- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग
- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.
- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्या भाताबरोबरही चविष्ट लागते.
अजून एक पाकृ टाकेन असं
अजून एक पाकृ टाकेन असं कध्धी-कध्धी वाटलं नव्हतं
लले, छानाय की! पण श्रावणघेवडा
लले, छानाय की! पण श्रावणघेवडा म्हणजे फरसबी बद्दल डाऊट आहे. श्रावणघेवडा = घेवडा अशी माझी तरी समजूत आहे.
फोडणीत हळद घालायची नाही. (हळद
फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.>> हो माझ्या लेकीलाही कोबिच्या भाजीत हळद नाही आवडत.
लले, मस्तच एकदम. तोंपासु
लले, मस्तच एकदम. तोंपासु
मामी, घेवडा म्हणजे श्रावणघेवडा नव्हे गं. ललिने बरोबर लिहिलंय
मामी, घेवडा म्हणजे
मामी, घेवडा म्हणजे श्रावणघेवडा नव्हे गं. ललिने बरोबर लिहिलंय >>>> हायला, खरं की काय! म्हणजे इतकी वर्षानुवर्षं मी अज्ञानातच होते की. ज्ञानदीप उजळल्याबद्दल ललीचे आणि वरदाचे आभार्स! फरसबीला श्रावणघेवडा म्हणतात हे मला खरंच अज्जिबात माहित नव्हतं.
मस्त भाजी! फोटो पण छान
मस्त भाजी! फोटो पण छान आलाय.
जुन्या मायबोलीत पूनमने ही भाजी लिहिली आहे, फक्त कांदा वगळून. ती वाचल्यापासून मी फरसबीची भाजी अशीच करते.
श्रावणघेवडा = घेवडा अशी माझी
श्रावणघेवडा = घेवडा अशी माझी तरी समजूत आहे. >>>हो मला पन हेच माहिति होते..
मंजू मस्त होते ही भाजी
मंजू
मस्त होते ही भाजी (अर्थात, कांद्याशिवायच केली आहे नेहेमी, पण एकदा करून पाहिन कांदा घालूनही.)
मी पण कांद्याशिवाय केली आहे
मी पण कांद्याशिवाय केली आहे आजपर्यंत. फरसबीच्या ३ प्रकारे भाज्या करते. आता कांदा घालून बघेन.
कांदा घालून करायला सांगितली
कांदा घालून करायला सांगितली पाहिजे.. बटाटा घालून मस्तच लागते...
मस्त लागते ही भाजी! माझ्या
मस्त लागते ही भाजी!
माझ्या साउथइंडीयन बॉसिणीने सांगितली होती. त्यात शेवटी भाजी उतरवतांना अर्धा लिंबु पिळायचा. छान चव येते.
आमच्याकडे यालाच बीन्सची भाजी
आमच्याकडे यालाच बीन्सची भाजी असं पण म्हणतात. माझ्याकडे कांदा वगळून इतर सर्व जिन्नस घातले जातात. (कांदा चिरायचा आळस अजून काही नाही)
लले, लगे रहो!!!
फरसबी हा फ्रेंच बीन्सचा अपभ्रंश असावा बहुतेक.
अजून एक पाकृ टाकेन असं
अजून एक पाकृ टाकेन असं कध्धी-कध्धी वाटलं नव्हतं
>>> लले... ही ही ही!
अरे वा! छान व सोपी पाकृ.
अरे वा! छान व सोपी पाकृ. श्रावणघेवड्याची भाजी आता या कृतीने करून बघणार.
आमच्याकडे सध्या श्रावणघेवड्याची कोशिंबीर टाईप भाजी लोकप्रिय आहे : उकडलेला, बारीक चिरलेला श्रावणघेवडा + मीठ + साखर + लिंबाचा रस + थोडंसं दाण्याच कूट, वरून ओलं खोबरं - भरपूर कोथिंबीर. आणि हवीच असली तर नाममात्र तेलातली मोहरीची फोडणी वरून घालायची. नुसती खायलाही ही श्रावणघेवड्याची भाजी/ कोशिंबीर मस्त लागते. घेवड्याची जी अंगची गोडी असते ती जिभेवर मस्त रेंगाळते.
