चंद्र हरवला आहे

Submitted by kaushiknagarkar on 7 March, 2013 - 11:29

चंद्र हरवला आहे

चेहेरा गोल, उजळ वर्ण.
चेहेऱ्यावर काळे वण, पण एकंदरीत देखणा अाहे.
तरणाबान्ड दिसत असला तरी वय बरेच अाहे.
स्वभाव जरा एककल्ली अाहे.
एकच गोष्ट परत परत करण्याची आणि एकटयानेच फिरायची सवय.
अाहे तसा रात्रींचर पण दिवसाही कधी कधी दिसतो.
मात्र तेंव्हा त्याची ही ऐट, ही चमक उसनी आहे हे समजून येते.

तर हरवला आहे काल संध्याकाळ पासून.
परवा शुक्राच्या चांदणी बरोबर फिरायला जायचे त्याने कबूल केले होते.
पण तो आलाच नाही.
मग ती रूसली, रागाने लखलखली. आणि आता ढगाच्या पडद्याआड गेली आहे.

आणून देणारास येण्याजाण्याचा खर्च अाणि योग्य ते बक्षिस देऊ.

- कवि चंद्रहास चंद्रात्रे
'अाकाशगंगा' क्षितिजापल्याड, इंद्रधनुच्या बाजूला (शुक्रतारा हौ. सो. च्या समोर)
फोन: कशासाठी?

प्रिय चंद्रा
तू गेल्यापासून
सागराला उधाण येइनासे झाले आहे.
कवी वेडेपिसे झाले आहेत
आणि वेडे लोक नॉर्मल झाले अाहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्योतिष्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

तू आसशील तिथून ताबडतोब परत ये. तुला कोणी काही बोलणार नाही.
अगदी गणेश चतुर्थीला सुद्धा हवे तर तुला बघू.
शुक्राची चांदणी तुला परत भेटायला तयार आहे.
तरी तू परत ये.

तुझे,
चंदू, सोमु, शशांक, शशी, कला, यामिनी अाणि चंद्रकला

कायदेशीर नोटीस
वरील जाहीरातीतील वर्णन केलेले श्री. चंद्र उर्फ सोम उर्फ शशांक हे कालपासून नाहिसे झालेले आहेत.
असे करताना त्यांनी दिनांक इ.स.पू. ४,०००,०००,००० मध्ये केलेल्या सूर्यमालेच्या कराराचा जाणूनबुजून भंग केलेला आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. या करारातील श्री. न्यूटन व श्री. केपलर यांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच फिरणे व घालून दिलेल्या नियामांचे पालन करणे या दोन्ही महत्वाच्या अटींचे उल्लंघन श्री. चंद्र यांच्या वर्तणुकीमुळे झाले आहे. यामुळे झालेल्या, अथवा होणाऱ्या, अथवा होऊ शकणाऱ्या, अथवा न झालेल्या, अथवा न होणाऱ्या, किंवा होऊ न शकणाऱ्या कोणत्याही परिणामांची जबाबदारी अामच्या अशिलांकडे नाही. तसेच येण्याजाण्याचा खर्च हा सेकंड क्लासच्या हिशेबाने मिळेल. योग्य म्हणजे काय ते ठरविण्याचे सर्व अधिकार अामचे अशिलांकडेच रहातील.

नोटिस रुजू केली असे.

पृथ्वीराज सूर्याजी जगदाळे, वकील

संपादकीय खुलासा
वाचकांना नम्र विनंती. सदरहू चंद्र परत आलेला आहे तरी कृपया या जाहिराती संबंधी फोन, पत्रव्यवहार अथवा प्रत्यक्ष चौकशी करू नये. चंद्र रोज ठरल्या जागी हजर असतो. तो न दिसल्यास सूसा अॉप्टीशियन्स यांच्याकडे डोळे तपासून घ्यावेत. जाहिरात देणारे कवि चंद्रात्रे यांची दिशाभूल झालेली होती असा खुलासा त्यांनी केला आहे. पूर्व समजून आपण पश्चिमेकडे पाहात होतो म्हणून चंद्र सापडला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही त्यावर वाद घालीत बसलो नाही. आम्हाला दुसरी कामे अाहेत. आपणास इच्छा असल्यास त्यांच्याशी परस्पर प्रत्यक्ष संपर्क साधावा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला, चंद्र परत आला खरा, पण मागे काय दडवून ठेवलंय त्यानं? सारखा समोरचाच भाग दाखवतो. काहीतरी गुपित दिसतंय मागे. शुक्राच्या चांदणीसारखी अप्सरा सोडून कुण्या ओबडधोबड आकाराच्या अशनीबरोबर तर गेला नव्हता? म्हणतात ना, दिल आया गधीपे तो परी क्या चीज है! Biggrin
-गा.पै.

पहिले सगळे वाचताना माझ्या तोंडचे पाणीच पळाले होते ..........

तो शेवटचा परिच्छेद वाचल्यावर जीव भांड्यात का आकाशात कुठेतरी पडला बुवा.....

चंद्राची / शशांकाची एवढी आवर्जून दखल घेतल्याबद्दल पुन्हा पुन्हा आभार मानणारा -
एक चंद्र - शशांक

<<<<कवी वेडेपिसे झाले आहेत
आणि वेडे लोक नॉर्मल झाले अाहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्योतिष्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. >>>> हे लैच भारीए राव - मानलं तुम्हाला