तुला दुरून पाहणे (तरही)

Submitted by आनंदयात्री on 12 October, 2012 - 06:00

तुझे दुरून लाजणे निमित्त वाटते मला
तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला

तुला जपावया कुणी जवळ कशास पाहिजे?
तुझ्यासभोवती तुझीच गस्त वाटते मला

मनातल्या मनात छान मोकळीक वाटते
घरातल्या घरात फार शिस्त वाटते मला

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/10/blog-post_12.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला

हे शेर आवडले. अलामतीत सूट घेतली आहे.. पण गझल आवडली.

बेस्ट तरही
अलामत खास आवडली माझ्या पद्धतीने मी ती 'अर्धी -अ ' अशी मोजली
एकापेक्षा एक सरस खयालही
खूप खूप आवडली रचना

धन्यवाद !!

आवडली गझलं Happy

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला

>>> हा शेर सर्वात जास्त आवडला.

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला<<< मस्त काँट्रा

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला <<< व्वा व्वा, खयाल आवडला, पण मला असेही वाटून गेले की सिकस्त या शब्दाचा अर्थ उध्वस्त झालेला, नष्ट झालेला असा काहीसा आहे की काय! (भटसाहेबांच्या एका शेरात आहे तो शब्द.) नक्की माहीत नाही, एकदा चेक करायला हवे मला. पण येथे शिकस्तचा जो शिक्षा असा काहीसा अर्थ घेतलेला आहे त्याने शेर उत्तमच.

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला<<<

विराण सावली. भयाण अंतरात. शेर फार आवडला.

धन्यवाद Happy

-'बेफिकीर'!

<<<तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला>>>

<<<तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?>>> हे दोन्ही शेर खासच आवडले Happy

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला>>> शेर चांगलाय, पण हा शेवटी आल्यामुळे गझल अपूर्ण राहिली असं वाटलं.

तुला जपावया कुणी जवळ कशास पाहिजे?
तुझ्यासभोवती तुझीच गस्त वाटते मला...हे अशक्य आवडलंय!!

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?... Happy

कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला, तुझ्या विराण सावलीत शब्दप्रयोग आवडले.

मतला,

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?

भन्नाट !

रच्याकने शिकस्त म्हणजे पराकाष्ठा ना?

-सुप्रिया.

तुला जपावया कुणी जवळ कशास पाहिजे?
तुझ्यासभोवती तुझीच गस्त वाटते मला

प्रचंड आवडलं हे.

शिकस्त म्हणजे उर्दूत 'पराभव',
.मराठीत आपण 'हद्द झाली ' अशा अर्थी हा शब्द वापरतो.. त्या द्विपदीचे अर्थ त्यामुळे बदलत रहातात..

शेवटही सखोल..

शिकस्त म्हणजे उर्दूत 'पराभव',>>>>>>>>>>>>>

मीही याच अर्थाने वापरला होता हा शब्द

नकोत भांडुया सखे पुन्हाकधी, नकोच ना !
उगाच व्ह्यायची तुझी शिकस्त वाटते मला

धन्यवाद !!

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला

मला ही हे ३ शेर खूप आवडले...

बाकी गझलही छान...

शुभेच्छा..

नचिकेतजी!
गझल आवडली!
आमची निरीक्षणे खालील प्रमाणे..............

१)शेर नंबर १.......... निमित्त म्हणजे बहाणा, कारण, प्रयोजन वगैरे. दुरून लाजणे..........खटकले. दुरून ऎवजी ‘उगाच’ असे हवे होते असे उगाचच वाटून गेले! ‘उगाच लाजणे तुझे, निमित्त वाटते मला!’..........असे करून पाहिले.

२) शेर नबर २
.....पहिली ओळ अजून जोरकस करता यावी! ‘बिशाद मीच काय, कोण छेड काढतो तुझी;’

३)शेर नंबर ३......दुसरी ओळ अजून प्रभावी करता यावी! ‘जपायला तुझी कठीण शिस्त वाटते मला!’

४)शेर नंबर ४...........सुंदर!

५)शेर नंबर ५ ........शिकस्त शब्दावर अजून चिंतन करायला हवे होते असे वाटून गेले.

अनोळखी अजून मी! परंतु लागलो रुळू......
रुळायची करेन मी शिकस्त वाटते मला!’

६)शेर नंबर ६.........‘‘कि’..........‘की’ असे हवे. तुझाच वाटतो तुला.....अभिव्यक्ती सुलभ वाटली नाही.

‘खरोखरी तुझाच जाहलो असेन काय मी?
असे घडेल?की, उगाच, फक्त वाटते मला!’

७)शेर नंबर ७........दोन्ही ओळी स्वतंत्ररित्या आवडल्या! शेर अजून मुलायम करता यावा.खयाल सुंदर!

‘तुझ्याच वळचणीस गारवा असेल वाटले!
तुझ्या परंतु सावलीत तप्त वाटते मला!!’