या भाजीचा मसालेदार प्रकार मोड आलेल्या मटकीबरोबरचा. ती एकदम तिखट, मसालेदार भाजी आहे. कँटीन - मेस, खानावळ इत्यादी ठिकाणी हमखास केली जाते.
छान आहे भाजी. मी कानडी
छान आहे भाजी. मी कानडी मित्राकडे खाल्ली होती. त्यांच्याकडे अनेक भाज्या ( तोंडली, कोबी) अशाच करत असत.
छानच. याच कृतीने कानडी लोकं
छानच.
याच कृतीने कानडी लोकं चवळीच्या शेंगांचीही भाजी करतात.
मी या श्राघेच्या भाजीत गाजर बारीक चिरुन टाकते आणि चमचाभर दाण्याचा कुट + लिंबु पिळुन, नारळ घालत नाही हेल्दी व्हर्जन मध्ये.
मस्त लागते.
मी कानडी मित्राकडे खाल्ली
मी कानडी मित्राकडे खाल्ली होती.>>> हो! कर्नाटकी सारस्वत लोकांची खासियत आहे ही. त्यांच्याकडे कोबीची भाजी पण हळद न घालता भरपूर ओलं खोबरं घालून करतात. कोबी अगदी बारीक बारीक बारीक चिरलेला असतो. मस्त लागते ती भाजी.
कोकणात पण करतात ... खुप आवडती
कोकणात पण करतात ... खुप आवडती भाजी
लले हे काय्ये स्वयंपाक घराची
लले हे काय्ये स्वयंपाक घराची किल्ली सुनेच्या हातात द्यायचं वय झालं तुझं आणि आता रेस्प्या कसल्या टाकत्येस? की म्हणूनच रेस्प्या नोंदवून ठेवत्येस वारसा पुढे सरकवायला?
ऐसी भी करके देखी जायेगी अभी. मी बरिचशी अशीच करते फक्त आधी फरसबी वाफवून घेते
मस्त. मलाही नेहमीची गोडा
मस्त.
मलाही नेहमीची गोडा मसाला घालून करतो त्यापेक्षा अकुने लिहिली आहे तशी पचडी आवडते. (हिरवी मिरची घालत नाहीस का अकु त्यात?)
आता अशीही करून बघेन.
मला बीन्स प्रचंड आवडतात (
मला बीन्स प्रचंड आवडतात ( आणि श्रावणघेवडा आवडत नाही असं इतके दिवस वाटायचं. जी भाजी आवडत नाही तिचं नाव काय असावं असा प्रश्न पडलाय आता :अओ:). ह्या पद्धतीने करून बघेन एकदा.
>>सुनेच्या हातात द्यायचं वय
>>सुनेच्या हातात द्यायचं वय झालं
कवे, हे काय्ये? शोनाहो! पोराच्या हातात द्यायला सांगत नाही. वारसे चालवायला सुनांना वेठीला धरा! बायका सुधारणार नाहीत..
फोटोत जे काय आहे ते श्रावण घेवड्यासारखे दिसत नाही. ती फरसबी आहे. श्रा घे लांब असतात अश्याच पण चपट्या असतात, या गोल दिसतायत (इथे ग्रीन बीन्स मिळतात तश्या). श्रा घे कोल्हापुरात श्रावणात मिळतात. मामे, श्रा घे म्हणजे घेवडा नव्हे! घेवडा इथे फोटोत आहे - http://www.maayboli.com/node/19333?page=3
हे सगळे दिनेशदांनी सांगायचे नाही का?
रेसिपी चांगली आहे.
श्रा घे म्हणजे फरसबी हे
श्रा घे म्हणजे फरसबी हे मा़झ्याकरताही नवीन आहे. मी घेवडा आणि श्रा घे एकच समजत होते.
