जप, ध्यान आणि प्रवास.....

Submitted by योग on 11 April, 2012 - 09:30

जप, जाप्य.. तप, तपश्चर्या वगैरे शब्द नविन नाहीतच.

तप आणि तपश्चर्या कदाचित आता तितक्याश्या अपिलींग राहिल्या नसल्या तरी अगदी पुराण कालापासून आजही जपाचे महत्व टीकून आहे. जपालाच बिलगून असते ते ध्यान. "सुंदर ते ध्यान ऊभे विटेवरी" मधले ध्यान नव्हे- त्या ओळीत, दगडात कोरलेल्या एखाद्या मूर्त रूपातही नाथांना सौख्य, शांती, लोभस असा जिवंत अनुभव मिळाला त्याचे ते वर्णन आहे. ईथे रूढ अर्थाने "ध्यान" करणे, मेडीटेशन या अर्थी म्हणतोय.
तर जप आणि ध्यान याचे आजच्याही युगात महत्व/अपिल कमी झालेले नाही.

नेहेमीप्रमाणेच धार्मिक, श्रध्दा, अंधश्रध्दा, ई. च्या मार्गाने हा लेख जावू नये म्हणून आधीच नमूद करतो की आजच्या युगातही टिकून असलेल्या व वेगवेगळ्या रूपाने/तर्‍हेने प्रकट होणार्‍या या जप, ध्यान बद्दल असलेले कायमचे कुतूहल व्यक्त करणे आणि जमलेच तर काही ठोकताळे बांधणे एव्हडाच या लेखाचा ऊद्देश.

तर लहानपणापासूनच घरचे वातावरण धार्मिक असल्याने, बाय डिफॉल्ट (म्हणजे माझ्या संमतीशिवाय) म्हणून अशा अनेक जप, ध्यान ई. चे अनुभव जवळून पहायला मिळाले. काळाच्या ओघात त्याच जुन्या अनुभवांचे नविन प्रकटीकरणही पाहिले. एक जाणवले की तेव्हाही आणि आताही "गूढ" कायम आहे. तेव्हाही आणि आताही अजूनही कसल्यातरी शोधात आपण सर्वच फिरतो आहोत..

जितके पंथ, कल्ट, समूह तितके वेगळे प्रकार. ध्यानाचेच पहा:
१. काहींच्या मते निव्वळ शून्यात ध्यान लावून भागत नाही.. समोर काहितरी वस्तू (ऑब्जेक्ट) हवे. असे ऑब्जेक्ट एखादी समई, ज्योत, एखाद्या बाबा/गुरू/माई ई. चा फोटो, किंवा एखादी देवाची मूर्ती/रूप, काहीच नाही तर ओंकार.. पण कशावर तरी लक्ष केंद्रीत करून ध्यान करायचे.
२. काहींच्या मते निव्वळ श्वासावर लक्ष केंद्रीत करून (प्राणायाम क्रीया) डोळे मिटून आपल्याच आतील चैतन्य/जीवन तत्वाशी अनुसंधान साधणे म्हणजे देखिल ध्यान होय.
३. काहींच्या मते एक "स्वयंकेंद्रीत" ध्यान असते. म्हणजे असे की स्वतःला एखादा बिंदू समजून आपल्याच भोवती घडत असलेल्या घटना, व्यक्ती, सभोवालचा परिसर वगैरे वगैरे कल्पून त्या ईतर सर्वांचा त्या बिंदूभोवती होत असलेला प्रवास पहाणे.
४. हिमालयात, वा ईतर पर्वतांवर, दुर्गम डोंगर दर्‍या, गुहा ईत्यादि ठिकाणी अनेक वर्षे ध्यान लावून बसलेल्या साधू, सन्यासी ई. च्या कहाण्याही आपण ऐकतच असतो.
५. तर काहींच्या मते एखादा ठराविक मंत्र (जो त्या समूहाखेरीज ईतरांना सांगितला जात नाही!) ऊच्चारून ध्यान करायचे असते. शिवाय तो मंत्र कसा ऊच्चारावा ई. चे अगदी व्यवस्थित नियमही असतात.

तर जपाचेही अनेक प्रकार आढळतातः
१. काहींच्या मते जप म्हणजे माळ ओढणे- थोडक्यात एखाद्या देव, दैवता, गुरू, साधू, ई. च्या नावाचा ऊच्चार, एक एक मणी सरकवत करणे. मुळात असे वाटते की निव्वळ जप असावा, कालानुसार त्यात मोजणीसाठी "माळ" घातली गेली असावी.. (आपण गमतीत म्हणतो ना "काय नुसता जप लावलाय..")
यात किती वेळा जप झाला याला महत्व असते, जितके जास्ती तितके चांगले असे काहीसे.
२. काहींच्या मते जप म्हणजे एखादा मंत्र सतत म्हणणे, माळ असायलाच हवी असे नाही- ऊ.दा: "श्री राम जय राम जयजय राम", किंवा "श्री स्वामी समर्थ जय जय..." ईत्यादी...
३. काहींच्या मते जप म्हणजे ईश्वराचा धावा करणे- आता प्रत्येकाला वेगळा ईश्वर पूजण्याची मुभा असल्याने
यात जितके देव/ईश्वर तितके जप.

जपाच्या जवळ जाणारे पण व्यावहारीक अर्थाने मात्र एखादे अनुष्ठान, संकल्प असले रूप घेणार्‍या गोष्टि म्हणजे- गायत्री मंत्राचे सामूहीक वा वैयक्तीक ऊच्चारण, श्री गणपती अथर्वशीर्ष याचे सहस्त्रावर्तन (१००० वेळा म्हणणे), किंवा एखाद्या संत महात्म्याची पोथी वाचणे, ईत्यादी सर्व.

