वक्त- ’साठ’वण सिनेमांची
पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.
साठचं दशक आल्हाददायक होतं. मुगल-ए-आझम, संगम सारखे भव्य आणि नेत्रदीपक, हम दोनो, तेरे घर के सामने सारखे अवखळ आणि रोमॅन्टिक, ज्युवेल थीफ़, तिसरी मंझिल सारखे रहस्यमय आणि रोमांचक, बीस साल बाद, गुमनाम सारखे गूढ आणि संगीतरम्य, बंदिनी, गाईडसारखे संवेदनशील, पाकिझा, साहिब बिबी और गुलामसारखे काव्यमय सिनेमे साठच्या दशकाला झगमगते चांद लावून गेले, ज्यांची रोशनी अजूनही त्याच तेजाने झळाळते आहे.
यातला प्रत्येक सिनेमा पुन्हा पुन्हा पहावा आणि प्रत्येक वेळी त्यात काहीतरी नव्याने सापडावे. यातल्या प्रत्येक सिनेमावर, त्यातल्या अभिनेता अभिनेत्रींवर, कथानकावर, दिग्दर्शनावर, संगीतावर आजवर अनेकांनी अनेकदा लिहिलं आहे आणि तरीही अजून खूप काही सांगण्यासारखे, लिहिण्यासारखे राहून गेले आहे असे पुन्हा पुन्हा वाटावे.
असं असूनही साठच्या दशकातल्या सिनेमांवर लिहीताना मला पहिल्यांदा आठवला तो ’वक्त’च. काय जादू होती या सिनेमाची?
सिनेमांना पर्सनॅलिटी आहे असं मानलं तर ’वक्त’ ला निर्विवादपणे स्टाईलिश, ग्लॅमरस, फ़ॅशनेबल आणि ट्रेन्डसेटर पर्सनॅलिटी बहाल होईल.
’वक्त’ पहिल्यांदा पूर्णपणे पाहीला अर्थातच टीव्हीवर. साठच्या दशकातले सिनेमे प्रत्यक्ष पडद्यावर झळकताना बघण्याचे भाग्य आमच्या पिढीला लाभले नाही. सगळे भव्य, नेत्रदीपक इत्यादी सिनेमे टीव्हीच्या सोळा-अठरा इंची पडद्यावरच पहाता आले. कधीतरी मॅटीनीला लागणारे सिनेमे आणि हल्ली मुगल-ए-आझम, हम दोनो, नया दौर रंगीत होऊन पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकवले गेले ते अपवाद सोडून. मात्र त्याच्या कितीतरी आधीपासूनच छायागितात ’वक्त’ची गाणी अनेकदा पाहिली होती. विशेषत: ’आगे भी जाने ना तु..", ’कौन आया के निगाहोंमे चमक जाग उठी..’ आणि ’ऐ मेरी जोहराजबी..’ ही गाणी.
’आगे भी..’ गाण्यातली दुनिया अद्भूत होती. पुढे काय होणार माहीत नाही, मागे काय झालय आठवत नाही, आत्ताचा हा क्षणच तेव्हढा खरा.. साहीरने हे गाणं टीव्हीच्या पडद्यावर नजर चिकटवून बसलेल्या माझ्यासाठीच लिहिलं असावं इतकी मी या गाण्याच्या प्रत्येक कडव्यात, प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दांत गुंतून गेलेली आठवतेय. म्हणजे आशाचा आवाजबिवाज किंवा रवीचं संगीत वगैरेमधे नाही. ते थोरच. पण ते सगळं नंतर. त्यावेळी मोहात पाडायचा तो त्या गाण्यातला माहोल.
आगे भी जाने ना तु.. गाण्याचं चित्रिकरण अत्यंत ’हॅपनिंग’ आहे. गाण्यातून ’कथा’ पुढे जाणं, गाण्यातल्या प्रत्येक ओळीत काही ना काही चित्तथरारक घडणं हे एक आणि दुसरं त्यातला देखणेपणा (खरं तर हा देखणेपणा ’वक्त’च्या सगळ्याच गाण्यांचं, आख्ख्या सिनेमाचंच प्रमुख वैशिष्ट्य. पण ते नंतर) अनुभवणं.
एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलातली आलिशान बॉलरुम शोभावी अशा हॉलमधे हे गाणं सुरु असतं. तो चिनॉयसेठचा रहाता बंगला असतो. पार्टीत हातात माईक घेऊन गाणारी ऍन्ग्लो इंडियन क्रूनर, गाण्याच्या तालावर नृत्य करणारे सोफ़िस्टीकेटेड, उच्चभ्रू स्त्री-पुरुष असा एकंदरीत माहोल. जस जसं गाणं पुढे सरकत जातं तसा हा माहोल असा काही खुलत जातो की बास.
पार्टीत राजकुमार कोण्या राजघराण्यातल्या शशिकलाला मिठीत घेऊन नृत्य करत आहे. अर्थात नृत्य हा एक बहाणा आहे, खरं तर तो तिच्या गळ्यातला रत्नजडीत (पचास लाखसे भी कई ज्यादा) हिर्याचा हार चोरण्याची संधी साधू पहातोय. या प्रसंगाच्या किनार्या किनार्याने इतरही काही घटना पार्टीत घडत जातात.
ड्रायव्हर असलेल्या शशी कपूरवर प्रेम करणारी श्रीमंत घरातली शर्मिला टागोर त्याच्याशी बोलायची संधी शोधू पहात असते, तो बाहेर कारपार्किंगमधे मालक चिनॉयसेठची गाडी राखत उभा असतो. साधना आणि सुनील दत्त एकमेकांच्या संगतीत बाकी सगळ्या दुनियेला विसरुन जाऊन, कारंजाचे तुषार झेलत गप्पांमधे मग्न झालेले असतात.
