......तोच त्या सद्गृहस्थांचेच पत्र मला माझ्या पत्त्यावर आले. मी ते सोबत आणले आहे व आता तुम्हाला वाचून दाखवते: ... इथून पुढे चालू -
"कॉपर बीचेस, विंचेस्टर जवळ
प्रिय मिस. हंटर,
श्रीमती स्टॉपर यांजकडून मला तुमचा पत्ता मिळाला. तुम्ही तुमच्या निर्णयाबाबत फेरविचार केलात का, हे जाणून घेण्यासाठी हा पत्रव्यवहार करत आहे. तुमचे वर्णन मी माझ्या बायकोला करून सांगितल्यापासून ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे व तुम्ही यावे म्हणून आतूर झाली आहे. आमच्या तर्हेवाईक वागण्यामुळे तुमचे जी काही गैरसोय होईल त्याची भरपाई म्हणून आम्ही तुम्हाला दरमहा तीस पाऊंड म्हणजेच वार्षिक एकशे वीस पाऊंड द्यायला तयार आहोत. त्यानेही पूर्ण भरपाई होणार नाहीच, ह्याची आम्हाला जाणीव आहे. माझ्या पत्नीला निळ्या रंगातील एक विशिष्ट छटा फार पसंत आहे व आमच्या घरात सकाळी वावरताना तुम्ही त्या रंगछटेचा पेहराव करावा अशी तिची इच्छा आहे. परंतु तुम्ही असा पेहराव स्वतः खरेदी करण्याची आवश्यकता नाही. कारण माझ्या मुलीचा - अॅलिसचा (जी आता फिलाडेल्फिया मध्ये असते) - तसा एक झगा आमच्याकडे आधीच आहे आणि मला वाटते तो तुम्हाला अगदी बरोबर बसेल. त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या आज्ञेनुसार सांगितलेल्या ठिकाणी बसणे किंवा इतर आमचे मनोरंजन करण्यासाठी आमच्या काही आज्ञा पाळणे इ. ने तुमची गैरसोय होणार नाही अशी अपेक्षा करतो. तुमच्या केसांबाबतीत म्हणाल तर मला हे नक्कीच मान्य करावे लागेल की ते खरोखरच सौंदर्याचा नमुना आहेत. आपल्या काहीच मिनिटांच्या छोट्याश्या मुलाखतीतही मला हे जाणवून गेले. पण तरीही केस कापून कमी करण्याच्या माझ्या मुद्द्यावर मला ठाम रहावेच लागेल. त्याची भरपाई म्हणून मी तुम्हाला जो वाढीव पगार देऊ करत आहे, त्याने तुम्ही समाधानी व्हाल अशी आशा! लहान मुलाला सांभाळण्याबाबतीतली तुमची कर्तव्ये जास्त असणार नाहीत. आता मी आशा करतो की तुम्ही ही नोकरी स्वीकाराल. मी तुमची विंचेस्टर स्थानकाबाहेर डॉगकार्ट मध्ये वाट पाहीन. कृपया तुम्ही ज्या आगगाडी ने याल तिची वेळ मला कळविणे.
तुमचा विश्वासू
जेफ्रो रुकास्टल"
"हे ते मला आलेले पत्र आहे, मी. होम्स आणि मी जवळपास हे निश्चित केले आहे की मला ही संधी स्वीकारायची आहे. तरीही शेवटचे पाऊल उचलण्यापूर्वी एकदा ही केस तुमच्यासमोर ठेवावी व तुमचे ह्यावर मत घ्यावे असे मला वाटले."
"तुमच्या मनाने जर का संधी स्वीकारायचे ठरवलेच आहे तर मग प्रश्न तिथेच सुटला, मिस. हंटर," होम्स गालातल्या गालात हसत म्हणाला.
"पण तुम्ही मला ही संधी नाकारायला सांगणार नाही?"
"मी हे मान्य केले पाहिजे की माझ्या सख्ख्या बहिणीला अशी संधी चालून आली असती तर तिने ती स्वीकारू नये असाच सल्ला मी दिला असता."
"तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय, मि. होम्स?"