यातलाच अजून एक वेगळा प्रकार आहे तो म्हणजे एखादे मंत्र, स्तोत्र, याचे श्रवण. डॉ. बालाजी तांबे यांचे "गर्भसंस्कार" हे पुस्तक व ध्वनिफीत तर अगदी अलिकडेही प्रसिध्द आहेच. अनेक लोकांनी अनेक प्रकारे प्रयोग करून अशा विशीष्ट मंत्र ऊच्चार वा श्रवणाचे मनुष्यावरील परिणाम अनेक पुस्तकांतून कधी अनुभवासकट तर कधी त्याशी निगडीत वैज्ञानिक प्रयोग यासह प्रकाशीत केले आहेत. (जपान मध्ये एक प्रयोग केला गेला होता असे वाचल्याचे आठवते. त्यात दोन छोट्या रोपट्यांची वाढ तपासली गेली. एका रोपट्याला कायम रॉक म्युझिक च्या जवळ तर दुसर्‍याला कायम मेलडी/जाझ म्युझिक च्या जवळ वाढवले गेले. पहिले रोपटे रॉक म्युझिक च्या स्त्रोत/ध्वनिलहरींपासून दूर अशा विरुध्द दिशेने वाढून शेवटी मलूल होत गेले.. तर दुसरे रोपटे मेलडी म्युझिक च्या दिशेने व्यवस्थित वाढत गेले.)

अर्थातच ९९% वरीलपैकी कुठल्याच गोष्टीला "बाप दाखव नाहीतर श्राध्द कर" अशा वस्तूनिष्ट कसोटीवर तपासून बघणे आणि दर वेळी खरे खोटे सिध्द करणे शक्य नसते. एखादी गोष्ट (वैज्ञानिक अर्थाने "प्रयोग") करून पाहिल्याशिवाय त्यातून अनुभव, निरीक्षणे आणि पर्यायाने काही अनुमान वा सिध्दांत मांडणे अवघड आहे हे मान्य केले तर वरील सर्व गोष्टी करून पाहिल्याशिवाय त्यातून नेमके काय मिळते हे सांगणे अवघड. गोंधळ व वाद तेव्हा निर्माण होतो जेव्हा या वरील सर्वाचे स्तोम माजवून वर त्याला पाप-पुण्य ईत्यादीच्या तराजूत तोलून, मग विश्वास-अविश्वास, श्रध्दा-अंधश्रध्दा अशा भावनिक भेदातून एकतर तुम्ही यातले आहात वा नाहीत अशी एकच टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडले जाते. आणि यातून गंभीर समस्या तेव्हा ऊद्भवतात जेव्हा या वरील सर्वाचा वापर लोकांची फसवणूक, लुबाडणूक ई. साठी केला जातो. अर्थात तो वेगळा विषय.

पण एव्हडे असूनही काही वैयक्तीक बाबी मात्र नोंदवाव्याश्या वाटतातः
१. कधी कधी असे प्रसंग घडतात, अनुभव येतात (बरे वाईट सर्वच) की ज्याचे व्यावहारीक, वैज्ञानिक, वा तर्कबुध्दीच्या आधारे स्पष्टीकरण देता येत नाही.
२. आता अमुक एक संताची पोथी वाच असे मला कुणी निव्वळ सांगितले म्हणून वाचणार्‍यातला मी नाही. पण वाचून पाहुया काय वाटते असे म्हणून वाचली- बरे वाटले, थोडी मनःशांती मिळाल्यासारखे झाले असे मात्र होते. मग यातून ऊलट काही अपाय तर होतच नाहीये तर नावे कशाला ठेवा? तेव्हा वाचतो मी.
३. कधी कधी या वरील ध्यान धारणा प्रकरणापैकी एखादी करून पाहिली तर काही काही गमतीशीर अनुभव देखिल येतात. ऊ.दा. एखादी भविष्यात घडणारी गोष्ट दिसणे (जी नंतर घडून गेली की आपल्याला आठवते अरे हे तर आपण आधी पाहिलेले...), एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी बातमी आधीच कळणे, किंवा काही काही आधी न पाहिलेल्या व्यक्ती, शब्द, देखावे ई. दिसणे.. याला बरेच लोक सिक्स्थ सेंस (अतींद्रीय ज्ञान) म्हणतात, तर वैज्ञानिक, वा मानसशास्त्र तज्ञ याला प्रकाश-ध्वनी-लहरींचे चित्रखेळ वगैरे असेही म्हणतात.. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" असेही म्हणतात... तर "माझ्या ध्यानी मनी नव्हते आणि अचानक घडले" असेही आपण ऐकतो.
४. कधी कधी अशा जप जाप्य, ध्यान ई. चे अनेक वर्ष अनुभव असणार्‍या लोकांच्या कडून अनेक गोष्टी ऐकतो- हा त्या व्यक्तीचा अनुभव असल्याने आपल्या पुरता "कही सुनी" असली तरी त्या व्यक्तीपुरता तो अनुभव "सत्य" असतो असे म्हणावे लागते. गंमत म्हणजे कधी काळाने "अरे मलाही अगदी असाच अनुभव जवळपास आला" असे म्हणणारा कुणी भेटला की त्याच अनुभवाची सत्यता अधिक भासू लागते. थोडक्यात जे मी अनुभवले तेच दुसर्‍याने देखिल अनुभवले असेल तर नक्कीच या मागे काहीतरी दडलेले आहे एव्हडा एक निश्कर्ष काढायला वाव असतो.
५. गर्भसंस्कार हा खरे तर हिंदू धर्मातील एक महत्वाचा संस्कार मानला जातो. आम्ही देखिल गंमत म्हणून बायको गर्भवती होती तेव्हा डॉ. बालाजी तांबे यांची "गर्भसंस्कार" ध्वनिफीत ऐकणे, किंव्वा मुद्दामून काही मंत्र, स्तोत्रे, ई. रोज म्हणणे ईत्यादी (मुख्यत्वे बायकोने) नेमाने करून बघितले होते. सर्वच तपशील ईथे बारकाव्यांसकट देता येणार नाहीत पण काही काही अनुभव अक्षरश: गर्भसंस्काराचे पुरावे म्हणून ठरतील ईतके स्पष्ट आले तर काही संबंध लावायचा ठरवला तर लागेलही असेही आले..

