१०२४ सदाशिव..
अशीच एक ऑफीसमधली मिटींग चालली आहे. मला ना एक अतिशय वाईट सवय आहे, हाताला सतत चाळा लागतो. कुणीतरी जे बोलतंय, ते ऐकता ऐकता मी हातातल्या डायरीमधे काहीतरी उगीच रेघोट्या मारतेय. मधेच मी माझं नाव लिहीलं "मीनाक्षी हर्डीकर.." क्षणभरात काय मनात आलं की त्या खालीच माझं माहेरचं नाव लिहीलं, मधल्या नावासहीत "मीनाक्षी गंगाधर माधवी" मज्जाच वाटली कित्येक वर्षांनी हे नाव लिहीलं. त्यापुढे ओघानंच आला घरचा पत्ता "१०२४ सदाशिव पेठ, आपटे वाडा, पुणे ३०". मला माहितीये तुम्ही सगळे हसाल, पण खरं सांगू का? एकदम समाधानी वाटलं. आपलं नाव आणि पत्ता लिहील्याचं समाधान. जेवण तर आपण जेवतोच की, पण मग भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटंत नाही त्यातलाच प्रकार.
१०२४ सदाशिव..आपटे वाडा... २५ वर्षामधे किती ठीकाणी, किती वेळा हा पत्ता लिहीला. सगळीकडे, शाळेत, कॉलेजात. त्यावेळी असं वाटंत होतं, की हाच आपला हक्काच्या घराचा पत्ता आहे अगदी जन्मभरासाठी.. नागनाथपाराकडून ज्ञानप्रबोधिनीकडे जाताना डाव्या हाताला 'प्रियांका टेलर्स' दुकान आहे. त्या दुकानाला लागूनच अलिकडे एक बोळ आहे 'वर्षा ऑप्टीशियन' अशी पाटी असलेला. हाच वाड्यात जाण्याचा रस्ता, आत जाणारा एक बोळ. बोळंच म्हणायचो आम्ही त्याला. बोळाच्या सुरुवातीला उजवीकडे एक जीना आहे वर जाणारा. इकडे वर तीन बिर्हाडं, एकेका खोल्यातली. तशी वाड्यातली जवळजवळ सगळीच बिर्हाडं एकेका खोलीतली. दोनचं बिर्हाडं अपवाद आणि तिसरा अपवाद मालकांचा.
बोळातून सरळ जाताना डावीकडे अजून चार बिर्हाडं. मग उजवीकडे वळलं की अंगण...अंगणात तीन बाजूंना अजून काही खोल्या आहेत. आणि समोरच्या बाजूला वर जाणारा जीना या जीन्यावरुन वर गेलात की समोरचंच घर आमचं १८*१० ची एक खोली. खोलीच्या तीन बाजूला भिंती, दर्शनी बाजूला एक मोठ्ठी खिडकी आणि दार. हे दार कायम उघडंच पाहीलंय मी... वर्षानुवर्ष. नो कडीकुलूप भानगड. तशी वाड्यातल्या सगळ्याच घरांची दार घरात कुणी असेल तर उघडीच. पण त्यातही काही पर्दानशीन घरं होती. बरीच सगळी पर्दानशीन. पण आमचं घर सताड उघडं. इकडे कसला आडपडदा नावाचा प्रकारंच नाही. अरे हो! इथे शेजारी शेजारी ४ खोल्या आहेत त्यापैकी आमच्या शेजारची खोली हे प्रियांका टेलर्सचं वर्कशॉप. आमच्या चारही घरांसमोर एक जोडलेली गॅलरी वजा जाण्यायेण्याचा रस्ता आहे. वाड्यातल्या सगळ्याच घरांना कारणाकारणाने कुलूपं लागलेली पाहीलीत, गावाला गेले असताना, सगळे मिळून बाहेर गेलेत.. इ. अपवाद आमच्या घराचा.
