दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397
भटकंतीमध्ये सह्याद्रीमधल्या नैसर्गिक शिवलिंगास - दुर्ग लिंगाण्यास - अर्धी प्रदक्षिणा घडली होती. आता दुस-या दिवशी ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी शाळेजवळचा मुक्काम आवरून आम्ही कूच केलं.
घाटमाथ्यावरच्या सिंगापूर गावाजवळची ‘सिंगापूर नाळे’ ची वाट ट्रेकर्समध्ये सुपरिचित असली, तरी हा अगदी धोपटमार्ग नक्कीच नाही. म्हणूनच ‘सिंगापूर नाळे’नं उतरण्यासाठी तांबडफूटी होण्याआधीच निघणं गरजेचं होतं. सिंगापूर अगदी सह्यधारेवर नसल्यानं, पहाटे नाळेच्या अचूक वाटेवर लावून देण्यासाठी सिंगापूर गावातले मांढरेमामा सांगाती होते. गावात विहिरीपाशी कळश्या – हंड्यांची लगबग. इटुकल्या पोरी गाई-गुरं घेऊन रानात निघालेल्या. पहाटेच्या मंद प्रकाशात समोर लिंगाण्याचा गवताळ खडकाळ माथा हळूहळू उजळू लागला होता.
गावाकडून पश्चिमेला एक वाट मंद उताराच्या दांडावरून साधारणत: अर्ध्या-पाऊण तासात एका ओढ्याच्या पात्रापाशी विसावली.
एक विलक्षण निसर्गदृश्य अनुभवायला मिळत होतं - ओढ्यात रेंगाळलेलं पाणी, अजूनही डोंगरमाथ्यापाशीचं झटापट खेळणारी सूर्यकिरणं, सह्याद्रीचे कोकणात कोसळलेले कडे,
उजवीकडे माथ्यावर येऊ पाहणारा रायलिंग डोंगर आणि लिंगाणा, दरीपल्याडचा रायगड,
हवेत सुखद गारवा दाटलेला अन सोबत पक्ष्यांची किलबिल. सिंगापूर नाळेच्या वाटेवरचा आल्हाददायक माहोल पूरेपूर अनुभवला...
मांढरेमामांना इथंच निरोप दिला. आता पुढच्या अर्ध्या तासाच्या वाटचालीमध्ये सिंगापूर नाळेचा थरारक भाग आहे. सिंगापूर गाव सोडल्यावर आता पहिल्यांदाच थेट खोलवर कोकण दिसू लागले. सुरुवातीलाच कातळावरची उतरंड आहे. पाठपिशव्या सांभाळत उतरण्याची डोंबारकसरत केली.
दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्यकड्याचं अन रानव्याचं वैभव डोळ्यांत साठवत, आम्ही खोल दरीच्या काठानं झपाझप वळसा घालत निघालो.
घसा-यातून उभ्या कातळाच्या टप्प्यांमधून उतरताना दृष्टीभय आहे, पण वाट अवघड नाही. त्यामुळे हृदयाची धडधड वाढायच्या आत हा टप्पा पार केला.
उजवीकडे समोर रायलिंग टोक आणि लिंगाणा आभाळात घुसल्यासारखे भासत होते.
अखेरीस ‘सिंगापूर नाळे’मध्ये पोहोचलो.
पुढची वाट नाळेतनं - म्हणजे ओढ्यातनं - न काढता हुषारीनं उभ्या दांडावरून उतरवलीये. लिंगाण्याच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या सोंडेला समांतर पण उतरंडीवरून कोकणातल्या दापोली गावाकडे उतरणा-या दांडावरून वाट उतरत गेली.
सिंगापूरचा वहाळ आडवा आला, आणि मोकळवनातून मागे वळून पाहिलं तर लिंगाणा-रायलिंग टोक-बोराटा नाळ-सिंगापूर नाळ अश्या ‘पॅनोरमा’ दृष्यानं अंगावर सुखद शहारा आला. सह्याद्रीचा नजारा डोळ्यांत अन कॅमे-यात साठवत, अनुभवत कितीतरी वेळ आम्ही बसून राहिलो.
सिंगापूर गावातनं कोकणातल्या पायथ्याच्या ‘दापोली’ गावात पोहोचायला तीन तास लागले होते.