माझ्या एका मित्राला छान सवय आहे - तो असे अनुभव लिहून काढतो- जसे स्वप्नात, किंवा ध्यान करताना काय दिसले, अनुभवले.. काळाच्या ओघात कधितरी काही प्रसंग असे घडतात की आधी जे दिसले असते, अनुभवले असते त्याच्याशी एक "लिंक" जोडता येते. जसे आपण रोज डायरी लिहीतो तसे गंमत म्हणून असे अनुभवही लिहून पहायला हरकत नाही. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत तो अनुभव निव्वळ कागदावरच असतो पण आधीच लिहून ठेवलेल्या अनुभवानुसार भविष्यत गोष्ट घडली तर मात्र दोन्ही तपासूण पहाणे रोमांचकारी असेल.

असो. तर एकंदरीत जप जाप्य, ध्यान धारणा ई. ने तुमची शरीर ईंद्रीये अधिक सूक्ष्म होतात असे वैज्ञानिक प्रयोग वा निश्कर्षही काढलेले वाचलेले आहेत. अशा जप जाप्य, ध्यान धारणेतून मन प्रसन्न रहाणे, शांतचित्त, एकाग्रता वाढणे, वगैरे अनुभवास येते असेही आपण ऐकतो. एव्हडेच काय आजकालचे आधुनिक योगा गुरू, मॅनेजेमेंट गुरू, हे देखिल अनेक पुस्तकातून तुम्हाला ध्यानधारणा वगैरेचे महत्व आजच्या टेक्निकल वा मॅनेजेमेंट भाषेतून सांगताना अगदी ढीगाने मिळतील. बहुतांशी लोक त्यातून छान व्यावसायिक धंदा करून घेतात तर काही जणांना खरेच स्वताच्या अनुभवातून दुसर्‍यालाही काहितरी फायद्याचे द्यायचे असते (ही जमात आता नामशेष होत आहे!).

शेवटी "असुरक्षितता" हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्या अनुशंगाने "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणणारा एखादा आपल्याला देवासमान भासतो हेही खरेच. किंवा काहीच ऊपाय चालेनासे झाले की आपसूक देवाचा धावा करणारे अगदी निष्णात डॉक्टरही पाहिले आहेत. जन्मलेल्या जीवाला "मृत्त्यू" हेच अंतीम सत्त्य आहे हे अगदी सर्व धर्मग्रंथ, संत वांगमय ई. मध्ये ठासून सांगितलेले असले तरीही ऊभा जन्म बहुतांशी सर्वांची धडपड ही तो मृत्त्यू टाळणे यासाठी असते हीच खरी गंमत आहे आणि मग त्या प्रवासात असे जप जाप्य, ध्यान धारणा ई. चे वाटाडे भेटतात. काही तुम्हाला मार्ग दाखवतात तर काही तुम्हाला लुबाडतात- शेवटी जसा ज्याचा अनुभव तशी त्याची धारणा/विचार प्रक्रीया घडत जाते आणि मग पुढील धोरणे देखिल त्यानुसारच बनतात.
"हर फिक्रको धुवे मे ऊडाता चला गया" हे रंगीत पडद्यावरच बघायला छान वाटते.. Happy

ज्या समर्थांनी निर्मनुष्य जंगलातून कठोर तप केले त्याच समर्थांनी एक सोप्पा ऊपायही सांगून ठेवलायः

"मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दींचे कारण"

पण अगदी हे देखिल आपल्याला जमत नाही हे सत्य आहे. मी कशाने प्रसन्न असतो याचा शोध संपत नाही. मुन्नी बदनाम हुवी किंवा शीला की जवानी बघून मिळणारी क्षणिक प्रसन्नता समर्थांना अपेक्षीत नाहीच. आणि चिरकाल टिकणारी प्रसन्नता कशात आहे याचे ऊत्तर माहित असले तरी ती मिळवेपर्यंत वा त्या मार्गाने चालेपर्यंत सर्व क्षणिक सुखे ऊपभोगण्याच्या शर्यतीत आयुष्य संपते. तुमच्याजवळ जितके कमी, थोडक्यात जितका कमी पसारा तितके तुम्ही सुखी अशीही एक धारणा आहे.
ईथे आमच्या आजीची फार आठवण येते. १० मुले, आजोबांचा थोडा पगार, त्यांची फिरतीची नोकरी, खडतर आयुष्य... पण वयाच्या ८५ व्या वर्षी ती स्वताच्या हाताने शेवया करून विकत असे, पैसे हवे म्हणून नव्हे तर काहितरी ऊद्योग हवा आणि विकतच्या शेवयांची खीर खावत नाही म्हणून ईतरांनाही स्वता: घरी बनवलेल्या शेवया करून देणे. अक्षरश: दिवसभर तो सर्व राम रगाडा आटोपून जेमेतेम ४-५ किलो शेवया बनवल्यावर निव्वळ २० रू किलो ने विकल्यावर आलेल्या रकमेतून नांतवंडांना गोळ्या, बिस्कीटे देणे, मंदीरातून दानपेटीत पैसे टाकणे, हे सर्व करताना चेहेर्‍यावर कायम हसू आणि आनंद. शेवयावाल्या आजी "गेल्या" म्हणून बायका हळहळल्या. पण मनाने कायम प्रसन्न असलेली आजी अगदी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याच्या निमीत्ताने गेली. बाकी कुठलाच रोग तिला कधीच शिवला नाही.. समर्थांचे वाक्य ती असे सिध्द करून गेली.

