निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालीची शेपटी पडलेली भाजी खाऊन पूर्ण कुटुंब वरती गेलं वगैरे बातम्या लहानपणी खूप ऐकल्या होत्या.. पण तू म्हणतोस कि पाल विषारी नसते.. आता मी कन्फ्यूज्ड आहे.. खुलासेवार सांग बघू.. >>>> कॉलेजमधील गोष्ट - कॉलेजसमोरील एका रसाच्या (ऊस) गुर्‍हाळात एक पाल त्या चरकात चिरडल्यामुळे एक माणूस मरण पावला असे ऐकले -त्याकरता डॉ मिलिंद वाटव्यांशी बोलताना असे कळले की भारतातील एकही पाल विषारी नस्ते, जास्त्तीत जास्त उलटी होणे, वगैरे होऊ शकेल पण माणूस मरणे शक्य नाही.

दुसरे असे की भाजी-आमटीत अगदी विषारी सापही उकळला गेला तर विषबाधा कशी होईल - मी तरी साशंक आहे - कारण ते विष नैसर्गिक असल्याने ते (जसेच्या तसे) आपल्या रक्तात गेले तरच विषबाधा होणार ना, गरम झाले, उकळले गेले, इतर भाजीपाल्यात मिक्स झाले तर त्याचे सर्वच्या सर्व गुणधर्म बदलून जाणार ना - मग ते विष कसे राहील -अर्थात कोणा जाणकाराकडून याचे उत्तर अपेक्षित आहे, मी ही आमच्या येथील तज्ज्ञ मंडळींना विचारुन बघतो.

पालीची शेपटी ही तिच्या संरक्षणासाठी असते, एखादा शिकारी प्राणी तिच्यामागे लागला तर त्याला फक्त शेपूट देऊन ती स्वतःची सुटका करुन घेते. दुसरे असे की नुसती तुटलेली शेपटी वळवळते ते त्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे - त्या हालचाली पाहून शिकारी गंडतो व त्या शेपटीला स्वाहा करतो. मेलेल्या सापाची शेपूटही बराच वेळ वळवळते कारण त्यातील रासायनिक प्रक्रिया, बाकी काही नाही. साप डूख धरतो हा ही गैरसमजच. त्याचा मेंदू फार विकसित नसतो. एखाद्या हत्याराने/ काठीने साप मारला तर त्या हत्याराला लागलेल्या सापाच्या सेक्स हार्मोनमुळे तिथे त्या जातीची मेल्/फिमेल येऊ शकते - त्यामुळे लोकांना साप डूख धरतो असे उगाचच वाटते...... (सापाचे हे सेक्स हार्मोन्स फार दूरवर दुसर्‍या सेक्सला - मेल / फिमेलला कळतात - निसर्गाने त्यांची ही विशेष सोय केलेली आहे, साप मेल्यावरही बराच काळ ते हार्मोन्स त्या हत्यारावर तसेच टिकून रहातात...)

पाल विषारी नसते. आमच्या एन्व्हिरॉनमेंटल सायन्स च्या शिक्षिकेने सांगितलेलं की पालीच्या त्वचेवर खुप वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे पाल अन्नात पडली तर विषबाधा होउ शकते. परंतु व्यवस्थित उकळली गेली तर त्वचेवरचे बरेचसे बॅक्टेरिया मरतील, परंतु तरिही शशांक म्हणतात त्याप्रमाणे उलटी वगैरे प्रकार होउ शकतात.

