नीता शाळेतून बाहेर पडली तेंव्हा बरंच अंधारून आलं होतं. त्यातून पाऊस दाटलेला. वारा सुटलेला. तिची पावलं झपाझप पडत होती. डोळ्यांसमोर दिसत होतं फक्त तिचं घर आणि चिमण्या आतूर डोळ्यांनी तिची वाट बघणारं तिचं पिल्लू!!.... पिलाची आठवण येताच घशाशी आलेला आवंढा गिळत तिनं पावलांचा वेग आणखी वाढवला. जवळ जवळ धावतच तिनं बसस्टॉप गाठला. आभाळ आता चांगलंच भरून आलं होतं. मनातही प्रचंड हुरहूर माजल्यासारखी... ही वेळच प्रचंड घातकी!
’रानडे बाईंना परोपरीने सांगितलं होतं कि मला या निवडणुकीच्या ड्युटीतून किमान या वर्षी तरी सूट द्या... माझं बाळ लहान आहे. मुख्याध्यापक झाली तरी बाईच ना ती पण? काळिज कुठे विकून आलेली असतात ही लोकं कुणास ठावूक! आता उद्यावर आलेली निवडणूक.... सगळी कामं उरकायची तर एवढा उशिर होणारच. सकाळी लवकर घरातून निघाले तेंव्हा रडून रडून थैमान घातलेलं पिल्लूने! पिल्लूचा तसाच रडवा काळवंडलेला चेहरा डोळ्यांसमोर ठेऊन स्वतःला फरफटत घराबाहेर काढलं. रोज सकाळी अशा फरफटण्याने मनाला होणार्या अदृष्य जखमा दिवसभर नुसत्या कुरवाळत रहायच्या. दुसरं काय करणार?’
पाऊस आता भुरुभुरू बरसायला लागला होता... तिच्या डोळ्यांतलं आभाळ सुद्धा नकळत फाटलं आणि बरसू लागलं! - ’काहिही करून घरी पोचायला हवं... लवकरात लवकर!’ ती डोळ्यात प्राण आणून बसच्या वाटेकडे पाहू लागली.
_______________
तुषार धावत पळत बसस्टॉपवर पोचला तेंव्हा कोसळायचाच बाकी राहीला होता. त्याला प्रचंड धाप लागली होती. कधीपासून धावत होता ते त्याला आठवतही नव्हतं. दिवसभर डोंगरावर भटकून कपडे पार मळले होते. घामाने चिकट झालेल्या अंगावर धूळ बसून त्याचा अवतार भयंकर दिसत होता. पण त्याला त्याची पर्वा नव्हतीच. अवघं १६-१७ वर्षांचं वय. ओठांवर नुकतंच मिसरुड फुटायला लागलेलं. आईच्या भाषेत शिंगं फुटायला लागली होती...
बसस्टॉपच्या खांबाला काही क्षण लोंबकळून एक हात कंबरेवर ठेवून त्यानं थोडे श्वास घेतले आणि मग "च्यायला..." असं जोरात उद्गारत तो तिथंच जमिनीवर थुंकला! काय करतोय आपण? कुठे आहोत? त्याला काही समजेना. परत घरी जायचंय? दोनच दिवस झालेत... मोठ्या टेचात घर सोडून निघालो होतो! निघताना बापाला सांगितलं होतं.... परत पाऊल ठेवणार नाही या घरात! आणि आता परत जायचं? बाप हसेल... जिंकल्यासारखा! जिंकायची सवय आहे ना त्याला...
"थूं....." तो परत थुंकला. च्यायला म्हातारा अप्पा नसता घरी तर फिरून कधी तोंड पाहीलं नसतं बापाचं. आणि आईचं पण. आई? तिचं तोंड तसंही दिसतं का कधी? अप्पावर खार खाऊन असते सदा. अशा माणसांमधे कशाला जायचं परत? ... पण मग... पण मग अप्पांचं काय?
बुचकळ्यात पडलेल्या चेहर्याने तो बघत राहिला बसच्या वाटेकडे. एव्हाना पावसाने रंग दाखवायला सुरूवात केलीच होती.