अकस्मात शशी कपूरची आजारी आई आजारी असते ती ’सिरियस’ होते. एक जण धावत धावत शशी कपूरला ती बातमी सांगायला येतो, शशी कपूर कावराबावरा होत आत जाऊन चिनॉयसेठची घरी जाण्याची आणि सोबत गाडी घेऊन जाण्याची परवानगी घेऊन घाईघाईने घरी पोचतो. घरी डॉक्टर आलेले असतात. आईची ट्रीटमेन्ट चालू होते. इकडे चिनॉयसेठने पाळलेला गुंड पार्टीत आधीच दारु पिऊन झोकांड्या खात घुसतो, साधनाला छेडायला लागतो. सुनील दत्त ते पाहून भडकतो. मग त्या दोघांची हातापाई. गुंड चाकू काढतो. राजकुमार मधे पडतो. मग त्यांची मारामारी. राजकुमार गुंडाला मै तुम्हे जानसे मार डालूंगा अशी धमकी देतो ती पार्टीतले सारे लोक ऐकतात (जनाब पॉइन्ट नोट किया जाये. नंतरच्या घटनांशी याचा जवळचा संबंध आहे). पार्टी फ़िसकटते. चिनॉयसेठ भडकतो. वगैरे वगैरे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ऍन्ग्लो इंडियन क्रूनर आपली हातात माईक घेऊन संथपणे झुलत गातच असते.. ये पल गवाना ना, ये पलही तेरा है..
गाणं इतक्यांदा पाहीलं की आता कोणत्या ओळीवर यातला काय प्रसंग घडणार हे तोंडपाठ.
नायक नायिकांच्या वेशभुषेमुळे सिनेमा इतका देखणा बनू शकतो हे पहिल्यांदा लख्खपणे उमगलं ’वक्त मधूनच. ही किमया चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनरची म्हणजेच भानू अथैयांची. भानूजींनी ’वक्त’मधे कमाल केली होती. साठच्या दशकाचा ट्रेडमार्क झालेले, नंतर जवळपास प्रत्येकच चित्रपटांमधून आपल्याला दिसलेले पंजाबी तंग चुडीदार, त्यांवरचं कशिदाकाम, मोत्यांचं भरतकाम, अनोख्या पद्धतीत नेसलेली साडी, साड्यांचे पेस्टल कलर्स, बुफ़ॉं हेअरस्टाईल, खड्यांचे नाजूक, चमचमते दागिने या सर्वांची सुरुवात ’वक्त’ पासून झाली.
वक्तने सिनेमांच्या वेशभुषेचा संपूर्ण चेहरामोहोराच बदलला आणि त्याचा ठसा या पुढच्या सर्व दशकांवर ठळकपणे पडला.
१९६५ साली आलेल्या ’वक्त’ने पुढच्या काळातल्या चित्रपटांमधे त्यानंतर वारंवार आढळून येणार्या ज्या अनेक गोष्टींची पहिल्यांदा सुरुवात करुन दिली त्यातली स्टायलिश, फ़ॅशनेबल लूक ही केवळ एक गोष्ट.
साठच्या दशकात दोन हिरो-एक हिरॉइन (संगम) किंवा एक हिरो-दोन हिरॉइन्स (हम दोनो) असणं कॉमन होतं पण एकाच सिनेमात त्या काळात टॉपला असलेले स्टार्स इतक्या मोठ्या संख्येने चमकवण्याची म्हणजेच ‘मल्टीस्टारर फ़िल्म्स’ची सुरुवात वक्तपासून झाली. यात एकाचवेळी सहा स्टार्स होते. बलराज सहानी, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर. यापैकी शर्मिला टागोरचा हा जेमतेम दुसराच सिनेमा. आदल्याच वर्षी झळकलेल्या ’काश्मिर की कली’ ने तिला स्टार बनवलं होतं.
’लॉस्ट ऍन्ड फ़ाउंड’ हा नंतरच्या काळात घासून घासून अतीगुळगुळीत बनलेल्या फ़ॉर्म्युला पहिल्यांदा वक्तमधेच वापरला.
पळणार्या लहान मुलाच्या पायांवर कॅमेरा रोखून नंतर तो मोठा झालेला, नायकाच्या रुपात दाखवणे ही स्टाइलही यश चोप्रांनी पहिल्यांदा हिंदी सिनेमात ’वक्त’द्वारे दाखवली.
थरारक कोर्टरुम क्लायमॅक्स हाही या सिनेमातून रुजवलेला पायंडा.
तसं पाहीलं तर बी.आर.चोप्रा नवं काहीतरी करणारे म्हणून कायमच प्रसिद्ध होते. साठच्या दशकातच त्यांनी एकही गाणं नसलेले दोन सिनेमे प्रसिद्ध करण्याचं धाडस दाखवलं होतं (कानून आणि इत्तेफ़ाक).
चोप्रांना सामाजिक आशयाच्या, समस्याप्रधान कथानकाला मनोरंजनाच्या अवगुंठनामधून पेश करण्याची हातोटी अचूक जमलेली होती. पटकथा, अभिनय, संगीत, दिग्दर्शन हे चारही खांब भक्कम असले की सिनेमाचा डोलारा यशस्वीपणे पेलला जातोच हे त्यांनी या आधीच्या गुमराह, नया दौर, साधना, धूल का फ़ूल मधून सप्रमाण सिद्ध करुन दाखवले होते.
वक्तमधे बी.आर.च्या सामाजीकतेला साथ मिळाली या फ़िल्मद्वारे पहिल्यांदा स्वतंत्र दिग्दर्शन करणा-या यश चोप्रांच्या आधुनिक, नव्या विचारांची आणि ताज्यातवान्या टवटवीत सौंदर्यदृष्टीची.
यश चोप्रांच्या या पहिल्याच दिग्दर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वक्त त्या काळातला ह्यूज ब्लॉकबस्टर ठरला.
