साधं सोपं सरळ

Submitted by योग on 16 April, 2013 - 03:46

कोणे एके काळी..

सात च्या आत घरात हा संस्कृतीचा भाग होता, शिस्त म्हणून नव्हे. पोटभरून खेळल्यावर मग घरी आल्यावर छान अंघोळ करून वडीलधार्‍यांना नमस्कार करून देवापुढे दिवा लावून श्रीमद्भगवद्गीता, श्री रामरक्षा, हनुमान स्तोत्र ई. म्हणायचे. दूरदर्शनवर असलेले एखादे परिवार 'धारावाहिक' बघून मग सर्वांनी एकत्रीत रात्रीचे जेवण करायचे आणि दुसर्‍या दिवशीचे दप्तर भरून झोपी जायचे. पुनः सकाळी ७ वाजता दुसरा दिवस सुरू..
साधारण हाच दिनक्रम सर्वांना लागू असे. जेमतेम ५०० चौ. फूट क्षेत्रफळात (संडास, बाथरूम सकट), एक बेडरूम मध्ये पाच जणांचे कुटूंब काय मस्त रहात असे.. गोदरेजच्या दीड कपाटात सर्वांचे सर्व कपडे व्यवस्थित मावलेले, माळ्यावर काही जास्तीची भांडी कुंडी बांधून ठेवलेली, स्वयंपाघरातील मांडणीत आवश्यक तेव्हडीच भांडी वाट्या ठेवलेले, लिविंग रूम मधिल एकाच "शोकेस" मध्ये फोटो, औषधे, रद्दी, टिव्ही पासून, ते एका छोट्या कप्प्यात चपला.. मित्र, नातेवाईक, पाहुणे सर्वांचे त्याच ५०० चौ. फूट मध्ये अगदी भरभरून आगत स्वागत.. आम्हा पाच जणांच्या टुमदार संसाराला 'क्षेत्रफळ' कधी कमी पडले नाही कारण मनांचा एफेसाय अगणित होता. मधल्या भिंती नावाला मात्र- अन्यथा शेजारी म्हणजे दुसरे घर्/कुटूंबीयच होते. शेजारच्या आज्जी सकाळी सहा वाजल्यापासून देवपूजा, पोथी पाठ करायच्या आणि या मधल्या भिंती अक्षरशः बोलू लागायच्या. समोरच्या काकूंच्या स्वयंपाक घरातील सकाळच्या नाष्त्याच्या फोडणीचे वास, शाळेला, बँकेत जायच्या घाईत जिने ऊतरणार्‍या लोकांचे आवाज, अक्षरशः बसल्या जागी ईतर अनेकांची दिनचर्या, हालचाली टिपता येत होत्या. एकंदरीत एरीया मधिल ब्रेकींग न्यूज त्याही खात्रीशीर या फक्त दूधकेंद्राच्या लाईन मध्ये मिळायच्या. दूधाच्या पिशव्या नव्हत्याच- छान ताजे दूध आपल्या भांड्यात घालून मिळत असे- भेसळ वगैरे शब्द परिचयाचे नव्हते. धुणं, भांडी. ई. ला बाई नव्हती कारण स्वताचे कपडे व भांडी शक्यतो स्वताच धुवायची असा नेम होता- अगदी बाहेरगावी नातेवाईकांकडे गेलो तरी त्यात खंड पडत नसे. नियमित हॉटेलात खाणे वगैरे गोष्टी "श्रीमांतांचे चोचले" या सदरात असल्याने महिन्यातून एकदा बाहेर एखाद्या हॉटेलात खायला मुभा असे. एकत्रीतपणे अनेक नाटके, चित्रपट बघितले जायचे, शाळेतल्या शिक्षीका, शिक्षक कुठे ना कुठे दुकानात, मार्केट मध्ये, नाट्यगृहात ई. ठिकाणी आई वडीलांना भेटतच असल्याने निवळ सहामाहीचे प्रगतीपुस्तक येईपर्यंत वाट पहावी लागत नसे- आमच्या एकंदर सर्व कारवाया व बर्‍या वाईट सर्वच शिलालेखांबद्दल घरी लगेच खबरबात मिळत असे. होळी ला केलेले (चिखलाचे) 'राडे', दिवाळीला केलेला लवंग्यांचा माज, गुढीपाडव्याला घेतलेली एखादी नविन वस्तू, ऊन्हाळ्याच्या सुट्टीत जीवाचे केलेले रान या व्यतिरीक्त सभ्य, साळसूद, आटोपशीर आयुष्य होते. पण त्या सर्वात काय गंमत होती. ईतके अपरंपार सुख व समाधान होते. हे माझे ते तुझे हा भाव नव्हता, मित्रांशी कट्ट्यावर गप्पा व चेष्टा मस्करी हीच 'प्रायव्हसी' होती. पुण्याला २ मामा होते, जायला डेक्कन क्विन होती, कर्जतचे बटाटे वडे होते, लोणावळ्याची मगन चिक्की होती, खंडाळ्याला बोरे होती, मंकी हिल ला जांभळे होती, थोडक्यात शाळा, घर, मित्र या व्यतिरीक्त 'मामाच्या गावाला जाऊया' म्हणत आयुष्य कसे सुखाने 'तालात' चालले होते. त्यातही मामा ईकडे मुंबईला येऊन परतीला निघाला की आई व मामाचे ते रेलवे स्टेशन किंवा बस स्टँड वर साश्रू निरोप समारंभ हा त्या तालाच्या जोडीला लाभलेला सुरेल साज होता. आयुष्यात जटील प्रश्ण तसे काहीच नव्हते- फार तर बोर्डात किती मार्क मिळतील या वेशीवर सर्व प्रश्ण, कथा, कल्पना यांचा शेवटचा मुक्काम असे. अज्ञानातून विज्ञानाकाडे एव्हडाच प्रवास होता. अध्यात्मद्यान, अतिंद्रीयज्ञान, ही असली स्टेशनं त्या प्रवासात नव्हती. "साधी माणसं" निवळ चित्रपटात नव्हती, रोज अवती भोवती भेटत होती. 'चॅरिटी बिगीन्स अ‍ॅट होम' हे सत्य होतं. दिवे गेले तरच मेणबत्त्या इतकं साधं लॉजिक होतं. बाकी सर्दी, ताप, पडसं यावर १००% ऊपाय म्हणून अमृतांजन होतं, तापाची लस हा विनोद होता! रेशन कार्ड सोडल्यास ईतर कसलेच कार्ड नव्हते, माणसं हेच 'आधार' (कार्ड) होते. आणि माझे संपूर्ण नाव एव्हडी एकच आयडी होती व ती पुरेशी होती.