______________________
अडखळत्या संथ पायांनी बर्व्यांनी कसाबसा बसस्टॉप एकदाचा गाठला! त्यांचं त्यांनाच हायसं वाटलं. आता घरी पोचणं एवढंच काम उरलं. त्याचीही काही घाई नाही. निवांत बर्वे बसस्टॉपच्या कठड्याला टेकले. आज फारच दिवसांनी त्यांनी मित्रांसोबत थोडी थोडी ’मारली’ होती. सवय नसल्याने जरा जडच गेलं... पण मजा आली. आज वाढदिवस ना आपला! असा वाढदिवस आयुष्यात पहिल्यांदाच साजरा केला. सुलभा असती तर जाम वैतागली असती. ती असताना लपून छपून प्यायचो आपण. तिला समजायचं म्हणा सगळं... सुरुवातीला वैतागायची. नंतर तिनं बोलणंच सोडूनच दिलं. म्हणायची ’काय करताय ते करा...’. मग आपणही पिणं सोडलं! थ्रिलच संपलं ना त्यातलं! बायको भांडतच नाही म्हणजे काय? काही गंमतच नाही ना राहीली....
बर्वे स्वतःशीच हसले. ’तिची ती युक्तीच होती बहुतेक! इतकी नामी... कि ती गेल्यावरही गेल्या सहा महिन्यांत आपण आज पहिल्यांदा हात लावला दारुला! आणि दोन पेगनंतर स्वतःहून बास केलं! तो परांजपे तर स्साला पार झिंगला होता. ’आपण नाही गं फार घेतली बये.... रागावू नकोस!’ बर्व्यांनी उगाचच आकाशाकडे बघत हात हलवला.
’हं...’ एक सुस्कारा सोडत बर्व्यांनी मान खाली वळवली... ’सुलभे.... बघ दारु प्यायलोय मी... माझ्यावर ओरडायला, भांडायला तरी ये ना गं...’
विमनस्क नजरेने ते बस येण्याच्या दिशेकडे पाहत राहिले. पाऊस आता कोसळायला लागणार अशी चिन्हं दिसू लागली. त्यांच्या डोळ्यांवरच्या चष्म्याची काच धुरकट झाली होती!
________________________
ते तिघंही त्या बसस्टॉपवर उभे होते. एकमेकांना अनोळखी... स्वतःची स्वतंत्र विश्वं उरात जपणारी... पण एकाच दिशेने प्रवास करण्यासाठी एकत्र आलेली ती तिघं! नकळतपणे... एकाच धाग्याने जोडली गेलेली!
बराच वेळ होऊन गेला. पाऊस आता धबाबा कोसळायला लागला होता. नीताने छत्री उघडली. तिच्या जीवाची चाललेली उलाघाल तिच्या प्रत्येक हालचालीतून दिसत होती. एका हाताने छत्री आणि एका हाताने साडीच्या निर्या सावरत टाचा उंच करुन करुन ती बसच्या वाटेकडे पहात होती. तुषार बसच्या खांबाला टेकून पावसातच भिजत उभा होता. पावसाच्या पाण्याने त्याचा चेहरा धुवून निघाला. पण चेहर्यावर होते तसेच गोंधळलेले भाव! आणि बर्वे बसस्टॉपच्या आतल्या मोडक्या सीटवर शांत बसले होते. बसस्टॉपच्या तुटक्या छपरावरून चारी बाजूंना ओघळणार्या पागोळ्यांनी त्यांच्या भोवती भिंती उभारलेल्या जणू!
"बस गेली का हो?" अस्वस्थपणे नीताने विचारलं.
"...." तुषारने तिच्याकडे नजर उचलून पहायचेही कष्ट घेतले नाहीत.
"काही कळत नाही बुवा. एवढा उशीर व्हायला नको खरंतर." बर्वेच मागून बोलले.
"हो ना हो... काहिच कळत नाही. त्यात हा वैताग पाऊस!"- नीताच्या डोळ्यांत आता पाणी जमा झालं.
"तुम्हाला फार घाई दिसते..."
"हो तर... तुम्हाला नाही समजायचं..."
"हं... समजलं. नक्की काहितरी फॅमिली प्रॉब्लेम असणार. काय? नै म्हणजे ’तुम्हाला नाही समजणार’ वगैरे उद्गार एखाद्या बाईच्या तोंडून निघतात तेंव्हा ती बाई बाई नसून ’आई’ असते. अनुभवाचे बोल आहेत. काय? बरोबर ना?"
त्रस्त आणि आठ्याग्रस्त नजरेनं नीताने बर्वेकडे पाहीलं आणि ती पुन्हा बसच्या दिशेने पाहू लागली.
"घरी कुणीतरी आजारी असावं... किंवा कुणाशीतरी संपर्क होत नसल्याने तुम्ही काळजीत असाव्या... किंवा मग तुमची मुलं कुठेतरी तुमची वाट पहात असावी... किंवा मग तुमचं बाळ लहान असेल..."
