संयुक्ता मुलाखत - लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर

Submitted by नानबा on 23 May, 2012 - 00:09

"अस्तमान दोन घटकेचा मर्द राहिला
सख्याची स्वारी घराकडे आली
उंच माडीवर चवथ्या मजल्यावर
तळजागा करविली
झुळुक वार्‍याची हवा सुटली
तशीच पतंगाची मजा वाटली"

ह्या लावणीच्या ओळींवर बसून, सुरमांडी घालून, कधी उभं राहून, कधी कुशीवर आडवं होऊन एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा वेगवेगळ्या प्रकारे पतंग उडवून रसिकांची मनं जिंकणार्‍या - लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांची मुलाखत घेण्याचा योग नुकताच आला.

वय वर्षं ९७ - गोड गळा, भलं मोठं कुंकू, पान खाऊन लाल चुटुक झालेले ओठ, चेहर्‍यावर अत्यंत निरागस भाव आणि कोणीही आलं की निर्मळ हसण्यानं स्वागत. पंधरा वर्षापूर्वी त्यांना भेटण्याचा योग सर्वप्रथम आला. त्या वेळेस त्या ८०-८५ वर्षांच्या होत्या, पण डोळे मिटून गाणं ऐकलं तर वाटावं की एखादी षोडशाच गातेय. अतिशय हालअपेष्टांतून वर आलेल्या यमुनाबाईंनी गाण्याबरोबरच त्यांच्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न केले. ह्या सगळ्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वयापरत्वे आठवणी धूसर झाल्यात. मूड लागला तर पटापट गप्पा मारणार, नाहीतर नुसतंच हसणार. त्यामुळे ही मुलाखत म्हणजे नेहमीच्या मुलाखतींसारखी नसून यमुनाबाई आणि त्यांचे कुटुंबीय लताताई, कल्पनाताई, जयवंत आणि शशिकांत ह्या सगळ्याशी मारलेल्या गप्पातून साकारलेली आहे. त्यामुळे ह्याचा साचा, भाषा नेहमीच्या मुलाखतीसारखी नाही.

प्रश्न : तुमचं लहानपण कुठं गेलं?
यमुनाबाई : वाईतच. तशी आम्ही भटकी माणसं. पण वाईत आमचं एक झोपडं होतं, तिथं राहायचो. बापानं कसरती शिकवलेल्या. कमानी टाकायच्या, कोलांट्या उड्या मारायच्या, दोन्ही हात मोकळे सोडून हनुवटीनं कांब कमानीवाणी वाकडी करायची, केसांनी दगड उचलायचे असले डोंबारी खेळ करायचो. पोट नाही भरलं तर अगदी भीकही मागायचो.

प्रश्न : मग गाण्याची सुरुवात केव्हा आणि कशी झाली?
यमुनाबाई : वयाच्या दहाव्या वर्षापासून. डोंबारी खेळातून पोट भरायचं नाही - मग शेजारच्या पालातले व्यवसाय बरे वाटले तर तेही करायचो. त्यातूनच हे गाणं सुरू झालं. माझी आई गीताबाई तर फार सुरेख गायची, तीच माझी पहिली गुरू. तिनं मला गाणं शिकवलं.


यमुनाबाईंच्या वेळी त्यांच्या आईला डोहाळे पण गाण्याचेच लागलेले. रानोमाळ भटकावं आणि स्वच्छंद गावं. त्यांना कळा सुरू झाल्या तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या सगळ्यांना फेर्‍यातली गाणी म्हणायला सांगितली आणि त्या गाण्यांच्या सुरात आपला सूर मिसळतच यमुनाबाईंचा जन्म झाला.

यमुनाबाई : मग मी 'रंगू आणि गंगू' फडावर दाखल झाले - तिथेच ठेका आणि नाचणं शिकले. नंतर वाईला परत आल्यावर 'यमुना हिरा तारा संगीत पार्टी' - अशी घरचीच पार्टी उभी राहिली आणि आमचे कार्यक्रम सुरू झाले. त्या नंतर एकदा उस्ताद फकीर महंमद पार्टी शोधत माणिक बिल्डिंगांमध्ये आले - तिथं आमचे कार्यक्रम व्हायचे. त्यांनी मला रागदारी शिकवली. पुढे धाधिंना धातिंनाच्या तालावर छ्क्कड बसवून दिली.


