चिरंजीव परशुराम भूमी प्रांगण, बुरोंडी

Submitted by मंदार-जोशी on 9 April, 2012 - 00:56

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].

ज्ञान, शक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच भगवान श्री विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम. आपल्या काळातील अत्याचारी आणि समाजविघातक राज्यकर्त्यांना आणि शक्तींचं निर्दालन करुन समाजजीवन सुरक्षित करणारे चिरंजीव भगवान परशुराम. अपरांत भूमीची निर्मिती करणारे आणि राजा शिवछत्रपतींच्या प्रेरणास्थानांपैकी एक असणारे भगवान परशुराम. पहिला ब्रह्मक्षत्रिय म्हणून ओळखले गेलेले जमदग्नीपुत्र परशुराम.

तरुण पिढीला अशा चिरंजीव परशुरामांचे मूर्त रूपात प्रेरणादायी दर्शन घडावे या हेतूने इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, भोसरी आणि न्यु मॉडर्न ऑप्टिशियन्स, पुणे चे संचालक श्री. अनिल गोविंद गानू आणि सौ. अश्विनी अनिल गानू यांनी चिरंजीव परशुराम भूमी प्रांगणाची निर्मिती केली आहे. हा प्रकल्प भगवान परशुरामांनीच निर्माण केलेल्या कोकणभूमीत दापोलीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर असलेल्या बुरोंडी या गावात टेकडीवर उभा राहिलेला आहे.

PRAM01.jpgPRAM02.jpgPRAM03.jpgPRAM04.jpg

४० फूट व्यास असलेल्या अर्धगोलाकृती पृथ्वीवर श्री. ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी फायबर ग्लास मधे घडवलेली परशुरामांची २१ फुटांची उत्तराभिमुख भव्य मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. पृथ्वीच्या अर्धगोलाकृती अंतर्भागात सप्तचिरंजीवांचे स्मरणस्थान असून त्यात भविष्यात तारांगण आणि बाहेर Optic Garden तयार करण्याची योजना आहे.

PRAM05.jpgPRAM06.jpgPRAM07.jpgPRAM08.jpgPRAM09.jpg

कोकणातला एक निसर्गचमत्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या तामसतीर्थ नामक सागरतीराचे या ठिकाणाहून दर्शन होते. समुद्राचा फक्त याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात. चहूबाजूने हिरवाई ल्यालेले पर्वत आणि मधे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा हे दृश्य बघताना भान हरपते.

श्री परशुराम भूमी प्रांगणातून होणारे तामसतीर्थाचे मनोहारी दर्शन:
PRAM_TT_10.jpgइतर छायाचित्रे:

PRAM_TT_11.jpgPRAM_TT_12.jpgPRAM_TT_13.jpgPRAM_TT_14.jpgचिरंजीव परशुराम भूमी या वास्तूचे शिल्पकार:
डॉ. बाळकृष्ण नारायण दिवेकर, Ph.D, Concrete Technology, पुणे
श्री. हेमंत शरद साठ्ये, B. Arch, पुणे
श्री. पद्मनाभ प्रभाकर लेले, ठेकेदार, AMIE, पुणे
श्री. सुहास गजानन जोशी, B.E., M.Tech, AMIE, पुणे
श्री. सदानंद सुरेश ओक, DCE, पुणे
श्री. आशुतोष आपटे, BFA, पुणे

विशेष सहकार्य:
सौ. मधुवंती व श्री. प्रफुल्लचंद्र देव, इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे
सौ. पौर्णिमा व श्री. राजेंद्र मनोहर
सौ. अपर्णा व श्री. अतुल केतकर
श्री. विवेक गोगटे
श्री. पांडुरंग पांगारे

विशेष सूचना: सकाळी लवकर किंवा मग संध्याकाळी पाचच्या सुमारास बुरोंडी गाठणे इष्ट. जेवण दापोलीतच घ्यावे.

---------------------------------------------------------
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
---------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार फोटो सुंदर आलेत. मुरूड मधे गानू आहेत ( जेवण चांगलं आहे त्यांच्याकडचं ) त्यांच्यापैकीच आहेत का रे तुमचे गानू ? चांगली माहीती दिलीस. पुढच्या वेळी कर्द्याला गेलो कि नक्की जाईन ...

रेडीला खाणी आहेत. त्यामुळे समुद्रालगतच्या वाळूतही खनीजांचे प्रमाण जास्त असणार. लाटांमुळे किनार्‍यावरची वाळू ढवळून निघते आणि पाण्यात मिसळते. त्यामुळे अनेकदा त्या वाळूच्या रंगावर समुद्राच्या पाण्याचा रंग ठरतो. दिवे आगरातली वाळू काळी आहे त्यामुळे समुद्राचे पाणी पण काळेच दिसते. रेडीतली वाळूही लालसरच आहे तोच रंग पाण्याने ल्यायला आहे.