सापाचे विष रक्तात गेले तरच बाधतं. तेच जर अन्ननलिकेद्वारे पोटातुन गेले तर अजिबात विषबाधा होत नाही. पण अर्थात जर तोंडात किंवा जठरापर्यंत जाइपर्यंत जर अल्सर्स असतील तर मात्र तिथुन विष रक्तात मिसळु शकते. जठरातील अ‍ॅसिड्स मुळे विष (प्रोटिन्स) डिनेचर होतं, आणि मग ते विषाचं कार्य बजावु शकत नाहीत.. (हे कधी काळी कॉलेजात ऐकलेलं, अर्थात आता यातले डिटेल्स कितपत बरोबर आहेत हे सांगता येणार नाही, जाणकार सांगतीलच अजुन)

पाल विषारी नसते. आमच्या एन्व्हिरॉनमेंटल सायन्स च्या शिक्षिकेने सांगितलेलं की पालीच्या त्वचेवर खुप वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. >>>> हे फर्फेक्ट सांगितलंस तू, त्यामुळे बरेच अनर्थ होऊ शकतात, दुर्दैवाने ते पालीच्या विषाबरोबर जोडले जातात....

काळजी आपण घ्यायला पाहिजे खरं तर..... (अन्न पदार्थ नीट झाकणे, भाज्या नीट निवडून, धुवून घेणे, इ.) पण उगाचच बिचार्‍या प्राण्यांवर Wink Wink खापर फोडतो आपण...

आणि दुसरे एक - "मर्यादेविण पाळी सुणे | तो एक मूर्ख ||" - समर्थ रामदास. (सुणे = कुत्रे) ...किती प्रॅक्टिकल सल्ला. प्राण्यांवर प्रेम करा पण मर्यादा / तर तम भाव पाहिजेच ना.......

आमची संस्था रेबीजची लस (माणसांसाठी) तयार करते. रेबीज याविषयीच्या काही फॅक्ट्स.....

रेबीज हा विषाणू (व्हायरस) आहे. त्याचा संसर्ग फक्त उष्णरक्तीय (वॉर्म ब्लडेड)प्राण्यांपासून होतो - उदा. कुत्रा, मांजर, घोडा, गाय, म्हैस, बकरी, उंदीर, घूस इ. सर्व डोमॅस्टिक प्राणी, तसेच वाघ, सिंह, अस्वल, हत्ती, इ जंगली प्राणी. सर्व वटवाघळेही रेबीज प्रसार करु शकतात. रेबीड प्राण्याच्या सर्व बॉडी फ्लूईडमधे हे रेबीजचे विषाणू असतात त्यामुळे अशा प्राण्याने माणसाला / इतर प्राण्याला चावा घेतल्यास ते विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. याबरोबरच प्राणी आपल्याला नखांनी जखमा करतात किंवा अशा प्राण्यांची लाळ जर आपल्या शरीरावरील जखम्/कट्/भेग यावर पडली तरीही आपल्याला रेबीजचा संसर्ग होऊ शकतो. आणखी एक महत्वाचे म्हणजे निरसे/ धारोष्ण/ गरम न केलेले दूध पिणे - ज्या दुभत्या जनावराला रेबीज झालेला असतो त्या जनावराला व्हेट डॉ ने तपासून डिक्लेअर करेपर्यंत त्याचे दूध काढले जातेच - असे विषाणूयुक्त दूध न तापवताच प्यायले तर आपल्याला संसर्ग होतोच...

रेबीजचा व्हायरस शरीरात प्रवेश केल्यावर मेंदूकडे वाटचाल करतो (ही वाटचाल कमीत कमी १५-२० दिवस तर कधी कधी १०-१२ वर्षे इतकीही असते - विंडो पिरीयड/ इन्क्युबेशन पिरीयड). एकदा का मेंदूचा ताबा या व्हायरसने घेतला की त्या माणसाचा/प्राण्याचा मृत्यू अटळ असतो.