"अहो तुम्ही एकटेच कसले तर्क-वितर्क करताय? बसची चौकशी केली फक्त तुमच्याकडे. माझ्या वैयक्तिक समस्या ज्या काही असतील... तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी?" नीता उग्र आवाजात म्हणाली.
"राहिलं...." बर्वे खांदे उडवत म्हणाले.
पुन्हा काही काळ गेला. अंधार आता चांगलाच गडद होत होता. नीता आता भलतीच बेचैन झाली. रस्ता ओलांडून इकडेतिकडे फिरून पुन्हा बसस्टॉपवर आली.
"बाळा... जरा पलिकडच्या चौकात वगैरे कुठे रिक्षा मिळते का बघशील का रे? प्लीज?"
तुषारचे हूं नाही कि चूं नाही. नीता पुन्हा नेटाने म्हणाली... "मी तुलाही सोडते ना हवं तिथे... फक्त तेवढी रिक्षा आण बाबा कुठूनतरी. उपकार होतील रे..."
तुषार गप्पच! नीता हतबल झाली. तिचा पडलेला चेहरा पाहून बर्वे गरजले.
"का रे ए कार्ट्या... बहिरा आहेस का काय? ऐकू येत नाही बाई काय बोलतायत ते? पावसाचं पाणी गेलं काय कानात?"
आता मात्र तुषारने बर्वेंकडे मोर्चा वळवला.
"ओ काका... उगाच वाट्टेल ते बोलू नका."
"अरे वा! बोलता येतं की आपल्याला! आता चालता येतं का ते ही दाखवा बरे... जा जाऊन रिक्षा बघ ताईंसाठी." -बर्वे
"शहराच्या एवढ्या बाहेर, संध्याकाळी एवढ्या उशीरा, त्यात या पावसात रिक्षा नाही मिळणार बाई. उगाच पायपीट करून काय उपयोग?" -तुषार
"असं नको रे बोलू बाळा. जरा बघून तरी ये ना..." -नीता
"मुली... सोड त्याचा नाद. मी स्वतःच जाउन येतो."- बर्वे
"ओ थांबा! कुठे चाललात लगेच? च्याईची कटकट... येतो मीच बघून." - तुषार
तुषारच्या पावसात धुसर होत जाणार्या आकृतीकडे पाहून बर्वे हसले. नीता आता तुषार गेला त्या दिशेने पाहू लागली.
"काळजी करू नकोस पोरी. होईल काहीतरी सोय तुझ्या घरी जाण्याची!" - बर्वे
"काका... माफ करा हं मला. मघाशी जरा तोडूनच बोलले तुमच्याशी..." - नीता
"चालतं गं. तुझ्यातली आई बोलत होती तेंव्हा." - बर्वे
"बरोबर ओळखलंत काका. माझं लहानगं घरी आहे हो. माझी वाट पहात असेल... म्हणून घरी पोचायचंय मला." - नीता
"शांत हो आधी. घरी पोचायचंय, घरी पोचायचंय असं म्हणत राहीलं की लगेच आपण घरी पोचायला ही काही ’अरेबियन नाइटस्’ मधली एखादी परिकथा नाही. आयुष्य आहे. तेंव्हा असे कठिण प्रसंग यायचेच. धीर धर." - बर्वे
बसस्टॉपच्या शेजारच्या खांबावरचा दिवा आता लागला. त्या धुरकट पांढर्या प्रकाशात पावसाच्या तिरप्या दाट रेषा जास्तच उठावदार आणि भयाण दिसायला लागल्या. पावसाचा रपारप आवाज, पागोळ्या, रस्त्यावरून वाहणारं पाणी... बाकी भयाण शांतता! गोगलगायीच्या संथ गतीने पुढे सरकणारा प्रत्येक क्षण... ढळू लागलेला संयम!
तुषार चिंब भिजून निथळत बसस्टॉपवर आला. "काय झालं?" नीतानं घाईघाईत विचारलं.
"म्हटलं होतं ना. शहरापासून काही मैल लांब आहोत आपण. जवळपास वस्ती सुद्धा नाही. इथं एवढ्या पावसात रिक्षा कुठून मिळायला? तरी पण हे काका म्हणाले म्हणून पुढच्या दोन चौकांपर्यंत जाऊन आलो! पण एकही रिक्षा नाही."
"अरे देवा!" नीता बसस्टॉपच्या आडव्या फळीवर जवळजवळ कोसळली आणि कशाचाही मुलाहिजा न बाळगता ढसा ढसा रडू लागली.
