलेला. भारताच्या दौर्‍यावर आलेले बहुतेक क्रिकेट संघही इथं भेट देत असावेत[ सोबर्सने धडाकेबाज खेळत मुंबईचा सामना लवकर संपवला होता तेंव्हा त्याला दुपारच्या रेसला जायचं होतं म्हणून तो तसा खेळला, अशी दाट वदंता उठल्याचं आठवतं] .
इतक्या वर्षांत इथल्या भव्य इमारती व रेसकोर्स यांत फ़रक पडला नसला तरीही संगणक व टीव्ही आल्यापासून इथं बेटींगच्या भागात बराच फ़रक पडल्याचं जाणकार सांगतात. प्रचंड मोठे 'डिस्प्ले बोर्ड' आतां सर्वत्र टीव्ही सेट बसवल्यामुळे गायब झाले. बेटींगचे वेगवेगळे प्रकारही संगणकामुळे आतां शक्य शालेत. शिवाय, आतां केवळ मुंबईच्याच नाही तर दिल्ली, कोलकत्ता, बंगळुरू , मैसूर व पुणे इथल्याही रेसॆस इथं सर्वत्र लावलेल्या टीव्ही सेट्सवर ' लाईव्ह' पहाता येतात व बेटींगही करतां येते. [ पुणे रेसकोर्स मुंबई क्लबच्याच अखात्यारीता येतो व मुख्यत: पावसाळी मोसमासाठी वापरला जातो.]

रेस कोर्सवर जावून तिथल्या खानदानी, रुबाबदार, अश्वांचं [ घोडे नाही म्हणवत त्याना] तुकतुकीत शरीरसौष्ठव पाहिलं कीं हेवाच वाटतो. अनेक सिनेमांत धुळीचे लोट उडवणारी जबरदस्त घोडदौड सर्वानीच पाहिली असेल. पण रेसकोर्समधील ट्रॅकच्या रेलींगला रेलून समोरूनच धाड धाड करत रेल्वेच्या इंजीनसारखे धांवणारे घोडे पाहिल्याशिवाय घोडदौडीचा खरा 'फील' येणं कठीणच ! ९०%हून अधिक घोडे तपकिरीच असतात. पण त्यांतच एखादा करड्या रंगाचा किंवा पांढरा शुभ्र घोडा नजर खेंचून घेतोच. [ अर्थात, तिथल्या पब्लिकला घोड्यांचे दोनच रंग सहसा मोहीत करतात - 'फ़ेवरीट' व 'फ़्ल्यूक' !]. प्रत्येक घोड्याची वंशावळ, त्याचं वय, वजन, पूर्वीची कामगिरी व त्यावर आधारित त्याला दिलेला 'वर्ग' ही सर्व माहिती पद्धतशीरपणे त्या दिवशींच्या रेसच्या पुस्तिकेत दिलेली असते. त्यावर चाललेला अभ्यास, रंगलेली चर्चा , बांधलेले आडाखे व त्याला दिलेली 'आंतल्या खबरी'ची फोडणी हें तटस्थपणें ऐकणं ह्यांतच २० -३० रुपयांचं तिथलं प्रवेश शुल्क सहज वसूल होतं.[आंत प्रवेश केल्यावर तुम्ही पैसे लावून थोडं तरी खेळलंच पाहिजे असं कांहींही बंधन नसतं ! ]. हें झालं 'टोट'वर छोट्या बेट लावणार्‍यांचं. इथल्या 'रिंग'मध्ये स्टॉल घेवून बसलेले सटोडिये मात्र रु. १००/ पासून कित्येक पेट्यांच्याही [ लाख रुपये] बेटस स्विकारतात. बेटींगवरच्या करामुळें राज्य शासनाला कित्येक कोटींचा फायदा होतो.

