पोपट झाला रे ...

Submitted by मामी on 5 December, 2012 - 11:37

दोनेक महिन्यांपूर्वीची गोष्ट. रविवारच्या निवांत दुपारी शाकाहारी जेवण जितपत अंगावर येईल तितपत आलेलं. मला होत असलेली झोपेची तीव्र इच्छा निग्रहाने नाकारून लेकीच्या अभ्यासाला बसण्याकरता मिनतवार्‍या करत होते. अर्थात 'असल्या प्रयत्नांना कसे टाळावे?' या विषयात पीएचडी केली असल्यामुळे ती नुसतीच इथे तिथे वेळकाढूपणा करत होती.

अचानक माझ्या बाल्कनीला आवाज फुटला. टीटीव्....टीटीव... (याचं मराठी भाषांतर विठू विठू असं करतात.)

माझ्या बाल्कनीला वेगवेगळे आवाज फुटतात. त्यातला घुट्टरघूं आवाज अतिशय वैतागवाणा असतो. आणि तो सदोदित येत असतो. कावळेदादा कधीमधीच येतात.

एखाद्या सुदिनी चीं...... चीं..... अशी तीव्र स्वरातली आरोळी आली की समजायचं बाल्कनीबाहेर हवेत भलेमोठे पंख पसरून विहरणार्‍या घारीनं आज माझी बाल्कनी विश्रांतीस्थान म्हणून निवडली आहे. तो सोहळा बघण्यासारखा असतो. काय ती नजर, काय त्या नख्या, काय तो रूबाब!!! इतक्या जवळच्या दर्शनानं केवळ धन्य धन्य होतं. मग हळूच लपतछपत जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करायचा. मध्ये फ्रेंचविंडोची काच असते. या काचेतून बाहेरचं दिसतं पण बाहेरच्याला केवळ आरसाच दिसतो. पण हे आपल्यासारख्या माणसांना. घारीला (बहुधा) या काचेतूनही हालचाल जाणवते. जरा जास्त जवळीक साधली जातेय हे कळताक्षणी झटकन घूमजाव करून पंख फडफडवून झेप घेते ती. किती देखणं दृष्य....

पण त्यादिवशीचा हा आवाज बाल्कनीतून पहिल्यांदाच येत होता. शेजारीच बांधलेल्या बिल्डिंगच्या गच्चीतून मागचे दोनतीन दिवस मी हा आवाज ऐकत होते. आवाजाच्या रोखानं पाहिलं तर दोन्-तीन सुळकन उडणारे रेशमी हिरवे जुडगे दिसले होते. पण हा आवाज अगदी जवळून आला की....

धावत गेस्टरूमच्या बाल्कनीत जाऊन पाहिलं तर कुंडीतल्या (कधीही न फुलणार्‍या) अनंताच्या झाडावर पोपट महाशय बसले होते. आनंदाची आरोळी न ठोकता लगोलग मागे गेले आणि घरातल्या उर्वरीत सदस्यांना घेऊन आले. अप्रुपाची घटना! लेक, नवराही खुश झाले. मग लग्गेच कॅमेरा शोधला आणि फोटोसेशन सुरू झालं. आधी लांबून, मग जरा जवळ, मग आणखी जवळ. काच बंद होती आणि पोपट नेमका आमच्याकडे पाठ करून बसलेला. त्यामुळे बरंच जवळ जाता आलं. मध्येच पोपटाने थोडे पंख उभारले. मी लगेच त्याच्या झेपेचं रेकॉर्डिंग करावं म्हणून व्हिडिओ सुरू करून ठेवला. कसचं काय. पोपटभाऊ बसूनच राहिलेले.

दिसला का? सगळ्यात उजवीकडच्या झाडावर बसलाय तो. नाही दिसला? आता बघा बरं जवळून...