पुढे वयात आलो तशी नेमाने भांग पाडणे, कपड्याला रोजची ईस्त्री, अत्तर असली 'खुळे' लागली. ईतर ऊच्चब्रू 'सेंट' मारायचे तेव्हा आम्ही 'सेंटी' होत असू- पण तक्रार नव्हती. असेही रोज सेंट मारून कुणावरही वेगळे ईंप्रेशन मारायचे नव्हतेच. कोलगेट व पॅराशूट एव्हडेच मर्यादित वैश्विक सत्त्य असल्याने 'फूफू' कींवा 'हाहा' करून केसांची वा तोंडाच्या वासांच्या जाहिराती देण्याचे फॅड नव्हते. रू. २५५० च्या पहिल्या पगारातील १०० ची नोट जपून ठेवली होती/आहे. त्यातून आई वडील, बहिणी, देव्हार्‍यातील देव, मित्र, शाळेतील आवडते शिक्षक, ई. सर्वांना काय काय देता देता खिशात निवळ २०० शिल्लक राहिले होते ती आठवण अगदी कालची वाटते. पहिला पगार हातात घेतला तेव्हा 'Responsibility' या शब्दाचे रियल मिनींग कळले. प्रश्णांची 'ऊकल' शोधायची नव्याने अक्कल आली. मनोरंजन व चैन यातला फरक कळला होता. कुठे थांबायचे हे पूर्ण माहित नसले तरी कुठपर्यंत पोहोच (पोहचायचे) आहे हे स्पष्ट झाले होते.