या घराशी माझ्या आयुष्यातल्या किती तरी आठवणी निगडीत आहेत. लग्न होईपर्यंतच्या पंचवीस वर्षातल्या सगळ्या आठवणी इथल्याच.. काही आठवणी आम्हा घरातल्या पाच जणांच्या आईबाबा, मी, माझी बहीण आणि आज्जी यांच्या.. मग इतर आठवणी माझ्या वाड्यातल्या सगळ्या रक्ताच्या नसलेल्या, पण रक्ताच्या नात्यांपेक्षा जवळच्या असलेल्या, नातेवाईकांच्या, मैत्रिणींच्या, जांभळाच्या झाडाच्या, अंगणातल्या झाडांच्या, जांभळाच्या झाडाच्या पानातून डोकावणार्या आभाळाच्या. नवनविन मोठ्या इमारती होण्याआधीच्या आणि नंतरच्या सुद्धा..
मी अशी खूप वेळा हरवून जाते. किती तरी वेळा या रस्त्यावरुन मैत्रिणीबरोबर जाताना मी आवर्जून त्यांना माझं घर दाखवायला घेऊन जाते. (आता हे काय लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु किंवा अजून कुणा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचं घर आहे का ..? :D) पण खरं म्हणजे मलाचं ते पहायचं असतं पुन्हा पुन्हा... वाड्यात गेलं की बोळात शिरल्या पासून माझा शोध सुरु होतो. पूर्वीचं काही आहे का पाहण्याचा.. खरं म्हणजे, ती पूर्वीची माणसं शोधण्याचा.. मला माहीतीये की तिथे आता पेइंग गेस्ट राहतात. वाड्यात तसं आता पुर्वीच्या बिर्हाडापैकी एक प्रियांका टेलरंच तेवढा राहीलाय. बाकी सगळ्या खोल्यातून पेइंग गेस्ट.
अशीच काही महिन्यांपुर्वी एका मैत्रिणीला घेऊन घर दाखवायला गेले. मोडकळीला आलेला जीना वर चढून जायला आणि आमच्या घराचं (हो! अजूनही आमचं घरंच म्हणते मी...) दार बंद व्हायला एकच वेळ.. खिडक्या सुद्धा बंद बाहेर उभं राहून दोन वाक्य बोललो .. इतक्यात दार उघडून एक मुलगा बाहेर आला. कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. आता दार थोडसं उघडं राहील्यासारखं. मग अगदीच रहावलं नाही दार हलकेच ढकललं. हे राम.. इतकं करुनही मला यात आपण दुसर्या कुणाच्या खोलीचं दार बिनधास्त उघडतोय, हे योग्य नाहीये वगैरे असलं काही वाटलं नाही. तीच ती आमची खोली. आम्ही जागा सोडण्यापूर्वी शहाबादी फरशी काढून कोटा बसवला होता. बाकी आत आता नुसत्या दोन तीन कॉट.. गॅलरीत उभं राहून मोबाईलवर बोलणार्याचं बोलणं एव्हाना संपलं होतं. तो आमच्याकडेच पहात होता. मला खरं म्हणजे काय म्हणावं ते कळेना.
अचानक तो म्हणाला "तुम्ही रहात होतात का इथे?"
"हो"
"बरीच वर्ष आपण ज्या घरात राहतो ते घरंच आपलं वाटतं त्यातून वाड्यातलं घर विसरणं अवघडच. माधवी का तुम्ही"
"हो. मी त्यांची मोठी मुलगी. पण तुम्हाला कसं कळलं?"
"तिथे लिहलंय ना जिन्यावरच्या पत्र्याखालच्या लाकडावर"
मी पहातंच राहीले जिन्यात माझ्या आवडत्या जागी उभं राहून खडुनं लिहीलेल्या नावाकडे.. "माधवी"..
.. छान
:).. छान लिहीलय!
मस्त
मस्त लिहीलंय ! आवडलं !