लावणीतला एक प्रकार म्हणजे छक्कड. ही शृंगारिक प्रकारची लावणी. उडत्या चालीमुळे छक्कड ऐकणार्‍या माणसाच्या मनात उत्साह येतो.
उस्ताद फकीर महंमदांच्या शिक्षणामुळे यमुनाबाईंचं गाणं अधिकच समृद्ध झालं. त्याला शास्त्रीय संगीताचा बाज आला. गाण्याचा भावार्थ समजून घ्यायचा आणि तो चेहर्‍यावरच्या अदाकारीनं रसिकांपर्यंत कसा पोचवायचा हे त्या शिकल्या.

प्रश्न : तुम्ही म्हटलेल्या कुठल्या लावण्या सांगू शकाल का?
यमुनाबाई : हो. बालेघाटी, छक्कड, चौकाची लावणी....
"कुठवर पाहू वाट सख्याची माथ्यावरी चंद्र ढळला, सखी बाई येण्याचा वक्त की गं टळला" ही बालेघाटी.
"अर्धा विडा आपण घ्यावा, अर्धा मला द्यावा" हे छक्कड
"ऐका चतुरा जीवलगा, नाही गेले बालपण, आहे माझी ओळख.
तुम्हीच उतरीला चिरा. कोणा विषयाची तर्‍हा" ही चौकाची.


'नेसली पितांबर जरी गं, जरी गं जरतारी लाल साडी, गं चालताना पदर झाडी', 'तुम्ही माझे सावकार, जिवलगा' ह्या त्यांच्या लावण्या, 'सजना पहाट झाली, चल उठ उठ आता सजना पहाट झाली' ही भैरवी, यमुनाबाईंच्या ह्या सगळ्या लावण्या खूप गाजल्या.

From Padmashree Yamunabai Waikar


पद्मश्री पुरस्कार, टागोर अ‍ॅकॅडमीचा जीवन गौरव, माणिक वर्मा प्रतिष्ठान, संगीत अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा लावणी सम्राज्ञी पुरस्कार, जागतिक मराठी परिषद, पहिला लोकरंगभूमी पुरस्कार, वसुंधरा पंडित पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार - हे आणि असे असंख्य पुरस्कार यमुनाबाईंना मिळालेत.

प्रश्न : केवढे पुरस्कार मिळाले आहेत तुम्हाला! पहिला पुरस्कार कितव्या वर्षी मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचा कुठला पुरस्कार वाटला?
यमुनाबाई : सरकारातले सगळे (पुरस्कार) पन्नाशी नंतर मिळाले, पण रसिकांचं प्रेम लहानपणापासून मिळालं. सम्राज्ञीदेवीची कृपा, दुसरं काय!

From Padmashree Yamunabai Waikar

प्रश्न : तशी एखादी आठवण सांगता येईल का?
यमुनाबाई : औरंगाबादला संगीतबारी चालू होती. आसपास सगळे फड लागलेले. सगळीकडे खूपच गर्दी होती, पण आमच्या फडावर एकच तिकिट विकलं गेलेलं. मी मॅनेजरला म्हणाले की त्याचे पैसे परत करून टाका, पण तो रसिक काही ऐकेना, तो म्हणाला मी इतका लांबून आलोय, मी ह्यांची लावणी ऐकल्याबिगर नाही जायचा. त्याचा आग्रह बघून वाटलं की हा खरा रसिक, ह्याच्यासाठी कार्यक्रम करायला हरकत नाही.

यमुनाबाई त्या एका रसिकासाठी गायला बसल्या खर्‍या, पण एक-दोन गाणी झाल्याबरोबर चारी बाजूनं गर्दी उसळली. कार्यक्रम तर हाऊसफुल झालाच, मैफिलही रात्रभर रंगली. सकाळी नमस्कार करून यमुनाबाई उठल्या तशा मागे इतर फडावरच्या बाया उभ्या होत्या. त्या चटचट पाया पडायला लागल्या. म्हणाल्या तुमच्या गाण्याची नक्कल करूनच तर आम्ही पोट भरतो.