टीप: गझलेखाली, काय प्रतिसाद द्यावा, किंवा प्रतिसादाची कुठलीच आचारसंहिता वगैरे विषयक कोणतीही टीप दिलेली नसल्याने, जे प्रांजळपणे वाटले ते लिहिले! नचिकेतजी! आपली गझल सुंदर आहे. आम्हास जे जाणवले ते प्रांजळपणे लिहिले. मामला आपण दोघांमधला आहे!
तरीही आम्हास खात्री आहे, की काही टुकार व थिल्लर प्रतिप्रतिसाद यावर येतील. पण आम्ही त्यांना मोजत नाही! हां, खुद्द आपणासच आमचा प्रतिसाद नको असेल तर, कृपया तसे स्पष्टपणे सांगावे. म्हणजे आमच्या डायरीत वगळायच्या नावांमधे आम्हास नूतनीकरण करता येईल!

..................प्रा. सतीश देवपूरकर
.................................................................................................

शिकस्त म्हणजे काय?<<<<<<<<<<<
मूळ फारसी शब्द आहे शिकस्त्
हे जर विशेषण म्हणून वापरले तर त्याचा अर्थ होतो..........
......पराजित
..........भग्न, मोडके तोडके, मोडकळीस आलेले उदाहरणार्थ घर, विहीर इ.
.........कुचकामाचे, निरुपयोगी
स्त्री. शब्द......... अर्थ पराभव, दुर्दशा.
शिकस्त करणे म्हणजे कागद, तक्ता इत्यादींची घडी घालून चार रकाने पाडणे.
शिकस्त खाणे म्हणजे हार खाणे, पराभूत होणे.
शिकस्त फारसी स्त्री. शब्द....अर्थ.........कमाल, पराकाष्ठा.

आपण मराठी बोली भाषेत शिकस्त झाली, कमाल झाली किंवा हद्द झाली वा पराकाष्ठा झाली असे म्हणतो.

म्हणून नचिकेतजींच्या शिकस्तच्या शेरावरील ब-याच सखोल चिंतनानंतर, आम्ही खालील शेर लिहिला...........

अखेर हात टेकलेच! लाभला न सोबती!
खरोखरीच जाहली शिकस्त वाटते मला!!

टीप: आधी आम्ही दुसरी ओळ निश्चित केली .............
खरोखरीच जाहली शिकस्त वाटते मला!

मग पहिल्या ओळीचा विचार करू लागलो!

इथे पहिला मिसरा म्हणून खलील मिसरे लिहून पाहिले.........
१)म्हणून वाट चालतो अनोळखी बनून मी!

२)अनोळखी बनून एकटाच वाट चालतो!

३)अखेर एकटाच मी प्रवास लागलो करू!

४)अखेर हात टेकलेच! लाभला न सोबती!

वरील चार पर्यायातून शेवटचा म्हणजे चौथा पर्याय आम्ही शेराची दुसरी ओळ म्हणून कायम ठेवला व अखेरीस शेर असा मार्गी लावला..........

अखेर हात टेकलेच! लाभला न सोबती!
खरोखरीच जाहली शिकस्त वाटते मला!!

नचिकेतजींच्या मनातील भावभावनांना, मराठी व्याकरणाची कोणतीही चूक न करता व शिकस्त शब्दाला पुरेपूर न्याय देण्यासाठी हा शेर शेवटी वरीलप्रमाणे आम्ही आमच्या अल्पमतीनुसार फायनल केला.
आमची चिंतनप्रक्रियाही वर मुद्दाम दिलेली आहे.

नचिकेतजी! काही चुकीचे बोललो असल्यास आम्हास क्षमा करावी!
न रहावल्यामुळे हा आमचा लेखनप्रपंच!
वाचण्याची तसदी घेतल्याबद्दल आभारी आहोत!
थांबतो!
..........प्रा.सतीश देवपूरकर
..........................................................................................

सर्वांचे धन्यवाद! Happy

उदया, तिकडे वाचून इकडे लिहीण्याची सवय बरी नव्हे Wink

सुप्रिया, शिकस्त हा शब्द पराभव या अर्थी वापरला आहे.

सतीश देवपूरकर,
आपल्या प्रतिसादावर उत्तर द्यायची ही माझी पहिलीच वेळ. आपली प्रत्येक गझल मी वाचतो, आपले प्रतिसादही वाचतो. मुद्देसूद निष्कर्षापर्यंत पोचण्यापेक्षा स्वतःचीच जाहिरात करण्यासाठी केल्या जाण्यार्‍या दीर्घ चर्चा करण्यात मला रस नसतो आणि तेवढा वेळही नसतो.