गावातल्या नदीपाशी एक मामा भेटले. अस्सल कोकणी पद्धतीनं चौकसपणे ‘कोण गाव, काय नाव, कुठं चाललात’ वगैरे चौकशीसत्र पार पडलं, आणि मग त्यांनी अनपेक्षितरित्या आयुष्याबद्दल संदेश वगैरे द्यायला सुरुवात केली, ‘‘त्या थोर शिवरायांसारखं तुम्हीपण मोठ्ठं नाव काढा, उत्तुंग काम करा की लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे. खूप कष्ट करा. पोराबाळांची काळजी घ्या...’’ वगैरे वगैरे . अचानक मूल्यशिक्षणाच्या व्याख्यानाची गम्मत वाटलीच. खरंच एका डोंगरयात्रेत किती किती प्रकारची माणसं भेटतात, कसे अनुभवसंपन्न करून जातात, असं वाटून गेलं...
काळ नदीच्या पात्रात रायगडाचं प्रतिबिंब विलक्षण दिसत होतं. रायगडाची उंची डोळ्यांत मावत नव्हती, पायथ्यापासून माथ्यापर्यंतचं रान अन कातळ केवळ अफाट आहे.
शेताडीतून, नदीच्या पात्राजवळून, चढ उतारावरून, तळपणा-या उन्हांतून दीड तास चालल्यावर ‘पाने’ गावापाशी लिंगाणा प्रदक्षिणेची सांगता केली. लिंगाण्याच्या दृशानं परत एकदा खुळावलो. अशक्य रौद्र वैभव!
पुढं काळ नदीच्या पात्रातल्या ‘वाळणकोंड’ या निसर्गातल्या चमत्काराला आणि भोळ्या भाविकांच्या श्रद्धास्थानाला भेट द्यायला पोहोचलो.
वरदायिनी देवीचा हा डोह म्हणून इथल्या डोहामधल्या माशांना अभय आहे. लोखंडी पूलावरुन पल्याड कातळावर वरदायिनी देवीच्या राऊळापाशी पोहोचलो.
पूजारी बुवांनी विशिष्ट पद्धतीनं आवाज काढत, डोहामध्ये अन्न टाकल्यावर मोठाल्या आकाराचे अक्षरश: शेकडो मासे गोळा झाले अन अन्नावर तुटून पडले. सगळंच विलक्षण!
काळ नदीच्या खळाळत्या पाण्यात निवांत पाय सोडून बसल्यावर, चौफेर होतं रायगड-लिंगाण्याच्या रांगांचं विराट दृष्य!
डोळ्यांसमोर येत होते डोंगरयात्रेतले सारे सारे क्षण, भेटलेली माणसं...पाय दुखले, ओझ्यानं खांदे ठणकले, उन्हानं चेहरा रापला, पण रायगडाची एक अनोखी ओळख झाली होती. इथली दुर्गमता, इथला रानवा, माणसांमधली माणूसकी अश्शीच टिकून राहावी,...रायगडाच्या शक्तिपीठातून भारावलेल्या अन ध्येयवेड्या मावळ्यांची सेना निर्माण व्हावी,...विकासाबरोबरच इथला निसर्ग टिकून राहावा. जुन्या घाटवाटा, किल्ले यांच्यावर वावर राहावा,...आपल्या सारख्या भटक्यांना ताकदीचे अनुभव देणा-या सह्याद्रीची भुरळ अशीच पडत राहावी असं साकडंच वरदायिनी देवीला घातलं...खरं सांगू, वरदायिनी देवीनं खरोखरंच पावावं अन या सा-या इच्छा पू-या कराव्यात असं मनापासनं वाटतं!!!
- Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)
एक जबरदस्त आणि थरारक प्र.ची.
एक जबरदस्त आणि थरारक प्र.ची. अनुभव... आपल्या या धाडसाला त्रिवार मुजरा ..
वाह.. छान प्रवास वर्णन आणी
वाह.. छान प्रवास वर्णन आणी प्रचि.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिंगाणा किल्ल्याबद्दल काही
लिंगाणा किल्ल्याबद्दल काही माहिती आणि प्र.ची. मिळेल का?
जबरदस्त वर्णन . शेवटच्या
जबरदस्त वर्णन .
शेवटच्या ओळी तर कातीलच
फारच सुरेख लेखन. शेवटच्या ओळी
फारच सुरेख लेखन.
शेवटच्या ओळी तर कातीलच >>>> अग्दी अग्दी...
या मोहिमेतील सर्व मावळ्यांना सलाम, सलाम....