निरीक्षण करून आणि गळ्यावर पुसट हिरव्याच रंगाचा पट्टा दिसत होता त्यावरून मी निष्कर्ष काढला की हे पिल्लु आहे. आमच्या घरी असल्या ज्ञानाच्या बाबतीत मी वासरात लंगडी गाय असल्याने त्यावर इतर दोन सदस्यांनी निमुटपणे मुंडी डोलावली. आणि मग एका चित्तथरारक नाट्याला प्रारंभ झाला.

लेकीच्या मनात अचानक त्या पोपटाला खाऊ घालण्याचा विचार प्रबळ झाला. धावत जाऊन तिनं स्वैपाकघरात पेरू आहेत का ते पाहिलं. नव्हते. मग फ्रीजमधून तिनं दोन तीन हिरव्या मिरच्या आणल्या त्यांचे तुकडे केले, दुसर्‍या टोकाकडून काचेचा दरवाजा हळूSSSच उघडला आणि ते मिरच्यांचे तुकडे पोपटाला कळतील आणि दिसतील अशा हेतूने टाकायचे म्हणून त्याच्या जवळ टाकले.

तर नेमका त्यातला एक तुकडा त्याच्या अंगाला लागून खाली पडला. आता जोरात काही लागलं तर एखाद्या सभ्य पक्ष्यासारखं लग्गेच उडून जायला हवं की नाही? पण पोपटानं फक्त जराजरासं अंग थरथरवलं आणि तसाच बसून राहिला.

आता हे जरा काळजीचंच प्रकरण झालं की. का बरं उडाला नसेल तो? कुठे दुखापत तर झाली नसेल ना? पिल्लु आहे बिचारं. आईबाबा हरवले की काय? नुकतंच उडायला लागलंय वाटतं. दमून बसलंय का? आता काय करावं बाई????? तेवढ्यात अजून एक भयानक शक्यता मनात डोकावली. हे बिचारं दुखावलंय म्हणून उडू शकत नाही. जर का हे पिल्लू घारीच्या नजरेस पडलं तर नक्कीच येईल त्याच्यावर हल्ला करायला ...... बापरे!

काय करावं? माझ्यासकट आमच्या घरात कोणी पक्ष्याला हात लावणार्‍यातलं नव्हतं. त्यातून त्याला कसं हाताळायचं, काय करायचं, दुखापत झाली असेल तर कशी काळजी घ्यायची तेच कळेना.

घाईघाईनं मी नेटवर आले आणि मुंबईतले प्राणीमित्र, बर्ड रेस्क्यु असा काहीतरी सर्च मारला. एक बर्‍यापैकी लिस्ट सापडली. त्यात काही व्यक्तींचे फोन नंबर्स होते, काही संस्थांची नावं होती ... हातात खजिना आल्याचा आनंद झाला. आता एक-दोन फोन केले की कोणी पक्ष्यांचा तारणहार येऊन पोपटाला घेऊन जाणार, त्यावर औषधोपचार करणार आणि मग त्याला छानपैकी उडता आलं की आकाशाकडे सोडून देणार... बाई, बाई, बाई मी कित्ती पुण्य साठवणार आज! पण दैव माझ्याकडे बघून खदखदा हासत होतं हे मला काय माहित?

पहिला फोन लावला. उचलला पण गेला :
मी: हॅल्लो, मी अमुकतमुक. आमच्याकडे बाल्कनीत पोपट येऊन बसलाय कधीचा.
प्राणीमित्र१ : कधीपासून?
मी : झाला असेल अर्धा-पाऊण तास. तो उडायलाच बघत नाहीये. मला वाटतं त्याला लागलंय. तुम्ही प्लीज येऊन त्याला घेऊन जाल का?
प्राणीमित्र१ : तुम्ही कुठे राहता?
मी: अमुकतमुक इथे.
प्राणीमित्र१ : तो माझा एरीया नाही. मी फक्त घाटकोपर पर्यंतच काम करतो.
मी: (प्राणीमित्रांचाही एरीया असतो ही बातमी पहिल्यांदाच कळल्याने आवाक!) मग काय करू?
प्राणीमित्र१ : मी हा नंबर देतो. तिथे फोन करा.

