रायगड : छोट्या दोस्तांसमवेत (अंतिम भाग २)

Submitted by आनंदयात्री on 24 April, 2012 - 00:16

रायगड : छोट्या दोस्तांसमवेत (भाग १)

लहान मुलं किती लोळतात!!! १८० अंशात वळण्यापासून बसून झोपलेले सापडण्यापर्यंत अनेक प्रकार मुले ट्राय करत असावीत! कुण्या एका लहान मुलाने लोळत लोळत खाली सरकताना मारलेली तिसरी हलकीशी लाथ तोंडावर बसल्यावर मी वैतागून जागा झालो आणि त्याला नीट झोपण्यासाठी सांगणार तेवढ्यात महेंद्र म्हणाले, 'अहो नचिकेत! वर सरका! झोपेत सरकत किती खाली गेलात!' मी अवाक आणि गप्प! (क्षणभर लहान झाल्याच्या आनंदात!)

सूर्योदय बघण्यासाठी जगदीश्वराच्या पलीकडील भवानी टोक गाठायचा प्लॅन होता. पण सकाळी सकाळी एवढी तंगडतोड करायचं जीवावर आल्यामुळे 'भवानी टोकावरून सूर्योदय' हा प्लॅन पुढील खेपेसाठी आरक्षित करून ठेवला आणि सूर्योदय पाहण्यासाठी नगारखान्याकडे धावलो. होळीच्या माळावर तुरळक वर्दळ होती. मग थोडे फोटो काढले -

डोंगरकडे -

नगरपेठ/बाजारपेठ -

त्या दिवशी पाहिलेला सूर्योदय हा आतापर्यंतचा 'वन ऑफ द बेस्ट' म्हणावा लागेल. तोरण्याच्या किनारीमागून हळूहळू वर उगवणारा लाल-गुलाबी गोळा अक्षरशः स्तब्ध होऊन आणि भान हरपून बघत होतो. त्याचे काही फोटो इथे आपण पाहिले आहेतच.

खाली येऊन सर्वांना फोटो दाखवले (आणि टुकटुक केलं). चहा-पोहे आटपल्यावर हिरकणी बुरूजाकडे निघालो. पाचव्यांदा रायगडला जात असूनही हिरकणी बुरूजावर जाणे झाले नव्हते.
टकमक टोक - (काल सूर्यास्त इथून पाहिला होता)

बुरुजावरील सपाटीच्याही अलिकडच्या टेकाडावरच सर्वांना थांबवलं गेलं. तिथे माहितीदान आणि ताकपानाचा कार्यक्रम झाला. तिथून उरलेले सगळे आंघोळीच्या आशेने कुशावर्त तलावाकडे गेले आणि कॅप्टनना सांगून आम्ही तिघेच हिरकणी बुरूजाकडे निघालो. गडाच्या पायथ्यापासून पायर्‍या चढतांना हा बुरूज बराच काळ समोर दिसत राहतो. त्याच्या पायथ्याजवळूनच वाट महादरवाजाकडे जाते. त्या बुरूजावरून खाली डोकावताना दोन सेकंद ज्जाम तंतरली. त्या हिरकणीबाईने त्याकाळी तो कडा कसा उतरला असेल (ती गोष्ट खरी असेल तर) ते तीच जाणे! त्यानंतर महाराजांनी ती बाजू तासून घेतली, त्यामुळे हिरकणी जेव्हा उतरली तेव्हा त्यामानाने सोपी वाट असेल असं जरी मानलं तरी एक्स्पोजरमुळे वाटणारी भीती कमी होत नाही!