प्रश्न : मग जसे हे चांगले अनुभव आले तसे वाईट अनुभवही आले का?
यमुनाबाई : होय. एका ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला आणि फडावरचे लाईट गेले. अंधार झाल्यावर प्रेक्षक दंगा करायला लागले, कनातीत घुसायला लागले. सगळ्या बाया घाबरल्या, तसं मी जोरात ओरडले "हिरा, तारा हातात काठ्या घ्या आणि बडवून काढूया ह्यांना" आणि आम्ही सगळ्यांनी आत घुसलेल्यांना धोपटून काढलं. आमचा अवतार बघून मग ती लोकं तिथून पळून गेली.

पण खूप वाईट अनुभव आले तसे अनेक चांगले अनुभवही आले. तमाशामुळे पन्नाशीत सगळ्याचा खेळ खंडोबा झालेला - अंगावर पुन्हा लक्तरं आलेली. अश्या वेळेस चिरंजीव भेटायला आले आणि त्यांनी लालबागचं थेटर उघडून दिलं आणि सगळं पुन्हा उभं करायला मदत केली.

हे चिरंजीव म्हणजे श्री मधुकर निराळे, यमुनाबाईंचे चाहते होते. त्यांनी ह्या कठीण प्रसंगातून पुन्हा ऊभं रहायला यमुनाबाईंना मदत केली. त्यानंतर त्यांच्यात मायलेकराचं नातं जुळलं. यमुनाबाई त्यांना चिरंजीव म्हणायला लागल्या आणि ते यमुनाबाईंना मातोश्री.

प्रश्न : वाईतल्या तुमच्या समाजातल्या बेघर लोकांना घर मिळवून देण्यात तुमचं बरंच योगदान आहे, त्या कामाबद्दल काही सांगाल का?
यमुनाबाई : मराठा पेपरचे एक उपसंपादक होते भावे नावाचे. त्यांची माझी जानपेहचान होती. त्यावेळी आमच्या समाजातल्या एका मुलानं शाळा काढायची म्हणून बरेच पैसे जमवले माझ्याबरोबर फिरून आणि मग पळून गेला. ती बोच मला होती. मी भाव्यांना शाळेबद्दल बोलले. ते म्हणाले शाळा कसली काढतेस, तुमच्या समाजाला स्वत:ची घरं नाहीत. तू एखादा कार्यक्रम काढ, मी मंत्री घेऊन येतो. आणि खरंच त्या कार्यक्रमाला पडवी (बांधकाम मंत्री) आले. कार्यक्रम झाल्यावर त्यांना आमची घरं दाखवली. त्यांना वाईट वाटलं, मग त्यांनी पैसे पाठवले आणि त्यातून ५० घरं उभी राहिली.

प्रश्न : बाई पंचायती समोरून गेली तरी तिला शिक्षा करायचे, अशा वेळेस गावपंचायतीच्या पंचपदी बसायचा सन्मान तुम्हाला मिळाला, तो कसा काय?
यमुनाबाई : समाजाला मदत केली असल्यानं समाजानं मला आग्रह केला की 'बाई तुम्ही पंच व्हा'. न्यायपंचायतीचं काम मी प्रामाणिकपणे केलं.

समाजासाठी घरं, आळंदीत मठ बांधणं, अनेक लोकांच्या घरच्या अडीअडचणींमध्ये मदत अशा अनेक कामांना यमुनाबाई मदत करत आल्यात. पंचपदी बसायचा मान म्हणजे त्यांनी केलेल्या कामाला लोकांनी दिलेली पावतीच

प्रश्न : पंडित बिरजू महाराज आणि तुमची जुगलबंदी झाली होती - त्याबद्दल थोडंसं सांगाल का?
यमुनाबाई : पुण्यातल्या बिरजू महाराजांच्या शिष्या प्रभाताई मराठे ह्यांनी हा कार्यक्रम आखला. महाराजांना ६० वर्ष पूर्ण होणार होती, मला ७०. ते म्हणाले बाईंच्या लावण्यांवर मी कथ्थक करणार आणि माझ्या ठुमरीवर बाई अदा करतील. परमेश्वराची कृपा, नाहीतर माझ्यासारखी अडाणी बाई त्यांच्या ठुमरीवर काय अदा करणार!

