सध्या चाळीशीत किंवा पन्नाशीत असलेल्या पिढीला निरुपमा प्रधान या भारताच्या एक प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू होत्या हे कदाचित आठवत असेल. काही अपवाद वगळता (खासकरून क्रिकेट) आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेले आपले खेळाडू नंतर काय करतात, कुठे जातात याबद्दल आपल्याला फारसे ठाऊक नसते. त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण विशेष प्रयत्नही करत नाही. या अनुषंगाने ‘आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.’ हे पुस्तक म्हणजे निरुपमा प्रधान यांनी बॅडमिंटन कारकीर्दीला निरोप दिल्यानंतरच्या त्यांच्या आयुष्याचा दीर्घ असा लेखाजोखा म्हणता येईल, जो त्यांनी स्वतःच्या शब्दांमधे वाचकांसमोर मांडलेला आहे.
शीर्षकावरून सूचित होते, त्यानुसार जर्मनीतील तीस-पस्तीस वर्षांच्या वास्तव्याचे हे अनुभवकथन आहे.
अतुल सोनाळकर यांच्याशी लग्न करून १९६८ साली निरुपमा प्रधान यांनी जर्मनीत (तेव्हाचा पश्चिम जर्मनी) पाऊल ठेवले. जास्तीत जास्त दीड ते दोन वर्षे तिथे रहायचे आहे या तयारीने त्या तिथे गेल्या होत्या. पण त्यांचे तिथले वास्तव्य वाढत गेले आणि पुढील पस्तीस वर्षे त्या तिथल्या मातीत जणू रुजूनच गेल्या. त्यांचा संसार, दोन्ही मुलांचे जन्म, त्यांची शिक्षणे हे सर्व तिथेच झाले. मुले मोठी होत असतानाच अगदी योगायोगाने त्यांचा आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायात शिरकाव झाला. आधीची बॅडमिंटनची कारकीर्द, तसेच नंतरची गृहिणी म्हणून असलेली आपली भूमिका त्यांनी जितक्या समरसतेने निभावली, तितकीच ही नवीन व्यवसायाची जबाबदारीही मोठ्या समर्थपणे त्यांनी आपल्या खांद्यावर पेलली. या सर्व कालखंडाचे अगदी विस्तृत वर्णन पुस्तकात वाचायला मिळते. ते वाचताना निरुपमा यांच्या अंगची धडाडी वाचकाला पदोपदी जाणवत राहते. तोच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अतिशय महत्त्वाचा पैलू होता, आहे हे लक्षात येते.
दुसरा ठळकपणे जाणवणारा मुद्दा म्हणजे त्यांचा लोकसंग्रह. अर्थात पर्यटनव्यवसाय चालवायचा म्हणजे लोकसंग्रह हा हवाच. पण त्यांच्या बाबतीत असे म्हणावेसे वाटते, की व्यवसायामुळे त्यांचा लोकसंग्रह वाढीस लागला असे नव्हे, तर त्यांच्या लोकसंग्रहामुळे त्यांचा व्यवसायही वृध्दिंगत झाला.
त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला अंगभूतच असावी. कारण जर्मनीत गेल्यागेल्या लगेचच त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला तो तिथल्या स्थानिकांमधे लवकरात लवकर मिसळता यावे यासाठी. ल्युनेबुर्ग या गावी स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्यापुढे सर्वप्रथम भाषेची समस्या उभी राहिली. त्या काळात मोबाईल फोन, इंटरनेट यांसारख्या कुठल्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. भारतातून पत्रे यायलाही बरेच दिवस जात. अशा वेळी (श्री. कुमार केतकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे) सासर-देशातच नवे माहेर निर्माण करणे आवश्यक होते आणि त्यासाठी अत्यावश्यक होते तेथील भाषा शिकून घेणे. त्यामुळे, शेजारीपाजारी, गावातील झालेल्या इतर जुजबी ओळखी, मुलांच्या शाळाशिक्षिका अशा सर्वांच्या मदतीने धडपडत, ठेचकाळत त्यांचे जर्मन भाषाशिक्षण सुरू झाले. रोजच्या व्यवहारातून कानावर पडणारे शब्द, वाक्ये त्या आत्मसात करत गेल्या आणि बघताबघता त्यांनी जर्मन बोलीभाषेवर, संभाषणकलेवर प्रभुत्त्व मिळवले. पुस्तकातील हा त्यांचा प्रवास आवर्जून वाचण्यासारखा आहे. ज्या वातावरणात त्या राहत होत्या, जर्मन भाषा आणि तेथील रीतीरिवाज शिकत होत्या, त्या अनुषंगाने तेथील कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सणवार साजर्या करण्याच्या पध्दती, स्थानिकांची दिनचर्या, विरंगुळ्याची साधने या सर्व घटकांबद्दल त्यांनी अगदी भरभरून लिहिले आहे, तो काळ त्यांनी तिथे कशा प्रकारे काढला असेल, भाषा येत नसतानाचे सुरूवातीचे त्यांचे मुके-बहिरेपण हळूहळू कसे लोप पावले असेल, त्यांचे कुटुंबीय तिथल्या समाजात कसे विरघळून गेले असतील याचे चित्रदर्शी वर्णन केले आहे.
विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, या वाटचालीदरम्यान त्यांनी आपले भारतीयपण, मराठीपण कधीही सोडले नाही. साडी ही स्वतःची सर्वसाधारण वेषभूषा त्यांना कधीही त्यागावीशी वाटली नाही. सुरूवाती-सुरूवातीला सार्वजनिक ठिकाणी माणसे त्यांच्याकडे, त्यांच्या वेषभूषेकडे वळून वळून पाहत. पण त्याबद्दल त्यांनी कधीही कमीपणा वाटून घेतला नाही.
तिथे रुळण्याच्या सुरूवातीच्या वर्षांमधे त्यांचे बॅडमिंटन-प्राविण्यही त्यांच्या मदतीला आले. फावल्या वेळात गावातल्या मुलांना त्याचे प्रशिक्षण देण्यास त्यांनी सुरूवात केली. त्यामुळे त्यांचा लोकसंग्रह वाढत गेला. तिथल्या स्थानिक मित्रपरिवारात मिसळताना, त्यांच्यासोबत नाताळ आणि अन्य सण साजरे करताना त्यांनी त्यांना आपल्या सणांची, विविध खाद्यपदार्थांची अगदी अभिमानाने ओळख करून दिली. (त्यांच्या एका जर्मन मैत्रिणीने एका वर्षी नाताळात घरी आलेल्या पाहुण्यांना संपूर्ण मराठी पध्दतीचा स्वयंपाक करून खाऊ घातल्याचा एका ठिकाणी उल्लेख आहे.) त्यातूनच ‘कुकरी क्लास’ घेण्याचा प्रस्तावही त्यांनी स्वीकारला; राहत्या ठिकाणापासून, गावापासून लांब दुसर्या गावात जाऊन अठ्ठावीस वर्षे तो क्लास चालवला.
एकीकडे बॅडमिंटनच्या वर्ल्ड-मास्टर्समधेही त्या भाग घेत होत्या. अनेक पदके मिळवत होत्या.
या सर्वांतून त्यांचा धडपड्या स्वभाव आणि सतत नवीन काहीतरी करत, शिकत राहण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसून येते. ही वृत्ती आणि सार्वजनिक ठिकाणी असलेला त्यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर यामुळेच त्यांचा पर्यटनव्यवसायात शिरकाव झाला. जर्मन नागरिकांना भारतात फिरवून आणणे या एकाच उद्दीष्टाने त्यांनी ‘मयूर इंडिया ट्रॅव्हल्स’ ही संस्था स्थापन केली. दोन-अडीच दशके आपल्या संस्थेद्वारे अनेक जर्मन आणि ऑस्ट्रियन नागरिकांना भारतवार्या घडवल्या.
त्यांच्या या सहलींची वर्णने, त्यासाठी त्यांनी केलेली तयारी, नियोजन, सहलींदरम्यानचे बरे-वाईट अनुभव यांनी पुस्तकाचा जवळपास अर्धा भाग व्यापलेला आहे. खरेतर हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. हा मजकूर म्हणजे ‘जर्मनीतील तीन तपांचा अनुभव’ या उपशीर्षकासोबत अपेक्षित असलेला असा खचितच नव्हे. पण हा त्यांच्या आयुष्यसंचिताचा अतिशय महत्त्वाचा भाग असल्याने त्यांनी त्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. किंबहुना, पुस्तकाच्या उत्तरार्धात पर्यटन व्यवसायाचे अनुभव लिहिणे हेच पुस्तकाचे प्रमुख उद्दीष्ट आहे की काय असे वाटायला लागते. तसे असायला हरकत काहीच नाही; पण मग पुस्तकाचे शीर्षक त्यानुसार दिले असते तर बरे झाले असते असे वाटते.