"आह्! माझ्याकडे काहीच तपशील नाहीत. तेव्हा मी काहीच सांगू शकत नाही. कदाचित तुम्हीच तुमच्या मनाने काही अंदाज लावले असतील!"
"मला वाटते एकच शक्यता आहे. मि. रुकास्टल हे एक सदहृदयी आणि दयाळू मनुष्य वाटतात. त्यांची पत्नी कदाचित मनोरुग्ण असावी व तिला मनोरुग्णालयात धाडण्याची त्यांची इच्छा नसावी. त्यामुळे तिच्या प्रत्येक वेडगळपणाला ते हसण्यावारी नेत असावेत जेणेकरून तिचा तोल ढळायला नको."
"तशी शक्यता असू शकते. वास्तविक जितके तपशील आपल्यासमोर आहेत त्यावरून तरी ही एकच शक्यता असल्याचे निदर्शनास येतेय. असे काहीही असले तरी एका तरुण स्त्री साठी ती जागा राहण्यास योग्य आहे असे वाटत नाही."
"पण पैसा, मि. होम्स, पैसा!"
"खरे आहे. कामाच्या मानाने पगार खरंच खूप चांगला आहे. आणि त्यामुळेच मी अस्वस्थ झालो आहे. त्यांना चाळीस पाऊंड मध्येही हे काम करणारी आया मिळू शकत असतानाही त्यांनी तुम्हाला एकशे वीस पाऊंड का द्यावेत? ह्यामागे नक्कीच काहीतरी भक्कम कारण असले पाहिजे."
"मी असा विचार केला की ह्या सर्व घटना मी तुम्हाला आधीच सांगून ठेवल्या तर तुम्हाला कदाचित पुढे मला तुमची गरज लागू शकेल की नाही हे समजेल आणि नंतरही तुम्ही कायम माझ्या मदतीसाठी तत्पर आहात ह्या भावनेने मला उभारी येईल."
"तुम्ही नक्कीच ह्या भावनेसह तुमच्या कामावर रुजू होऊ शकता. तुमची ही छोटीशी केस नक्कीच रंजक असणार आहे, ह्याची मला खात्री पटली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी अश्या रंजक केसवर काम केलेले नाही. ह्या कथेतल्या काही बाबी अतिशय विलक्षण आहेत. जर का तुम्हाला कधीही शंका आली किंवा धोका आहे असे वाटले..."
"धोका? तुम्हाला ह्यात माझ्या जीवाला कुठेही धोका आहे असे वाटते?"
"जर का आपण तसे पुराव्यानिशी पटवू शकलो तरच धोका आहे असे विधान करता येईल," होम्स त्याचे डोके जोरजोरात हलवत उद्गारला, "तसेही कुठल्याही क्षणी - दिवसा किंवा रात्री - तुमच्याकडून आलेली एक तार मला तुमच्या मदतीसाठी तिथे आणेल."
"तितके पुरेसे आहे, " असे म्हणून ती स्त्री हलकेच तिच्या बसल्या जागेवरून उठली. तिच्या चेहर्यावर आता उत्सुकता पसरली होती,"आता मी हँपशायरला नि:संकोचपणे जाईन. मी लगेचच मि. रुकास्टल ह्यांना पत्र पाठवते. आजच रात्री हे लांब केस कापून उद्या मी विंचेस्टर साठीचा प्रवास सुरू करेन."
होम्स चे आभार मानून आणि आम्हा दोघांना शुभरात्री च्या शुभेच्छा देऊन ती स्त्री आपल्या घरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
"मला वाटते स्वतःच स्वतःची काळजी घेऊ शकण्याइतकी ही मुलगी हुशार आणि धाडसी आहे," पायर्या भराभर उतरताना होणार्या तिच्या दमदार पावलांचा आवाज ऐकत मी म्हणालो.
"आणि तिला तसे असावेच लागेल," शून्यात दृष्टी लावत होम्स म्हणाला,"अजून काही दिवसांतच तिचे बोलावणे मला आले नाही तर मला आश्चर्य वाटेल."