उकाका, अर्धगोलाच्या आतील विकासकामे पूर्ण व्हायची आहेत. बांधकाम सुरू असल्याने जाणे धोकादायक वाटले म्हणून तिथली छायाचित्रे काढली नाहीत.

परशुराम या पौराणिक व्यक्तिरेखेबद्दल माझ्या मनात बरेच प्रश्न आहेत. विशेषत: २ कथांमध्ये परशुरामाचा उल्लेख येतो - पृथ्वी २१ वेळा नी:क्षत्रिय कारणे, आणि पितृआज्ञा पाळण्यासाठी आईचा शिरच्छेद. याबद्दल माझ्या शंका अशा:

१) पृथ्वीवरचे सर्व क्षत्रिय मारले का? तसे असेल तर नवीन कुठून निर्माण झाले? ते सगळे अत्याचारी होते का? माझ्या माहितीप्रमाणे य कथेची सुरवात एका राजाने गाय (सुरभी? पण खात्री नाही) चोरल्यापासून होते. या गुन्ह्याबद्दल एकवेळ त्या राजाला मारणं ठीक, पण सगळे क्षत्रिय का? ते सगळेच 'अत्याचारी आणि समाजविघातक' होते का? हे कसं, कोणी ठरवलं? त्यानंतरचे राजे/ सत्ताधारी एकदम चांगले होते का? ते असे कशामुळे झाले? सध्याचे राज्यकर्ते 'अत्याचारी आणि समाजविघातक' असल्याची खात्री आपल्यापैकी बहुतेकांना आहे. तर आताही पृथ्वी नी:क्षत्रिय कारणे हा आदर्श या अवताराच्या कार्यातून घ्यायचा आहे का? राज्यकर्ते चांगले व्हावेत म्हणून किंवा चांगल्या लोकांनी राज्यकर्ते व्हावे म्हणून परशुरामाने काय केले?

२) रेणुकेला इंद्राने फसवल तेव्हा ती फसली. हे कळल्यावर इंद्राला काही नं करता जमदग्नीने परशुरामाला सांगितले की तुझ्या आईचा शिरच्छेद कर. त्याने ताबडतोब आज्ञा पाळली. त्यामुळे खुश झालेल्या बापानी (जमदग्नी) त्याला वर मागायला सांगितले, तर त्याने पुन्हा आईला जिवंत करून घेतले. - - या कथेत परशुरामाचे वागणे 'आदर्श' आहे का? बापाची चुकीची किंवा अन्यायकारक आज्ञा पाळली पाहिजे, हा आदर्श समाजासमोर सतत राहावा म्हणून ही कथा सांगितली जाते का?

मला आपल्या कोणाच्याही श्रद्धांचा अधिक्षेप करायचा नाही. पण केवळ पुराणात आहे म्हणून एखादी गोष्ट चांगली, आदर्श आहे असं मान्य करणं मला जमत नाही. कदाचित या कथा मला नीट माहित नसतील. जाणकारांनी सांगितल्या तर बरे.

परशुराम अवतारात क्षत्रियांचा वंशविच्छेद, आणि महाभारतात खांडव वनातल्या नागांचा, या गोष्टी (आणि उदात्तीकरण) मला इतर सगळ्या हिंदू संस्कृतीत नं बसणाऱ्या , खटकणार्या वाटत राहतात.

मस्त. पार्ल्याचे एक जण कोकण ट्रिपा ऑर्गनाइज करतात. त्यांच्या लिस्टित हे ठिकाण आहे. आर्यावर्त , आंजर्ले पन आहे. योग्य बाफ वर माहिती लिहीते. जाण्यासारखी जागा दिसते.

लाल रंगाचे कारण आयर्न ऑक्साइड असू शकते. कारण मातीत लोहखनीजे असू शकतात.

पुराणकथा या कल्पनाविष्कार मानावा. त्यात असलाच तर अगदी नगण्य सत्यांश असावा. तर्क लावत गेल्यास आजच्या बहुसंख्य माध्यम मालिका आणि पुराणे यात फार मोठा फरक नसावा. परशुराम नावाचा कोणीतरी कर्तबगार पुरुष होऊन गेला एवढेच आपण म्हणू शकतो. त्याच्या प्रत्यक्ष चरित्रामध्ये एवढ्या मोठ्या काळात खूप अवास्तव बाबी घुसडल्या गेल्या असाव्यात.

अरेच्चा, मी इथे आताच तर जानेवारीत गेले होते. आम्ही कोळथरेला गेलो होतो ट्रीपला तेव्हा येताना रस्त्यात हे ठिकाण लागलं होतं. कोळथरेच्या अगदी जवळ आहे हा स्पॉट. हे लोक प्लॉट डेवलप करुन विकताहेत ना? भन्नाट मस्त लोकेशन आहे हे वेकेशन साठी. Happy

दामोदरसुत,

" कोणीतरी कर्तबगार पुरुष" यांना कोणी अवतार समाजात नाहीत. ईश्वरी अवतार होण्यासाठी काहीतरी लोकोत्तर स्वरूपाचे कार्य, पराक्रम, स्वत:च्या पलीकडे समाजाच्या कल्याणाचा हेतू, असं काही तरी असावं (अशी आपली माझी समजूत आहे).

