दिवेआगर
दिवेआगरबद्दल अनेक दिवसांपासून ऐकून होतो.. तिथे सापडलेला सोन्याचा गणपती आणि स्वच्छ किनारा.. सगळ्यांकडूनच कौतुक ऐकले होते.. त्याबरोबर हेही, की तिकडे भरपूर गर्दी असते. हा दिवेआगर महिमा ऐकून तिकडे सुट्टी मिळाली की जायचेच असे ठरवले होते. त्याप्रमाणे डिसेंबरमधेच बूकिंग करून २४-२७ जानेवारी (२००८)मध्ये दिवेआगरची एक सुंदर सफर करून आलो. जाण्याआधी रस्ता, रूट, तिकडे अजून पहाण्यालायक स्थळे यासाठी नेटवर बराच सर्च मारला होता. पण समाधानकारक माहिती नव्हती मिळाली. त्यासाठी आणि एका अप्रतिम ट्रिपची उजळणी म्हणूनही हा लेखनप्रपंच.
पुण्याहून दिवेआगरला स्वत:च्या चारचाकीनी सर्वात सोपा रस्ता म्हणजे ताम्हिणी घाटातून. घाट ओलांडून आपण थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येतो- माणगाव या ’जंक्शन’ला. माणगाव जंक्शन अशासाठी की इथूनच कोकणात जायला अनेक फाटे फुटतात. त्यातला आपण ’म्हसाळा’हा फाटा घ्यायचा- म्हसाळ्यावर तेव्हाही दिवे आगर दिसत नाही, आपण दिशा पकडायची श्रीवर्धनची. मग श्रीवर्धनच्या बरंच जवळ पोचल्यानंतर दिवेआगरला जायला अचानक फाटा लागतो आणि आलं आलं म्हणेपर्यंत दिवेआगर येतंच! पुणे-माणगाव साधारणपणे १२० कि.मी. आणि माणगाव-दिवेआगर साधारण ४५ कि.मी. असे आटोपशीर १७० कि.मीच्या आत आपण चार-साडेचार तासात एका रम्य ठिकाणी पोचतोही.
पण कधी नव्हे ते सुट्टीला बाहेर पडलो होतो म्हणून आम्ही जरा फिरून गेलो.. आम्ही उलटा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे गाठला. हायवेवर दुसर्या टोलनाक्याआधी ’पाली’ला जायला एक्झिट आहे.. ते घेतलं. पालीला बल्लाळेश्वराचं सुरेख दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. एका नयनमनोहर वळणावळणाच्या रस्त्यावरून आम्ही पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाला लागलो.. थोड्या वेळानी माणगाव आणि मग पुढे तोच रस्ता.. अर्थातच पुण्याहून उलटं गेल्यामुळे हे अंतर पडतं साधारण २३० कि.मी. पण चांगल्या रस्त्यांमुळे वेळ साधारण तेवढाच लागतो. सकाळी लवकर नाश्ता करून घराबाहेर पडले तर वाटेत एक चहा ब्रेक घेऊन गरम गरम जेवायला आपण दिवे आगरमधे असतो!