प्रतिसादांमध्ये आपण चिंतनाबद्दल, गझलेबद्दल जेवढं तळमळीने, कळकळीने, ध्येयवादी-आदर्शवादी, पवित्र लिहिता त्याला साजेशी गझल आपण लिहिल्याचं मला तरी आठवत नाहीये. (एखाद-दुसरा अपवाद! पण तीस-पस्तीस वर्षांच्या अनुभवानंतर एखाद-दुसरी उत्तम गझल जमायलाच हवी!) आणि कुठल्याही कवी/लेखक/कलाकाराच्या सल्ल्या/विनंत्या/सुचवण्यांबद्दल मला आदर तेव्हाच वाटतो जेव्हा त्याच्या स्वतःच्या कलाकृतीमधून त्या मार्गदर्शनाला साजेसं प्रदर्शन बघायला मिळतं. आपली गझल त्या उंचीवर जात नाहीये. त्यामुळे आपल्या सुचवण्यांना माझी हरकत नसेलच, पण त्यावर माझ्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळायची शक्यता फार कमी आहे. (एखादाच अपवाद!) हे आपल्याला चालणार असेल तर खुशाल प्रतिसाद देऊ शकता.

आता वरील गझलेबद्दल. फक्त एकच शेर उदाहरणार्थ घेतो आहे.

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला

नचिकेतजींच्या मनातील भावभावनांना, मराठी व्याकरणाची कोणतीही चूक न करता व शिकस्त शब्दाला पुरेपूर न्याय देण्यासाठी हा शेर शेवटी खालीलप्रमाणे आम्ही आमच्या अल्पमतीनुसार फायनल केला.

अखेर हात टेकलेच! लाभला न सोबती!
खरोखरीच जाहली शिकस्त वाटते मला!!

सतीश देवपूरकर, मला शेरामध्ये जे म्हणायचंय त्याचा थोडातरी विचार केलात का? तुम्ही शेरामधून जो अर्थबदल करताय, तो का स्वीकारावा? आपण कवीला जे म्हणायचंय त्यालाच अनुसरून सुचवणी केल्याचे उदाहरण दुर्मिळ आहे! आणि हे एकच कारण आपल्या प्रतिसाद/सुचवण्यांबद्दल तिटकारा निर्माण करण्यास पुरेसे आहे!

आपण ज्या प्रकारे गझल चिंतन/लेखनाचे धडे देत आहात, त्याच प्रकारे भटसाहेबांनी आपल्याला गझल शिकवली का? शेवटी गझल ही काही गुरू करून शिकण्याची गोष्ट नाहीये! तंत्र शिकवता येईल एकवेळ, गझल ज्याची त्यालाच शोधावी लागेल ना? सध्याची मराठी गझल/गझलेमधले विषय/मांडण्याची पद्धत आपल्या काळातील गझलांपेक्षा खूप बदलले आहेत, यावर गांभीर्याने विचार कराल का?

मामला दोघांचा आहे म्हणताय, मग स्पष्टपणे सांगतो. जेव्हा तुमची स्वत:ची गझल तुमच्या प्रतिसादांच्या तोडीची मला वाटेल, तेव्हा आपली प्रत्येक सूचना गंभीरपणे घेईन! ही ओपन साईट आहे, त्यामुळे आपल्याला प्रतिसाद देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, मी ही नाही! Happy

प्रत्येक गोष्टीतून काही ना काही चांगलं शोधण्याची सवय असल्यामुळे, आपल्या प्रतिसादांमधूनही माझ्यापुरते काहीतरी चांगले शोधेनच!

धन्यवाद!

कावळ्याचा आनंद आणि आनन्दयात्री ह्यांचा उद्वेग समजू शकतो. माझ्यासारखे अनेक जण असावेत, जे समजू शकतील. ज्यांनी क्वचितच कुठल्या चर्चेत भाग घेतला पण झालेल्या चर्चा वाचल्या मात्र.

प्रोफेसर स्वतःचं हसू करून घेवोत की अजून काही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण ह्या मंचाचे मात्र हसे होत आहे, हे खरे आणि हा सामाजिक प्रश्न आहे.

मतस्वातंत्र्य आणि प्रतिसादस्वातंत्र्य ह्यावर निर्बंध घालणे चूकच आहे. पण जर अश्याप्रकारे प्रत्येक गझलेला अख्खी प्रतिगझल लिहिली जात असेल, तर ह्याची काय हमी आहे की सम्पूर्ण गझल लिहिल्यावर ती गझल स्वतःकडे नोंदवून ठेवली जात नसेल. आणि ती नंतर स्वतंत्रपणे सादर केली जात नसेल?

असे ना का! मी तर लिहित नाही. फक्त वाचत असतो. वाचत राहीन.. तुम्ही लिहित राहा.. सर्वांनाच शुभेच्छा व शुभाशिर्वाद !

ऋतुवेद, बर्‍याच दिवसांनी दर्शन? Happy

रसप, प्राजक्ता, अलामतीत सूट झालीये खरी.. अशी सूट घ्यायला मला स्वतःला आवडत नाही... क्या करे?

Pages