'१९९२' नंतर 'नवाकाळ' आला आणि बर्‍याच गोष्टी रातोरात बदलल्या.. काही कुटील प्रश्ण निर्माण झाले खरे पण तरिही अगदी ढवळून घुसळून निघण्या एव्हडे काही गंभीर नव्हते. कारण विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिला अक्षरशः दोन फुटावरून घरीच भेटल्याच्या घटनेनंतर तर पुढील अनेक वर्षे 'ऐश्वर्यमय' गेली..

मग ऊच्चशिक्षणानिमित्त परदेशी राहिल्यावर मी, घर, समाज, माझा देश, ईतरांचा देश, ई. बद्दलचे अनेक तोपर्यंत न पडलेले प्रश्ण पडले, त्यांची ऊत्तरे शोधायचा प्रयत्न केला, नकळत त्या सर्व गुंत्याचा स्वतः एक घटक व गाठ होवून गेलो होतो.

दाण्याच्या कुटाच्या खलबत्त्या जागी मॉल च्या पिशव्यांमधील सुबत्ता आली पण साधं, सोपं, सरळ, शांत कुठेतरी गायब झालं- अगदी छोट्या गोष्टी त्रासिक वाटू लागल्या-दूध,बालवाडी, शाळा देणगी, कॉलेज प्रवेश. क्षेत्रफळेच पुरेनाशी झाली, एफेसाय करोडोने महागले, कपाटांमध्ये ऑर्गनायझर्स अपुरे पडू लागले, मित्र परिवार, नातेवाईक फक्त फेसबुकावर भेटू लागले, मामा गेल्याची बातमी फोनवर कळली- त्याचे अंत्यदर्शन घेता आले यातच धन्यता मानावी लागली, 'एक्सप्रेस' मार्गांमूळे आयुष्याची वेगमर्यादा वाढली आणि आणि सर्वच मर्यादा ओलांडल्या जाऊ लागल्या, 'मी माझा' अशा चारोळी संस्कृतीला ऊत आला, नेट भेटीवर संसार मांडले जाऊ लागले, ऊठसूठ मेणबत्त्या पेटू लागल्या, 'ऊकल' गेली 'गुगल' आली, निचर्‍या च्या चर्चा गेल्या ईलेक्ट्रॉनिक कचर्‍याच्या चिंता आल्या, आणि शेवटी हातात ऊरलय फक्त प्रत्त्येक प्रश्णावर ऊपलब्ध एखादं 'अ‍ॅप'. "An App a Day keeps the Doctor Away".

आयुष्य आजही देवाच्या दयेने ऐश्वर्यमय आहेच. फक्त ज्या वेगात पसरलोय त्याच वेगात घसरलोय का असले कुटील प्रश्ण पडतात; बरेच काही आठवतय आणि बरेच काही विसरलोय हेही जाणवते आहे; 'ईझम', 'वाद', 'लस' यांनी जीवन आंतर्बाह्य व्यापून टाकलय; रोजच्या व्यापातून 'शट डाऊन' शक्य नाहीये आणि 'लॉग आउट' केले तरी अनेक प्रोसेसेस गुपचूपणे मेमरी खातायत; कुणासाठी माझे अस्तित्व एखाद्या मॉनिटर स्क्रीन वरील एखादी आयडी एव्हडंच ऊरलय...

या सर्वाला 'मिडलाईफ क्रायसिस' असं गोंडस नाव देवून माझी समजूत घालणारे हितचिंतक आहेत हेही दिसतय..