याला उपाय एकच - अ‍ॅलोपॅथिक डॉ कडे जाऊन लगेच उपचार घेणे - रेबीज लस व रेबीज अँटीसिरा - डॉ जे सांगेल ते. कुठलेही आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, मंत्र-तंत्र इथे उपयोगी पडत नाही. ही लस वा अँटीसिरा लगेच म्हणजे त्याच दिवशी सुरु झाले पाहिजे - जेवढा उशीर तेवढा आपण त्या विषाणूला पुढे सरकण्यास चान्स देत असतो.
पूर्वी डॉ विचारायचे की त्या प्राण्यावर (विशेषतः कुत्रा) लक्ष ठेवा, कारण तो प्राणी पिसाळलेला (रेबीड) आहे की नाही हे लगेच कळत नाही - काही दिवसांनी कळते. पण सध्या कुठल्याही प्राण्याचा चावा/ नख लागणे घडल्यास ते रेबीड समजूनच उपाय केले जातात. कारण लगेच व योग्य उपाय न झाल्यास प्राण जाण्याचीच भिती..... रेबीज इज हंड्रेड पर्सेंट फेटल.....

आपल्या पाळीव प्राण्यांना रेबीजची नियमित लस द्यायला पाहिजे -त्याचे (लसीकरणाचे) कार्ड मेंटेन करायला पाहिजे - व जराही आजार झाल्यास व्हेट डॉ ला दाखवणे गरजेचे आहे.

कोणाला काही शंका असल्यास विचाराव्या...

त्याचा संसर्ग फक्त उष्णरक्तीय (वॉर्म ब्लडेड)प्राण्यांपासून होतो म्हणजेच थंड रक्ताचा प्राणी - किटक, साप, विंचू चाऊन रेबीज होत नाही.

<<एकदा का मेंदूचा ताबा या व्हायरसने घेतला की त्या माणसाचा/प्राण्याचा मृत्यू अटळ असतो.<<
बाप्रे...कठीण आहे.
कुत्रा चावलेला माणुस वेळेवर लस न मिळाल्यास पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वर्तन करतो हे ही खरं आहे का?
मी लहानपणी अशा गोष्टी ऐकल्यात ...

कुत्रा चावलेला माणुस वेळेवर लस न मिळाल्यास पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वर्तन करतो हे ही खरं आहे का? >>> नाही. रेबीजच्या लक्षणांचे दोन प्रकार आहेत - व्हायोलंट (पिसाळणे) व डंब रेबीज. पिसाळणे या प्रकारात प्राणी चावत सुटतो, जास्त अ‍ॅग्रेसिव्ह होतो. माणसात तसे होत नाही. फीट येताना माणूस कसा धडपडत पडतो / उडून पडतो तसे होते. शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे पॅरालिसिस सुरु होते -हायड्रोफोबिया - पाण्याला भिणे हे मुख्य लक्षण. रेबीज पेशण्टचे गिळण्याचे स्नायू जसजसे निकामी होतात तस तसे स्वतःची लाळही तो गिळू शकत नाही - ती सतत तोंडाबाहेर येते (फ्रॉदिंग). त्यामुळे त्याला प्रचंड तहान लागलेली असते. जेव्हा समोर पाणी दिसते तेव्हा त्याला केव्हा एकदा पाणी पिईन असे झाले असते - पण त्याचबरोबर साधी लाळही गिळली जात नाहीये हे माहित असतेच - त्यामुळे पाणी पाहिल्यावर तो थरथरतो - लोकांना वाटते तो पाण्याला घाबरतो.

ताप येणे, प्रचंड डोके दुखणे, ब्लर व्हिजन, भास, भ्रम होणे, दोन दोन गोष्टी दिसणे ही सर्व साधारण लक्षणे आहेत. जसजसा मेंदूचा ताबा जातो तसतसे वेगवेगळ्या स्नायूंचे नियंत्रण सुटत जाते.

हो हे ही ऐकलं होतं. कुत्र्यासारखी लाळ गाळणं, पाणी पहाताच पळत सुटणं.
पण कुत्र्यासारखं भुंकणही???

कुत्र्यासारखे भुंकणे शक्यच नसावे, मला लहानपणी कुत्रा चावला होता, मी कुठे भुंकतो ? !!! Happy

अर्थात त्यावेळच्या उपचारपद्धतीप्रमाणे पोटात ८ इंजेक्शन्स घेतली होती.