दिवेआगर हे श्रीवर्धन तालुक्यातील एक टुमदार गाव. गावाची लांबी साडेचार कि.मी आणि रुंदी दीड कि.मी. इतका छोटसा जीव याचा. हे गाव इतकं उजेडात कसं आलं? तर, गावात ग्रामदैवतासारखं एक गणपतीचं देऊळ आहे. जवळच्या ’बोर्ली-पंचतन’ या गावातल्या द्रौपदी धर्मा पाटील यांचीही बाग या देवळाच्या मागे आहे. पावसाळ्यानंतर, नव्हेंबर १९९७ मधे बागेत खताचं, झाडांना आळी करण्याचं काम चालू होतं. आणि असं खोदताना अचानक एका सुपारीच्या झाडाखाली ’खण्ण्’ असा आवाज झाला.. कसला आवाज म्हणताना काळजीपूर्वक खोदले असतां चक्क एक तांब्याची पेटी, साधारण जुन्या काळातल्या ’ट्रंक’ असतात ना, तशी मिळाली. तिच्याच एका कोपर्यात खोदताना पहार बसली होती. पेटीला कुलूप होतं. ’पेटी सापडली’ ही वार्ता त्या इवल्याश्या गावात वार्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठीत मंडळी, पोलिस सगळे आले. सर्वांसमक्ष पेटीचं कुलूप तोडण्यात आलं. सर्वांनाच ’आत काय आहे?’ याची उत्सुकता.. खजिनाबिजिना असला तर? आणि खरंच एक खजीनाच लागला हाती. आत होता गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्या डब्यात होते गणपतीचे अलंकार!!! समस्त लोकांनी आश्चर्यानी तोंडात बोटं घातली. हे तर आक्रितच होतं. लोकांचे जथ्थेच्या जथ्थे लोटले हे पहायला.
आता खरंतर ’पुरलेलं धन’ सापडलं तर ती असते सरकारी मालमत्ता. हे असं ऐतिहासिक महत्त्व असणारं धन सरकारदरबारी नोंद होऊन जातं दिल्लीच्या अथवा कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात. आता हा मुखवटा आणि दागिने इतके लांब गेले तर पुन्हा पहायचे कधी? आणि जाणार कोण ते पहायला? मोठाच प्रश्न होता.. पण सापडली, त्यात एक वाट सापडली! असाही कायदा आहे म्हणे की जमिनीखाली ३ फूटांपर्यंत असं काही धन सापडल्यास त्याची मालकी मूळ मालकाकडेच रहाते. पण त्या खाली धन सापडलं, तर ते सरकारचं! आता पेटी तर लगेचच खाली सापडली होती. त्यामुळे तिची मालकी सुदैवानी द्रौपदी धर्मा पाटीलांकडेच राहिली. या कामी तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी बराच पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले- हा मुखवटा जिथे ठेवला आहे त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली- ’महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने’!!!
मुखवटा आहे कसा? तर त्याला मुकुट आहे.. आणि आपल्याकडे दिसतो तसा छोटा मुकुट नाही, तर दक्षिणेत दिसतो तसा उंच मुकुट आहे.. मुकुट, चेहर्याचा भाग, खांदे आणि सोंड असा साधारण २६ इंच लांबीचा मुखवटा आहे.. तो मूळ दगडी मूर्तीवर अगदी ’फिट्ट’ बसतो! सोबत जे अलंकार आहेत तेही दाक्षिणात्य पद्धतीचेच आहेत.. छोट्या मोहोरांसारखा हार, बिंदल्या वगैरे.. आणि हे दागिने मुखवट्यावर चढवण्यासाठी मुखवट्यावर योग्य जागी भोकंही पाडली आहेत! मुखवटा आणि दागिन्यांच्या कारागिरीवरून हे काम दक्षिणेतल्या सोनाराने केलं असावं असा अंदाज आहे. सोनं असं शुद्ध आहे की कित्येक हजार वर्ष जमिनीखाली पुरलेलं असूनही त्यावर एकही डाग नाही! सापडल्यावर केवळ रिठ्याच्या पाण्यानी मुखवटा साफ केला आणि तो पुन्हा झळाळू लागला. तेच दागिन्यांबाबतही. मुखवट्याचे वजन आहे १ किलो ३०० ग्रॅम आणि दागिने आहेत २८० ग्रॅम वजनाचे.