एरवी मुंबईच्या कोलाहलात स्वता:चाही आवाज न ऐकू येणारा मनुष्य जेव्हा कधी बाहेरच्या प्रदेशात जातो- जिथे एक छोटासाच पण टुमदार निसर्ग एव्हडेच त्याच्या सोबतीला असतो तिथे मग अगदी सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळी पाखरांची, पक्षांची किलबील, एखाद्या मंद वाहणार्‍या झर्‍याचे पाणी, सागराची गाज, ऊंच डोंगरावरील एखाद्या टेकडीवरून अनुभवलेला वारा, एखाद्या दरीतून ऐकू येणारा नाद, किंवा निव्वळ निरभ्र आणि टीपूर चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली निवांत पहुडताना झालेला संवाद... अशा ठिकाणी अशा वेळी देखिल रूढ अर्थाने कुठलाही जप, ध्यान न करता कुठल्यातरी सुकून, आत्मशांती देणार्‍या शक्तिशी तादात्म्य झाल्याचा अनुभव आपण घेत असतो. काहींसाठी ती एक प्रेरणा ठरते- कविता, कथा, चित्र या रूपातून ती प्रकट होते, काहींना त्यातूनही सगुण निर्गुण भक्तीची गोम ऊकलते- "रुणुझुणु रुणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा..."
सर्वव्यापी असे ते जे काही आहे (काही म्हणा न्युटन बाबा ची ऊर्जा, किंवा अणू रेणू परमाणू, प्रकाश वा ध्वनी लहरी, ऊर्जा, वा अज्ञात शक्ती, ई. ) त्याचा आपण किती सूक्ष अंश आहोत याचा स्पष्ट पुरावा व अनुभव दोन्ही एकाच वेळी या अशा ठिकाणांतून मिळत असतो.

द्वैत, अद्वैत, कोहं वगैरे असल्या अध्यात्मिक, आदीभौतीक वगैरे वादात न शिरता एक नमूद करावेसे वाटते की स्व. किशोरदांची गाणी ऐकताना ध्यान लागते, एक स्वता:शीच संवाद झाल्याचा अनुभव येतो, त्यातही संगीत पंचम चे असेल, तर ते वर ऊल्लेखलेले ज्योत, बिंदू, शून्य, ई. सर्व सर्व आपसूक सर्वच कसे मस्त एकाच जागी गवसते- मग मी त्या सर्वाच्या मधला एक सूक्ष्म बिंदू होवून त्या ध्वनिलहरींचा अनाहत नाद ऐकत पुढील प्रवास करत रहातो-
"खुश रहो एहेले वतन हम तो सफर करते है".........

ता.क.:
प्रजापिता ब्रह्मकुमारी, आर्ट ऑफ लिव्हींग, ऑरोबिंदो (योगी ऑरोबिंदो), हरे कृष्ण हरे राम, मनःशक्ती, विपश्यना, अशा अनेक समूह, पंथांचे जवळून अनुभव आहेत. त्यांच्या जप, ध्यान, योगा ईं. चे आधुनिक युगातील प्रकटीकरण, क्वचित "मार्केटींग" हेही जवळून पाहिले आहे. याखेरीज महाराष्ट्राच्या मातीतील सर्व संत समूदाय परिवारांचा अनुभव घेतला आहे. त्यामूळे एकंदरीत अनेक गोष्टी अनेक प्रकारातून अनेक कोनातून व विविध चष्म्यातून पाहिल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नयेत. "गूढ, कुतूहल" कायम आहेच.. आणि वरील सर्व लिहीताना कुठलीच लाज वा तमा वाटत नाही कारण ते सर्व माझ्यापुरते आपापल्या परीने माझ्या आयुष्यात काही ना काही उपयुक्त भर घालणारे घटक/अनुभव आहेत हे निश्चीत. त्यातल्या "वाईट" गोष्टीच घेवून चर्चा करण्यात मला रस नाही- तरिही एकंदरीत अश्या गूढ व रोमांचक अनुभवांबद्दल कुतुहल असणार्‍यांनी खालील पुस्तके जरूर वाचावीतः