पण कुत्र्यासारखं भुंकणही???>>>>>> कदाचीत स्वरयंत्राचे स्नायु लुळे पडत गेल्यावर बोलताना प्रय्त्न केल्यावर गुरगुरणे टाइप आवाज येत असावा त्यामुळे तसं म्हणत असतील

पण कुत्र्यासारखं भुंकणही??? >>> भुंकत नाही, त्या तोंडाबाहेरील फेसामुळे (लाळेच्या) गुरगुरल्यासारखा जरा आवाज येतो एवढंच....

अर्थात त्यावेळच्या उपचारपद्धतीप्रमाणे पोटात ८ इंजेक्शन्स घेतली होती. >>> ही लस केव्हाच कालबाह्य झाली असून आता सर्व सेल कल्चर्ड बेस्ड लशी मिळतात - ही लस दंडावर देतात.

भयानक होतं ते प्रकरण! पोटावर लस घेणं म्हणजे! Sad

माझ्या पोराला लहानपणी कुत्र चावलेलं (आम्ही पाळलेलच होतं) तर ३ च इंजेक्शन्स दिले दंडावर.
पण माझा पोरगा अजुनही कुत्र्याला खुप घाबरतो.
हे काय कनेक्शन आहे माहित नाही पण कुत्रेही त्याच्यावर खुप भुंकतात.

माझ्या बाबतीतला एक भयंकर अनुभवः
आमच्याच कॉलनीत अ‍ॅग्री. कॉलेजला प्रोफेसर असणारे एक सर रहातात. त्या दोघा भावांचा इन्टरकनेक्टेड असे दोन बंगले आहेत. . तर एकदा काही कामानिमित्त त्यांनी मला बोलावले होते. सकाळी ८.३०लाच त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्यांच्याकडे पुर्ण वाढ झालेला जर्मन शेफर्ड कुत्रा आहे ज्याचा आवाज आख्ख्या कॉलनीत गाजतो. तर तो आजुबाजुला नाही याची खात्री करुन त्यांचे एन्ट्रन्स गेट उघडुन आत गेले. गेट पुन्हा वळुन बंद केले. मला वाटलं गेटच्या आवाजाने सर बाहेर येतील पण ते कदाचीत दुसर्‍या बंगल्यात होते. थोडसं थांबुन मी 'सर' 'सर' अशा हाका मारल्या. त्याबरोबर त्यांचा कुत्रा बाहेर पळतच आला, जोरजोरात भुंकत!! त्याच्या मागे सर त्याच्या नावाचा पुकारा करत होते पण माझ्या काही दृष्टीक्षेपात नव्हते. इकडे मी हादरलेले..आणि स्तब्धच! मागे जावं तर मागचं गेटही मीच बंद केलेलं. डोक्यात नाना विचार.. पळत सुटलं तर कुत्रा आपल्यामागे पळतो हे ही आठवलं. एकीकडे पोटावरची इंजेक्शनं दिसत होती तर एकीकडे हा कुत्रा पाळीव असल्याने कुत्र्याला नक्कीच अँटीरेबिजची इंजेक्शनं दिली असतील याची खात्री वाटत होती.
अजिब्बात हालचाल न करता स्तब्ध उभी राहिले. तसं २-३ दिवस आधीही सरांना आधी फोन करुन गेले होते, पण तेव्हा सरच त्या कुत्र्याला साखळी बांधुन गेट उघडायला आले होते त्यामुळे प्रॉब्लेम नव्हता. पण आता इथे तर सरही दिसत नव्हते. इकडे हा डॉगी जोरजोरात भुंकत माझ्याजवळ आला. माझा वास घेतला. पायाजवळ वास घेतला आणि एकदाचा भुंकायचा थांबला. तेवढ्यात सर दारातुन डोकावले. आणि मी सुटले एकदाची. पण तो अर्धा मिनिट कसला भयानक,एकेक क्षण मोजत होते!! Sad