यश चोप्रांच्या पुढच्या सर्व यशस्वी फ़िल्म्समधल्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांची- आगळं कथानक, थरारक क्लायमॅक्स, उत्कृष्ट गाणी, काव्यमय संवाद, नयनरम्य लोकेशनवर शूटींग, लेटेस्ट, अभिरुचीसंपन्न फ़ॅशन्सनी नटलेले देखणे, अभिनयसंपन्न, त्या त्या काळातले टॉप मल्टी स्टार्स, यांची रुजुवात ’वक्त’ने करुन दिली.
यश चोप्रांनी ’वक्त’ मधून प्रेक्षकांना ज्या ऐश्वर्यसंपन्न जीवनशैलीची झलक प्रत्येक दृष्यांमधून दाखवली ती त्या काळातल्या प्रेक्षकांकरता स्वप्नवत होती. आधी कधीही ही दुनिया हिंदी सिनेमाच्या, तेही रंगीत पडद्यावरुन, प्रेक्षकांना दिसली नव्हती. वॉल टू वॉल उंची, मऊशार, लालभडक रुजाम्यांनी सजलेले बंगले, ज्यांच्या आवारात स्विमिंग पूल आणि आवारालगत बोटींग करता येतील असे रम्य तलाव आहेत. रेड-यलो स्पोर्ट्सकार उडवत रेसिंग करणारी, डॅशिंग तरुण मुलं, सकाळी शॉर्ट्स घालून बंगल्यातल्या हिरवळीवर नाजूकपणे बॅडमिंटन खेळणार्या, गार्डन चेअरवर बसून, बोनचायनाच्या टीसेटमधून चहा पिणार्या, शिफ़ॉनच्या तलम साड्या नेसून किंवा फ़ॅशनेबल चुडीदार घालून, लाल रुजाम्यांवर पहुडून दुपारी कादंबर्या वाचणार्या, गुलाबांच्या परड्या नीट लावून ठेवण्याचे, रेशमी, सळसळते पडदे बाजूला ओढण्याचे ’काम’ करणार्या, मनोरंजनासाठी पियानो छेडणार्या, बर्थडे पार्ट्यांमधून नाजूक हसत प्रेझेन्ट्स स्विकारणार्या आणि मेणबत्त्या विझवून केक कापणार्या, स्वीमसूट घालून पोहायला जाणार्या, पिकनिक्सना जाणार्या तरुण, देखण्या मुली- हे सगळं ’वक्त’ मधून चोप्रांनी सहजतेनं दाखवलं.
मात्र ’वक्त’मधे हा दिखावा, भपकाच केवळ नव्हता. ’वक्त’चं संगीत, दिग्दर्शन, कथानक, स्क्रीप्ट, अभिनयाची बाजू तितकीच तगडी होती. ब्रिटिश फ़िल्म इन्स्टीट्यूटमधे जी दहा टॉप हिंदी फ़िल्म्सची स्क्रीप्ट्स ठेवलेली आहेत त्यातलं एक ’वक्त’चं आहे. ओरिजिनॅल्टी हा कथेचा स्ट्रॉन्ग पॉइन्ट होता.
अख्तर मिर्झांची कथा काळाचा अगाध महिमा दर्शवणारी, एका मोठ्या कालखंडातून प्रवास करणारी आहे. मिर्झांचं फ़ाळणीपूर्व आयुष्य पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात गेलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात केदारनाथ ऍन्ड सन्स नावाची त्यांची कार्पेट बनवण्याची मोठी फ़र्म होती. क्वेट्टाच्या भूकंपाच्या तडाख्यात त्यांच्याही कुटूंबाची वाताहत झाली. पुढे अनेक वर्षांनी योगायोगाने त्या कुटूंबातील सदस्य पुन्हा एकत्र आले. याच आठवणींवरुन मिर्झांनी ’वक्त’ची कथा लिहिली. बी.आर.चोप्रांचं बालपणही लाहोरला गेलं असल्याने त्यांना या कथेविषयी आत्मभाव वाटला. या कथानकावर भव्यदिव्य, रंगीत चित्रपटाची निर्मिती करण्याचं त्यांनी ठरवलं. पटकथा-संवाद लिहिण्याचं काम त्यांनी अख्तर उल इमान यांच्याकडे सोपवलं (हे अमजदखानचे सासरे).
इमान यांनी कथानकाला कोर्टरुम ड्रामा, खूनाचं रहस्य, दैववादाची जोड दिली.
स्टोरी सुरु होते लाला केदारनाथांच्या नव्या दुकानाच्या, नव्या हवेलीच्या उद्घाटन प्रसंगाने.
त्याच दिवशी त्याच्या तिनही मुलांचा वाढदिवसही असतो. लाला केदारनाथ आपल्या स्वकतृत्वाने मिळवलेल्या यशाने संतुष्ट, अभिमानाने ओतप्रोत आहे. आनंदाने काठोकाठ भरलेला आहे. उत्सवी वातावरण आहे, तो आणि त्याची पत्नी लक्ष्मी नातेवाईक, शेजार्यापाजार्यांच्या स्वागतात मग्न आहेत. जल्लोश चालू आहे. गाणी बजावणी सुरु आहेत. लालाजींच्या रोमॅन्टीक ’ऐ मेरी जोहरजबी..’मुळे लक्ष्मी लाजून लालेलाल होते आहे.
कोणीतरी काळाचा महिमा वर्तवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लाला त्याला धुत्कारतो. जणू काळ ते ऐकतो आणि लाला केदारनाथला आपल्या सामर्थ्याची किंचितशी चुणूक दाखवायचं ठरवतो. त्याच रात्री भूकंप होतो. लालाची हवेली पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते. मुलं, पत्नी हरवतात. लाला वणवण करत त्यांना शोधायला भटकत रहातो.
लक्ष्मीच्या कुशीतला धाकटा मुलगा तिच्यासोबतच रहातो. ते निर्वासितांच्या छावणीत रहायला लागतात, त्यांना दूर कुठेतरी हलवण्यात येते.
मोठा मुलगा अनाथालयात आहे असं समजतं म्हणून लाला तिथे पोचतो पण नेमका त्याच दिवशी तो मुलगा तिथल्या छळाला कंटाळून पळून जातो, पुढे चोरीमारी करुन पोट भरतो, चिनॉयसेठ त्याला आपल्या पंखाखाली घेतो.
