शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात १५ तारखेला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले होते. या पत्रामुळे दादाजी व त्यांचे बावा चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. आज ह्या घटनेला ३६७ वर्षे पूर्ण होत आहेत...
श्री
राजश्री दादाजी नरसप्रभु देशपांडे व कुलकर्णी ता रोहीरखोरे व वेलवंडखोरे यांसि प्रति सीवाजीराजे सु| खमस अबीन अलफ तुम्हास मेहेरबान. वजिराचा विजापुराहून हुकुम आला तो ठाणे सिरवलाहून अमिनानी तुम्हाकडे पाठवला त्याच वरून तुमचे बाप नरसिबावा हवालदिल झाले वगैरे कितेक बहुतेक. त्यास शाहासी बेमानगिरी तुम्ही व आम्ही करीत नाही. श्री रोहिडेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव. तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य पूर्ण करून पुरवणार आहे. त्यास बावास हवाल होऊ नये खामाखा सांगावा आणि तुम्ही तो कागद घेऊन सिताब हुजूर येणे. राजश्री श्रीदादापंताचे विध्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इनाम झाले ते कायम वज्रप्राय आहे. त्यांत अंतर आम्ही व आमचे वंशज लेकराचे लेकरी वतन वगैरे चालवण्याविसी कमतर कमतर करणार नाही. हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे या प्रमाणे बावाचे मनाची खात्री करून तुम्ही येणे.
रा छ २९ बहुत काय लिहिणे.
रुजू सुरनीस.
मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :
तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे..
ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?
सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...
बदअमलाबद्दल कड़क शासन...
सही! त्यावेळच्या भाषेत
सही! त्यावेळच्या भाषेत संस्क्रृत व फार्सी एकत्र बघून गंमत वाटते (वज्रप्राय/खमस अबीन अलफ/मेहरबान/खामाखा)
"तुमचे बाप" असा आदरार्थी उल्लेखही
राजश्री श्रीदादापंताचे विध्यमाने >>> म्हणजे दादोजी की आणखी कोण?
वा छान... या निमित्तने आणखी
वा छान... या निमित्तने आणखी पत्रे वाचायला मिळाली.
बहुत काय लिहावे... धन्यवाद.
फारएण्ड... त्यावेळी बरेच
फारएण्ड... त्यावेळी बरेच फार्सी शब्द नेहमीच्या वापरात होते. पुढे ते कमी व्हावेत म्हणून राजांनी खास प्रयत्न केले. राज्याभिषेकाच्या वेळी संस्कृत - मराठी शब्दकोश देखील तयार केला.
होय रे.. राजश्री श्रीदादापंत म्हणजे दादोजी कोंडदेव..
छान!
छान!
>>हे राज्य व्हावे हे श्रीचे
>>हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे ..<<
हे वाक्य शिवरायांच्या संदर्भातील लेखांमधून नेहमीच उद्धृत होत असते. पण त्याच्या उगमस्थानाचेच दर्शन नेमके ज्या दिनांकाला शिवरायांनी शपथ घेतली त्याच दिनांकाला घडवून आपण औचित्य तर साधलेच पण अत्यंत महत्वाची माहितीही आमच्यापर्यंत पोचवलीत त्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद दामोदारसुत..
धन्यवाद दामोदारसुत..
'हे राज्य व्हावे हे श्रीचे
'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' हें खूप वाचनात येते; पण प्रत्यक्ष पत्र वाचून [ व तेंही वयाच्या १५व्या वर्षीं लिहीलेले ] आणि त्याची पार्श्वभूमी समजल्यावर ते खूपच भावतें !
वा रे सेनापती! हे पत्र आधी
वा रे सेनापती! हे पत्र आधी वाचलं होतं, पण या निमित्त आणखी पत्रं वाचायला मिळाली. धन्यवाद!
हे दादाजी दादोजी
हे दादाजी दादोजी नसावेत..
शिवचरित्रात अनेक "दादा" लोक सापडतात. उदा. दादाजी क्रुष्णा, दादाजी बापुजी इइइ. शिवाजी महाराजांची जी दादोजींबाबतची जी चार अस्सल पत्रे उपलब्ध आहेत त्यात त्यांचा उल्लेख "दादोजी कोंडदेव (सुभेदार)" असाच आहे. त्यामुळे एखाद्याच पत्रात शिवराय त्यांचा उल्लेख फक्त "दादापंत" असा करणार नाहीत. त्यामुळे हे दादा पंत अन्य कोणी तत्कालीन रोहिरा खो-यातील एखादी व्यक्ती असणार.
पण ज्याना दादोजीना उरावर घेऊन नाचाय्चे असते, त्याना दादा, दादू, दाद्या , दादी, दीदी .. काहीही असले तरी दादोजीच वाटतात .
छान माहीती............कॉलेज
छान माहीती............कॉलेज चे दिवस आठवले......
छान माहितीसंकलन
छान माहितीसंकलन
(No subject)
नारायण, नारायण औरंग्याच्या
नारायण, नारायण
औरंग्याच्या अनौरस अवलादी आल्या वाटते इथे जिल्लेईलाही म्हणून....
मित्रहो, एक श़का आहे .. मी
मित्रहो, एक श़का आहे ..
मी काल शिव्रायांची पत्रे- खंड हे पुस्तक आणले होते त्यामध्ये असलेले तिन क्रमांकाचे पत्र दादाजी नरसप्रभुंना शिवरायांनी लिहिले आहे त्या पत्राचे मुळ मोडी, त्याचे देवनागरी ट्रान्सलेशन व त्याचा सारांश, म्हणजे आपल्या आताच्या मराठी मध्ये त्या पत्राचा मायना असे स्वरुप आहे. तेव्हा मला या पत्रामध्ये दिलेल्या देवनागरी ट्रान्सलेशन मध्ये हिंदवी असा उल्लेख सापडला नाही पण लेखीकेने त्याचा सारांश आपल्या भाषेत लिहिताना (मुळ पत्रात तसा उल्लेख नसताना ) "हिंदवी" हा शब्द वापरलेला आहे.
ज्या अर्थी लेखीकेने हिंदवी हा शब्द वापरला आहे त्या अर्थी काही तरी उद्देश नक्कीच असेल , तो माझ्यासारख्या अल्पमती मनुशास समजत नाहीये, क्रुपया मार्गदर्शन करावे.
मुळ मोडी पत्र..
व त्याचा अनुवादीत (सारांश) भाग पुढीलप्रमाणे ..
सुरज... कृपया आपली विपु
सुरज... कृपया आपली विपु तपासा.
उत्तम शंका सुरज महाजन! उत्तर
उत्तम शंका सुरज महाजन! उत्तर मिळालं की इथे जरून माहिती द्या!
आ.न.,
-गा.पै.