पनवेल ला एका घरी मी जात असे, त्यांच्याकडे टँगो नावाचा भला मोठा कुत्रा होता. पहिले काही दिवस, त्याला बांधून मग माझ्यासाठी गेट उघडत असत. मग त्यांनी विचारले, कुत्र्याची भिती वाटते का ? मी नाही म्हणाल्यावर, त्यांनी त्याची आणि माझी ओळख करुन दिली, म्हणजे सांगितले कि हे आपले मित्र आहेत ( हो मराठीतच ) आणि काही सेकंद त्याला माझा वास घेऊ दिला, त्यानंतर आमची मैत्री झाली, मी गेलो कि रोज, माझ्या जवळ येऊन, मान खाली घालून ऊभा राही, मी त्याला थोपटले कि, त्याचे समाधान होई.

आता बरीच वर्षे झाली, पण मला अजूनही ओळखेल तो, असे वाटते.

वरचे वाचता येत नाहीय मला सध्या Sad मलेरियाने पिडलेय आणि डोळ्यांना चष्मा लावुनही कॉम्पुटरवरची अक्षरे नीट दिसत नाहीयेत. अंदाजे टायपतेय.. स्ध्या डॉ. कैलास गायकवाडांची पेशंट आहे मी Happy

वरचे रेबिजवाचुन मला हमोमराठ्यांच्या बालकांडामधले हणम्याच्या आईबद्दल लिहिलेले आठवले. आईला काय आजार झालेला ते लिहिले नाही पण तीचे शेवटचे जे वर्णन लिहिलेय ते अगदी रेबिजसारखे आहे, आई भुंकायची, चार पायांवर चालायची.. अगदी भयाण वर्णन आहे.

पण माझा पोरगा अजुनही कुत्र्याला खुप घाबरतो.
हे काय कनेक्शन आहे माहित नाही पण कुत्रेही त्याच्यावर खुप भुंकतात. >>> आपण कोणीही घाबरल्यावर आपल्या शरीरातून नैसर्गिकरित्या एक केमिकल स्त्रवते (बहुतेक हिस्टामाईन). याचा वास विशेषतः कुत्रे व साप यांना येतो, त्यांना लगेच कळते हा प्राणी आपल्याला घाबरलाय, ते अजून जोराने भुंकतात किंवा अंगावर येतात. दिनेशदांसारखे अनेक जण असतात की ज्यांना कुत्र्याची भिती वाटत नाही - ते त्या कुत्र्यालाही कळते व ते कुत्रे काही करतही नाहीत - भुंकणे, चावणे वगैरे..

पं भीमसेन असेच कुठल्याही कुत्र्याला सहज हाताळत असत.

डॉग शोच्या वेळेस आपण पहातोच की कुठल्याही कुत्र्याला ते जजेस अगदी सहजपणे हाताळतात, त्याचे दातही तपासतात....

अभिनेत्री नूतन देखील, कुत्र्यांना हाताळू शकत असे.

नजर आणि स्पर्श, देखील कुत्र्यांना बरोबर कळतो. शिवाय त्यांच्या अशा काही समजूती असतात.
कर्जतला आमच्या परिचितांचे एक फार्महाऊस होते. एकाच घरातील एक बाजू पाहुण्यांसाठी होती तर एक बाजू
तेच लोक वापरत असत. त्यांचा कुत्रा कॉमन पॅसेजमधे मोकळाच असे, पाहुण्यांच्या खोलीकडे कुणीही जा, तो अजिबात बघत नसे पण त्यांच्या खोलीकडे कुणाची पावले जरी वळली, तरी तो चिडत असे.