लागला नाही. पुन्हा प्राणीमित्र१ ला फोन करून आणखी एका कोणाचा नंबर मिळवला. त्याचाही एरीया हा नव्हता. पण त्यानं आमच्या एरीयात असलेल्या अ‍ॅनिमल हॉस्पिटलचा नंबर दिला. मला आशेचा मोठ्ठा किरणझोतच दिसला. (मध्येच जाऊन पोपट बाल्कनीतच आहे ना याची खात्री करून घेतली. होता तिथेच होता त्या पोझमध्ये बसलेला). हॉस्पिटलातला फोन बरेचदा वाजला, पण कोणी उचलला नाही.

मग आता मी सगळ्या नंबरांना फोन करायचं ठरवलं. आणि प्रत्येक नंबर झाल्यावर एकदा हॉस्पिटलचा नंबर फिरवायचा असंही ठरवलं. आता मी त्या पोपटाला माहेरी पाठवल्यावाचून राहणारच नव्हते.

मग फोनची एक जंगी मालिका सुरू झाली. कोणी रविवारी बाहेर पडण्यास तयार नव्हतं, हॉस्पिटल: बिझी, (पोपट बाल्कनीतच आहे ना याची खात्री करून घेतली. होता तिथेच होता त्या पोझमध्ये बसलेला), कोणी कामानिमित्त आधीच बाहेर होतं, हॉस्पिटल : वाजत राहिला, (पोपट बाल्कनीतच आहे ना याची खात्री करून घेतली. होता तिथेच होता त्या पोझमध्ये बसलेला), कोणाचा एरिया हा नव्हता. (पोपट बाल्कनीतच आहे ना याची खात्री करून घेतली. होता तिथेच होता त्या पोझमध्ये बसलेला)

प्रत्येकाला तीच तीच कहाणी सांगून मला गरगरायला लागलं.

हॉस्पिटल : वाजतोय, .... हां हां थांबा, हॉस्पिटल: चक्क उचलला.

मी : मी अमुकतमुक. तुमच्या जवळच्याच एरीयात आहे. आमच्याकडे ............
सगळं चर्‍हाट नव्यानं सांगून झाल्यावर तिथला बाबू म्हणाला...
बाबू : पण आमच्याकडे असं घेऊन जायला कोणी नाही.
मी : हे बघा, मला बर्‍याच लोकांकडून तुमचा पत्ता मिळालाय कोणीतरी असेल ना? एक पक्षी तर घेऊन जायचाय. वेळीच उपचार झाले पाहिजेत.
बाबू : तुम्हीच घेऊन या ना.
मी : एकतर मला पक्ष्यांना हात लावायला भिती वाटते. आणि मी कशी आणू? कशातून आणू?
बाबू : आमच्याकडे गाडी नाय.
मी: अहो, मी टॅक्सीचे पैसे देते. पण कोणाला तरी पिंजरा घेऊन पाठवा अन या पोपटाला घेऊन जा.
बाबू : पण आम्ही गाडीतूनच घेऊन जातो.
मी : मग आहे की तुमच्याकडे गाडी.
बाबू : हो, गाड्या तीन आहेत.
मी : मग काय प्रॉब्लेम आहे?
बाबू : पण त्या गाड्या गायी आणायला गेल्यात.

हसावं की रडावं कळेना.

हॉस्पिटलवर माझी खूप भिस्त होती. ते ही असं फुसकं निघालं. या सगळ्या फोनाफोनीत जवळजवळ तास-दीडतास गेला होता. हे सगळे प्राणीमित्र कधीतरी एकत्र भेटतच असतील. त्यांच्या पुढच्या भेटीत 'एका रविवारी एका संवेदनशील स्त्रीनं एका पोपटाला वाचवण्याकरता केलेली पराकोटीची धडपड' या विषयावर नक्की चर्चा होणार याची खूणगाठ मी मनाशी बांधली.

मग आता काय ऑप्शन उपलब्ध आहे बरं????