जर्मनीच्या एकीकरणाबद्दलचे, ‘बर्लिन वॉल’ जमीनदोस्त होण्याच्या काळाचे वर्णन एका प्रकरणात वाचायला मिळते. एकंदर पुस्तकाच्या तुलनेत ते त्रोटकच म्हणावे लागेल. पूर्व आणि पश्चिम जर्मन संस्कृतीतील तुलना, एकीकरणानंतर दैनंदिन जीवनात पडलेला फरक, संबंधित अनुभव यांवर अधिक प्रकाश टाकला जायला हवा होता असे वाटते.
तरीही, वयाची पंचविशी ते साठी या काळात लेखिकेने अनुभवलेल्या तीन जर्मन पिढ्या, त्यादरम्यान विविध स्तरांवर झालेली तिथल्या समाजसंस्कृतीची ओळख यांचा बोली भाषेतील हा पसरट आढावा एकदा वाचून पाहण्याजोगा आहे.
**********
आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.
लेखिका - निरुपमा प्रधान-सोनाळकर.
ग्रंथाली. पृष्ठे २६५. मूल्य ३०० रुपये.
पुस्तक इंटरेस्टींग वाटतय.
पुस्तक इंटरेस्टींग वाटतय. ६०/७० च्या दशकात अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये स्थाईक झालेल्यांचे अनुभव वाचलेले / ऐकलेले आहेत. पण हे वेगळ्या देशाबद्दल आहे. नक्की वाचेन! तू परिचय पण छान लिहिला आहेस.
सोन्याच्या धुराचे ठसके नंतर हे.. सध्या साधारण परदेशस्थ भारतीयांची पुस्तके वाचते आहेस का ?
इंटरेस्टींग वाटतय.
इंटरेस्टींग वाटतय.
लेखिका जर्मनीत कुठे असतात
लेखिका जर्मनीत कुठे असतात त्याचा उल्लेख आहे का?
पुस्तक वाचायला आवडेल, पूर्वीचे जर्मनी आणि आत्ताचे जर्मनी ह्यांचा तौलनिक अभ्यास करायला मजा येईल
मस्त परिचय लले, नक्की आवडेल
मस्त परिचय लले, नक्की आवडेल वाचायला
परिचय आवडला!
परिचय आवडला!
वा, सुरेख पुस्तक परिचय करुन
वा, सुरेख पुस्तक परिचय करुन दिलाय....
चांगला परिचय.
चांगला परिचय.
नेहमीप्रमाणे उत्तम परिचय!
नेहमीप्रमाणे उत्तम परिचय! उत्सुकता चाळवली गेलीये!
-गा.पै.
चांगली ओळख. वाचायला आवडेल.
चांगली ओळख. वाचायला आवडेल.
परिचय वाचून पुस्तक वाचावेसे
परिचय वाचून पुस्तक वाचावेसे वाटू लागलेले आहे.
धन्यवाद मंडळी. संपदा, लेखिका
धन्यवाद मंडळी.
संपदा, लेखिका आता पुण्यात स्थायिक झालेल्या आहेत. त्यांची मुले मात्र अजूनही जर्मनीत असतात. त्यांचा जावई जर्मन आहे.
पूर्वीचे जर्मनी आणि आत्ताचे जर्मनी ह्यांचा तौलनिक अभ्यास >>> इण्टरेस्टिंग! यासाठी तुला पुस्तकात भरपूर खाद्य सापडेल.
(एकीकरणानंतरच्या पूर्व आणि पश्चिम जर्मनीबद्दलच्या निरिक्षणांतून केल्या गेलेल्या अभ्यासाची मला अपेक्षा होती. त्यासाठी मी अधाश्यासारखी पुस्तक वाचत गेले, पण शेवटी अपेक्षाभंगच झाला म्हणायचा माझा. लेखिकेची तिथल्या अनेक आजी-माजी राजकारण्यांशी आणि प्रशासकीय उच्चपदस्थांशी चांगली ओळख होती. त्यामुळे, माझ्या मते, she has played safe!)
धन्यवाद ललिता. आईला हे
धन्यवाद ललिता. आईला हे पुस्तक घेऊन ठेवायला सांगते
पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद,
पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद, लली!
थोडक्यात आणि सर्वसमावेशक परिचय आहे.