दिनेशदा हे ही शक्य आहे.
माझ्या एका मैत्रीणीकडे आम्ही सगळ्या मैत्रीणी जायचो. तिचा पोमेरियन मोकळा असला तर आम्हाला शिक्षाच असाय्ची. दिवाणवर बसलं की अजिबात पाय हलवायचे नाहीत. Happy

काल म्यूझियम ऑफ लाईफ, माहितीपट बघताना, तिथल्या टॅक्सॉनॉमिस्टचे एक वक्तव्य खुप आवडले.
आपण एकाद्याबद्दल गॉसिप करताना, नाव माहीत नसले तर ती नाही का, घार्‍या डोळ्यांची, ऊंच, सोनेरी केसांची... वगैरे वर्णन करतो, पण तिचे नाव माहित असले तर गॉसिप करायला मजा येते, तसेच वनस्पतिंच्या नावाचे.. त्यांना नाव ठेवायचे कारण म्हणजे त्यांच्याबद्दल बोलता येते....

हा माहितीपट ३ भागात आहे.

मोरकिड्यांनी केलेले गोलाकार खळगे पाहिलेत का ? सध्या इथे भरपूर दिसताहेत. इतका सुंदर गोलाकार,
कुठलेही साधन न वापरता, कसा जमत असेल ? या खळग्यांचा उतारही अगदी ठराविक कोनाचाच असतो.
तो सुरवात कशी करतो ते दिसले नाही, पण अगदी तळाशी राहून, सर्व बाजूने चिमूट चिमूट माती, फेकताना मात्र दिसतो.

असा खळगा खणून त्याच्या तळाशी हा किडा लपून बसतो. त्या खळग्यात एखादी लहान मुंगी पडली, तर तिला
तो चढ चढता येत नाही आणि ती तळाशी घसरत जाते. मग तो किडा तिला पकडतो.

आता माझा खेळ म्हणजे, एखादी मुंगी पकडून त्या खळग्यात टाकायची. पण दोन्ही बाजूंनी मी फसतो. एकतर असे आयते भक्ष्य त्या मोरकिड्याला आवडत नाही, तो अजिबात हल्ला करत नाही, आणि या मुंग्या पण हुशार,
धडपडत का होईना, पण त्या खळग्याबाहेर पडतातच.

मला नीट आठवत असेल तर दुर्गाबाईनी, ऋतूचक्र मधे असे लिहिलेय कि हे मोरकिडे म्हणजे चित्तूर ( चतूर का ? ) या किटकाची पिल्ले. पण चित्तूर म्हणजे चतूर असेल तर ते अर्थातच खरे नाही. मग चित्तूर म्हणजे काय ?
दुर्गाबाई असे चुकीचे लिहिणार नाहीत.

ओ अच्छा!!! शशांक, चिमुरी.. धन्स!!!
मी पण पालीबद्दलच्या चुकीच्या समजुती दूर करेन इतरांच्या आता.. Happy
कुत्रा मला दुसर्‍यांचा पेट म्हणून खूप आवडतो.. पण मला स्वतःला घरात कोणत्याही प्रकारचे पेट्स आवडत नाहीत.
बँकॉक ला असताना शेजार्‍यांच्या कुत्र्याचा दात लागला म्हनून मुलीला इंजेक्शन ह्यावं लागलं होतं. एकच. पण ते इतकं स्ट्राँग होतं कि एका आठवड्यात तिचं वजन कमी होऊन गालाची हाडंबिडं वर आली.. तेंव्हा आम्ही फार घाबरून गेलो होतो. पण डॉक ने सांगितलं कि 'त्या' इंजेक्शन मुळे शरीरातील प्रोटीन्स भराभरा कमी होतात.. म्हणून भरपूर प्रोटीनयुक्त जेवण पोटात गेलं कि सर्व पूर्वव्रत होईल.. आणी ते झालंही तसंच..
काय दिलं असेल इंजेक्शनमधून..ते कोणी जाणकारच सांगू शकतील इथे ..

कोणताही साप दिसला कि जिथे (माझ्या)पोटात खड्डा पडतो,तिथे सिंगापूर, चीन मधे कोब्रा हेड करी साठी प्रसिद्ध असलेली रेस्टोरेंट्स च्या नुस्त्या पाट्या पाहून (माझी ) काय बरं अवस्था होत असेल..
पण वर चिमुरीने सांगितल्याप्रमाणे विषाचा परिणाम , साप शिजल्यावर होत नसावा ..