.....लहानपणी मामाच्या गावी गेल्यावर्....बाकी मुलांच्या नादाने डोंगरातल्या एका मोठ्या धोंड्यावर दगडाने ठोकुन ठोकुन स्वतःचे नांव लिहीले होते......अशातच एकदा तिकडे जाणे झाले...आणि तो नाव लिहीलेला दगड सापडला..त्या दगडाने मला ओळखलं आणि सगळ्या बालपणीच्या बर्याच आठवणी पण सांगीतल्या.
दगडाला देखील अंतःकरण असते ते त्यादिवशी कळाले मला !
तुम्हाला पु.ले.शु. छान लिहीता तुम्ही.
मीनू,
मीनू, तुझ्या घराचं वर्णन वाचून मलापण नॉस्टॅल्जीक व्हायला झालं. मला पण आमच्या गिरगावातल्या दोन खोल्यांची खूप आठवण आली. मी एकदा आई रागावली म्हणून आईशी अर्धा तास
बोलत नव्हते तेव्हा आतल्या खोलीच्या भिंतीवर खडूने तिच्यासाठी मेसेज लिहिला होता, तुझं माझ्यावर प्रेमच नाहिये.. वगैरे वगैरे, अर्थात आईने शांतपणे तो पोतेरं घेवून पुसून टाकला होता व भाजी निवडत बसली.
तू निदान तिथे जावून पाहून तरी येतेस. मला तर तिथे गेल्यावर तिथे रहाणार्या नव्या बिर्हाडकरुंसमोर रडूच फुटायचं (ते बिचारे समजून मला आतपर्यंत घेवून जायचे "तुझं घर बघून घे" म्हणत). पण आता मी जाणंच टाळते, नुस्त्या आपण रहात असतानच्या आठवणीच बर्या वाटतात
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |
छान
छान लिहलयस..... अगदि तुमचा वाडा (माहीत नसुनही) डोळ्यासमोर आला!
काही काही आठवणीच अश्या असतात.... भरभरुन लिहावस वाटणार्या.... खुपखुप सांगावस वाटणार्या... बर्याचदा वयाच्या एका टिपीकल फेज मधल्या, जुन्या घराच्या आणि कायमच्या आठवणीत कोरलेल्या काही खुणांच्या!
मस्त
मस्त लिहीले आहे. वाचताना मी "नवनविन मोठ्या इमारती होण्याआधीच्या आणि नंतरच्या सुद्धा.." यावर ५-१० मिनीटे आठवत होतो काही वर्षांपूर्वी तो भाग कसा दिसत होता (नागनाथ पाराजवळ, खुन्या मुरलीधर मंदिराजवळ वगैरे, कारण तेथे मी खूप जायचो), आणि मग पुढचे वाचले.
मी टिळक
मी टिळक रोडवर रहात असे. आनंद पुस्तक मंदीर समोर. चार वर्षांपूर्वी तरी ते दुकान होते. ट्या समोरचा वाडा केंव्हाच पाडून तिथे काहीतरी दुसरेच बांधले आहे. तिथलीच एक समोरची गच्ची पडून एक कार नि एक दोन माणसे पण मेली म्हणे.
पण निदान चार वर्षांपूर्वी माझे संपूर्ण नाव न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेत मधल्या गोलात बोर्डावर लिहून ठेवलेले होते, सर्वात डावीकडच्या बोर्डावर.
खुन्या
खुन्या मुरलीधराचा भाग केवढां बदललांय आता.. तिथलं शेजारचं उपाशी विठोबाचं मंदिर पण आत गेलंय.
हं, जुनं पुणं आठवलं या योगे..
मीनू, खूप
मीनू, खूप सुरेख लिहीलंय.
वाड्यातल्या आयुष्याचा योग कधी आला नाही पण असं काही वाचलं की वाटतं,'अश्या जागी राहणं अनुभवायला हवं होतं'.
मीनू छान
मीनू
छान लिहीलयस ग. तुझ्या ह्या लिखानामुळे माझे बालपण ज्या घरात गेले ते घर, आजुबाजुचे शेजारी-पाजारी, समोरचे खेळाचे मैदान, मागच्या अंगणातली विहीर अश्या बर्याच गोष्टींची उजळणी झाली.