आणि खरोखरंच काही दिवसांतच होम्स चा अंदाज खरा ठरला. ह्या घटनेला पंधरवडा उलटला होता आणि बर्याचदा माझे मनात तिचे विचार येत असत. मानवी अनुभवांच्या अश्या कोणत्या विचित्र गर्तेत ह्या एकट्या स्त्रीने स्वतःला झोकून घेतले होते, ह्याचे मला आश्चर्य वाटत असे. गरजेपेक्षा जास्त पगार, विचित्र अटी, पगाराच्या मानाने काम कमी - ह्या सर्व गोष्टी फारच विचित्र गोष्ट सूचित करत होत्या. एक तर तर्हेवाईकपणा किंवा रचलेला सापळा. तो मनुष्य एक तर खरोखरंच परोपकारी होता किंवा खलनायक तरी होता. पण माझ्या मनाचा कुठल्याही बाजूने कौल लागत नव्हता. मी गेला अर्धा तास होम्स ला कपाळावर आठ्यांचे जाळे आणि चेहर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन बसलेला पाहिले होते. पण मी विचारताच त्याने हात हवेत उडवून झटकल्यासारखे केले.
"तपशील, मित्रा, तपशील!" तो उतावीळपणे म्हणाला,"मी तपशीलांशिवाय कुठल्याच निष्कर्षाला येऊ शकत नाही. माती असल्याशिवाय विटा कधी बनतात का?"
एका रात्री उशीरा जेव्हा मी झोपायला जाण्याच्या तयारीत होतो आणि होम्स त्याच्या रासायनिक पदार्थांच्या अभ्यासाला हात घालणार होता, तेव्हा आम्हाला एक तार मिळाली. (होम्स बर्याचदा रात्री जागून हा रसायनांच्या अभ्यासाचा उद्योग करत असे. मी रात्री झोपायला जाण्यापूर्वी त्याला रसायने ठेवलेल्या भांड्यात नाक खुपसून बसलेला पाहत असे आणि सकाळ होऊन मी माझे आवरून सकाळच्या न्याहारीसाठी त्याला हाक मारायला यायचो तरीही तो त्याच स्थितीत उभा किंवा बसलेला दिसे.) त्याने लागलीच त्या तारेचे पिवळे पाकीट फोडून तारेतला मजकूर वाचला आणि तो कागद माझ्या दिशेने भिरकावला.
"लागलीच वेळापत्रकात पाहून योग्य आगगाडी शोध," इतकेच बोलून तो त्याच्या रसायनांकडे वळला.
तारेतला मजकूर अतिशय मोजका व तातडीचा होता.
"उद्या दुपारी विंचेस्टर मधील ब्लॅक स्वान हॉटेलात या. नक्की या! माझी बुद्धी चालेनाशी झाली आहे - हंटर"
इतकाच मजकूर तारेत होता.
"तू माझ्यासोबत येणार आहेस का?' होम्स ने वरती पाहत विचारले.
"मला असे वाटते की होय!"
"तर मग आगगाडी शोध."
"एक आगगाडी सकाळी ९:३० वाजता आहे," मी वेळापत्रकात पाहात उद्गारलो, "जी विंचेस्टरला साडे अकरा वाजता पोहोचते."
"तर मग तीच आपल्याला योग्य ठरेल. आता ह्या रसायनांना मी जरा बाजुला ठेवतो. कारण उद्यासाठी आपल्याला जरा तयारी करावी लागेल."
दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजता आम्ही विंचेस्टर कडे जणार्या आगगाडीत होतो. प्रवास सुरु झाल्यापासूनच सकाळच्या वृत्तपत्रांमध्ये होम्स डोके खुपसून बसला होता. पण हँपशायरच्या हद्दीत शिरताच वर्तमानपत्रे खाली ठेवून त्याने बाहेरील नजार्याचा आस्वाद घेणे सुरू केले. तो वसंत ऋतुतील एक आदर्श दिवस होता. फिकट निळ्या रंगाचे आकाश! पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे सफेद ढगांचे पुंजके त्या आकाशात विहरत होते. सूर्य उजळपणे तळपत असला तरीही हवेत सुखद बोचरी थंडी होती. आल्डरशॉट शहराभोवती पसरलेल्या टेकड्या, त्यावरील हिरवळीमधून मध्येच डोकावणारी लालसर - करड्या रंगाच्या छतांची शेतातली घरे! अहाहा! किती सुंदर नजारा होता.