इकडे लाला त्या अनाथालयातल्या लोभी मॅनेजरचा आपल्या मुलाचा छळ केला म्हणून चिडून खून करतो आणि तुरुंगात जातो.
काळाची पावलं वेगात पडत असतात. वीस वर्षं उलटतात.
मधल्या रवीला एक प्रेमळ, श्रीमंत जोडपं दत्तक घेतं. तो वकिल बनतो. श्रीमंत कुटुंबातली साधना त्याची मैत्रिण आहे, दोन्ही कुटुंबांचे स्नेहसंबंध आहेत.
सोफ़िस्टिकेटेड चोर बनलेला स्टायलिश राजा जज्जाच्या मुलीच्या म्हणजे साधनाच्या गळ्यातला नेकलेस चोरतो, तेव्हा पोलिस इन्स्पेक्टर (अर्थातच जगदीश राज) त्याला सल्ला देतो की परत कर तो नेकलेस जर चोरला असशील तर. कारण जज्ज आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवसाला भेट म्हणून घेतलेला नेकलेस चोरीला गेला हे गप्प बसून सहन करणार नाहीत.
राजा वाढदिवसाच्या पार्टीत जाऊन नेकलेस आपल्याला मिळाला असं सांगत परत करतो. आणि साधनाच्या प्रेमात पडतो. तिच्या आधीपासूनच प्रेमात असलेला रवी त्याला आपला प्रतिस्पर्धी वाटतो.
राजा-रवी-साधना यांच्यातला प्रेमाचा त्रिकोण, काही प्रसंग नंतर यश चोप्राने जसेच्या तसे त्रिशुलमधे वापरलेत. अमिताभ-शशी-हेमा त्रिकोणात. त्यातही अमितभ आणि शशी एकमेकांचे भाऊ असतात हे दोघांना माहीत नसतं. अमिताभला जेव्हा ते कळतं तेव्हा तो स्पर्धेमधून बॅक आऊट होतो. इथे राजालाही कळतं रवी आपलाच भाऊ आहे, जेव्हा तो त्याचा खून करायला बेडरुममधे रात्री शिरतो आणि टेबलावर रवीचा बालपणातला फोटो बघतो तेव्हा. पण तो ते रवीला सांगत नाही. अबोलपणे त्याच्या सोबत रहातो.
पुढे राजावर चिनॉयसेठ स्वत: केलेल्या खूनाचा खोटा आळ घालतो तेव्हा रवीच त्याची बाजू लढवून त्याला खूनाच्या केसमधून सोडवतो. शेवटचा हा कोर्टड्रामा अफ़लातून आहे.
इथेच लाला केदारनाथ आणि त्याच्या तिनही मुलांची, पत्नीची पुनर्भेट होते.
खरं तर हा अविश्वसनीय प्रकार पण स्क्रीप्टमधे सगळे सुटे धागे इतक्या कौशल्याने या शेवटच्या प्रसंगात खूबीने जोडले आहेत की हा प्रसंग बघताना जराही अतार्किक वाटत नाही.
ढोबळ कथानक या मार्गाने जात असलं तरी खरे रंग भरतात यातले बारीकसारीक प्रसंग. राजा-चिनॉयसेठमधले, रेणू-रवीमधले, रवी-राजा-मीना, राजा-रवीमधले. या प्रत्येक प्रसंगातले संवाद, अभिनय लाजवाब.
वक्त मधे लाला केदारनाथ आणि त्याची तीन मुलं यांच्या भूमिकांकरता चोप्रांच्या मनात पृथ्वीराज कपूर आणि त्याची तीन मुले-राज, शम्मी आणि शशी कपूर यांना घेण्याचं पक्क होतं. दरम्यान त्यांनी ही कथा बिमल रॉयना वाचून दाखवली आणि त्यांचं मत विचारलं. बिमलदांनाही कथेतला ड्रामा, दैववाद हे सगळं आवडलं. फ़क्त त्यांनी स्टारकास्टबद्दल मुलभूत शंका व्यक्त केली. कपूर बापबेटे किंवा भाईभाई एकमेकांसमोर आल्यावर, परस्परांना चेह-यामोह-याने ओळखू शकणार नाहीत यावर प्रेक्षकांचा कदापी विश्वास बसणार नाही असं त्यांचं मत त्यांनी चोप्रांकडे व्यक्त केलं. त्यांनाही ते पटलं. त्यांनी ’वक्त’चं नव्याने कास्टींग केलं. आणि त्यानंतर ते इतकं अचूक ठरलं की आज ’वक्त’ त्याकरता प्रसिद्ध आहे. आदर्श कास्टींग.
बलराज सहानी लाहोरच्या सरकारी कॉलेजात चोप्रांचे सहाध्यायी होते. बलराजजी चांगल्या रोलच्या प्रतिक्षेत आहेत हे चोप्रांना ठाऊक होते. त्यांनी ’वक्त’ मधल्या मध्यवर्ती लाला केदारनाथ यांच्या भूमिकेकरता बलराज सहानींची निवड केली ती किती अचूक ठरली हे पुढच्या काळात सिद्धच झाले. प्रेक्षकांनी चोप्रांना त्याकरता मनोमन धन्यवाद द्यावेत अशा ताकदीने बलराज सहानींनी ही भूमिका वठवली. काळाने श्रीमुखात भडकाविलेल्या सामान्य माणसाचं रुप बलराज सहानींच्या लाला केदारनाथमधून अक्षरश: जिवंत झालं.
एका दृश्यात लाला चौपाटीवर बसून चुपचाप चणे खात असतो. एकेकाळचा गडगंज, आलिशान हवेलीचा मालक, तीन सुपुत्र, गुणी बायको असलेला लाला आता सर्वस्व गमावून, काळाच्या एका थपडीत कोलमडून जाऊन असा चौपाटीवर चणे खात पोट भरतोय, हे दाखवताना त्याच्या चेहर्यावर जी सुन्न उदासी आणि हताश परिस्थिती शरणता आहे ती बघून अंगावर काटा येतो. काळजातल्या सगळ्या जखमा चेहर्यावर वागवत लाला तिथे बसलेला असतो.