"आता काय करायच हो? घरी कशी जाऊ मी?" - नीता
"पोरी तू धीर धर जरा. ए पोरा... बसला काय झालंय त्याची चौकशी केलीस का कुठे?" - बर्वे
"हो. त्या तिथे एका दुकानात विचारलं. वाटेत कुठेतरी दरड वगैरे कोसळलीये म्हणे. बस नाही येणार आता." -तुषार
नीता आता हुंदक्यावर हुंदके देऊ लागली.
"मुली... रडू नको गं बावळ्यासारखी. तुझ्याकडे मोबाईल वगैरे असेलच ना? घरी फोन कर. कुणीतरी येईलच ना घ्यायला..." -बर्वे
"या इथे कुठल्याच मोबाईलला रेंज येत नाही हो. निघताना शाळेतून फोन केला होता. आता शाळा पण बंद झाली असेल. जवळपास कुठे फोन बूथही नाही..." -नीता
"अरे देवा..." -बर्वे
"ओ काका... या ताई परत रडताहेत." -तुषार
"रडू देत. मीही रडतो. हवं तर तूही रड. तू कशाला रडशील म्हणा. तुझं काय? तू सडाफटिंग. रात्र इथंच या बसस्टॉपवर काढावी लागली तरी काढशील... तुझं काय जातंय?"
नीताच्या हुंदक्यांचा वेग आणि तीव्रता या वाक्यानिशी आणखी वाढली.
"का? मलाही जायचं आहे घरी..." -तुषार
"अरे वा... घरही आहे म्हणायचे आपल्याला. बघून वाटलं घरच्यांनी ओवाळून टाकलंय बहुतेक!" - बर्वे
"काका... फार बोलताय हां..." - तुषार
"मला घरी न्या हो... माझं पिल्लू..." - नीता हुंदके देता देता.
"थांबा... मी बघतो कुणी लिफ्ट देतं का ते..." -तुषार.
तुषार रस्त्यावर जाऊन थांबला. नीता अजुनही रडत होती. बर्वे आता नुसतेच एकदा तुषारकडे आणि एकदा नीताकडे पहात होते. त्यांनाही जायचे होते घरी. वाट पहाणारं कुणी नसलं म्हणून काय झालं? नुसत्या घरालाही असतात ना डोळे..! सुलभाचा वावर अजून आहे तिथं... ती वाट पहात असेल! देह घरापासून लांब असल्याची अगतिकता जाणवल्याशिवाय मनाला असलेली घराची ओढ समजुनच घेता येत नाही!
तुषार रस्त्यात उभं राहून विचार करत होता... आज घरी जाता नाही आलं आपल्याला आणि आजच्या रात्रीतच अप्पांचं काही बरं वाईट झालं तर? ’मी जाताना माझ्या डोळ्यांसमोर रहा रे लेकरा...’ - अप्पांचे शब्द कानी घुमत होते... पावसाच्या पाण्यात त्याचे अश्रू मिसळत होते.
तेवढ्यात त्याला लांबवर पावसाच्या घनघोर रेघोट्यांत एक पिवळा प्रकाश जवळ जवळ येताना दिसला... कुठलेतरी वाहन जवळ जवळ येत होते...
"ओ काका... कुणीतरी येतंय. गाडी आहे. थांबवतो मी. तुम्ही तयार रहा."
गाडी जवळ जवळ आली. रिक्षा! तुषारचा विश्वास बसेना. एवढ्या आडरानात, भर पावसात, अशा अवेळी एक रिकामी रिक्षा स्वतःहून त्यांच्याकडे येत होती... जोरजोरात हात हलवत तो ’रिक्षा... रिक्षा...’ ओरडत राहिला! पण त्याची काहिच गरज नव्हती. ती रिक्षा जणू त्यांच्यासाठीच येत होती. बसस्टॉपपाशी येऊन रिक्षा थांबली आणि एक म्हातारा गोरटेलासा रिक्षावाला त्यातून डोकावून गंभीरशा आवाजात विचारता झाला... "कुठं जायचंय?"
______________________________________________
क्रमशः...
छान आहे. एक शंका - सुलभा की
छान आहे.
एक शंका - सुलभा की सुषमा?
पुढचा भाग कधी?
एक फु.स. - हाताशी चार भाग तयार असले कीच पहिला पोस्ट करा
(हलके घेणे)
मस्त सुरुवात.. यात्री, तु
मस्त सुरुवात..
यात्री, तु कधी कथा लिहिली आहेस का? एक आगाउ प्रश्न
छान आहे.
छान आहे.