प्रियांका टेलर माझा ठरलेला टेलर होता एस.पी. कॉलेजात असतांना. त्यामुळे तुझ्या घरासमोरुन मी खूप वेळा गेलेय.
चान्गला
चान्गला विषय, चान्गला हाताळलाय!


शेवटचा सन्वाद वाचताना एक क्षणभर वाटले की डोळ्यातून पाणी गळेल!
बरीचशी पुनर्भुती लाभली!
पण नशिबवान आहेत ते सगळे जण, की पन्चवीस वर्षान्च्या आयुष्यात केवळ एकाच ठिकाणाशी सान्गड बान्धली गेली!
नाहीतर आम्ही!
मध्यन्तरी नाशिकला गेलो होतो २००५ मधे, तेव्हा माझा जन्मवेळचे घर बघुन आलो, फोटो पण काढले!
पण का? वर म्हणल्याप्रमाणे मी थोडीच कोणी क्रान्तिकारक वा नेता आहे? की नन्तर अजुन पाचपन्नास वर्षान्नी लोकान्ना दाखवायला... बघा, या ठिकाणि लिम्ब्या लहानाचा मोठा म्हणजे चालुबोलू लागेस्तोवर रहात होता!
पण अशा असन्ख्य आठवणी अस्तात, आठवल्या की जीव तीळ तीळ तुटतो, त्यापासून दुरावल्याच्या भावनेने!
ती हुरहूर वरील लेखात चान्गली उमटली आहे!
वरील पत्त्या च्या थोडे पुढे गेले की, आमच्या काळी "नाना क्लास" होता, मला आडनाव देखिल नीटसे आठवत नाही पण त्या काळी गणित विषयासाठी तो फेमस क्लास होता! तो, अन दुसरा "डाके क्लास" एस्पीच्या मागे! (मी कधीच गेलो नाही तिथे, भाऊ जायचा म्हणून माहित)
हो नाना
हो नाना क्लास अगदी जवळंच होते की. मी जायचे त्या वाड्यात फुलं गोळा करायला. डाके क्लास मधे मी स्वतः जात होते.
मृण्मयी कधी तरी वाड्यातल्या लोकांच्या आठवणी लिहायला सवड झाली तर लिहेन.. फार फार वेगळं असतं वाड्यात राहणं. जरा जास्त चांगली एकत्र कुटुंबपद्धती म्हणावी लागेल. रोज रोज एकमेकांच्या अध्यामध्यात येणार नाहीत पण वेळ पडली की मग तुमचा वैयक्तीक मामला असेल तरी मधे पडायला मागे पुढे पहाणार नाहीत असं वेग़ळंच कायतरी रसायन असतं
बाकी सर्वांनाच प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.
~~~~~~~~~
मीनू,
मीनू, मस्तच लिहील आहेस. खूप सार्या आठवणी जागृत केल्यास. आमचा वाडा अजून शाबुत आहे व आमची खोलीसुद्धा फक्त अंगणात खेळणारे कुणी राहीले नाही.
________________
बोझ होता जो ग़मों का तो उठा भी लेते
ज़िंदगी बोझ बनी हो तो उठाएं कैसे
-----------------------------
मीनू मस्त
मीनू मस्त लिहिलयस .. खूप आठवणी जाग्या झाल्या...:)
सही मीने!
सही मीने! मला आमचा वाडा अजूनही आठवतो. ५१५, सदाशिव पेठ, खराडे वाडा
आमचा वाडा खूपच प्रशस्त होता. तो पाडला तेव्हा आम्हा भाडेकरूंवर काय आघात झाला होता, अजूनही आठवते!
कधीपासून मलाही वाड्यावर लिहायचे आहे, आता लिहीनच. (तुला श्रेय देईन बरं ;))
---------------------
*ससुराल गेंदा फूल*
आज्जे,छान
आज्जे,छान लिहिलयस गं.