बुरूजामधील मारूती -

उन्हं वाढायला लागल्यावर आम्हीही कुशावर्त तलावाकडे पावले वळवली. दुर्दैवाने तलावात खूप गा़ळ असल्यामुळे आंघोळ तर सोडाच, साधं पाय टाकूनही बसता आले नाही. एव्हाना फक्त दहा वाजले होते. बाराच्या आत जेवण तयार होणार नसल्यामुळे दोन तास काय करायचे हा प्लॅन कॅप्टनच्या डोक्यात तयार होता - सगळ्या मुलांना घेऊन जोडसाखळी खेळायला होळीच्या माळावर न्यायचे. तेवढ्यात घारूने मला जवळ बोलावून 'थांब! वाघ दरवाजाला जाउ' असं म्हटल्यावर आमचाही दोन तास घालवायचा प्लॅन तयार झाला. अखेर सर्व मुले होळीच्या माळाकडे गेल्यावर सात-आठ उत्साही मंडळींसोबत आम्ही वाघ दरवाजाकडे निघालो.

कुशावर्त तलावाच्या खालच्या अंगाला, डोंगराच्या कुशीत बांधला गेलेला वाघ दरवाजा हा एक चोर दरवाजा आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या वधानंतर जेव्हा फितुरीमुळे झुल्फिकारखानाच्या ताब्यात गड जायची वेळ आली होती तेव्हा राजाराम महाराज याच दरवाजातून निसटले होते. पुढे ते जिंजी किल्ल्यावर पोचले आणि तिथून त्यांनी राज्यकारभार पाहिला.

वाघ दरवाजाबद्दल मला आतापर्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची वाट सहज न सापडणे. आतापर्यंत चारपैकी दोनदाच वाट सापडली होती. त्यादिवशीही तेच झाले. कुशावर्तापासून खाली उतरलो. आणि एका सपाटीवरून वाट सापडेनाशी झाली. तापायला लागलेलं उन्हं, वाढणारी तहान, सोबतीला दरवाजाच्या आशेने आलेली मंडळी आणि वाट शोधत फिरणारे आम्ही! दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या घळींमध्ये पार ओढ्यात उतरून शोध घेतला. दरवाजाकडे जाणारी वाटच सापडेना. अखेर पोटल्याच्या डोंगरासमोरच्या कड्याजवळ जाऊन थोडं खालच्या अंगाने दरीच्या बाजूने ट्रॅवर्स मारायला मी खाली उतरलो. आणि पाच मिनिटातच रूळलेली वाट सापडली. त्या वाटेने दरवाजाचे बांधकाम दिसेपर्यंत खाली उतरून खात्री करून घेतली आणि बाकीच्यांना हाक मारली. वाघ दरवाजाबद्दल मला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे दरवाजात येणारा आणि समस्त एअरकूलर्सला फिकं ठरवेल असा प्रेमळसा थंडगार वारा! असं वाटत होतं की तिथेच झोपून जावं! त्या दरवाजातून चाळीसएक फूट खाली कातळ उतरून कड्याच्या अगदी टोकावर जाऊन येण्याची हौस भागवून घेतली.

पुन्हा माघारी आलो तेव्हा बच्चेमंडळी खेळ-बिळ आटोपून, येऊन, जेवून निवांत (हुंदडत) बसली होती. सहलीमधला शेवटचा खाना म्हणून आमटी-भात-भाजीबरोबरच पोळी-गुलाबजाम-ताक अशी चंगळ होती. पोटभर जेवल्यावर हात धुवायला कसेबसे उठलो. लगेच सॅक पॅक केल्या आणि संजयभाऊ व कुटुंबाचा निरोप घेतला.
शिरकाईदेवीच्या मंदिराजवळ एक ग्रूप फोटो झाला.

गोलाकार उभे राहून प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत म्हटले आणि गड उतरायला सुरूवात केली. टळटळीत ऊन असलं तरी उतार असल्यामुळे व पायर्‍या असल्यामुळे तासाभरात उतरून बसजवळ आलो. मग पुन्हा सरबताची फेरी झाली. वाटेत पाचाड गावी जाऊन राजमाता जिजाऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आल्या वाटेने माघारी निघालो. महाडच्या फाट्याजवळ मला सोडून बस मुंबईच्या दिशेने निघून गेली. त्यांना पोचायला ट्राफिकमुळे मध्यरात्र झाली आणि स्वत:हून ओढवून घेतलेल्या एका रोमांचकारी प्रवासामुळे मीही पुण्यात पावणेबाराला पोचलो.