शेजारीच त्याचा मुलगाही असाच सुन्न, उदास होऊन बसलेला असतो. त्यालाही नुकतंच आपण आपल्या आईबापांच्या पोटचा सख्खा नाही तर दत्तक मुलगा आहोत हे सत्य उमगलय, आपला सख्खा बाप शेजारी बसलाय हे त्याला आणि ज्या आपल्या मुलांना शोधायला आयुष्यभर वणवण केली, तुरुंगातही जाउन आलो, तो असा शेजारी, हाताच्या अंतरावर बसला आहे हे लालाजींनाही माहीत नाही.
यश चोप्रांनी एकही संवाद नसलेला हा सीन विलक्षण परिणामकारकरित्या जमवलाय!
अजून एका प्रसंगात जेव्हा लाला केदारनाथ तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आणि खुल्या आकाशाकडे बघत मोकळा श्वास घेताना गलबलतो आणि शिपायाला सांगतो की तुरुंगात असताना बायको मुलांना दैवाच्या हवाली करुन टाकलं होतं मी, आता पुन्हा या विशाल दुनियेत आलोय, कुठे आणि कसा शोधणार मी त्यांना..
बलराज सहानींच्या अभिनयातली, त्यांच्या संवाद उच्चारणातली सहजता, नैसर्गिकता या प्रसंगात बघावी फ़क्त.
राजकुमार पूर्वी पोलिस ऑफ़िसर असल्यापासून चोप्रांना परिचीत होता. त्याच्या हट्टी, हेकेखोर स्वभावाचाही त्यांना चांगलाच परिचय होता. ’धूल का फ़ूल’ मधे त्यांनी आधी राजकुमारलाच घेतले होते, मात्र त्याच्या आडमुठ्या स्वभावाला वैतागून त्यांनी ती भूमिका रजेन्द्र कुमारला दिली. ’वक्त’मधला ’राजा’चा रोल तरीही राजकुमारनेच करावा अशी चोप्रांची इच्छा होती. त्याच्या व्यक्तिमत्वाला ही भूमिका साजेशी आहे असं त्यांना प्रामणिकपणे वाटत होतं खरं तर धर्मेन्द्रही ही भूमिका करायला उत्सुक होता. पण चोप्रांनी राजकुमारकडेच ’राजा’ची भूमिका सोपवली आणि राजकुमारने त्या भूमिकेचं सोनं केलं.
इमान यांनी लिहिलेल्या संवादांना त्याने आपल्या खर्जातल्या आवाजाने आणि ऍटीट्यूडने बहार आणली. ’ये चाकू है बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है," किंवा "चिनॉयसेठ, जिनके अपने घर शीशोंके होते है, वो दुसरोंपर पत्थर नही फ़ेका करते," या संवांदांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
राजकुमार पुढील काळात खर्या अर्थाने ’राजा’च्या भूमिकेबाहेर येऊच शकला नाही, इतका त्याच्यावर या भूमिकेचा शिक्का बसला.
चि्नॉयसेठच्या भूमिकेत रेहमानसारख्या बुजूर्ग अभिनेत्याने मस्त रंग भरलेत. त्याचा उजवा हात राजा आणि डावा हात मदनपुरीने रंगवलेला एक मवाली गुंड.
बाकी सुनील दत्तने उमदा, बडबडा, जवां दिल, वकिल रवी, जो राजाला म्हणजे आपल्या मोठ्या भावाला खूनाच्या केसमधून सोडवतो तो मस्त रंगवला. त्याचे सारखे ’चष्मे बद्दूर, गुले गुलजार..’ म्हणणे जरा डोक्यात जाते, पण ठीक आहे.
साधना तर माझी आवडती हिरॉइन. ब्लॅक ऍन्ड व्हाईट सिनेमांमधली तिच्या देखण्या चेहर्याची जादू रंगीत पडद्यावरही तितकिच खुलली. जुन्या हिरॉइन्सचा प्लस पॉईन्ट असलेली व्यक्तिमत्वातली ग्रेस साधनात पुरेपूर होती. श्रीमंत, देखण्या मीनाच्या भूमिकेत साधना अप्रतिम शोभली. वाढदिवसाच्या दिवशी तिचे प्रेझेन्ट स्वीकारताना कपाळावरच्या बटा सावरत नाजूकपणे ’थॅन्क यू’ म्हणणे थेट रोमन हॉलिडेतल्या ऑड्रे हेपबर्नच्या स्टाईलवरुन उचलले आहे. पण तिला शोभते. तिचे स्वीमसूटमधले दृश्य सेन्सॉरने कापले होते पण रिरिलिजच्या वेळी चोप्रांनी पुन्हा ते घुसडलेच.
तीनही भावांमधला सर्वात धाकटा भाऊ विजय आईकडे म्हणजे अचला सचदेवकडेच असतो. हुषार विजय (बीए फ़र्स्ट क्लास फ़र्स्ट अर्थात) आपल्या गरीब परिस्थितीची जाणीव असलेला, आजारी, खचलेल्या आईला सांभाळणारा. त्याचा बिचारेपणा, बापुडवाणेपण, परिस्थितीची समजूत शशी कपूरने यथार्थ दाखवली. दत्तक सुनील दत्तची धाकटी बहिण रेणू म्हणजे शर्मिला टागोर गरीब विजयच्या प्रेमात पडते, त्याच्या अभावग्रस्त परिस्थितीला समजावून घेत असते, पण शशी कपूर तिला न्यूनगंडातून सतत नाकारत रहातो. रेणू विजयला हट्टाने कार ड्रायव्हिंग शिकवते आणि नंतर आपल्या आजारी आईला उपचाराकरता मुंबईला आणावे लागल्यावर पोट भरण्याकरता विजयला हे ड्रायव्हिंगच उपयोगी पडते, त्याला चिनॉयसेठकडे ड्रायव्हरची नोकरी मिळते.