घोड्यांच्या मालकांबरोबरच, ट्रेनर, जॉकी , घोड्याची निगा राखणारे इ.इ. बर्‍याच तज्ञांचा सहभाग या खानदानी खेळ-कम-करमणूक -कम- जुगारात आवश्यक असतो. शिवाय, प्रत्येक दिवशीची प्रत्येक रेस वेळापत्रकानुसारच पार पाडण्यातलं व्यवस्थापन कौशल्य तर वाखाणण्यासारखंच. 'इन्व्हीटेशन कप','डर्बी'
इत्यादी मोठ्या रेसेस फारच प्रतिष्ठेच्या असतात या सर्वच संबंधितांसाठी. अशा रेसच्या दिवशीं रेसकोर्सवर मोठाच सोहळा असतो; नाच-गाणीं, फॅशन पेहरावाच्या स्पर्धा, महत्वाच्या रेसमधले विजेते घोडे अचूक सांगणार्‍यांसाठीं विविध बक्षिसं [ बेटींग व्यतिरिक्त] इत्यादींमुळें बरींच कुटूंबही त्या दिवशीं या जत्रेत सामील होतात.

एका पारशी धनाढ्याने रेसकोर्ससाठीं दिलेली आपली समुद्रकांठची दलदलीची ही जागा 'रिक्लेम' करून इंग्लंडमधील एका रेसकोर्सच्या धर्तीवर बांधलेला हा रेसकोर्स १८८३ सालीं सुरूं झाला. पण जमीनीची मालकी ही मुंबई महापालिका व राज्यशासन यांच्याकडे असून ती दीर्घकालीन 'लीज'वर क्लबला देण्यांत आलेली आहे. [तो 'लीज' आतां 'रिन्यू' करायची वेळ आल्यानेच सर्व आशाळभूत नजरा या सोन्याच्या खाणीवर खिळून राहिल्या आहेत, हें वेगळें सांगणें न लगे !]. धनाढ्यांचं जरी वर्चस्व असलं तरीही रेसकोर्स हा सामान्य नागरिकांचंही मनोरंजनाचं ठिकाण होतं व आहे. ४०-५० वर्षं नियमितपणे रेसकोर्सवर येणारे,आपल्याला परवडेल एवढंच खेळणारे व त्यांतला निखळ आनंद घेणारे अनेक जण माझ्या पहाण्यात आहेत. कापडाच्या गिरण्या बंद पडण्यापूर्वीं तिथल्या अनेक कामगारांचंही हें मनोरंजनाचं हमखास ठिकाण असायचं. [तेंव्हां रु.५ पासून बेटींग करतां येई , आतां किमान रु.१०/ खेळावे लागतात. ] बेटींगच्या आहारीं न जातां निव्वळ गंमत म्हणून अधून मधून महालक्ष्मी रेसकोर्सवर जाणं हा एक आनंददायी अनुभव आहे, अशी माझी तरी धारणा अहे. अर्थात, आतां अनेकांच्या तोंडातुन गळणारी मोकळ्या जमीनीबाबतच्या आधाशीपणाची लाळ पहातां, ही स्वप्नवत असलेली मस्त मोकळी जागा पुढेही तशीच राहील याची शक्यता कमीच !

मी केली आहे व्हीटी स्टेशनची हेरिटेज टूर गेल्याच महिन्यात. वेगळाच अनुभव होता. लिहिन त्याबद्दल. ज्यांना शक्य आहे त्यांनी कराच.

बाकी धागा मस्त चालला आहे. खूपच इंटरेस्टींग माहिती मिळते आहे. भाऊ, हिरा, जिप्सी, पाटील आणि इतरही सगळे- ग्रेट.

रेसकोर्सवर इमोझेस रोडच्या बाजूला अश्वांसाठी खास पाण्याचा पूल बांधला आहे. सकाळी त्यातून घोडे चालत फिरतात. त्यांच्या व्यायामाकरता एक मैदानही आहे. सकाळी सगळे घोडे शिस्तीत त्यांचे त्यांचे ठरलेले व्यायाम करतात. उद्या फोटो टाकेन.

