पहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे! तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.
काय तो गडाचा पसारा! नजर जाईल तिथे डोंगरच! लहानपणी आले तेव्हा फार समजत नव्हतं काही... तो अनुभव तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे! पण तरी थोडक्यात सांगतेच... त्या वेळी आमचा अर्धा गड सर झाला (!) आणि वळवाचा पाऊस आम्हाला कडकडून भेटला गडाच्या महाद्वारातच! आम्ही तिघी लहान, आई-बाबा आणि आईच्या एक निवृत्त सहशिक्षिका असे सगळे पावसात अडकलो! आणि इतक्या वर आलो होतो की एरवी आकाशात चमकणारी वीज त्या वेळी डोळ्यासमोरून गेली... ही वीज आहे हेही समजायला मला वेळ लागला! भिती वाटली नाही कारण ती वीज आहे हेच समजलं नव्हतं!!! आणि अगदी एक फुटावरून तो लोळ अनुभवला होता मी! आईच्या जिवाचं काय झालं हे आता आठवलं की शहारा येतो अजूनही... आणि तरी तशा पावसानंतरही आम्ही मुक्कम केला होता. तेव्हा तर एम टी डी सी ची सोय नव्हती. चढताना हातात, तिथे रहायचं म्हणून तरी लागेल असं अत्यावश्यक सामान होतं, आणि आम्ही मुली वाटेतल्या ठेल्यावरच्या सरबतासाठी हट्ट करू म्हणून आई-बाबांनी आधीच २-२ किलोची कलिंगडं घेतली होती! तसे ते गड चढले, ४५ व्या वर्षी!
हे सगळं आठवलं नि देवाच्या नावानंतर आई-बाबांचं नाव घेऊन गड चढायला सुरूवात केली! धाप लागली की बसत, श्वास घेत, "इथून घोडे कसे आले असतील?" "राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती कसे आले असती?" "हेर कसे ४ वेळ गड चढून उतरून येत असतील...?" असा विचार करत चढत होतो. बरेच पर्यटक होतेच बरोबर. काही विघ्नसंतोषीही होतेच. असायचेच! आम्ही २/३ गड चढलो होतो, जरा विसावलो... समोर टकमकीचं टोक दिसत होतं, नि एक कार्टं कुरबुरलं "अरे! हे इथे बसलेले लोक कधी पोहोचणार वर? पोचेपर्यंतच संध्याकाळ होईल यांना!" आम्ही दुर्लक्ष केलं नि अर्ध्या तासात वर पोहोचलो. म्हणजे गडावर!
त्यात मग मधेच "आवळसुपारी घेऊया ना..." "मी तोफेवर बसू म्हणतोस? एक तोफ दुसर्या तोफेवर बसणार म्हणजे फोटो अंमळ विनोदीच दिसेल नाही!..." "पाडलंस का बाटलीचं झाकण पाणी पिताना! नशीब घरंगळत गेलं ते मिळालं.. नाहीतर गेलं असतं दरीतच! किती लहान मुलीसारखं करायचं!" असे प्रमळ संवाद होतेच!
" हत्ती लहान होते, पिल्लं होती ती, तेव्हाच वर नेलं त्यांना...पिल्लं चढतात ना... म्हणजे बघ, ६-७ वर्षं आधीपासूनच राज्याभिषेकाची पूर्वतयारी होती.. उद्या अभिषेक नि आज हत्ती शोधा असं नव्हतं...याला म्हणतात प्लॅनिंग... आपल्यासारखं नाही, रोप वे नाही तर चढून जाऊ..." - अहो.
"तर तर! माझं ऐकलंस म्हणून असा मस्त अनुभव मिळतोय..." -मी.
असे बरेच फुटाणे फोडत टकमकीवर आलो. मग माझ्या आठवणीत होता तेवढा सगळा गड बघितला. फक्त हिरकणी बुरूज आणि वाघदरवाजा बघायचा राहिला. बाकी सगळं मला जसच्या तसं आठवत होतं, ते अहोंनाही दाखवून झालं! आणि मग मात्र कंटाळाही आला आणि दमायलाही झालं. एकतर एवढ्या वर असून एक झुळूक नाही वार्याची, पहाटेसेच निघालेलो, आणि भर दुपारी १२ वाजता गड फिरत होतो... "परत जायचं का आता... झालंय सगळं बघून.." असं दोघांनीही एकाच वेळी म्हटलं नि कोणा एकाचाही (माझाच!!!) बेत बदलायच्या आत आम्ही, आता तरी रोप वे मिळतो का म्हणून गेलो तिथे... १ तास वेटिंग होतं. चालणार होतं तेवढं. टोकन घेऊन बसलो तिथे. मग आईसक्रीम घेणं वगैरे ओघाने आलंच....
