तुला दुरून पाहणे (तरही)

Submitted by आनंदयात्री on 12 October, 2012 - 06:00

तुझे दुरून लाजणे निमित्त वाटते मला
तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला

तुला जपावया कुणी जवळ कशास पाहिजे?
तुझ्यासभोवती तुझीच गस्त वाटते मला

मनातल्या मनात छान मोकळीक वाटते
घरातल्या घरात फार शिस्त वाटते मला

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/10/blog-post_12.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती खरे तर सूट नाही होत आहे अलामतीतील , तो अ‍ॅक्चुअली अकारान्त स्वरकाफिया होतोय Happy

तुझे दुरून लाजणे निमित्त वाटते मला - त्त
तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला - स्त

पण हे यात्रींना आधीच माहीत असल्याने त्यांनी ठरवून तसे केले असणार याची जाणीव आहे Happy

अलामतीतील सूट तेव्हा झाली असती जेव्हा:

प्रशस्त
व्यस्त
ग्रस्त
त्रस्त
मस्त
स्वस्त

या काफियांबरोबर 'शिस्त' हा काफिया घेतला गेला असता तर Happy

'त्त' आणि 'स्त' ही दोन अक्षरेच वेगळी आहेत

योग्य तो मुद्दा बेफिकीर ह्यांनी मांडला आहे अलामतीबद्दल.

त्त = त + त (पहिला त अर्धा समजावा - अर्धे अक्षर कसे काढायचे कुणी तरी सांगा)
स्त = स + त

योग्य तो मुद्दा बेफिकीर ह्यांनी मांडला आहे अलामतीबद्दल.<<<

फक्त मीच नाही.वैवकुंनी तो पहिल्याच प्रतिसादात मांडलेला होता, पण त्यांच्या शैलीमुळे कोणाचे तिकडे लक्ष गेलेले दिसत नाही.

हे त्यांचे वाक्यः

>>>अलामत खास आवडली माझ्या पद्धतीने मी ती 'अर्धी -अ ' अशी मोजली <<<

हो का? लक्षात नव्हते आले.

वैवकुच्या टारगटपणामुळे दुर्लक्ष झाले जणू..... Proud

बेफीजी धन्स !!

त्त टाईप करून बॅक्स्पेस केले की जसे त् होते तशी अर्धे-अ हे कसे टाईप करायचे याची सोय उपलब्ध नाहीये इथे ! .......यावर काही उपाय ??

आनंदयात्री,
सध्याची मराठी गझल/गझलेमधले विषय/मांडण्याची पद्धत आपल्या काळातील गझलांपेक्षा खूप बदलले आहेत<<<<<<<<<
सध्याची मराठी गझल, कालची मराठी गझल, परवाची मराठी गझल, उद्याची मराठी गझल...........हे कोणते गझलेचे वर्गीकरण बुवा?
या असल्या वर्गीकरणाला कोणता साहित्यिक आधार आहे?
काळ बदलला तरी मानवी भावभावना बदलतात काय?
गझलेला कुठला एक विषय असतो काय?
एका गझलेत जितके शेर, तितके विविध विषय असू शकतात.
अमुक काळात अमुक विषयावर गझल, असे काही आहे का?
अमुक विषयावर शेर लिहिले म्हणजे गझल प्रगत व तमुक विषयावर लिहिले की, मागास असे काही आहे का?
शेराचा विषय/आशय, शब्दनिवड, योजलेल्या प्रतिमा/प्रतिके, त्यांची गुंफण, वृत्ताची निवड, वृत्तावरची पकड, काफिया/रदीफ यांचे अंगचे सौंदर्य, लिखाणातील लालित्य, इत्यादी गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत, कालसापेक्ष नव्हेत!
लिहिणा-याची प्रज्ञा, प्रतिभा, मानसिक पातळीवरील जगणे, एकंदर झालेले साहित्यिक पोषण, शब्दांची जाण, अभिरुची, इत्यादी गोष्टींवर लिहिलेल्या शेराचा एकूण साहित्यिक व्यक्तीनिरपेक्ष दर्जा अवलंबून असतो.
प्रत्येक काळात सुमार/ब-या/बेताच्या/ठीकठाक/सुंदर/अलौकिक गझला लिहिणारे असतात. हा कोणत्याही काळाचा(काल/आज/उद्या/परवा) मक्ता नसतो.
शेवटी शब्द/प्रतिके/प्रतिमा इत्यादी फक्त साधने आहेत. शेर/गझल/काव्य हे लिहिणा-याच्या अतरंगात असते. कागदावर उतरवता उतरवाता तो/ती/ते कोणता आकार घेईल हे सर्वस्वी लिहिणा-याने केलेल्या चिंतनावर, त्याच्या निष्ठेवर,त्याने घेतलेल्या जीवनातील प्रामाणिक प्रत्ययांवर, त्याने दाखवलेल्या सबूरीवर अवलंबून असते.
ब-याचदा लिहिणारी व्यक्ती शेर/गझल/कविता पूर्ण करायला इतकी उतावीळ होते, की, कलाकृती सिझेरियन करून जन्मास घातली जाते. हे प्रगल्भ साहित्यिकांच्या एका क्षणात लक्षात येते.यामुळेच बहुधा शेर थोडक्यात हुकतो.
आमची अशी धारणा आहे, की आपणच आपल्या शेरांचा इस्लाह करायला शिकले पाहिजे!
सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्याला काय सांगायचे आहे, हे निश्चित असायला हवे.
जे काव्य हृदयात स्फुरले, ते तसेच्या तसे कागदावर उमटले काय? की, कुठे आपण बदमाशी केली आहे, याचा पाठपुरावा आपला आपणच करायला हवा.
जेव्हा खरेच हृदयातील काव्य जसेच्या तसे कागदावर उमटते, तेव्हा लिहिणा-याला त्या त्या शेरापुरती मुक्ती मिळते.
शब्दांवर/काफियांवर/रदीफांवर भाळून त्यांच्याकरता म्हणून कधीच कुठलाही शेर करायचा/रचायचा/लिहायचा नसतो!
काफियांची आपल्यावर हुकमत चालू न देता आपली काफियांवर हुकुमत चालायला हवी!
नंतर नंतर अशी सुद्धा अनुभूती येते की, काफिये आपल्यामागे धावत येतात.
कधी कधी काफियाच अख्खाच्या अख्खा शेर घेवून येतात.
काफियांसाठी शेर, किंवा धावाधाव करायलाच लागत नाही.
आम्ही अजून हयात आहोत, लिहिते आहोत, मग ही पिढी, हा काळ आमचा देखिल
नाही का?
थांबतो!
............प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