१. The monk who sold his ferrari.. या रॉबीन महाशयांच्या अलिकडील दुबई मधील "सेशन" ऐकायचा योग आला होता. गंमत वाटली. एरवी ज्या गोष्टी आपले आई वडील, वा साधू सज्जन आपल्या भल्या साठी सांगतात त्याच गोष्टि मात्र रॉबीन साहेबांच्या "मिठ्ठास" बिझिनेस भाषेतून ऐकायला अक्षरशः हजारोने पैसे देवून लोक आले होते Happy पुस्तक छान आहे. बरेच लोकं या पुस्तकाला so the monk who had first bought the ferrari? असेही म्हणतात Happy
http://www.amazon.com/The-Monk-Who-Sold-Ferrari/dp/0062515675
२. The messages from the Masters- अनेक ऊपखंड आहेत. पूर्वजन्म, आठवणी, कर्म-क्रीयमाण, पुनर्जन्म, याबद्दल फ्लोरीडामधिल प्रख्ख्यात डॉ. ब्रायन वेस यांचे एकंदर अनुभव, प्रयोग, विचारसरणी, सर्वच "भन्नाट" आहे. ब्रायन वेस हे नाव माहित नसेल तर गुगलून पहा. http://www.amazon.com/Messages-Masters-Tapping-into-Power/dp/0446676926
३. Silvercrest of Himalayas (मला वाटते याचे मराठी भाषांतर देखिल आहे: साद देती हिमशिखरे). एक प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रधान यांना हिमालयात भेटलेल्या गुरूंचे व त्या अनुशंगाने लिहीलेले काही रोमांचक अनुभव व विश्लेषण यात आहे.
http://books.sulekha.com/book/towards-the-silver-crests-of-the-himalayas...

४. ईतर पुस्तकेही आहेत... जमलेच तर नंतर यादी देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला, संतुलित लेख.
कुठलाही निष्कर्ष ठासून सांगण्याच्या फंदात पडला नाहीत, हे विशेष आवडले.

केवळ असुरक्षितताच नाही, तर अनिश्चीतताही सर्वांसाठी असते. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यावर उपाय शोधत असतो.

>>केवळ असुरक्षितताच नाही, तर अनिश्चीतताही
बरोबर.. अनिश्चीतता हेही असुरक्षित वाटण्याचे मुख्य कारण आहेच..

>>"मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दींचे कारण ... हे बहुतेक तुकोबांचे आहे...
नाही हे रामदास स्वामींचेच आहे "बलोपासना" मधील.

योगः
अप्रतिम लेख! १००% पटला. प्रत्येक मुद्द्याशी न शब्दाशी सहमत (नव्हे... हा लेख मीच लिहला की काय अस वाटल). उगाच ओरडून आणि ठासून न सांगणे, सहज नोंदवल्यासारखी केलेली मांडणी तर खूपच परिणामकारक वाटली. क्रमशः पाहिजेच! Happy

>>उगाच ओरडून आणि ठासून न सांगणे, सहज नोंदवल्यासारखी केलेली मांडणी तर खूपच परिणामकारक वाटली.
अगदी अगदी!
लेख आवडला आहे.

छान लिहीले आहे, एकदम संयत आणि स्पष्ट.
स्व. किशोरदांची गाणी ऐकताना ध्यान लागते, एक स्वता:शीच संवाद झाल्याचा अनुभव येतो,>>> एकदम मान्यच!
The monk who sold his ferrari..>> मला तर हे नावच बकवास वाटते, मोहातून बाहेरच पडायचे आहे तर 'सोल्ड' कशाला आणि मग? 'गेव्ह अवे' तरी म्हणा!!!

>>The monk who sold his ferrari..>> मला तर हे नावच बकवास वाटते, मोहातून बाहेरच पडायचे आहे तर 'सोल्ड' कशाला आणि मग? 'गेव्ह अवे' तरी म्हणा!!!

आगाऊ,
अरे तीच तर गंमत आहे.. अगदी प्रमाणिक लिहीले आहे पुस्तक. त्यामूळे ऊगाच आव न आणता "गेव्ह अवे" असे लिहीण्यापेक्षा "सोल्ड" लिहील्याने अनेकांना ते अधिक अपिलींग वाटते Happy
लेखकाचा प्रवास कौतूकास्पद आहेच (सोपे नाही जवळचे सर्व देवून टाकणे, किंवा अगदी विकून टाकणे देखिल!), पण त्याहीपेक्षा या लेखकाने पुढे जावून जी "प्रवचने" चालू ठेवली आहेत ते अगदीच मस्त आहे. बहुतांशी पाश्चात्य समुदाय असतो त्यांच्या प्रवचनाला. आता त्याच्या बाजारीकरणात वगैरे आपण शिरुयात नको. असो. रॉबिन शर्मा सारखे लोक्स हे "आधुनिक कीर्तनकार" आहेत असे म्हणुयात Happy

ललित वाचले. बरेचसे पटले. धन्यवाद विषय काढल्याबद्दल.

मंक - बरे आहे.
साद देती- बोर वाटले
मेसेजेस फ्रॉम मास्टर्स- माहित नव्हते. आता शोधेन कुठेतरी.
Autobiography of a Yogi मात्र रोचक वाटले होते.
झेनकथा आवडतात मला. कृष्णमुर्तीही. पण त्यांचे तत्वज्ञान वेगळे आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे त्यामुळे बोर होते.
ज्ञानेश्वरी- सोपी हवीये ती मनासारखी मिळाली नाहीये.
भग्वदगीता- वाचली. फार काही उजेड पडला नाही. पुन्हा वाचायला हवी. महाभारतातील गुंतागुंत गीतेच्या बाबतीत बाजूल ठेवता येत नाही (मला), त्यामुळे गीता खोटी वाटत राहते. शिवाय अनुवादित वाचले. त्यामुळेही बोर.
विनोबा- बळेच वाचले. काही पोचले, बरेचसे निसटुन गेले..
ते हभप कोणीही तर ऐकवत नाहीत. किती बोलतात. शेवाळकरांसकट सगळेच. वैताग.
कबीर- नुसताच ऐकलाय.

>>ते हभप कोणीही तर ऐकवत नाहीत. किती बोलतात. शेवाळकरांसकट सगळेच. वैताग.