हे सर्व तांब्याच्या पेटीत ठेवल्यामुळे हाती लागले. लोखंडी पेटी असती तर गंजली असती, लाकडी असती तर कुजली असती. तांब्याची असल्यामुळे त्याला गंज, कीड लागली नाही. झाकणावर कडी आहे , जेणेकरून ती पेटी खाली दोराच्या सहाय्याने सोडता येईल. हा मुखवटा म्हणजे त्या काळी गावाची प्रतिष्ठा असेल. तो परकीयांच्या, शत्रूच्या हाती लागू नये म्हणून एवढा बंदोबस्त. अजून एक प्रश्न पडतो की ही पेटी आधी कशी काय सापडली नाही? तर ही पेटी ज्या झाडाखाली सापडली तिथे एक आंब्याचं झाड होतं- खूपच मोठा विस्तार होता त्याचा. ते झाड काढलं आणि तिथे सुपारीचं छोटं रोप लावलं. त्या रोपालाच खळं करतांना हे धन हाती लागलं. रोज संध्याकाळी मंदिरात आरती असते. नेहेमीच्या आरत्यांबरोबरच खास दिवेआगरच्या गणपतीची एक आरती असते, ती खूप श्रवणीय आहे. तिथे श्री. विजय ठोसर म्हणून एक गृहस्थ आहेत, ते ही गणपतिची कथा अगदी रंगवून सांगतात. (गणपतीचे फोटो काढायची परवानगी नाही :()
खुद्द दिवेआगर हे गाव अगदी टुमदार आहे. अप्रतिम, अस्पर्श आणि सुरक्षित समुद्रकिनारा हे त्याचं वैशिष्ठ्य. किनाराही अगदी विस्तीर्ण आहे. किनार्यावर अजूनतरी भेळ, पेप्सी, लेजवाली मंडळी नाहीयेत, त्यामुळे किनारा स्वच्छही आहे. संध्याकाळी, थोडं ऊन उतरल्यावर समुद्रावर यावं, पाण्यात मनसोक्त खेळावं, डोळे निवेस्तोवर सोनेरी रंगाची जादू पहावी आणि घरी अप्रतिम रुचकर जेवणाचा स्वाद घेण्यासाठी परतावं!
दिवेआगर हे तसं संपन्न गाव. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केलीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत, त्यामुळे दूध-दुभतंही पुष्कळ. घरं मोठी, घरामागे बागा आणि शेजारी परसू, गोठा, मोकळी जागा इत्यादि. इथे रहायची सोय ही अशी घरीच होते. कमर्शियल हॉटेलं वगैरे नाहीत. पाहुण्यांसाठी सर्व सोय़ीयुक्त वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. आपले ’होस्ट’ आपल्या चहा, नाश्त्याची सोय करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण मिळतं. अतिशय रुचकर, गरमागरम जेवण सगळ्यांकडे मिळतं. फ़क्त आधी सांगावं लागतं. दिवे आगरमधेच ’रूपनारायण’ हे विष्णूचे मंदिर आहे. एका अखंड शीळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. तसंच शंकराचं ’उत्तरेश्वर’ म्हणून एक देऊळ आहे. या दोन्ही मंदिरांची नव्याने बांधणी सुरु आहे. यासाठी शासनाकडून त्यांना अनुदानही मिळाले आहे. लवकरच दोन प्रशस्त आणि सुरेख मंदिरं ही गणपतीच्या देवळाबरोबीनी इथली आकर्षणं होणार आहेत.
दिवेआगरहून श्रीवर्धन १६ कि.मी आहे आणि त्याच दिशेनी हरिहरेश्वर आहे ३२ कि.मी. हरिहरेश्वराचा किनारा साहसी आहे, पण त्यामुळेच त्यावर आता जाऊ देत नाहीत. अनेक तरूण मुलांनी वेड्या साहसापायी तिथे जीव गमावला आहे. पण किनारा अगदी मनोहर आहे. शंकराचं दर्शन घेऊन श्रीवर्धनच्या किनार्यावर आपण जाऊ शकतो. श्रीवर्धनचा किनारा दिवेआगरसारखाच शांत आहे, फक्त लांबी कमी आहे. त्यामुळे तोही पोहायला लोकप्रिय आहे. श्रीवर्धन तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथे गर्दी असते. शिवाय ’स्टॉल’ही आहेत सर्व प्रकारचे.