'लढाईत तलवार, भाला, जांबिया, धनुष्यबाण, गदा अशी थोरथोर हत्यारं वापरून तुटल्यावर आपल्या नखांवर अवलंबून रहावे' ही चिनी म्हण कामी आली. मी इंटरकॉमवरून खाली सिक्युरिटीला फोन लावला.

'जरा हाऊसकिपींगवाल्यांना पाठवा ... ' पुढे पोपटपंची वाचली.

दोन मिनिटात दोन पठ्ठे हजर. मी एकाच्या हातात एक प्लॅस्टिकची छोटी डबी पाण्यानं भरून दिली. 'बराच वेळ झालाय. पोपटाला बिचार्‍याला तहान लागली असेल. तर आधी पाणी दे रे त्याला आणि मग पकड.' तो ही पाणी घेऊन दुसर्‍या बाजूने हलक्या पावलाने बाल्कनीत उतरला. पोपट जागच्याजागी. अजून जवळ गेला. पोपट तिथेच. अजून जवळ गेला. पोपटाने मान हलवली आणि पाय जागच्याजागी हलवले. अजून जवळ गेला आणि ......

श्री. पोपटराव हिरवे शांतपणे पंख पसरून सुमडीत आकाशात उडते झाले.

उपोदघात : रात्री झोपताना मनाशी एकच विचार होता. बरं झालं कोणी प्राणीमित्रं, हॉस्पिटलवाले आले नाहीत ते. घात झाला असता! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोपटा पोपटा हुप्प, तुझ्या शेपटीला .... च्यामारी, कायतरी घोटाळा झाला काय या वाक्यात ? Wink

मामे, मज्जाय तुमची रोज नवीन पाहुणे, ते ही न रहाणारे. Happy

फोनायचत की मला.... हा का ना का

लेखन ललितात हालवा. आधीच विनोदी लेखन म्हंटल्यावर लोक जरा 'कसेसेच' होऊन वाचतात. त्यातून या चांगल्या अनुभवाची महाराष्ट्र साहित्य परिषद कशाला करताय? सर्व फोटो मस्त. अनुभवही मस्तच! घरही मस्त, म्हणजे टेरेस वरून जे जाणवले ते!

अमितशी सहमत!

माहिती व लेख आवडला Happy

लय भारी पोपट झाला की हो तुमचा!!! अभिनंदन.
पण खरंच ते प्राणीमित्र यायला हवे होते ना................ म्हणजे हा पठ्ठ्या उडून जायच्या आधी हो!! Wink

धन्यवाद, सर्वच.

@ बेफी, धन्यवाद. आपल्या सुचनेप्रमाणे लेख ललितलेखनात हलवला आहे.

मस्तच गा मामे.. Rofl किती ते चुटचुटीत वर्णन... मेड माय डे...!!!!!!!!!!!!

पोपटाची नैच्चे .. ही तर मामीपंची.. लय भारी ,खुसखुशीत!!!!! Happy

पण त्या गाड्या गायी आणायला गेल्यात. Rofl

मामी.. एक सुचना... हे असे करण्याआधी पक्ष्याजवळ जरासे जाण्याचा प्रयत्न करायचा. त्याला जर ईजा झाली असेल आणि ऊदता येत नसेल तर तो चलत / धडपडत बाजूला सरकायचा प्रयत्न करतो. ह्यावरून आपल्याला बरेचसे कळते की काय होतयं ते. Happy बरेचदा पोपट तत्सम पक्षी घारींपासून तात्पुरते लपण्यासाठी असा आधार घेतात. Happy

तुम्ही घेतलेल्या प्रयासासाठी मात्र अभिनंदन... Happy

छानच ललित !
वरून दिसणारं काँक्रीटचं जंगल बघून पोपट बिचारा सुन्न झाला असावा ! घार तर म्हणूनच तिकडे पाठ करून घरातली दिलासा देणारी हिरवळ बघत बसलीय !!! Wink

Pages