तायवान ला स्नेक मार्केट मधे दुकानांमधून लांब लांब जिवंत साप उलटे लोंबकळत असतात. त्यातून एखादा पसंत केला कि त्या सापाला वरपासून खालपर्यन्त ब्लेड सारख्या हत्याराने उभा चीर देतात. आणी शहाळ्यातून पाणी कलेक्ट करावे तसे प्याल्यामधे त्याचे रक्त जमा करत. मग विकत घेणारा ते रक्त पिऊन टाकतो. उरलेल्या सापाचे तुकडे करून लगोलग स्नेक फ्राईड राईस करून त्याच्यासमोर पेश करतात.

मॅन व्हर्सेस वाईल्ड मधे दाखवले होते. कुठलाही साप खाण्याजोगा असतो. विषारी असाला तरी विष फक्त त्याच्या डोक्यातच असते. ते काढून टाकले कि झाले !

विष म्हणजे प्रथिने असतात, आपल्या पचनसंस्थेत ( हिरड्या / जिभ / घसा / अन्ननलिका यावर जखमा नसतील तर ) सहज पचू शकते. फक्त थेट रक्तात गेले तर प्रॉब्लेम होतो. ( हो ना, शशांक ? )

आफ्रिकेत अनेक विषारी साप असले तरी, सर्पदंशाच्या घटना कमी घडतात ( त्यापेक्षा मधमाश्या जास्त बळी घेतात ) कारण इथले साप लाजाळू आहेत. सहसा माणसाच्या वाटेला जात नाहीत.

विष म्हणजे प्रथिने असतात, आपल्या पचनसंस्थेत ( हिरड्या / जिभ / घसा / अन्ननलिका यावर जखमा नसतील तर ) सहज पचू शकते. फक्त थेट रक्तात गेले तर प्रॉब्लेम होतो. ( हो ना, शशांक ? ) >> येस्स - वरती चिमुरीनेही ही माहिती दिली आहे.

मा बो वरील जाणकार डॉ - आय डी "इब्लिस" यांनीही ही खालील माहिती दिली आहे -
<<त्यात सापाचे विष प्रथिन आहे व ते प्याल्यास इतर प्रोटीन्सप्रमाणे आपल्या पचनसंस्थेत पचून जाते हे सत्य आहे. पालीत सापासारख्या विषग्रंथीच नाहीत.

पाल, साप हे सरपटणारे प्राणी, त्यांच्या शरीरातील 'कमेन्साल्स'मुळे आपल्याला धोकादायक ठरू शकतात. साल्मोनेला ग्रूपचे बॅक्टेरिया यांना धोकादायक नाहीत ते आपल्याला धोकादायक असतात. त्यामुळे शिजवून थंड झालेल्या भाजीत पडलेली पाल 'फूड पॉयझनिंग'चे कारण ठरू शकते. उकळली गेल्यावर अर्थातच (ऑलमोस्ट) निर्जंतुक होते, पण त्या प्राण्याचा 'शिसारी' फॅक्टर इतका जबरदस्त आहे की नुसत्या कल्पनेनेच तुम्हाआम्हाला उलट्या सुरू होतात.>>

तसेच दुसर्‍या डॉक - "साती" यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

आफ्रिकेत अनेक विषारी साप असले तरी, सर्पदंशाच्या घटना कमी घडतात ( त्यापेक्षा मधमाश्या जास्त बळी घेतात ) >>> दोन - तीन वर्षांपूर्वी पुण्यात घडलेली एक दुर्दैवी सत्य घटना - माझ्या मित्राच्या भावाच्या (चुलत का मावस) बाबतीत घडलेली. रात्रीचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत असताना मानेवर काही पडले म्हणून झटकले तर एक मधमाशीने डंख मारल्याचे लक्षात आले - काही वेळातच दोन -चार उलट्या होऊन तो अत्यवस्थ झाला. डॉ येईपर्यंत सगळा खेळ खलास झालेला - कारण काय तर एक मधमाशीचा डंख - हा बहुतेक अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक (रिअ‍ॅक्शन) असावा - शरीराची संरक्षण यंत्रणा फार जोरात रिअ‍ॅक्शन देते - परिणामी जीवच जातो.