हे आज सकाळीच काढलेले रेसकोर्सचे फोटो. आज आकाशात मळभ आल्यानं फोटो काहीसा डल दिसत आहे. :

१. उजवीकडील खालच्या कोपर्‍याजवळ घोड्यांचा वॉकिंग पूल दिसत आहे. पूलाच्या डावीकडे १०वाजताच्या जागेत मातीचा छोटासा ढीग दिसत आहे ना? त्याच्या भोवतून घोडे पळवतात. रेसकोर्सचा शर्यतीचा ट्रॅकही दिसतोय. सकाळी यावरून चालण्याकरता चिक्कार मंडळी येतात. ट्रॅकच्या पलिकडे सगळ्यात डावीकडच्या पांढर्‍या स्ट्रक्चर समोर हेलिपॅड आहे. इथे हेलिकॉप्टर्सची ये-जा असते अधूनमधून. त्या शेजारी दिसणार्‍या इमारतीसमोरचं मैदान लग्नं समारंभ साजरे करण्याकरता वापरलं जातं. फोटोत रेसकोर्सचा केवळ १/३ भागच दिसत आहे. यावरून त्याची भव्यता लक्षात यावी.

२. पावसाळ्यात याच रेसकोर्सचं छानपैकी तळं बनतं. Happy हा १२ जून २००८ ला काढलेला फोटो आहे.

आता लवकरच रेसकोर्सचं लीज संपणार आहे, त्यामुळे सध्या ते रोज बातम्यांत आहे. ही आजच्या मटातली बातमी :
रेसकोर्सवरील महापालिकेच्या मालकीचा भूखंड प्रशासनाने ताब्यात घ्यावा , असा ठराव बुधवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला . मात्र , कॉँग्रेसने या ठरावाला विरोध केला आहे . मंजूर झालेल्या ठरावाची माहिती राज्य सरकारला कळविण्यात येणार असल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे .

रेसकोर्सच्या एकूण साडेआठ लाख चौ . मीटर भूखंडापैकी राज्य सरकारकडे पाच लाख ९६ हजार ९५३ चौरस मीटर तर , पालिकेकडे दोन लाख ५८ हजार २४५ चौ . मीटर जमिनीची मालकी आहे . ' रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब ' ला १ जून , १९१४ रोजी हा भूखंड ९९ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आला होता . येत्या ३१ मे रोजी हा करार संपत असून कराराचे नूतनीकरण न करता पालिकेने रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारावे , अशी मागणी महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे .

महापौरांच्या दालनात बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत सभागृह नेते शैलेश फणसे यांनी टर्फ क्लबच्या कराराला मुदतवाढ देऊ नये , असा प्रस्ताव मांडला . भूखंडाचा वापर फक्त धनदांडग्यांसाठी होत आहे . मुंबईतील प्रदूषणाचा विचार करता मुंबईकरांना श्वास घ्यायला मोकळी जागा राहिलेली नाही . त्यामुळे पालिकेच्या मालकीचा भाग असलेल्या भूखंडावर मनोरंजन मैदाने , उपवने , उद्याने बांधावीत , अशी सूचना फणसे यांनी केली . भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , मनसे , समाजवादी पक्षाने या प्रस्तावाला पाठिंबा दिला .

आर्थिक लेखाजोखा :
पालिकेच्या मालकीचा भूखंड : दोन लाख ५८ हजार २४५ चौ . मीटर
वार्षिक भूभाडे : २० लाख , १९९५पासून दरवर्षी १० टक्के वाढ
कर्मचारी वसाहत भाडे : ३२ हजार ८३० रुपये
सॅनिटरी ब्लॉक : ९४३ रुपये
तरणतलाव : २१ हजार ७३ रुपये
दवाखाना : १ , ३६२ रुपये
बार : दोन लाख ४६ हजार रुपये
विवाह सोहळ्यासाठी : प्रतिदिन २५ हजार रुपये

<< अश्वांसाठी खास पाण्याचा पूल बांधला आहे...... त्यांच्या व्यायामाकरता एक मैदानही आहे. सकाळी सगळे घोडे शिस्तीत त्यांचे त्यांचे ठरलेले व्यायाम करतात. >> मामी, अश्व हें सर्व करताना त्यांच्यावर नजर ठेऊन त्याचीं टिपणं घेतलीं जातात व तीं दर्दी व अभ्यासू 'रेस रसिकां'साठीं त्या त्या दिवशींच्या पुस्तिकेत दिलीं जातात ! [ हें सर्व अर्थातच माझ्यासारख्या तिथल्या हौशी कलाकारासाठी अगम्यच ! Wink ]