एकदा त्याच्या कारमधे मागे नेमकी रेणूच बसते, त्या सिनमधे शशी कपूरने बिचारेपणा वैतागवाणा होण्याइतका खरा रंगवलाय.
शर्मिला टागोरची रेणू मस्त. तिचा नंतर अती झालेला लाडीकपणा यात जरा सुसह्य आहे. भानू अथैयाने शर्मिला टागोरचे ड्रेसेसही सुंदर केलेत. बोटीवरच्या पिकनिकच्या वेळचा तिचा गुलाबी-पांढरा फ़्रील्सचा चुडीदार, काळे कशिदाकाम केलेला पांढरा चुडीदार एलेगन्ट दिसतो. तिच्या नाजूक शरिरयष्टीला सगळे ड्रेसेस शोभतातही.
साहीर लुधियानवी आणि रवी ही जादुई जोडी चोप्रांकडे होतीच. त्यामुळे वक्तच्या संगीतयशाबद्दल आधीपासूनच कधी संदेह नव्हता. ’चलो इक बार फ़िरसे अजनबी बन जाये हम दोनो..’ सारखी जादू साहीर-रवीने ’वक्त’मधून पुन्हा एकदा दाखवली. वक्तचं टायटल सॉंग ’आदमी को चाहिए वक्त.’ तर खास साहीरचा ठसा असलेलं गाणं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच काळाची महती प्रेक्षकांना अचूक समजली. बाकी ’ऐ मेरी जोहराजबीं..’ गाण्याने घडवलेला इतिहास तर सर्वपरिचित आहेच. "हम जब सीमटके आपके..", "कौन आया के निगाहोंमे चमक..", "जब तुम मुझे अपना कहते हो, अपनेपे गरुर आ जाता है..", "दिन है बहार के.." ही गाणी खार रवीच्या शैलीतली हळुवार रोमॅन्टिक.
’वक्त’ला फ़िल्मफ़ेअरचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यश चोप्रा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री साधना, सहाय्यक अभिनेता राजकुमार, सर्वोत्कृष्ट कथा एफ़.ए.मिर्झा, संवाद अख्तर-उल-इमान असे मानाचे पुरस्कार मिळाले. पहिल्याच रंगीत सिनेमाकरता धरम चोप्रांनाही पदार्पणातच उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ़ीचा पुरस्कार मिळाला.
मला ’वक्त’ आवडतो त्याच्या स्टाईलिश, ग्लॅमरस रुपामुळे. दिग्दर्शक यश चोप्रांच्या पुढच्या सर्व सिनेमांमधे हा लुक त्यांचा युएसपी राहिलेला आहे, आणि त्याची सुरुवात झाली ’वक्त’ पासून. मात्र वक्तच्या स्टाईल आणि ग्लॅमर कोशंटचं निम्म क्रेडीट नि:संशयपणे घेऊन जाते सिनेमाची कॉस्च्युम डिझाईनर भानू अथैया.
साठच्या दशकातल्या सिनेमांची जादू, तसे सिनेमे पुन्हा आजतागायत निर्माण होऊ शकले नाहीत. पुन्हा निर्माण होतील याची जराही शक्यता नाही. सत्तरच्या दशकातल्या अनेक सिनेमांचे रिमेक झाले पण या सिनेमांना कोणी अजूनही हात लावू धजलेला नाही. साहजिकच आहे, कथानक जसंच्या तसं उचलू शकाल, पण बिमल रॉय, विजय आनंद, चोप्रांसारखे दिग्दर्शक, आसिफ़, अमरोहीसारखे निर्माते, नौशाद, एस.डी., शंकर जयकिशन, रवी, आर.डी. यांसारख्या संगितकारांना, ज्यांचा जादुई स्पर्श सिनेमा निर्मितीला लाभलेला होता ते कुठून आणणार? देव आनंद, शम्मी कपूर, राज कपूर, नूतन, मधुबाला, वैजयंती माला, मीना कुमारी, वहिदा, साधना सारख्या देखण्या, अभिनयसमृद्ध अदाकारी कोण करणार? या दिग्गज कलावंतांच्या, दिग्दर्शक, संगितज्ञांच्या कारकिर्दीतला हायेस्ट पीक परफ़ॉर्मन्स साठच्या दशकाने पाहीला होता.
=========================================================================
संदर्भ- विनोद मेहता (इंडियन सिनेमा)
भावना सोमैया ( दी गोल्डन एरा)
अरुणा अंतरकर
इंटरनेट डेटा बेस- विकिपिडिया, आयएमडिबी आणि इतर
सुंदर लिहिलयेस शर्मिला ! तो
सुंदर लिहिलयेस शर्मिला !
तो वरचा रेड वेलेवेट वर सुखाने पहुडलेल्या साधनाचा फोटो पण खूप सुरेख , एकदम चोप्रांची आयडिअल हिरॉइन :).
भानु अथैय्यांचे ड्रेसेस, त्यांएने बनवलेली ट्रेड मार्क स्टाइल तशी आयकॉनिक फॅशन ट्रेंड कुठलाच काळ तितकी कयम नाही ठेउ शकला.
साडीच्या स्टाइल्स पण एक से एक.. संगम मधली वैजयन्ती मलाची स्टाइल, "आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे "वाली मुमताज ची स्टाइल एकदम हॉट अॅन्ड हॅपनिंग..अजुनही त्या वेळाच्या फॅशन ची कॉपी पेस्ट करताना दिसतात आज कालचे डिझायनर्स !
ट्युलिप ने मागे भानु
ट्युलिप ने मागे भानु अथैयांच्या ७० च्या फॅशन वर एक लेख लिहिला होता, तो पण छान होता.
लिंक आहे का कोणा कडे, मला सापडत नाहीये.