श्रीवर्धनहून परततांना अवश्य ’शेखाडी’मार्गेच दिवेआगरला परतावे. शेखाडी या गावाच्या मागेच समुद्र आहे, आणि तो पूर्ण रस्ता केवळ समुद्राकाठून दिवेआगरला थेट जातो.. ही अगदी परदेशात समुद्राच्या काठाची ’राईड’ असते तशीच आहे. केवळ सुरेख. सूर्यास्ताच्या वेळी गेलं तर ह्या अश्या अप्रतिम दृश्याचे आपण साक्षीदार होतो.. केवळ मंत्रमुग्ध!
तसंच, दिवेआगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्याजवळ पोचतो. हो, जवळच. किल्ल्याच्या आत पोचण्यासाठी अजून एक दिव्य करायला लागतं. ते म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून साधारण १०० फूटांवर आपण आलो की मोटर लाँचवरून आपली रवानगी साध्या होडीत होते आणि ही होडी किल्ल्याच्या पायर्यांपर्यंत आपल्याला पोचवते. येताना तसंच- आधी होडी, मग तिच्यातून लाँचमधे ट्रान्स्फर. आणि हे बर्यापैकी घाबरवणारं असतं बरंका. समुद्रामुळे होडी आणि लाँच सतत हेलकावे खात असतात. त्यातच आपण उड्या मारून इकडून तिकडे पटकन जायचे. परत पब्लिक इतका गोंधळ घालतं- मी आधी, मी आधी करत सगळे एकाच वेळी चढण्याची किंवा उतरण्याची घाई करतं. यामुळे होडी पलटी होण्याचीही शक्यता असते.
किल्ला मात्र प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष आहे. हा एकमेव सागरी किल्ला आहे तो कायम अजिंक्य राहिला. पुरातत्व खात्यानी ’ऐतिहासिक वास्तू’ म्हणून तिकडे एक बोर्ड चिकटवला आहे. त्यानंतर काहीही केलेले नाही. आज ४०० वर्ष झाली, पण तिथे अजूनही बरेच अवशेष शिल्लक आहेत. गोड्या पाण्याचं तळं आहे. इथे थोडीशी डागडुजी केली, तर पुरातन वास्तूचे जतनही होईल आणि अजून लोक येतील.. पण सरकारी खाती इतकी जागरूक असती तर काय? असो! किल्ल्याच्या माहितीसाठी स्थानिक गाईड मिळतात आणि ते किल्ल्याची बर्यापैकी ओळख करून देतात.
तर आमची ही छोटी सफर फ़ारच सुरेख झाली. सर्वांनी आवर्जून दिवेआगरला भेट द्या. एक अनामिक मानसिक शांती मिळते तिथे. मात्र एक कळकळीची विनंती- समुद्र किनारा खराब करू नका, कचरा करू नका. किनारा स्वच्छ आहे, त्याला आपण तरी डाग लावायला नको. दिवेआगरमधे जागोजाग लिहिलेल्या या पाटीवरच्या सूचनांचे आपण पालन नक्कीच करूया. हॅपी जर्नी!
(हा लेख १ वर्षापूर्वीचा आहे)
खरंच, दिवे
खरंच, दिवे आगर सगळ्यांना आवडेल असंच ठीकाण आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता, यंदा जमवाच, पण शक्यतो उन्हाळा नको... गर्मी आणि लोडशेडींग- दोन्ही खूप असतं.. पावसाळ्यानंतर बघा..
दक्षिणे, आता एकदा अवश्य जाऊन ये, पुन्हा पुन्हा जाशील अशी जागा आहे..
किरू, काय फोटो आहेत वाह! ह्या नारळी-सुपारीच्या बागांचा, अगदी केळफुलाचाही फोटो मी काढलाय.. आणि सूर्यास्ताचे तर अगणित! वेड लागल्यासारखंच होतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च सही! कसली भाग्यवान आहेस तू!