के.गो.
पण जर अश्याप्रकारे प्रत्येक गझलेला अख्खी प्रतिगझल लिहिली जात असेल, तर ह्याची काय हमी आहे की सम्पूर्ण गझल लिहिल्यावर ती गझल स्वतःकडे नोंदवून ठेवली जात नसेल. आणि ती नंतर स्वतंत्रपणे सादर केली जात नसेल?<<<<<<<<<<<<<<
निदान आमच्याकडे तरी एवढे गझलदारिद्र्य नाही!
टीप..........आता पर्यंतचे ‘माझे लेखन’ पहावे आपणास उत्तर मिळेल!
...........प्रा.सतीश देवपूरकर

देवपूरकर माझ्या काही शंका विचारतोय, जमल्यास थोडक्यात उत्तर द्या कारण मला वाचनाचा प्रचंड कंटाळा आहे.

१) व्यक्ती शेर/गझल/कविता पूर्ण करायला इतकी उतावीळ होते, की, कलाकृती सिझेरियन करून जन्मास घातली जाते. हे प्रगल्भ साहित्यिकांच्या एका क्षणात लक्षात येते ....हे कसे ? अर्थात हे प्रगल्भ साहित्यिकाला विचारायला हवे पण तुम्ही लिहले आहे तर तुम्हाला सांगता येईलच.

२)आपणच आपल्या शेरांचा इस्लाह करायला शिकले पाहिजे!>>> आपणच आपल्या शेरांचा इस्लाह कसे करू शकतो आणि असे असेल तर त्याला इस्लाह कसे म्हणा॓वे?

३)शब्दांवर/काफियांवर/रदीफांवर भाळून त्यांच्याकरता म्हणून कधीच कुठलाही शेर करायचा/रचायचा/लिहायचा नसतो!
काफियांची आपल्यावर हुकमत चालू न देता आपली काफियांवर हुकुमत चालायला हवी!
याचा अर्थ तुम्हाला पुरेपुर कळला असेल तर मला सांगा की १५-२० शेरांची गझल कशीकाय निर्माण होऊ शकते? याचा अर्थ आपण काफियानुसार गझल करतो असाच होत नाही काय?

४)मी कुठेतरी वाचले होते की,"आपण लिहलेले सर्वच शेर आपल्याला प्रिय असले तरी सपाट वाटणारे, गुळगुळीत आशयाचे शेर आपण स्व्तःहून काढून टाकायला शिकले पाहिजे" या विधानात काही तथ्य आहे काय?

सध्याची मराठी गझल, कालची मराठी गझल, परवाची मराठी गझल, उद्याची मराठी गझल...........हे कोणते गझलेचे वर्गीकरण बुवा?
या असल्या वर्गीकरणाला कोणता साहित्यिक आधार आहे?>>>> हे समजायला साहित्यिक आधारापेक्षा डोळस गझल अभ्यासाची गरज आहे...
विविध दशकांतील कोणत्याही गझला शेजारी शेजारी ठेऊन पहा ... उत्तर लगेच मिळेल.

शाम,
तुझ्या प्रश्नांना एकच उत्तर...........
झोपी गेलेल्याला जागा करता येते पण.............पुढचे तुला तोंडपाठच असेल, दशकांच्या डोळस अभ्यासामुळे!
उत्तर तुला लगेच मिळालेच असेल!

पण हे यात्रींना आधीच माहीत असल्याने त्यांनी ठरवून तसे केले असणार याची जाणीव आहे
व्वा!!! आवडला! Lol

अलामतीच्या बेसिक्समध्ये घोळ झाला आणि स्वरकाफिया घेतला गेला Happy
स्वरकाफिया शक्यतो असू नये ना?

तुला जपावया कुणी जवळ कशास पाहिजे?
तुझ्यासभोवती तुझीच गस्त वाटते मला>> वाssssह, नचिकेत!! सूपर्ब

मनातल्या मनात छान मोकळीक वाटते
घरातल्या घरात फार शिस्त वाटते मला>> लईsssच खास! 'मोकळीक'चा इतका गोंडस वापर.. दिलखूष

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला>> बेस्ट
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला>> सुंदर! फारच मस्त झाला आहे हा शेर, पुन्हा पुन्हा गुणगुणावासा

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला>> शिकस्त वर इतकी चर्चा झालीये, मी काही लिहीण्याची भिती वाटते मला Wink

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?>> आह!

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला>> भयाण अंतरातला गारठा.. क्लास

Pages