मस्त लेख
मस्त लेख
मस्त लेख, माझा आवड्ता सिनेमा
मस्त लेख, माझा आवड्ता सिनेमा आहे हा..
वक्त से दिन और रात
वक्त से कल और आज
वक्त की हर शह गुलाम
वक्त काझर शह पे राज
आदमीसे कहे वक्त से डर कर रहे ...
काय मस्त सिनेमाची आठवण करून
काय मस्त सिनेमाची आठवण करून दिली शर्मिला.
आता पुन्हा पहावा लागणार वक्त. यूट्युब वर आहे का?
संगम, गाइड वर पण लिहा ना. हा
संगम, गाइड वर पण लिहा ना. हा लेखही सुरेख जमला आहे. त्या जोहराजबी मागच्या आठ्वड्यातच वारल्या.
'वक्त'च्या पावलावर पाऊल टाकून
'वक्त'च्या पावलावर पाऊल टाकून आलेले सगळे चित्रपट पाहू झाल्यावर वक्त पहायला मिळाला. त्यावेळी तो अजिबात आवडला नव्हता. त्यातली सगळी गाणी मात्र ऐकून पाठ झालेली होती. त्यातलं सगळ काही OTT वाटत राहिलं. पंजाबी व्यापारी साकारणारा बलराज सहानी गरजेपेक्षा जास्त लाउड आणि नाटकी वाटला. ते चित्रपटाची नायिका म्हणजे बिनडोक शोभेची बाहुली हा ट्रेंडही याच चित्रपटाने सेट केला की काय?
आता या लेखामुळे हिंदी चित्रपटांच्या इतिहासात वक्त ज्या स्थानी आहे तिथे ठेवून पहाता आला पाहिजे.
सुंदर, अभ्यासपूर्ण लेख!
सुंदर, अभ्यासपूर्ण लेख!
मस्त लिहिलंय अगदी ,
मस्त लिहिलंय अगदी , नेहमीप्रमाणेच ! पारायणं केलेली आहेत या चित्रपटाची एके काळी , आता अलीकडे पाहिला नाहीये ब-याच दिवसात, आता आवडणार नाही अशी भीती वाटते
मला ' आगे भी जाने ना तू ' ऐकायलाच आवडायचे याआधी , मात्र आता तुमच्या लिखाणामुळे पाहायलाही आवडणार असे वाटते 
सुंदर रसग्रहण. आवडले. आगे
सुंदर रसग्रहण. आवडले.
आगे भी..’ गाण्यातली दुनिया अद्भूत होती. >>>>खरंय!
पुढे ही अनभिज्ञ तू, मागे ही अनभिज्ञ तू
जे जे आहे ते, पळ हाच आहे
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
अनोळखी छायेचा, वाटेत डेरा आहे
अदृष्य हातांचा, आम्हाला घेरा आहे
पळ हा प्रकाशाचा, बाकी अंधेर आहे
पळ हा गमवू नको, तो पळ तुझा आहे
राहणार्या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
ह्या क्षणीच्या तोर्याने, बैठक सावरलेली
ह्या क्षणीच्या ऊर्जेने, धडधड चालवलेली
ह्याच्या अस्तित्वाने, दुनिया आमची आहे
शतके ओवाळून ह्या, पळा दिली आहेत
राहणार्या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
ह्या क्षणीच्या छायेत, आपले ठिकाण आहे
या पुढल्या काळाचे, फसवे निशाण आहे
कोण पाही भविष्य, कोण जाणी भविष्य
ह्या क्षणानेच मिळेल, जे तुला मिळवायचे
राहणार्या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
हे गाणे राहणार्या प्रत्येकाचीच कथा सांगत जाते.
खूप सुंदर लिहिले आहे अभिनंदन
खूप सुंदर लिहिले आहे
अभिनंदन शर्मिला
अप्रतिम लिहिले आहे! आगे भी
अप्रतिम लिहिले आहे!
आगे भी जाने न तू बद्दल प्रचंड अनुमोदन. माझ्या आठवणीतले हे पहिले गाणे जे पडद्यावर कोणी नायक-नायिका गात नाही, त्याच्या या वेगळेपणाने ते आधी लक्षात राहिले होते मग आशाचा आवाज आणि शब्दही आलेच.
मी मात्र 'वक्त' मोठ्या पडद्यावर पाहिला. सोलापूरात 'सेंट्रल' नावाचे एक अत्यंत गचाळ थेटर होते तिथे कायम जुने सिनेमे लागायचे.
छानच!!! >>साठच्या दशकातल्या
छानच!!!
>>साठच्या दशकातल्या सिनेमांची जादू, तसे सिनेमे पुन्हा आजतागायत निर्माण होऊ शकले नाहीत. पुन्हा निर्माण होतील याची जराही शक्यता नाही
अगदी. आजही वय झालेला नवरा बायकोला उद्देशून गाणं म्हणतो ते "ए मेरी जोहरा जबीं...........तू अभी तक है हसीं और मै जवाँ..." हेच. अशी अक्षरशः शेकडो उदाहरणं देता येतील. या काळाला हिंदी चित्रपटांचं सुवर्णयुग का काय म्हणतात ते उगाच नाही.
हा चित्रपट मला सुदैवाने
हा चित्रपट मला सुदैवाने थेटरात पाहायला मिळाला. सांताक्रुझच्या पश्चिमेच्या मिलन आणि पुर्वेच्या रुप टॉकिजमध्ये जुने चित्रपट लागत असत. जवळजवळ १८ वर्षांपुर्वी हा चित्रपट मिलनला लागलेला. तेव्हा पाहिलेला. अप्रतिम. माझ्याकडे डिवीडीही आहे याची, कधी अगदीच उदास झाले तर हा चित्रपट लाऊन बसते
मध्यंतरी एफेमवर साधनाची मुलाखत होती. त्यात तिने या चित्रपटाच्या आठवणी सांगितलेल्या. एक आठवण त्यातल्या ड्रेसेसची. त्या काळी चुडीदार हा केवळ चित्रपटातल्या कोठ्यावरच्या सिन्समध्ये घालावयाचा ड्रेस होता. त्यामुळॅ चोप्रा आपल्या हिरोईनीला तो घालु देणे शक्य नव्हते. त्यांना गळी हा ड्रेस उतरवण्यासाठी साधनाने त्यांना घरी चहाला बोलावले आणि तेव्हा तिने हा ड्रेस घातला. तिच्या अंगावर तो इतका खुलुन दिसत होता की चोप्रांना ही स्टाईल चित्रपटात घेणे मान्य करावे लागले.