आवडली ........ मस्त आहे पुढचा
आवडली ........ मस्त आहे
पुढचा भाग लवकर येउदेत
धन्यवाद! आनंदयात्री>>> अगदी
धन्यवाद!
आनंदयात्री>>> अगदी तसंच केलं आहे. या भागाचे प्रतिसाद बघून ठरवावे म्हटले पुढचे पोस्टण्याविषयी...
आणि हो... नावाचा घोळ लक्षात आनून दिल्याबद्दल धन्यवाद.
यात्री, तु कधी कथा लिहिली
यात्री, तु कधी कथा लिहिली आहेस का? एक आगाउ प्रश्न डोळा मारा
>> अजून तरी नाही... पण ट्रेकवर्णनांचा (गाढा) अनुभव आहे ना
तेव्हा सगळे 'पुढचा कधी?' असं छळून नक्को करायचे
आणि हो... सुलभा या नावात काही
आणि हो... सुलभा या नावात काही प्रॉब्लेम आहे का?>>> अगं बर्वेंच्या पत्नीच नाव पहिल्यांदा सुलभा नी मग सुषमा झालय.
बाकी छाने भाग. पटापट टाक पुढचे भाग
छान झालीये सुरवात... पटापट
छान झालीये सुरवात...
पटापट पुढचे भाग टाक बघु..
समस्त माबो लेखकांच्या वळणावर जाऊ नको.. दिवे घ्या बरे ;)!!!
मस्त आहे. पुढचे भाग पण लवकर
मस्त आहे. पुढचे भाग पण लवकर येऊदेत.
मस्त झालीये सुरुवात.. पटापट
मस्त झालीये सुरुवात..
पटापट टाक पुढचे भाग
छान. पुढचा भाग लवकर टाक
छान. पुढचा भाग लवकर टाक
मस्तच सुरूवात! आता पुढचा भाग
मस्तच सुरूवात!
आता पुढचा भाग कधी??
क्रमशः नको रे बाबा. कथा छानच
क्रमशः नको रे बाबा.:अरेरे:
कथा छानच आहे, विषय पण वेगळा घेतलाय.:स्मित:
लवकर येऊ दे पुढचा भाग.
धन्यवाद धन्यवाद! लवकरच टाकते
धन्यवाद धन्यवाद! लवकरच टाकते आता पुढचा भाग...
पटापट पुढचे भाग टाक बघु..
पटापट पुढचे भाग टाक बघु..
समस्त माबो लेखकांच्या वळणावर जाऊ नको..>>>>11111
mast........
पटापट पुढचे भाग टाक बघु..
पटापट पुढचे भाग टाक बघु.. >>>>+१००
खरच नहितर लिन्क राहत नहि वाचायाला
खूपच मस्त.... पुभाटा लवकर
खूपच मस्त.... पुभाटा लवकर
मस्त आहे हा भाग. पुढचा भाग
मस्त आहे हा भाग.
पुढचा भाग लवकर टाकणे.
आवडलीये! लौकर टाका पुढचे भाग.
आवडलीये! लौकर टाका पुढचे भाग.
आवडली, आता पटकन पुढचा भाग
आवडली, आता पटकन पुढचा भाग टाक. वाट पाहतेय
ए पटकन लिही ग क्रमशः वाचलंच
ए पटकन लिही ग
क्रमशः वाचलंच नव्हतं मी
भ्याआआआआआआआआआआआआ
समस्त माबो लेखकांच्या वळणावर जाऊ नको..>>+११११११११ करोड+ हजार+ लक्ष.....
मस्त सुरूवात. पुढचे भाग लवकर
मस्त सुरूवात. पुढचे भाग लवकर --- नको --- घाई न करता मनासारखे जमले की टाका!
सहीच्....माफ करा...तगादा
सहीच्....माफ करा...तगादा लावतोय्..पण please लवकर टाका पुढचे भाग....
हा भाग आवडला. पुढचे भाग पण
हा भाग आवडला. पुढचे भाग पण पटापट टाका नैतर इंटरेस्ट संपुन जातो.
छान. मला तुमची अव्यक्त ही
छान. मला तुमची अव्यक्त ही कथादेखील आवडली. आता बाकीचं लिखाण वाचेन हळूहळू
मस्त, पहिले तिघांचे वेगवेगळे
मस्त,
पहिले तिघांचे वेगवेगळे विचारसत्र मस्त वाटले .
(No subject)
Hi katha maayboli var aadhi
Hi katha maayboli var aadhi aaleli aahe.
Bhag 2nd www.maayboli.com/node/42643
3rd www.maayboli.com/node/42647
4th www.maayboli.com/node/42673