एक आश्चर्य म्हणजे वर पूर्ण रेंज होती मोबाईलला.
"बघ, राजांचं कम्युनिकेशन नेटवर्क जबरदस्त होतं त्याचा अजून ३५० वर्षांनीही फायदा मिळतोय" असं मी म्हटल्यावर "बायको अगदीच टाकाऊ विनोद करत नाही" हे मनोमन मान्य (नाईलाजाने!) करून अहोंनी हसून दाद दिली!
यथावकाश रोप वे च्या झुल्यात बसलो आणि वरून खाली बघितल्यावर जे काही दृश्य दिसलंय! आधी किंचित भितीने आणि मग आनंदाने डोळे विस्फारले मी! खोल खोल दरी.. पण मग वाटलं मला कशाला भ्यायला हवं? मी थोडीच अफझलखान आहे? आणि माझं मलाच हसू आलं!
खाली आलो तेव्हा २:३० झाले होते आणि त्यावेळी कदाचित आमचा वर चढायला म्हणून नंबर लागायचा असं सकाळी सांगितलं होतं त्या रोप वे च्या लोकांनी! या वेळी पुन्हा रामाचे आणि प्रेरणा मिळाली म्हणून शिवाजीराजंचेही मनातून आभार मानले.
परतीच्या रस्त्याला लागून मग वाटेत थांबून जेवलो आणि सातारा रोडला लागलो. तिथे भ या न क ट्रॅफिक! ३ तास किमान लागणार होते असं लक्षण दिसलं. पण काहीतरी निर्णय घेत गेलो, नि खरंच, देवाचीच कृपा, ठरल्या वेळेत घरी आलो! अगदी त्याच रस्त्याने, कुठेही यु टर्न घेऊन दुसर्या एखाद्या फाट्याने वगैरे न येता... त्या व्यापातून अलगद सुटलो!
मनात आता मात्र विचारांचा कल्लोळ झाला.... अपघात होताना भिती वाटत नाही, पण "आपण वाचलोय सुखरूप" या विचाराने कधीकधी बसलेला धक्का फार जास्त असतो... तसं झालं माझं...
काय विचार करून काल निघालो? काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं? काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले? काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता? कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला? तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता? जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं? कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून? कुठून बळ आलं म्हणून "जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर..." असं म्हणायला जीभ रेटली माझी?
गडावर आले तेव्हा काय आलं मनात म्हणून इथेही अख्खं पुस्तक आठवलं? आजीची खूप चेष्टा करायचो,कारण तिच्या मते खरे राष्ट्रभक्त ४ च होते ....शिवाजीराजे, भगतसिंग, अटलबिहारी वाजपेयी नि माझे बाबा! (फॉर दॅट मॅटर, रा स्व संघ ही एक समष्टी मानली तर ती म्हणजे ४थे राष्ट्रभक्त!) पण मग तिच्या आठवणीने जीव किती कळवळला! काशी-रामेश्वर घडलेली पुण्यवान बाई ती, तिचा रायगडच कसा राहिला घडायचा.. का माझ्या घशात हुंदका आला!
गड चढूनच जायचा... नवरा असताना, खास करून दोघंच असलो तर जास्त छान... असा विचार कधीतरी मनात आला नि गेला.. तो असा इतका खरा कसा काय उतरला? माझ्या मनातलं प्रत्येक आंदोलन एक नवा प्रश्न पुढे आणत गेलं... आणि मग पुन्हा एक युरेका क्षण आला!
हे घडायचंच होतं! काहीतरी खूप खूप मोठं, अत्यंत चांगलं फळ मिळायचं असेल भविष्यात म्हणून ही यात्रा घडली. एक धर्मतीर्थ, एक रणतीर्थ!
ते रणतीर्थ ३५० वर्षांपूर्वी अखंड जागं राहिलं होतं म्हणून पुढे अनेक धर्मतीर्थं सुखेनैव आपल्याला वाट दाखवू शकली. आपण फार साधी माणसं आहोत, पण इतिहास समजून घ्यायची मिळालेली बुद्धी हे या सगळ्याचं उत्तर आहे हे आतून जाणवलं....