सुरेख
सुरेख लिहिले आहेस मीनू.
हम्म्म्म..
हम्म्म्म.. छोटेसे आणि सुटसुटीत.. मलाही आमचा वाडा आठवला.. जन्मापासून ते इयत्ता नववीत जाई पर्यंत तिथेच होतो. अर्थात वाड्यातली जागा अजुनही सोडलेली नाही त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊन नॉस्टॅलजिक काय म्हणतात ते होता येतं..
आमच्या दोन खोल्यंच्या घरातच आईचा बिजनेस होता स्क्रीन प्रिटींगचा.. आणि दोन्ही खोल्या पार भरुन जायच्या कागद वाळवायला ठेवले की.. आणि मग परिक्षा असली की माझी रवानगी टेबलाच्या खाली अभ्यास करायला..
आणि वाड्याच्या शेजारीच मिलिटरी बॉईज हॉस्टेलचं ग्राऊंड.. त्या ग्राऊंडवर किती संध्याकाळी वेगवेगळे खेळ खेळण्यात घावल्यात त्याची गणतीच नाही.. हे हॉस्टेलचं ग्राऊंड आता मात्र वापरता येत नाही. भिंत घातली त्याला मिलिटरी वाल्यांनी..
=========================
वाह ! मीनू,
वाह ! मीनू, सुंदर लिहीले आहेस. हुरहूर पोहोचली.
वाड्यातल्या आयुष्याबद्दल लिहिशील त्याची वाट पाहतो.
***
दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)
खुप आठवणी
खुप आठवणी जाग्या केल्या मिनु तुझ्या लेखाने... एकेकाळी सदाशिव पेठ खुपच शांत - निवांत असायची.. शाळकरी वयात खेळता खेळता सहज नातुबाग, नागनाथपार, गाडगीळ स्ट्रीट, निंबाळकर तालीम चौक, रतन सायकल मार्ट, विश्रामबाग वाडा, तुळशीबागेतले रामाच्या मंदिराला सहज फेरफेटका होत असे... आता हा भाग इतका गजबजुन गेलाय की पायी चालणे कठीण होऊन बसलय..
या लेखाने ते सगळे दिवस आठवले... जुन्या घराची हुरहुर प्रकर्षाने जाणवली...
"ते सरता
"ते सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे "
आवडले.
>>रोज रोज
>>रोज रोज एकमेकांच्या अध्यामध्यात येणार नाहीत
कसलं काय! आमच्या खालच्या मजल्यावरच्या गोरवाडकर आजी रोज सकाळी घरात येऊन अगदी मला "अजून उठलं नाही का कार्ट" म्हणून जायच्या
छान लिहीलस
छान लिहीलस मीनू..
माझ्याही लहानपणच्या आठवणी जागल्या.. ते घर, समोरचा ओटा, गल्लीतले मोठ्ठे लिंबाचे झाड- घरावर सावली धरणारे, झोपाळा, गच्ची.,ऊन्हाळ्यात रात्री दिसणारे लखलखणारे आकाश.. तेव्हा मोहोल्ला ८ नंतर शांत व्हायचा.. रस्त्यावर रहदारी पण कमी व्हायची.. वयाची २०-२२ वर्षे ज्या घरात गेली ते विसरणे अशक्यच.. पण दुरावलेच आता कायमचे.. 
मीनु, लेख
मीनु, लेख मस्त लिहिला आहेस. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी ८२३ सदाशिव (नातु वाडा) मध्ये राहायचो. म्हणजे फार लांब नाही. १५ वर्षांपुर्वी आमचा वाडा पाडुन नविन इमारत बांधली तेव्हा काहीच फोटो वगैरे काढले नाहीत याची फार हुरहुर वाटते. एकेकाळी सगळे वाडे असताना गल्लीचे असणारे स्वरुप अजुनही ध्यानात आहे. आता आमच्या गल्लीतील फाटक वाडा व अर्धा नुलकर वाडा सोडुन बाकी बहुतेक सगळे वाडे काळाच्या पडद्याआड गेलेत. आणी आता प्रत्येक इमारतीत झालेल्या 'मेडिकल वितरकां"च्या दुकानांमुळे गल्लिचे 'दवाबाजार' असे नामकरण झाल्याचा साक्षात्कारही गेल्याच भारत भेटीत झाला.