वा भाऊ ! मस्त आलेख.
पुर्वी बहुतेक हिंदी सिनेमात रेसकोर्स दिसायचा !
माझा बरीच वर्षे वावर त्या भागात होता. आधी ऑडीट साठी महालक्ष्मीला आणि मग हॉर्नबी वेलार्ड इस्टेट जवळ.
रेसकोर्सच्या दोन्ही बाजूने जाणे व्हायचे पण कुतुहल कधी वाटले नाही. इनकम टॅक्सचे महालक्ष्मी चेंबर्स पण तिथेच होते.

तूम्ही म्हणताय ती झाडे बहुतेक पर्जन्यवृक्षाची आहेत. त्याच्या चिकट शेंगा रस्त्यावर पडून रस्ता खराब होतो.

मधे कुठल्यातरी राजकीय पक्षाचे तिथे अधिवेशन भरले होते. त्यावेळी मंडपाचे खांब रोवताना बरेच साप निघाले होते. ते अर्थातच मारले गेले. पण नंतर कळले उंदरानी ट्रॅकजवळ बिळे करुन धावणार्‍या घोड्यांना अडथळा आणू नये म्हणून ( त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ) ते साप मुद्दाम तिथे सोडलेले होते.

त्या काळात लोकसत्तामधे विजय शिंदे रेसच्या अंदाजाबाबत नियमित लिहीत असते. ( ते तूझे कोण ? असे मला मित्र विचारत असत. ) लोकसत्तामधेच, "फोटोफिनीश" हा शब्द तेव्हापासूनच रुढ झाला.

<< तूम्ही म्हणताय ती झाडे बहुतेक पर्जन्यवृक्षाची आहेत.>> दिनेशदा , खरं असावं. किंबहुना आपण वर ज्या काळा घोडा परिसरातल्या वृक्षांबद्दल लिहीलंत तेही पर्जन्यवृक्ष [रेनट्री] असावेत असाच आधीं माझा ग्रह होता.
<< रेसकोर्सच्या दोन्ही बाजूने जाणे व्हायचे पण कुतुहल कधी वाटले नाही.>> अहो, माझे मित्रच तिथं नियमितपणे जात असूनही नोकरीवर असताना मला तिथं जावसं कधींच वाटलं नव्हतं. निवृत्तिनंतर कदाचित अशीं 'टाईमपास'चीं कांहीं ठीकाणं हाताशीं असणं बरं असं वाटत असावं. Wink
<< मधे कुठल्यातरी राजकीय पक्षाचे तिथे अधिवेशन भरले होते >> सध्या राजकीय नेत्यांच्या व धनाढ्यांच्या घरच्या लग्नांसाठी सर्रास इथलं मैदान दिलं जातं; एका दिवसासाठीची सजावट, रोषणाई व जेवणखाण यावरचा खर्च पाहून अवाक व्हायला होतं.

माझ्या वरच्या पोस्टीत दिलेल्या आजच्या मटाच्या बातमीत रेसकोर्सचा काही आर्थिक लेखाजोखा दिला आहे.

पण भाऊ, खरं सांगायचं तर (आणि विषयांतर करायचं झालं तर) श्रीमंत लग्नांवर होणारा खर्च हा त्यांच्या एकूण मिळकतीच्या हिशेबात ठीकच असतो. त्याचा आकडा आपल्याला मोठा दिसतो इतकंच. पण एखाद्या सामान्य पगाराच्या कुटुंबात जो लग्नाचा डामडौल केला जातो, तेव्हा त्या खर्चाचं पगाराशी प्रमाण जास्त व्यस्त असतं. तेव्हा आपलं अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले.