कमाल आहे ? बाकी लोकांचे जाऊ द्या पण निदान शेवाळकरांबद्दल तरी असे बोलू नका. Sad

रैना, भिड्यांची ज्ञानेश्वरी बघ. मी आयडीअल वाल्याला सांगितले होते की मला सहज समजेल अशी ज्ञानेश्वरी हवी आहे त्यांनी मला ती सुचवली. मी फक्त त्यांचे आजच्या मराठीत केलेले निरुपणच वाचले सुरुवातीला. एकदम ओघवती आणि सोपी भाषा आहे. मग जमेल तशा मूळ ओव्या वाचायच्या आणि त्यात बुडून जायचे.

खुप सुंदर लेख!
माँक वाचलंय...बाकीची शोधते. इतर पुस्तकांची यादी पण टाकावी Happy

छान लिहीलय,
अन तस तर पहिल्याप्रथम येऊन जामोप्यानेच सर्टीफिकेट दिलय म्हणल्यावर बघायलाच नको. Proud आयमीन, मी अजुन वेगळ छान छान वगैरे म्हणायची गरजच नाही! Wink

जिथे एक छोटासाच पण टुमदार निसर्ग एव्हडेच त्याच्या सोबतीला असतो तिथे मग अगदी सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळी पाखरांची, पक्षांची किलबील, एखाद्या मंद वाहणार्‍या झर्‍याचे पाणी, सागराची गाज, ऊंच डोंगरावरील एखाद्या टेकडीवरून अनुभवलेला वारा, एखाद्या दरीतून ऐकू येणारा नाद, किंवा निव्वळ निरभ्र आणि टीपूर चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली निवांत पहुडताना झालेला संवाद... अशा ठिकाणी अशा वेळी देखिल रूढ अर्थाने कुठलाही जप, ध्यान न करता कुठल्यातरी सुकून, आत्मशांती देणार्‍या शक्तिशी तादात्म्य झाल्याचा अनुभव आपण घेत असतो.>>>>>>
अगदी १००% सहमत. लेख आवडला.

ओघवत्या भाषेत आणि अट्टाहास न करता लिहिलेला लेख Happy
प्रत्येकानी स्वताहा अनुभव घ्यावेत... दुसर्यावर अविश्वास न दाखविता हे बरे.
आणि पुस्तके वाचायचि असतील तर
नर्मदे हर हर -- जगन्नाथ कुन्टे
कालिंदी -- जगन्नाथ कुन्टे
साधनामस्त -- जगन्नाथ कुन्टे
धुनि -- जगन्नाथ कुन्टे

आणि ही बरीच आहेत....

मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धिंचे कारण | मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा ते ||१||
मने प्रतिमा स्थापिली | मने मना पूजा केली | मने इच्छा पुरविली | मन माऊली सकळांची ||२||
मन गुरु आणि शिष्य | करी आपुलेचि दास्य | प्रसन्न आपआपणास | गति अथवा अधोगति ||३||
साधक वाचक पंडित | श्रोते वक्ते ऐका मात | नाही नाही अनुदैवत | तुका म्हणे दुसरे ||४|| तुकाराम गाथा - अभंग क्र. २९१.

अभिनिवेश नसलेला लेख प्रामाणिकपणामुळे आवडला. माणसाला भावना आहेत तोपर्यंत श्रद्धा कुठेतरी असतातच. श्रद्धा अंधश्रद्धा अश्रद्धा या बाबी मनोव्यापाराचा भाग आहेत. त्या चालूच राहाणार.

>>आणि पुस्तके वाचायचि असतील तर
नर्मदे हर हर -- जगन्नाथ कुन्टे
कालिंदी -- जगन्नाथ कुन्टे
साधनामस्त -- जगन्नाथ कुन्टे
धुनि -- जगन्नाथ कुन्टे
आणि ही बरीच आहेत....

बरीच...? कुणाची.... कुंट्यांची...? Happy

छान लेख !

<<कधी कधी या वरील ध्यान धारणा प्रकरणापैकी एखादी करून पाहिली तर काही काही गमतीशीर अनुभव देखिल येतात. ऊ.दा. एखादी भविष्यात घडणारी गोष्ट दिसणे (जी नंतर घडून गेली की आपल्याला आठवते अरे हे तर आपण आधी पाहिलेले...), एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी बातमी आधीच कळणे, किंवा काही काही आधी न पाहिलेल्या व्यक्ती, शब्द, देखावे ई. दिसणे.. याला बरेच लोक सिक्स्थ सेंस (अतींद्रीय ज्ञान) म्हणतात, तर वैज्ञानिक, वा मानसशास्त्र तज्ञ याला प्रकाश-ध्वनी-लहरींचे चित्रखेळ वगैरे असेही म्हणतात.. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" असेही म्हणतात... तर "माझ्या ध्यानी मनी नव्हते आणि अचानक घडले" असेही आपण ऐकतो.>>

असे अनुभव अनेकांना येतात .मलाही येतात ................!

एरवी ज्या गोष्टी आपले आई वडील, वा साधू सज्जन आपल्या भल्या साठी सांगतात त्याच गोष्टि मात्र रॉबीन साहेबांच्या "मिठ्ठास" बिझिनेस भाषेतून ऐकायला >>>>>>>>
अर्थातच! साधु सज्जन, आई वडील सांगतात ते अंधश्रद्धेतुन..न्युयॉर्क टाईम्स किंवा इतर कुठे पाश्चात्त्य माध्यमात आले तर त्यात काहीतरी तथ्य आहे Happy असो.

फार सुंदर लेख. निवडक १० त.

पेशवा,
धन्स रे!..