"किती प्रसन्न आणि सुंदर नाही?" बेकर स्ट्रीवरील धुक्याने कुंद झालेल्या घरातून बाहेर पडून ह्या मोकळ्या हवेत आलेलो मी खूपच उल्हसित झालो होतो.
पण होम्स ने गंभीरपणे डोके हलवले.
"तुला माहीत आहे का वॉटसन?" तो म्हणाला, "माझ्यासारखी वाकडी बुद्धी लाभलेल्या माणसाला मिळालेला हा शाप आहे की प्रत्येक गोष्ट मला माझ्या अभ्यासाच्या विषयाशी निगडीत चष्म्यातूनच पहायची सवय लागली आहे. ह्या विरळ संख्येने पसरलेल्या घरांचे सौंदर्य तुला भुरळ पाडते. पण मी त्यांच्याकडे बघतो आणि माझ्या मनात येणारा एकमेव विचार म्हणजे - त्यांचे एकमेकांपासून असलेले अंतर आणि त्यामुळे कुठचाही दंड होण्याची भीती न बाळगता इथे करता येऊ शकणारे गुन्हे!"
"अरे देवा!" मी ओरडलो,"इतक्या सुंदर घरांचा संबंध कोण गुन्हेगारीशी लावू शकेल?"
"अशी घरे माझ्या मनात कायमच भीती उत्पन्न करत आली आहेत. इथल्या खेडेगावाकडच्या सुंदर व हसर्या दिसणार्या घरांत जितके भयानक गुन्हे घडतात तितके लंडनच्या कमी लोकवस्तीच्या भागांतही घडत नाहीत व अश्या गुन्ह्यांचा आकडाही भयंकर आहे."
"आता मी खरंच घाबरलोय!"
"त्याला कारणही तसेच आहे. शहरांमध्ये कायद्यापेक्षा जनमताच्या रेट्यामुळे कामे अधिक यशस्वी होतात. शहरांमध्ये एकही गल्ली इतकी निर्दयी नसेल की जिथे एका पीडित बालकाचा आक्रोश किंवा एका मद्यपीने केलेल्या मारहाणीचा आवाज ऐकूनही सहानुभूती मिळणार नाही. शेजार्या-पाजार्यांमध्ये अश्या घटनेमुळे असंतोष पसरला की सबंध न्याययंत्रणेला कामाला लागावे लागते. फक्त एक तक्रार सुद्धा न्यायव्यवस्थेला कामाला लावण्यात हातभार लावू शकते. अश्या ठिकाणी गुन्हा आणि त्याची न्यायव्यवस्थेकडे नोंद ह्या घटनांमध्ये फक्त एकच पावलाचे अंतर असते. पण इथल्या विजनवासातील घरांकडे पहा. प्रत्येक घर आपापल्या शेताच्या मधोमध. त्यात राहणारेही तितकेच अलिप्त आणि कायद्याच्या बाबतीत बिचारे अडाणी! अश्या घरांमध्ये कुणालाही न कळता वर्षानुवर्षे क्रूर व अन्याय्य गोष्टी घडत राहू शकतात. ही बिचारी स्त्री विंचेस्टर मधील एका घरात नोकरीला असती तर मला काळजी वाटली नसते. विंचेस्टर पासून त्या बंगलीचे हे जे पाच मैलांचे अंतर आहे ते मला धोकादायक वाटतेय. पण इतके नक्की की तिला व्यक्तिगतरीत्या धमकावण्यात आल्यासारखे वाटत नाही!"
"ज्या अर्थी ती आपल्याला भेटावयास विंचेस्टरला येऊ शकते त्या अर्थी तिला घराबाहेर पडण्याची मोकळीक असावी."
"असे दिसते खरे. तितके स्वातंत्र्य तिला असावे."
"तर मग काय समस्या असू शकेल? तुला काही अंदाज लावता येतोय का?"
"आपल्याकडे असलेल्या तपशीलांवरून मी सात शक्यता मांडल्या आहेत. परंतु त्यांपैकी कोणती शक्यता सत्यतेच्या जवळ जाणारी आहे हे आपल्याला आपल्या अशीलाकडून आता जो ताजा वृत्तांत कळेल त्यावर अवलंबून आहे."