मामी, रेसकोर्सचीं छान विहंगम दृश्यं व तपशीलवार माहिती.
<< त्याचा आकडा आपल्याला मोठा दिसतो इतकंच.>> बरोबर. शिवाय, अशा लग्नाच्या दिवशीं तिथं वावरणार्‍या १००-१५० कामगार, ५०-१०० कॅटरींग क्षेत्रातली मुलं, 'इव्हेंट मॅनेजमेंट'वाली २५-३० तरुण मुलं-मुली इ.इ.ना यामुळें मिळणारा रोजगार/ करिअर संधी पाहिलीं कीं बरंच वाटतं ! पण हेवा न वाटताही श्रीमंतीचं अतिप्रदर्शन खटकतच ना .
<<.....डावीकडच्या पांढर्‍या स्ट्रक्चर समोर हेलिपॅड आहे.>> दक्षिण मुंबईतलं 'नागरी' हेलिकॉप्टर उतरवण्याचं हें एकमेव हेलिपॅड आहे. महालक्ष्मी पूलावरून हेलिकॉप्टर्स उतरताना अगदीं जवळून पहायला मिळतात.

रेसकोर्सची चर्चा मस्तच की!

रेसकोर्सवर सर्वसामान्यांना सहज फिरायला म्हणून जाता येतं - हे माहिती नव्हतं. भायखळा-वरळी बसमधून येता-जाता अनेकदा रेसकोर्सकडे मान वळवून वळवून पाहिलं जातं, पण ते काही सेकंदच. भाऊंनी लिहिलंय त्याप्रमाणे, त्या आवारात काही भव्य वास्तू आहेत हे देखील मला माहिती नव्हतं.
आता कधीतरी त्या परिसराला भेट देणारच! Happy गर्दी नसणारे, ज्यादिवशी रेसेस् नसतात असे दिवस कुठले ही माहिती कशी, कुठे मिळेल?

शर्मिला, हेरिटेज टूरबद्दल लिहीच. मी त्याबद्दल पेपरमधे वाचलेलं होतं. मला ती टूर करण्याची इच्छाही आहेच.

मामी, हे तुझ्या घरातून काढलेले फोटो आहेत?? आता आधी तुझ्या घरालाच एकदा भेट दिली पाहिजे. Wink

लले, केव्हाही जाता येतं रेसकोर्सवर. रेसेस असल्याच तर त्या रविवारी असतात. केव्हाही ये आपण जाऊ.

http://www.abhijitsplanet.com/pratibimb/index.php?showimage=124
http://www.abhijitsplanet.com/pratibimb/index.php?showimage=154

कृपया वरील दोन फोटो पहा. त्या फोटोंमधील दिव्याच्या खांबांविषयी अधिक माहिती मिळेल काय? ते नक्की कधीपासून अस्तित्त्वात आहेत? त्यांचे काही ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे काय?

धन्यवाद!

रेसकोर्सवर जाणे झाले नाही, यंदाच्या मुंबई डर्बीला जायचे ठरवले होते ( अगदी सुटपण ड्रायक्लीन करुन ठेवला होता) पण मुंबईबाहेर जावे लागले. आत्ता जर रेसकोर्स बंद झाला तर ती इच्छा कायम अपुरी राहील

खालच्या चित्रातले सिंह गिरगावकराना नक्की माहिती असतील. भाऊ /हिरा - तुम्हाला या शिल्पा बद्दल काही खास माहिती असेल तर प्लिज लिहा
Lions.jpg

बित्तु, अप्रतिम फोटो. Happy

पाटील, हे केसरी 'केसरी'कार लो. टिळकांच्या गिरगाव चौपाटीवरच्या पुतळ्याखालच्या चबुतर्‍यावरचे आहेत ना?

महालक्ष्मी रेसकोर्स टिकला पाहिजे, कारण इतर महानगरां सारखाच तो मुंबईच्या कॅरेक्टरचा एक प्रमुख भाग आहे.

रेसकोर्सला लागुनच विलिंग्डन स्पोर्टस क्लब आहे. मुंबईतल्या मोजक्याच चँपियनशिप गॉल्फ कोर्स असणार्‍या स्पोर्टस क्लब्सपैकि एक. आता कदाचित "हेरिटेज" स्टेटस मिळालं असावं.

Pages