मनस्मी,
धन्यवाद!
>>न्युयॉर्क टाईम्स किंवा इतर कुठे पाश्चात्त्य माध्यमात आले तर त्यात काहीतरी तथ्य आहे ...

दुर्दैवाने "stamped by west" ही कसोटी अनेक शतके आपल्याकडे मानली गेली हे खरे आहे पण त्याचे कारणही तितकेच खरे आहे की अशा सर्व अनुभव, भूमिका, पूर्वपिठीका ई. सापेक्ष अनुभवांना ऊपलब्ध वैज्ञानिक साहित्य, सिध्दांत, ई. च्या आधारावर तपासून पहाण्याचे काम ('ऊपद्व्याप') हे बहुतांशी पाश्चिमात्य जगतातच अधिक केले गेले आहे.. हे खरे तर कौतूकास्पदच आहे आणी त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. जे ऊपलब्ध व 'ज्ञात' ज्ञान आहे ते अधिक वाढवण्याचे व अधिक सजग व सबळ करण्याचे शास्त्र म्हणजेच विज्ञान अशी व्याख्या मान्य केल्यास खरे तर असे अनेकानेक प्रयोग अजूनही व्हायला हवेत...

असो.

विषय निघालाच आहे तर, मुळात या बाबतीत आपली भारतीय मानसिकता ही चिकीत्सक नसून अनुकरणात्मक, भावनाप्रधान, वा श्रध्दाळू (अंधश्रध्दाळू?) अशी असल्याने अशा अनेक विषयांच्या मूळ गाभ्यात न शिरता आपण निवळ वरवरचे (ऊथळ) अनुभव यातच समाधान मानत आलो आहोत असे मला वाटते. हे सर्व 'आमच्या पुराणे, ऊपनिषदे, ई.' मध्ये अगदी 'य' काळापूर्वी सांगून ठेवलेले आहे असे अभिमानाने सांगताना मात्र त्यावर प्रयोग वा त्याच्यापुढे जाऊन काही वेगळे गवसते का हे पहाण्याचा दृष्टीकोन पिढ्यानपिढ्या आपल्या जनुकात कधीच जाणिवपूर्वक विकसीत केला गेला नाही... फार कमी ऊदाहरणे (संस्था, व्यक्ती, समाज) अपवादाने आढळतील जे याच्या तळाशी जाऊन काही प्रयोगशील विचार व वस्तूनिष्ट परिमाणे ऊपलब्ध करून देऊ शकतील.. आपला समाज "xx चालीसा" मध्येच अजूनही अडकून पडला आहे.. "दिव्य अनुभूती' यालाच आपल्या संस्कृतीक/अध्यात्मिक जडण घडणीत अधिक महत्व दिले गेले आहे.. "भिऊ नकोस कुणितरी xx तुझ्या पाठिशी आहे" एव्हड्यावर आपण समाधानी आहोत..
ते चूक आहे असे नाही पण, मात्र त्याच्या पलिकडे काय, याचा विचार आपण फारसा केलेला नाही.. असे (स्वानुभवावरून) म्हणावेसे वाटते.

त्यामूळे खरे तर या अशा विषयात एक मोठ्ठी संशोधन संधी आपण वाया घालवली याची खंत आहे.. आणि अर्थातच its not career making field in true sense... but if you know how to 'market and talk' then you can earn millions in this same field असा विरोधाभास आहे. आणि अशी अक्षरश: अनेक 'दुकाने' आपण आपल्या भोवतीच पहातो.. त्यामूळे या प्रांतात, एकतर चांगली अनुभूती किंवा फसवणूक ही दोनच टोके आपल्या वाट्याला येतात; संतुलीत विचार व संतुलीत विवेक मात्र अपवादानेच आढळतो.

गंमत म्हणजे एखादा ऊच्चशिक्षीत पदवीधर, डॉक्टर, ईंजीनीयर, बिझिनेसमन, वगैरे लोक्स या असल्या प्रांतात शिरले की त्याला authenticity देण्याची एक विचीत्र खोड आपल्या समाजाला आहे.. MBA/MS/Dr असा 'बाबा/साधू/सन्यासी' आपल्याला आधिक खरा, अपिलींग वाटतो.. Happy ईथेच सगळा झोल आहे. 'लेबलींग' हे आपल्या रक्तात आहे...

असो.. 'रेकी' या प्रकाराबद्दलही मला बरेच आकर्षण आहे.. कुणि एकाने आपल्याच जागी बसून जगाच्या कोपर्‍यात असणार्‍या दुसर्‍या कुणाला 'सकारात्मक ऊर्जा' देणे हे त्या रेकीचा कंसेप्टच मला भन्नाट वाटतो.. निवळ free flowing energy च्या संदर्भाने हे असे होवू शकते हे गृहीत धरले तरी देखिल एकंदर निव्वळ स्पर्श न करता (ऊर्जा देण्यासाठी काहितरी माध्यम आवश्यक असते असे म्हणतात!) हे असे काही करणारे आहेत व तसे अनुभव असणारे लोकं आहेत हे सर्व 'गूढ' या विभागात मोडते...