तरीही, साधं सोपं सरळ... शोध सुरू आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग, सेम पिंच... पण मलातरी काही हरवलंय असं वाटत नाही. घरातल्या वस्तू बदलल्या एवढेच, नाती तशीच राहिलीत.
आपल्यापुरती साधं सोपं या शब्दाच्या व्याख्येची व्याप्ती विस्तारत न्यायची !

दिनेशदा,
मी 'विसरलोय' असा शब्द वापरलाय 'हरवलाय' असा नव्हे Happy

असो.
>>आपल्यापुरती साधं सोपं या शब्दाच्या व्याख्येची व्याप्ती विस्तारत न्यायची
ईथेच खरा 'झोल' आहे... व्याख्याविस्तार आणि कल्पनाविस्तार यातली सीमारेषा पुस्ट होत चालली आहे असे वाटते.

आपल्याला पाहिजे तेव्हढंच सोप्पं अन पाहिजे तेव्हढच कठीण... असच असतय आयुष्य.. माझ्यामते तरी.... कोणे एकेकाळी अन अत्ताही हेच समीकरण आहे.
जेव्हा आपलं सोप्पं अन दुसर्‍यांचं सोप्पं ह्याचा मेळ जमत नाही तेव्हा गडबड होतेय. तेच कठीणच्याही बाबतीत.
तुझा लेख अगदी जीवाभावाच्या प्रश्नांचा आहे. त्यांची चर्चा व्हायला हवी. त्यातूनच तर कळतं किती कठीण अन किती सोप्पं ठेवायचं, ते.
आपण तसे प्रत्येक क्षणाला स्वार्थीच असतो. त्या क्षणी जी आवश्यक (priority) तेच करतो. फक्तं काळ-अन स्थळाचे संदर्भं सोडून जेव्हा थोड्या मोठ्या स्केलवर आयुष्यं बघायला लागतो तेव्हा लोकार्थं ध्यानी घेऊ लागतो. (आपल्यातले काही परमार्थंही Happy ). तेव्हढ्यापूर्ती उपरती काय ती. थोडी adjustment करतो... पुन्हा वर्तमान, स्थळ ह्यातच काय ते.
आणि तेच खरय. असं बिगर पिक्चर, ग्रेटर कॉज ध्यानात घेता घेता केलेल्या अ‍ॅड्जस्ट्मेन्ट्स कठीण गोष्टीही सोप्प्या करीत सुटतात.
काय न किती लिहिलं मी... सुमारच नाही.
तू वर्णिलेला प्रवास... त्यावर मात्र बेहद्दं खुष.. अतिशय सुरेख वर्णन.

>>आपल्याला पाहिजे तेव्हढंच सोप्पं अन पाहिजे तेव्हढच कठीण... असच असतय आयुष्य.. माझ्यामते तरी.... कोणे एकेकाळी अन अत्ताही हेच समीकरण आहे.

Happy तरिही दोहोंमधील 'पटीतला' फरक प्रचंड आहे नाही का? 'पत' ची जागा 'पट' ने घेतलीये..
एकूणातच आजकाल "पटीत" पावन सीताराम.. असाच मंत्र आहे..

लेख आवड्ला.. अजुन इतके पावसाळे बघितले नाहीयेतं पण छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद निसटुन जातोय असं वाटतयं
वरचे प्रतिसाद ही आवड्ले

लेखाची मांडणी सुंदर आहे.

<<<फक्त ज्या वेगात पसरलोय त्याच वेगात घसरलोय का असले कुटील प्रश्ण पडतात; बरेच काही आठवतय आणि बरेच काही विसरलोय हेही जाणवते आहे >>>> हे पण खरंच आहे.
हा वेग कोणाला कुठे नेईल कळत नाहीये.

तरी पण बर्‍याच गोष्टी आपल्याच हातात आहेत - आपण ठरवल्या तर...

