सुगंधी कट्टा:
हा आहे दौरा एका आठवाचा स्मृतीतल्या साठवाचा
वळणावळणानी उलगडतील चित्रांच्या लडी
तुम्हीसुद्धा सामील व्हा ह्या प्रवासात दोन घडी.
धुक्यात हरवलेल्या शोधताना वाटा जुन्या आठवणींचा सापडेल का पत्ता?
जिवाभावाच्या मित्रांचे सुटलेले धागे काळाबरोबर सरले मागे.
पण मग त्या सरलेल्या दिवसांचे काय?
प्रवाहात भेटलेल्या जीवालागांच काय?
काहीच नात उरलं नाही ?
कि बरेच दिवसात भूतकाळात डोकावलोच नाही?
आणखी एक विचारू तुम्हाला?
मला सांगा मित्रांना इतक्यात विसरलात काहो?
भान हरपलेले ते दिवस खरंच सांगा, कुठे विरले काहो?
कुठे गेल्या ह्या आठवणी? कसं वाढलं अंतर....
जरा शोधून पहा, तुमच्यातच दडला आहे तोच जुना "मैतर"! आठवाचा हा प्रवास जातो ओळखीच्या वळणावरून,
जुने क्षण नव्याने घेतो ओंजळीभरून!
नमस्कार मंडळी काय झालात ना हळवे? अश्याच असतात आठवणी! आणि आठवणी म्हणजे तरी काय, आपलं संचित. काळाबरोबर हे संचित जरा मागे पडतं आणि मग लख्खकन वीज चमकावी तश्या ह्या सरलेल्या वेळा समोर उभ्या ठाकतात. अशाच हव्याश्या वाटणाऱ्या स्मृतींना मी "सुगंधी कट्टा" संबोधते. "कट्टा" माहिती आहे ना? अशी एक जागा जिथे चहाच्या एका कपात वाफाळलेल्या गप्पा रंगतात, मिसळीच्या प्लेटवर खमंग चर्चा झडतात आणि सिगरेटच्या झुरक्यात जुने वाद विरून जातात! असा "कट्टा" आपल्यातल्या प्रत्येकाने अनुभवला असेलच. अहो हा कट्टा म्हणजे दगडमातीची नुसती भिंत नाही तर ती आहे एक संकल्पना मैत्रीची, विचारांच्या देवाणघेवाणीची अगदी टिंगलटवाळीची सुद्धा. काय म्हणालात? आज झालंय तरी काय एकदम, हे आठवणी वगैरे? त्याचं काय झालं कि दोन दिवसांपूर्वी मला एक इ-मेल आली, एका ओळखीच्या नावाची पण पुसून गेलेल्या चेहऱ्याची. ते नाव आणि मनातल्या डेटाबेस मधला चेहरा जुळवताच येत नव्हता, शेवटी त्या इ-मेलला उत्तर दिलं कि "आपण एकमेकांना कसे ओळखतो?". उत्तर आलं कि "आपण पहिली ते दहावी एकाच बस मधून वरळी ते दादर प्रवास करत होतो". आणि खरंच सांगते कोडं सुटलं!नाव आणि चेहरा जुळला सगळे तपशील आठवले आणि डेटाबेस अपडेट झाला. हे माझ्याच बाबतीत नाही तर आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत होतं. हे असं का होतं? कारण आपण माणूस आहोत, आपली आठवण आपल्या गरजेशी निगडीत असते म्हणून, त्यावेळी अतिमहत्वाचं वाटणारं काही कालांतरानी बोथट होतं आणि विस्मृतीच्या गर्तेत जातं. पण गेल्या दोन दिवसात मला जाणीव झाली आहे कि 'मधून मधून मागे वळून बघायला हवं,काय कुठे गळून गेलं थोडं शोधायला हवं'!. गम्मत असते अश्या "सिन्हावालोकानात", म्हणजे;
मनात सुरु असतो आठवणींचा खेळ घरातल्यांना लागत नसतो आपल्या वागण्याचा मेळ
मधेच येतात उसासे, दब्कं हसू ओठावर कोणाच्यातरी आठवणीचा लाल रंग गालावर!
काहीजणं म्हणतात गेले ते दिवस गेल्या त्या आठवणी! प्रत्येक क्षणाला काळाचीच फोडणी. पण असं नसतं बाप्पा, मनात आणलं तर चक्क घड्याळ चक्क मागे फिरवता येतं! कसं? अहो दर दोन वर्षांनी येणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला जाऊन. उत्तर अमेरिकेतील अनेक मराठी मंडळी न चुकता अधिवेशनात एक "गेट-टू-गेदर" करतात, कोणी कौटुंबिक कोणी व्यावसायिक तर कोणी शालेयजीवनातील घड्याळाचे काटे मागे फिरवतात. काय घ्यायचा का हा अनुभव? तर मग अधिवेशनाला यायलाच हवं! काय तुम्ही? विचार कसला करता अहो उचला फोन आणि करा प्लानिंग सुरु, "शिकागोला" यायचं, 'बृहन महाराष्ट्र मंडळाचं" आगामी अधिवेशन २१ जुलै ते २४ जुलै रोजी "शिकागो" येथे संपन्न होणार आहे तेव्हा सर्वांनी ह्या आठवणीच्या प्रवासात सामील व्हायला नक्की या! मित्र मंडळींबरोबर अधिवेशानातल्या दर्जेदार कार्यक्रमांचा आणि सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्यायला आवर्जून या! अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळाला भेट देत राहा!
प्रत्येकाच्या मनात एक बकुळीचं फूल असतं,
कोमेजून गेलं तरी सतत घमघमणारं असतं
पानामागे असतं तेव्हा हमखास हुकतं,
गळून पडल्यावर मात्र न कळत गवसतं!
-रेवती ओक
हा पुर्वि लिहिलेला लेख आहे,
हा पुर्वि लिहिलेला लेख आहे, त्यामुळे सन्धर्भ जुने आहेत, प्रतिक्रिया न आल्यमुळे परत इथे लवत आहे! धन्यवाद!