खरेच सुवर्णयुग म्हणता येईल असा तो काळ होता. थॅक्स शर्मिला, तुझ्यामुळे परत त्या काळात जातेय मी. आधी पाकिजा, आता वक्त... पुढे काय???
मी "साधना" ची ही पोस्ट बघून
मी "साधना" ची ही पोस्ट बघून आधी जाम दचकलो.
मंदार आणि ती "शर्मिला" ला
मंदार
आणि ती "शर्मिला" ला थॅन्क्स देत आहे 
जबरी जमलाय हा ही लेख! वक्त मलाही आवडतो. गाण्याचे शब्द, संगीत, सादरीकरण सगळेच मस्त जमले आहे यात.
'आगे भी...' फारच सुंदर! साहिरची शब्दरचना असली की त्याच्या प्रत्येक गाण्याला आता पुढच्या ओळीत काय सांगणार आहे ही उत्सुकता पूर्ण गाणे ओळखीचे होईपर्यंत कायम वाटत असते. फक्त ती गाणारी जे म्हणते आहे ते तिला स्वत:ला कळत नसावे असे तिच्या हावभावांवरून वाटते :). तसेच शर्मिला शशी ला माना हलवून "शोधते" तो शॉट मला नेहमीच विनोदी वाटलाय या गाण्यात
इतर गाणीही मस्तच आहेत. "कौन आया..." ची सुरूवात आणि त्याच वेळेला राजकुमारचे येणे याचे टायमिंग चोप्राने मस्त जमवले आहे. अजून लिहीतो आठवेल तसे.
अप्रतिम सुंदर रसग्रहण..
अप्रतिम सुंदर रसग्रहण..
चित्रपटापेक्षा लेखच जास्त
चित्रपटापेक्षा लेखच जास्त आवडलाय.
माधव +१. तू फार मस्त लिहीतेस
माधव +१. तू फार मस्त लिहीतेस शर्मिला.
सुंदर. शर्मिला हा रसग्रहणाचा
सुंदर. शर्मिला हा रसग्रहणाचा कारवाँ असाच चालता राहू दे
शर्मिला, सुरेख लिहिते आहेस.
शर्मिला, सुरेख लिहिते आहेस. वाचत राहणार.
व्वा सुरेख लिहलेय
व्वा सुरेख लिहलेय
शर्मिला. सुंदर लेख. हा
शर्मिला. सुंदर लेख.
हा पिक्चर टीव्हीवर बर्याचदा पाहिलेला आहे. लॉस्ट अँड फाऊंडचे इतके सिनेमे पाहिले पण हा सिनेमा लक्षात राहतो तो संवादामुळे आणि स्टायलिश ट्रीटमेंटमुळे.
अजून लिवा.
सुरेख लेख हा पण! पुढचे लेख
सुरेख लेख हा पण!
पुढचे लेख वाचायची उत्सुकता आहे.
१०० नम्बरी सोन म्हणतो तसा
१०० नम्बरी सोन म्हणतो तसा कसदार लेख आहे.
हा चित्रपट मात्र दुरदर्शनवरच पहायला मिळाला.
शर्मिला, सुंदर चित्रपटावरील
शर्मिला,
सुंदर चित्रपटावरील सुंदर लेख! हा चित्रपट माझ्या वडिलांचा अत्यंत आवडता आहे. त्यांच्यासोबत चित्रपटगृहात अनेकवेळा बघितला आहे. मध्यंतरी एका रविवारी दुपारी दूरदर्शनवर दाखवला होता. तो पाहून माझा दहावीतला लेक राजकुमारच्या डायलॉगच्या भयंकर प्रेमात पडला! उठता बसता तेच डायलॉग! त्यामुळे हा चित्रपट कालातीत आहे, अस म्हणता येईल!!
शर्मिला..सुरेख लेख.. या
शर्मिला..सुरेख लेख..
सर्वच हिट्टं झाले होते सिनेमाबरोबर
या लेखाच्या निमित्ताने अचला सचदेव यांना श्रद्धांजलीस दिलीस..
इतक्या गोड लाजणार्या जोहरा जबीं दिसल्या होत्या त्या या सिनेमात..
इतर कलाकार ,डैलोक्स..पोशाख्..लाजवाब!!
चित्रपटापेक्षा लेखच जास्त
चित्रपटापेक्षा लेखच जास्त आवडलाय.>>>>>माधव, +१
चित्रपटातील गाणी मात्र दृष्ट लागण्याजोगी.
सगळी गाणी आवडती पण "दिन है बहार के तेरे मेरे इकरार के" आणि "कौन आय के निगाहोंमे.." जरा जास्तच.
"दुनिया का बोझ जरा दिलसे उतार दे, छोटीसी जिंदगी है हंसके गुजार दे" अस उदास शशी कपूरला सांगणारी शर्मिला टागोर मस्तच.
वक्तचे वेगवेगळे पैलू छान
वक्तचे वेगवेगळे पैलू छान उलगडून दाखवलेत व ते ही अतिशय रंजक पद्धतीने.....
एखाद्या चांगल्या वृत्तपत्रात किंवा स्टँडर्ड मासिक, पाक्षिकात द्या - नक्कीच आवडेल सर्वसामान्य लोकांना, रसिकांना व समिक्षकांनाही - इतका सुरेख जमलाय.....
खूप सुंदर लिहिले आहे
खूप सुंदर लिहिले आहे
Pages