तर ही होती एका ट्रेक कम ट्रीप कम मोहिमेची गोष्ट! लहान मुलांमध्ये त्यांच्याहून लहान होऊन राहण्यात, वावरण्यात मजा असतेच. हे लिखाण खास त्या छोट्यांच्या मोठ्ठ्या मज्जांना, त्यांच्या अमाप उत्साहाला आणि माझ्या वयातून बघताना निरागस वाटणार्‍या त्यांच्या भावविश्वाला समर्पित...
(समाप्त)

नचिकेत जोशी
(फोटो - नचिकेत जोशी आणि विश्वेश नवरे)
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/04/blog-post_21.html)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाघ दरवाजाबद्दल मला आतापर्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची वाट सहज न सापडणे.
>>> खरयं ते.. Happy

पोटल्याचा डोंगर मस्त दिसतोय तिथुन.. Happy

आया.. पुन्हा कधी जायचे?

सूर्योदय फार सुंर्रेख!!!
वर्णन आणी फोटोज मस्त!!!! Happy

मस्त फोटो आणि मुलं पण अगदी खास आहेत. मस्त खेळुन आणि मस्ती करुन घेतलेली दिसती आहे.

स्वत:हून ओढवून घेतलेल्या एका रोमांचकारी प्रवासामुळे मीही पुण्यात पावणेबाराला पोचलो.>>>>>>

म्हणजे हातचं राखुन लेख लिहिला आहे. अजुन काही तरी रोमांचकारक होतं तर..... त्याची गोष्ट कधी?

दोन्ही भाग सुरेख Happy

वाघ दरवाजाबद्दल मला आतापर्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची वाट सहज न सापडणे.
>>> खरयं ते..>>>>+१. मी माझ्या पहिल्याच रायगडवारीत वाघ दरवाजा पाहिला होता. Happy

वाघ दरवाजाबद्दल मला आतापर्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची वाट सहज न सापडणे.
>>> खरयं ते..>>>>+१. मी माझ्या अनेक रायगडवारीत वाघ दरवाजा फक्त २ वेळाच पाहिला आहे. आणि हिरकणी बुरुज फक्त एकदाच परत फक्त ह्या दोघांसाठी जायला हवे Wink

छान झाले दोन्ही भाग ---- आता पुढची मोहीम कोणती?

आणि मग वॄत्तांत कोणता ----- Happy Happy Happy

शुभेच्छा मनःपुर्वक Happy मोहीमेसाठी आणि लिखाणासाठी Happy

धन्यवाद दोस्तहो! Happy

रोहन, तू म्हणशील तेव्हा! Happy एखादं गटग करू तिथेच! Happy

छान झाले दोन्ही भाग ---- आता पुढची मोहीम कोणती?
गेल्या वीकेंडला विसापूर नाईट असेंड केला. त्याबद्दल लिहायचं आहे Happy

म्हणजे हातचं राखुन लेख लिहिला आहे. अजुन काही तरी रोमांचकारक होतं तर..... त्याची गोष्ट कधी?
रोमांचकारक होतं तर! हौसेने ओढवून घेतलेलं Proud ... त्याची गोष्ट लिहीली आहे, इथे केव्हा टाकेन ते माहित नाही... Happy

नचिकेत,
दोन्ही भाग आत्ताच वाचले...मस्तच लिहीले आहेस.. अगदी मनाला भावणारे...

रायगड बद्दल कितीही लिहीले आणी वाचले तरी अजून काहीतरी निसटलेय याची जाणीव होते... गेल्या काही वर्षांमध्ये रायगडला अनेक वेळा गेलोय.. पण अजूनही एक अनामिक जाणीव रायगडला खेचून नेते..
मला तर असे वाटते की रायगड हा एक प्रचंड लोहचुंबक आहे. आपण रायगडला जात नाही तोच आपल्याला त्याच्याकडे खेचतो..

रोहन, तू म्हणशील तेव्हा! एखादं गटग करू तिथेच! >>>> वाट बघतोय.... कधी अरेंज करताय???