मी खरंच दोन दिवस "जगून" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं! इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी!
पायथ्यावरून दिसणारा रोप वे
सुरूवातीच्या पायरीवरून टकमक टोक
मस्त लिहीलेत दोन्ही भाग.
मस्त लिहीलेत दोन्ही भाग. शांती अगदी पोचली वाचकांप्र्येत. अश्याच संधी तुला पुढेही मिळोत.
<< मी खरंच दोन दिवस "जगून"
<< मी खरंच दोन दिवस "जगून" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं! इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी! >>
अगदी अगदी. छान लिहिलय
हाही भाग आवड्ला
हाही भाग आवड्ला
मस्त लिहीलेत
मस्त लिहीलेत
खूप सुरेख लिहिलंयस गं. किती
खूप सुरेख लिहिलंयस गं. किती छोट्या छोट्या गोष्टींत आनंद सामावला असतो नं? एकदम प्रसन्न वाटलं वाचून!
अगदी मनापासून लिहीलंय.
अगदी मनापासून लिहीलंय.
मस्त लिहिलं आहेस. अगदी वाचता
मस्त लिहिलं आहेस. अगदी वाचता वाचता मी पण तुझ्यासोबत जगून घेतलं. आवडलं.
आवडले.
आवडले.
किती प्रामाणिक आणी अगदी आतुन
किती प्रामाणिक आणी अगदी आतुन उतरलेलं आहे म्हणुनच खुप भावलं लिखाण!
<<मनात आता मात्र विचारांचा कल्लोळ झाला.... अपघात होताना भिती वाटत नाही, पण "आपण वाचलोय सुखरूप" या विचाराने कधीकधी बसलेला धक्का फार जास्त असतो... तसं झालं माझं...
काय विचार करून काल निघालो? काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं? काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले? काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता? कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला? तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता? जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं? कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून? कुठून बळ आलं म्हणून "जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर..." असं म्हणायला जीभ रेटली माझी?<< परमोच्च!!!
<<मी खरंच दोन दिवस "जगून" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं! इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी<< अतिशय आवडलं.
मस्त!! हा भाग छान झालाय.
मस्त!!
हा भाग छान झालाय. मधली मधली साखरपेरणी जमून आली आहे. हत्तीच्या पिल्लांचं वाचताना
झालं.
जमलं तर आधीचा भागही पुन्हा एकदा एकसलग लिहून काढशील का?
मंजूडी, प्रयत्न करीन
मंजूडी, प्रयत्न करीन नक्की.
कदाचित सगळाच बदलेन तो भाग.... पण आता परीक्षा आहे त्यामुळे बहुतेक पुढच्या आठवड्यातच...
प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार!
अप्रतिम प्रज्ञा
अप्रतिम प्रज्ञा
दोन्ही भाग मस्त जमलेत.
दोन्ही भाग मस्त जमलेत.
<<चुळूकभर जिवाला आनंद व्हायला
<<चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं!>>
क्य बात है. जीवाचं चुळुकभर पाणी म्हणजे नक्की किती ते असं आयुष्याचं रहाटगाडगं सोडून तहानलाडू-भूकलाडू करीत वणवणल्याशिवाय ध्यानीच ये ना.
खूप छान लिहिलयस. मीही अगदी तुझ्यासवेच जगून घेतलं म्हण.
दोनही भाग आवडले. शिवथरघळ आणि
दोनही भाग आवडले. शिवथरघळ आणि रायगड दोनही ठिकाणी यापूर्वी एकदाच गेलोय. पुन्हा एकदा जाण्याची इछ्छा झाली तुमच्या लेखांनी. "अनुभूती" हे शीर्षक एकदम समर्पक.
खूप सुरेख
खूप सुरेख
आवडला
आवडला
किती प्रामाणिक आणि अगदी आतून
किती प्रामाणिक आणि अगदी आतून उतरलेलं आहे म्हणूनच खूप भावलं लिखाण! >>>+१११११
खुप सुरेख लिहिलेय.. आवडले.
खुप सुरेख लिहिलेय.. आवडले.
मस्त . अगदी मनापासून
मस्त . अगदी मनापासून लिहीलयं.