हा नक्कीच यमुनाबाईंचा विनय होता. यमुनाबाईंच्या लावणीवर बिरजूमहाराजांचं तांडव झालं आणि 'मला काय भाषा कळतेय,' असं म्हणत असल्या तरी त्या ठुमरीवर बाईंनी बसल्या जागी केलेली अदा खूप रंगली. हा कार्यक्रम प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला.

प्रश्न : एका अमेरिकन तरुणीनं तुमच्यावर डॉक्टरेट मिळवली, त्याची काही आठवण?
यमुनाबाई : किसाबाई (क्रिस्टिना) १-१.५ महिने आमच्या घरी येऊन राहिली घरच्यासारखी, तिला माझ्यावर अभ्यास करायचा होता. नाचायला, गायला शिकली. सारखी काहीतरी लिहून घ्यायची. घरकामात पण मदत करायची. जाताना तर रडायलाच लागली. म्हणाली पुढचा जन्म इथेच घेईन आणि तुझ्यासारखच बसूनशान गाणं गाईन.

प्रश्न : आयुष्यात काही करण्यासारखं राहिलं आहे का? कसली खंत?
यमुनाबाई : नाही बा. आणखीन काही करायचं नाही. पण खंत म्हणजे लावणी जिवंत ठेवली त्या कलावती पडद्या आड गेल्या. राधा बुधगावकर, रंगू-गंगु सातारकर, सत्यभामा पंढरपूरकर, गुलाबबाई संगमनेरकर, लिलाबाई यावलकर या आणि कितीतरी - त्यांच्या अदाकारीनं मैफिली रंगायच्या, पण त्यांना प्रतिष्ठा, समाधान नाही मिळालं. मला मिळालेले पुरस्कार ह्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज आहे. आणि सिनेमातल्या लावणीनं मूळ लावणी शिल्लक राहिली नाही, ते वाईट वाटतं.

नवीन पिढीला ही कला समजावी म्हणून यमुनाबाईंनी सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे घेतल्या जाणार्‍या शिबिरात ७६ ते ८० अशी पाच वर्ष लावणी शिकवली.

प्रश्न : पुढचा जन्म असेल तर पुन्हा लावणी म्हणायला आवडेल का?
ह्यावर 'पुढचा जन्म असेल तर देवाला म्हणेन की देवा चांगल्या घरात जन्माला घाल' असं उत्तर त्यांनी दिलं.
इतक्या झगडल्या, इतकं कमावलं, तरी जे सोसावं लागलं त्याचे घाव, त्या घावांच्या आठवणी कुठंतरी आत असतीलच ना! पण हे उत्तर दिलं ते ही किती सहज - जराही कुरकूर नाही, कटुता नाही. वागणंही अगदी साधं, अगदी सरळ. इतके पुरस्कार मिळाले, त्याबद्दल कुठेही गर्व नाही.

गप्पा मारताना त्यांचे भाचे शशिकांत म्हणाले, 'आत्यानं आमच्या समाजात आदर्श निर्माण केला, भाचरांना शिकवलं. आम्हा सगळ्यांना ताकीद होती की शिकलंच पाहिजे, आमच्या समाजात लग्नामध्ये असतात तशी दारू पिऊन भांडणं नकोत. बाकीच्या समाजाच्या इतर घटकांप्रमाणे आपणही शिकून सवरून शहाणं व्हायला पाहिजे. आत्यानं आम्हाला सगळ्यांना शिकवलं, उद्योगाला लावलं. आज आमच्या समाजात आमच्या घराला वाडा म्हणतात आणि नवीन सगळ्या सुधारणा इथून सुरू होतात.'