मुलांना चांगल्या गोष्टी बरोब्बर कळतात, नाही? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
उपासा, हो रे.. छोट्या गावी रहायला मलाही आवडतं.. पण पोटापाण्याचा प्रश्न आहे, दुसरं काय?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि शांत समुद्र यामुळे हे गाव हिट्ट आहे
आणि काय जेवण! पोतनीसांकडे काही गोरे आले होते सुरमई मसाला खायला.. तिखटामुळे चेहरे लाल झाले होते, पण 'more, more' करत होते
आणि नाश्त्याचे हातसडीचे पोहे, शाकाहारी थाळी सगळंच ए वन! मी तर थकत नाही त्या आठवणी काढताना..
खरंच, ग्रूपने गेलो तर धमाल येईल
पण किमान दोन दिवस तरी हवेत..
सुरमई आणि
सुरमई आणि हातसडीचे पोहे.. अगदी ओ येईस्तोवर खाल्ले होते. नारळापोफळाची वाडी असलेल्या एका बाबांकडे राहिलो होतो.. अविस्मरणीय अनुभव. कोकणातली बहूतेक सगळी ठिकाणे बघितली, पण दिवेआगर सर्वांत अप्रतिम.
छान वृत्तांत आणि माहिती, पूनम..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगले
चांगले लिहीलयस पूनम.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
एकदाही कोकणात गेलेले नाहीये मी.
psg..खूपच छान
psg..खूपच छान लिहिले आहे आपण.... दिवेआगर चा समुद्र किनारा फारच अप्रतिम आहे..
दिवेआगर जर कुणी जायचा प्लॅन करत असेल, तर १ दिवसाचा स्टे नक्की करावा..
दिवसभर समुद्र किनारी मनसोक्त फिरायचे, आणि आल्यावर अस्सल कोकणी जेवणावर मनसोक्त ताव मारायचा...आणि झकास पैकी ताणुन द्यायचे..
कोकणातिल अजुनही सुंदर आणि शांत सुमुद्र किनार्यांपैकी एक, असे दिवेआगर चे वर्णन करता येइल..
पुण्या-मुंबै च्या लोकांसाठी मस्त वीकांत चा प्लॅन..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
मस्त आलेत
मस्त आलेत गं फोटु..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
खूप छान
खूप छान लिहिलं आहेस गं पूनम.....!! फोटो तर एकदम बढिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्याच लोकांनी सांगितलंय की दिवे आगर ला नक्की जा म्हणून. तुझ्या लेखाने तर "जायचंच" अशी मोहर लागली
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
पूनम, मस्त
पूनम, मस्त प्रवासवर्णन आणि जोडीला सुंदर फोटो. गणपतीचाही बघायाला मिळाला असता तर!!!
दिवेआगर सारखीच हरिहरेश्वरलाही स्थानिकांच्या घरी रहायची आणि जेवायची सोय होते. लहानपणी आम्ही जायचो ते आठवलं.
मस्त फोटो
मस्त फोटो आणि प्रवासवर्णन. पण आता वाटतंय की दिवेआगार ही फक्त वाचायची नाही तर स्वतः बघायची गोष्ट आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |
पूनम,
पूनम, मस्तच. दिवेआगर खरच अप्रतिम आहे. जंजीर्याचे प्रवेशद्वार नाव तिथे पोचेपर्यंत दिसत नाही. हरीहरेश्वर देवस्थान तर अप्रतिम. तिथे समुद्राच्या लाटांमुळे खडकावर जे नैसर्गीक डिझाईन झाले आहे ते बघण्यासारखे आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांदण्याबद्दल अनुमोदक.
असो. तर गटग करायचे असेल तर खरच मस्त कल्पना आहे. मी लागेल ती मदत करायला तयार आहे. माझी मावस बहीण असते दिवेआगरला.