तेव्हा एकंदरीत हे सर्वच "जे पिंडी ते ब्रह्मांडी' वगैरे असल्या अवजड भाषेत आपल्या कानावर पडत असते. कुणास ठावूक, अजून काही वर्षांनी आपल्या स्मार्ट फोन वर एखादे असे अ‍ॅप ऊपलब्ध होईल ज्याद्वारे या अशा अनेक 'गूढ' गोष्टींची अनुभूती, विश्लेषण हे आपल्या 'हातात' ऊपलब्ध होईल.. अर्थात तसा शोध व ऊपकरण हे कुठल्या देशात होण्याची शक्यता अधिक हे वेगळे सांगायला नकोच.. Happy

sky is the limit or may be not the limit अशा जागी आज तंत्रज्ञान येऊन ठेपले आहे... तेव्हा हे सो कॉल्ड ब्रंम्हांड आपल्या फोन वर ऊपलब्ध झाले तर नवल वाटायला नको. तसे झालेच तर अश्या काही गोष्टी भविष्यात शक्य होतील का:
१. मोबाईल वरून गेलेल्या/मृत व्यक्तींशी बोलणे.. संवाद साधणे.
२. एखादे अ‍ॅप वापरून आपले मागचे जन्म याबाबत चक्क एखादी व्हिडीयो फाईल पहाणे..
३. रोज रात्री झोपताना आपल्या अख्ख्या मेंदूचे बॅक अप बनवणे व रोज दुसरे दिवशी ते रिस्टोर करणे- (स्मृतीभ्रंश, अल्झायमर वगैरे गायबच होतील..)
४. स्वप्ने, भविष्यातील घटना दिसणे ई. ची सचित्र/व्हिडीयो नोंद करता येणे..
५. आणि ईतरही बरेच काही...

थोडक्यात अजूनही अनेक अज्ञात गोष्टि आहेत... अलिकडेच अंतराळातून (सर्वात जास्त उंचावरून) फ्री फॉल चा विक्रम नोंदवणार्‍या फेलिक्स चे एका मुलाखतीत ऐकलेले शब्द अजूनही मनात घर करून आहेतः
"sometimes you have to be really at the top of the world to understand how small you are and you become so humble.. "

निव्वळ जपजाप याद्वारे आम्ही मंगळ, शुक्र ई. ग्रहांवर जाऊन आलो याच्या बढाया मारणारे व पुस्तके छापणार्‍यांपेक्षा फेलिक्स हा मला खरा 'कर्मयोगी' साधक वाटतो.. रूढार्थाने, पृथ्विवरील तमाम बाबा, गुरू, माई, बापू, ई. सर्वांनी त्याचे पाय धरावेत ईतक्या ऊंचीवर तो नक्कीच पोचला नाही का? Happy आणि तेही थेट आपल्या डोळ्यादेखत- "लाईव्ह"!!! हेच ते विज्ञान आणि त्या ऊंचीवर पोचल्यावर फेलिक्स ला जाणवलेले, त्याला ऊमगलेले, त्याने अनुभवलेले, तेच ते सूक्ष्मतत्व किंवा आत्मतत्व!!
बाकी सब कही सुनी............

ज्या समर्थांनी निर्मनुष्य जंगलातून कठोर तप केले त्याच समर्थांनी एक सोप्पा ऊपायही सांगून ठेवलायः

"मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दींचे कारण"

आण्णा, अहो ते तुकोबांचेच आहे, हे पुन्हा एकदा सांगतो..

ऐका जरा.... उगाच गरीब बिचार्या तुकोबांच्या काव्यावर डल्ला मारु नका. बदला ते.

तुमच्या यमनियमात अस्तेय शिकवत नाहीत का? अस्तेय म्हणजे ढापणे, पाप आहे.

यम नियम अस्तेय न पाळता लगेच मोक्षाला गाडी गेली की तुमची ! Proud

योगः मूळ लेखाएवढीच वरची पोस्टही जबरदस्त! अगदी क्रमशः असल्यासारखा.

अध्यात्मात वा पारंपारीक संस्कृतीतून आलेल्या बर्‍याच गोष्टी आधुनिक physical science च्या placebo controlled double blinded clinical study च्या निकषाने पडताळून पाहता येत नाही वा ती याच निकषात फिट्ट बसली पाहिजे असा आग्रह धरण बरोबर का?

रेकीचा उल्लेख तुमच्या पोस्टीत आहे---मी रेकीच्या धाग्यावर त्याबद्दल लिहल आहे. माझा अनुभव खूप छान आहे. तुमचे विचार ऐकायला खूप आवडतील.

कर्मयोगी साधक्! प्रकाशभाउ- आणि मंदाताई आमटे आमच्या घरी दोन्-तीन दिवस रहायला होत्या. त्या दोघांचा परंपारिक देव या संकल्पनेवर विश्वास आहे के नाही ठाउक नाही (नसावा असा माझा अंदाज आहे) पण त्यांच्या कार्याचा अवाका, त्यांची कामावरची अढळ निष्ठा, आणि कसलाही आव नसलेली कामातली सहजता बघून divinity divinity म्हणतात ती हीच याची जबरदस्त अनुभुती मला आणि नवर्‍याला आली. मनुष्यप्राण्याला चुकूनही नमस्कार न करणारा माझा नवरा--त्यांने भरल्या डोळ्याने दोघांना साष्टांग नमस्कार घातला!

योग,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

तुम्ही मांडलेल प्रश्न मलाही एके काळी पडले होते. त्याची थोडीफार संगती एके ठिकाणी लागली.

प्रा. राजीव मलहोत्रांच्या भाषेत सांगायचं झालं तर असं सांगता येईल :
This essay argues that intellectual svaraj (self-rule) is as fundamental to the long term success of a civilization as is svaraj in the political and financial areas. Therefore, it is important to ask: whose way of representing knowledge will be in control?

मूळ लेख (इंग्रजी दुवा) लांबलचक आहे, तरीपण वाचून पहावा असं सुचवेन. Western Classics आणि Indian Clssics यांचं तौलनिक स्थान नेमक्या शब्दांत मांडलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages