मेंदी - लहानपणापासूनच लागलेलं एक वेड. सोलापूरला असताना लहानपणी फक्त नागपंचमीला मेंदीच्या झाडाची पानं तोडून वाटून तिचा लगदा करुन हातावर गोळे लावले जायचे. नंतर पावडर आणून, पंच्यातून चाळून, सगळे सोपस्कार करून पेस्ट तयार होऊ लागली. मग ती चांगली रंगावी म्हणून प्रचंड प्रयोग!! चिंच उकळून त्या पाण्यात, चहाच्या पाण्यात, भेंडी भिजवून त्या चिकट पाण्यात, निलगिरीचे थेंब, लिंबाचा रस वगैरे घालून भिजवणं, (चिमणीची शी वगैरे अघोरी प्रकार पण फार इमानेइतबारे करण्याचा प्रयत्न झाला पण अनेक पाखरं येणार्या अंगणात नेमकी ती ओळखायची कशी आणि ती उचलणार कोण यावर एकमत कधीच झालं नाही.) काडेपेटीच्या काडीने, उदबत्तीच्या काडीने सावकाश तासनतास मनासारखी नक्षी येईपर्यंत प्रयत्न करत राहणं, (चिडणं, रुसणं, फुगणं तर सोबत असायचंच) असं करत करत कोनापर्यंत प्रवास झाला. मग ७वी-८वी नंतर हळुहळू मेंदी कशी भिजवायची, कोन कसा करायचा, कसा धरायचा, अलगद मेंदी कशी रेखायची, निरनिराळे आकार कसे साधायचे हे सारं सरावाने जमत गेलं. कळत नकळत त्यात गुंतत गेले आणि एक छंदच लागला. कधीही मेंदी काढायची म्हणलं की माझा नंबर पहिला - आपल्या हातावर काढून घेण्यासाठी आणि नंतर नंतर मैत्रिणींच्या हातावर काढण्यासाठी सुद्धा. हे वेड अजूनही तसंच आहे. सुदैवाने मुलीत सुद्धा ही आवड अशीच आलेली आहे. या छंदाचा इथे अमेरिकेत कधी उपयोग होईल अशी कल्पनाही आली नाही. पण प्रचंड हौस, त्यासाठी कष्ट करायची तयारी, आणि आवडीला पूरक वातावरण यामुळे एक योग जुळुन आला.
माझ्या मुलीच्या शाळेत दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा - हॉलीडे मार्केट भरते. १०-१२ वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या या जत्रेला विणकाम, भरतकाम, कुंभारकाम, चित्रकला अशा आवडी असणारे शिक्षक/शिक्षिका आपआपली कला शाळेच्या परिवारात सादर करत. मग या कलेतून काही अर्थार्जन करण्याचाही प्रयत्न असे. पण पुढे पुढे हा व्याप बराच वाढला. आता शाळेच्या जिममधे भरणार्या जत्रेची महिनोंमहिने तयारी चालते. स्थानिक कलाकार येतात. कलाकारी आणि खरेदी-विक्री बरोबरच खाण्यापिण्याची मजा, संगीत-नृत्याचा आविष्कार असतो. शेकडो लोक भेट देतात या मार्केट्ला. दीड दिवस हसतखेळत हा उत्सव चालतो. ही शाळा फ्रेंच आहे पण विद्यार्थी हे वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले आहेत. त्यामुळे मार्केटला एक ग्लोबल रुप आलेलं आहे. वैश्विक संस्कृतीला पूरक अशाच गोष्टी इथे सादर केल्या जातात. कलेवर प्रेम करणारे लोक धर्म, भाषा, वर्ण असे अडसर दूर करून दोन दिवस एकमेकांबरोबर आनंदाने घालवतात. यातून शाळेसाठी थोडाफार निधी उभा राहतो आणि शाळेच्या परिवारात एक मैत्रीची भावना वाढीस लागते.
तर नमनाला हंडाभर तेल पुरे झालं.... यावर्षी मी या जत्रेत शाळेच्या पालक कमिटीतर्फे मेंदीचा स्टॉल मांडला होता. त्याचे हे काही फोटो. जबाबदारी घेण्यापूर्वी खूप काही विचार केला नव्हता खरंतर. पण जसजसा तो दिवस जवळ आला तशी तशी या शिवधनुष्याची जाणीव होऊ लागली. मी एक हौशी कलाकार. या जत्रेत किती लोक येतील, किती कोन लागतील, इतका वेळ बसून मेंदी काढणं जमेल ना, लोकांना आवडेल का?? असे एक ना दोन, अनेक प्रश्न सतावू लागले. पण काहीतरी छान करतोय या विचाराने आनंद पण वाटत होता. सोबत अजून एक हौशी पालक होती. पण तिने बर्याच वर्षात कोन हाती घेतला नव्हता म्हणून जरा साशंक होती. पण आता जसं जमेल तसं पुढे जायचं असा आमचा निर्णय होता. माझी लेक लुटुपुटीची मदत करण्यासाठी एका पायावर तयार होतीच. मग तिला गल्ला सांभाळायचे काम दिले. म्हणलं त्यानिमित्ताने जरा आकडेमोड करेल.
आणि तो दिवस उजाडला. आमचा मेंदी बूथ सजला. दिवाळीची थोडी आरास मांडून जरा वातावरण निर्मिती केली. आदल्या दिवशी माझ्या आणि मुलीच्या हातावर मेंदी काढून आम्हीच "मॉडेल" झालो होतो. मायबोलीकर दीपांजलीने तिच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे थोडा "होमवर्क" केला होता. त्याशिवाय दुसर्या कोणाच्या कलेचे फोटो न टाकता मी स्वतःच आधी काढलेल्या नक्षीचे फोटो सजावटीसाठी मांडले. काही नमुने रेफरन्ससाठी ठेवले होते. दीपांजलीच्या वेबसाईटवरून मेंदीची शास्त्रीय माहिती मिळाली. ती पण पालकांना वाचण्यासाठी ठेवली. धन्यवाद दीपांजली!!!
पोर्टलँड बर्यापैकी कॉस्मोपोलिटन आहे. त्यामुळे मेंदी म्हणजे काय हा प्रश्न नव्हता. तरी सुरुवातीला लोक लांबूनच बघत होते. मग हळूहळू खूप गर्दी वाढत गेली. आमची कलाकारी एकदम हिट्ट झाली आणि आम्ही बनलो "सेलिब्रिटी!!" खूप कौतुक झालं. कमाईपण अपेक्षेपेक्षा चांगली झाली. आलेला सगळा निधी आम्ही शाळेसाठी देणगी म्हणून दिला. प्रचंड कुतुहल, अनेक प्रश्न, मेंदीच्या इतर उपयोगाबद्दल शंका, ती भिजवताना घातलेली तेले, मेंदीचा वास - त्याबद्दल चांगले आणि वाईट मत, नक्षी झाल्यावर त्याबद्दल अभिप्राय, तिची घ्यायची काळजी, या आणि अशा संदर्भात गप्पा होत गेल्या. हसतखेळत २ दिवस कसे गेले हे समजलंच नाही. मार्केटच्या दुसर्यादिवशीदेखील अनेकांनी एक नवीन कला कळल्याबद्दल आभार व्यक्त केले. एका प्रकारे अगदी रुटीन झालेल्या आयुष्यात काहीतरी वेगळं आणि छान घडल्याची जाणीव झाली.
कुतुहलाने बघणारे ते चिमुकले डोळे, मैत्रिणीच्या हातावर नक्षी चालू असताना जवळ जावून केलेले बारीक निरीक्षण, "Mommy, can I get this tattoo? It looks so nice." असा आईकडे झालेला हट्ट, मग समोर ठेवलेल्या ४ डिझाईन्सपैकी कोणतं निवडावं हा पडलेला गहन प्रश्न, त्यानंतर हात धुवून माझ्यासमोर येऊन बसलेली चिमुकली मूर्ती, अगदी पहिल्यांदा मेंदी लावून घेताना काहीजणींना झालेल्या गुदगुल्या, पहिल्यावहिल्या मेंदीचा तो थंड स्पर्श, कधीही माहीत नसलेला घमघमता निलगिरीचा सुवास, कोनातून सलग येणार्या तारेने रेखलेल्या ओळी, एकेक वळण घेत घेत भरलेला छोटुसा तळवा, आणि नक्षी आवडल्यावर ओठावर फुललेलं निरागस हसू!!! ते हास्य माझ्या मनात साठत गेलं. एक अनुभव रंगत गेला. माझ्यातील छुप्या कलाकाराचे अनुभवविश्व समृद्ध करणारी घटना होती ही. मेंदी काढणं ही माझ्यासाठी एक ध्यानधारणा आहे. डोक्यात कलकलणारे विचार, काळज्या, मेंदी काढताना काही प्रमाणात नाहीश्या होऊन जातात. पण यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेली ही आराधना खूप समाधान देऊन गेली. कलेच्या माध्यमातून या चिमण्यांबरोबर आपण बांधले गेलो हा आनंद काही औरच होता. हा दरवळ असाच मनात रेंगाळत राहिल हे मात्र नक्की.
तळव्यावरची मेंदी, वळणावळणाने रचत गेली
मैत्रीच्या नव्या गजर्यात फुले बांधत गेली
गालावरचे गुलाब चित्रात रेखताना
आयुष्यातले काटे घेऊन गेली
तुला नि मला नव्या रंगात रंगवताना
आनंदाचा दरवळ पसरवत गेली
एका नव्या भावविश्वाची दारे उघडली
माझीच मला आज नव्याने ओळख झाली
प्रचि १ दिवाळीच्या निमित्ताने काढलेली नक्षी सजावटीसाठी वापरली होती.
प्रचि २ हा आमचा बूथ.
प्रचि ३ आमचा कॅशियर असिस्टंट.
प्रचि ४ सुरुवात झाली....
प्रचि ५ स्वारी खुशीत आहे.
प्रचि ६ नक्षीकामाचे काही नमुने.
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
मस्तच
मस्तच
मस्त अनुभव !
मस्त अनुभव !
मेंदी डिझाईन्स नी शब्दांकन
मेंदी डिझाईन्स नी शब्दांकन केवळ अप्रतिम! कविता नी त्या आधीचा पॅरॅ फारच सुंदर! पोर्टलॅंड, ओरेगॉन का? म्हणजे आमच्या जवळच की!
btw, एवढी मेंदी कुठून आणली?
अभिनंदन... अन.. शुभेच्छा...
अभिनंदन... अन.. शुभेच्छा...
छान लिहिलय. अनुभव कथन एकदम
छान लिहिलय. अनुभव कथन एकदम सुरेख.
मेंदीची डीझाईन्सपण छान आहेत... आवडली.
सुंदर अनुभवकथन ! खुलविते
सुंदर अनुभवकथन !
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान.. हे गाणे आठवले
वॉव, मस्त अनुभव ना? आता
वॉव, मस्त अनुभव ना? आता सुरुवात झाली आहे तर पुढे चालत रहा. शुभेच्छा!
Pages