चलो दिवेआगर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी स्वत:
मी स्वत: दिवे आगार गेलो आहे फार दिवसान्पूर्वि पण तुमच्या वर्णनाने माझ्या त्या अप्रतिम आठ्वणीना उजाळा दिला....
धन्यवाद.
पूनम.. तुझे
पूनम.. तुझे दिवेआगारचे फोटो बघुन व प्रवासवर्णन वाचुन नक्कीच तिथे जायला हवे असे वाटते. माझ्या मागील भारतवारी मधे ही असली ठिकाणे बघायला मिळावित म्हणुनच सासवडपासुन कापुरवाळ घाट.. भोर.. वरंधा घाट असे करत कोकणात उतरलो व कोकणातुन प्रवास करत करत महड,दापोली,चिपळुण,हर्णे,मार्लेश्वर,सावंतवाडी असे मजल दरमजल करत गोव्याला गेलो होतो. त्याची आठवण आली तुझा लेख वाचुन.(गोव्यातला व्हेगेटॉर बिच सुद्धा थोडासा असाच दिसतो..)
अरुण तुला कोकणातली अशी बरीच ठिकाणे माहीत आहेत असे वाटते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किरु.. तुझे फोटो बघुन मला असलीच नारळी- पोफळिची बाग कर्देला बघीतलेली आठवली.. तुफान पाउस पडत होता कर्देला व त्या किनार्यावरच्या बागेत चवळीची आमटी( खोब्रे व अम्सुल्-गुळ घातलेली),भरली वांगी,चपाती,साधे वरण भात.. त्यावर साजुक तुप व पापड्-लोणचे असे रुचकर शाकाहारी जेवण आम्हाला मिळाले होते. वर झावळीच्या छतावर होत असलेली पावसाची रपरप, वार्यामुळे होणारी नारळी-पोफळिच्या पानांची सळसळ व बाजुलाच असलेल्या कर्दे सागरकिनार्यावरील.. उधाण आलेल्या समुद्राच्या लाटांचा खळखळणारा आवाज... ही आठवण मी कधीच विसरु शकणार नाही.. ती आठवण ताजी करुन दिल्याबद्दल किरु व.. पूनम तुलाही धन्यवाद..
मस्तच...
मस्तच... देशात गेल्यावर दिवे आगार ला जाणारच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूनम,
पूनम, वर्णन, फोटो मस्त. कीरु तु दिलेले फोटो पण मस्त आहेत. खरच जायला हवं एकदा तरी.
मि तसा
मि तसा श्रीवर्धनचा .............
त्यामुले खुप भावला हा लेख
फोटो आणि
फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख!
एकदा जायला हवे!
पूनम.. खुप
पूनम.. खुप छान वर्णन.. आभारी आहोत मस्तच्या मस्त फोटुबद्दल नि सविस्तर माहितीबद्दल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूनम,
पूनम, दिवेआगरची नव्याने ओळख करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!! छान माहीतीपूर्ण वर्णन केलयस!फोटोंनी बहार आली!!
किरू, तुमचे फोटो पण छान आलेत!
कोकणकी बात ही कुछ और है!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
------------------------------------------
क्यूं इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू
दुनिया सजी तेरे लिये, खुदको जरा पेहचान तू!
मागच्या
मागच्या वर्षी भारत भेटी त दिवे आगर च्या सूर्यास्ताचे काढलेले काही फोटो :).
वाह वाह...
वाह वाह... केवळ अप्रतिम! मस्तच. दिवेआगर भेट आता पक्किच ठरली.
पावसाळ्यात जायला कसे आहे दिवेआगर? पावसाळ्यातही रहायची सोय होत असेल ना तिथे?
अविकुमार, प
अविकुमार,
पावसाळ्यात आनंदी आनंद असणार.. भरपूर पाउस असतो ..इतक्या पावसात एंजॉय करणं अशक्य च !
हिवळ्यात जाणं सर्वात बेस्ट !