सासुरवाशीण ( बहुतेक ) या चित्रपटात निळू फुले च्या सांगण्यावरुन, चिमट्यात धरुन, पालीचे थेंब (? !) ललिता
पवार, दूधात पाडते आणि मग ते दूध प्रेमाने सुनबाया आशा काळे आणि रंजना यांना प्यायला देते !!!

खरंच, असंच दाखवलंय त्या चित्रपटात !

इब्लिस आणि साती, यांनी इथे नियमित यायला पाहिजे.

BBC Journeys from the Centre of the Earth अशी माहितीपटांची मालिका यू ट्यूबवर आहे.
एकंदर सहा भाग आहेत, पहिला भाग इथे आहे
http://www.youtube.com/watch?v=9q_kPZZgpHs

अवश्य बघा.

आता माझा खेळ म्हणजे, एखादी मुंगी पकडून त्या खळग्यात टाकायची.>>>

मी असा प्रयोग कोळ्याच्या जाळ्यावर केला होता पुर्वी. जर मुंगी किंवा किटक टाकला तर कोळी लगेच धावून येई आणि त्याला धाग्यात गुरफटून टाकी व सावकाश भोजनाचा आस्वाद घेई. पण त्याच आकाराचा कागदाचा बोळा टाकला तर तो जाळ्यातून सोडवून टाकून देई.

पालीची आणि सापाची बरीच माहिती मिळाली.

डिस्कव्हरीवर जंगलातल्या अजस्त्र पालींची माहिती पाहिली होती. त्यांच्या लाळेत म्हणे असंख्य जिवाणू आणि विषाणू असतात ज्यांची अजून पुर्ण माहिती नाही आणि त्यावर इलाजही सापडले नाहित. तसच कोळी चाऊन झालेल्या जखमांवरही एक फिल्म पाहिली होती. भयानक प्रकार होता.

वर्षु, सापाचे रक्त.... यक्क्क्क्क्क्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..... मला तर स्वप्नात साप दिसले तरी भिती वाटते.. कोब्रा हेड करीमधे कदाचीत ते लोक विष आधीच काढुन घेउन मग करी बनवत असतील.. सापाच्या विषाला मार्केट वॅल्यु असेलच की.. विषकन्या कन्सेप्ट आठवला अचानक आता Wink

काहीकाही मधमाश्यांचा डंख जीवघेणा ठरु शकतो..

पण त्याच आकाराचा कागदाचा बोळा टाकला तर तो जाळ्यातून सोडवून टाकून देई. >>> हे भारीचे अगदी...

वर मी जे वर्णन केलंय - बेडूक / टोड यांना कागदाचा बोळा देऊन फसवण्याचे - त्यात हे पुढे काय होते त्या बोळ्याचे हे पहायचे राहिलेच खरं तर...

सापाच्या विषाला मार्केट वॅल्यु असेलच की.. >>> प्रचंड महाग असते हे सर्प विष. जेवढा तो साप दुर्मिळ तेवढे ते विष महाग.

मस्त चर्चा आणि माहीती.

चतुर :
प्राणी, पक्षी, फुले, झाडे सग़ळ्यांनाच वेगवेगळ्या बोलीभाषेत, वेगवेगळ्या समाजात, वेगवेगळ्या कुटुंबात निरनिराळी नावे असतात. माझी कोळी मैत्रिण चतुरांना 'पितर' म्हणते. कारण पित्रुपक्षात चतुर जास्त दिसतात. का बर येत असतील आत्ता इतके चतुर ? तेही पावसाळ्यानंतर ?

Pages