कालाय तस्मै नमः ||

>>तरी पण बर्‍याच गोष्टी आपल्याच हातात आहेत - आपण ठरवल्या तर...
असे आपल्याला वाटते- Happy अत्ता जवळ जवळ १० सेकंद ईथे सर्व हालत होते- ईराण मधिल ८. चा भूकंप ईथे दुबईत व पार भारतात जाणवला... हे लिहायला मी 'शिल्लक' आहे Happy

फार सुरेख उतरलाय लेख..... !!
अगदी अगदी अस्संच मनापासून जाणवतं..... !!
आपल्या पिढीला हा वेग चांगलाच जाणवतो.
लेकिन कुछ भी बोलो यार........ ती मज्जा नाही राहिली......... हे वाक्य बोलावंसं वाटतंच !!

अरे कुवेत ला पण का..?
आणि तरिही बुर्ज खलिफा च्या सर्वात वरच्या मजल्यावरील घराचा भाव पृथ्वीवर सर्वात जास्त आहे हे कोडे मला अजून ऊलगडलेले नाही.. 'सोन्या' चे ही तसेच.. एक बप्पी दा सोडले तर बाकी सर्व जण 'लॉकर' मध्ये सोने ठेवतात. आणि अशा अंधार्‍या पेटीत पडून राहिलेल्या सोन्याची किंमत वाढतच कशी जाते हे एक महाभयंकर गूढ आहे. २७,००० भाव तर म्हणे बाजार कोसळला.. धन्य!

छान चित्रण,''याला जीवन ऐसे नाव''..
पुलंच्या असा मी असामी मध्येही तेव्हाही हाच क्रायसिस होता अन हा कायम राहील.. प्रगती होते तेव्हा परिस्थिती अनुकूल होते पण काही किंमत वसूल करूनच.

लेख फारसा पटला नाही. तू जुन्या काळाचं अति गोंडस वर्णन केलंयस. तू लिहीला आहेस इतका काही तो स्वर्गीय काळ नव्हता! शेजार्‍यांशी सर्रास भांडणं चालायची.. आठव नळावरची भांडणं! चांगल्या वाईट माणसांचं statistical distribution हजारो वर्ष तेच आहे. सध्या फक्त सर्व गोष्टींचा वेग वाढला आहे.

लेख जरासा पटला अन जरा नाही पण पटला. म्हणजे मला असं वाटतं की कसंही असलं तरी लहानपण, जबाबदार्‍या नसतानाचा काळ प्रत्येकाला आवडतोच. तुम्हाला जो ९० नंतरचा काळ विशेष आवडत नाहिये, तोच आमच्या लहानपणचा काळ असल्याने मला आवडतो. २००० सालाच्या आधी पर्यंत बरंच काही सरळ सोपं होतं असं मलाही वाटतं. कदाचित तुमच्या आईवडलांना अर्थातच त्यांच्या लहानपणचा काळ जास्त आवडत असेल.
जग कॉम्प्लेक्स होत चाललंय हे मात्र खरंच.

एक बप्पी दा सोडले तर बाकी सर्व जण 'लॉकर' मध्ये सोने ठेवतात. आणि अशा अंधार्‍या पेटीत पडून राहिलेल्या सोन्याची किंमत वाढतच कशी जाते हे एक महाभयंकर गूढ आहे. >> पुण्यातले गल्ली लिडर पासून अन्ना, दादा, भाऊ लोक बघितले नाहीत का?;) किती सोनं असतं अंगावर. सो व्हल्गर.