या कथा किती खऱ्या, किती काल्पनिक/अवास्तव , हा मुद्दा माझ्या मते गैरलागू आहे. त्या 'समाज मान्य' आहेत, त्या व्यक्तिरेखा आदर्श म्हणून समाजासमोर उभ्या आहेत, त्यामुळे त्यांच्या वागण्याची चिकित्सा करावीशी वाटते. कृष्ण चारीत्रातही अनेक अवास्तव कथा असतील. पण बहुतेक लोक १६१०८ लागणे करण्याचा आदर्श नं घेता, तत्वज्ञानाचा आदर्श घेवू शकतात. किंवा वैयक्तिक 'पराक्रम'पेक्षा सामाजिक किमतीचा विचार करून द्वारकेला निघू जाण्याचा; 'रणछोडदास' हे ब्रुड मिरवण्याचाही आदर्श घेवू शकतात.

तसं काहीच मला माहीती असलेल्या परशुराम कथांमधून हाती लागत नाही, म्हणून या शंका.

अतुल पाटणकर,

पृथ्वी नि:क्षत्रिय करणे म्हणजे सगळ्या क्षत्रियांना मारणे नव्हे. जे राजे मातले होते, अत्याचारी होते त्याच राजांना व जुलमी व्यक्तींना परशुरामाने मारले. शिवाय त्याकाळीही स्त्रिया व मुले यांना मारले जात नसेच. त्यामुळे अत्याचारी राजांची कुटुंबे त्यातून वाचलीच. बाकीचे न्यायी व चांगले राजे होते त्यांना परशुरामाने हात लावला नाहीच.
(आपल्याकडे दुर्दैवाने शब्दार्थावर भर देऊन मतितार्थाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची सवय आहे याचे हे उत्तम उदाहरण.)

>>त्यामुळे खुश झालेल्या बापानी (जमदग्नी) त्याला वर मागायला सांगितले, तर त्याने पुन्हा आईला जिवंत करून घेतले. - - या कथेत परशुरामाचे वागणे 'आदर्श' आहे का?
कितीही चुकीची असली तरी वडीलांची आज्ञा पाळणे हे त्या काळी आदर्शच समजले जात असेल.
आईला मारल्यावर वडील हवे ते माग असा वर देतील हे परशुरामाला माहीत असणार. म्हणूनच त्याने वडीलांची आज्ञा पाळली. म्हणजे यातून त्याने दोन्ही गोष्टी साधल्या. वडीलांची आज्ञा पाळली गेली, आणि आई पण मिळाली. पण मला स्वतःला हे मारुन पुन्हा जिवंत करण्याची गोष्ट खरेच घडली असेल हे पटत नाही. कदाचित आश्रमातून बाहेर काढली असेल व वडीलांनी सांगितल्यावर पुन्हा आत घेतली असेल.

हा धागा 'प्रवासाचे अनुभव' या विभागात आहे. तेव्हा परशुरामासंबंधी प्रश्न इतर धार्मिक विभागात विचारल्यास समर्पक उत्तरे मिळू शकतील.

एका मा.बो.कराचे ह्या प्रकल्पाबद्दलचे मत ईथे वाचा. मी त्याच्याशी सहमत आहे म्हणून ईथे पोस्टतोय.
[Disclaimer: भांडणे लावणे किंवा वाद सुरु करणे हा ईथे हेतू नाही. प्रकल्पाकडे बघण्याची दुसरी बाजू केवळ मांडतो आहे. प्रत्येकाचा ViewPoint अर्थात वेगळा असणारच. ईत्यलम.]

वैनिल, ऐकीव माहितीवर आधारीत आहे ते मत. आणि शिवाय ती जागा किती मोठी आहे ते बघितलं आहे का? झाडं आणि माळ तोडला असा गळा काढण्याआधी संबंधितांनी ती जागा खूपच छोटी आहे हे लक्षात घ्यावं. प्रत्येक बांधकाम करण्याआधी तिथे काही ना काही असतंच. मग केवळ परशुराम स्मारकाबाबत असा वाद कृपया उकरून काढू नये. आणि आधी तिथे नक्की किती झाडं आणि माळ होता, की नुसता तण आणि इतर झाडी माजली होती का हे विचारलं होतं का कुणी? माहित नाही कुणालाच.

ती जागा खूपच छोटी आहे हे लक्षात घ्यावं >> हो, हे मात्र खरं. त्या जागेत फार तर फार २-३ खोल्यांचे १ बसक्या पद्धतीचे घर होवू शकते. जागा डोंगर कड्यावर आणि तीव्र उताराची आहे.

|| भगवान परशुराम जयंती निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम व आपणां सर्वांना शुभेच्छा ||

Parshuram2.jpg

Pages