मस्तच वर्णन. सिंगापूर नाळेतून
मस्तच वर्णन. सिंगापूर नाळेतून रायगड गाठायची इच्छा केव्हा पूर्ण होईल याची वाट पहातेय.
जबरदस्त !!! हा पण भाग आवडला..
जबरदस्त !!! हा पण भाग आवडला.. छान लिहीलेस नि मस्त फोटोज !
वरदायिनी देवीनं खरोखरंच
वरदायिनी देवीनं खरोखरंच पावावं अन या सा-या इच्छा पू-या कराव्यात असं मनापासनं वाटतं!!! > +१
अप्रतिम अनुभव... आणि प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरदायनीच्या प्रचि बद्दल आभारी आहे.
सिंगापूर नाळेतून दिसणारा रायगडचा भवानी टोक ते टकमकचा दुर्मिळ भाग फारच सुंदर!
सुंदरच फोटो. काळ नदीला भरपूर
सुंदरच फोटो. काळ नदीला भरपूर पाणी असते ना ?. तशीच बघितलीय !
वाळणकोंड, म्हणजे काय ?
अप्रतिम डोंगरयात्रा आणि
अप्रतिम डोंगरयात्रा आणि वर्णनदेखील. मस्त वाटलं!!
कोंड म्हणजे डोह. वाळणकोंडाच्या वर रानवडीच्या अलिकडे गुळंबवाडीला पाडळकोंड आहे. तिथे पेशवेकालीन विहीर व शिलालेखही आहे.
व्वा खुपच सुंदर ...
व्वा खुपच सुंदर ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सह्याद्रीचा हा परिसर भारी आवडला.
आपल्या या धाडसाला त्रिवार
आपल्या या धाडसाला त्रिवार मुजराअप्रतिम डोंगरयात्रा आणि वर्णनदेखील. मस्त वाटलं!
@vinayakparanjpe: खूप छान
@vinayakparanjpe: खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून.. धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिंगाणा दुर्गाबद्दल माझ्याकडे first hand माहिती नाहीये...
@वर्षू नील: आभारी आहे...
@वर्षू नील:
आभारी आहे... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@संदीप पांगारे आणि @पुरंदरे शशांक: प्रतिक्रियेनं खूप बरं वाटलं, कारण मला माहिती आहे की ही दाद केलेल्या लिखाणापेक्षा आपल्या सगळ्यांनाच वाटणा-या सह्याद्री प्रेमाकरता आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@आऊटडोअर्स: सिंगापूर नाळेचा
@आऊटडोअर्स: सिंगापूर नाळेचा ट्रेक थोडा निवांत, पण अवश्य करावा. रायगडाचा परिसर शिवतेजानं भारलेला आहे, याची प्रचीती नक्की येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@Yo.Rocks, @रोहित ..एक मावळा आणि @हेम: दर्दी ट्रेकर्सना लेख आवडला, की खूप खूप आनंद वाटतो! खूप धन्यवाद!
@इंद्रधनुष्य: ‘रायगड कोकणात ढाण्या वाघासारखा लपून बसलाय’ हे कुठे तरी वाचलेलं असतं.. हे दुर्गमत्व खरं समजतं अश्या भटकंतीतूनच! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@दिनेशदा: काळ नदीच्या खडकाळ पात्रातला एक मोठ्ठा डोह/ रांजणखळगे, म्हणजे वाळणकोंड. वरदायिनीच्या कृपेनं अभय असणारे मोठ्ठाले मासे अन् ट्रेकर्सना वेड लावणारा रायगड अन् सह्याद्रीचा पॅनोरमा दृश्य ही वैशिष्ट्य! प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
@shekharkul: प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
_/\_ खुप छान वर्णन .. वाचताना
_/\_ खुप छान वर्णन .. वाचताना असं वाटतंय की मी सुद्धा तुमच्याबरोबर जाऊन आलोय तिथे.
वाळणकुंड खरंच मस्त आहे पहायला. सिंगापुर नाळ कशी आहे उतरायला? म्हणजे दोराविना उतरता येऊ शकते का?
@विजय वसवे: _/\_ प्रतिक्रिया
@विजय वसवे: _/\_![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिक्रिया वाचून छान वाटलं..
सिंगापूर नाळेत कातळउतार/ घसारा अवघड नाहीत. दोराची आवश्यकता नाही. पण पावसाळा टाळलेला बरा. अग्गदी अवश्य पायदळी तुडवावी, अशी सुंदर घाटवाट आहे.