ब्लॅक स्वान हे हाय स्ट्रीटवरील व स्थानकापासून अगदी जवळच असलेले एक नामवंत हॉटेल आहे. आत शिरताच आमच्यासाठी बसण्याची जागा अडवून बसलेल्या मिस. हंटरला आम्ही पाहिले. आमच्यासाठी जेवणाची ताटे मेजावर वाट पाहत होती.
"तुम्ही आल्याबद्दल मी तुमची आभारी आहे," ती विनयाने म्हणाली, "तुम्हा दोघांचे खरेच खूप उपकार आहेत. पण मला खरेच समजेनासे झाले होते की मी नक्की काय करायला हवे. तुमचा सल्ला माझ्यासाठी नक्कीच मोलाचा आहे."
"तुमच्या बाबतीत जे काही घडले ते आता कृपया तुम्ही आम्हाला सांगा" - होम्स.
क्रमशः
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ३
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ४
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ५ (अंतिम)
छान जमलाय.
छान जमलाय.
मस्त गं... पुढचा भाग कधी?
मस्त गं... पुढचा भाग कधी? अगदी ओघावत्या भाषेत अनुवाद करतियेस..
वा. सह्ही.. फटाफट लिहीतेस ग.
वा. सह्ही.. फटाफट लिहीतेस ग. उत्सुकता निर्माण झालीये
छान झालाय हा भाग. श्रीयुत
छान झालाय हा भाग.
श्रीयुत होम्स, कुमारी हंटर पेक्षा मि. होम्स, मिस हंटर सोपं/छान वाटतयं वाचताना
अरे वा.. निंबे..मस्तच गं छान
अरे वा.. निंबे..मस्तच गं छान ओघवती शैलीत लिहिलंयस ..
मस्तच. पुढचा भाग लवकर टाका.
मस्तच.
पुढचा भाग लवकर टाका.
निंबे, इतक्या भराभर भाग
निंबे, इतक्या भराभर भाग टाकतेयस. तुला १००० मोदक
आता समस्त शॅरेलॉक मराठीत आलाच पाहीजे.
अनुवाद म्हणुन याकडे दुर्लक्ष
अनुवाद म्हणुन याकडे दुर्लक्ष करत होतो ... पण मनापासुन सांगतोय .. मस्त जमलेत दोन्ही भाग ... पुढचा लवकर येऊ दे
वाव.. खुप खुप मस्त आहे
वाव.. खुप खुप मस्त आहे अनुवाद.. पुढचा भाग लवकर टाक ना.
समस्त शॅरेलॉक >>> वेड लागेल
समस्त शॅरेलॉक >>>
वेड लागेल मला
निवडक रंजक कथा अनुवादण्याचा प्रयत्न जरूर करेन.
प्रतिसाद देऊन हुरूप वाढविल्याबद्दल परत एकदा सर्वांना धन्यवाद!
वेड लागेल मला >>>> वेड वगैरे
वेड लागेल मला >>>> वेड वगैरे काही लागत नाही, मात्र निरीक्षणातून निस्कर्ष मात्र काढायला लागशील, मग टेप, भिंग वगैरे....
छानच लिहिते आहेस.. आधीच्या
छानच लिहिते आहेस.. आधीच्या लिंक्स पण शिरोभागी दे ना, उघडून वाचता येतील..
उत्सुकता ताणुन राहीली
उत्सुकता ताणुन राहीली आहे.
पटापट टायपा प्लिझ.
बायो हाईस कुठे? लवकर टाक
बायो हाईस कुठे? लवकर टाक पुढचे भाग. एका दिवशी २पण चालतील.
शेवटाची उत्सुलता आहे.......
शेवटाची उत्सुलता आहे.......
शहरांमध्ये कायद्यापेक्षा
शहरांमध्ये कायद्यापेक्षा जनमताच्या रेट्यामुळे कामे अधिक यशस्वी होतात... >>>
हा परिच्छेद वाचताना दिल्ली बलात्कार प्रकरणाचा संदर्भ आठवला. छोट्या छोट्या गावांमधे असे अनेक गुन्हे होतात जे तिथेच दफन केले जातात
बाकी अनुवाद सुंदर चालू आहे धन्स!!!