असो.. पण लेख आवडला.
छान लिहिलं
छान लिहिलं आहेस, मीनू
मस्त गं
मस्त गं मीनु..
मला पण आमचा वाडा आठवला.. आमचाच वाडा असल्याने लहानपणी मोठ्या अक्षरात लिहून ठेवायचो आम्ही ' दाते वाडा '
खूप मजा केली जेव्हडी वर्षे होतो तो पर्यंत... वड्यात खेळलेले दगड का माती, डबड एसपैस, लपा-छपी.. एक ना दोन असे कितीतरी खेळ खेळलो आम्ही..
आता फ्लॅट सिस्टिम मधे आल्यावर प्रकर्शाने जाणवते की त्या वेळची वाड्याची मजा आपल्या मुलांना कधीच नाही अनुभवता येणार, अगदी जे खेळ अपण खेळलो ते तरी माहीत होतील की नाही काय माहित.
खूप छान
खूप छान लेख.
माझं आजोळ तुमच्या अगदी शेजारी - १०७३ सदशिव. (आगशे वाडा).
तिथल्या रामाच्या देवळात आम्ही भाचे मंडळींनी आमच्या सगळ्यांची नावे लिहुन ठेवली होती. वाडा पाडताना मी आणि बहिण मुद्दानहुन जाउन पाहून आलो. पण ती नावे कोरलेली लाकडी फळी काही सापडली नाही. उगाच हूरहूर...
आता मामा सुद्धा तिथे राहात नाही. पण आई अजुन सुद्धा बोलताना "आमचा वाडा असा उल्लेख करते".
वाह क्या
वाह क्या बात है मिनू.. अंतर्मुख आंणि नॉस्टेलजिक केलस सगळ्यांना ह्यातच कळतय किती छान लिहिलयस ते!
मी सहा-आठ महिने राहिलोय रेणूका स्वरूप च्या गल्लीत सदाशिव पेठेत.. त्यामुळे तिथे काय धमाल असते हे नक्कीच समजू शकतो..
पुण्याचे जसे वाडे तसे आम्हा मुंबईकरांच्या चाळी.. सगळं आठवलं !
भावना
भावना पुरेपुर पोहोचल्या. वडीलांनी जिवापाड मेहनत करून बांधलेलं कौलारू घर, ज्यात मी लहानाचा मोठा झालो, ते पाडताना जसं वाटलं अगदि तसंच हे वाचतानाही वाटलं. कालाय तस्मै नमः !
मीनू, खूप
मीनू, खूप आतलं आणि सहज लिहिलयस. नो आवेश! काही मुद्दाम सांगण्याचा अट्टाहास नाही... झुळुकीसारखं! तरीच इतकं फुंकर घालतय
मी 'वाडा' रहिवासी नाही. पण तुझी भावना इतकी प्रत्येकाची आहे, की चटकनी जाऊन आईच्या घरातल्या एका विशिष्टं फरशीवर बसावं... असं मलाही वाटलं. तिथे आणि तिथेच बसून मी तबल्याचा रियाज करायची. पुढे कधीतरी एक अडमढेंगळं टेबल तिथे ठेवायची कुणालातरी हौस आली. मी इतरवेळी तिथे छान दिसणारं ते टेबल सरकवून, ती फरशी मोकळी करून बसायचे... माझं नाव नव्हतं त्या फरशीवर इतकच काय ते....
(इथे रंगेबीरंगीवर येणच होत नाही.. मग असलं मस्तं काय काय मिसते)
मी
मी पप्रियान्का त कपदे शिवायला ताक्ले आहेत. शालेत अस्ताना.
Pages