********** स्टाइल मे रहनेका !! ************
धन्यवाद
धन्यवाद डीजे.
वर मुकुंदने सांगीतलेल्या पावसाळ्यातल्या आठवणीने प्रेरीत होऊन पावसाळ्यात जावंसं वाटलं. मागे असाच एकदा पावसाळ्यात सिंहगडावर गेलो होतो आणि काय ते मस्त धुकं. मक्याचे भाजलेली कणसं, त्याचा तो भाजताना येणारा सुगंध, गरमागरम कांदा भजी... बाहेर पडणारा पाऊस.. आम्ही बसलेल्या पडवीत आमच्या शेजारीच चूलीवर भाजल्या जात असलेल्या भाकर्या.. झूणका.. असं वातावरण खरंच स्वर्गसुखाचा आनंद देतं.. म्हणूनच दिवेआगर एकदम निश्चित करुन टाकलं.. बघू पावसाळ्याच्या शेवटी शेवटी श्रावणात वगैरे जायची योजना करेन...
ए. वे. ए. ठी. पण जर झालंच तिथं तर मी हमखास असणार तिथे.... वरची प्रकाशचित्रंही तितकीच मनोहारी... वाऽऽह!
सुंदर फोटो
सुंदर फोटो आणि वर्णन.
बर्याच वर्षांपूर्वी आम्ही अशीच ट्रिप केली होती. त्यावेळी मुखवटा नुकताच सापडला होता. हरिहरेश्वर म्हणजे शंकर आणि विष्णु यांचे एकत्र देवस्थान. ओहोटीच्या वेळी तिथे एका छोट्या डोंगराला प्रदक्षिणा घालता येत असे. आम्ही केली होती ती. एक छोटासा दगडी जिना होता.
तिथेच काळभैरवाचे पण देवस्थान आहे.
वाटेतले म्हसळा हे कुप्रसिद्ध गाव म्हणजे मिनी पाकिस्तानच आहे. मुंबईतील बॉम्ब्स्फोटात वापरलेला दारुगोळा तिथे उतरवण्यात आला होता.
इथे फार पुर्वी एका ठिकाणी आपोआप दिवा लागत असे, आणि तो दूरवर दिसत असे, म्हणुन हे नाव. ( हा उल्लेख मला मारुति चितमपल्लींच्या एका लेखात सापडला होता )
हरिहरेश्व
हरिहरेश्वर आमचं कुलदैवत आहे त्यामुळे मोठी मंडळी अधून मधून जायची टूम काढत असतात.
सुरेख फोटो
सुरेख फोटो आणि अप्रतिम वर्णन.....
सूर्यास्ताचे फोटो पण मस्तच.
वाटेतले
वाटेतले म्हसळा हे कुप्रसिद्ध गाव म्हणजे मिनी पाकिस्तानच आहे. >>> अगदी अगदी दिनेशजी...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे म्हणजे अगदी जाणवण्या इतपत आहे
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
आजच
आजच द्वारकानाथ सावंताशी बोलुन बुकींग करून टाकलं .( क्षितीजा हॉलिडेज)
आता दिवे आगारला जावुन आल्यावरच पुढचा प्रतिसाद देइन.
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
पूनम ...
पूनम ... कोकण सफर घडवल्याबद्दल धन्स...
मागच्या दिवाळीत पुण्याला आलो होतो तेव्हा दापोली, हर्णै अशी ट्रीप झाली होती त्याची आठवण आली
जाणार
जाणार जाणार नक्की जाणार. पूनम, किरु, दिपांजली- छायाचित्र सुंदर. पूनम- माहिती बेष्ट.
आणखि काही
आणखि काही प्रकाश चित्रे......http://picasaweb.google.com/aherlekar44/DiveagarSunSet?authkey=Gv1sRgCPH...![IMG_0018_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u11698/IMG_0018_0.jpg)
एक नमुना...
दिवेआगरची
दिवेआगरची आणखी काहीं प्रकाश चित्रे......
Pages