चाळीत लहानपण गेल्याने फक्त

>>>सात च्या आत घरात हा संस्कृतीचा भाग होता, शिस्त म्हणून नव्हे. पोटभरून खेळल्यावर मग घरी आल्यावर छान अंघोळ करून वडीलधार्‍यांना नमस्कार करून देवापुढे दिवा लावून श्रीमद्भगवद्गीता, श्री रामरक्षा, हनुमान स्तोत्र ई. म्हणायचे. दूरदर्शनवर असलेले एखादे परिवार 'धारावाहिक' बघून मग सर्वांनी एकत्रीत रात्रीचे जेवण करायचे आणि दुसर्‍या दिवशीचे दप्तर भरून झोपी जायचे. पुनः सकाळी ७ वाजता दुसरा दिवस सुरू..
साधारण हाच दिनक्रम सर्वांना लागू असे. जेमतेम ५०० चौ. फूट क्षेत्रफळात (संडास, बाथरूम सकट), एक बेडरूम मध्ये पाच जणांचे कुटूंब काय मस्त रहात असे.. गोदरेजच्या दीड कपाटात सर्वांचे सर्व कपडे व्यवस्थित मावलेले, माळ्यावर काही जास्तीची भांडी कुंडी बांधून ठेवलेली, स्वयंपाघरातील मांडणीत आवश्यक तेव्हडीच भांडी वाट्या ठेवलेले, लिविंग रूम मधिल एकाच "शोकेस" मध्ये फोटो, औषधे, रद्दी, टिव्ही पासून, ते एका छोट्या कप्प्यात चपला.. मित्र, नातेवाईक, पाहुणे सर्वांचे त्याच ५०० चौ. फूट मध्ये अगदी भरभरून आगत स्वागत.. आम्हा पाच जणांच्या टुमदार संसाराला 'क्षेत्रफळ' कधी कमी पडले नाही कारण मनांचा एफेसाय अगणित होता. मधल्या भिंती नावाला मात्र- अन्यथा शेजारी म्हणजे दुसरे घर्/कुटूंबीयच होते. शेजारच्या आज्जी सकाळी सहा वाजल्यापासून देवपूजा, पोथी पाठ करायच्या आणि या मधल्या भिंती अक्षरशः बोलू लागायच्या. समोरच्या काकूंच्या स्वयंपाक घरातील सकाळच्या नाष्त्याच्या फोडणीचे वास, शाळेला, बँकेत जायच्या घाईत जिने ऊतरणार्‍या लोकांचे आवाज, अक्षरशः बसल्या जागी ईतर अनेकांची दिनचर्या, हालचाली टिपता येत होत्या>>>

याच्याशीच कनेक्ट होऊ शकले. बाकी विशेष भावलं नाही.

>> शाळा देणगी सोडले तर हे सगळ मला साधे सोपे सरळ वाटतय.... एफसाय महागल्याने मी नोकरीला जाऊ लागले -साधे सोपे सरळ नाहीतर ते किती अवघड होते. मित्र परिवार फेसबुक वर ठीक आहे नाहीतर चहाचे आधण हेच माझे आयुष्य. मामा गेले, फोन आला... नाहीतर पोस्टकार्ड येईपर्यंत सगळ होऊन गेल असत. हातात चहा पोहे पेक्षा नेट भेट फार बरी. रोजच्या व्यापातून 'शट डाऊन' जमतय आणि 'लॉग आउट' केले तरी अनेक प्रोसेसेस गुपचूपणे मेमरी खातायत - पण सांगू 'लॉग आउट' करू शकते,शकले हेच मला फार मस्त वाटतय!!

तुमच्या भावना माझ्यापर्यंत नाही पोहोचल्या... कारण मुळात त्या साध्या सोप्या आणि सरळ नसतात. त्यांना सोप्प्या करून दुसर्या पर्यंत न्याव्या लागतात.

faarach sundar... ekdum pramanik agadi.. sadha saral sop...!

IE 10 upgrade kelya pasun Mabo Marathi typing gandala ahe Sad

धन्स लोक!

रच्याकने: या असल्या लेखावरही 'पटले/ नाही पटले', 'नाही भावले' अशा प्रतिक्रीया आल्या की थोडी गंमत वाटते. लग्न झाल्यावर 'अजूनही आईच्या हातचीच आमटी आवडते' हे ऊघडपणे म्हणायची सोय नसते त्यातला प्रकार आहे हा. Happy
असो.

जुनं ते सोनं असा सूर वाटला तरी साध, सरळ वाटलम वाचायला...

मिडलाईफ क्राईसीस नको तर सुख बोचतं चालेल का? (ह. घ्या)

>>मिडलाईफ क्राईसीस नको तर सुख बोचतं चालेल का?
नाही Happy
माझ्या आजी च्या भाषेत- "भरल्या पोटीच्या रोगावर/प्रश्णांवर औषध नसते"..

मनापासून आवडले नाही.
भूतकाळातील प्रत्येक गोष्ट 'मागे वळून पाहताना' सिंड्रोममध्ये गोंडस गोजिरीच वाटते असे माझे मत.
असे काहीच 'अ‍ॅब्सोल्यूट' छान असत नाही, ना आजचे ना कालचे.
कदाचित मी कायमच भूतकाळापेक्षा भविष्यकाळात जास्त रमतो हा माझा प्रॉब्लेम असावा.

योग
छान जमलाय लेख
पुर्वी माणूस माणूस म्हणून जगायचा आता यंत्र म्हणून जगतोय.
तेव्हाची आणि आताची मोजमापं बदलली आहेत.
तेव्हाही बदल होतच होते पण ते नॅचरल होते त्यामुळे गती मर्यादीत होती आता अनैसर्गीक लादलेले बदल आहेत त्यांची गती अफाट आहे, जे साध्या माणसांना पचवणं कठीण आहे.

योग, <<रच्याकने: या असल्या लेखावरही 'पटले/ नाही पटले', 'नाही भावले' अशा प्रतिक्रीया आल्या की थोडी गंमत वाटते. लग्न झाल्यावर 'अजूनही आईच्या हातचीच आमटी आवडते' हे ऊघडपणे म्हणायची सोय नसते त्यातला प्रकार आहे ह<<>>
असं नाहीये, रे.
'ह्या असल्या' म्हणजे कसल्या? जितक्या सहजतेनं तू उघडपणे हे मांडलं आहेस... तितक्याच उघडपणे आम्ही होय रे बाबा.. किंवा अगदी इतकं नाही... किंवा मुळीच नाही... म्हणतोय.
तुला म्हणायची सोय आहे तितकीच इतरांनाही आहे... नाही का?
असो... ते जाऊदे.

सगळच टेक्नालाजीमुळे इतकं वेगानं धावतय की... श्वास घ्यायला, मागे वळून बघायला उसंत नाहीये हे खरय. पण ज्यांना तितक्या वेगात धावायचं नाहीये, ते ठरवून त्या तांत्रिकांमधे मांत्रिक नाहीत...
आजही अगदी कमी क्षेत्रफळात सुखाचा संसार करणारे खूप खूप आहेत... अन दहा खोल्यांच्या बंगल्यात कंप्ञूटरच्या म्हणून असलेल्या खास खोलीत दिवसाचे अठरा तास घालवणारेही.
जो तो ज्याच्या त्याच्या ठरवलेल्या प्रायॉरिटीजमधे'च' जगतोय.

खंडकाव्यं म्हणजे संस्कृती... चारोळी म्हणजे "त्या" संस्कृतीपासून मैलो दूर. इतकी संस्कृतीची वाटचाल छोटी नसावी, बाबा. संस्कृती हे जपून ठेवलेलं डबकं नाही. ती एक वाहती नदी आहे... तिनं आयुष्यं समृद्धं होतील... कधी कधी पूराने उध्वस्तंही... पण मोस्टली समृद्धं.

खूप गप्पा मारत येतील अशा सुंदर विषयाला हात घातला आहेस. इथे वाचणारी सुज्ञ माणसं ह्यावर विचार करणारेत. काही जागणं असेल, काही जागं होणं असेल... जे काही आहे त्याला.... "असले प्रतिसाद" म्हणून बांध नको घालूस.
तुझा हा लेख मायबोलीसारख्य फक्तं टेक्नॉलॉजीने बांधलेल्या कुटुंबात सुरू झालेला एक संवाद आहे.. वाहू दे.
अशाच अनेक लेखांसाठी माझ्या तुला अन मायबोलीकरांना मनापासून शुभेच्छा.

Pages