जुन्या मायबोलीत पूनमने ही
जुन्या मायबोलीत पूनमने ही भाजी लिहिली आहे, फक्त कांदा वगळून. >>> मंजू, छत्रे सुना असतातच प्रयोगशील
इथल्या प्रतिसादांवरून असं दिसतंय, की ही रेसिपी म्हणजे कर्नाटकी खासियत आहे. पण मी ज्या मैत्रिणीकडून ही भाजी शिकले, ती मराठीच आहे, पण मध्यप्रदेशात लहानाची मोठी झालेली आहे. तिच्या लहानपणापासून त्यांच्या घरात ही भाजी केली-खाल्ली जाते. त्यामुळे मी समजत होते की भाजीचा हा प्रकार मध्यप्रदेशी आहे.
लोला, यू आर म्हणिंग द राईट.
'श्रावण'घेवडा जरा चपटा, मांसल असतो. अधिक चविष्ट असतो. त्याचा रंगही जरा गडद हिरवा असतो. पण तो वर्षभर मिळत नाही, फोटोत जी आहे ती त्याची एक पोटजात आहे, वर्षभर उत्पन्न मिळत असल्याने ती अधिक पहायला मिळते. सांगली-कराडच्या भागात सरसकट त्याला श्रावणघेवडा म्हटलं जातं.
(जसा केसर, नीलम हा पण आंबाच आणि हापूस हा ही आंबाच, तसाच हा प्रकार आहे.)
लोला, व्हय व्हय चुक झाली. लले
लोला, व्हय व्हय चुक झाली. लले लेकाला पण शिकीव आणि सुनेलाबी शिकिव गं
कवे, लली स्वयंपाकघरात रेसिपी
कवे, लली स्वयंपाकघरात रेसिपी टाचून ठेवते आणि आद्याला ते बघून करायला सांगते. तिने लिहिल्याप्रमाणे आदित्य भाजी करतो.
अगदी वेगळी दिस्तेय रेस्पी,
अगदी वेगळी दिस्तेय रेस्पी, करुन बघायला हवी.
मला श्रा घे = फरसबी हेच
मला श्रा घे = फरसबी हेच माहिती होतं आत्तापर्यंत. आणि साध्या घेवड्याला उसावरच्या शेंगा असंही म्हणतात असं साबांनी सांगित्लं.
असो. भाजी छान होईलसं वाटतंय. करून बघेन.
फोटोत जे काय आहे ते श्रावण
फोटोत जे काय आहे ते श्रावण घेवड्यासारखे दिसत नाही. ती फरसबी आहे. श्रा घे लांब असतात अश्याच पण चपट्या असतात, या गोल दिसतायत (इथे ग्रीन बीन्स मिळतात तश्या). श्रा घे कोल्हापुरात श्रावणात मिळतात. मामे, श्रा घे म्हणजे घेवडा नव्हे! घेवडा इथे फोटोत आहे - http://www.maayboli.com/node/19333?page=3
>>>>>>>>>>> घ्या! आता जवस-आळशीला जोरदार टशन आली. लालू, हा घेवडा माहिताय गं पण या साधारण घेवड्याची मावसचुलत बहिण लागेल अशी अजून एक भाजी असते. जास्त हिरवी, जास्त लांब, जास्त सरळ, जास्त फुगिर आणि आतून फोफशी. त्याला श्रावणघेवडा म्हणतात असं मला वाटतं. मी म्हणतेय त्या शेंगा साधारण अशा दिसतात : http://www.floracafe.com/Search_PhotoDetails.aspx?Photo=Top&Id=1091
हे सगळे दिनेशदांनी सांगायचे नाही का? >> लोल लोला.
मी घेवडा आणि श्रा घे एकच समजत होते. >>> ये सायो बोटीत बसायला.
एक चपटा, रुंद आणि किंचीत
एक चपटा, रुंद आणि किंचीत खरखरीत घेवडा असतो. तो जरा बेचव पचपचीत असतो. दुसरा फुगीर, अरुंद आणि तुळतुळीत घेवडा असतो. हा चविष्ट असतो. ह्याला गावठी घेवडाही म्हणतात. गावठी घेवड्यालाच बरेचजण श्रावण घेवडा म्हणताय का?
फरसबी अजून वेगळीच. हिला पण घेवडाच म्हणायचं असेल तर पिटुकल्या बिया असलेला, उंच स्लिम आणि आतून पोकळी नसलेला, उकलू शकणार नाही असा घेवडा म्हणावं लागेल.
Pages