अनेकदा उतारवयातलं कलावंतांचं आयुष्य हे उपेक्षित असतं, पण आत्यानं केलेल्या त्यागाची जाणीव त्यांच्या सगळ्या घराला आहे. वयाच्या ९७ व्या वर्षीही त्यांच्या कुटुंबीयांच त्यांच्या अवतींभोवती असणं ही यमुनाबाईंची कमाई मला त्यांच्या इतर अनेक पुरस्कारांइतकीच मोठी वाटली.

यमुनाबाईं:
From Padmashree Yamunabai Waikar

यमुनाबाई आणि मुलाखतकार साधना कोठावळे:
From Padmashree Yamunabai Waikar

-------------
मुलाखतकार: साधना कोठावळे (dhanisa)
फोटो: प्रतिभा आणि विष्णू खरे
विशेष आभारः श्री शशिकांत वाईकर

यमुनाबाईंचा पद्मश्री प्रदान सोहळा इथे बघता येईल. (२०:५३)

---------------------------------------------------------------------------------------------------------------
** संयुक्ताच्या माध्यमातून स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचे एक वेगळे व्यासपीठ मायबोलीने उपलब्ध करून दिले आहे. व्यवसाय, करियर, आरोग्य, सल्ला-मार्गदर्शन, आधार, मदत, माहिती, संवादाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यक्त होण्याचे, जाणिवा प्रगल्भ करण्याचे प्रयत्न संयुक्ताच्या माध्यमातून सातत्याने चालू असतात. आज अडीचशेहून अधिक स्त्रिया संयुक्ताच्या सदस्या आहेत व या व्यासपीठाचा लाभ घेत आहेत. नव्या मैत्रिणी मिळवत आहेत. मायबोलीवरील कोणीही स्त्री सदस्या संयुक्ताचे सभासदत्व घेऊ शकते.

संयुक्ता सदस्यत्वाबद्दल अधिक माहिती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली मुलाखत आहे. यामुनाबाईंचा कुटुंबातील वावर आश्वासक आहे.

त्यांची कला पुढे कोणी चालवत आहे का?

किसाबाई Rofl

-गा.पै.

छान झाली आहे मुलाखत. आणखी विस्तृत मुलाखत चालली असती, परंतु यमुनाबाईंचे वय बघता त्यांनी एवढे सांगितले, कथन केले हेच खूप आहे! त्यांचे समाज कार्य प्रेरणादायी आहे. थँक्स नानबा व साधनाकाकू. Happy

गामा पैलवान,
पुढच्या पिढीतल्या त्यांच्या भाच्या कल्पनाताई आणि लताताई ह्या दोघींकडे ही कला आहे, पण लताताई स्वतःच आता ७० वर्षाच्या आहेत.

अत्यंत खडतर आयुष्यं. एकतर त्यांच्या ऐन बहरात, त्या कलेला प्रतिष्ठा अशी नाही.. मग उतार वयात मानसन्मान... पण सिनेमानं ही कला इतकी 'वि'कली की, अक्षरशः भ्रष्टं झाली म्हणण्याइतकी. मूळ अदाकारी जाऊन त्याचे "आयटम" झाले.
मुलाखत लहान पण चांगली झालीये. यमुनाबाईंचं खरच कौतुक आहे. आपल्या समाजासाठी किती करून ठेवलय. आपल्या आधीच्या कलाकारांचं ऋणं उरी-शिरी वागवणार्‍या ह्या लावणीसम्राज्ञीला माझे लाख दंडवत.
'आहे ते राखुन, समॄद्धं करण्याची बुद्धी दे, माये'... इतकच मागेन त्यांच्याकडे.

मस्त झालीय मुलाखत. त्यांच्याकडून, त्यांच्या इतर साथी कलाकारांकडून लावण्यांचे शब्द, चाली, ठेके, नाचाचा सराव , दागिने या सगळ्यांची माहिती रेकॉर्ड करुन ठेवली पाहिजे.

हो मेधा, मलाही तसच वाटलं!
पुढच्या वेळेस वाईला गेले की त्यांना भेटून यायचा विचार आहे..

आईला आणखीन एक दोन आठवणी टाकायच्या आहेत इथे, पण अजून जमलेलं नाही तिला..